शेअर करा
 
Comments
सृजनशीलता आणि ज्ञान अमर्याद :पंतप्रधान
गुरुदेव टागोर यांना बंगालच्या अभिमानाइतकाच भारताच्या विविधतेचाही अभिमान : पंतप्रधान
आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे महत्वाचे पाऊल : पंतप्रधान

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड जी, विश्व भारतीचे कुलगुरू प्रा. विद्युत चक्रवर्ती जी, शिक्षकवृंद, कर्मचारी वृंद आणि माझ्या उत्साही युवा मित्रांनो !

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी जी अद्भुत परंपरा माता भारतीवर सोपविली आहे, त्याचा एक भाग होणे, तुम्हा सर्व मित्रांशी जोडले जाणे माझ्यासाठी प्रेरणादायी देखील आहे, आनंददायी सुद्धा आहे आणि एक नवीन ऊर्जा निर्माण करणारे आहे. या पवित्र धरतीवर मी स्वतः तुमच्यात येऊन सहभागी होणे शक्य झाले असते, तर त्या गोष्टीचा मला अधिक आनंद झाला असता. पण ज्या प्रकारे नव्या नियमांचे अनुसरून सध्या करावे लागत आहे आणि त्यासाठीच मी प्रत्यक्ष उपस्थित न राहता, दूरस्थ पद्धतीनेच, आपणा सर्वांना नमस्कार करतो, या पवित्र धरतीला नमस्कार करतो. यावेळी तर काही दिवसांच्या अंतरानेच मला दुसऱ्यांदा ही संधी मिळाली आहे. तुमच्या आयुष्याच्या या सर्वात महत्त्वाच्या क्षणी तुम्हा सर्व युवा मित्रांना, आई – वडिलांना, गुरुवर्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो, अनेक अनेक शुभेच्छा देतो.

 

मित्रहो,

आज आणखी एक पवित्र निमित्त आहे, खूपच प्रेरणेचा दिवस आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व देशवासियांना, खूप खूप शुभेच्छा देतो. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी देखील शिवाजी - उत्सव नावाने शिवाजी महाराजांवर एक कविता लिहिली होती. त्यांनी लिहिले होते..

कोन् दूर शताब्देर

कोन् – एक अख्यात दिबसे

नाहि जानि आजि, नाहि जानि आजि,

माराठार कोन् शोएले अरण्येर

अन्धकार बसे,

हे राजा शिवाजी,

तब भाल उद्भासिया ए भावना, ताडित्प्रभावत्,

एसेछिल नामि –

``एकधर्म राज्यपाशे खण्ड

छिन्न बिखिप्त भारत

बेंधे दिब आमि.``

म्हणजे, एका शतकाच्याही पूर्वी, कोण्या एका दिवशी, मला तो दिवस आज आठवत नाही, कोण्या एका पर्वताच्या उंच कड्यावरून, कोण्या एका घनदाट अरण्यात, तो एक राजा शिवाजी.. काय असा विचार एका विद्द्युल्ल्तेच्या प्रकाशासारखा तुमच्या मनात आला होता का ? या वैविध्यपूर्ण धरतीला एका सूत्रामध्ये बांधले पाहिजे, असा विचार मनात आला होता का ? यासाठी काय मी स्वतःला समर्पित करावे का ? अशा ओळींमध्ये छत्रपती वीर शिवाजी महारांजापासून प्रेरणा घेत भारताची एकता, भारताला एका सूत्रामध्ये बांधण्याचे एक आव्हान होते. देशाच्या एकतेला मजबूत करणाऱ्या या भावनांना आपण कधीच विसरले नाही पाहिजे. क्षणोक्षणी, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर देशाच्या एकता – अखंडतेच्या या मंत्राला आपण लक्षात देखील ठेवले पाहिजे, आपण तो जगला देखील पाहिजे. हाच संदेश तर टागोर यांनी आपल्याला दिला आहे.

