“ही वेळ भारताची आहे”
“आज भारतासमोर, एकविसाव्या शतकातल्या या दशकातला हा काळ अभूतपूर्व आहे.”
“2023 या वर्षातील पहिल्या 75 दिवसातल्या भारताच्या उपलब्धी,ही भारताची वेळ असल्याचेच प्रतिबिंबित करतात.”
“आज भारतीय संस्कृती आणि आपल्या सुप्त शक्तीचे संपूर्ण जगाला अभूतपूर्व असे आकर्षण आहे.”
“जर देशाला पुढे जायचे असेल, तर त्यात कायम गतिमानता आणि धाडसी निर्णय घेण्याची ताकद असायला हवी”
“आज देशबांधवांमध्ये हा विश्वास निर्माण झाला आहे, की सरकारला त्यांची काळजी आहे”
“आम्ही प्रशासनाला एक मानवी चेहरा दिला आहे.”
“आज देश जे साध्य करतो आहे, त्यामागे देशाच्या लोकशाहीची ताकद आहे, आपल्या संस्थांची ताकद आहे.”
“भारताची ही वेळ आपण, ‘सबका प्रयास’ मधून अधिक मजबूत करायला हवी आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात विकसित भारताचा प्रवास अधिक सक्षम करायला हवा”

इंडिया टुडे कॉन्क्लेव्हशी संबंधित सर्व मान्यवरांना नमस्कार. डिजिटल माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या देश-विदेशातील प्रेक्षक आणि वाचकांचेही अभिनंदन. मला हे पाहून आनंद झाला की या कॉन्क्लेव्हची संकल्पना  द इंडिया मोमेंट अशी आहे. आज जगातील आघाडीचे अर्थतज्ज्ञ, विश्लेषक, विचारवंत सर्वच म्हणतात आणि एका सुरात म्हणत आहेत की  हा क्षण भारताचा  आहे. मात्र  जेव्हा इंडिया टुडे समूह हा आशावाद दाखवतो तेव्हा ते अधिकच खास आहे. तसे, मी 20 महिन्यांपूर्वी लाल किल्ल्यावरून  सांगितले होते - हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे. पण इथपर्यंत पोहोचायला 20 महिने लागले. तेव्हाही भावना हीच होती – हा क्षण भारताचा आहे.

मित्रहो,

कोणत्याही राष्ट्राच्या विकासाच्या प्रवासात अनेक चढ-उतार येतात, अनेक टप्पे येतात. आज एकविसाव्या शतकाच्या या दशकात भारतासमोर जो कालखंड आला आहे तो अभूतपूर्व आहे. काही दशकांपूर्वी जे देश नावारूपाला आले, ज्यांनी प्रगती केली, विकसित झाले, परंतु त्यांच्या समोरची परिस्थिती खूप वेगळी होती. एक प्रकारे ते स्वत:शीच स्पर्धा करत होते. त्यांच्यासमोर एवढी स्पर्धा  नव्हती. मात्र, आज ज्या परिस्थितीत  भारत पुढे जात आहे, ती आव्हाने खूप वेगळी आहेत, खूप व्यापक आहेत, विविधतेने भरलेली आहेत. आज अनेक जागतिक आव्हाने आहेत, आता 100 वर्षांनी उद्भवलेली सर्वात मोठी महामारी पाहा, हे सर्वात मोठे संकट आहे, दोन देश अनेक महिने युध्दात गुंतले आहेत, संपूर्ण जगाची पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे, अशा परिस्थितीत, या पार्श्वभूमीवर विचार करा, की अशा परिस्थितीत द इंडिया मोमेंटबद्दल बोलले जाणे ही  सामान्य गोष्ट नाही.

हा एक नवा इतिहास रचला जात आहे, ज्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. आज संपूर्ण जगभरात भारताबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज भारत जगातील स्मार्टफोन डेटा वापरणारा  अव्वल क्रमांकाचा देश आहे. आज भारत फिनटेकचा अवलंब करण्याच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर आहे. आज भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश आहे. आज भारतात जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप परिसंस्था आहे.

