“महिला नैतिकता, निष्ठा, निश्चय आणि नेतृत्वाचे प्रतिबिंब असतात”
“देशाला योग्य दिशा दाखविण्यासाठी महिला सक्षम आणि समर्थ असल्या पाहिजेत असे आपल्या वेद आणि परंपरांनी म्हटले आहे”
“महिलांची प्रगती नेहमीच देशाच्या सक्षमीकरणाला बळकटी देते”
“भारताच्या विकास यात्रेत महिलांना संपूर्णपणे सहभागी करून घेण्याला आज देशाने प्राधान्य दिले आहे”
“स्टँड अप इंडिया” योजनेअंतर्गत देण्यात आलेली 80 टक्क्याहून अधिक कर्जे महिलांना देण्यात आली आहेत. तसेच मुद्रा योजनेखाली दिलेली 70 टक्के कर्जे आपल्या भगिनी आणि सुकन्यांना दिलेली आहेत”

नमस्कार!

तुम्हा सर्वांना, देशातल्या सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मी अनेकानेक शुभेच्छा देतो. आजच्या महिला दिनानिमित्त  देशातल्या महिला संत आणि साध्वींच्यावतीने या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो.

माता भगिनींनो,

कच्छच्या ज्या भूमीवर तुम्हा सर्वांचे आगमन झाले आहे, ती भूमी अनेक युगांपासून स्त्री शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. इथे स्वतः माता आशापूरा मातृशक्तीच्या रूपामध्ये विराजमान आहे. याठिकाणच्या महिलांनी संपूर्ण समाजाला कठीण नैसर्गिक आव्हानांना, सर्व प्रकारच्या अवघड आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून राहायला शिकवले आहे. काही झाले तरी येणा-या प्रत्येक आव्हानांना तोंड देत लढायचे आणि त्या परिस्थितीवर मात करीत जिंकणेही शिकवले आहे. जल संरक्षणाच्या कार्यामध्ये कच्छच्या महिलांनी जी भूमिका बजावली आहे, पाणी समित्या बनवून जे कार्य केले आहे, त्या कार्याचा आंतरराष्ट्रीय संस्थांनीसुद्धा गौरव केला आहे. कच्छच्या महिलांनी आपल्या अथक परिश्रमांनी कच्छची संस्कृती, संस्कारही जिवंत ठेवण्याचे कार्य केले आहे. कच्छचे रंग, विशेषत्वाने इथली हस्तकला याचे एक मोठे उदाहरण आहे. या कला आणि हे कौशल्य आता तर संपूर्ण जगामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करीत आहे. आपण याक्षणी भारताच्या पश्चिमी सीमेवरच्या शेवटच्या गावामध्ये आहात. याचा अर्थ गुजरातच्या, हिंदुस्तानच्या सीमेवरचे हे अखेरचे गाव आहे. त्याच्या पुढे कोणत्याही प्रकारची मानवी वस्ती नाही. पुढे दुसरा देश सुरू होतो. सीमावर्ती गावांमध्ये तिथल्या लोकांवर देशाची विशेष जबाबदारी असते. कच्छच्या वीरांगना महिलांनी नेहमीच ही जबाबदारी उत्तमरितीने पार पाडली आहे. आता तुम्ही कालपासून तिथे आहात, त्यामुळे कदाचित तुम्ही कोणाकडून काहीतरी नक्कीच ऐकले असेल. 1971 मध्ये ज्यावेळी युद्ध सुरू होते, त्यावेळी शत्रूंनी भूजच्या विमानतळावर हल्ला केला होता. धावपट्टीवर बॉम्बवर्षाव केला त्यामुळे आपली धावपट्टी पूर्णपणे नष्ट झाली होती. अशावेळी, युद्ध काळामध्ये आणखी एका धावपट्टीची गरज होती. तुम्हा सर्वांना एका गोष्टीचा अभिमान वाटेल की, अशा अवघड प्रसंगी कच्छच्या महिलांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता रात्रीतून धावपट्टी तयार करण्याचे काम केले आणि भारतीय सेनेला लढता यावे, यासाठी सुविधा निर्माण करून दिली. ही इतिहासातली अतिशय महत्वपूर्ण घटना आहे. त्यावेळी धावपट्टी तयार करण्याचे काम करणा-या अनेक माता भगिनी आजही आपल्यामध्ये आहेत. तुम्ही त्यांच्याविषयी विचारपूस केलीत, तर त्या भेटतील. त्यांचे वय आता खूप जास्त झाले आहे. तरीही त्यांना भेटून संवाद साधण्याची संधी मला अनेकवेळा मिळाली आहे. महिलांच्या अशा असामान्य साहस आणि सामर्थ्याने भारलेल्या या भूमीवर आज  मातृशक्ती समाजासाठी एक सेवा यज्ञ सुरू करीत आहे.

