भारतातील जी 20 शिखर परिषदेशी संबंधित 4 प्रकाशनांचे केले अनावरण
"युवा पिढीचा सहभाग असेल तर असे मोठे कार्यक्रम निश्चितच यशस्वी होतात"
"गेल्या 30 दिवसांत प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व घडामोडी दिसून आल्या,भारताची कामगिरी अतुल्य आहे"
"नवी दिल्ली घोषणापत्रावरची सर्वसहमती जगभरातील माध्यमांची ठळक बातमी ठरली"
"दृढ राजनैतिक प्रयत्नांमुळे, भारताला नवीन संधी, नवीन मित्र आणि नवीन बाजारपेठा मिळत आहे, तरुणांना नवीन संधी उपलब्ध होत आहेत"
"भारताने जी 20 ला जनसंचालित राष्ट्रीय चळवळ बनवले"
"आज प्रामाणिक व्यक्तींचा सन्मान केला जातो तर बेईमानांवर कारवाई केली जात आहे"
"देशाच्या विकासयात्रेसाठी स्वच्छ, स्पष्ट आणि स्थिर शासन अनिवार्य आहे"
"भारतातील तरुण हीच माझी ताकद आहे"
"मित्रांनो,चला माझ्यासोबत, मी तुम्हाला आमंत्रित करतो,25 वर्षे आपल्यासमोर आहेत, 100 वर्षांपूर्वी आपल्या नेत्यांनी स्वराज्यासाठी मार्गक्रमण केले,आपण समृद्धीसाठी करूया"

देशातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्राध्यापक, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि माझ्या तरुण मित्रांनो!  आज, भारत मंडपममध्ये जितके लोक उपस्थित आहेत त्यापेक्षा अधिक  लोक आपल्याशी ऑनलाइन जोडले गेले आहेत.मी जी -20 विद्यापीठ कनेक्ट या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत करतो आणि तुम्हा सर्व तरुणांचे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

दोन आठवड्यांपूर्वी याच भारत मंडपमध्ये  जोरदार घडामोडी घडत होत्या. हे भारत मंडपम एकदम ‘हॅपनिंग’ ठिकाण होते आणि मला आनंद आहे की आज माझा भावी भारत त्याच भारत मंडपमध्ये उपस्थित आहे. जी-20 च्या आयोजनाला भारताने ज्या उंचीवर नेले  आहे ते पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे.पण तुम्हाला माहीत आहे की , मी अजिबात थक्क नाही ,मला अजिबात आश्चर्य वाटले नाही.कदाचित तुमच्या मनात असेल की इतके मोठे आयोजन झाले तुम्ही  खुश नाही , काय कारण आहे ?  माहीत आहे का ? कारण कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी तुमच्यासारखे  तरुण विद्यार्थी घेतात  , तरुणाईचा यात सहभाग असेल तर तो यशस्वी होणार हे निश्चित असते. .

तुम्हा तरुणांमुळे संपूर्ण भारत एक ‘हॅपनिंग प्लेस '(घडामोडींचे ठिकाण )’ बनला आहे. आणि गेल्या 30 दिवसांवर नजर टाकल्यास किती घडामोडी घडत आहेत  हे स्पष्टपणे दिसून येते.आणि जेव्हा मी 30 दिवसांबद्दल बोलतो तेव्हा तुम्ही तुमचे  30 दिवस, गेले 30 दिवस जोडत राहा .. तसेच तुमच्या विद्यापीठाचे 30 दिवस देखील आठवा. आणि मित्रांनो, 30 दिवसात घडलेल्या इतर लोकांचा पराक्रम देखील आठवा. मी तुम्हाला सांगतो कारण आज माझ्या तरुण मित्रांनो, मी तुमच्यासमोर आलो आहे, म्हणून मी तुम्हाला माझे रिपोर्ट कार्ड देत आहे.मला तुम्हाला गेल्या 30 दिवसांचा  आढावा द्यायचा आहे. यावरून तुम्हाला नव्या भारताचा वेग आणि नव्या भारताची प्रगती  दोन्ही समजू शकेल.

 

मित्रांनो,

तुम्हा सर्वांना आठवत असेल 23 ऑगस्टचा तो दिवस जेव्हा हृदयाचे ठोके वाढले होते , विसरलात,..सर्व काही ठीक व्हावे , काहीही गडबड होऊ नये , अशी प्रार्थना सर्वजण करत होतो ना ?  आणि मग अचानक सर्वांचे चेहरे उजळले, संपूर्ण जगाने भारताचा आवाज ऐकला... भारत चंद्रावर पोहोचला आहे.
23 ऑगस्ट ही तारीख राष्ट्रीय अंतराळ  दिवस म्हणून घोषित झाली आहे. पण त्यानंतर काय झालं? तर एकीकडे चांद्रमोहीम यशस्वी झाली, तर दुसरीकडे भारताने आपली सौर मोहीम सुरू केली.जर आपले चांद्रयान 3 लाख किलोमीटर गेले तर हे  15 लाख किलोमीटरवर जाईल. तुम्ही मला सांगा, भारताच्या आवाक्यामध्ये काही स्पर्धा आहे का?