 

मित्रहो,

तुम्ही केवळ एका विश्वविद्यापीठाचा एक भाग नाही आहात, तर एका जिवंत परंपरेचे पाईक देखील आहात. गुरुदेवांना विश्व भारती हे केवळ एका विद्यापीठाच्या रूपात पहावयाचे असते तर त्यांनी याला ग्लोबल युनिव्हर्सिटी (जागतिक विद्यापीठ) किंवा अन्य कोणतेही नाव देऊ शकले असते. मात्र त्यांनी, याला विश्व भारती विश्वविद्यालय असे नाव दिले आहे. त्यांनी म्हटले होते की, "विश्व भारतीने इतरांना तिच्या सर्वोत्कृष्ट संस्कृतीचे आतिथ्य करणे आणि इतरांकडून त्यांचे सर्वोत्कृष्ट स्वीकारण्याचा हक्क देणे हे भारताचे बंधन आहे."

गुरुदेवांची विश्व भारतीकडून अपेक्षा होती की, या ठिकाणी जो ज्ञान ग्रहणासाठी येईल तो पूर्ण जगाला भारत आणि भारतीयतेच्या दृष्टीने पाहील. गुरुदेवांनी तयार केलेले हे प्रमाण ब्रह्म, त्याग आणि आनंदाच्या मूल्यांनी प्रेरित झालेले होते. म्हणूनच त्यांनी शिक्षणासाठी विश्व भारती हे एक असे स्थान बनविले, जे भारताच्या समृद्ध परंपरेला आत्मसात करेल, त्यावर संशोधन करेल आणि गरिबातील गरीब असलेल्यांच्या समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी काम करेल. हे संस्कार यापूर्वी येथून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मी पाहिलेले आहेत, आणि आपल्या सर्वांकडून देखील देशाची हीच अपेक्षा आहे.

 

मित्रहो,

गुरुदेव टागोर यांच्यासाठी विश्व भारती केवळ ज्ञान देणारी, ज्ञान दान करणारी एक केवळ संस्था नव्हती. भारतीय संस्कृतीच्या टोकाशी पोहोचण्याचे लक्ष्य गाठण्याचा हा एक प्रयत्न आहे, ज्याला आपण म्हणतो – स्वतःचा शोध घेणे. जेव्हा तुम्ही तुमच्या संस्थेच्या आवारामध्ये बुधवारी उपासनेसाठी एकत्र येता, स्वतःलाच शोधण्याचा प्रयत्न करीत असता. जेव्हा तुम्ही गुरुदेवांनी सुरू केलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असता, तेव्हा स्वतःची ओळख नव्याने करून घेण्याची एक संधी उपलब्ध होत असते.

 

जेव्हा गुरूदेव म्हणतात –

``आलो अमार

आलो ओगो

आलो भुबन भारा ``

तर हे त्या प्रकाशासाठी केलेले आवाहन आहे जो आपल्या चेतना जागृत करीत असतो. गुरुदेव टागोर असे मानत असत की, विविधता राहील, विचारधारा असतील, या सर्वांबरोबर आपल्याला स्वत्वाचा देखील शोध घ्यावा लागेल. ते बंगालसाठी म्हणत असत –

बांगलार माटी,

बांगलार जोल,

बांगलार बायु, बांगलार फोल,

पुण्यो हौक,

पुण्यो हौक,

पुण्यो हौक,

हे भोगोबन..

परंतु, बरोबरच ते भारताच्या विविधतेचा देखील तेवढाच गौरव मोठ्या कौतुकाने करीत असत. ते म्हणत असत –

हे मोर चित्तो पुन्यो तीर्थे जागो रे धीरे,

ई भारोतेर महामनोबेर सागोरो – तीरे

हेथाय दाराए दु बाहु बाराए नमो,

नरोदे – बोतारे,

आणि गुरुदेवांची ही दूर आणि भव्य दृष्टी होती की शांतिनिकेतनच्या मोकळ्या आकाशाखाली ते विश्वमानवाला बघत होते.

एशो कर्मी, एशो ज्ञानी,

ए शो जनकल्यानी, एशो तपशराजो हे !

एशो हे धीशक्ति शंपद मुक्ताबोंधो शोमाज हे !

