पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान मिझोराम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेत. 13 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मिझोरामला भेट देतील आणि सकाळी 10 वाजता आयजॉल येथे पंतप्रधान 9000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. ते एका सार्वजनिक सभेलाही संबोधित करतील.
त्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मणिपूरला भेट देतील आणि चुराचांदपूर येथे 7,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. या निमित्ताने ते सभेलाही संबोधित करतील. त्यानंतर, दुपारी अडीच वाजता इंफाळ येथे 1,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करतील आणि एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करतील.
त्यानंतर, पंतप्रधान आसामला भेट देतील आणि गुवाहाटी येथे संध्याकाळी 5 वाजता भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या 100 व्या जयंती सोहळ्यात सहभागी होतील. यावेळी ते या कार्यक्रमालाही संबोधित करतील.
14 सप्टेंबर रोजी पंतप्रधान आसाममध्ये 18,530 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रमुख पायाभूत आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. ते सकाळी 11 वाजता दरांग येथे विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करतील. त्यानंतर, दुपारी पावणे दोनच्या सुमारास ते गोलाघाट येथील आसाम बायो-इथेनॉल प्रायव्हेट लिमिटेड, नुमालीगढ रिफायनरी प्लांटचे उद्घाटन करतील. ते गोलाघाट येथे पॉलिप्रॉपिलीन प्लांटची पायाभरणीही करतील.
15 सप्टेंबर रोजी पंतप्रधान पश्चिम बंगालला भेट देतील आणि सकाळी साडेनऊ वाजता कोलकाता येथे 16 व्या संयुक्त कमांडर्स परिषदेचे उद्घाटन करतील.
त्यानंतर, पंतप्रधान बिहारला भेट देतील आणि दुपारी पावणेतीनच्या सुमाराला पूर्णिया विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील.
तसेच, ते पूर्णिया येथे सुमारे 36,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील आणि या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करतील. बिहारमध्ये राष्ट्रीय मखाना बोर्डाचेही ते उद्घाटन करतील.
मिजोराममध्ये पंतप्रधान 9,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, ऊर्जा, क्रीडा व इतर अनेक क्षेत्रांशी संबंधित आहेत. तसेच ते 8,070 कोटी रुपये किमतीच्या बैराबी-सैरंग नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन करतील, ज्यामुळे मिजोरामच्या राजधानीला पहिल्यांदा भारतीय रेल्वे जाळ्याशी थेट जोडले जाईल. आव्हानात्मक डोंगराळ प्रदेशात बांधलेल्या या रेल्वेमार्गावर 45 सुरंग, 55 मोठे पूल आणि 88 लहान पूल आहेत. मिझोरम आणि देशाच्या उर्वरित भागांमधील थेट रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे या प्रदेशातील लोकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि किफायतशीर प्रवासाचे पर्याय उपलब्ध होतील. तसेच अन्नधान्य, खते आणि इतर आवश्यक वस्तूंचा वेळेवर आणि विश्वासार्ह पुरवठा सुनिश्चित होईल, ज्यामुळे एकूण लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि प्रादेशिक सुलभता वाढेल.
याच प्रसंगी पंतप्रधान तीन नवीन एक्स्प्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. ज्यात सैरंग (आयझॉल ) - दिल्ली (आनंद विहार टर्मिनल) राजधानी एक्सप्रेस, सैरंग -गुवाहाटी एक्सप्रेस आणि सैरंग -कोलकाता एक्सप्रेस यांचा समावेश आहे. आयझॉल आता राजधानी एक्सप्रेसद्वारे थेट दिल्लीशी जोडले जाईल. सैरंग-गुवाहाटी एक्सप्रेस मिझोराम आणि आसाम दरम्यान वाहतूक सुलभ करेल. सैरंग-कोलकाता एक्सप्रेस मिझोरामला थेट कोलकात्याशी जोडेल. या कनेक्टिव्हिटीमुळे रुग्णालये, विद्यापीठे व बाजारपेठा पर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल. शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक संबंध बळकट होतील, रोजगार निर्मिती वाढेल आणि पर्यटनाला चालना मिळेल.