मित्रांनो,
गेल्या 30 दिवसांत भारताच्या मुत्सद्देगिरीने नवी  उंची गाठली आहे.  जी -20 च्या आधी दक्षिण आफ्रिकेत ब्रिक्स शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. भारताच्या प्रयत्नांमुळे 6 नवीन देश ब्रिक्स समुदायात सहभागी  झाले आहेत.. दक्षिण आफ्रिकेनंतर मी ग्रीसला गेलो होते.   40 वर्षांतील कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा हा  पहिलाच दौरा होता आणि जी काही चांगली कामे आहेत ना , ती  करण्यासाठी तुम्ही मला या ठिकाणी बसवले आहे. जी -20 शिखर परिषदेच्या अगदी आधी, इंडोनेशियामध्येही  अनेक जागतिक नेत्यांसोबत माझी बैठक झाली. यानंतर, जी -20 मध्ये त्याच इंडिया पॅव्हेलियनमध्ये जगासाठी मोठे निर्णय घेण्यात आले.

 मित्रांनो, 

आजच्या ध्रुवीकृत आंतरराष्ट्रीय वातावरणात इतक्या देशांना एका व्यासपीठावर आणणे हे काही छोटे  काम नाही. मित्रांनो, तुम्ही  एक सहल  आयोजित करा , तरी कुठे जायचे हे ठरवता येत नाही.आपल्या  नवी दिल्ली घोषणापत्राबाबत  100% सहमती  एक आंतरराष्ट्रीय ठळक मथळा बनला आहे. या काळात भारताने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आणि निर्णयांचे नेतृत्व केले. जी -20 मध्ये काही निर्णय घेतले गेले आहेत, ज्यात 21 व्या शतकाची संपूर्ण दिशा बदलण्याची क्षमता आहे. भारताच्या पुढाकाराने,  आफ्रिकन युनियनला  जी -20 चे स्थायी सदस्य म्हणून स्थान मिळाले.भारताने जागतिक जैवइंधन आघाडीचेही नेतृत्व केले. जी -20 शिखर परिषदेतच आपण सर्वांनी मिळून भारत-मध्य-पूर्व-युरोप कॉरिडॉर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कॉरिडॉर अनेक खंडांना परस्परांना जोडेल. यामुळे येणाऱ्या शतकांसाठी व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे.

 

मित्रांनो,

जी-20 शिखर परिषद संपली तेव्हा दिल्लीत सौदी अरेबियाच्या युवराजांचा  दौरा सुरू झाला. सौदी अरेबिया भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. आणि मी सांगत असलेली कथा 30 दिवसांची आहे. 
गेल्या 30 दिवसांत भारताचा पंतप्रधान म्हणून मी एकूण 85 जागतिक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. आणि हे जवळजवळ अर्धे जग आहे.यातून तुम्हाला काय फायदा होईल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, नाही का? जेव्हा भारताचे इतर देशांशी संबंध चांगले असतात, जेव्हा नवीन देश भारताशी जोडले जातात  तेव्हा भारतासाठी नवीन संधी निर्माण होतात, आपल्याला नवा भागीदार, नवी  बाजारपेठ मिळते. आणि या सगळ्याचा फायदा माझ्या देशाच्या तरुण पिढीला होतो.

मित्रांनो ,

तुम्ही सगळे विचार करत असाल की गेल्या 30 दिवसांचे रिपोर्ट कार्ड देताना मी फक्त अंतराळ विज्ञान आणि जागतिक संबंधांवरच बोलत राहणार आहे का  , याच   गोष्टी  30 दिवसांत केल्या आहेत  का, असे नाही. गेल्या 30 दिवसांत एससी-एसटी-ओबीसी, गरीब आणि मध्यमवर्गीयांना सक्षम करण्यासाठी अनेक पावले उचलली गेली आहेत.17 सप्टेंबर रोजी विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी पीएम विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली. ही योजना आपले कारागीर, कुशल कारागीर आणि पारंपरिक काम  करणाऱ्या लोकांसाठी आहे. रोजगार मेळाव्याचे आयोजन करून गेल्या  30 दिवसांत 1 लाखाहून अधिक तरुणांना केंद्र सरकारमध्ये सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. हा उपक्रम सुरू झाल्यापासून आतापर्यंत 6  लाखांहून अधिक तरुण-तरुणींना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.

