श्री नारायण गुरूंचे आदर्श संपूर्ण मानवतेसाठी एक खूप मोठी ठेव आहे: पंतप्रधान
भारताला कायम समाजात परिवर्तनकारी बदल घडवून आणणारे उल्लेखनीय संत, ऋषी आणि समाजसुधारक लाभले आहेत: पंतप्रधान
श्री नारायण गुरूंनी सर्व प्रकारच्या भेदभावापासून मुक्त समाजाचे स्वप्न पाहिले होते, आज परिपूर्तीचा दृष्टिकोन अवलंबत देश भेदभावाच्या कुठल्याही शक्यतेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काम करत आहे: पंतप्रधान
स्किल इंडिया सारखी मोहीम तरुणांना सक्षम बनवत आहेत आणि त्यांना आत्मनिर्भर बनवत आहे: पंतप्रधान
भारताला सक्षम करण्यासाठी आर्थिक, सामाजिक आणि लष्करी अशा प्रत्येक बाबतीत आपण आघाडीवर राहिले पाहिजे. आज, देश याच दिशेने मार्गक्रमण करत आहे: पंतप्रधान

ब्रह्मर्षी स्वामी सच्चिदानंद जी, श्रीमठ स्वामी शुभंगा-नंदा जी, स्वामी शारदानंद जी, सर्व आदरणीय संत, सरकारमधील माझे सहकारी जॉर्ज कुरियन जी, संसदेतील माझे सहकारी अदूर प्रकाश जी, इतर सर्व ज्येष्ठ मान्यवर, आणि सभ्य स्त्री-पुरूषहो.
पिन्ने एनडे ऐल्ला, प्रियपेट्ट मलयाली सहोदिरि सहोदरन मार्कु, एनडे विनीतमाय नमस्कारम्।
आज हा परिसर देशाच्या इतिहासातील एका अभूतपूर्व घटनेचे स्मरण करण्याचा साक्षीदार होतो आहे. ती एक अशी ऐतिहासिक घटना होती, ज्या घटनेने आपल्या स्वातंत्र्य चळवळीला केवळ एक नवीन दिशा दिली नाही तर स्वातंत्र्याच्या उद्दिष्टाला, स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला ठोस अर्थ दिला. शंभर वर्षांपूर्वीची श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांची ती भेट आजही तितकीच प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहे. शंभर वर्षांपूर्वी झालेली ती भेट आजही सामाजिक सौहार्द आणि विकसित भारताच्या सामूहिक उद्दिष्टांसाठी उर्जेचा एक मोठा स्रोत आहे. या ऐतिहासिक प्रसंगी, मी श्री नारायण गुरुंच्या चरणी प्रणाम करतो. गांधीजींनाही मी आदरांजली वाहतो.
 

बंधू आणि भगिनींनो,
श्री नारायण गुरूंचे आदर्श ही अवघ्या मानवतेसाठी एक मोठी संपदा आहे. देशाची आणि समाजाची सेवा करण्याच्या संकल्पावर काम करणाऱ्यांसाठी श्री नारायण गुरू हे प्रकाश स्तंभासारखे आहेत. समाजातील शोषित-पीडित-वंचित वर्गाशी माझे नाते कसे आहे हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. आणि म्हणूनच आजही जेव्हा मी समाजातील शोषित, वंचित वर्गासाठी मोठे निर्णय घेतो तेव्हा मला गुरुदेवांची नक्कीच आठवण येते. शंभर वर्षांपूर्वीची सामाजिक परिस्थिती, शतकानुशतके गुलामगिरीमुळे निर्माण झालेल्या विकृती, त्या काळी लोक अशा वाईट गोष्टींविरुद्ध बोलण्यास घाबरत होते. मात्र श्री नारायण गुरूंना विरोधाची पर्वा नव्हती, ते अडचणींना घाबरत नव्हते, कारण सुसंवाद आणि समानतेवर त्यांचा विश्वास होता. सत्य, सेवा आणि सौहार्दावर त्यांचा विश्वास होता. ही प्रेरणा आपल्याला 'सबका साथ, सबका विकास'चा मार्ग दाखवते. ही श्रद्धा आपल्याला असा भारत निर्माण करण्याची शक्ती देते जिथे शेवटच्या पायरीवर उभ्या व्यक्तीला आपले प्रथम प्राधान्य असेल.