अशा कितीतरी गोष्टींवर चर्चा होत असते. असो, जुन्या गोष्टींची कुणाला कधी गरज भासली  तर जरूर पहा.  मात्र मला वर्तमानाबद्दल आणि तेही 2023 बद्दल बोलायचे आहे. 2023 या वर्षातील 75 दिवस उलटले आहेत. आज मला फक्त 75 दिवसांबद्दलच बोलायचे आहे. या 75 दिवसांत देशाचा ऐतिहासिक हरित अर्थसंकल्प मांडण्यात आला. या 75 दिवसांत कर्नाटकातील शिवमोगा येथील विमानतळाचे लोकार्पण  करण्यात आले. या 75 दिवसांत मुंबईत मेट्रो रेल्वेचा पुढचा टप्पा सुरू झाला. या 75 दिवसांत जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ देशात सुरु झाली. बंगळुरू म्हैसूर द्रुतगती महामार्ग सुरू झाला. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा एक टप्पा सुरु  करण्यात आला. मुंबईहून, विशाखापट्टणमहून वंदे भारत गाड्या धावू लागल्या. आयआयटी धारवाडच्या कायमस्वरूपी संकुलाचे लोकार्पण करण्यात आले. भारताने अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाच्या  21 बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली.

मित्रहो,

या 75 दिवसांतच, भारताने पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळून E20 इंधनाची सुरुवात केली आहे. या 75 दिवसांतच तुमकुरू येथे आशियातील सर्वात मोठ्या आधुनिक हेलिकॉप्टर कारखान्याचे लोकार्पण करण्यात आले. एअर इंडियाने जगातील सर्वात मोठी एव्हिएशन ऑर्डर दिली आहे. या 75 दिवसांतच भारताने ई-संजीवनीच्या माध्यमातून 10 कोटी टेलि-कन्सल्टेशनचा टप्पा गाठला आहे. या 75 दिवसांतच भारताने नळाद्वारे पाणीपुरवठ्यासाठी 8 कोटी जोडणी देण्याचा टप्पा गाठला. या 75 दिवसांतच, उत्तर प्रदेश -उत्तराखंडमधील रेल्वे जाळ्याचे 100 टक्के विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले.

मित्रहो,

या 75 दिवसांत कुनो राष्ट्रीय उद्यानात 12 चित्त्यांची नवी तुकडी दाखल झाली आहे. भारतीय महिला संघाने 19 वर्षांखालील क्रिकेट टी-20 विश्वचषक जिंकला आहे. या 75 दिवसांत दोन ऑस्कर जिंकण्याचा आनंद देशाला लाभला आहे.

मित्रहो ,

या 75 दिवसांत हजारो विदेशी राजनैतिक अधिकारी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी जी-20 बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आले. या 75 दिवसांत जी -20 च्या 28 महत्त्वाच्या बैठका झाल्या आहेत, म्हणजेच  दर तिसऱ्या दिवशी एक बैठक. याच दरम्यान, ऊर्जा शिखर परिषद  झाली, आजच जगतिक भरड धान्य परिषद  झाली. बंगळुरू येथे झालेल्या एअरो -इंडियामध्ये 100 हून अधिक देश सहभागी झाल्याचे आपण पाहिले. या 75 दिवसांतच सिंगापूरबरोबर युपीआय  लिंकेजची सुरूवात झाली. या 75 दिवसांतच भारताने तुर्कीच्या मदतीसाठी 'ऑपरेशन दोस्त' मोहीम राबवली. भारत-बांगलादेश गॅस पाइपलाइनचे लोकार्पण काही तासांपूर्वीच झाले आहे. या 75 दिवसांची एवढी मोठी यादी आहे की वेळ कमी पडेल. आणि मी 75 दिवसांच्या काही गोष्टी यासाठीच सांगत आहे कारण भारताच्या क्षणाचे हेच तर प्रतिबिंब आहे.