 

या 30 दिवसांमध्ये, तुम्ही देशाच्या  संसदेच्या नवीन इमारतीतील पहिले संसद अधिवेशनही पाहिले आहे.  देशाच्या नवीन संसद भवनात पहिले विधेयक मंजूर झाले, ज्याने संपूर्ण देश अभिमानाने भरून गेला आहे. नारी शक्ती वंदन कायद्याद्वारे महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे महत्त्व संसदेने सहर्ष स्वीकारले आहे .

मित्रांनो,

गेल्या 30 दिवसांतच, देशात इलेक्ट्रिक वाहतुकीचा   विस्तार करण्यासाठी आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला.आमच्या सरकारने बॅटरी ऊर्जा साठवणूक यंत्रणा सक्षम बनवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची योजना मंजूर केली आहे. काही दिवसांपूर्वी, आम्ही द्वारका येथील यशोभूमी आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र राष्ट्राला समर्पित केले. तरुणांना खेळामध्ये  अधिक संधी देण्यासाठी मी वाराणसीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणीही केली आहे. 2 दिवसांपूर्वी, मी 9 वंदे भारत रेल्वेगाड्यांना   हिरवा झेंडा दाखवला. एकाच दिवसात इतक्या आधुनिक गाड्या सुरू करणे हा देखील आपल्या वेगाचा आणि प्रगतीची साक्ष आहे.

या 30 दिवसांत, आम्ही पेट्रोकेमिकल क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. मध्य प्रदेशातील एका रिफायनरीमध्ये पेट्रोकेमिकल संकुलाची  पायाभरणी करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातच नवीकरणीय  ऊर्जा, आयटी पार्क, एक भव्य औद्योगिक पार्क आणि 6 नवीन औद्योगिक क्षेत्रांवर काम सुरू झाले आहे. जितकी कामे मी सांगितली आहेत , ही सर्व कामे थेट तरुणांचे कौशल्य आणि युवकांसाठी रोजगार निर्मितीशी संबंधित आहेत. ही यादी एवढी मोठी आहे की संपूर्ण वेळ त्यातच जाईल.या  30 दिवसांचा हिशोब मी तुम्हाला  देत होतो, आता तुम्ही तुमचा हिशोब केला का? तुम्ही जास्तीत जास्त सांगाल की, दोन सिनेमे पाहिले. माझ्या तरुण मित्रांनो, मी हे म्हणत आहे कारण माझ्या देशातील तरुणांना हे कळले पाहिजे की देश किती वेगाने पुढे जात आहे आणि किती विविध पैलूंवर  काम करत आहे.

मित्रांनो,

जिथे आशावाद, संधी आणि खुलेपणा असतो तिथेच तरुणांची प्रगती होते.  आज भारत ज्या प्रकारे प्रगती करत आहे, तुमच्यासाठी आकाश मोकळे झाले आहे.  मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो - मोठा विचार करा.  आपण साध्य करू शकत नाही असे काहीही नाही. अशी कोणतीही यश प्राप्ती नाही जी मिळवण्यासाठी देश तुम्हाला साथ देणार नाही. कोणतीही संधी छोटी समजू नका. तर त्या संधीला नवीन विक्रमी टप्पा बनवण्याचा विचार करा. याच दृष्टिकोनातून आम्ही जी-20 ला इतके भव्य आणि विशाल बनवले.  आपणही जी-20 चे अध्यक्षपद हे केवळ राजनैतिक आणि दिल्ली केंद्रित बनवू शकलो असतो. पण भारताने याला लोकांनी चालवलेली राष्ट्रीय चळवळ बनवले.  भारतातील विविधता, लोकसंख्या आणि लोकशाहीच्या बळाने जी-20 ला नवीन उंचीवर नेले.

 

जी-20 च्या 60 शहरांमध्ये 200 हून अधिक बैठका झाल्या. दीड कोटीहून अधिक नागरिकांनी जी-20 उपक्रमांमध्ये योगदान दिले. दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतल्या शहरातही, जिथे यापूर्वी कोणत्याही आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्हते, त्यांनीही मोठी ताकद दाखवली.  आणि आजच्या या कार्यक्रमात मी जी-20 साठी आमच्या तरुणांचे विशेष कौतुक करू इच्छितो. विद्यापीठ संलग्न कार्यक्रमाच्या (युनिव्हर्सिटी कनेक्ट प्रोग्रामच्या) माध्यमातून 100 हून अधिक विद्यापीठे आणि 1 लाख विद्यार्थ्यांनी जी-20 मध्ये भाग घेतला.  शाळा, उच्च शिक्षण संस्था आणि अनेक शैक्षणिक संस्था तसेच कौशल्य विकास संस्थांमधील 5 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत सरकारने जी-20 ला पोहचवले. आपल्या लोकांनी मोठा विचार केला, पण त्यांनी जे वास्तवात उतरवले ते त्याहून भव्य आहे.

