पलाशबरी आणि सुआलकुची यांना जोडणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवरील एका पुलाची आणि रंग घर शिवसागर सुशोभीकरणाच्या प्रकल्पाची केली पायाभरणी
नामरुप येथे 500 टीपीडी मेन्थॉल प्रकल्पाचे केले उद्घाटन
पाच रेल्वे प्रकल्पांचे केले राष्ट्रार्पण
10,000 पेक्षा जास्त कलाकारांचा सहभाग असलेल्या बिहू नृत्याचा घेतला आनंद
“ हे सर्व कल्पनेच्या पलीकडचे आहे. हे विलक्षण आहे. हे आसाम आहे”
“अखेर आसाम ए-वन राज्य बनत आहे”
“प्रत्येक भारतीयाची चेतना या देशाची माती आणि परंपरांमधून निर्माण झाली आहे आणि हाच विकसित भारताचा पायादेखील आहे”
“रोंगाली बिहू हा आसामच्या जनतेचे मन आणि आत्मा यांचा सण आहे”
“विकसित भारत हे आमचे सर्वोच्च स्वप्न आहे”
“आज कनेक्टिविटी चार घटकांचा महायज्ञ आहे, भौतिक कनेक्टिविटी, डिजिटल कनेक्टिविटी, सामाजिक कनेक्टिविटी आणि सांस्कृतिक कनेक्टिविटी
“ईशान्येमधील अविश्वासाचे वातावरण आता दूर जात आहे”

मोय ओहमबाखिक, रोंगाली बीहूर, होभेच्छा जोनाइसू, एई होभा मोहोर्टत, आपोना-लुकोलोई, ऑन्टोरिक ओभिनन्दन, ज्ञापन कोरीसू.

 

मित्रांनो,

आजचे हे दृश्य, टेलिव्हिजनवर बघणारा असो, इथे कार्यक्रमात हजर असणारे असो आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. हे अविस्मरणीय आहे, अद्भुत आहे, अभूतपूर्व आहे, हा आसाम आहे. आसमंतात घुमणारा ढोल, पेपा अरु गॉगोनाचा आवाज संपूर्ण हिंदुस्तान ऐकत आहे. आसामच्या हजारो कलाकारांची ही मेहनत, हे परिश्रम, हा समन्वय आज सगळं जग मोठ्या अभिमानाने बघत आहे. एक तर इतका मोठा क्षण आहे, उत्सव इतका मोठा आहे, दुसरं म्हणजे आपला उत्साह आणि आपली भावना याला तोड नाही. मला आठवतं, जेव्हा विधानसभा निवडणुकांच्या काळात मी इथे आलो होतो, तेव्हा म्हणालो होतो की तो दिवस दूर नाही, जेव्हा लोग A पासून Assam म्हणतील. आज खरोखरच आसाम, A-One प्रदेश बनत आहे. मी आसामच्या लोकांना, देशाच्या लोकांना बिहुच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो.

 

मित्रांनो,

आज पंजाबसह उत्तर भारताच्या अनेक भागांत बैसाखीची धामधूम देखील आहे. बंगाली बंधू भगिनी पोईला बोईशाख साजरा करत आहेत, तर केरळमध्ये विषु पर्व साजरे केले जाईल. अनेक राज्यांत नवीन वर्ष सुरु होण्याचा हा काळ आहे. जे उत्सव आपण साजरा करत आहोत, त्यात एक भारत - श्रेष्ठ भारत या भावनेचे प्रतिबिंब आहे. हे उत्सव, सर्वांच्या प्रयत्नांनी विकसित झालेल्या भारताचे सर्व संकल्प पूर्ण करण्याची प्रेरणा आहेत.

 

मित्रांनो,

आज याच भावनेने आसामच्या, ईशान्य भारताच्या विकासाच्या अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. आज आसामला, ईशान्य भारताला, एम्स गोवाहाटी आणि तीन नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची भेट मिळाली आहे. आज ईशान्य भारतात रेल्वेचे जाळे विस्तारत आहे, याच्याशी निगडीत अनेक प्रकल्प सुरु देखील झाले आहेत. आज दळणवळण वाढविण्याच्या दृष्टीने ब्रह्मपुत्रा नदीवर आणखी एका पुलाचे काम सुरु झाले आहे. मिथेनॉल प्लांट बनल्यामुळे आसाम आता शेजारी देशांना देखील मिथेनॉल निर्यात करू शकेल. आसामी कला – संस्कृती, परंपरेचे प्रतीक रंगघरच्या पुनर्विकासाचे आणि सुशोभीकरणाची काम आजपासून सुरु झाले आहे. संस्कृती आणि वेगवान विकासाचा हा जो उत्सव आपण साजरा करत आहोत, त्यासाठी देखील मी आपणा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा देतो.

