युवा कौशल्य विकासासाठीचा ऐतिहासिक उपक्रम म्हणून, पंतप्रधान देशभरातील 1,000 सरकारी आयटीआय संस्थांच्या श्रेणी सुधारणेसाठी 60,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह पीएम-सेतू योजनेचा करणार शुभारंभ
या उपक्रमाच्या माध्यमातून बिहारमध्ये युवा कौशल्य आणि शिक्षण यावर विशेष भर
पंतप्रधान बिहारच्या सुधारित मुख्यमंत्री निश्चय स्वयं सहाय्यता भत्ता योजनेचा करणार शुभारंभ, या योजनेद्वारे 5 लाख पदवीधरांना दोन वर्षांसाठी 1,000 रुपये मासिक भत्ता दिला जाणार
बिहारमध्ये उद्योग-केंद्रित अभ्यासक्रम आणि व्यावसायिक शिक्षणाला चालना देण्यासाठी जन नायक कर्पूरी ठाकूर कौशल्य विद्यापीठाचे पंतप्रधान उद्घाटन करणार
पंतप्रधान बिहारमधील चार विद्यापीठांमध्ये नवीन शैक्षणिक आणि संशोधन सुविधांची पायाभरणी करणार, बिहटा येथे एनआयटी पाटणाच्या नवीन संकुलाचे लोकार्पण करणार
पंतप्रधान देशातील 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील नवोदय विद्यालये आणि एकलव्य आदर्श निवासी शाळांमध्ये स्थापन केलेल्या 1,200 व्यावसायिक कौशल्य प्रयोगशाळांचे उद्घाटन करणार
कौशल्य दीक्षांत समारंभात पंतप्रधानांच्या हस्ते आयटीआय मध्ये अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार

युवा विकासासाठीचा एक महत्वाचा उपक्रम म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात सकाळी 11 वाजता 62,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध युवा-केंद्रित उपक्रमांचे उद्घाटन करतील. यामुळे देशभरात शिक्षण, कौशल्य आणि उद्योजकतेला निर्णायक चालना मिळेल. या कार्यक्रमात कौशल दीक्षांत समारंभ देखील आयोजित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाला अनुसरून, आयोजित होत असलेला हा चौथा राष्ट्रीय कौशल्य  दीक्षांत समारंभ असेल. यामध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील राष्ट्रीय पातळीवर अव्वल कामगिरी करणाऱ्या 46 विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाईल.

पंतप्रधान 60,000 कोटी रुपये गुंतवणुकीच्या पीएम-सेतू (PM-SETU- पीएम स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड आयटीआय) या केंद्र पुरस्कृत योजनेचा शुभारंभ करतील. या योजनेत देशभरातील 1,000 सरकारी आयटीआयचे हब-अँड-स्पोक मॉडेलमध्ये श्रेणी सुधारणा करण्याची योजना असून, यात 200 हब आयटीआय आणि 800 स्पोक आयटीआय यांचा समावेश आहे. प्रत्येक हब (केंद्र) सरासरी चार स्पोक्सशी (शाखा) जोडले जाईल. यामुळे प्रगत पायाभूत सुविधा, आधुनिक व्यापार, डिजिटल शिक्षण प्रणाली आणि इनक्युबेशन सुविधांनी सुसज्ज क्लस्टर तयार होतील. उद्योग क्षेत्रातील प्रमुख भागधारक या क्लस्टर्सचे व्यवस्थापन करतील, जेणेकरून बाजारातील मागणीनुसार परिणाम-आधारित कौशल्य उपलब्ध होईल. या केंद्रांमध्ये नवोन्मेष केंद्रे, प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याची सुविधा, उत्पादन युनिट्स आणि प्लेसमेंट सेवा देखील असतील, तर या केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना अधिकाधिक प्रवेश मिळावा  यावर स्पोक्स लक्ष केंद्रित करतील. एकत्रितपणे, पीएम-सेतू भारताच्या आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या परिसंस्थेचा कायापालट करेल, त्यामुळे या संस्था सरकारी मालकीच्या मात्र उद्योग-व्यवस्थापित असतील तसेच त्यांना जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेकडून  सह-वित्तपुरवठा लाभेल. योजनेच्या अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात पाटणा आणि दरभंगा येथील आयटीआयवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.

देशभरातील 400 नवोदय विद्यालयांमध्ये स्थापन केलेल्या 1,200 व्यावसायिक कौशल्य प्रयोगशाळांचे आणि 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्थापन केलेल्या  200 एकलव्य आदर्श निवासी शाळांचे उदघाटन देखील पंतप्रधान करतील. या प्रयोगशाळांमध्ये दुर्गम आणि आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान, वाहनउद्योग, कृषी, इलेक्ट्रॉनिक्स, परिचालन आणि पर्यटन यासारख्या अतिशय मागणी असलेल्या  12 क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाईल. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत असलेल्या या प्रकल्पात उद्योगाशी निगडित  शिक्षण देण्यासाठी आणि रोजगारक्षमतेचा  पाया लवकर तयार करण्याच्या दृष्टीनं  1,200 व्यावसायिक शिक्षकांना  देखील प्रशिक्षण दिले जाईल.