मित्रांनो,

आज भारत आपल्या अमृतकाळात आहे.  हा अमृतकाळ फक्त तुमच्यासारख्या अमृत पिढ्यांचा काळ आहे.  2047 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होणार आहेत, तो आपल्यासाठी ऐतिहासिक क्षण असेल.  2047 पर्यंतचा काळ हा तोच काळ आहे ज्यामध्ये तुम्ही युवकही तुमचे भविष्य घडवाल. म्हणजे पुढची 25 वर्षे तुमच्या आयुष्यात जितकी महत्त्वाची आहेत तितकीच ती देशासाठीही महत्वाची आहेत.  हा असा काळ आहे ज्यात देशाच्या विकासाचे अनेक घटक एकत्र आले आहेत.  असा काळ इतिहासात याआधी कधीच आला नव्हता आणि भविष्यातही येण्याची शक्यता नाही, म्हणजे ना भूतो ना भविष्यति. आज आपण जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत, तुम्हाला माहीत आहे ना, विक्रमी अल्पावधीत, आपण 10व्या  अर्थव्यवस्थेवरुन 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो. आज जगाचा भारतावर विश्वास वाढला आहे, भारतातील गुंतवणूक विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.  आज भारताचे उत्पादन आणि सेवा क्षेत्र नवीन उंची गाठत आहे, आपली निर्यात नवीन विक्रम निर्माण करत आहे.  केवळ 5 वर्षात 13.5 कोटीहून अधिक लोक गरिबीतून बाहेर आले आहेत.  हा भारताचा नवमध्यमवर्ग बनला आहे.

देशात सामाजिक पायाभूत सुविधा, भौतिक पायाभूत सुविधा आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे विकासाला अभूतपूर्व वेग आला आहे.  या वर्षी भौतिक पायाभूत सुविधांमध्ये 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे आणि अशी गुंतवणूक दरवर्षी वाढत आहे. याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर किती मोठा परिणाम होईल आणि किती नवीन संधी निर्माण होतील याची कल्पना करा.

मित्रांनो,

तुमच्यासारख्या तरुणांसाठी हा संधीचा काळ आहे.  2020 नंतर सुमारे 5 कोटी सहकारी EPFO ​​शी जोडले गेले आहेत.  यापैकी सुमारे 3.5 कोटी लोक असे आहेत जे पहिल्यांदाच EPFO ​​च्या कक्षेत आले आहेत आणि त्यांना पहिल्यांदाच औपचारिकरित्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. याचा अर्थ तुमच्यासारख्या तरुणांसाठी औपचारिक नोकऱ्यांच्या संधी भारतात सातत्याने वाढत आहेत.

2014 पूर्वी आपल्या देशात 100 पेक्षा कमी स्टार्टअप होते.  आज त्यांची संख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे.  स्टार्टअपच्या या लाटेमुळे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आज भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे. आज आपण मोबाईल आयातदारापासून मोबाईलचे निर्यातदार झालो आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. संरक्षण उत्पादन क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठा विकास झाला आहे.  2014 च्या तुलनेत संरक्षण निर्यातीत सुमारे 23 पट वाढ झाली आहे.  जेव्हा एवढा मोठा बदल घडतो, तेव्हा संरक्षण परिसंस्थेच्या संपूर्ण पुरवठा साखळीत मोठ्या संख्येने नवीन नोकऱ्या निर्माण होतात.

मला माहीत आहे की आपल्या अनेक तरुण मित्रांना नोकरी शोधणाऱ्यांऐवजी नोकरी निर्माण करणारे बनायचे आहे. सरकारच्या मुद्रा योजनेतून देशातील छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत मिळते. वर्तमानात 8 कोटी लोकांनी प्रथमच उद्योजक म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे, स्वतःचे काम सुरू केले आहे.  गेल्या 9 वर्षांत 5 लाख सामान्य सेवा केंद्र (कॉमन सर्व्हिस सेंटर्सही) उघडण्यात आली आहेत. यामध्ये प्रत्येकी 2 ते 5 जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.

मित्रांनो,

राजकीय स्थैर्य, धोरणातील स्पष्टता आणि आपल्या लोकशाही मूल्यांमुळे हे सर्व भारतात घडत आहे. गेल्या 9 वर्षांत भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले आहेत.  तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी असे असतील ज्यांचे वय 2014 मध्ये, आजपासून दहा वर्षांनी, कोणी दहा, कोणी बारा, कोणी चौदा वर्षाचे असतील.  त्यावेळी त्यांना वर्तमानपत्रात काय ठळक बातम्या आहेत हे माहित नसेल.  भ्रष्टाचाराने देश कसा उद्धवस्त केला होता.