मित्रहो,
श्री नारायण गुरू आणि शिवगिरी मठावर माझा किती विश्वास आहे, हे शिवगिरी मठाशी संबंधित लोक आणि संतांना सुद्धा माहिती आहे. मला भाषा समजत नव्हती, पण पूज्य सच्चिदानंद जी ज्या गोष्टी सांगत होते, त्यांना सर्व जुन्या गोष्टी आठवत होत्या. आणि मी हे देखील पाहत होतो की तुम्ही खूप भावनिक होत होता आणि त्या सर्व गोष्टींमुळे त्यांच्याशी जोडलेले होता. आणि मठातील पूज्य संतांनी नेहमीच मला त्यांचे प्रेम दिले आहे, हे माझे सौभाग्य आहे. मला आठवते, 2013 साली,  जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा केदारनाथमध्ये नैसर्गिक आपत्ती आली होती, तेव्हा शिवगिरी मठाचे अनेक पूज्य संत तिथे अडकले होते, काही भक्तही अडकले होते. शिवगिरी मठाने तिथे अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारत सरकारशी संपर्क साधला नाही, प्रकाश जी, वाईट वाटून घेऊ नका, शिवगिरी मठाने, मी एका राज्याचा मुख्यमंत्री होतो, मला आदेश दिला आणि या सेवकावर विश्वास ठेवला, की भाऊ , तुम्ही हे काम करा. आणि ईश्वराच्या कृपेने, मी सर्व संत आणि भक्तांना सुरक्षितपणे बाहेर काढू शकलो.

मित्रहो,
खरे तर कठीण काळात, आपण ज्याला आपले मानतो, ज्याच्यावर आपला हक्क आहे असे आपल्याला वाटते, त्याच्याकडेच आपले पहिले लक्ष जाते. आणि तुमचा माझ्यावर हक्क आहे, असे तुम्ही मानता, याचा मला आनंद आहे. शिवगिरी मठातील संतांच्या या आपुलकीपेक्षा माझ्यासाठी आत्मिक सुख आणखी काय असू शकते?
 

मित्रहो,
आपणा सर्वांबरोबरच माझे एक नाते काशीसोबतही आहे. शतकानुशतके वर्कलाला दक्षिणेची काशी देखील म्हटले जाते आहे. आणि काशी उत्तरेची असो वा दक्षिणेची, माझ्या लेखी प्रत्येक काशी माझी काशी आहे.

मित्रहो,
मला भारताची आध्यात्मिक परंपरा, ऋषी-मुनींचा वारसा जाणून घेण्याचे आणि जवळून जगण्याचे भाग्य लाभले आहे. जेव्हा आपला देश अडचणींच्या भोवऱ्यात अडकतो तेव्हा देशाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात कोणीतरी महान व्यक्तिमत्व जन्माला येते आणि समाजाला एक नवीन दिशा दाखवते, हे भारताचे वैशिष्ट्य आहे. कोणी समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी काम करतात. कोणी सामाजिक क्षेत्रात सामाजिक सुधारणांना गती देतात. श्री नारायण गुरु हे असेच एक महान संत होते. 'निवृत्ति पंचकम' आणि 'आत्मोपदेश शतकम' सारखे त्यांचे ग्रंथ अद्वैत आणि अध्यात्माच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शकाप्रमाणे आहेत.

मित्रहो,
योग आणि वेदांत, साधना आणि मुक्ती हे श्री नारायण गुरुंचे मुख्य विषय होते. मात्र वाईट प्रथांमध्ये अडकलेल्या समाजाची आध्यात्मिक उन्नती केवळ त्याच्या सामाजिक उन्नतीद्वारेच शक्य होईल, हे त्यांना माहित होते. म्हणूनच त्यांनी आध्यात्मिकतेला सामाजिक सुधारणा आणि सामाजिक कल्याणाचे माध्यम बनवले. आणि गांधीजींनाही श्री नारायण गुरुंच्या अशा प्रयत्नांमधून प्रेरणा मिळाली, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यासारख्या विद्वानांनाही श्री नारायण गुरुंशी चर्चा करण्याचा लाभ मिळाला.
 