 

बंधू आणि भगिनींनो,

आता थोड्याच वेळात जी सांस्कृतिक झलक संपूणर देश बघणार आहे, आणि मी आता  जेव्हा आत तुमच्यामध्ये गेलो तेव्हा मला त्याचा अंदाज आला की तुम्ही काय जबरदस्त तयारी केली आहे. सर्वांच्या प्रयत्नांचे हे उत्तम उदाहरण आहे. आपली संस्कृती तुम्हा आसामवासीयांनी खूप जतन करून, सांभाळून ठेली आहे. आणि यासाठी तुमचे जितके अभिनंदन करावे तितके कमी आहे, मी तुमचे खूप खूप अभिनंदन करतो. जितक्या मित्रांनी या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला आहे, त्यांची प्रशंसा करायला शब्द अपुरे पाडतील. आपले हे सण केवळ संस्कृतीचा उत्सव नाहीत. तर सर्वांना जोडण्याची, एकत्र पुढे जाण्याची प्रेरणा देखील आहेत. रोंगाली बिहू-बौहागची हीच शाश्वत भावना आहे. हा आसामवासीयांसाठी मन आणि आत्म्याचा सण आहे. हा प्रत्येक दरी बुजवतो, प्रत्येक भेद मिटवतो. हा मानव आणि निर्सगाच्या संतुलनाचे उत्तम प्रतीक आहे. म्हणूनच बिहू फक्त शाब्दिक अर्थातून कोणी समजू शकत नाही. तर, हे समजून घ्यायला भावनांची गरज असते. हेच भाव, भगिनी-मुलींच्या केसांत माळलेल्या ‘कोपोफुल’ मध्ये असतात, मोगा सिल्क, मेखेला सदॉर अरू रोंगा रिहामधून दिसून येतात. हेच भाव आज घरोघरी केल्या जाणारे विशेष व्यंजन ‘एखो ऐक बीड-ख़ाक’ मध्ये देखील असतात.

 

मित्रांनो,

भारताचे वैशिष्ट्यच हे आहे, की आपली संकृती, आपल्या परंपरा हजारो - हजारो वर्षांपासून प्रत्येक भारतीयाला जोडत आली आहे. आपण मिळून, गुलामीच्या दीर्घ कालखंडाचा सामना केला आहे. आपण मिळून, आपल्या संस्कृतीवर झालेल्या कठीणातल्या कठीण हल्ल्यांचा सामना केला आहे. सत्ता बदलल्या, शासक आले आणि गेले, मात्र भारत अजराअमर राहिला, अटल राहिला. आपणा भारतीयांचे मन देखील आपल्या मातीचेच बनले आहे, आपल्या संस्कृतीचे बनले आहे. आणि हेच आज विकसीत भारताच्या निर्मितीची मजबूत पायाभरणी देखील करत आहेत.

 

मित्रांनो,

मला या क्षणी आसामचे प्रसिद्ध साहित्यिक आणि चित्रपट निर्माते ज्योती प्रोहाद आगरवालाजी यांनी लिहिलेले एक गीत आठवत आहे. हे गीत आहे - बिस्सा बिजोई नौ जोआन, या गीताचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. जेव्हा भारतरत्न भूपेन हजारिकाजी खूप लहान होते, तेव्हा त्यांनी हे गीत गायले होते. आजही हे गीत, देशाच्या तरुणांसाठी, आसामच्या तरुणांसाठी खूप मोठी प्रेरणा आहे. मी या गीताच्या काही ओळी वाचणार आहे, मात्र आधी तुमच्याकडून मला समजून घ्यायचे आहे. तुम्ही माझ्या उच्चारांत काही दोष असतील तर माफ कराल ना? नक्की कराल. मी जर चुकलो तर तुम्ही नाराज होणार नाही ना? खरंच, आसामच्या लोकांचं मन अतिशय विशाल आहे.