 

मित्रांनो,

आज मी मोठ्या अभिमानाने सांगू शकतो की आम्ही मध्यस्थ आणि गळती रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली तयार केली आहे. अनेक सुधारणा आणून दलालांना व्यवस्थेतून दूर करून पारदर्शक व्यवस्था निर्माण केली आहे. बेईमान लोकांना शिक्षा होत आहे आणि प्रामाणिकपणाचा आदर केला जात आहे. आजकाल माझ्यावर आरोप होत आहे की मोदी लोकांना तुरुंगात टाकतात, मला याचे आश्चर्यच वाटते.  तुम्हीच सांगा, तुम्ही देशाची संपत्ती चोरली असेल तर कुठे राहणार?  कोठे राहावे?  शोधून शोधून पाठवायला हवे की नाही.  तुम्हाला हवे तेच मी करतोय ना?  काही लोक खूप चिंतेत राहतात.

मित्रांनो,

विकासाचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी स्वच्छ, सुस्पष्ट आणि स्थिर प्रशासन अत्यंत आवश्यक आहे.  तुमचा निर्धार असेल तर 2047 पर्यंत भारताला विकसित, सर्वसमावेशक आणि आत्मनिर्भर देश होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

मित्रांनो,

आपण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.  तुमच्याकडून सर्वोत्तमाची अपेक्षा फक्त भारतच बाळगत नाही तर संपूर्ण जग तुमच्याकडे आशेने पाहत आहे. भारत आणि भारतीय तरुणांची क्षमता तसेच कामगिरी या दोन्हीची जगाला कल्पना आली आहे. आता त्यांना समजावून सांगण्याची गरज नाही की भारतातला मुलगा असेल तर काय होईल, भारतातली मुलगी असेल तर काय होईल. ते स्वतःच समजून जातात, भाऊ, हे मान्य तर कराच.

भारताची प्रगती आणि भारताच्या तरुणांची प्रगती जगाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे.  मी देशाला अशक्य वाटणारी हमी देऊ शकतो, कारण त्यामागे तुमची ताकद आहे, माझ्या मित्रांनो.  त्या आश्वासनांची पूर्तता मी करू शकतो कारण त्यामागे तुमच्यासारख्या तरुणांचे सामर्थ्य  आहे. मी भारताचे म्हणणे जगाच्या व्यासपीठावर जोरकसपणे मांडू शकतो, त्यामागे माझी प्रेरणा ही माझी युवा शक्ती आहे.  त्यामुळे भारतातील तरुण हीच माझी खरी ताकद आहे, माझे संपूर्ण सामर्थ्य त्यातच आहे. आणि मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या चांगल्या भविष्यासाठी मी रात्रंदिवस काम करत राहीन.

पण मित्रांनो,

मला देखील आज तुमच्याकडे काही मागायचे आहे. वाईट नाही वाटणार ना? तुम्हाला वाटेल हे असे कसे पंतप्रधान आहेत, आम्हा तरुणांकडेच मागत आहेत. मित्रांनो, तुम्ही मला निवडणुकीत विजयी करा असे काही मी मागत नाही. माझ्या पक्षात तुम्ही सामिल व्हा असे देखील मी म्हणणार नाही.

मित्रांनो,

येथे माझे वैयक्तिक असे काहीच नाहीये, जे काही आहे ते देशाचे आहे. आणि म्हणूनच मी आज तुमच्याकडे काहीतरी मागणार आहे, तेही देशासाठीच मागणार आहे. स्वच्छ भारत अभियानाला यशस्वी करण्यात तुमच्यासारख्या तरुणांची फार महत्त्वाची भूमिका होती. पण, स्वच्छतेची कास धरणे हा काही एक दोन दिवसांपुरता कार्यक्रम नाही. ही एक सतत सुरु राहणारी प्रक्रिया आहे.आपल्याला त्याची सवय करून घ्यावी लागेल. आणि म्हणूनच, येत्या 2 ऑक्टोबरला असलेल्या बापूजींच्या जयंतीच्या थोडे आधी म्हणजेच 1 ऑक्टोबरला देशात स्वच्छतेशी संबंधित एक भव्य कार्यक्रम होणार आहे. तुमच्यासारख्या युवकांनी यामध्ये चढाओढीने भाग घ्यावा असा माझा आग्रह आहे. आपण हा कार्यक्रम यशस्वी करु, नक्कीच यशस्वी करू. तुमच्या विद्यापीठात याची माहिती मिळेल. एखादा भाग निश्चित करून तुम्ही तो संपूर्णपणे स्वच्छ करणार का?  

