शेअर करा
 
Comments
It is our Constitution that binds us all together: PM Modi
What is special about Indian Constitution is that it highlights both rights and duties of citizens: PM Modi
As proud citizens of India, let us think how our actions can make our nation even stronger: PM Modi

माननीय राष्ट्रपती महोदय, आदरणीय उपराष्ट्रपती जी, आदरणीय सभापती महोदय, श्री प्रल्हाद जी आणि सर्व आदरणीय लोकप्रतिनिधी,

काही दिवस आणि काही प्रसंग असे असतात, जे भूतकाळाशी असलेला आपला संबंध अधिक दृढ करतात. आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे आणि त्या दिशेने काम करण्यासाठी प्रेरणा देतात. आज हा 26 नोव्हेंबरचा दिवस एक ऐतिहासिक दिवस आहे. 70 वर्षांपूर्वी आम्ही विधिवत एका नव्या रंगरुपातल्या संविधानाचा स्वीकार केला होता. मात्र त्यासोबतच, आज 26 नोव्हेंबर या दिवसाची एक वेदनाही आपल्याला जाणवते, जेव्हा भारताच्या महान परंपरा, हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा, वसुधैव कुटुंबकम चा विचार घेऊन जगणारी आमची महान परंपरा या सगळ्यांवर आजच्याच दिवशी, म्हणजे 26 नोव्हेंबरला मुंबईत दहशतवाद्यानी हल्ला केला होता. आज मी त्या सर्व हुतात्म्यांना नमन करत श्रद्धांजली अर्पण करतो.

सात दशकांपूर्वी, याच मध्यवर्ती सभागृहात इतक्याच पवित्र आवाजांचे प्रतिध्वनी घुमत होते. संविधानातील एकेका कलमावर अत्यंत सखोल आणि बारकाईने चर्चा होत होती. अनेक तर्क मांडले जात होते, तथ्ये समोर येत होती, विचार होते, आस्था होत्या, विश्वास होते, यावर चर्चा सुरू होती, स्वप्नांवर चर्चा होती, संकल्पावर चर्चा सुरू होती. एक प्रकारे हे सभागृह त्यावेळी ज्ञानाचे महाकुंभ बनले होते आणि याच ठिकाणी भारताच्या प्रत्येल कानाकोपऱ्यातली स्वप्ने शब्दांत उतरवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले जात होते.

डॉ राजेंद्र प्रसाद, डॉ भीमराव बाबासाहेब आंबेडकर,सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, आचार्य सुकराणी जी, मौलाना आझाद, पुरुषोत्तम दास टंडन, सुचेता कृपलानी, हंसा मेहता, एल.डी.कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी आयंगार, जॉन मथाई, आणि असे असंख्य आदरणीय महानुभाव ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात योगदान देत हा महान वारसा आपल्याकडे सुपूर्द केला आहे.आज मी यानिमित्त मी त्या सर्व महान विभूतींचे स्मरण करतो आणि त्यांना आदरपूर्वक वंदन करतो.