 

मित्रहो,

आज एकीकडे देश रस्ते-रेल्वे, बंदर-विमानतळ अशा भौतिक पायाभूत सुविधा निर्माण करत आहे, तर दुसरीकडे भारतीय संस्कृती आणि सॉफ्ट पॉवरचे जगाला अभूतपूर्व आकर्षण आहे. आज योगाभ्यास जगभर लोकप्रिय झाला आहे. आज आयुर्वेदाबद्दल उत्साह आहे, भारताच्या खाद्यसंस्कृतीबद्दल उत्सुकता आहे. आज भारतीय चित्रपट, भारतीय संगीत, नव्या उर्जेने लोकांना भुरळ पाडत आहेत. आपली भरडधान्ये -श्रीअन्नही जगभर पोहोचत आहेत. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असो वा आपत्ती रोधक पायाभूत विकास आघाडी असो, आज जगाला हे जाणवत आहे की भारताच्या कल्पना आणि भारताची क्षमता जागतिक हितासाठी आहे. म्हणूनच आज जग म्हणत आहे - हा क्षण भारताचा  आहे.

आणि तुम्ही सर्वांनी अलीकडे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली असेल. या सर्वांचा दूरगामी  प्रभाव होत असतो. एका छोट्या मुद्द्याकडे मी तुमचे लक्ष वेधतो. आजकाल मला जेव्हा-जेव्हा बहुतेक देशांचा दौरा करायचा असतो किंवा त्यांचे प्रमुख भारतात येतात किंवा भारतातील कोणीतरी तिथे भेट देतो, तेव्हा तुमच्याही असे निदर्शनास आले असेल की प्रत्येक देशात स्पर्धा सुरू झाली आहे की भारतातून चोरीला गेलेल्या ज्या प्राचीन मूर्ती आहेत, त्या स्वतःहून आपल्याला देतात. कारण त्यांना खात्री पटली आहे की त्यांचा इथेच योग्य आदर  केला जाईल. हाच तर तो क्षण आहे.

आणि मित्रांनो, हे सर्व असेच घडत नाही आहे. आजच्या इंडिया मोमेंटची सर्वात खास गोष्ट म्हणजे आश्वासनांबरोबरच त्याला कामगिरीचीही जोड लाभली आहे. येथे अनेक ज्येष्ठ मंडळी बसली आहेत. तुम्ही तर  2014 पूर्वीच्या ठळक बातम्या लिहिल्या आहेत, वाचल्या आहेत आणि प्रसारित केल्या  आहेत. आणि तेव्हा माझ्यासारखा कोणी दुकान चालवणारा  नव्हता. आधीच्या ठळक बातम्या काय होत्या? अमुक  क्षेत्रात काही लाख कोटींचा घोटाळा. भ्रष्टाचाराविरोधात लोक रस्त्यावर उतरले. आजच्या ठळक बातम्या काय असतात? भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कारवाई झाल्यामुळे भ्रष्ट लोक एकत्र येऊन रस्त्यावर उतरले. तुम्ही लोकांनी घोटाळ्यांच्या बातम्या दाखवून इतका टीआरपी जमवला  आहे. आता तुम्हाला संधी आहे, भ्रष्टाचाऱ्यांवर होणारी कारवाई दाखवून टीआरपी वाढवा. कोणाच्याही दबावाखाली येऊ नका, संतुलन राखण्याच्या नादात ही संधी दवडू नका.