 

मित्रांनो,

हे गीत आहे, “बिस्सा बिजोई नौ जोआन, बिस्सा बिजोई नौ जोआन, होक्ति हालि भारोटोर, उलाई आहा - उलाई आहा !!!! होन्टान टुमि बिप्लोबोर, होमुख होमो होमुखोटे, मुक्टि जोजारु हूसियार, मृट्यु बिजोय कोरिबो लागिबो, साधीनाता खुलि डुआर” !!!!

 

मित्रांनो,

याचा अर्थ तुम्हा आसामच्या लोकांना चांगलाच माहित आहे. मात्र जे लोक देशभरातून हा कार्यक्रम बघत आहेत, त्यांना याचा अर्थ सांगणे गरजेचे आहे की आसामच्या धमन्यांत, आसामच्या हृदयात, आसामच्या तरुण पिढीच्या मनात काय आहे. या गीतात भारताच्या तरुणांना आवाहन करण्यात आले आहे. विश्व विजयी भारताच्या तरुणांनो, भारत मातेची हाक ऐका. हे गीत युवकांना आवाहन करते की बदलाचे वाहक बना. हे गीत विश्वास देते की आपण मृत्यूवर विजय मिळवून स्वातंत्र्याचे दरवाजे उघडणार आहोत.

 

मित्रांनो,

हे गीत तेव्हा लिहिले होते, जेव्हा स्वातंत्र्य हेच सर्वात मोठे स्वप्न होते. भारत आज स्वतंत्र आहे आणि आज विकसित भारताची निर्मिती, आपल्या सगळ्यांचे एक मोठे स्वप्न आहे. आपल्याला देशासाठी जगण्याचे सौभाग्य मिळाले आहे. मी देशाच्या तरुणांना, आसामच्या तरुणांना आवाहन करेन – माझ्या भारताच्या युवकांनो, तुमच्यात विश्व विजय साध्य करण्याचे सामर्थ्य आहे. तुम्ही पुढे चला, वेगाने विकासाची धुरा सांभाळा, विकसित भारताचे दरवाजे उघडा.

 

मित्रांनो,

अनेक लोक मला म्हणतात की मी इतके मोठे लक्ष्य कसे काय ठरवतो, कुणाच्या भरवशावर विकसित भारताबद्दल बोलत असतो. उत्तर एकदम सोपं आहे. माझ्या अंतर्मनाचा आवाज सांगतो, माझा विश्वास, तुमच्यावर आहे, माझा विश्वास देशाच्या तरुणांवर आहे, माझा विश्वास 140 कोटी देशवासियांवर आहे. आमच्या सरकारचा प्रयत्न आहे की आपल्या वाटेत येणारा प्रत्येक अडथळा लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न केला जावा.

तुमच्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे पुरेपूर कष्ट करत राहू. या ठिकाणी आज ज्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले, ते सुद्धा त्याचेच उदाहरण आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

आपल्या देशात गेल्या अनेक दशकांपासून जोडणीचे प्रमाण अतिशय मर्यादित असल्याचे दिसत होते. एखादी व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचली म्हणजे जोडणी चांगली आहे, असे मानले जात होते. त्यातही भारतातील परिस्थिती काय होती, हे आसाम आणि ईशान्य क्षेत्रातील आपणा सर्वांना चांगलेच माहीत आहे. गेल्या 9 वर्षात जोडणीबाबतचा जुना दृष्टिकोन आम्ही बदलला आहे. आज जोडणी म्हणजे आमच्यासाठी चहू दिशांना एकत्रितपणे काम करणारा महायज्ञ आहे. जोडणीच्या संदर्भात आज देशात जे काम सुरू आहे, त्याचे चार पैलू आहेत - भौतिक जोडणी, डिजिटल जोडणी, सामाजिक जोडणी आणि सांस्कृतिक जोडणी.

 

मित्रहो,

आज या ठिकाणी इतक्या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे आणि म्हणूनच मी सर्वात आधी सांस्कृतिक जोडणीबद्दल बोलतो. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात सांस्कृतिक जोडणीबाबत अभूतपूर्व काम झाले आहे. आसामचे महान योद्धा लसीत बोरफुकन यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त दिल्लीत एवढा मोठा कार्यक्रम होईल, अशी कल्पनाही कोणी केली असेल. इथून आसाममधून सुद्धा शेकडो लोक त्या कार्यक्रमासाठी गेले होते आणि मलासुद्धा त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती.