हे कष्टकरी मित्रांनो, हे जाणकार मित्रांनो, हे समाज सेवकांनो, हे संतांनो, समाजातील सर्व जागरुक मित्रहो, या समाजाच्या मुक्तीसाठी एकत्र येऊन मिळून प्रयत्न करूयात. या आवारात ज्ञान मिळविण्यासाठी एक क्षण देखील व्यतीत करणाऱ्या प्रत्येकाचे हे उत्तम नशीब आहे की, त्यांना गुरुदेवांची ही दृष्टी मिळते आहे.

मित्रहो,

विश्व भारती तर स्वतःच एक ज्ञानाचा तो उन्मुक्त सागर आहे, ज्याचा पायाच अनुभवावर आधारित शिक्षणासाठी रचण्यात आला आहे. ज्ञानाची, कौशल्यतेची काही सीमा नसते, याच विचारांसह गुरुदेवांनी या महान विश्वविद्यालयाची स्थापना केली होती. तुम्हाला हे देखील नेहमी लक्षात ठेवावे लागेल की, ज्ञान, विचार आणि कौशल्य, स्थिर नाहीये, दगडाप्रमाणे नाहिये, तटस्थ नाहिये, तर जिवंत आहे. ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि यामध्ये दुरुस्तीची, सुधारण्याची संधी नेहमीच राहील, परंतु, ज्ञान आणि अधिकार या दोन्ही जबाबदारीबरोबरच येत असतात.

ज्या प्रकारे, सत्तेमध्ये असताना संयमी आणि संवेदनशील असावे लागते, तसे राहणे आवश्यक असते, त्याच प्रकारे प्रत्येक ज्यांच्याकडे अधिकार नाहीत, त्या प्रत्येक विद्वान व्यक्तीला, प्रत्येक जाणकाराला, देखील त्यांच्या प्रति जबाबदार असावे लागते. तुमच्याकडील ज्ञान हे केवळ तुमच्यासाठी नाही, तर समाजाच्या, देशाच्या आणि भावी पिढ्यांची देखील ती परंपरा आहे. तुमचे ज्ञान, तुमचे कौशल्य, एका समाजाला, एका राष्ट्राला गौरव देखील प्रदान करू शकते आणि ते समाजाला बदनामी आणि नष्ट होण्याच्या अंधारात देखील नेऊ शकते. इतिहासात आणि वर्तमानात अशी अनेक उदाहरणे आहेत.

तुम्ही बघा, जगभरात जी दहशत निर्माण झाली आहे, जगभरात जी हिंसा पसरत आहे, त्यांच्यामध्ये देखील कितीतरी उच्च शिक्षित, उच्च अभ्यासू, उच्च कौशल्य असणारे लोक आहेत. दुसऱ्या बाजूला असेही लोक आहेत, जे कोरोना सारख्या जागतिक महामारीतून जगाला मुक्त करण्यासाठी दिवस – रात्र आपले प्राण पणाला लावत आहेत. रुग्णालयांमध्ये तैनात आहेत, प्रयोगशाळांची आघाडी सांभाळत आहेत.

हा केवळ विचारधारेचा प्रश्न नाहिये, मूळ संकल्पना तर मानसिकतेची आहे. तुमची मानसिकता सकारात्मक आहे की, नकारात्मक यावर तुम्ही काय करता, हे अवलंबून असते. संधी दोन्हीसाठी आहे, मार्ग दोन्हीसाठी खुले आहेत. तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे मूळ बनायचे आहे की, एखादे उत्तर बनायचे आहे, हे ठरविणे आपल्या हातात असते. जर आपण त्या शक्ती, त्या सामर्थ्य, त्याच बुद्धी, त्याच वैभवाला सत्कारणी लावण्यासाठी हाती घेतले तर परिणाम एक प्रकारचा मिळेल, वाईट कामांसाठी याचा वापर केला तर परिणाम वेगळाच असेल. जर आपण केवळ स्वतःचे हित पाहात गेलो तर आपल्याला चोहोबाजूंना कायम केवळ संकटे दिसत राहील, समस्याच समोर येतील, निराशा दिसत राहील आणि आक्रोश दिसत राहील.

