“स्वातंत्र्योत्तर भारतात, दीर्घ काळापर्यंत आरोग्य विषयक पायाभूत सुविधांकडे द्यायला हवे तसे लक्ष दिले गेले नाही आणि त्याकाळी नागरिकांना योग्य उपचारांसाठी धावपळ करावी लागल्यामुळे रुग्णाची परिस्थिती आणि आर्थिक ताण अधिकच वाढत जात असे”
“केंद्रातील तसेच राज्यातील सरकार यांना गरीब, पददलित, नाडलेले, मागास वर्गीय आणि मध्यम वर्गीय यांच्या वेदना समजत आहेत”
“पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक काना-कोपऱ्यात, उपचारांपासून महत्त्वाच्या संशोधनापर्यंतच्या सर्व सुविधांसाठी संपूर्ण परिसंस्था उभारण्यात येईल”
“पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियान हे आरोग्यक्षेत्राच्या विकासासह आत्मनिर्भरतेचे देखील माध्यम आहे”
“काशी शहराचे हृदय होते तसेच आहे, मन देखील तेच आहे, पण शरीर सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जात आहेत”
“बनारस हिंदू विद्यापीठात आज तंत्रज्ञानापासून आरोग्य क्षेत्रापर्यंत सर्व बाबतीत अभूतपूर्व सुविधा निर्माण केल्या जात आहेत. संपूर्ण देशभरातून युवक मित्र येथे अभ्यासासाठी येत आहेत”

मला सुरुवात करू द्या, आता तुम्ही मला परवानगी द्या, मग मी बोलायला सुरुवात करीन.  हर हर महादेव, बाबा विश्वनाथ, काशी या पवित्र भूमीतल्या सर्व बंधू-भगिनींना, आई अन्नपूर्णेच्या नगरीतील सर्व बंधू आणि भगिनींना  विनम्र अभिवादन.  तुम्हा सर्वांना दिवाळी, देव दीपावली, अन्नकूट, भाऊबीज, प्रकाशोत्सव आणि दाला छठच्या हार्दिक शुभेच्छा.  उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेलजी, उत्तर प्रदेशचे ऊर्जावान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवियजी, उत्तर प्रदेश सरकारचे इतर मंत्री, केंद्रातील आमचे आणखी एक सहकारी महेंद्र नाथ पांडेजी, आणखी एक राज्यमंत्री अनिल राजभरजी. नीलकंठ तिवारीजी, श्री. रवींद्र जैस्वालजी, इतर मंत्री, संसदेतील आमच्या सहकारी श्रीमती सीमा द्विवेदीजी, बीपी सरोजजी, वाराणसीच्या महापौर श्रीमती मृदुला जैस्वालजी, इतर लोकप्रतिनिधी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातून जोडले गेलेले आरोग्य व्यावसायिक, जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय संस्था आणि इथे उपस्थित बनारसचे माझे बंधू आणि भगिनी.

 

कोरोना महामारीविरुद्धच्या लढाईत देशाने 100 कोटी लसींच्या मात्रांचा मोठा टप्पा पूर्ण केला आहे.  बाबा विश्वनाथ यांच्या आशीर्वादाने, मा गंगेच्या अतूट महिमेने, काशीतील लोकांच्या अतूट विश्वासाने, सर्वांसाठी मोफत लसीची मोहीम यशस्वी होत आहे.  मी तुम्हा सर्व स्वजनांना नमन करतो.  आजच काही वेळापूर्वी, एका कार्यक्रमात, मला उत्तर प्रदेशला 9 नवीन वैद्यकीय महाविद्यालये समर्पित करण्याचा बहुमान मिळाला.  यामुळे पूर्वांचल आणि संपूर्ण उत्तर प्रदेशातील कोट्यवधी गरीब, दलित-मागास-शोषित-वंचित लोकांना, अशा समाजातील सर्व घटकांना, खूपच फायदा होईल. इतर शहरांमधील मोठ्या रुग्णालयांसाठी त्यांची धावपळ होत असे ती कमी होईल.