माता- भगिनींनो,

आपल्या वेदांमध्ये महिलांना आवाहन केले आहे - ‘पुरन्धिः योषा’! अशा मंत्रांनी हे आवाहन केले आहे. याचा अर्थ महिला आपल्या नगराची, आपल्या समाजाची जबाबदारी पेलण्यामध्ये समर्थ व्हाव्यात. महिलांनी देशाला नेतृत्व द्यावे. नारी म्हणजे नीती, निर्णय शक्ती आणि नेतृत्वाचे प्रतिबिंब असते. त्यांचे प्रतिनिधित्व स्त्री करीत असते. म्हणूनच आपल्या वेदांनी, आपल्या परंपरांनी असे आवाहन केले आहे की, स्त्री सक्षम व्हावी, समर्थ व्हावी आणि राष्ट्राला तिने दिशा दाखवावी. आपण एक गोष्ट अधून-मधून बोलत असतो, ‘‘ नारी  तू नारायणी!’’ मात्र आणखी एक गोष्टही तुम्ही ऐकली असेल, कोणती ते अगदी लक्षपूर्वक ऐकावी. जसे की, आपल्याकडे म्हणतात, नर कार्य करेल तर तो नारायण होईल! परंतु नारीविषयी काय म्हटले आहे- नारी तू नारायणी! आता लक्षात घ्या, या दोन्हीमध्ये किती मोठे अंतर आहे. आपण बोलतो, त्याचा जर थोडा विचार केला तर आपल्या पूर्वजांनी किती सखोल चिंतन करून आपल्या पुरूषांसाठी म्हटले आहे की, नर कार्य करेल, तर तो नारायण होईल! मात्र माता -भगिनींसाठी म्हटले आहे, ‘‘नारी तू नारायणी!’’