 

माझी दुसरी मागणी डिजिटल देवाणघेवाणीबद्दल आहे, युपीआयशी संबंधित आहे. आज संपूर्ण जगभरात डिजिटल भारताची, युपीआयची किती प्रशंसा होत आहे. हा तुम्हा सर्वांचा देखील सन्मान आहे. तुम्ही सर्व तरुणांनी हा बदल वेगाने स्वीकारला सुद्धा आणि फिनटेकमध्ये त्याच्याशी संबंधित अनोखे नवोन्मेष देखील करून दाखवले. आता याचा आणखी विस्तार करण्याची, या बदलाला नवी दिशा देण्याची जबाबदारी देखील माझ्या तरुणांनाच घ्यावी लागणार आहे. मी एका आठवड्यात किमान सात लोकांना युपीआय कसे चालवायचे याचे शिक्षण देईन, युपीआयचा वापर प्रत्यक्ष करायला शिकवीन, डिजिटल व्यवहारांचे शिक्षण देईन असा निश्चय तुम्ही करू शकता का? सांगा, कराल का? पहा दोस्तांनो, बघताबघता परिवर्तन सुरु होऊन जाते.

मित्रांनो,

माझा तुमच्याकडे तिसरा आग्रह देखील आहे, आणि माझी मागणी ‘व्होकल फॉर लोकल’ संकल्पनेशी संबंधित आहे. मित्रांनो, हा उपक्रम देखील तुम्ही वाढवू शकता. एकदा तुम्ही हे काम हातात घेतलेत ना, की मग बघा, जग थांबणार नाही, विश्वास ठेवा. कारण, तुमच्या सामर्थ्यावर माझा विश्वास आहे. तुमचा तुमच्या स्वतःच्या ताकदीवर विश्वास आहे की नाही ते मला माहित नाही, पण मला विश्वास आहे. हे बघा, हा सणासुदीचा काळ आहे. या सणांच्या निमित्ताने तुम्ही ज्या भेटवस्तू खरेदी करा त्यांची निर्मिती आपल्याच देशात झालेली असेल याची खबरदारी तुम्ही घेऊ शकाल. आपल्या दैनंदिन जीवनात देखील तुम्ही अशाच वस्तूंचा वापर करा, अशीच उत्पादने वापरा ज्यांना भारताच्या मातीचा सुगंध येतो आहे, ज्या वस्तू देशातील श्रमिकांनी घाम गाळून तयार केल्या आहेत. आणि ‘व्होकल फॉर लोकल’चा हा उपक्रम केवळ सणांच्या काळापुरता मर्यादित राहायला नको.

मी तुम्हांला एक काम सांगतो, तुम्ही करणार का,बोला.गृहपाठाशिवाय शिकण्याचा कोणताही तास पूर्ण होऊ शकत नाही, सांगा, तुम्ही करणार का? काही जण यावर काहीच बोलत नाहीत. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत एकत्रितपणे, कागद-पेन घेऊन बसा, जर मोबाईलवर लिहित असलात तर त्यावर यादी तयार करा. अशा गोष्टींची यादी बनवा, ज्या तुम्ही वापरता, दिवसाच्या चोवीस तासांमध्ये ज्या ज्या वस्तूंचा वापर तुम्ही करता, त्यापैकी आपल्या देशात निर्मित वस्तू कोणत्या आहेत आणि परदेशात तयार झालेल्या किती आहेत. करणार का अशी यादी? तुम्हांला माहितच नसेल की तुम्ही तुमच्या खिशात जो छोटा कंगवा ठेवता तो देखील परदेशातून आयात केलेला असू शकेल आणि हे तुम्हाला कळलेच नसेल. अशा एकेक परदेशी वस्तू असतात आपल्या घरात, आपल्या आयुष्यात त्यांनी घुसखोरी केलेली आहे. मित्रांनो, आपल्या देशाला वाचवण्यासाठी या गोष्टी आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. अर्थात आपल्या देशात निर्माण होणाऱ्या काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला हव्या त्या प्रकारच्या नाहीत, ठीक आहे. मात्र आपण आवर्जून त्यावर लक्ष ठेवायला हवे, जरा शोध घ्यायला हवा की आपण काही चुकीचे तर करत नाही आहोत ना? एकदा आपण आपल्याच देशात तयार झालेल्या उत्पादनांची खरेदी करायला सुरुवात केली ना की, मग दोस्तहो, तुम्ही पाहतच राहाल की, आपल्या देशातील व्यापार उदीम इतक्या वेगाने वाढीस लागेल ज्याची कोणीच कल्पना करू शकत नाही. लहान लहान उपक्रम देखील मोठी स्वप्ने साकार करण्यात मदत करतात.