 

मित्रांनो,

 

मानसमधे  म्हटलं आहे –

मुक्ति जन्म महि जानि, ज्ञान खानिअघ हानि कर।

जहं बस सम्भु भवानि, सो कासी सेइअ कस न।।

म्हणजेच शिव आणि शक्ती काशीमध्ये विराजमान आहेत.  ज्ञानाचे भांडार असलेली काशी आपल्याला कष्ट आणि क्लेश या दोन्हीपासून मुक्ती देते.  मग आरोग्याशी निगडित एवढी मोठी योजना, रोग-कष्टांपासून मुक्ती मिळवण्याचा एवढा मोठा संकल्प, ती सुरू करण्यासाठी काशीहून चांगली जागा कोणती असू शकते ?  काशीच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज या व्यासपीठावर दोन मोठे कार्यक्रम होत  आहेत.  एक भारत सरकारचा आणि संपूर्ण भारतासाठी 64 हजार कोटींहून अधिक खर्चाचा हा कार्यक्रम आज काशीच्या पवित्र भूमीतून सुरू होत आहे.  आणि दुसरे म्हणजे, काशी आणि पूर्वांचलच्या विकासासाठी हजारो कोटींच्या कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. एक प्रकारे, मी असे म्हणू शकतो की येथे पहिला कार्यक्रम आणि इथला कार्यक्रम मिळून, मी असे म्हणू शकतो की आज सुमारे 75 हजार कोटी रुपयांच्या कामांचा निर्णय किंवा लोकार्पण आज इथे होत आहे.  काशीपासून सुरू होणाऱ्या या योजनेत महादेवाचा आशीर्वादही आहे.  आणि जिथे महादेवाचे आशीर्वाद आहेत, तिथे कल्याणच कल्याण आहे, यशच यश आहे.  आणि जेव्हा महादेवाचा आशीर्वाद असतो, तेव्हा दुःखापासून मुक्तीही स्वाभाविक असते.

मित्रांनो,

 

आज, उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशाच्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांना बळ देण्यासाठी, भविष्यातील साथीच्या आजारांना रोखण्यासाठी आपली तयारी उच्च पातळीची असली पाहिजे. गाव आणि विभाग पातळीपर्यंत आपल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता आणण्यासाठी आज मला काशीतून 64 हजार कोटी रुपयांचे आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान देशाला समर्पित करण्याचा बहुमान मिळाला आहे.  काशीच्या पायाभूत सुविधांशी संबंधित 5000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटनही आज झाले आहे.  यामध्ये घाटांचे सौंदर्यीकरण, गंगाजी आणि वरुणाची स्वच्छता, पूल, पार्किंगची ठिकाणे, बीएचयूमधील अनेक सुविधांशी संबंधित अनेक प्रकल्प आहेत.  या सणासुदीच्या काळात, जीवन सुगम, निरोगी आणि समृद्ध करण्यासाठी काशीमध्ये होत असलेला हा विकास महोत्सव एक प्रकारे संपूर्ण देशाला नवी ऊर्जा, नवी ताकद, नवा आत्मविश्वास देणारा आहे.  त्यासाठी आज काशीसह 130 कोटी देशवासियांना काशीच्या भूमीपासून, भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत, भारताच्या गावापासून भारताच्या शहरापर्यंत, सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

