पंतप्रधान नरेंद्र मोदी 11ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील बाबा खरक सिंग मार्गावर संसद सदस्यांसाठी नव्याने बांधलेल्या टाइप-7 बहुमजली 184 सदनिकांचे उद्घाटन करतील.
यावेळी पंतप्रधान निवासी परिसरात सिंदूरचे रोप लावतील. पंतप्रधान यावेळी श्रमजीवींशी संवादसुद्धा साधणार आहेत. ते उपस्थितांना देखील संबोधित करतील.
या संकुलाची रचना स्वयंपूर्ण होण्याच्या उद्देशाने केली आहे तसेच संसद सदस्यांच्या कार्यात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक सुविधांच्या संपूर्ण श्रेणीने ते सुसज्ज आहे. हरित तंत्रज्ञानाचा समावेश करून, हा प्रकल्प गृह 3-तारांकित श्रेणीच्या मानकांवर आधारभूत आहे तसेच राष्ट्रीय इमारत संहिता (NBC) 2016 चे पालन करतो. या पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत वैशिष्ट्यांमुळे ऊर्जा संवर्धन, अक्षय्य ऊर्जा निर्मिती आणि प्रभावी कचरा व्यवस्थापनात योगदान मिळणे अपेक्षित आहे. प्रगत बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर - विशेषतः ॲल्युमिनियम झडपांसह मोनोलिथिक काँक्रीट - संरचनात्मक टिकाऊपणा सुनिश्चित करताना प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यास सक्षम ठरले आहे. हे संकुल दिव्यांग-अनुकूल देखील आहे, जे सर्वसमावेशक रचनेप्रती वचनबद्धता दर्शविते.
संसद सदस्यांसाठी पुरेशा घरांच्या कमतरतेमुळे या प्रकल्पाचा विकास करणे आवश्यक होते. जमिनीच्या मर्यादित उपलब्धतेमुळे, जमिनीचा वापर अनुकूल करण्यासाठी आणि देखभाल खर्च कमी करण्यासाठी अनुलंब स्वरुपात घरांच्या विकासावर सातत्याने भर दिला जात आहे.
प्रत्येक निवासी युनिटमध्ये अंदाजे 5,000 चौरस फूट चटई क्षेत्र आहे, ज्यामुळे निवासी आणि कार्यालयीन कामांसाठी पुरेशी जागा उपलब्ध होते. कार्यालये, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी समर्पित जागा आणि सामुदायिक केंद्र यांचा समावेश संसद सदस्यांना जनप्रतिनिधी म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास सहाय्यभूत ठरेल.
आधुनिक रचनात्मक संरचना नियमांनुसार, संकुलातील सर्व इमारती भूकंप-प्रतिरोधक स्वरूपाच्या बांधण्यात आल्या आहेत. सर्व रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी एक व्यापक आणि मजबूत सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली आहे.