पंतप्रधान ईशान्य क्षेत्र विकास उपक्रमांतर्गत रस्ते पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर घालण्यासाठी पंतप्रधान अनेक रस्ते प्रकल्पांची पायाभरणी करतील, ज्यात ऐझॉल बायपास रोड, थेनझॉल–सियालसुक रोड आणि खांकावन–रॉंगुरा रोड यांचा समावेश आहे. 45 किमी लांबीचा आणि 500 कोटी रुपये किमतीच्या ऐझॉल बायपास रोडमुळे ऐझॉल शहरातील गर्दी कमी होईल आणि लुन्गलेई, सियाहा, लॉंगतलाई, लेंगपुई विमानतळ व सैरांग रेल्वे स्थानकशी कनेक्टिव्हीटी सुधारेल. यामुळे दक्षिणेकडील जिल्ह्यांपासून ऐझॉलपर्यंत प्रवासाचा वेळ सुमारे 1.5 तासांनी कमी होईल आणि या भागातील लोकांना फायदा होईल. ईशान्य विशेष पायाभूत सुविधा विकास योजनेअंतर्गत NESIDS (रस्ते) हा थेन्झॉल-सियालसुक रस्ता थेनझॉल–सियालसुक रोड अंतर्गत बागायतदार, ड्रॅगन फ्रूट उत्पादक, तांदुळ शेती करणारे व आले प्रक्रिया करणाऱ्यांना लाभदायी ठरेल आणि ऐझॉल–थेनझॉल–लुन्गलेई महामार्गाशी संपर्क मजबूत करेल. ईशान्य विशेष पायाभूत सुविधा विकास योजनेअंतर्गत खांकावन–रॉंगुरा रोड सेरचिप जिल्ह्यातील बाजारपेठेत प्रवेश सुधारेल, विविध बागायतदार व नागरिकांना लाभ होईल तसेच नियोजित आले प्रक्रिया प्रकल्पासाठी सहाय्यभूत ठरेल.
पंतप्रधान लॉंगटलाई-सियाहा मार्गावरील छिमतुइपुई नदी पुलाची पायाभरणी देखील करणार आहेत. या पुलामुळे सर्व प्रकारच्या हवामानात देखील कनेक्टिव्हिटी लाभेल आणि प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी होईल. कलादान मल्टीमॉडल परिवहन चौकटीअंतर्गत हा पूल सीमापार व्यापाराला देखील चालना देईल.
क्रीडा विकासाच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या खेलो इंडिया बहुउद्देशीय इनडोअर कक्षाची देखील पंतप्रधान पायाभरणी करतील. तुइकुअल येथील हॉलमध्ये मिझोरामच्या तरुणांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांकरता पोषक वातावरण उपलब्ध करुन देण्याबरोबरच त्यांना सक्षम करण्यासाठी आवश्यक बहुउद्देशीय इनडोअर संकुलासह आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
या क्षेत्रातील ऊर्जाविषयक पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी आयझॉलमधील मुआलखांग येथे उभारण्यात येणाऱ्या 30 TMTPA (वार्षिक हजार मेट्रिक टन ) एलपीजी बॉटलिंग प्लांटची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. यामुळे मिझोराम आणि आसपासच्या प्रदेशातील राज्यांना एलपीजी चा अखंड आणि विश्वासार्ह स्रोत उपलब्ध होईल ज्यामुळे स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळू शकेल. त्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होईल.