मित्रहो,

पूर्वी शहरांमध्ये बॉम्बस्फोटांच्या ठळक बातम्या असायच्या, नक्षली हिंसाचाराच्या ठळक बातम्या असायच्या. आज शांतता आणि समृद्धीच्या बातम्या जास्त असतात. पूर्वी पर्यावरणाच्या नावाने मोठ-मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प थांबवले जाण्याच्या बातम्या येत होत्या. आज पर्यावरणाशी संबंधित सकारात्मक बातम्यांसोबतच नवीन महामार्ग, द्रुतगती मार्ग बनवण्याच्या बातम्या येत आहेत. पूर्वी रेल्वे अपघातांच्या दुःखद बातम्या ही नेहमीची बाब होती. आज आधुनिक रेल्वे गाड्यांचा प्रारंभ ही ठळक बातमी बनते. पूर्वी एअर इंडियाच्या घोटाळ्यांची, खालावलेल्या परिस्थितीची चर्चा होत असायची. आज जगातील सर्वात मोठा विमान करार जागतिक पातळीवर ठळक बातमी बनत आहे. ‘Promise’ आणि ‘performance’ चा हाच बदल India Moment घेऊन आला आहे. तसं पाहायला गेलं तर मित्रहो ज्यावेळी देश आत्मविश्वासाने भरलेला असेल, संकल्पांनी भरलेला असेल, परदेशात देखील जगातील विद्वान भारताविषयी आशावादी असतील. या सर्वांच्या मध्येच निराशेच्या बातम्या, वैफल्याच्या बातम्या, भारताची प्रतिमा मलीन करण्याच्या प्रयत्नांच्या बातम्या, भारताचे मनोधैर्य खच्ची करण्याच्या गोष्टी तर होतच राहतात. आता आपल्याला माहीत आहेच की कोणाचे कुठे काही शुभ काम होत असेल तर तिथे एक काळी तीट लावायची परंपरा राहिलेली आहे तर आज इतके शुभ होत आहे, इतके शुभ होत आहे की काही लोकांनी काळी तीट लावायची जबाबदारी घेतली आहे आणि हे यासाठी आहे की कुठेतरी नजर लागू नये.

मित्रहो,

गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालखंडामुळे आपण गरिबीचा एक खूप मोठा कालखंड पाहिलेला आहे. हा कालखंड कितीही मोठा राहिलेला असला तरी एक गोष्ट नेहमीच शाश्वत राहिली. भारताला लवकरात लवकर गरिबीतून बाहेर पडण्याची इच्छा होती. आज देखील तो दिवसभर प्रचंड कष्ट करतो. त्याची ही इच्छा असते की त्याचे जीवन बदलले पाहिजे. त्याच्या भावी पिढ्यांचे जीवन बदलले पाहिजे. त्याला केवळ दोन वेळच्या भाकरीपुरते आपले जीवन मर्यादित रहावे अशी इच्छा नसते. गेल्या दशकांमध्ये जी काही सरकारे होऊन गेली त्यांनी आपापल्या ताकदीने आणि विचाराने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांच्या प्रमाणात त्या सरकारांना तसे परिणाम देखील मिळाले आहेत. आम्हाला नवे परिणाम हवे आहेत, म्हणून आम्ही आमचा वेग देखील वाढवला आहे आणि कामाचे प्रमाण देखील वाढवले आहे. आता पाहायला गेले तर शौचालये पूर्वी देखील तयार होत असायची. मात्र, आम्ही विक्रमी वेगाने अकरा कोटींपेक्षा जास्त शौचालयांची निर्मिती केली. बँका तर देशात पूर्वी देखील असायच्या आणि गरिबांच्या नावावर बँकांचे राष्ट्रीयीकरण देखील करण्यात आले होते. पण आम्ही आणि आता अरुणजी अतिशय सविस्तर सांगत होते, आपण जलद गतीने 48 कोटी लोकांना बँकिंग व्यवस्थेत समाविष्ट केले आहे गरिबांसाठी घराच्या योजना यापूर्वी देखील होत्या या योजनांची स्थिती काय होती हे तुम्हा सर्वांना खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. आमच्या सरकारने यामध्ये देखील पूर्णपणे बदल केला. आता घरे बांधण्यासाठी पैसे थेट त्या गरिबाच्या बँक खात्यामध्ये पाठवले जातात. आता घर बनवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेवर सातत्याने देखरेख ठेवली जाते आणि आता owner driven scheme घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत आणि ज्यावेळी owner driven असते तेव्हा घोटाळे होत नाहीत. त्यांची इच्छा चांगले घर बनवण्याची असते. गेल्या नऊ वर्षात आम्ही तीन कोटींपेक्षा जास्त घरे बनवून गरिबांच्या ताब्यात दिली आहेत. म्हणजेच जगातील अनेक देश आहेत. आम्ही संपूर्ण देश नवीन बनवत आहोत. आपल्याकडे नेहमीच महिलांच्या नावाने मालमत्ता असत नाहीत. दुकाने खरेदी करण्यात येतात पुरुषांच्या नावाने, गाड्या खरेदी केल्या जातात पुरुषांच्या नावाने, जमीन खरेदी केली जाते पुरुषांच्या नावाने. पण आमच्या सरकारने जी घरे गरिबांना तयार करून दिली आहेत त्यापैकी जवळ-जवळ अडीच कोटी घरे संयुक्त नावांनी आहेत, त्यामध्ये महिलांचा देखील मालकी अधिकार आहे.