 बंधू आणि भगिनींनो,

 आरोग्य हा इथल्या प्रत्येक कृतीचा मूळ आधार मानला जातो.  शरीर निरोगी ठेवण्यासाठी केलेली गुंतवणूक ही नेहमीच उत्तम गुंतवणूक मानली गेली आहे.  पण स्वातंत्र्योत्तर प्रदीर्घ काळात आरोग्यावर, आरोग्य सुविधांकडे देशाला जेवढे हवे होते तेवढे लक्ष दिले गेले नाही.  देशात ज्यांची सरकारे प्रदीर्घकाळ होती, त्यांनी देशाची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे विकसित करण्याऐवजी सुविधांपासून वंचित ठेवली.  गावात एकतर रुग्णालय नाही, रुग्णालय असतील तर उपचार करायला कोणी नव्हते. विभागातील रुग्णालयात  गेलो तर तेथे चाचणीची सोय नाही.  चाचणीची सोय असेल, चाचणी केली तरी निकालाबाबत संभ्रम, त्याच्या अचूकतेबद्दल शंका, जिल्हा रुग्णालयात पोहोचल्यावर कळते की, ज्या गंभीर आजाराचं निदान झालं आहे त्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार. पण जी शस्त्रक्रिया करायची आहे त्यासाठी सोय नाही, मग मोठ्या रुग्णालयांत धाव घ्या, मोठ्या रुग्णालयात जास्त गर्दी, जास्त वेळ थांबा.  आपण सर्व साक्षीदार आहोत की रुग्ण आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला अशाच समस्यांचा सामना करावा लागला.  जीवन संघर्षातच चालले होते, त्यामुळे एखादा गंभीर आजार अनेक वेळा बळावतो, वरून गरीबांवर अनावश्यक आर्थिक बोजा पडतो तो वेगळाच.

 

मित्रांनो,

 

आपल्या आरोग्यसेवा व्यवस्थेतील मोठ्या कमतरतेने गरीब आणि मध्यमवर्गीयांमध्ये उपचाराबाबत कायमची चिंता निर्माण केली आहे.  आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान हे देशाच्या आरोग्य व्यवस्थेतील या उणीवा दूर करण्यासाठीचा उपाय आहे.  आपण भविष्यात कोणत्याही साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी सज्ज असावं, सक्षम असावं यासाठी आपली आरोग्य यंत्रणा आज घडवली जात आहे.  आजाराचं लवकरात लवकर निदान व्हावं. तपासणीत दिरंगाई होऊ नये, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.  पुढील 4-5 वर्षात देशातील गावापासून ते विभाग, जिल्हा, प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत  सक्षम आरोग्य सेवा जाळे मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे.  विशेषत: ज्या राज्यांमध्ये आरोग्य सुविधांचा अभाव आहे, जी आपली डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्ये आहेत, त्यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे.  जसे की उत्तराखंड, हिमाचल आहे.

 

देशातील आरोग्य क्षेत्रातील कमतरता भरून काढण्यासाठी आयुष्मान  भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानाचे 3 महत्वाचे पैलू आहेत. पहिला पैलू रोगनिदान आणि उपचारासाठी व्यापक सुविधांच्या उभारणीशी संबंधित आहे. याअंतर्गत गावांमध्ये आणि शहरांमध्ये आरोग्य आणि निरामयता केंद्र सुरु करण्यात येत आहेत, आजाराचे निदान लवकर आणि सुरुवातीलाच व्हावे यासाठीची सुविधा या  केंद्रांमध्ये असेल. या केंद्रांच्या माध्यमातून  विनामूल्य वैद्यकीय सल्ले,विनामूल्य चाचण्या, विनामूल्य औषधे यांसारख्या सुविधा उपलब्ध होतील. वेळेवर आजाराचे निदान झाले तर आजार गंभीर  होण्याची शक्यता कमी राहील. गंभीर आजाराच्या परिस्थितीत या आजारावर उपचार करण्यासाठी 600 हुन अधिक जिल्ह्यात, क्रिटिकल केअरशी संबंधित 35 हजारांहून अधिक खाटा  तयार केल्या जातील.  बाकी,सुमारे सव्वाशे जिल्ह्यांमध्ये संदर्भ सेवांची सुविधा दिली जाईल. यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण आणि दुसऱ्या क्षमता बांधणीसाठी 12 केंद्रीय रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा विकसित करण्याबाबतही काम सुरु आहे. या योजनेअंतर्गत राज्यांमध्येही शास्त्रक्रियेशी निगडीत जाळ्याला सक्षम करण्यासाठी 24x7 चालणारी  15 आपत्कालीन शस्त्रक्रिया केंद्रही तयार केली जातील.

