जागतिक दर्जाची हवाई वाहतूक पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या आणि हवाई वाहतूक जोडणीचा विस्तार करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 जून रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमाराला नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (IATA - International Air Transport Association) 81 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होणार आहेत. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेची 81वी वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच जागतिक हवाई वाहतूक शिखर परिषदेला (WATS - World Air Transport Summit) आज दि. 1 जूनला प्रारंभ झाला, येत्या 3 जूनपर्यंत ही बैठक आणि परिषद सुरू राहील. याआधी भारतात 42 वर्षांपूर्वी 1983 मध्ये यापूर्वीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली होती. यंदा होत असलेल्या बैठकीच्या निमित्ताने जागतिक विमान वाहतूक उद्योग क्षत्रातील आघाडीची दिग्गज व्यक्तिमत्वे, सरकारी अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासह 1,600 पेक्षा जास्त प्रतिनिधी एकत्र आले आहेत.
या निमित्ताने होत असलेल्या जागतिक हवाई वाहतूक शिखर परिषदेत विमान वाहतूक उद्योग क्षेत्रासमोरील विमान कंपन्यांचे अर्थकारण, हवाई वाहतूक जोडणी, ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विमान इंधन उत्पादन, कार्बन उत्सर्जनाचे घट साध्य निधी अर्थ सहाय्य, नवोन्मेषी सुधारणा (Innovations) या आणि अशा अनेक महत्वाच्या समस्या आणि मुद्यांवर प्राधान्याने चर्चा केली जाणार आहे. यानिमित्ताने विमान वाहतूक क्षेत्रातील जगभरातील आघाडीची दिग्गज व्यक्तिमत्वे आणि माध्यम प्रतिनिधींना भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रातील उल्लेखनीय परिवर्तन आणि या क्षेत्राच्या देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासातील योगदानाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.