या संविधानाचा स्वीकार करण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 25 नोव्हेंबर 1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात काय म्हंटले होते ते आज मला सुरुवातीलाच तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे. या भाषणात बाबासाहेबांनी देशाला स्मरण करुन दिले होते की भारत पहिल्यांदा 1947 साली स्वतंत्र झाला किंवा 26 जानेवारी 1950 साली प्रजासत्ताक आले असे नाही. भारत आधीही स्वतंत्र होता आणि आपल्याकडे अनेक गणराज्ये देखील होती. त्यापुढे आपली व्यथा मांडताना ते म्हणाले होते की आपल्या चुकांमुळेच आपण भूतकाळात आपले स्वातंत्र्य गमावले आणि प्रजासत्ताक हे वैशिष्ट्य देखील गमावले. याच भाषणात देशातल्या नागरिकांमध्ये चेतना निर्माण करत बाबासाहेब म्हणाले आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. ‘प्रजासत्ताक’ही मिळाले, मात्र आता हे प्रजासत्ताक स्वतंत्र राष्ट्र आपण कायम ठेवू शकतो का? भूतकाळातील चुकांमधून आपण काही शिकलो आहोत का? आज जर बाबसाहेब असते, तर कदाचित त्यांच्याइतके खुश कोणी नसते, कारण भारताने इतक्या वर्षांच्या वाटचालीत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तर दिली आहेतच त्यापलीकडे जात देशाच्या स्वातंत्र्याला लोकशाहीभिमुख, समृद्ध आणि सशक्त केले आहे. आणि आजच्या या प्रसंगी मी तुम्हा सर्वांचे, गेल्या सात दशकात संविधानाची भावना अक्षुण्ण ठेवणारी संसद, विधीमंडळे, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यात कार्यरत सर्व कर्मचारी-अधिकारीआणि इतर सहकाऱ्यांचे आभार मानतो. मी विशेषत्वाने 130 कोटी भारतीयांसमोर नतमस्तक होत आहे. कारण त्यांनी लोकशाहीवरची आस्था कधीही कमी होऊ दिली नाही. त्यांनी संविधानाला कायमच एक पवित्र ग्रंथ मानले एक मार्गदर्शक दीपस्तंभ मानले आहे.

 

संविधानाची ही 70 वर्षे आमच्यासाठी हर्षोल्हास, उत्साह आणि निष्कर्ष अशा मिश्र भावना घेऊन आली आहेत. आनंद हा की संविधानाची भावना अटल आणि दृढ राहिली आहे. जर कोणी कधी असे प्रयत्न केले, तर देशातल्या नागरिकांनी मिळून ते प्रयत्न हाणून पाडले आहेत. देशाच्या संविधानाला त्यांनी काहीही धोका पोहचू दिला नाही. उत्कर्षाची भावना अशासाठी की आपल्या मजबूत संविधानाच्या भरवशावरच आपण “एक भारत-श्रेष्ठ भारत” या दिशेने वाटचाल करु शकतो आहोत, प्रगती करतो आहोत. जेवढ्या सुधारणा आजवर आपण केल्या त्या सगळ्या एकत्र येऊन संविधानाच्या चौकटीत राहूनच केल्या. आणि निष्कर्ष हा की या विशाल आणि विविधतेने संपन्न देशाच्या प्रगतीसाठी आपल्या सुवर्णमय भविष्यासाठी, नव्या भारताच्या निर्मितीसाठी आपल्यासमोर केवळ संविधान, संविधानाच्या मर्यादा आणि संविधानाची भावना हा आणि हाच एकमेव मार्ग आहे. आपले संविधानच आपल्यासाठी एकमेव पवित्र ग्रंथ आहे. एक असा ग्रंथ, ज्यात आमच्या जीवनाचा आमच्या समाजाचा, आमच्या परंपरांचा,आमच्या मान्यतांचा. आमचे व्यवहार, आमचे आचार या सर्वांचा समावेश आहे. त्यासोबतच अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठीचे उपायही आहेत. आपले संविधान इतके व्यापक आहे. कारण त्यात आम्ही बाहेरच्या प्रकाशासाठी आपल्या सगळ्या खिडक्या मोकळ्या ठेवल्या आहेत आणि त्यासोबतच संविधानाच्या आत जो प्रकाश आहे तो आणखी अधिक प्रज्वलित करण्याचे मार्गही खुले ठेवले आहेत.