मित्रांनो,

या योजनेचा दुसरा पैलू, आजाराच्या निदानासाठी  चाचणी नेटवर्कशी संबंधित आहे. या अभियानाअंतर्गत आजारांचे निदान आणि निगराणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. देशातील 730 जिल्ह्यांमध्ये एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आणि देशातील निश्चित केलेल्या 3,500  पंचायतींच्या कार्यक्षेत्रात पंचायत स्तरावरील  सार्वजनिक आरोग्य कक्षांची स्थापना केली जाईल.रोग नियंत्रणासाठी 5 प्रादेशिक राष्ट्रीय केंद्रे, 20 मेट्रोपॉलिटन युनिट्स आणि 15 बीएसएल प्रयोगशाळा  हे नेटवर्क आणखी बळकट करतील.

बंधू आणि भगिनींनो,

 

महामारीशी संबंधित संशोधन संस्थांचा विस्तार करून त्यांना सक्षम बनवणे हा या अभियानाचा तिसरा पैलू आहे. आताच्या घडीला देशात 80 विषाणूजन्य रोग  निदान आणि संशोधन प्रयोगशाळा आहेत, या अधिक बळकट  केल्या जातील. महामारीमध्ये  जैवसुरक्षा पातळी-3  स्तरावरील प्रयोगशाळांची गरज असते. अशा 15 जैवसुरक्षा स्तरीय प्रयोगशाळा कार्यरत केल्या जातील, याशिवाय, चार नव्या राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था आणि वन हेल्थसाठी राष्ट्रीय संस्था स्थापन केली जात आहे. दक्षिण आशियासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे  प्रादेशिक संशोधन व्यासपीठ देखील संशोधनाचे हे जाळे  मजबूत करेल.म्हणजेच आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानाच्या  माध्यमातून उपचारांपासून ते  महत्वाच्या संशोधनापर्यंत सर्वांचा समावेश असलेल्या अशा सुविधा,देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याच्या दृष्टीने एक संपूर्ण कार्यक्षेत्र विकसित केले जाईल.

 

मित्रांनो,

खरे तर ,हे काम काही दशकांपूर्वीच  व्हायला हवे होते .पण परिस्थिती काय आहे याचे वर्णन करण्याची मला गरज नाही, गेल्या 7 वर्षांपासून आपण सातत्याने सुधारणा करत आहोत पण आता हे काम खूप मोठ्या प्रमाणावर, अत्यंत आक्रमक दृष्टिकोनासह  करावे लागणार आहे.काही दिवसांपूर्वी, तुम्ही पाहिले असेल की मी दिल्लीत संपूर्ण देशासाठी एक अतिशय मोठा देशव्यापी पायाभूत सुविधा कार्यक्रम 'गती-शक्ती'सुरु  केला. आज हा दुसरा कार्यक्रम, आरोग्यासाठी सुमारे  64 हजार कोटी रुपये खर्चाचा आरोगासाठीचा, रोगाविरुद्धच्या लढाईसाठी, देशातील प्रत्येक नागरिकाला निरोगी ठेवण्यासाठी इतके मोठे  अभियान  घेऊन आज आपण काशीच्या भूमीतून देशभरात निघालो आहोत.

