माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्ही सकाळपासून बसलेले आहात, थकून गेले असाल? अजून आणखी ३६ तास काढायचे आहेत, तर आणखी थकून जाल का? मात्र तुम्ही लोकांनी विचार केला असेल कि १० वाजता कुणी पंतप्रधान येतात का आणि नंतर तुम्हाला आठवले असेल आज तर १ एप्रिल आहे, त्यामुळे बहुधा मोदीजी आपल्याला एप्रिल फुल करत असतील. मित्रांनो, आज तुम्हा सर्वांबरोबर सहभागी होताना मला खरेच अतिशय आनंद होत आहे.

स्मार्ट इंडिया हॅकॆथॉन हा भारतातील सर्वात मोठा प्रयोग आहे. ज्या देशातील लोकसंख्येत ६५ टक्के लोक ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे असतील, जो देश जगातील तरुण देश असेल, तेथील युवा शक्ती आज, या वेळी आपला समाज, आपल्या देशाच्या काही महत्वाच्या समस्यांवर तोडगा काढण्यात गुंतली आहे. आपली नावीन्यता दाखवण्यासाठी, आपली सर्जनशीलता दाखवण्यासाठी तुम्ही सगळे, सर्व तरुण ज्या उत्साहाने कार्यक्रमात सहभागी होत आहात, ते प्रशंसनीय आहे. १५ तास सलग काम केल्यानंतर देखील या क्षणी तुमच्या चेहऱ्यावर थकवा नाही. तुमच्या चेहऱ्यावर मला हसू दिसत आहे. जेव्हा अशा प्रकारच्या ऊर्जेने, अशा उत्कटतेने काम केले जाते, तेव्हाच यश मिळते.

मित्रांनो, ज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या देशाची स्वतःची एक ओळख आपल्याला आहे, आजच नाही तर हजारो वर्षांपासून आहे. असे म्हणतात कि शून्याचा शोध भारतातच लागला. आज माहिती तंत्रज्ञानाच्या ज्ञानक्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करत आहे. शून्यापासून मंगळयानाच्या मंगल यात्रेचा प्रवास आपला गौरव वाढवणारा आहे. उपनिषदापासून उपग्रहापर्यंत आपला प्रवास विस्तृत असा आहे. मात्र हे देखील खरे आहे कि आज भारताला आपल्या गरजा, आपल्या समस्या सोडवण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याची गरज आहे. एक प्रकारे आजचा समाज तंत्रज्ञान प्रेरित आहे. नावीन्यता, तंत्रज्ञान हे समाज जीवनाला गती देत आहेत, ऊर्जा देत आहेत. आणि म्हणूनच या हॅकॆथॉनसाठी माय गव्ह. च्या मदतीने अशा सुमारे ५०० समस्यांची निवड करण्यात आली आहे, ज्यावर तोडगा काढला जाईल,तरुण मनांच्या माध्यमातून शोधला जाईल, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शोधला जाईल. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तुमच्या समोर मांडल्या आहेत. तुमच्यासाठी हे आव्हान देखील आहे, संधी देखील आहे. आणि यामुळे मला खात्री आहे कि आपल्या परीक्षेसाठी तुम्ही जिथली मेहनत घेता, तेव्हा जो आनंद मिळतो, त्यापेक्षा अधिक आनंद तुम्हाला तुमच्या या कामातून मिळॆल. कारण जेव्हा काम पूर्ण होईल आणि तुम्हाला वाटेल कि एखाद्या गरीबाला तुमच्या मेहनतीचा फायदा होणार आहे. तुम्ही जो उपाय शोधत आहात, तो कदाचित सरकारच्या धोरणाचा एक भाग बनणार असेल. तेव्हा तुमचे आयुष्य खरोखरंच धन्यता अनुभवेल.