आता तुम्ही विचार करा, गरीब महिलांमध्ये स्वतःचे सक्षमीकरण झाल्याची भावना निर्माण झाली तर मग India Moment येणार की नाही? देशात असे कित्येक बदल झाले आहेत जे India Moment घेऊन आले आहेत. यातील काही बदलांची चर्चा तर प्रसार माध्यमे देखील करत नाहीत. तुम्हाला हे माहीत आहे का की जगामध्ये मालमत्तेचे अधिकार हे देखील एक मोठे आव्हान आहे. जागतिक बँकेच्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की जगातील केवळ 30 टक्के लोकसंख्येकडेच त्यांच्या मालमत्तेचे legally registered title आहे. म्हणजेच जगातील 70 टक्के लोकसंख्येकडे त्यांच्या मालमत्तेचे कायदेशीर दस्तावेज नाही आहेत.

मालमत्तेचा अधिकार नसणे, जागतिक विकासामधील सर्वात मोठा अडथळा मानला जात आहे. जगातील अनेक विकसित देश देखील या आव्हानाला तोंड देत आहेत. पण आजचा भारत, यामध्ये देखील lead घेत आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून भारतात पीएम-स्वामित्व योजना सुरू आहे. तंत्रज्ञानाचा भरपूर वापर केला जात आहे. भारतातील गांवांमध्ये, ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने जमिनीची मॅपिंग केली जात आहे. आतापर्यंत भारतातील दोन लाख चौतीस हजार गांवांमध्ये ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. एक कोटी बावीस लाख प्रॉपर्टी कार्ड देखील वितरित करण्यात आली आहेत. या संपूर्ण प्रक्रियेचा आणखी एक फायदा झाला आहे. गावातील लोकांमधील ही भीती देखील कमी झाली आहे की जर ते गावांच्या बाहेर गेले तर त्यांचे घर किंवा जमीन यावर कोणी तरी दुसरा कब्जा करेल.

अशा कितीतरी Silent Revolution आज भारतात होत आहेत आणि हाच India Moment चा आधार बनू लागला आहे. आणखी एक उदाहरण शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीचे आहे. पूर्वी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या घोषणा होत असायच्या. पण कोट्यवधी शेतकऱ्यांची बँक खातीच नसायची, ते तर इतर स्रोतांकडून कर्ज घेत असायचे, त्यांना तर कर्जमाफीचा कोणताही लाभ होत नसायचा. आम्ही या परिस्थितीत देखील बदल केला. पीएम किसान सन्मान निधीमधून आतापर्यंत सुमारे अडीच लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आले आहेत. याचा फायदा देशातील त्या  11 कोटी लहान शेतकऱ्यांना झाला आहे ज्यांना यापूर्वी कोणीच विचारत नव्हते.