माता आणि भगिनींनो,

विश्वाच्या बौद्धिक परंपरेचा वाहक असणा-या भारताचे अस्तित्व त्याच्या तत्वज्ञानावर केंद्रीत आहे आणि या तत्वज्ञानाचा आधार भारतामध्ये असलेले अध्यात्मिक चैतन्य आहे. आणि हे अध्यात्मिक चैतन्य त्याच्या स्त्री शक्तीवर केंद्रीत आहे. आपण ईश्वरीय सत्तेलाही सहर्ष महिलेच्या रूपामध्ये स्थापित केले आहे. ज्यावेळी आपण ईश्वरीय सत्ता आणि ईश्वरीय सत्तांच्या स्त्री आणि पुरूष अशा दोन्ही स्वरूपांना पाहतो, त्यावेळी स्वाभाविकपणे प्राधान्य महिला सत्तेला  दिले जाते. मग ते सीता-राम असो राधा-कृष्ण असो, गौरी-गणेश असो अथवा लक्ष्मी- नारायण असो.  आपल्या या परंपरा तुमच्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असणार? आपल्या वेदांमध्ये घोषा, गोधा, अपाला आणि लोपामुद्रा अशा अनेक विदूषी, पंडिता ऋषीकन्या होऊन गेल्या आहेत. गार्गी आणि मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषींनी वेदांतांमध्ये शोधांना दिशा देण्याचे काम केले आहे. उत्तरेकडील मीराबाईपासून ते दक्षिणेतल्या संत अक्का महादेवीपर्यंत, भारतातल्या देवींनी भक्ती आंदोलनातून ज्ञानाचे तत्वज्ञान आणि समाजामध्ये सुधारणा घडविल्या तसेच परिवर्तनाचे स्वर आळवला आहे. गुजरात आणि कच्छच्या या भूमीवरही सती तोरल, गंगा सती, सती लोयण, रामबाई आणि लीरबाई यांच्यासारख्या अनेक देवींची नावे घेता येईल. तुम्ही सौराष्ट्रामध्ये गेला तर घराघरांमध्ये ही नावे घेतली जातात, ती ऐकायला मिळतील.  याचप्रमाणे तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन पहा, या देशामध्ये कदाचित असे एकही गाव असणार नाही, किंवा क्षेत्र असणार नाही की, स्थान असणार नाही की,  त्या त्या गावामध्ये, ग्रामदेवी, कुलदेवी तिथल्या लोकांचे श्रद्धेचे केंद्र नाही. या देवी या देशाची त्या स्त्रीच्या चैतन्याचे प्रतीक आहेत. या चैतन्याने सनातन काळापासून आपल्या समाजाला सृजन केले आहे. या नारी चैतन्याने स्वातंत्र्याच्या आंदोलन काळातही देशामध्ये स्वातंत्र्याची मशाल प्रज्वलित ठेवली. 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामाचे आपण स्मरण केले पाहिजे. आणि ज्यावेळी आता स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आहेत, त्यावेळी हे स्मरण गरजेचे आहे. आपली अध्यात्मिक यात्रा अशीच सुरू राहील. मात्र सामाजिक चैतन्य, सामाजिक सामर्थ्य, सामाजिक विकास, समाजामध्ये परिवर्तन, याविषयी प्रत्येक नागरीक जोडला गेला आहे. त्याची प्रत्येकवेळी एक विशिष्ट जबाबदारी आहे. आता तर इतक्या मोठ्या संख्येने संत परंपरेतल्या माता- भगिनी इथे जमलेल्या आहेत, तर मला असे वाटते की, आज तुमच्याबरोबर काही विशेष गोष्टींबाबत बोललेच पाहिजे. आणि मी महिला चैतन्याने भारलेल्या एका जागृत समूहाबरोबर बोलत आहे, हे माझे सौभाग्य आहे.

माता- भगिनींनो,