लोकशाहीचे यश लोक सहभागाच्या भागीदारीतच आहे. लोकशाहीचा अर्थ हा नाही कि मत दिले आणि एखाद्याला ५ वर्षांचे कंत्राट दिले, आता माझी समस्या दूर करा. आणि ५ वर्षात करू शकले नाहीत तर म्हटले आता दुसरा कंत्राटदार पकडू, ही लोकशाही नव्हे. लोकशाही लोक सहभागाची आहे. सव्वाशे कोटी देशबांधवांनी एकत्रितपणे देशाला पुढे न्यायचे आहे. सगळे काही सरकारलाच माहित आहे, सगळ्या समस्या केवळ सरकारच सोडवू शकेल, त्याच्याकडे सर्व उपाय आहेत, हा भ्रम आहे. सरकारमध्ये देखील तुमच्यासारखेच लोक येऊन बसले आहेत. सर्व समस्यांचे निराकरण आपण एकत्रितपणेच करू शकतो. जे सरकारमध्ये नाहीत, त्यांच्याकडेही अनेक चांगल्या सूचना असतात, बुद्धी-प्रतिभा असते, काम करण्याची एक उर्मी असते. आणि म्हणूनच माझा नेहमी प्रयत्न असतो कि लोक- सहभागातून कशा प्रकारे पुढे जाता येईल. आणि आजची ही संधी, देशातील दहा हजार युवक अभियांत्रिकी व्यवसाय असेल, माहिती तंत्रज्ञान व्यवसाय असेल, ते एकत्रितपणे आपल्या रोजच्या ५०० समस्यांवर तोडगा शोधत आहेत. काही न खाता-पिता बसले आहेत, यातून आपोआप एका नवीन शक्तीची ओळख होईल. आणि म्हणूनच सर्वप्रथम, यात सहभागी झालेल्या तुम्हा सर्वाना मी खूप-खूप शुभेच्छा देतो, तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

आज जर तुम्ही आपली ऊर्जा प्रशासन प्रक्रियेत वळवाल, तर नक्कीच अतिशय सकारात्मक परिणाम मिळतील. मला नेहमीच असे वाटते कि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण आजच्या समाजात खूप मोठा बदल घडवून आणू शकतो. तंत्रज्ञान आपल्याला असे-असे उपाय सुचवते , ज्याबद्दल काही वर्षांपूर्वी पर्यंत विचार देखील केला जात नव्हता. कुणी विचार केला होता कि कधी रस्त्यांवर चालक-विरहित गाड्या धावू लागतील? आगामी काळात, कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रसार आणखी वाढणार आहे. थ्रीडी तंत्रज्ञानाच्या मदतीने त्रिमितीय वस्तूची छपाई आणि त्यापेक्षाही येणाऱ्या भविष्याची निर्मिती, थ्रीडी तंत्रज्ञान त्याचा एक खूप मोठा आधारस्तंभ बनणार आहे.

निर्मिती क्षेत्रात, घरांच्या रचनेत याचा खूप मोठा उपयोग होणार आहे. आता तर इंटरनेटचे युग आहे. एक अशी व्यवस्था तयार होत आहे जिथे बरेच काही इंटरनेट द्वारे ठरवले जाईल. आज देशात जी शहरे स्मार्ट शहरांमध्ये परिवर्तित केली जात आहेत, तिथे या तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला जात आहे, मग ते स्मार्ट पार्किंग असो, स्मार्ट प्रकाश योजना असो, हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण असो, यात इंटरनेटचा वापर केला जात आहे.

मित्रांनो, तंत्रज्ञान आजच्या जीवनात खूप मोठे बदल घडवत आहे. काही नवीन गोष्टी, नवीन परंपरा,निर्माण होत आहेत. काही जुन्या गोष्टी, जुन्या पध्दती नष्ट होत आहेत. तुम्ही स्वतः बघा, तुमच्याच समोर फ्लॉपी, टेप रेकॉर्डर, वॉकमन या सर्व वस्तू आल्या आणि गेल्या, बंद पडल्या. दीर्घकाळ तर त्या टिकल्याच नाहीत, नवीन तंत्रज्ञानाने जागा घेतली. एक काळ होता जेव्हा रेडियो, आताचे जे मायक्रोवेव्ह ओव्हन आहेत, तेवढ्या आकाराचे असायचे. आणि आज रेडिओ काड्यापेटीत देखील मावू शकतो. तंत्रज्ञानाने जग छोटे करण्याबरोबरच सुविधांचा अधिक विस्तार करण्यात मदत केली आहे. तुम्ही पाहिले असेल कि गेल्या काही महिन्यात आपल्या देशात रोकडविरहित व्यवहारांचा प्रसार किती वेगाने वाढला आहे. आणि या क्षेत्रात देखील सातत्याने नवीन अभिनव पर्याय समोर येत आहेत.