 

मित्रहो,

वीर लसीत बोरफुकन असो की राणी गाइदिन्ल्यु, काशी-तमिळ संगमम असो किंवा सौराष्ट्र-तमिळ संगमम असो, केदारनाथ असो वा कामाख्या, डोसा असो की डोई सिरा असो, आज भारतात प्रत्येक विचार, प्रत्येक संस्कृती इतरांशी जोडली जाते आहे. हिमंता जी नुकतेच गुजरातमधील माधवपूर जत्रेत जाऊन आले आहेत. कृष्ण-रुक्मणीचा हा बंध पश्चिम भारताला ईशान्येलाही जोडणारा आहे. इतकेच नाही तर मोगा सिल्क, तेचपुर लेसु, जोहा राइस, बोका साउल, काजी नेमु अशा अनेक उत्पादनांनंतर आमच्या गामोसालासुद्धा भौगोलिक मानांकन अर्थात GI टॅग मिळाला आहे. आसाममधील कला आणि आमच्या भगिनींचे श्रम-उद्योग देशाच्या इतर भागात पोहोचविण्याचाही हा एक प्रयत्न आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

आज पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा देशातील विविध संस्कृतींचा परस्पर संवाद होतो आहे. पर्यटक जिथे जातात, तिथे फक्त पैसेच खर्च करत नाहीत, तर त्या ठिकाणची संस्कृतीही आपल्या आठवणींमध्ये घेऊन जातात. मात्र ईशान्य क्षेत्रात भौतिक जोडणीचा अभाव असताना वेगवेगळ्या संस्कृती परस्परांशी कशा जोडल्या गेल्या असत्या? त्यामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई संपर्क वाढविण्यावर आम्ही भर दिला आहे. दीर्घ काळ जोडणीचा अभाव असलेल्या लोकांपर्यंत अशा प्रकारच्या जोडणी सुविधा वेगाने पोहोचविण्यासाठी गेली 9 वर्षे आम्ही काम केले आहे. ईशान्य क्षेत्रातील बहुतांश गावेही आज सर्व प्रकारच्या हवामानाला अनुकुल असणाऱ्या रस्त्यांनी जोडलेली आहेत. गेल्या 9 वर्षांमध्ये ईशान्य क्षेत्रात अनेक नवीन विमानतळ बांधले गेले आहेत, व्यावसायिक विमाने पहिल्यांदाच इथे उतरली आहेत. मणिपूर आणि त्रिपुरामध्ये गेल्या 9 वर्षांत ब्रॉडगेज रेल्वेगाड्या पोहोचल्या आहेत. आज ईशान्य क्षेत्रात पूर्वीपेक्षा तिप्पट वेगाने नवीन रेल्वे रूळ टाकले जात आहेत. पूर्वीच्या तुलनेत आज  ईशान्येकडील रेल्वे मार्गांच्या दुहेरीकरणाचे काम जवळपास 10 पट वेगाने होते आहे. आजच या ठिकाणी 5 रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण झाले आहे, ईशान्य क्षेत्रात एकाच वेळी 5 प्रकल्प. त्यासाठी 6 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे. यामुळे आसामसह ईशान्येकडील मोठ्या भागाच्या विकासाला गती मिळणार आहेत. आसामच्या मोठ्या भागात पहिल्यांदाच रेल्वे पोहोचत आहे. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे आसाम तसेच मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि नागालँड ही राज्ये सहज जोडली जातील. त्याचबरोबर मालगाड्याही अनेक नवीन भागात पोहोचू शकतील. त्यामुळे अनेक तीर्थक्षेत्रे आणि पर्यटनस्थळी पोहोचणे सोपे होणार आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

2018 साली मी बोगीबील पुलाच्या लोकार्पणासाठी आलो होतो, ते मला अजूनही आठवते. ढोला-सादिया-भूपेन हजारिका सेतू लोकार्पण करण्याचे सौभाग्यही मला मिळाले होते. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले प्रकल्पच आम्ही पूर्ण करत नाही, तर नवीन प्रकल्पांवरही वेगाने काम करत आहोत. गेल्या नऊ वर्षांत ब्रह्मपुत्रेवर उभारलेल्या पुलांच्या जाळ्याचा पुरेपूर फायदा आज आसामला मिळतो आहे. आजही या पुलाचे काम सुरू झाल्यामुळे ख्वालकुस्सी येथील रेशीम उद्योगाला मोठे बळ मिळणार आहे.