मित्रांनो,

आपल्या महाविद्यालयांचे परिसर सुद्धा ‘व्होकल फॉर लोकल’ साठीची मोठी केंद्रे बनू शकतात. आपले परिसर फक्त शिक्षणाचेच नव्हे तर फॅशनसाठीचे देखील उपक्रम करणारी केंद्रे असतात. का, तुम्हांला हे ऐकून बरे नाही का वाटले? तुम्ही महाविद्यालयांमध्ये कितीतरी विशेष दिन साजरे करता तेव्हा काय होते? समजा आज रोझ डे आहे. मग अशावेळी आपण भारतीय कापडापासून तयार झालेल्या वस्रांना महाविद्यालय परिसरातील फॅशन स्टेटमेंट बनवू शकत नाही का? तुम्हा तरुणांची ही ताकद आहे. तुम्ही बाजारपेठेला, ब्रँड्सना, डिझायनर्सना आपल्या पद्धतीचे काम करण्यासाठी थोडी सक्ती करू शकतो. महाविद्यालये तसेच विद्यापीठ परिसरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. त्यावेळी आपण खादीशी संबंधित फॅशन शो आयोजित करु शकतो.

आपण आपल्या विश्वकर्मा सहकाऱ्यांनी तयार केलेली, आपल्या आदिवासी सहकाऱ्यांनी घडवलेली शिल्पे प्रदर्शित करू शकतो. हा भारताला आत्मनिर्भर करण्याचा, भारताला विकसित करण्याचा मार्ग आहे. याच मार्गावर वाटचाल करून आपण मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करू शकतो. आणि तुम्ही लक्षात घ्या, या ज्या तीन-चार छोट्या-छोट्या गोष्टी मी सांगितल्या आहेत, तुमच्याकडे जी मागणी केली आहे, एकदा या गोष्टी केल्या की मग तुम्ही बघाल, तुमचा किती फायदा होतो आहे, देशाचा किती फायदा होतो आहे. यातून कोणाला किती लाभ होईल हे तुम्ही नक्की तपासा.

माझ्या तरुण मित्रांनो,

जर आपल्या युवावर्गाने, आपल्या नव्या पिढीने एकदा निश्चय केला ना की मग त्याचा हवा तो परिणाम नकीच साध्य होतो. तुम्ही सर्वजण आज या भारत मंडपम मधून घरी जाल तेव्हा मनात असा निर्धार करुनच जाल असा मला विश्वास आहे. आणि या निर्धारासह त्याचे सामर्थ्य देखील नक्की दाखवा.

मित्रांनो,

आपण एक क्षण असा विचार करूया की, आपल्याला देशासाठी प्राणत्याग करण्याची संधी मिळाली नाही. जे भाग्य भगतसिंग, सुखदेव यांना मिळाले, चंद्रशेखर आझाद यांना मिळाले ते आपल्याला मिळू शकलेले नाही. पण आपल्याला भारत देशासाठी जीवन जगण्याची संधी मिळालेली आहे. आजपासून शंभर वर्षांपूर्वीच्या काळावर एक नजर टाका, त्याच्याही 19,20,22,23,25 वर्षां आधी काय परिस्थिती होती याची कल्पना करा. त्यावेळी जे तरुण होते त्यांनी दृढनिश्चय केला होता की मी देशाला स्वतंत्र करण्यासाठी जे जे करावे लागेल ते सगळे प्रयत्न करीन. जो मार्ग मला सापडेल त्या मार्गाने मी करीन. आणि त्या काळचे तरुण त्या दिशेने वाटचाल करू लागले होते. त्यांनी पुस्तके फडताळात ठेवली, तुरुंगात जाण्याचा मार्ग निवडला होता. फाशीवर जाणे स्वीकारले होते. जो जो मार्ग दिसला त्या मार्गाने वाटचाल केली.शंभर वर्षांपूर्वी पराक्रमाची जी पराकाष्ठा झाली, त्याग आणि तपस्येचे जे वातावरण तयार झाले, मायदेशासाठी जगण्या-मरण्याचा कठोर निर्धार झाला, त्यातून बघता बघता देश 25 वर्षांत स्वतंत्र झाला. खरे आहे की नाही? त्यांच्या पुरुषार्थाने हे घडले की नाही? त्या 25 वर्षांमध्ये जे देशव्यापी सामर्थ्य निर्माण झाले त्यातून 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.