आज या प्रसंगी, मी 2014 साली लाल किल्यावरुन जी गोष्ट मी बोललो होतो, ती आज पुन्हा सांगतो. आपल्या संविधानाचे जर साध्या सरळ दोन वाक्यांत वर्णन करायचे असेल तर मी म्हणेन- डिग्निटी फॉर इंडियन एन्ड युनिटी फॉर इंडिया. याच दोन मंत्रांनी आपले संविधान साकारले आहे. नागरिकांची प्रतिष्ठा सर्वोच्च राखली आहे आणि संपूर्ण भारताची एकता आणि अखंडता अक्षुण राखली आहे. आपले संविधान जागतिक लोकशाहीचे सर्वोत्तम यश आहे. ते केवळ अधिकारांविषयी सजग नाही, तर आपल्याला कर्तव्यांविषयी देखील जागरुक बनवणारे आहे. एका अर्थाने आपले संविधान जगात सर्वाधिक धर्मनिरपेक्ष आहे. आपल्याला काय करायचे आहे, किती मोठी स्वप्ने बघायची आहेत आणि कुठवर पोहचायचे आहे, या सगळ्यासाठी काहीही बंधने नाहीत. संविधानातच अधिकारांविषयी लिहिले आहे आणि त्याच संविधानात कर्तव्यांची अपेक्षाही केली आहे. आपले हे संविधान, आपला देश, आपले देशबांधव आणि त्यांची स्वप्ने आपल्याकडून ज्या अपेक्षा ठेवतात, त्याविषयी, एक व्यक्ती म्हणून, एक कुटुंब म्हणून, एक समाज म्हणून असलेल्या आपल्या कर्तव्यांविषयी आपण तेवढेच गंभीर आहोत का?

राजेंद्र बाबू एकदा म्हणाले होते, की जे राज्यघटनेत लिहिलेलं नाही, ते विषय आपल्याला परस्पर सामंजस्याने निकाली काढावे लागतील आणि हेच भारताचे वैशिष्ट्य देखील आहे. गेल्या काही दशकांत आम्ही आपल्या अधिकारांवर भर दिला, तो आवश्यकही होता आणि योग्यही होता. कारण समाजात अशा व्यवस्था तयार करण्यात आल्या होत्या, ज्यामुळे एक मोठा वर्ग अधिकारांपासून वंचित राहिला. या वर्गाला कधी त्यांच्या अधिकारांची जाणीव न करून देता समानता, समता आणि न्यायाची जाणीव करुन देणे अशक्य होते. मात्र आज अधिकारांसोबतच एक नागरिक म्हणून आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या याविषयी विचार करणे ही काळाची गरज आहे. कारण जबाबदाऱ्या पार पाडल्याशिवाय आपण आपले अधिकार सुरक्षित ठेवू शकत नाही.