मित्रांनो,

जेव्हा अशा आरोग्य पायाभूत सुविधा निर्माण होतात, तेव्हा त्यातून आरोग्य सेवेत सुधारणा तर होतेच, शिवाय संपूर्ण रोजगाराचे वातावरणही निर्माण होते.डॉक्टर्स, निमवैद्यक, प्रयोगशाळा, औषधालय, स्वच्छता, कार्यालय, प्रवास-वाहतूक, खाण्यापिण्याच्या क्षेत्रासारखे  अनेक रोजगार  या योजनेतून निर्माण होणार आहेत. एखादे मोठे  रुग्णालय बांधले  की त्याच्याभोवती संपूर्ण शहर वसते, हे आपण पाहिलं आहे.जे रुग्णालयाशी संबंधित उपक्रमांसाठी उपजीविकेचे केंद्र बनते. ते मोठ्या आर्थिक घडामोडीचे  केंद्र बनते.आणि म्हणूनच आयुष्मान भारत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अभियान  हे आरोग्यासह  आर्थिक आत्मनिर्भरतेचेही   माध्यम आहे.सर्वांगीण आरोग्य सेवेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. सर्वांगीण आरोग्य सेवा म्हणजे जी सर्वांसाठी सुलभ, परवडणारी आणि सर्वांसाठी उपलब्ध असेल. सर्वांगीण आरोग्य सेवा म्हणजे  जिथे आरोग्य तसेच निरोगी राहण्यावरही  लक्ष केंद्रित केले जाते.स्वच्छ भारत अभियान, जल जीवन अभियान , उज्ज्वला योजना, पोषण अभियान, मिशन इंद्रधनुष, अशा अनेकअभियानांनी   देशातील कोट्यवधी गरीबांना रोगांपासून संरक्षण दिले आहे  आहे, त्यांना आजारी पडण्यापासून वाचवले आहे. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून  रुग्णालयांमध्ये दाखल दोन कोटींहून अधिक गरीबांवर मोफत उपचार केले आहेत.आयुष्मान भारत डिजिटल अभियानाच्या  माध्यमातून उपचारांशी संबंधित अनेक समस्या सोडवल्या जात आहेत.

 

बंधू आणि भगिनींनो,

 

आमच्या आधी वर्षानुवर्षे जे सरकारमध्ये होते त्यांच्यासाठी आरोग्यसेवा हे पैसे कमवण्याचे साधन, घोटाळे करण्याचे माध्यम राहिले आहे. गरिबांचे हाल पाहूनही ते  त्यांच्यापासून दूर पळत राहिले. आज केंद्रात आणि राज्यात गरीब, दलित, शोषित- वंचित , मागास, मध्यमवर्गीय अशा सर्वांच्या वेदना समजून घेणारे सरकार आहे.देशातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी आम्ही रात्रंदिवस झटत आहोत. पूर्वी जनतेचा पैसा घोटाळ्यात जायचा, अशा लोकांच्या तिजोरीत जायचा, आज मोठमोठ्या प्रकल्पांमध्ये पैसा खर्च होत आहे.त्यामुळे आज देश इतिहासातील सर्वात मोठ्या महामारीचाही सामना करत आहे आणि आत्मनिर्भर भारतासाठी लाखो कोट्यवधींच्या  पायाभूत सुविधाही उभारत आहे.

मित्रांनो,

वैद्यकीय सुविधा वाढवण्यासाठी डॉक्टर आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची  संख्याही तितक्याच वेगाने वाढणे अत्यंत आवश्यक आहे.उत्तरप्रदेशमध्ये ज्या वेगाने नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जात आहेत त्याचा चांगला परिणाम वैद्यकीय प्रवेशासाठीच्या आणि डॉक्टरांच्या संख्येवर होईल.अधिक जागांमुळे आता गरीब पालकांची  मूलेही डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहू शकणार आहेत  आणि ते पूर्णही  करू शकणार आहेत .

 

बंधू आणि भगिनींनो,

 

स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात देशात जेवढे डॉक्टर वैद्यकीय महाविद्यालयातून अभ्यास करून बाहेर पडले आहेत, त्यापेक्षा जास्त डॉक्टर येत्या 10-12 वर्षात देशाला मिळणार आहेत. देशात वैद्यकीय क्षेत्रात किती मोठे काम सुरु आहे, याची तुम्ही कल्पना करू शकता.जेव्हा जास्त डॉक्टर असतील, तेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यात तितक्याच सहजतेने डॉक्टर उपलब्ध होतील. हाच  नवा भारत आहे जिथे अभावाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस काम केले जाते आहे. 