मित्रहो,
एकदा कोणीतरी श्री नारायण गुरुंचे आत्मोपदेश शतकम् रमण महर्षीजींना वाचून दाखवले. ते ऐकल्यानंतर, रमण महर्षीजी म्हणाले होते"अवर एल्म तेरीन्जवर". म्हणजेच - त्यांना सर्व काही माहित आहे! आणि त्या काळात, जेव्हा परकीय कल्पनांच्या प्रभावाखाली भारताची सभ्यता, संस्कृती आणि तत्वज्ञानाचे अवमूल्यन करण्याचे कट रचले जात होते, तेव्हा, आपल्या मूळ परंपरेत दोष नाही याची जाणीव श्री नारायण गुरुंनी आपल्याला करून दिली होती. आपण आपले अध्यात्म खऱ्या अर्थाने आत्मसात करण्याची गरज आहे. आपण नरामध्ये श्रीनारायण आणि जीवामध्ये शिव पाहणारे लोक आहोत. आपल्याला द्वैतात अद्वैत दिसते. आपल्याला भेदामध्येही अभेद दिसतो. आपल्याला विविधतेतही एकता दिसते.

मित्रहो,
तुम्हा सर्वांना माहिती आहे की श्री नारायण गुरुंचा मंत्र होता- “ओरु जाती, ओरु मतम्, ओरु दैवम, मनुष्यनु।.” अर्थात संपूर्ण मानवतेची एकता, सर्व सजीवांची एकता! ही कल्पना भारताच्या जीवन संस्कृतीचा गाभा आहे, तिचा पाया आहे. आज भारत त्या कल्पनेचा विस्तार विश्व कल्याणाच्या भावनेने करत आहे. तुम्ही लक्षात घ्या, अलिकडेच आपण जागतिक योग दिन साजरा केला. यावेळी योग दिनाची संकल्पना होती-

एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग. म्हणजेच एक पृथ्वी, एक आरोग्य!

याआधीही भारताने जागतिक हितासाठी एक जग, एक आरोग्य सारखा उपक्रम सुरू केला आहे. आज भारत शाश्वत विकासाच्या दिशेने One Sun, One Earth, One grid अशा जागतिक चळवळींचे नेतृत्व सुद्धा करत आहे. तुम्हाला आठवत असेल की 2023 साली भारताने जी-20 शिखर परिषदेचे आयोजन केले होते तेव्हा आपण त्याची संकल्पना देखील ठेवली होती- “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य”. आपल्या या प्रयत्नांमध्ये 'वसुधैव कुटुंबकम'ची भावना निहित  आहे. श्री नारायण गुरुंसारख्या संतांची प्रेरणा या प्रयत्नांमध्ये निहित  आहे.

 

मित्रहो,
श्री नारायण गुरु यांनी  भेदभाव विरहीत समाजाची कल्पना केली होती.आज देश संपृक्तीचा दृष्टीकोन घेऊन वाटचाल करत भेदभावाला थाराही  ठेवत नाही. मात्र आपण 10-11 वर्षांपूर्वीची परिस्थिती आठवून पहा, स्वातंत्र्यानंतर इतक्या दशकांनंतरही कोट्यवधी देशवासीयांना कसे हलाखीचे जीवन कंठावे लागत होते ? कोट्यवधी  कुटुंबांच्या डोक्यावर छप्परही नव्हते ! लाखो गावांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी नव्हते, छोट्या-छोट्या आजारांवर उपचार करण्याची सोय नाही, गंभीर आजार झाला तर प्राण वाचविण्यासाठी मार्ग नाही. कोट्यवधी गरीब,दलित,आदिवासी, महिला  माणसाच्या मुलभूत सन्मान आणि हक्कापासून वंचित होते ! हे कोट्यवधी लोक अनेक पिढ्यांनपिढ्या खडतर आयुष्य जगत होते,त्यांची  चांगल्या आयुष्याची उमेदच  ते हरवून बसले होते. जेव्हा देशाची इतकी मोठी लोकसंख्या असे कष्टमय आणि निराशेचे जीवन जगत होती तेव्हा देश प्रगती कसा साध्य करू शकत होता ? आणि म्हणूनच आम्ही सर्वप्रथम सरकारच्या विचारात  संवेदनशीलता आणली ! आम्ही सेवा हा संकल्प केला ! परिणामी पीएम आवास योजनेअंतर्गत कोट्यवधी गरीब-दलित-पिडीत-शोषित, वंचित कुटुंबाना आम्ही पक्की घरे देऊ शकलो.प्रत्येक गरिबाला  पक्के घर देणे हे आमचे लक्ष्य आहे. हे  घर म्हणजे  केवळ सिमेंट आणि विटांचा सांगाडा नव्हे तर सर्व आवश्यक सुविधांसह ही घरे साकार झाली आहेत.आम्ही केवळ चार भिंती असलेली घरे देत नाही तर आम्ही स्वप्नांना संकल्पाचे रूप देणारे घर देतो.