अधिकार आणि कर्तव्ये यांच्यात एक अतूट नाते आहे आणि विशेषतः महात्मा गांधी यांना त्याची अतिशय उत्तम जाणीव होती. आज जेव्हा देश पूज्य बापूंची 150 वी जयंती साजरी करत आहे त्याचवेळी त्यांचे अनेक विचार आजही प्रासंगिक ठरत आहेत. ते म्हणत- राईट इज ड्युटी वेल परफॉंर्म्ड-म्हणजे आपण आपल्या कर्तव्यांचे उत्तम पालन करणे हेच अधिकार आहेत. त्यांनी एका ठिकाणी असे देखील म्हंटले होते की माझ्या अशिक्षित मात्र समंजस आईने मला शिकवले आहे की सगळे अधिकार आपल्याला तेव्हाच मिळतात जेव्हा आपण आपली कर्तव्ये निष्ठापूर्वक पार पाडू. गेल्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा संपूर्ण जग अधिकारांविषयी चर्चा करत होतं तेव्हा गांधीजीनी त्याच्या एक पाऊल पुढे जात म्हटले होते की चला आपण नागरिकांना त्यांची कर्तव्ये म्हणजे “ड्युटीज ऑफ सिटिझन्स” विषयी बोलू या. 1947 मध्ये युनेस्कोचे महासंचालक डॉ जुलियन हक्सले यांनी 60 मोठ्या मान्यवरांना पत्र लिहून मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. त्यांनी पत्रात लिहिले होते की मानवाधिकारांविषयी एक जागतिक कायदा तयार करायचा असेल, तर त्याचा आधार काय घ्यावा? आणि त्यासाठी त्यांनी जगभरातील सर्व विचारवंत मान्यवरांकडून सल्ला मागितला होता. महात्मा गांधींनाही त्यांनी पत्र लिहिले होते. मात्र जगभरातील लोकांनी त्यावर जी उत्तरे दिली, त्यांच्यापेक्षा महात्मा गांधीजींचे उत्तर वेगळे होते. त्यांनी म्हंटले होते की आपण आपल्या जीवनात अधिकार तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा नागरिक म्हणोन आपण आपल्या कर्तव्यांचे पूर्ण पालन करु. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, कर्तव्य केल्यासच अधिकारांचे रक्षण होते असे मत महात्मा गांधी यांनी त्यावेळी व्यक्त केले होते. आणि आपण मात्र आज जबाबदाऱ्यांची आणि कर्तव्यांची चर्चा करतो. ती कर्तव्ये अत्यंत साध्या-सोप्या जबाबदाऱ्या आहेत, ज्या सांभाळत असतांना एक राष्ट्र म्हणून आपले संकल्प सिद्धीस जात असतात. आणि आपल्याला हे ही लक्षात घ्यायला हवे की कर्तव्य आणि सेवा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण अनेकदा सेवेलाच कर्तव्य समाजात असतो. सेवा भाव, संस्कार प्रत्येक समाजात अतिशय महत्वाचे असतात. मात्र सेवाभावनेपेक्षाही कर्तव्ये वेगळी आहेत आणि आपले त्याकडे कधी कधी लक्ष जात नाही. आपण रस्त्याने चालत असतो, त्यावेळी एखाद्या व्यक्तीला आपल्या मदतीची गरज असते, तेव्हा आपण जी मदत करतो ती सेवा भावना असते. ही सेवा भावना कोणत्याही समाजाला, मानवतेला खूप सक्षम करत असते. मात्र कर्तव्यभाव त्यापेक्षा वेगळा आहे. रस्त्यावर कोणाला मदत केली, ते चांगलेच आहे मात्र वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, कोणाला कधी काही त्रास होणार नाही अशा व्यवस्थेचा भाग बनणे हे माझे कर्तव्य आहे. तुम्ही जे काही करत आहात, त्यासोबत मी आणखी एक वाक्य जोडतो, मी जे काही करतो आहे, त्यामुळे देश मजबूत होतो आहे की नाही? कुटुंबांचा सदस्य म्हणून आपण अशा सगळ्या गोष्टी करत असतो, ज्यामुळे आपले कुटुंब भक्कम होत असते, त्याचप्रकारे एक नागरिक या नात्याने आपण ते करायला हवे ज्यामुळे आपल्या देशाची ताकद वाढेल, आपला देश शक्तिशाली होईल.

एक नागरिक जेव्हा आपल्या मुलाला शाळेत पाठवत असतो, तेव्हा त्याचे आई-वडील आपले कर्तव्य पार पाडत असतात. मात्र, जेव्हा ते आई-वडील जागरूक राहून आपल्या मुलाला मातृभाषा शिकण्याचा आग्रह करत असतात, त्यावेळी ते एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडत असतात. देशसेवेचे कर्तव्य पार पाडत असतात. आणि अशाच प्रकारे नागरिक म्हणून आपण जी छोटी छोटी कर्तव्ये निभावत असतो, तर त्यातूनच देश घडत जातो. जर आपण स्वतःच जाऊन लसीकरण करुन घेतले, तर कोणाला घरी येऊन आठवण करुन द्यावी लागणार नाही, नागरिक स्वतःच आपले कर्तव्य पार पाडत असतो. मत देण्यासाठी समजवावे लागणार नाही, नागरिक स्वतःहून आपले कर्तव्य पार पाडत मतदान करत राहतील. जेव्हा नागरिक वेळेत कर भरत असतात,तेव्हा ते आपले कर्तव्य पार पाडत असतात. अशा अनेक जबाबदाऱ्या असतात, ज्या आपण नागरिक म्हणून पार पाडत असतो, त्यावेळी एक व्यवस्था विकसित करत असतो, त्यातून देशाला प्रगतीपथावर नेण्याचे काम करत असतात. एक नागरिक म्हणून जर आपण सतत जागरूक राहिलो नाही, त्याची चेतना आपल्या मनात तेवत ठेवली नाही, तर आपली नागरिकत्वाची कर्तव्ये कुठेतरी दुबळी पडत जातील, आणि मग कुठल्या ना कुठल्या रुपात ते इतरांच्या अधिकारांना नुकसान पोहोचवत राहतील. त्यामुळे इतरांच्या अधिकारांचे संरक्षण व्हावे यासाठी, आपली कर्तव्ये पार पाडणे ही देखील आपली जबाबदारी आहे. आणि लोकप्रतिनिधी म्हणून तर ही जबाबदारी आणखी जास्त आहे, दुप्पट आहे.