बंधू आणि भगिनींनो,

 

गतकाळात  देशात असो वा उत्तर प्रदेशात ,ज्या पद्धतीने काम झाले , जर त्याच पद्धतीने काम झाले असते, तर आज काशीची काय अवस्था झाली असती? भारताच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेले जगातील सर्वात जुने शहर काशीला त्यांनी वाऱ्यावर सोडले होते. त्या लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा, खडबडीत रस्ते, घाट आणि गंगामैया यांची दुर्दशा, वाहतूक कोंडी , प्रदूषण, अनागोंदी, हेच सर्वकाही सूरु असायचे. आज काशीचे हृदय तेच आहे, मन तेच आहे, मात्र  शरीर सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत.वाराणसीमध्ये जितके काम गेल्या ७ वर्षांत झाले, तितके काम गेल्या अनेक दशकांत झाले नाही.

 

बंधू आणि भगिनींनो,

रिंग रोड नसतांना काशी मध्ये वाहतूक कोंडीमुळे काय त्रास होत असेल, याचा आपण सर्वांनी वर्षानुवर्षे अनुभव घेतला आहे. ‘नो एन्ट्री’ उघडण्याची वाट बघणे हे तर आता बनारसच्या लोकांच्या सवयीचे झाले होते. पण आता रिंग रोड तयार झाल्यामुळे, प्रयागराज, लखनौ, आजमगढ, गाजीपूर, गोरखपूर, दिल्ली, कोलकाता कुठेही जायचे-यायचे असेल, तर शहरात येणाऱ्या लोकांना शहरांतल्या नागरिकांना त्रास देण्याची गरज पडणार नाही. केवळ हेच नाही, तर रिंग रोड आता गाजीपूर च्या बिरनोन पर्यंत चारपदरी राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यात आले आहे. जागोजागी सर्विस रोडच्या सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. यामुळे, गावांसोबतच, प्रयागराज, लखनौ, गोरखपूर आणि बिहार, अगदी थेट नेपाळपर्यंतच्या वाहतुकीची  सुविधा  सोयीची झाली आहे. यामुळे, प्रवास तर सुलभ झालाच आहे, पण व्यापार-उद्योगधंद्यांनाही गती मिळेल आणि वाहतुकीची किंमत कमी होईल.

 

बंधू आणि भगिनींनो,

 

जोपर्यंत देशात एका समर्पित पायाभूत सुविधांची निर्मिती होत नाही, तोपर्यंत विकासाचा वेगही अर्धवट राहतो. वरुणा नदीवर दोन पूल बनवण्यामुळे डझनभर गावांसाठी आता शहरात जाणे-येणे सुलभ झाले आहे. यामुळे विमानतळाकडे येण्या-जाण्यासाठी प्रयागराज, भादोही आणि मिर्झापूरच्या लोकांना अत्यंत सोयीचे होणार आहे. त्याशिवाय, गालिचा उद्योगांशी संबंधित कारागिरांना देखील  लाभ मिळणार आहेत. आणि मां विंध्यवासिनीच्या दर्शनासाठी विमानतळापासून थेट मिर्झापूर इथे जाण्यास इच्छुक मां भक्तांनाही सुविधा मिळणार आहे. रस्ते, पूल, पार्किंग अशा ठीकाणांशी संबंधित अनेक प्रकल्प आज वाराणसीच्या लोकांना समर्पित केले गेले आहेत. ज्यामुळे शहर आणि आसपासच्या लोकांची आयुष्ये अधिक सुगम होणार आहेत. रेल्वेस्थानकांवर तयार होणाऱ्या आधुनिक एक्झिक्युटिव्ह लाऊंजमुळे प्रवाशांना सोयीसुविधा अधिक वाढवण्यात आल्या आहेत.