मित्रांनो, नावीन्यता हाच उत्तम भविष्याचा आधार आहे. इतिहास असेच लोक लिहितात, जे रूढ असलेल्या परंपरांना आव्हान देतात, त्यात परिवर्तन घडवून आणतात. यासाठी आणखी एक गोष्ट खूप आवश्यक आहे आणि ती आहे चिकाटी, सातत्याने त्यात गुंतून राहणे. लहानपणापासून आपल्याला, अनेक कथा तुम्ही सर्वानी ऐकल्या असतील, त्यात म्हटले आहे कि ती मुंगी आपले खाणे घेऊन चालली होती, साखरेचा दाणा, आणि तो घेऊन जाताना किती तरी वेळा तो निसटला, घेऊन जाऊ शकत नव्हती, वर भिंतीवर चढायचे होते, मात्र शेवटी तो दाणा घेऊन गेल्यावरच ती थांबली. एक मुंगी देखील सतत प्रयत्न करण्याच्या प्रेरणेचे कारण बनू शकते आणि म्हणूनच आपण देखील ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि नावीन्यपूर्ण संशोधनाच्या मार्गात अनेकदा तुम्हाला अपयशाला सामोरे जावे लागू शकते. मात्र तुम्ही हार मानू नका आणि म्हणूनच जो विजयाचा संकल्प घेऊन मार्गक्रमण करतो तो झगडणे देखील जाणतो आणि जो झगडणे जाणतो, तो यशस्वी होण्याचे ध्येय देखील बाळगतो. तुम्ही यशस्वी व्हाल, त्या दिवशी याच जगातील लोक म्हणतील कि तुमचा मार्ग योग्य होता, तुमची पध्दत योग्य होती. मात्र या काळात एक गोष्ट अवश्य ध्यानात ठेवा कि तुमच्या नावीन्यतेचा अंतिम घटक गुणवत्ता, दर्जा आहे.

गुणवत्तेबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड असू नये, केली जाऊ नये. गुणवत्ता ही अशी गोष्ट आहे जी लोक लक्षात ठेवतात. तुमच्या अभिनवतेतून, तुमच्या उत्पादनातून लोकांच्या आयुष्यात, जीवनशैलीत जो बदल होतो तो महत्वपूर्ण आहे. मित्रांनो, तुम्ही सर्व जितके अभिनव आहात, उत्साही आहात, देशाच्या, समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी तुमचा जो दृष्टिकोन आहे तो नवीन भारताला अधिक मजबूत करणारा आहे. ज्याप्रमाणे तंत्र पूर्वीपेक्षा कित्येक पटीने वेगाने बदलत आहे, त्याचप्रमाणे आजची पिढी पूर्वीपेक्षा कित्येक पटीने वेगाने विचार करते, काम करत आहे. काही लोक म्हणतात कि आजचा तरुण खूप प्रश्न विचारतो, ही काही वाईट गोष्ट नव्हे, ही तर चांगली गोष्ट आहे. आजचा तरुण एखादी पोतडी घेऊन चालतो, आणि प्रत्येक गोष्ट सुरुवातीपासून जाणून घेऊ इच्छितो, आपल्या नजरेने पाहू इच्छितो. काही लोक असेही म्हणतात कि आजच्या तरुणांमध्ये धीर नाही. मी म्हणेन कि हीच बाब तर आजच्या पिढीच्या युवकांसाठी आणि त्यांच्यातील संशोधनासाठी प्रेरणेचे कारण बनते. आयुष्यात धैर्य असायला हवे, अधीर आयुष्य नाही चालत, मात्र असेही धैर्य असू नये जे नवीन विचार करण्यासाठी प्रेरित करणार नाही, विराम घेऊन येईल. आणि यामुळेच ते अधिक वेगाने काम करत आहेत, आणि मी पाहिले आहे असे तरुण यशस्वी देखील झाले आहेत. काही लोक असेही म्हणतात कि आजच्या तरुणाला निरस काम नको असते, त्याला ते आवडत नाही, त्याला बदल हवा असतो. मला वाटते कि त्याचा हाच विचार ऑटोमेशनमध्ये नवनवीन कल्पना आणत आहे. जर तो देखील जुन्या पध्दतीनुसार जगला असता तर नवीन कुठून मिळाले असते. जो जुने तोडून त्यातून बाहेर पडू इच्छितो तोच तर नवीन देतो. काही लोक असेही म्हणतात कि आजच्या तरुणाला एकाच वेळी अनेक कामे एकदम करायची असतात. काही लोकांना वाटते कि ते आपला वेळ वाया दवडत आहेत. ज्या युवकांमध्ये अशी वृत्ती असते, एक, सात, पाच, दहा कामे आपोआप एका वेळी करत असतात, ते मला अयोग्य वाटत नाही. आता एकाच वेळी अनेक गोष्टी करण्यासाठी स्वतःला तयार करायला हवे. प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा आणि जो करतो, त्याला प्रोत्साहन द्यायला हवे. काही लोकांना तरुणांच्या महत्वाकांक्षेबाबत समस्या असते. ते म्हणतात, आजच्या तरुणाला वेगाने पुढे जायचे आहे. मित्रांनो, मी पुढे जाण्याच्या बाजूने आहे मात्र काही लोक कमी वेळेत पैसे कमवण्यासाठी पुढे धावत असतात, ते क्वचितच आयुष्यात यशस्वी होतात. काही तरी करून दाखवण्यासाठी जे पुढे धावतात, वेगाने धावतात, निर्धारित वेळेपूर्वी करतात, ते स्वतःला देखील काही देतात, जगाला देखील काही देतात. आणि मी जेव्हा नवीन भारताबाबत बोलतो, तेव्हा याच भावनेने बोलतो.