आपल्याला आपली घटनात्मक मूल्ये मजबूत करण्यासोबतच स्वतःलाही एक आदर्श म्हणून घडवायचे आहे. ही आमची जबाबदारी आहे आणि समाजात चांगले बदल घडवून आणण्यासाठी हे कर्तव्य आपल्याला पार पाडायचे आहे. आपला प्रयत्न असायला हवा की आपल्या प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक चर्चेत, संवादात आपण आपल्या कर्तव्यांवर भर देऊ. जनतेशी बोलत असताना आपण कर्तव्यांविषयी बोलायला विसरू नये. आपले संविधान “आम्ही भारतीय लोक…” अशा शब्दांत सुरु होते. “भारताचे लोक” हीच या संविधानाची खरी ताकद आहे. आपणच त्याची प्रेरणा आहोत आणि आपणच त्याचा उद्देश.

मी जे काही आहे, ते समाजासाठी आहे, देशासाठी आहे, हीच कर्तव्यभावना आपल्या प्रेरणेचा स्रोत आहे. मी तुम्हा सर्वाना आवाहन करतो की आपण सगळे या संकल्प शक्तीसह एकत्र येऊन भारताचे एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यांचे पालन करु. आपल्या या प्रजासत्ताकाला आपण कर्तव्यतत्परतेच्या नव्या संस्कृतीकडे घेऊन जाऊ. या, आपण सगळे नवे नागरिक बनू. उत्तम नागरिक बनू. माझी अशी प्रार्थना आहे की हा संविधान दिवस आमच्या संविधानाच्या आदर्शांना कायम ठेवत राष्ट्रनिर्माणाच्या कामात हातभार लावण्याची आमची कटीबद्धता अधिक मजबूत करणारा ठरो. आपल्या संविधाननिर्मात्यांनी जे स्वप्न पाहिले होते, ते पूर्ण करण्याची शक्ती आम्हाला मिळावी. आणि ही पवित्र जागा, जिथे हे संविधान लिहिण्यासाठी विचारमंथन झाले, त्याचे पडसाद आजही इथे घुमत आहेत. त्याचे हे पडसाद आपल्याला नक्की आशीर्वाद देतील, प्रेरणा देतील, शक्ती देतील, दिशा देतील. याच भावनेसह मी आज पुन्हा एकदा संविधान दिवसाच्या पवित्र प्रसंगी मी पूज्य बाबासाहेब आंबेडकर यांना प्रणाम करतो, संविधानाच्या शिल्पकारांना प्रमाण करतो आणि देशातल्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो.

धन्यवाद!

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
Budget 2023: Perfect balance between short and long term

Media Coverage

Budget 2023: Perfect balance between short and long term
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 2 फेब्रुवारी 2023
February 02, 2023
शेअर करा
 
Comments

Citizens Celebrate India's Dynamic Growth With PM Modi's Visionary Leadership