प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम (PMJVK) योजनेंतर्गत कावरठा येथे निवासी शाळेचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. ममित या आकांक्षी जिल्ह्यातील या शाळेत अत्याधुनिक वर्ग, वसतिगृह आणि क्रीडा सुविधा उपलब्ध असून त्यात कृत्रिम फुटबॉल टर्फचा देखील समावेश आहे. यामुळे सुमारे 10,000 मुले आणि युवक-युवतींना लाभ होईल ज्यामुळे दीर्घकालीन सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती साध्य होईल.
सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण या आपल्या दृष्टिकोनाला पुढे नेत, पंतप्रधान त्लांगनुम येथे एकलव्य मॉडेल निवासी शाळेचे उद्घाटन देखील करतील. या शाळेमुळे हजेरीपटात सुधारणेबरोबरच, शाळेतून मुलांच्या गळतीचे प्रमाण कमी होईल आणि आदिवासी समाजातील युवकांना सर्वांगीण शिक्षणाची कवाडे खुली होतील.
पंतप्रधान मणिपूरमध्ये
मणिपूरच्या सर्वसमावेशक, शाश्वत आणि सर्वांगीण विकासाप्रति आपल्या वचनबद्धतेला अनुसरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी चुराचंदपूर येथे 7,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. या प्रकल्पांमध्ये 3,600 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या मणिपूरमधील शहरी रस्त्यांची निर्मिती, सांडपाणी आणि मालमत्ता व्यवस्थापन सुधारणा प्रकल्प, 2,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचे पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, मणिपूर इन्फोटेक विकास प्रकल्प, 9 ठिकाणी नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे आणि इतर कामांचा समावेश आहे.
याशिवाय पंतप्रधान इंफाळ येथे 1,200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचे उदघाटन करणार आहेत. यामध्ये मंत्रीपुखरी येथील नागरी सचिवालय; मंत्रीपुखरी येथील आयटी सेझ इमारत आणि नवीन पोलिस मुख्यालय; दिल्ली आणि कोलकाता येथील मणिपूर भवन आणि 4 जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी खास असलेले इमा मार्केट यांचा समावेश आहे.
पंतप्रधान आसाम मध्ये
पंतप्रधान येत्या 13 सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे आयोजित भारतरत्न डॉ भूपेन हजारिका यांच्या 100 व्या जयंती सोहळयाला उपस्थित राहणार आहेत. आसामचे संगीत, साहित्य आणि संस्कृतीत बहुमोल योगदान दिलेल्या डॉ हजारिका यांचे जीवन आणि आदर्श यांच्या सन्मानार्थ हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
तर 14 सप्टेंबर रोजी आसाम मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते 18,530 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रमुख पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे.
दरंग येथे, पंतप्रधान अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील. या प्रकल्पांमध्ये दरंग वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आणि जीएनएम स्कूल आणि बी.एससी नर्सिंग कॉलेज यांचा समावेश आहे. यामुळे या भागात वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवा बळकट होईल. गुवाहाटी रिंग रोड प्रकल्प शहरी गतिशीलता वाढवेल, वाहतूक कोंडी कमी करेल आणि राजधानी शहरात आणि आसपासच्या परिसरात कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील कुरुवा-नारेंगी पूल कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि प्रदेशात सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देईल.
गोलाघाटमधील नुमालीगड येथे, पंतप्रधान नुमालीगड रिफायनरी लिमिटेड (NRL) येथे आसाम बायोइथेनॉल प्लांटचे उद्घाटन करतील. या प्रकल्पाचा उद्देश स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देणे आणि जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करणे हा आहे. ते नुमालीगड रिफायनरी लिमिटेड (एनआरएल) येथे पॉलीप्रोपीलीन प्लांटची पायाभरणी देखील करतील. यामुळे आसामच्या पेट्रोकेमिकल क्षेत्रात लक्षणीय वाढ होईल. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि या प्रदेशाचा एकूण सामाजिक-आर्थिक विकास होईल.
पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये
मजबूत, सुरक्षित आणि स्वावलंबी भारताच्या प्रतिबद्धतेनुसार, पंतप्रधान 15 सप्टेंबर रोजी कोलकाता येथे 16 व्या संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स-2025 चे उद्घाटन करतील आणि संबोधितही करतील. हा सशस्त्र दलांचा सर्वोच्च स्तरीय विचारमंथन मंच आहे, जो देशाच्या सर्वोच्च नागरी आणि लष्करी नेतृत्वाला विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि भारताच्या लष्करी तयारीच्या भविष्यातील विकासासाठी पाया घालण्यासाठी तयार करण्यात आला आहे. दर दोन वर्षांनी एकदा आयोजित होणारी 16 वी संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स 15 ते 17 सप्टेंबर दरम्यान कोलकाता येथे आयोजित केली जाईल. या वर्षीच्या परिषदेची संकल्पना 'सुधारणांचे वर्ष - भविष्यासाठी परिवर्तन' अशी आहे.
पंतप्रधान बिहारमध्ये
पंतप्रधान बिहारमध्ये राष्ट्रीय मखाना बोर्डाचे उद्घाटन करतील. हे बोर्ड उत्पादन आणि नवीन तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन देईल, कापणीनंतरचे व्यवस्थापन मजबूत करेल, मूल्यवर्धन आणि प्रक्रिया करण्यास प्रोत्साहन देईल आणि मखानामध्ये बाजारपेठ, निर्यात आणि ब्रँड विकास सुलभ करेल, ज्यामुळे बिहार आणि देशातील मखाना शेतकऱ्यांना फायदा होईल.
देशातील एकूण मखाना उत्पादनापैकी सुमारे 90 % उत्पादन बिहारमध्ये होते. मधुबनी, दरभंगा, सीतामढी, सहरसा, कटिहार, पूर्णिया, सुपौल, किशनगंज आणि अररिया हे प्रमुख जिल्हे हे प्राथमिक केंद्र म्हणून काम करतात. याठिकाणी अनुकूल हवामान परिस्थिती आणि सुपीक माती आहे जी मखानाच्या उच्च दर्जामध्ये योगदान देते. बिहारमध्ये मखाना बोर्डाची स्थापना राज्य आणि देशातील मखाना उत्पादनाला मोठी चालना देईल आणि या क्षेत्रात जागतिक नकाशावर बिहारची उपस्थिती मजबूत करेल.
पंतप्रधान पूर्णिया विमानतळाच्या नवीन सिव्हिल एन्क्लेव्ह येथे अंतरिम टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील जेणेकरून या प्रदेशातील प्रवासी हाताळणी क्षमता वाढेल.
पंतप्रधान पूर्णिया येथे सुमारे 36000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील.
भागलपूर येथील पीरपैंती येथे पंतप्रधान 3 x 800 मेगावॅट क्षमतेच्या औष्णिक वीज प्रकल्पाची पायाभरणी करतील. हा प्रकल्प 25000 कोटी रुपयांचा बिहारमधील सर्वात मोठा खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक असेल. हा प्रकल्प अल्ट्रा-सुपर क्रिटिकल, कमी उत्सर्जन तंत्रज्ञानावर डिझाइन केलेला आहे. हा प्रकल्प समर्पित वीज पुरवेल आणि बिहारची ऊर्जा सुरक्षा मजबूत करेल.
पंतप्रधान 2680 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या कोसी-मेची आंतरराज्यीय नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी करतील. कालव्याचे अद्यतनीकरण, खराब झालेल्या संरचनांची पुनर्बांधणी आणि कालव्याच्या खोऱ्याचे नूतनीकरण यावर लक्ष केंद्रित केले जाईल, तसेच त्याची विसर्ग क्षमता 15,000 वरून 20,0000 क्युसेकपर्यंत वाढवली जाईल. यामुळे ईशान्य बिहारमधील अनेक जिल्ह्यांना सिंचन विस्तार, पूर नियंत्रण आणि शेतीची लवचिकता यांचा फायदा होईल.