मित्रांनो,

गंगानदीची स्वच्छता आणि निर्मळतेसाठी गेल्या काही वर्षांत व्यापक काम केले जात आहे, ज्याचे परिणाम आज आम्ही देखील अनुभवतो आहोत. घरांतील सांडपाणी गंगा नदीत जाऊ नये, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आता रामनगर इथे, पाच नाल्यातून वाहणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक प्रक्रिया केंद्रांचे काम सुरु झाले आहे. यामुळे आसपासच्या 50 हजार पेक्षा अधिक लोकसंख्येला थेट लाभ मिळणार आहे. गंगामाईच नाही, तर वरुणा नदीच्या स्वच्छतेविषयी देखील प्राधान्याने काम केले जात आहे. दीर्घकाळपर्यंत उपेक्षित राहिलेली वरुणा नदी, नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचली होती. वरुणा नदीच्या संवर्धनासाठी कालव्यांच्या योजनेवर काम केले जात आहे. आज वरुणा नदीत स्वच्छ जल देखील पोहोचत आहे. 13 छोट्या-मोठ्या नाल्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. वरुणा नदीकिनारी पदपथ, रेलिंग, लाईटिंग, पक्के घाट, पायऱ्या  अशा अनेक सुविधांची निर्मिती देखील पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

मित्रांनो,

काशीनगरी अध्यात्मासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्वाचे केंद्र आहे. काशीसह, संपूर्ण पूर्वांचलच्या शेतकऱ्यांची उत्पादने, देशविदेशातील बाजारांमध्ये पोचवण्यासाठी, गेल्या अनेक वर्षात, अनेक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. नाशवंत वस्तूंच्या मालवाहतुकीच्या केंद्रांपासून, पॅकेजिंग आणि प्रक्रिया उद्योगासाठीच्या आधुनिक पायाभूत सुविधा इथे विकसित केल्या गेल्या आहेत. याच मालिकेत, लाल बहादूर शास्त्री फळे आणि भाजीपाला बाजाराचे आधुनिकीकरण देखील झाले आहे, नूतनीकरण झाले आहे, यामुळे शेतकऱ्यांना उत्तम सुविधा निर्माण झाल्या आहेत. शहंशाहपूर इथे जैव-सीएनजी प्रकल्प तयार झाल्यामुळे, बायोगॅस तर मिळणार आहेच आणि हजारो मेट्रिक टन सेंद्रिय खत देखील, शेतकऱ्यांना उपलब्ध केले जाणार आहे.

बंधू आणि भगिनींनो,

गेल्या काही वर्षात वाराणसी शहराचे आणखी एक विशेष यश  असेल, तर ते म्हणजे बनारस हिंदू विद्यापीठाचे पुन्हा जगात श्रेष्ठत्वाच्या दिशेने अग्रेसर होणे. आज बनारस हिंदू विद्यापीठात तंत्रज्ञानापासून ते आरोग्यापर्यंत,अभूतपूर्व सुविधा निर्माण होत आहेत. देशभरातून इथे युवक अभ्यासासाठी इथे येत आहेत. इथे शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी ज्या वसतिगृह सुविधा निर्माण झाल्या आहेत, त्या युवा सहकाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. विशेषत: शेकडो विद्यार्थ्यांसाठी ज्या वसतिगृह सुविधा तयार झाल्या आहेत, त्यामुळे पंडित मदनमोहन मालवीय यांची स्वप्ने साकार होण्यास आणखी पाठबळ मिळणार आहे. मुलींना उच्च आणि आधुनिक शिक्षण देण्याच्या ज्या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले, त्यांचे संकल्प पूर्ण करण्यात आम्हाला मदत होणार आहे.