माझ्या भारतातील तरुणाला लवकर समस्या सोडवायच्या आहेत, लवकर उन्नती साधायची आहे, आणि मला ते योग्य वाटते. आजचा तरुण कुणाची चाकरी करण्यापेक्षा स्वतः दुसऱ्याला रोजगार पुरवण्याची इच्छा बाळगतो. यासाठी नक्कीच भांडवल आवश्यक आहे मात्र त्याही पेक्षा महत्वपूर्ण आहे आयुष्याचा उद्देश, अभियानाची भावना, ज्याची आपल्या तरुणांमध्ये कमतरता नाही. तो आपल्या कल्पना, आपले नाविन्यपूर्ण संशोधन अशा प्रकारे प्रत्यक्षात उतरवू इच्छितो, कि गोष्टी अधिक प्रभावी आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असतील. तुमच्यासारख्या लाखो- कोट्यवधी युवकांची ही अद्भुत क्षमता लक्षात घेऊन सरकार "स्टार्ट-अप इंडिया" अभियान राबवत आहे. मुद्रा योजनेअंतर्गत , तुमच्यासारख्या कोट्यवधी युवकांना बँक हमीच्या चिंतेतून मुक्त करत कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले जात आहे.

मित्रांनो, स्वप्ने पाहण्याची क्षमता प्रत्येकात असते. तुम्ही इतके लोक येथे बसले आहात, दररोज नवीन स्वप्ने पाहणारे लोक असतील. स्वप्ने पाहण्याची क्षमता प्रत्येकात असते.स्वप्नांना संकल्पात बदलण्याची क्षमता असायला हवी. आणि संकल्प सिद्धीला नेण्यासाठी सर्व क्षमता झोकून द्यायला हव्यात. काही लोक असेही असतात ज्यांची स्वप्ने, संकल्प आणि सिद्धी अनेक लोकांच्या प्रेरणेचे कारण देखील बनते. तुम्ही माहिती तंत्रज्ञानाच्या जगात पाहिले असेल कि मोठ-मोठ्या संशोधनाची सुरुवात एखाद्या छोट्याशा खोलीत, एखाद्या गॅरेजमध्ये अतिशय छोट्या स्तरावर झालेली आहे. लोकांनी सुरुवातीला त्यांना नाकारले होते, मात्र असे लोक आपली स्वप्ने, आपले संकल्प संपूर्ण ताकदीनिशी तडीस नेण्यासाठी झटत राहिले, यशस्वी देखील झाले.एकेकाळी ज्या कल्पनांना क्षुल्लक समजण्यात आले ते आज अब्जावधी डॉलर्सची कंपनी चालवत आहेत. म्हणूनच तुम्हा सर्वांना माझा सल्ला आहे कि तुमच्याकडे खूप वेळ आहे, तुम्हाला खूप काही करायचे आहे. आपल्या प्रवासात कुठल्याही कल्पनेला असेच वाया जाऊ देऊ नका. असेही घडू शकते कि अशीच एखादी कल्पना तुम्हाला उद्या अब्जावधी डॉलर्सची कंपनी मिळवून देईल आणि अब्जावधी लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याचे कारण देखील बनेल.