रेल्वे संपर्क व्यवस्था सुधारण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार पंतप्रधान बिहारमध्ये विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील तसेच अनेक गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील.
पंतप्रधान 2170 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या बिक्रमशिला-कटरिया दरम्यानच्या रेल्वे मार्गाची पायाभरणी करतील. या रेल्वे मार्गामुळे गंगा नदी ओलांडण्यासाठी थेट रेल्वे मार्ग उपलब्ध होईल. या प्रदेशातील लोकांना त्याचा मोठा फायदा होईल.
पंतप्रधान 4,410 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अररिया-गलगलिया (ठाकुरगंज) दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन करतील.
पंतप्रधान अररिया - गलगलिया (ठाकुरगंज) विभागात धावणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. या रेल्वेमुळे अररिया आणि किशनगंज जिल्ह्यांदरम्यान थेट रेल्वे संपर्क स्थापित होईल, परिणामी ईशान्य बिहारमध्ये वाहतूक व्यवस्थेत लक्षणीयरीत्या सुधारणा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी जोगबनी आणि दानापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. या वंदे भारत रेल्वेमुळे अररिया, पूर्णिया, मधेपुरा, सहरसा, खगरिया, बेगुसराय, समस्तीपूर, मुझफ्फरपूर, वैशाली आणि पटना या जिल्ह्यांना थेट लाभ पोहोचेल. पंतप्रधान सहरसा ते छेहरता (अमृतसर) आणि जोगबनी ते इरोड दरम्यान धावणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेस रेल्वेलाही हिरवा झेंडा दाखवतील. या रेल्वे आधुनिक अंतर्गत सजावट, सुधारित सुविधा आणि जलद प्रवासाची सोय प्रदान करतीलच, त्याचबरोबर संपूर्ण प्रदेशात आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मताही वाढवतील.
पंतप्रधान पूर्णिया येथे लिंग वर्गीकृत वीर्य सुविधा केंद्राचे उद्घाटन देखील करतील. हे केंद्र म्हणजे राष्ट्रीय गोकुल मिशन अंतर्गत सुरू असलेले एक अत्याधुनिक वीर्य केंद्र आहे, जे दरवर्षी 5 लाख लिंग वर्गीकृत वीर्य मात्रा तयार करण्यास सक्षम आहे. पूर्व आणि ईशान्य भारतातील अशा प्रकारचे हे पहिलेच सुविधा केंद्र असून ते स्वदेशात विकसित तंत्रज्ञानाचा वापर करते. ही मोहीम ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती. ही मोहीम ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारता’च्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. हे तंत्रज्ञान गाईंच्या मादी वासरांच्या जन्माची शक्यता वाढवून लहान, अल्पभूधारक आणि भूमिहीनांना अधिक दुभती जनावरे मिळवून देण्यात, त्यांच्यावरील आर्थिक ताण कमी करण्यास आणि सुधारित दुग्ध उत्पादकतेद्वारे उत्पन्न वाढविण्यास मदत करेल.
प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (पीएमएवाय-आर) अंतर्गत 35,000 ग्रामीण लाभार्थ्यांसाठी तसेच प्रधानमंत्री आवास योजना - शहरी (पीएमएवाय-यू) अंतर्गत 5920 शहरी लाभार्थ्यांसाठी आयोजित गृह प्रवेश समारंभात देखील पंतप्रधान सहभागी होतील आणि काही लाभार्थ्यांना चाव्या सुपूर्द करतील.
पंतप्रधान बिहारमधील दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन (डीएवाय-एनआरएलएम) अंतर्गत क्लस्टर स्तरावरील महासंघांना सुमारे 500 कोटी रुपयांच्या सामुदायिक गुंतवणूक निधीचे वाटप देखील करतील आणि काही क्लस्टर स्तरावरील महासंघांना (सीएलएफ) अध्यक्षांना धनादेश सुपूर्द करतील.