बिहारचा समृद्ध वारसा आणि तरुण लोकसंख्या प्रतिबिंबित करणाऱ्या या कार्यक्रमाचा विशेष भर बिहारमधील परिवर्तनकारी प्रकल्पांवर असेल.  बिहारच्या  मुख्यमंत्री निश्चय स्वयंम सहाय्यता भट्ट या सुधारित योजनेचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून त्याअंतर्गत दरवर्षी सुमारे पाच लाख पदवीधर तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षण आणि  दोन वर्षांसाठी दरमहा 1,000 रुपये भत्ता मिळेल. याशिवाय नव्याने रचना केलेल्या बिहार विद्यार्थी क्रेडिट कार्ड योजनेचे अनावरण देखील त्यांच्या हस्ते होणार आहे, उच्च शिक्षणासाठीचा आर्थिक भार दूर करुन चार लाख रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत  3.92 लाख विद्यार्थ्यांना  एकूण 7,880 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. तसेच बिहार मधली युवा सक्षमीकरणाला आणखी बळकटी देण्यासाठी विशेषतः 18 ते  45 वयोगटातील व्यक्तींसाठी तयार केलेल्या बिहार युवा आयोग या वैधानिक आयोगाचे औपचारिक उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. हा आयोग राज्यातील तरुण लोकसंख्येच्या ऊर्जेचा कार्यक्षम विनियोग करण्याच्या दिशेने कार्य करेल.

जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कार्यबल निर्माण करण्यासाठी उद्योग-केंद्रित अभ्यासक्रम आणि व्यावसायिक शिक्षण देण्याच्या संकल्पनेनुसार स्थापन केलेल्या बिहारमधील जन नायक कर्पूरी ठाकूर कौशल्य विद्यापीठाचे उद्घाटन देखील पंतप्रधान करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून आणि उच्च शिक्षणाच्या संधी अधिक उत्तम  करण्याच्या उद्देशाने बिहारमधील चार विद्यापीठांमध्ये नवीन शैक्षणिक आणि संशोधन सुविधांची पायाभरणी करणार आहेत. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अर्थात पीएम-उषा अंतर्गत हे प्रकल्प सुरू होत आहेत.यात पाटणा विद्यापीठ, भूपेंद्र नारायण मंडल विद्यापीठ (मधेपुरा), जय प्रकाश विद्यापीठ (छपरा) आणि नालंदा मुक्त विद्यापीठ (पाटणा) यांचा समावेश आहे.एकत्रितपणे, 160 कोटी रुपयांच्या एकूण खर्चातून उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पांचा 27,000 हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. यामुळे आधुनिक शैक्षणिक पायाभूत सुविधा, प्रगत प्रयोगशाळा, वसतिगृहे आणि बहु-विद्याशाखीय शिक्षण शक्य होईल.

पंतप्रधान पाटणा इथल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या बिहटा कॅम्पसचे लोकार्पण करतील. या कॅम्पसमध्ये 6,500 विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील. या कॅम्पसमध्ये 5G वापर प्रयोगशाळा, इस्रोच्या (ISRO) सहकार्याने स्थापित केलेल्या प्रादेशिक अंतराळ प्रशिक्षण केंद्र आणि आधीच नऊ स्टार्ट-अप्सना सहाय्य केलेल्या नावीन्य व इनक्युबेशन  केंद्र या सारख्या प्रगत सुविधांचा समावेश आहे.

पंतप्रधान बिहार सरकारमधील 4,000 हून अधिक नव-नियुक्त उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण करतील. तसेच, मुख्यमंत्री बालक/बालिका शिष्यवृत्ती योजनेंतर्गत, 9 वी आणि 10 वीच्या 25 लाख विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे 450 कोटी रुपयांची शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करतील.

या उपक्रमांमुळे भारतातील तरुणांसाठी मोठ्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. शिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता आणि सुधारित पायाभूत सुविधा यांचा समन्वय साधून,  देशाच्या प्रगतीसाठी एक भक्कम पाया तयार करणे हे या उपक्रमांचे उद्दिष्ट आहे. बिहारवर विशेष लक्ष केंद्रित केल्यामुळे, हे राज्य कुशल मनुष्यबळाचे केंद्र म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रादेशिक आणि राष्ट्रीय अशा दोन्ही स्तरांवरच्या विकासाला हातभार लागेल.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India at Davos: From presence to partnership in long-term global growth

Media Coverage

India at Davos: From presence to partnership in long-term global growth
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 जानेवारी 2026
January 24, 2026

Empowered Youth, Strong Women, Healthy Nation — PM Modi's Blueprint for Viksit Bharat