म्हणूनच पीएम आवास योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या घरांमध्ये गॅस वीज,शौचालय यासारख्या सोयी-सुविधा निश्चित करण्यात येत आहेत. जल जीवन अभियानाअंतर्गत घरोघरी पाणी पोहोचविण्यात येत आहे. ज्या आदिवासी भागांपर्यंत सरकार कधी पोहोचलेही नव्हते अशा भागांमध्ये आज विकासाची हमी पोहोचत आहे.आदिवासींमध्येही जे अधिक वंचित आदिवासी आहेत त्यांच्यासाठी आम्ही पीएम जनमन योजना सुरु केली आहे. यामुळे आज कितीतरी भागांचे चित्रच पालटत आहे.याचाच परिणाम म्हणजे समाजाच्या तळाशी असलेल्या व्यक्तीमधेही नवी उमेद निर्माण झाली आहे. आपल्या जीवनात परिवर्तन घडविण्याबरोबरच राष्ट्र उभारणीतही आपली भक्कम भूमिका हा वर्ग पाहत आहे.

मित्रहो,
श्री नारायण गुरु यांनी नेहमीच महिला सशक्तीकरणावर भर दिला होता. आमचे सरकारही महिलांच्या नेतृत्वाखाली विकास हा मंत्र घेऊन आगेकूच करत आहे. स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे अशी अनेक क्षेत्रे होती जी महिलांसाठी खुली नव्हती.आम्ही यामधले निर्बंध दूर केले,नव-नव्या क्षेत्रांमध्ये महिलांना अधिकार प्राप्त झाले,आज क्रीडा क्षेत्रापासून ते अंतराळ क्षेत्रापर्यंत प्रत्येक क्षेत्रात कन्या देशाचे नाव उज्वल करत आहेत.आज समाजातला प्रत्येक वर्ग,प्रत्येक स्तर आत्मविश्वासासह  विकसित भारत साकारण्यासाठी आपले योगदान देत आहे. स्वच्छ भारत अभियान,पर्यावरणाशी संबंधित अभियान,अमृत सरोवरांची निर्मिती, भरड धान्यांविषयी जागृती  यासारखी अभियाने  लोकभागीदारीच्या भावनेने आम्ही पुढे नेत आहोत,140 कोटी देशवासीयांच्या सामर्थ्याने आगेकूच करत आहोत.
 

मित्रहो,
श्री नारायण गुरु म्हणत असत-    
- विद्या कोंड प्रब्बुद्धर आवुका संगठना कोंड शक्तर आवुका, प्रयत्नम कोंड संपन्नार आवुका"। म्हणजेच ‘शिक्षणाद्वारे ज्ञान, संस्थेद्वारे सामर्थ्य,उद्योगाद्वारे समृद्धी’. हा दृष्टीकोन साकार करण्यासाठी त्यांनी स्वतःही महत्वपूर्ण संस्थाचा पाया घातला होता. शिवगिरी मध्येच गुरुजींनी शारदा मठाची स्थापना केली होती.शिक्षण हेच वंचितांच्या  उत्थानाचे माध्यम बनेल हा संदेश, सरस्वती मातेला समर्पित हा मठ देत आहे.गुरुदेवांच्या या प्रयत्नांचा आजही सातत्याने विस्तार होत आहे याचा मला आनंद आहे.देशात अनेक शहरांमध्ये गुरुदेव सेंटर्स आणि श्री नारायण कल्चरल मिशन मानव कल्याणाचे काम करत आहेत.

मित्रहो,
शिक्षण,संघटना आणि औद्योगिक  प्रगतीद्वारे समाज कल्याण या दृष्टीकोनाची स्पष्ट झलक आज आपल्याला देशाची धोरणे आणि निर्णयांमध्येही दिसून येते. इतक्या दशकांनंतर आम्ही देशात नवे शैक्षणिक धोरण लागू केले आहे. नवे शैक्षणिक धोरण, शिक्षण आधुनिक आणि समावेशक तर करतेच त्याच बरोबर मातृभाषेत शिक्षणालाही प्रोत्साहन देते.याचा सर्वात मोठा लाभ मागास आणि वंचित वर्गाला होत आहे.