जर आपण स्वतःपेक्षा थोडे पुढे पाहू शकलो, आपल्या स्वार्थी मनोवृत्तीच्या पुढे डोकावून विचार करून नेशन फर्स्ट (राष्ट्र आधी) हा दृष्टीकोन ठेवून पुढे गेलो तर तुम्हाला प्रत्येक समस्येमध्ये उपाय शोधण्याची सवय लागेल, मार्ग आपोआपच समोर येतील. वाईट गोष्टींमध्ये देखील तुम्हाला चांगले शोधण्याची, त्याला चांगल्यामध्ये परिवर्तित करण्याची इच्छा निर्माण होईल आणि तुम्ही स्थितीमध्ये बदल घडवू शकाल, तुम्ही स्वतःमध्येच एक उपाय म्हणून तयार होऊ शकाल.

जर तुमचे विचार शुद्ध आहेत आणि निष्ठा माता भारतीच्या प्रति असेल, तर तुमचा प्रत्येक निर्णय, तुमचे प्रत्येक वागणे, तुमची प्रत्येक कृती कोणत्या ना कोणत्या उत्तराच्या दिशेने पुढे जाईल. यश आणि अपयश आपले वर्तमान आणि भविष्य ठरवत नाहीत. असे होऊ शकते की तुमच्या एखाद्या निर्णयानंतर तुम्ही जसे अनुमान केले असले, त्यानुसार अपेक्षित निकाल हाती येऊ शकणार नाही, परंतु, तुम्ही निर्णय घेताना घाबरू नये. एक युवक म्हणून, एक मनुष्य म्हणून जेव्हा केव्हा एखादा निर्णय घेताना तुम्हाला भीती वाटते तेच आपले सर्वात मोठे संकट असेल. जर निर्णय घेण्याचे धैर्य निघून गेले तर समजून घ्या की तुमची धडाडी संपुष्टात आली आहे. तुम्ही युवा नाही राहिलात.

जोपर्यंत भारतातील युवकांमध्ये काहीतरी नवे करण्याची, जोखीम पत्करण्याची आणि पुढे जाण्याची ऊर्मी असेल, कमीत कमी तोपर्यंत मला देशाच्या भविष्याची काळजी करण्याची गरज नाही. आणि जो देश युवा आहे, 130 कोटी लोकसंख्येमध्ये इतक्या मोठ्या संख्येने युवा शक्ती आहे, तेव्हा माझा विश्वास आणखी मजबूत होत जातो. आणि यासाठी तुम्हाला जो पाठिंबा हवा आहे, ते वातावरण हवे आहे, त्यासाठी मी स्वतः देखील आणि सरकार देखील.. इतकेच नाही, 130 कोटी संकल्पनांनी भरलेले, स्वप्नांना उराशी बाळगून जगणारा देश तुमच्या बाजूने उभा आहे.

 

मित्रहो,

विश्व भारतीच्या 100 वर्षांच्या ऐतिहासिक निमित्ताने जेव्हा मी तुमच्याशी संवाद साधला होता, त्या दरम्यान भारताच्या आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरतेसाठी तुम्हा सर्व युवकांच्या योगदानाचा उल्लेख केला गेला होता. येथून गेल्यानंतर, जीवनाच्या पुढील टप्प्यात तुम्हा सर्व युवकांना आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव मिळणार आहेत.

 

मित्रहो,

आज जसे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा आपल्याला अभिमान आहे, तसेच मला आज धर्मपाल यांचे स्मरण होत आहे. आज महान गांधीवादी धर्मपालजी यांची देखील जयंती आहे. त्यांची एक रचना आहे – The Beautiful Tree – Indigenous Indian Education in the Eighteenth Century

आज या पवित्र भूमीवर तुमच्याशी संवाद साधत असताना, मला असे वाटते की, त्यांचा उल्लेख मी निश्चितच केला पाहिजे. आणि बंगालची भूमी, उत्साही भूमीबद्दल बोलत असताना सहाजिकच माझी इच्छा होते की मी नक्कीच धर्मपाल यांच्या मुद्द्याला आपल्यासमोर मांडावे. या पुस्तकामध्ये धर्मपाल जी थॉमस मुनरो यांनी केलेल्या राष्ट्रीय शिक्षण सर्वेक्षणाचा अहवाल घेण्यात आला आहे.