मित्रहो,

आमच्या दुहेरी इंजिन सरकारने गेल्या 9 वर्षात सामाजिक जोडणीसाठी ज्या प्रकारे काम केले आहे, त्यामुळे कोट्यवधी लोकांचे जगणे सुसह्य झाले आहे. स्वच्छ भारत मोहिमेमुळे आज लाखो गावे उघड्यावरील शौचमुक्त झाली आहेत. पंतप्रधान आवास योजनेतून कोट्यवधी लोकांना घरे मिळाली आहेत. सौभाग्य योजनेतून कोट्यवधी घरांना प्रकाश मिळाला आहे. उज्ज्वला योजनेने कोट्यवधी माता-भगिनींना धुरापासून मुक्त केले आहे. जल जीवन मोहिमेमुळे कोट्यवधी घरांमध्ये नळामार्फत पाणी पोहोचू लागले आहे. डिजिटल इंडिया आणि स्वस्त डेटामुळे देशातील कोट्यवधी लोकांना मोबाईलवर अनेक सुविधा अगदी तळहातावर उपलब्ध झाल्या आहेत. ही सर्व घरे, ही सर्व कुटुंबे, आकांक्षी भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. ही भारताची ताकद आहेत, ज्यामुळे विकसित भारताचे स्वप्न साकार होणार आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

विकास साध्य करण्यासाठी विश्वासाचे सूत्र मजबूत असणे तितकेच महत्त्वाचे आहे. आमच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे आज ईशान्य क्षेत्रात सर्वत्र कायमस्वरूपी शांतता नांदते आहे. अनेक तरुणांनी हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या वाटेवर वाटचाल सुरू केली आहे. ईशान्य क्षेत्रातील अविश्वासाचे वातावरण दूर होते आहे, हृदयांमधील दुरावा नाहीसा होतो आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात विकसित भारत घडवायचा असेल तर हे वातावरण आणखी सुधारायचे आहे, सकारात्मकतेचा विस्तार करायचा आहे. सर्वांचा पाठींबा, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न या भावनेसह एकत्रितपणे पुढे जायचे आहे. आज या पवित्र सणानिमित्त मी देशवासियांना आणि आसामच्या जनतेला शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. गेले अनेक दिवस तुम्ही मेहनत केली आहे, हजारो लोकांनी एकत्र येऊन बिहू नृत्य सादर केले आहे, हा योग आसामला जगाच्या नजरेत एका नव्या उंचीवर घेऊन जाणारा आहे. पुढचा कार्यक्रम पाहण्यासाठी मी देखील खूप उत्सुक आहे, मी सुद्धा आनंद घेईन, देशातील नागरिक सुद्धा दूरचित्रवाणीवर त्याचा आनंद घेतील आणि मला खात्री वाटते की आता तुम्ही सोशल मीडियावरही प्रसिद्धी मिळवणार आहात.

माझ्या सोबत बोला – भारतमातेचा विजय असो. दूरवर आवाज पोहोचला पाहिजे. भारतमातेचा विजय असो. भारतमातेचा विजय असो. भारतमातेचा विजय असो.

वंदे-मातरम। वंदे-मातरम। वंदे-मातरम।

वंदे-मातरम। वंदे-मातरम। वंदे-मातरम।

वंदे-मातरम। वंदे-मातरम। वंदे-मातरम।

वंदे-मातरम।

अनेकानेक आभार.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Why The SHANTI Bill Makes Modi Government’s Nuclear Energy Push Truly Futuristic

Media Coverage

Why The SHANTI Bill Makes Modi Government’s Nuclear Energy Push Truly Futuristic
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chief Minister of Gujarat meets Prime Minister
December 19, 2025

The Chief Minister of Gujarat, Shri Bhupendra Patel met Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.

The Prime Minister’s Office posted on X;

“Chief Minister of Gujarat, Shri @Bhupendrapbjp met Prime Minister @narendramodi.

@CMOGuj”