मित्रहो,
गेल्या एका दशकात आम्ही देशात इतक्या मोठ्या संख्येने आयआयटी, आयआयएम,एम्स यासारख्या संस्था सुरु केल्या आहेत जितक्या स्वातंत्र्यानंतर 60 वर्षातही सुरु झाल्या नव्हत्या.या संस्थांमुळे उच्च शिक्षणात आज गरीब आणि वंचित युवकांसाठी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. गेल्या दहा वर्षात आदिवासी भागात 400 पेक्षा जास्त एकलव्य निवासी शाळा उघडण्यात आल्या आहेत. अनेक पिढ्यांपासून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आदिवासी समाजाची मुले आता आगेकूच करत आहेत.

बंधू-भगिनींनो,
आम्ही कौशल्य आणि संधी यांची शिक्षणाशी थेट सांगड घातली आहे. कौशल्य भारत यासारखे  अभियान देशातल्या युवकांना आत्मनिर्भर करत आहे.देशाची औद्योगिक प्रगती,खाजगी क्षेत्रात होत असलेल्या सुधारणा,मुद्रा योजना, स्टॅण्ड अप  योजना या सर्वांचा सर्वात मोठा लाभ  दलित,मागास आणि आदिवासी समाजाला होत आहे.
 

मित्रहो,
श्री नारायण गुरु यांना सशक्त भारत अपेक्षित होता.सशक्त भारतासाठी आपल्याला आर्थिक,सामाजिक आणि लष्करी अशा प्रत्येक पैलूमध्ये अग्रेसर राहायचे आहे. आज देश या मार्गावरूनच वाटचाल करत आहे.जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारताची घोडदौड  सुरु आहे.भारताच्या सामर्थ्याची झलक जगाने नुकतीच पाहिली आहे. ऑपरेशन सिंदूरने  दहशतवादाविरोधातले भारताचे कठोर धोरण जगासमोर स्पष्टपणे आणले आहे. भारतीयांचे रक्त सांडविणाऱ्या  दहशतवाद्यांसाठी कोठेही सुरक्षित आश्रय नाही हे आम्ही सिद्ध केले आहे.

मित्रहो,
आज भारत, जे योग्य आहे,जे देशहिताचे आहे ते लक्षात घेऊन पाऊले उचलतो.सैन्यदलांसाठीच्या सामग्रीकरिता परदेशावरचे भारताचे  अवलंबित्व सातत्याने कमी होत आहे.संरक्षण क्षेत्रात आपण आत्मनिर्भर होत आहोत आणि याचा प्रभाव आपण ऑपरेशन सिंदूर दरम्यानही पाहिला आहे.आपल्या सैन्यदलांनी, भारतात तयार झालेल्या शस्त्रास्त्रांनी शत्रूला 22 मिनिटात गुडघे टेकायला भाग पाडले.येत्या काळात मेड इन इंडिया शस्त्रास्त्रांचा संपूर्ण जगात डंका वाजेल याचा मला विश्वास आहे.

मित्रहो,
देशाचे संकल्प साध्य करण्यासाठी आपल्याला श्रीनारायण गुरु यांची शिकवण प्रत्येकापर्यंत पोहोचवायची आहे. आमचे सरकारही या दिशेने कार्यरत आहे.शिवगिरी मंडलाद्वारे श्रीनारायण गुरु यांच्या जीवनाशी संबंधित तीर्थस्थाने आम्ही जोडत आहोत.त्यांचा आशीर्वाद,त्यांची शिकवण अमृतकाळातल्या आपल्या वाटचालीमध्ये देशाला मार्गदर्शन  करत राहील याचा मला विश्वास आहे.आपण सर्वजण मिळून विकसित भारत हे स्वप्न साकार करू. श्रीनारायण गुरु यांचा आशीर्वाद आपणा सर्वांवर  सदैव कायम राहावा या सदिच्छेसह शिवगिरी मठाच्या सर्व संतांना मी पुन्हा एकदा नमन करतो.आपणा सर्वांना धन्यवाद !

नमस्कारम्!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Apple exports record $2 billion worth of iPhones from India in November

Media Coverage

Apple exports record $2 billion worth of iPhones from India in November
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares Sanskrit Subhashitam highlighting the power of collective effort
December 17, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi, shared a Sanskrit Subhashitam-

“अल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका।

तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः॥”

The Sanskrit Subhashitam conveys that even small things, when brought together in a well-planned manner, can accomplish great tasks, and that a rope made of hay sticks can even entangle powerful elephants.

The Prime Minister wrote on X;

“अल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका।

तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः॥”