मित्रहो,

कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये, धोरणे-निर्णय यामध्ये खंड पडणे, Stagnation, Status Quo एक खूप मोठा अडथळा असतो. आपल्या देशात देखील जुनी विचारसरणी आणि दृष्टीकोनामुळे, काही घराण्यांच्या Limitations मुळे, एक प्रदीर्घ खंडितावस्था निर्माण झाली. देशाला पुढे जायचे असेल तर त्यामध्ये नेहमीच गतिशीलता असली पाहिजे, धाडसी निर्णय शक्ती असली पाहिजे. देशाला पुढे जायचे असेल तर त्यामध्ये नावीन्य स्वीकारण्याचे सामर्थ्य असले पाहिजे, त्यामध्ये प्रगतीशील मानसिकता असली पाहिजे. देशाला पुढे जायचे असेल तर त्याला आपल्या देशवासियांच्या क्षमतांवर, त्यांच्या प्रतिभेवर विश्वास असला पाहिजे आणि या सर्वांपेक्षा जास्त म्हणजे देशाचे संकल्प आणि स्वप्ने यांना देशाच्या जनतेचा आशीर्वाद असला पाहिजे, लक्ष्य प्राप्तीमध्ये जनतेचा सहभाग असला पाहिजे.

केवळ सरकार आणि सत्ता यांच्या माध्यमातून समस्यांवरील उत्तरे शोधण्याचा मार्ग अतिशय Limited Result देत असतो. मात्र, ज्यावेळी130 कोटी  देशवासियांचे सामर्थ्य एकवटते, ज्यावेळी सर्वांचे प्रयत्न एकत्रित होतात, त्यावेळी देशासमोर कोणत्याही समस्येचा टिकाव लागत नाही. यासाठी देशाच्या लोकांचा सरकारवर विश्वास असणे देखील तितकेच गरजेचे आहे. मला आज अतिशय समाधान वाटत आहे की आज देशवासियांमध्ये हा विश्वास जागृत झाला आहे की सरकारला त्यांची पर्वा आहे.

याचे आणखी एक कारण मी तुम्हाला सांगेन आणि ते आहे शासनामध्ये Human Touch, सुशासनात संवेदनशीलता. आम्ही शासनाला Human Touch दिला आहे तेव्हा कुठे इतका मोठा प्रभाव दिसू लागला आहे. आता जशी वाइब्रेंट विलेज योजना आहे. अनेक दशके सीमेवरील आपल्या गावांना शेवटची गावे मानले गेले. आम्ही त्यांना देशातील पहिली गावे असल्याची हमी दिली, आम्ही त्या ठिकाणी विकासाला प्राधान्य दिले. आज सरकारचे अधिकारी, मंत्री या गावांमध्ये जात आहेत, तेथील लोकांना भेटत आहेत, तिथे बराच काळ घालवत आहेत.

 

ईशान्येकडील लोकांना देखील पूर्वी दिल (मनांमध्ये आपुलकीचा अभाव) आणि दिल्लीमधील अंतर खूपच जास्त जाणवत असायचे. आम्ही येथे देखील शासनाला मानवी भावनेशी जोडले. आता केंद्र सरकार चे मंत्री...जसे अरुण जी यांनी अतिशय सविस्तर सांगितले, नियमितपणे ईशान्येच्या भागांना भेटी देत असतात. आणि ते देखील राज्यांच्या राजधान्यांना नव्हे तर अंतर्गत भागांमध्ये जातात. मी सुद्धा ईशान्येकडच्या भागांमध्ये जाण्याचे अर्धशतक पूर्ण केले आहे.

मित्रहो,

या संवेदनशीलतेने न केवळ ईशान्येकडील राज्यांपर्यंतचे अंतर कमी केले आहे तर तिथे शांततेची स्थापना करण्यात देखील खूप जास्त मदत केली आहे.

तुम्ही युक्रेन संकटाच्या काळात सरकारच्या कार्यसंस्कृतीची देखील आठवण ठेवली पाहिजे. देशातील हजारो कुटुंबे चिंताग्रस्त होती. आम्ही जवळ-जवळ 14 हजार कुटुंबांशी संपर्क साधला. प्रत्येक घरी सरकारचा एक प्रतिनिधी पाठवला. त्या कुटुंबात एक व्यक्ती म्हणून सरकार जाऊन बसले. आम्ही त्या अतिशय अवघड कालखंडात त्यांना सरकार त्यांच्या सोबत असल्याची हमी दिली. तुम्हाला माहीत असेलच काही काही वेळा काही गोष्टींबाबत इतक्या जास्त प्रमाणात ओरड केली जाते की जिथे काम करायचे आहे त्यात देखील अडथळे येऊ लागतात. आणि म्हणूनच आम्ही पहिल्यांदा हे काम केले की बाबांनो, त्या कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्यासोबत बोला. त्यांच्याशी regularly communicate करा. आणि यामुळे देशातील सर्व जण निश्चिंत झाले की ठीक आहे की आपला मुलगा तिथे आहे, आता या परिस्थितीत तो आज नाही तर उद्या परवा येईलच, ही स्थिती निर्माण केली.

