महामहिम राष्ट्रपति रामाफोसा,

महामहिम  राष्ट्रपति लूला दा सिल्वा,

महामहिम राष्ट्रपति पुतिन,

महामहिम  राष्ट्रपति शी,

महिला आणि पुरुषगण ,

पंधराव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे भव्य आयोजन आणि आमच्या आदरातिथ्याबद्दल मी माझे प्रिय मित्र राष्ट्रपति रामाफोसा यांचे पुन्हा एकदा खूप-खूप अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो.

जोहान्सबर्गसारख्या सुंदर शहरात पुन्हा एकदा येणे माझ्यासाठी आणि माझ्या प्रतिनिधिमंडळासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.

या शहराचे भारतातील लोकांशी आणि भारताच्या इतिहासाशी खूप जुने संबंध आहेत.

येथून काही अंतरावर टॉलस्टॉय फार्म आहे, जे महात्मा गांधींनी 110 वर्षांपूर्वी बांधले होते.

भारत, युरेशिया आणि आफ्रिकेच्या महान विचारांच्या एकत्रीकरणातून महात्मा गांधींनी आपली एकता आणि परस्परांमधील सौहार्दाचा भक्कम पाया रचला होता

महामहिम,

मागील सुमारे दोन दशकांमध्ये, ब्रिक्सने दीर्घ आणि गौरवशाली टप्पा गाठला आहे.

या प्रवासात आपण उल्लेखनीय  यश मिळवले आहे.

आपली न्यू डेव्हलपमेंट बँक दक्षिणेकडील  देशांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

आकस्मिक राखीव निधी व्यवस्थेद्वारे आपण  आर्थिक सुरक्षेचे जाळे तयार केले आहे.

ब्रिक्स उपग्रह समूह , लस संशोधन आणि विकास केंद्र, औषधे उत्पादनांना परस्पर मान्यता यासारख्या उपक्रमांद्वारे आपण ब्रिक्स देशांमधील सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहोत.

युथ समिट, ब्रिक्स गेम्स, थिंक टँक्स कौन्सिल सारख्या उपक्रमांद्वारे आपण सर्व देशांमधील लोकांशी संबंध दृढ  करत आहोत.

ब्रिक्सच्या अजेंड्याला नवी दिशा देण्यासाठी भारताने रेल्वे संशोधन नेटवर्क, एमएसएमईं दरम्यान दृढ सहकार्य, ऑनलाइन ब्रिक्स डेटाबेस, स्टार्टअप फोरम सारखे काही प्रस्ताव मांडले होते.

मला आनंद आहे की या विषयांवर उल्लेखनीय प्रगती झाली आहे.

महामहिम,

आपले दृढ  सहकार्य आणखी व्यापक करण्यासाठी मी तुमच्यासमोर काही सूचना ठेवू इच्छितो.

पहिली आहे - अंतराळ क्षेत्रातील सहकार्य.    आपण आधीपासूनच  ब्रिक्स उपग्रह समूहासंदर्भात   काम करत आहोत.

एक पाऊल पुढे टाकत, आपण  ब्रिक्स अंतराळ संशोधन संघ  तयार करण्याचा विचार करू शकतो.

या अंतर्गत आपण अंतराळ संशोधन, हवामान निरीक्षण यांसारख्या क्षेत्रात जागतिक हितासाठी काम करू शकतो.

माझी दुसरी सूचना आहे  - शिक्षण, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य.

ब्रिक्सला भविष्यातील सज्जतेसाठीची  संघटना बनवण्यासाठी, आपल्याला आपल्या सर्व संस्थांना  भविष्यासाठी सज्ज करावे लागेल. यामध्ये तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल.

भारतात,आम्ही दुर्गम आणि ग्रामीण भागातील मुलांपर्यंत  शिक्षण  पोहोचवण्यासाठी दीक्षा (DIKSHA) म्हणजेच   ज्ञान सामायिकीकरणासाठी डिजीटल पायाभूत सुविधा मंच तयार केला आहे.

तसेच,शालेय विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषला  चालना देण्यासाठी आम्ही देशभरात 10,000 अटल टिंकरिंग प्रयोगशाळा  तयार केल्या आहेत.

भाषेसंबंधी अडथळे दूर करण्यासाठी भारतात भाषिणी हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता -आधारित भाषा व्यासपीठ वापरले जात आहे.

लसीकरणासाठी  को -विन (CoWIN ) मंच  तयार करण्यात आला आहे.

डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा म्हणजेच इंडिया स्टॅकद्वारे सार्वजनिक सेवा वितरणात क्रांती होत आहे.

विविधता हे भारताचे मोठे सामर्थ्य आहे.

भारतात कोणत्याही समस्येवर उपाय या विविधतेच्या कसोटीतूनच समोर येतो.

म्हणूनच हे उपाय जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात सहजपणे लागू केले जाऊ शकतात.

या संदर्भात, भारतात विकसित केलेले हे सर्व मंच ब्रिक्स भागीदारांसोबत सामायिक  करताना आम्हाला आनंद होईल.

माझी तिसरी सूचना अशी आहे की एकमेकांची ताकद ओळखण्यासाठी आपण एकत्रितपणे  कौशल्यांचे मॅपिंग करू शकतो.

यातून विकासाच्या प्रवासात आपण एकमेकांना पूरक ठरू शकतो. माझी चौथी सूचना मार्जार  कुळातील वन्य प्राण्यांबाबत आहे

ब्रिक्सच्या  पाचही देशांमध्ये मार्जार  श्रेणीच्या विविध प्रजाती मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

आंतरराष्ट्रीय बिग कॅट आघाडीअंतर्गत, आपण त्यांच्या संरक्षणासाठी संयुक्तपणे प्रयत्न करू शकतो.

माझा पाचवा प्रस्ताव, पारंपरिक औषधांशी संबंधित आहे.

आपल्या पाचही देशांमध्ये पारंपरिक औषधांची परिसंस्था अस्तित्वात आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन पारंपरिक औषधांचे भांडार निर्माण करू शकतो का?

महामहिम,

दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली ग्लोबल साऊथच्या देशांना ब्रिक्समध्ये विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

त्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो.

ही सध्याच्या काळाची केवळ अपेक्षाच नाही तर गरजही आहे.

भारताने आपल्या जी -20 अध्यक्षपदाअंतर्गत, या विषयाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

“एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य”, या ब्रीदवाक्यानुसार आम्ही सर्व देशांना बरोबर घेऊन  पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत.

या वर्षी जानेवारीमध्ये झालेल्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ परिषदेत 125 देशांनी भाग घेतला आणि त्यांच्या चिंता आणि प्राधान्यक्रम सर्वांसमोर मांडले.

आम्ही आफ्रिकन युनियनला जी -20 चे कायमचे सदस्यत्व देण्याचा प्रस्तावही  ठेवला आहे.

सर्व ब्रिक्स भागीदार जी 20 मध्ये एकत्र आहेत आणि सर्वजण आमच्या प्रस्तावाला पाठिंबा देतील, असा मला विश्वास आहे.

या सर्व प्रयत्नांना ब्रिक्समध्येही विशेष स्थान दिले गेले, तर ग्लोबल साउथमधील देशांचा आत्मविश्वास आणखी वाढेल.

महामहिम,

ब्रिक्स सदस्यत्वाच्या विस्ताराला भारताचा पूर्ण पाठिंबा आहे आणि यामध्ये एकमताने पुढे जाण्याचे आम्ही स्वागत करतो.

2016 मध्ये, भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात, ब्रिक्स (BRICS) ची व्याख्या आपण, Building Responsive, Inclusive, and Collective Solutions, अर्थात प्रतिसादात्मक, सर्वसमावेशक आणि सामूहिक उपायांची निर्मिती, अशी केली होती.

सात वर्षांनंतर आपण असे म्हणू शकतो, की BRICS म्हणजे – Breaking barriers, Revitalising economies, Inspiring Innovation, Creating opportunities, and Shaping the future, अर्थात, अडथळे दूर करणे, अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करणे, नवोन्मेषाला प्रेरणा देणे, संधी निर्माण करणे आणि भविष्याला आकार देणे .

या नवीन व्याख्येला अर्थपूर्ण बनवण्यासाठी आम्ही सर्व ब्रिक्स भागीदारांबरोबर एकत्र येऊन सक्रियपणे योगदान देत राहू.

मनःपूर्वक धन्यवाद!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Operation Sagar Bandhu: India provides assistance to restore road connectivity in cyclone-hit Sri Lanka

Media Coverage

Operation Sagar Bandhu: India provides assistance to restore road connectivity in cyclone-hit Sri Lanka
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 5 डिसेंबर 2025
December 05, 2025

Unbreakable Bonds, Unstoppable Growth: PM Modi's Diplomacy Delivers Jobs, Rails, and Russian Billions