1820 मध्ये झालेल्या शिक्षण सर्वेक्षणात काही अशा गोष्टी आहेत, त्या आम्हा सर्वांना आश्चर्यचकित करतात आणि त्या गोष्टींबद्दल आपल्याला अभिमान देखील वाटतो. त्या सर्वेक्षणात भारताचा साक्षरता दर खूप उंचावलेला होता. सर्वेक्षणात असेही लिहिले गेले होते की, कशाप्रकारे प्रत्येक गावामध्ये एकापेक्षा अधिक गुरुकुल होते. आणि ज्या गावांमध्ये मंदिर होते, ते केवळ पूजा – अर्चा करण्याची स्थान नव्हते, तर ते शिक्षणाला प्रोत्साहन देणारे, शिक्षणाप्रति प्रेरित करणारे होते, एका अतिशय पवित्र कार्याशी ही गावातील मंदिरे जोडली गेलेली होती. ते देखील गुरुकुलाच्या परंपरांना पुढे जाण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निरंतर प्रयत्न करीत असत. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक राज्यात त्या काळी महाविद्यालयांकडे खूप अभिमानाने पाहिले जात असे की कशा प्रकारे मोठे त्यांचे जाळे पसरलेले होते. उच्च शिक्षणाच्या संस्था देखील खूप मोठ्या संख्येने उपलब्ध होत्या.

भारतावर ब्रिटिश शिक्षण पद्धती लादली जाण्यापूर्वी थॉमस मुनरो यांनी भारतीय शिक्षण पद्धती आणि भारतीय शिक्षण व्यवस्था किती विलक्षण आहे, त्यांनी सांगितले होते, ही 200 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. याच पुस्तकात त्यांनी विल्यम अडम चा उल्लेख देखील आहे, ज्यांना 1830 मध्ये बंगाल आणि बिहारमध्ये एक लाखांहून अधिक ग्रामीण शाळा होत्या, ग्रामीण विद्यालये होती, असे लक्षात आले होते.

 

मित्रहो,

या गोष्टी मी तुम्हाला इतक्या सविस्तर अशासाठी सांगत आहे, की आपल्याला आपली शिक्षण व्यवस्था कशा प्रकारे होती, किती गौरवशाली होती, कशा प्रकारे ती प्रत्येक माणसापर्यंत पोहोचत होती, हे समजले पाहिजे. आणि त्यानंतर इंग्रजांच्या काळात आणि त्यानंतरच्या काळात आपण कुठून कुठे येऊन पोहोचलो आहे, आणि कशाचे काय होऊन बसले आहे, हे समजले पाहिजे.

गुरुदेव यांनी विश्वभारतीमध्ये ज्या व्यवस्था विकसित केल्या, ज्या पद्धती विकसित केल्या, त्या भारताच्या शिक्षण व्यवस्थेला पारतंत्र्याच्या बेडीतून मुक्त करून, भारताला आधुनिक बनविण्याचे एक माध्यम होते. आता आज भारतात जे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण बनले आहे, ते देखील जुन्या बेड्यांना तोडण्याबरोबरच, विद्यार्थ्यांना आपले सामर्थ्य दाखविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देते. हे शिक्षण धोरण तुम्हाला वेगवेगळे विषय शिकण्याचे स्वातंत्र्य देते. हे शिक्षण धोरण, तुम्हाला आपल्या भाषेत शिक्षण घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देते. हे शिक्षण धोरण उद्योजकता, स्वयंरोजगार यांना देखील प्रोत्साहन देते.