मानवीय संवेदना मोठ्या प्रमाणात असलेल्या अशाच प्रकारच्या शासनातूनच India Moment ला Energy मिळत आहे. तुम्ही कल्पना करू शकता. जर शासनव्यवस्थेमध्ये हा Human Touch असला नसता, तर आपण कोरोना विरोधातील इतकी मोठी लढाई देखील जिंकू शकलो नसतो.

मित्रहो,

आज भारत जे काही साध्य करत आहे त्यामागे आपल्या लोकशाहीची ताकद आहे, आपल्या Institutions ची शक्ती आहे. जग आज पाहात आहे की भारतात लोकशाही पद्धतीने निवडलेले सरकार, निर्णायक निर्णय घेत आहे. आणि भारताने जगाला दाखवून दिले आहे democracy can deliver. गेल्या काही वर्षात भारतात अनेक नव्या Institutions ची निर्मिती झाली आहे. International Solar Alliance भारताच्या नेतृत्वाखाली तयार झाली आहे. Coalition for Disaster Resilient Infrastructure CDRI ची स्थापना भारताच्या नेतृत्वाखाली झाली आहे. नीती आयोग आज भविष्याचा आराखडा तयार करण्यात मोठी भूमिका बजावत आहे. National Company Law Tribunal (NCLT) देशात कॉर्पोरेट गवर्नन्स बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. GST परिषदेमुळे देशात आधुनिक कर प्रणाली तयार झाली आहे.

आज जग पाहात आहे की कशा प्रकारे भारतात जास्तीत जास्त लोकांची लोकशाही भागीदारी वाढू लागली आहे. देशात कोरोनाच्या काळातही अनेक निवडणुका झाल्या. यशस्वी पद्धतीने झाल्या. ही आपल्या संस्थांची ताकद आहे. जागतिक संकटाच्या काळातही आज भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे, बँकिंग प्रणाली मजबूत आहे. ही आपल्या संस्थांची ताकद आहे. आपण दूरवर-अतिदुर्गम भागांपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसी पोहोचवल्या. 220 कोटींपेक्षा जास्त मात्रा दिल्या, ही आपल्या संस्थांची ताकद आहे. मला असे वाटते की आपली लोकशाही आणि आपल्या लोकशाही संस्थांना मिळणारे हे यशच काही लोकांना बोचत आहे आणि म्हणूनच त्यावर हल्ले देखील होत आहेत. पण मला खात्री आहे, या हल्ल्यांनतरही भारत आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने वेगाने पुढे जाईल, आपली उद्दिष्टे साध्य करेल.

मित्रहो,

भारताची भूमिका ज्यावेळी जागतिक होत आहे त्यावेळी भारताच्या प्रसारमाध्यमांनी देखील आपली भूमिका जागतिक बनवली पाहिजे. ‘सबका प्रयास’ या मंत्रानेच आपल्याला India Moment ला सशक्त करायचे आहे. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात विकसित भारताच्या प्रवासाला सशक्त करायचे आहे. मी पुन्हा एकदा अरुण जींच्या, इंडिया टुडे समूहाचे, मला येथे येण्याची संधी मिळाली, बोलण्याची संधी मिळाली, याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि 2024 मध्ये निमंत्रण देण्याचे जे धाडस दाखवले यासाठी विशेष धन्यवाद.

आभारी आहे!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s position set to rise in global supply chains with huge chip investments

Media Coverage

India’s position set to rise in global supply chains with huge chip investments
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 8 सप्टेंबर 2024
September 08, 2024

PM Modo progressive policies uniting the world and bringing development in India