बंधू आणि भगिनींनो,

विकासाचे हे सर्व संकल्प, आत्मनिर्भरतेचा आपला संकल्प प्रत्यक्षात सिद्ध करणारे आहेत. काशी आणि हे संपूर्ण क्षेत्र आता मातीपासून विविध वस्तू तयार करणारे अद्भूत कलाकार, कारागीर आणि अप्रतिम वस्त्रे विणणाऱ्या विणकरांसाठी ओळखले जाते. सरकारच्या प्रयत्नांमुळे गेल्या पाच वर्षांत वाराणसी इथे खादी आणि इतर कुटीर उद्योगांच्या उत्पादनांत सुमारे 60 टक्के आणि विक्रीमध्ये सुमारे 90 टक्क्यांची वाढ झाली आहे.

यामुळेच, मी  पुन्हा एकदा इथल्या सर्व देशबांधवांना आग्रह करेन, की या दिवाळीत आपण आपल्या या मित्रांच्या दिवाळीची देखील आठवण ठेवायला हवी. आपल्या घराच्या सजावटीपासून ते आपले कपडे आणि दिवाळीच्या दिव्यांपर्यंत, स्थानिक उत्पादनांसाठी आपल्याला प्रचार, प्रसार करायचा आहे, त्यांची खरेदी करायची आहे. धनत्रयोदशीपासून ते दिवाळीपर्यत आपण स्थानिक वस्तूंची खरेदी केली, तर सर्वांचीच दिवाळी आनंदाने भरून जाईल. आणि जेव्हा मी लोकल फॉर व्होकलविषयी बोलतो, तेव्हा मी पहिले आहे, की आपले टीव्हीवाले लोक देखील केवळ मातीच्या पणत्याच दाखवतात. व्होकल फॉर लोकल केवळ मातीच्या पणत्यांइतके मर्यादित नाही हो, तर यात त्या प्रत्येक गोष्टीचा समावेश आहे, ज्यात आपल्या देशबांधवांचा घाम आहे, ज्या उत्पादनात माझ्या देशाच्या मातीचा सुगंध आहे, त्या सगळ्या वस्तू!

आणि एकदा का आपल्याला याची सवय झाली, तेव्हा देशातल्या वस्तूंची खरेदी केल्यामुळे उत्पादन तर वाढेलच, रोजगारातही वाढ होईल. गरिबातल्या गरिबाला काम मिळेल आणि हे काम आपण सर्व मिळून करू शकतो. सर्वांच्या प्रयत्नातून आपण सगळे खूप मोठे परिवर्तन घडवू शकतो.

मित्रांनो,

पुन्हा एकदा आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानासाठी, संपूर्ण देशाचे आणि विकासाच्या या प्रकल्पांसाठी काशी नगरीचे खूप खूप अभिनंदन ! आपल्या सर्वांना येणाऱ्या सर्व सण-उत्सवांसाठी अनेकानेक शुभेच्छा !

खूप खूप धन्यवाद !

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
How NPS transformed in 2025: 80% withdrawals, 100% equity, and everything else that made it a future ready retirement planning tool

Media Coverage

How NPS transformed in 2025: 80% withdrawals, 100% equity, and everything else that made it a future ready retirement planning tool
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi extends greetings to Sashastra Seema Bal personnel on Raising Day
December 20, 2025

The Prime Minister, Narendra Modi, has extended his greetings to all personnel associated with the Sashastra Seema Bal on their Raising Day.

The Prime Minister said that the SSB’s unwavering dedication reflects the highest traditions of service and that their sense of duty remains a strong pillar of the nation’s safety. He noted that from challenging terrains to demanding operational conditions, the SSB stands ever vigilant.

The Prime Minister wrote on X;

“On the Raising Day of the Sashastra Seema Bal, I extend my greetings to all personnel associated with this force. SSB’s unwavering dedication reflects the highest traditions of service. Their sense of duty remains a strong pillar of our nation’s safety. From challenging terrains to demanding operational conditions, the SSB stands ever vigilant. Wishing them the very best in their endeavours ahead.

@SSB_INDIA”