जे राष्ट्र या भूमीला मातेस्वरूप मानते, तिथे महिलांची प्रगती राष्ट्राच्या सशक्तीकरणाला नेहमीच बळ देत असते. आज देशाची प्राथमिकता, महिलांचे जीवन अधिक सुकर, सुगम बनविणे आहे. आज देशाची प्राथमिकता भारताच्या विकास यात्रेमध्ये महिलांची संपूर्ण भागीदारी असावी, याला आहे आणि म्हणूनच आमच्या माता-भगिनींच्या अडचणी दूर करण्यावर आम्ही भर देत आहोत. आपल्याकडे अशी स्थिती होती की, कोट्यवधी माता- भगिनींना शौचासाठी घराबाहेर मोकळ्या जागी, उघड्यावर जावे लागत होते. घरामध्ये शौचालय नसल्यामुळे त्यांना किती त्रास भोगावा लागत होता. याचा अंदाज तुमच्यासमोर मला शब्दातून सांगण्याची गरज नाही. आमच्या सरकारनेच महिलांना होणारा हा त्रास जाणून घेतला. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून मी ही गोष्ट देशासमोर मांडली आणि आम्ही देशभरामध्ये स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत 11 कोटींपेक्षा जास्त शौचालये बनवली. आता अनेक लोकांना वाटत असेल की, हे काही काम आहे का? परंतु जर हे काम वाटत नसेल तर असे काम आधी कोणीही करू शकले नव्हते. तुम्ही सर्वांनी पाहिले आहे की, गावांमध्ये माता- भगिनींना लाकूड- सरपण, जळण, गोव-या यांच्या मदतीने चुलीवर स्वयंपाक करावा लागत होता. चुलीच्या धुरामुळे होणारा त्रास हा महिला आपल्या नशीबाचे भोग मानत होत्या. या त्रासातून त्यांना मुक्ती देण्यासाठी सरकारने देशाभरात   उज्ज्वला योजनेतून 9 कोटींपेक्षा जास्त घरांमध्ये गॅसजोडणी दिली आहे. त्या घरातल्या महिलांची धुराच्या त्रासातून मुक्तता केली आहे. आधी महिलांचे, विशेषतः गरीब महिलांचे बँकेत खातेही नसायचे. या कारणामुळे त्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल असायच्या. आमच्या सरकारने 23 कोटी महिलांची जन धन योजनेमार्फत बँकांमध्ये खाती उघडली आहेत. आधी आपल्याला माहितीच आहे की, स्वयंपाक घरामध्ये गव्हाच्या डब्यात किंवा अशाच कुठल्या तरी डब्यात महिला आपल्याकडचे पैसे ठेवत होत्या. तांदळाचा डबा असेल तर त्याच्या खाली तळाला पैसे महिला ठेवत होत्या. आज आपल्या माता -भगिनी बँकेत पैसे जमा करू शकतील अशी आम्ही व्यवस्था केली आहे.  आज गावा-गावांमध्ये महिला बचतगट तयार करून, लहान- लहान उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देत आहेत. महिलांकडे कौशल्याची काही कमी नसते. मात्र आता त्यांच्याकडचे कौशल्य त्यांची आणि त्यांच्या परिवाराची आर्थिक ताकद वाढवित आहेत. आमच्या भगिनी- कन्या पुढे जाव्यात, आमच्या कन्यांची स्वप्ने साकार व्हावीत, आपल्या इच्छेनुसार त्यांना काम करणे शक्य व्हावे, यासाठी सरकार अनेक माध्यमातून त्यांना आर्थिक मदतही देत आहे. आज ‘स्टँडअप इंडिया’ अंतर्गत 80 टक्के कर्ज आमच्या माता -भगिनींच्या नावे देण्यात आले आहे. मुद्रा योजनेअंतर्गत जवळपास 70 टक्के कर्ज आमच्या भगिनी - कन्यांना देण्यात आले आहे. आणि या योजनांमधून  हजारो -कोटी रूपये देण्यात आले आहेत. आणखी एक विशेष कार्य करण्यात आले आहे, त्याविषयीही  आपल्यासमोर बोलण्याची माझी मनापासून इच्छा आहे.