मित्रांनो, तुम्ही आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात ज्ञान आणि कौशल्य यातील फरक देखील समजून घ्यायला हवा. दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे. ज्ञान म्हणजे एखादी संकल्पना समजून घेणे, मूलभूत गोष्टी समजून घेणे, उदा. हे जाणून घेणे कि इलेक्ट्रॉनिक सर्किट कशा प्रकारे काम करते, तर कौशल्य आहे हि संकल्पना कशा प्रकारे प्रत्यक्षात आणायची. खूप लोक असतील ज्यांनी इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास केला असेल. मात्र घरी जर फ्यूज उडाला तर तो दुरुस्त करण्यासाठी बाहेरून कुणाला तरी बोलावतो. ज्ञानाला धारदार बनवून ते वापरणे हेच कौशल्य आहे. म्हणूनच आज ज्या वेगाने माहिती वाढत आहे, त्याच वेगाने कौशल्य देखील वाढणे गरजेचे आहे आणि म्हणूनच मी म्हणतो स्किल एंगेजमेंट ऑप्टिमायजेशन (एसईओ), इंटरनेटचे जग सर्च इंजिनवर फिरते आणि म्हणूनच त्यात सर्च इंजिन ऑप्टिमायजेशनची मोठी भूमिका असते.

तुमचे आमचे जग लोक कल्याण आणि लोक सहभागाच्या सभोवती फिरते. म्हणूनच त्यात स्किल एंगेजमेंट ऑप्टिमायजेशनची मोठी भूमिका असते .आणि जगाला असे लोक हवे असतात ज्यांना ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करणे माहित आहे, जे आपल्या कौशल्याद्वारे स्वतःला लोकांशी, क्लायंटशी जोडू शकतात. जेव्हा तुम्ही लोक स्किल एंगेजमेंट ऑप्टिमायजेशन वर लक्ष देणे सुरु कराल, देशाचा डेमोग्राफिक डिविडेंड देखील डेव्हलपमेंट डिव्हिडंड मध्ये बदलेल. नवीन भारतासाठी मार्ग अधिक मजबूत करेल.

मित्रांनो, तुम्हाला जे काम देण्यात आले आहे, पुढील काही तासात तुम्ही त्यावर काही ना काही तोडगा शोधणार आहात, मात्र आपल्याला फक्त इथेच थांबायचे नाही. या कार्यक्रमात केंद्र सरकारची २९ मंत्रालये सहभागी होत आहेत. आणि त्या सर्वांवर जबाबदारी आहे कि या हॅकॆथॉन मधून जे उपाय सुचतील, त्यांना शेवटच्या टप्प्यापर्यंत , तार्किक शेवटापर्यंत पोहोचवणे. काही बदल करण्याची गरज असेल तर त्यात बदल करून ते व्यवस्थेत लागू करावेत. तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल, काही नवीन संशोधन कराल, यासाठी सर्वांना माझ्या खूप-खूप शुभेच्छा.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s years? Amazon to pour Rs 3 lakh cr into India…and there’s more

Media Coverage

India’s years? Amazon to pour Rs 3 lakh cr into India…and there’s more
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister Condoles the Demise of Shri Shivraj Patil
December 12, 2025

Prime Minister Shri Narendra Modi today condoled the passing of Shri Shivraj Patil, describing him as an experienced leader who devoted his life to public service.

In his message, the Prime Minister said he was saddened by the demise of Shri Patil, who served the nation in various capacities—including as MLA, MP, Union Minister, Speaker of the Maharashtra Legislative Assembly, and Speaker of the Lok Sabha—during his long and distinguished public life. Shri Patil was known for his commitment to societal welfare and his steadfast dedication to democratic values.

The Prime Minister recalled his many interactions with Shri Patil over the years, noting that their most recent meeting took place a few months ago when Shri Patil visited his residence.

In separate posts on X, Shri Modi wrote:

“Saddened by the passing of Shri Shivraj Patil Ji. He was an experienced leader, having served as MLA, MP, Union Minister, Speaker of the Maharashtra Assembly as well as the Lok Sabha during his long years in public life. He was passionate about contributing to the welfare of society. I have had many interactions with him over the years, the most recent one being when he came to my residence a few months ago. My thoughts are with his family in this sad hour. Om Shanti.”

“श्री शिवराज पाटील जी यांच्या निधनाने दुःख झाले आहे. ते एक अनुभवी नेते होते. सार्वजनिक जीवनातील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे तसेच लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम केले. समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याच्या ध्येयाने ते झपाटले होते. ​गेल्या काही वर्षांत त्यांच्यासोबत माझे अनेक वेळा संवाद झाले, त्यापैकी सर्वात अलीकडील भेट काही महिन्यांपूर्वीच जेव्हा ते माझ्या निवासस्थानी आले होते तेव्हा झाली होती. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. ओम शांती.”