मित्रांनो,

माझ्यासोबत चला. या, मी तुम्हांला आमंत्रण देतो आहे. आपल्या समोर पुढची 25 वर्षे आहेत. शंभर वर्षांपूर्वी जे घडले, त्यावेळी सर्वजण स्वराज्य मिळवण्यासाठी निघाले होते, आपण देशाच्या समृद्धीसाठी एकत्र चालूया. येत्या 25 वर्षांमध्ये देशाला समृद्धी मिळवूनच देऊ. त्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते मी करीन, मागे हटणार नाही. मित्रांनो आत्मनिर्भर भारत, समृद्धीच्या दारात उभा रहावा. आत्मनिर्भर भारत स्वाभिमानाला नव्या उंचीवर घेऊन जात आहे.हाच निश्चय करून निघूया, चला, आपण सर्वजण मिळून समृध्द भारताच्या निर्मितीचे वचन पूर्ण करुया. 2047 मध्ये आपण विकसित राष्ट्र असले पाहिजे. आणि तेव्हा तुम्ही देखील जीवनाच्या सर्वात उंच जागी पोहोचलेले असाल. 25 वर्षांनंतर तुम्ही जेथे कुठे असाल तेथे तुमच्या जीवनातील सर्वोच्च ठिकाणी असाल.

मित्रांनो, आज मी जी मेहनत करतो आहे आणि उद्या तुम्हां सर्वांना सोबत घेऊन जी मेहनत करणार आहे, ती तुम्हांला जीवनात कुठून कुठे घेऊन जाईल याची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. तुमची स्वप्ने साकार करण्यापासून कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. आणि मी तुम्हाला ग्वाही देतो कि मित्रांनो, जगातील तीन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये मी भारताचा समावेश करुनच दाखवेन. आणि म्हणूनच मी तुमची सोबत मागतो आहे, तुमच्या सहकार्याची अपेक्षा करतो आहे, भारतमातेसाठी तुमची मदत मागतो आहे. 140 कोटी भारतवासीयांसाठी ही अपेक्षा करतो आहे.

माझ्यासोबत बोला- भारत माता की – जय,  संपूर्ण ताकदीने बोला मित्रांनो - भारत माता की – जय,  भारत माता की – जय, 

खूप खूप धन्यवाद.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
A big deal: The India-EU partnership will open up new opportunities

Media Coverage

A big deal: The India-EU partnership will open up new opportunities
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi interacts with Energy Sector CEOs
January 28, 2026
CEOs express strong confidence in India’s growth trajectory
CEOs express keen interest in expanding their business presence in India
PM says India will play decisive role in the global energy demand-supply balance
PM highlights investment potential of around USD 100 billion in exploration and production, citing investor-friendly policy reforms introduced by the government
PM calls for innovation, collaboration, and deeper partnerships, across the entire energy value chain

Prime Minister Shri Narendra Modi interacted with CEOs of the global energy sector as part of the ongoing India Energy Week (IEW) 2026, at his residence at Lok Kalyan Marg earlier today.

During the interaction, the CEOs expressed strong confidence in India’s growth trajectory. They conveyed their keen interest in expanding and deepening their business presence in India, citing policy stability, reform momentum, and long-term demand visibility.

Welcoming the CEOs, Prime Minister said that these roundtables have emerged as a key platform for industry-government alignment. He emphasized that direct feedback from global industry leaders helps refine policy frameworks, address sectoral challenges more effectively, and strengthen India’s position as an attractive investment destination.

Highlighting India’s robust economic momentum, Prime Minister stated that India is advancing rapidly towards becoming the world’s third-largest economy and will play a decisive role in the global energy demand-supply balance.

Prime Minister drew attention to significant investment opportunities in India’s energy sector. He highlighted an investment potential of around USD 100 billion in exploration and production, citing investor-friendly policy reforms introduced by the government. He also underscored the USD 30 billion opportunity in Compressed Bio-Gas (CBG). In addition, he outlined large-scale opportunities across the broader energy value chain, including gas-based economy, refinery–petrochemical integration, and maritime and shipbuilding.

Prime Minister observed that while the global energy landscape is marked by uncertainty, it also presents immense opportunity. He called for innovation, collaboration, and deeper partnerships, reiterating that India stands ready as a reliable and trusted partner across the entire energy value chain.

The high-level roundtable saw participation from 27 CEOs and senior corporate dignitaries representing leading global and Indian energy companies and institutions, including TotalEnergies, BP, Vitol, HD Hyundai, HD KSOE, Aker, LanzaTech, Vedanta, International Energy Forum (IEF), Excelerate, Wood Mackenzie, Trafigura, Staatsolie, Praj, ReNew, and MOL, among others. The interaction was also attended by Union Minister for Petroleum and Natural Gas, Shri Hardeep Singh Puri and the Minister of State for Petroleum and Natural Gas, Shri Suresh Gopi and senior officials of the Ministry.