आमच्या सरकारने पंतप्रधान घरकुल योजनेत जी 2 कोटींपेक्षा जास्त घरे बांधून दिली आहेत, कारण आमचे स्वप्न आहे की हिंदुस्तानातील प्रत्येक गरीबाचं स्वतःचं घर असावं. पक्कं छत असलेलं घर असावं आणि घर म्हणजे फक्त चार भिंती नाही, एक असं घर, जिथे शौचालय असेल, एक असं घर जिथे नळाद्वारे पाणीपुरवठा होत असेल, एक असं घर जिथे वीजपुरवठा असेल, एक असं घर जिथे त्यांना प्राथमिक सुविधा मिळतील, गॅस जोडणी सकट, या सगळ्या सुविधा असलेलं घर मिळेल, आमचं सरकार आल्यानंतर दोन कोटी गरीब कुटुंबांसाठी दोन कोटी घरं बांधण्यात आली. हा फार मोठी संख्या आहे. आता दोन कोटी घरं, आज दोन कोटी घरांची किंमत किती असते, आपण विचार करत असाल, किती असते किंमत, दीड लाख, दोन लाख, अडीच लाख, तीन लाख, छोटंसं घर असेल, तर याचा अर्थ असा दोन कोटी महिलांच्या नावावर जी घरं बनली आहेत, म्हणजे दोन कोटी महिला लखपती झाल्या आहेत. जेंव्हा आपण लखपती हा शब्द ऐकतो, तेंव्हा किती मोठा वाटत असे. मात्र, जर गरिबांविषयी संवेदना असेल, काम करण्याची इच्छा असेल, तर कामं होतात आणि आज बहुतेक सर्व दोन कोटी माता भगिनींना त्यांच्या मालकीचं घर मिळालं आहे. एक काळ होता, जेव्हा महिलांच्या नावावर ना जमीन असायची, न दुकान असायचं, आणि ना घर असायचं, कुणालाही विचारा, की दादा, जमीन कोणाच्या नावावर आहे, तर उत्तर मिळायचं एकतर पतीच्या नावावर नाही तर मुलाच्या नावावर, नाहीतर भावाच्या नावावर. दुकान कोणाच्या नावावर, पती, मुलगा किंवा भावाच्या नावावर. गाडी घेतली, स्कूटर घेतली तर कुणाच्या नावावर, पती, मुलगा. आता आपल्या माता - भगिनींच्या नावावर देखील संपत्ती असेल, आणि म्हणून आम्ही असे महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आणि यामुळे जेंव्हा त्यांच्याकडे ताकद येते ना, त्याला सक्षमीकरण म्हणतात, तर जेंव्हा घरात आर्थिक निर्णय घेण्याची वेळ येते तेंव्हा माता - भगिनी त्यात भागीदार बनतात. त्यांचा सहभाग वाढतो नाहीतर आधी काय व्हायचं घरात मुलगा आणि वडील काही व्यापार आणि व्यवसायाची चर्चा करत असतात आणि स्वयंपाकघरातून आई येऊन मुकाट्याने उभी राहायची तर लगेच ते म्हणत, तू स्वयंपाकघरात जाऊन काम कर, मी मुलाशी बोलतो आहे. म्हणजे समाजाची ही स्थिती आपण बघितली आहे. आज माता - भगिनी सक्षम होऊन म्हणतात, हे तुम्ही चुकीचं करत आहात, असं करा. असं केल्यानं नुकसान होईल, असं केल्यानं फायदा होईल. आज त्यांची भागीदारी वाढत आहे. माता भगिनी, मुली पूर्वी इतक्या सक्षम नव्हत्या, मात्र आधी त्यांच्या स्वप्नांना जुनाट विचार आणि अव्यवस्थांचे कुंपण होते. मुली काही काम करत असत, नोकरी करत असत, तेंव्हा अनेकदा त्यांना मातृत्वाच्या वेळी नोकरी सोडावी लागत असे. आता त्या वेळी जेंव्हा सर्वात जास्त गरज असेल, पैशांची देखील गरज अशो, इतर मदतीची गरज असताना जर त्याच वेळी नोकरी सोडावी लागली, तर तिच्या पोटात जे मूल आहे, त्यावर परिणाम होतो. कितीतरी मुलींना स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या भीतीने काम सोडावं लागत होतं. आम्ही ही परिस्थिती बदलण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. आम्ही मातृत्व रजा 12 आठवड्यांवरून वाढवून 26 आठवडे केली आहे म्हणजे एक प्रकारे 52 आठवड्यांचं वर्ष असतं, 26 आठवडे रजा देऊन टाकतात. आम्ही कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे केले आहेत. बलात्कार, आणि आम्ही देशात आमच्या सरकारने खूप मोठं काम केलं आहे, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात, दोषीना फाशीची शिक्षा होईल, अशी तरतूदही आम्ही कायद्यात केली आहे. त्याचप्रमाणे मुलगा-मुलगी यांना समान मानत, सरकार मुलींच्या विवाहाचे वय 21 करण्याच्या प्रस्तावावर देखील विचार करत आहे. संसदेत हे विधेयक मांडण्यात आले आहे. आज देशाच्या सैन्यदलात, मुलींच्या अधिक व्यापक योगदानाला प्रोत्साहन दिले जात आहे. सैनिकी शाळांमध्ये देखील मुलींना प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे.

