पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडला भेट देणार आहेत.
पंतप्रधान वाराणसी येथे सकाळी11:30 च्या सुमारास, सध्या 9 ते 16 सप्टेंबर 2025 या कालावधीकरिता भारताच्या दौऱ्यावर असलेले मॉरिशसचे पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतील.
त्यानंतर पंतप्रधान डेहराडूनला जाणार असून दुपारी 4.15 वाजण्याच्या सुमारास ते उत्तराखंडमधील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करतील. संध्याकाळी पाच वाजता, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांसमवेत उच्च स्तरीय आढावा बैठक घेण्यात येणार आहे..
वाराणसी या ऐतिहासिक शहरात होत असलेली दोन्ही नेत्यांची भेट भारत आणि मॉरिशस यांच्यातील विशेष आणि अनोखे संबंध आकारास आणण्यास आधारभूत असलेले सांस्कृतिक नाते, आध्यात्मिक संबंध आणि दोन्ही देशांच्या लोकांमध्ये असलेले परस्पर संबंध अधोरेखित करते,
द्विपक्षीय चर्चेदरम्यान, दोन्ही नेते विशेषत: विकास भागीदारी आणि क्षमता बांधणी या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून परस्पर देशांमधील व्यापक सहकार्याचा विस्तृत आढावा घेतील. आरोग्य, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, ऊर्जा, पायाभूत सुविधा तसेच नवीकरणीय ऊर्जा, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि नील अर्थव्यवस्था यासारख्या नवीन उदयास येत असलेल्या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्याच्या संधींबाबतही चर्चा करतील.
पंतप्रधान मोदींनी मॉरिशस सरकारचे निमंत्रित म्हणून मार्च 2025 मध्ये या देशाला दिलेल्या भेटीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध आणखी उंचावून ते 'वर्धित धोरणात्मक भागीदारी'मध्ये रुपांतरित केल्याने उभयपक्षी संबंधांमध्ये निर्माण झालेल्या सकारात्मक गतीच्या आधारावर ही भेट होत आहे.
हिंद महासागर क्षेत्रातील महत्वाचा भागीदार आणि जवळचा सागरी शेजारी म्हणून, मॉरिशस भारताच्या महासागर (म्युच्युअल अँड होलिस्टिक ॲडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ ॲक्रॉस रिजन) दृष्टिकोन आणि ''शेजारधर्म प्रथम' धोरणातील महत्त्वाचा घटक आहे. दोन्ही देशांदरम्यानच्या सहकार्यातील वाढ केवळ दोन्ही देशांतील नागरिकांच्या समृद्धीसाठीच नाही तर ग्लोबल साउथच्या सामूहिक आकांक्षांच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे.
वाराणसी शिखर परिषद भारत आणि मॉरिशसच्या परस्पर समृद्धी, शाश्वत विकास आणि सुरक्षित आणि सर्वसमावेशक भविष्याच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.