हे शैक्षणिक धोरण संशोधनाला, नाविन्याला बळ देत आहे, आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी हे शिक्षण धोरण देखील एक महत्त्वाचा टप्पा आहे. देशात एक मजबूत संशोधन आणि नाविन्यपूर्ण परिसंस्था तयार करण्यासाठी देखील सरकार सातत्याने काम करीत आहे. अलिकडेच सरकारने देश आणि जगाच्या लाखो जर्नल्सची मोफत उपलब्धता आपल्या विद्यार्थी आणि बुद्धिवतांना देण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षी अर्थसंकल्पात देखील संशोधनासाठी राष्ट्रीय संशोधन फांडेशनच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या 5 वर्षात 50 हजार कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

 

मित्रहो,

भारताची आत्मनिर्भरता, ही देशातील कन्यांच्या आत्मविश्वासाशिवाय शक्य नाही. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रथमच जेंडर इंक्लूजन फंडची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या योजनेमध्ये सहाव्या इयत्तेपासूनच सुतारकामापासून कोडिंगपर्यंत अशा अनेक कौशल्यपूर्ण गोष्टी, ज्या कौशल्यांपासून मुलींना नेहमीच दूर ठेवले गेले आहे, त्या मुलींना शिकविण्याची योजना आहे. शिक्षण योजना आखताना मुलींमध्ये शाळा सोडण्याचा दर जास्त असल्याचे लक्षात घेऊन, त्या गोष्टीचा गांभीर्यांने अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे अभ्यासातील सातत्य, पदवी अभ्यासक्रमातील प्रवेश घेण्याचा आणि बाहेर पडण्याचा पर्याय आणि प्रत्येक वर्षाचे क्रेडिट मिळेल, अशा नव्या प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

मित्रहो,

बंगालने पूर्वी भारताच्या समृद्ध ज्ञान आणि विज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी देशाला नेतृत्त्व प्रदान केले आणि ही खूप मोठी गौरवशाली बाब आहे. बंगाल हे, एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेची प्रेरणा राहिले आहे आणि कर्मभूमी देखील राहिले आहे. शताब्दी महोत्सावात चर्चेदरम्यान मी वर देखील विस्ताराने मत मांडले होते. आज जेव्हा भारत 21 व्या शतकाच्या ज्ञानसंपदेच्या दिशेने विस्तार करीत आहे तेव्हा देखील लक्ष तुमच्याकडे आहे, तुमच्या सारख्या तरूणांवर लक्ष आहे, बंगालच्या ज्ञानसंपदेकडे आहे, बंगालच्या उत्साही नागरिकांवर लक्ष आहे. भारताचे ज्ञान आणि भारताची ओळख यांना जगाच्या कोनाकोपऱ्यात पोहोचविण्यामध्ये विश्व भारतीची खूप मोठी भूमिका आहे.

यावर्षी आपण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच प्रवेश करीत आहोत. भारताची प्रतिमा आणखी उजळविण्यासाठी आपण सगळेजण मिळून काम करूया आणि विशेष म्हणजे माझ्या युवा मित्रांनी अधिकाधिक लोकांना जागरूक करावे, ही विश्व भारतीच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या वतीने देशासाठी सर्वात मोठी भेट असेल. भारताची जी खरी ओळख आहे की, जी मानवता, जी आत्मीयता, जी विश्वकल्याणाची भावना आपल्या रक्तात सामावलेली आहे, त्याची जाणीव अन्य देशांना करून देण्यासाठी, पूर्ण मानवजातीला करून देण्यासाठी विश्व भारतीने देशातील शिक्षण संस्थांचे नेतृत्त्व केले पाहिजे.

मी आग्रह करेन की, पुढच्या 25 वर्षांचे विश्व भारतीचे विद्यार्थी मिळून एक व्हिजन डॉक्युमेंट (भविष्यातील माहितीपट) तयार करतील. जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्षे होतील, 2047 मध्ये जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असेल, तोपर्यंत विश्व भारतीची 25 सर्वांत मोठी उद्दिष्टे काय असतील, हे सर्व व्हिजन डॉक्युमेंटमध्ये नियोजित करता येऊ शकेल. आपल्या शिक्षकांसह चिंतन, मनन करा, परंतु, कोणते ना कोणते ध्येय निश्चित जरूर करा.