माता-भगिनींनो,

नारीशक्तीच्या सक्षमीकरणाच्या या प्रवासाला जलद गतीने पुढे नेणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मला कायमच आपल्या सर्वांचा स्नेह मिळाला आहे. आपले आशीर्वाद मिळाले आहेत. तुमच्या सहवासातच मी मोठा झालो आहे आणि म्हणूनच, आज मला इच्छा होते आहे, की माझ्या मनातले काही तुम्हाला सांगावे, मी तुम्हाला एक विनंती करतो आहे. तुम्हाला काही जबाबदारी द्यायची आहे. मला आपण मदत करावी, आपले काही मंत्री देखील इथे आले आहेत.काही आपले कार्यकर्ते आहेत. त्यांनी देखील सांगितलं असेल किंवा पुढे सांगणार असतील. आता बघा, अल्पपोषण आपण कुठेही असू, म्हणजे गृहस्थजीवनात असू अथवा संन्यासी असू, पण जर भारतातील मुले अल्पपोषित असतील, तर आपल्याला त्रास होणार नाही का? अल्पपोषित बालके बघून आपल्याला त्रास होऊ नये का? आपण या समस्येवर काही वैज्ञानिक पद्धतीने उपाय शोधू शकतो का? आपण याची जबाबदारी घेऊ शकतो का? आणि म्हणूनच मला सांगायचे आहे की अल्पपोषणाविरोधात देशभरात जो लढा सुरु आहे, त्यात आपण खूप मदत करु शकता. आपण, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानात देखील आपली महत्वाची भूमिका आहे.  मुली जास्तीत जास्त संख्येने शाळेत जाव्या, एवढेच नाही तर त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी आपण सतत त्यांच्याशी संवाद साधत राहिला पाहिजे. आपणही कधी कधी या मुलींना इथे बोलावून त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. आपल्या मठात, मंदिरात जिथे जिथे शक्य आहे, तिथे त्यांना प्रेरणा द्यायला हवी.

आता सरकार एक मोहीम हाती घेत आहे, ज्यात मुलींच्या शाळेत जाण्यचा उत्सव केला जाईल. यात सुद्धा तुमची सक्रीय भागीदारी खूप मदत करेल. असाच एक विषय आहे, व्होकल फॉर लोकल. हा शब्द तुम्ही माझ्या तोंडी सारखा सारखा ऐकला असेल तुम्ही मला सांगा महात्मा गांधी आपल्याला सांगून गेले आहेत, मात्र आपण सगळे विसरून गेलो आहोत. आज जगाची जी अवस्था आपण बघत आहोत, त्यात, तोच देश जग चालवू शकतो जो स्वतःच्या पायावर उभा असेल. जो बाहेरून येणाऱ्या वस्तूंवर अवलंबून असतो, तो काही करू शकत नाही. म्हणूनच आता व्होकल फॉर लोकल आपल्या अर्थव्यवस्थेशी निगडीत एक महत्वाचा विषय बनला आहे, पण याचा महिला सशक्तीकरणाशी देखील खोलवर संबंध आहे. बहुतांश स्थानिक उत्पादनांची शक्ती महिलांच्या हातात असते. म्हणूनच, आपल्या भाषणांत, आपल्या जनजगृती मोहिमांत आपण स्थानिक उत्पादने वापरण्यासाठी लोकांना प्रेरित करा. लोक, आपल्या घरांत जे आपले भक्त लोक आहेत ना, त्यांना म्हणा, बंधू, तुमच्या घरात किती परदेशी वस्तू आहेत आणि हिंदुस्तानी वस्तू किती आहेत, जरा हिशेब करा. आपल्या घरात लहान लहान विदेशी वस्तू शिरल्या आहेत. हे आमच्या देशातले लोक..... मी बघितलं छत्री, तो म्हणाला ही परदेशी छत्री आहे. अरे बाबा, आपल्या देशात शतकानुशतके छत्र्या बनत आहेत तर परदेशी छत्री घेण्याची काय गरज होती. एखादवेळेस दोन - चार रुपये किंमत जास्त असेल, पण त्यामुळे आपल्या किती लोकांना रोजगार मिळेल. आणि म्हणूनच मला असं वाटतं की इतक्या वस्तू आहेत की बाहेरून वस्तू आणण्याचा आपल्याला छंद जडला आहे. आपण लोकांना कशा प्रकारे जीवन जगावे, तुम्ही या गोष्टीवर लोकांना प्रेरणा देऊ शकता. आपण लोकांना एक दिशा दाखवू शकता. आणि यामुळे भारताच्या मातीत तयार झालेल्या वस्तू, भारताच्या मातीत तयार झालेल्या वस्तू, ज्यात भारताच्या लोकांची मेहनत असेल, अशा वस्तू आणि जेंव्हा मी व्होकल फॉर लोकल म्हणतो, तेंव्हा लोकांना वाटतं की दिवाळीचे दिवे, दिवाळीचे दिवेच नाही, बंधू, प्रत्येक गोष्टींकडे बघा, फक्त दिवाळीच्या दिव्यांवर नका जाऊ. असंच जेव्हा तुम्ही आपल्या विणकर बंधू - भगिनींना, हस्त कारागिरांना भेटाल तर त्यांना, सरकारचं एक GeM पोर्टल आहे, GeM पोर्टल विषयी सांगा. भारत सरकारने हे एक असं पोर्टल बनवलं आहे, ज्याद्वारे कुणी, कुठल्याही दुर्गम भागात राहत असेल, कुठेही राहत असेल, तो ज्या वस्तू तयार करतो, तो आपल्या सरकारला विकू शकतो. एक फार मोठं काम होतं आहे. माझा आणखी एक आग्रह असाही आहे, जेव्हा आपण समाजाच्या विविध वर्गातल्या लोकांना भेटता, त्यांच्याशी जे बोलाल त्यात नागरिकांच्या कर्तव्यांवर भर द्या. एक नागरिक म्हणून त्यांचा धर्म काय हे आपण त्यांना सांगितले पाहिजे. आणि आपण पितृधर्म, मातृधर्म हे सगळं तर सांगताच. देशासाठी नागरिक धर्म देखील तितकाच गरजेचा आहे. राज्यघटनेत अपेक्षित ही भावना आपल्याला सर्वांना मिळून दृढ करायची आहे. हीच भावना मजबूत करून आपण नव्या भारताच्या निर्मितीचे लक्ष्य गाठू शकतो. मला पूर्ण विश्वास आहे की, देशाला अध्यात्मिक आणि सामाजिक नेतृत्व देत असताना आपण प्रत्येक व्यक्तीला राष्ट्र निर्माणाच्या या यात्रेत सामील करून घ्याल. आपले आशीर्वाद आणि मार्गदर्शन यामुळे आपण नवीन भारताचे स्वप्न लवकरच साकार करू शकू आणि मग आपण बघितलं आहे की हिंदुस्तानातल्या शेवटच्या गावाचं दृश्य आपल्याला किती आनंद देत असेल. कदाचित आपल्यापैकी काही लोकांनी शुभ्र वाळवंट बघायला गेला असाल. काही लोक कदाचित आज जाणार असतील. त्याचं स्वतःचं एक सौंदर्य आहे. आणि त्यात एक आध्यात्मिक अनुभव देखील घेऊ शकता. काही क्षण एकटेच, थोडे दूर जाऊन बसा. एका नव्या चेतनेची अनुभूती होईल. कारण एके काळी माझ्यासाठी या जागेचा दुसरा मोठा उपयोग होत असे. तर, मी फार मोठा काळ, या जमिनीशी जोडलेला माणूस आहे. आणि आपण जेंव्हा इथे आलात, तर आपण नक्की बघा, की तो एक खास अनुभव असतो, तो अनुभव तुम्ही घ्या. मी आपणा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा देतो. आमचे काही सहकारी तिथे आहेत, त्यांच्याशी चर्चा करा. आपण समाजासाठी देखील पुढे या. स्वातंत्र्य संग्रामात संत परंपरेने फार मोठी भूमिका निभावली आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनतर देशाला पुढे नेण्यासाठी संत परंपरेने पुढाकार घ्यावा, आपली जबाबदारी सामाजिक जबाबदारी म्हणून पार पाडावी. माझी आपल्याकडून ही अपेक्षा आहे. आपणा सर्वांचे खूप खूप  आभार!