तुम्ही आपल्या परिसरातील अनेक गावांना दत्तक घेतलेले आहे. याची सुरुवात प्रत्येक गावाला आत्मनिर्भर बनविण्याने होऊ शकते का ? पूज्य बापू ग्रामराज्याबद्दल जे सांगत असत, ग्रामस्वराज्याबद्दल जे सांगत असत, हे माझ्या युवा मित्रांनो, गावातील ते लोक, तेथील शिल्पकार, तेथील शेतकरी, यांना तुम्ही आत्मनिर्भर बनवा. त्यांच्या उत्पादनांना जगातील मोठमोठ्या बाजारपेठांमध्ये पोचविण्याचे एक माध्यम तुम्ही बना.

विश्व भारती, हे तर बोलपूर जिल्ह्याचा मूळ आधार आहे. येथील आर्थिक, भौतिक, सांस्कृतिक अशा सर्व प्रकारच्या व्यवहारांमध्ये विश्व भारती वसलेले आहे, एक जिवंत उदाहरण आहे. येथील लोकांना, समाजाला सशक्त करण्याबरोबरच तुम्हाला तुमचे दायित्त्व देखील निभावयाचे आहे.

तुम्ही तुमच्या प्रत्येक प्रयत्नामध्ये यशस्वी व्हावे, आपल्या संकल्पांचे रूपांतर यशामध्ये करा. ज्या उद्देशांना उराशी बाळगून विश्व भारतीमध्ये पाऊल ठेवले होते आणि ज्या संस्कारांना आणि ज्ञानाची संपदा घेऊन आज तुम्ही विश्व भारतीतून जगाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवत आहात, तेव्हा जगाला तुमच्याकड़ून बऱ्याच काही अपेक्षा आहेत, तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी जगाला हव्या आहेत. आणि या भूमीने तुमचा सांभाळ केला आहे आणि तुम्हाला जगाच्या अपेक्षा पूर्ण करण्यायोग्य तयार केले आहे, मानवाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पात्र केले आहे. तुमच्यात आत्मविश्वास पूर्णपणे भरलेला आहे, तुम्ही तुमच्या संकल्पनांप्रति कटिबद्ध आहात, संस्कारांनी परिपूर्ण असलेले तुमचे तारूण्य आहे. हे सर्व येणाऱ्या पिढ्यांच्या उपयोगी पडणार आहे, देशाच्या उपयोगी येणार आहे. 21 व्या शतकात भारताने आपले योग्य स्थान मिळवावे, यासाठी तुमचे सामर्थ एका मोठ्या ताकदीच्या रूपाने पुढे येईल, असा पूर्ण विश्वास आहे आणि तुमच्यापैकीच एक असा सहयात्री होण्याच्या नात्याने मी आज या गौरवपूर्ण क्षणी तुमचे आभार मानतो. आणि गुरुदेव टागोर यांनी आपल्याला ज्या पवित्र भूमीमध्ये आपल्याला शिक्षित केले आहे, संस्कारित केले आहे, त्या प्रति आपण सगळे मिळून एकत्र येऊ आणि पुढे जाऊ, याच माझ्या आपल्याला शुभेच्छा आहेत.

माझ्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा. तुमच्या आई – वडिलांना माझा नमस्कार, तुमच्या गुरुजनांना प्रणाम.

माझ्यावतीने अनेक अनेक धन्यवाद.

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
In 100-crore Vaccine Run, a Victory for CoWIN and Narendra Modi’s Digital India Dream

Media Coverage

In 100-crore Vaccine Run, a Victory for CoWIN and Narendra Modi’s Digital India Dream
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मिडिया कॉर्नर 22 ऑक्टोबर 2021
October 22, 2021
शेअर करा
 
Comments

A proud moment for Indian citizens as the world hails India on crossing 100 crore doses in COVID-19 vaccination

Good governance of the Modi Govt gets praise from citizens