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Most NE districts now ‘front runners’ in development goals: Niti report

Media Coverage

Most NE districts now ‘front runners’ in development goals: Niti report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आलेले सर्वोच्च नागरी पुरस्कार
July 09, 2025

अनेक देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केला आहे. त्यांच्या या गौरवात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे आणि दूरदृष्टीचे प्रतिबिंब दिसून येते. या पुरस्कारांमुळे जागतिक स्तरावर होत असलेल्या भारताच्या उदयाला अधिक बळ मिळाले आहे. जगभरातील देशांबरोबर भारताचे वृद्धिंगत होत असलेले संबंधही त्यातून प्रतीत होतात.

पंतप्रधान मोदींना गेल्या सात वर्षात प्रदान करण्यात आलेल्या विविध पुरस्कारांवर एक नजर टाकूया

विविध देशांनी दिलेले पुरस्कार

1. एप्रिल 2016 मध्येत्यांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यातपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना किंग अब्दुलअझीझ सश- हा सौदी अरेबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. राजे सलमान बिन अब्दुलअजीज यांच्या हस्ते पंतप्रधानांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

2. त्याच वर्षीपंतप्रधान मोदींना स्टेट ऑर्डर ऑफ गाजी अमीर अमानुल्ला खान – हा  अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविण्यात आले.

3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2018 मध्येपॅलेस्टाईनला ऐतिहासिक भेट दिली तेव्हा त्यांना ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परदेशातील मान्यवरांना दिला जाणारा हा पॅलेस्टाईनचा सर्वोच्च सन्मान आहे.

4. 2019 मध्येपंतप्रधानांना ऑर्डर ऑफ झायेद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

5. रशियाने पंतप्रधान मोदींना 2019 मध्ये त्यांचा - ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू पुरस्कार हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.

6. ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रुल ऑफ निशान इज्जुद्दीन- हा परदेशी मान्यवरांना देण्यात येणारा मालदीवचा सर्वोच्च सन्मान पंतप्रधान मोदींना 2019 मध्ये प्रदान करण्यात आला.

7. ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रुल ऑफ निशान इज्जुद्दीन- हा परदेशी मान्यवरांना देण्यात येणारा मालदीवचा सर्वोच्च सन्मान पंतप्रधान मोदींना 2019 मध्ये प्रदान करण्यात आला.

8. उत्कृष्ट सेवा आणि उल्लेखनीय कामगिरीतील यश तसेच गुणवत्तापूर्ण वर्तनासाठी अमेरिकेच्या सरकारद्वारे दिला जाणारा लीजन ऑफ मेरिट, हा अमेरिकेच्या सशस्त्र दलाचा पुरस्कार 2020 मध्ये पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आला.

9. भूतानने डिसेंबर 2021 मध्ये पंतप्रधान मोदींना ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो या  त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे.

अनेक देशांच्या सर्वोच्च नागरी सन्मानांव्यतिरिक्तजगभरातील अनेक प्रतिष्ठित संस्थांनीही पंतप्रधान मोदींचा विविध पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.

1. सोल शांतता पुरस्कार: मानवजातीमध्ये सुसंवादविविध राष्ट्रांमध्ये सलोखा निर्माण करण्यात तसेच जागतिक शांततेसाठी योगदान देऊन आपला ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींना सोल पीस प्राइज कल्चरल फाऊंडेशनच्यावतीने हा द्विवार्षिक पुरस्कार प्रदान केला जातो. 2018 मध्ये पंतप्रधान मोदींना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

2. युनायटेड नेशन्स चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार: हा संयुक्त राष्ट्रसंघाचा सर्वोच्च पर्यावरण सन्मान असून, UN ने 2018 मध्ये पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार देऊन त्यांच्या धाडसी पर्यावरण नेतृत्वाला जागतिक मंचावरून कौतुकाची थाप दिली.

3. पंतप्रधान मोदींना 2019 मध्ये पहिला-वहिला फिलिप कोटलर राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरवर्षी एखाद्या देशाच्या नेत्याला हा पुरस्कार दिला जातो. “देशाचे उत्कृष्टरीत्या नेतृत्व” केल्याबद्दल पंतप्रधान मोदींची या पुरस्कारासाठी निवड झाली असल्याचे त्यांना पुरस्कारासोबत देण्यात आलेल्या मानपत्रात म्हटले होते.

4. ‘2019 मध्ये, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनतर्फे  पंतप्रधान मोदींना स्वच्छ भारत अभियानासाठी ग्लोबल गोलकीपर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. स्वच्छ भारत मोहिमेचे “लोक चळवळी”त रूपांतर करून दैनंदिन जीवनात स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या भारतीयांना पंतप्रधान मोदींनी हा पुरस्कार समर्पित केला होता. 

5. ‘2021 मध्ये, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनतर्फे  पंतप्रधान मोदींना स्वच्छ भारत अभियानासाठी ग्लोबल गोलकीपर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. स्वच्छ भारत मोहिमेचे “लोक चळवळी”त रूपांतर करून दैनंदिन जीवनात स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या भारतीयांना पंतप्रधान मोदींनी हा पुरस्कार समर्पित केला होता.