संसदेच्या 2025 च्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या आवारात प्रसारमाध्यमांसमोर निवेदन केले. हे अधिवेशन केवळ एक औपचारिकता नसून, देशाच्या सध्याच्या वेगवाग प्रगतीच्या वाटचालीकरता ऊर्जेचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, असे ते म्हणाले. हे अधिवेशन देशाच्या प्रगतीला अधिक गती देण्यासाठी सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांना नवी ऊर्जा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारताने आपल्या लोकशाही परंपरांची चैतन्यशीलता आणि भावना सातत्याने सिद्ध करून दाखवली आहे असे त्यांनी नमूद केले. नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकीचा संदर्भ त्यांनी दिला. या निवडणुकीतले विक्रमी मतदान हे देशाच्या लोकशाहीच्या सामर्थ्याचा शक्तिशाली पुरावाच असल्याचे म्हणत, याबद्दल त्यांनी प्रशंसाही केली. महिला मतदारांचा वाढता सहभाग हा एक उल्लेखनीय आणि उत्साहवर्धक कल आहे, यामुळे लोकशाही प्रक्रियेला नवी आशा आणि आत्मविश्वास मिळतो, असे त्यांनी नमूद केले. भारताच्या लोकशाही संस्था जसजशा अधिक मजबूत होत आहेत, तसतशी भारताची लोकशाहीची चौकट देशाच्या आर्थिक क्षमतांनाही कशारितीने बळकट करत आहे, यावर जगाचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीमुळे परिणाम घडून येतात, हे भारताने सिद्ध करून दाखवले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारताच्या आर्थिक स्थितीत ज्या वेगाने नवी उंची गाठणारे बदल घडून येत आहेत, त्यामुळे विकसित भारत घडवण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करताना आत्मविश्वास वाढतो, आणि आपल्याला नवे बळ मिळते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले.

यावेळी पंतप्रधानांनी सर्व राजकीय पक्षांना या अधिवेशनात राष्ट्रीय हित, रचनात्मक वादविवाद आणि धोरणात्मक परिणामांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. संसदेने देशासाठी काय संकल्प केला आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी ती किती वचनबद्ध आहे, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे ते म्हणाले. विरोधी पक्षांनी त्यांची लोकशाहीप्रती असलेली जबाबदारी पूर्ण करावी असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी अर्थपूर्ण आणि ठोस मुद्दे मांडावेत असेही ते म्हणाले. निवडणुकीतील पराभवामुळे आलेल्या निराशेचे प्रतिबिंब संसदीय कामकाजावर उमटू नये, असा सल्लाही त्यांनी विरोधी पक्षांना दिला. निवडणुकीतील विजयातून निर्माण होणारा अहंकार अधिवेशनात दिसू नये, ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. या हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित असलेला समतोल, जबाबदारी आणि गांभीर्य प्रतिबिंबित झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नागरिकांना अधिक चांगल्या पद्धतीने माहिती मिळण्यासाठी, जे सदस्य चांगले काम करत आहेत त्यांना अधिक सुधारणा घडवून आणण्याचे तसेच आवश्यकता भासेल तेथे रचनात्मक, अचूक टीका करण्याचे आवाहन करत पंतप्रधानांनी माहितीपूर्ण चर्चेचे महत्त्व अधोरेखित केले. “हे कार्य कठीण आहे पण ते देशासाठी अत्यावश्यक आहे,” असे ते म्हणाले.

पहिल्यांदाच खासदार झालेल्यांबद्दल आणि युवा खासदारांबद्दल काळजी व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले की, पक्षाच्या सीमा ओलांडून अनेकांना असे वाटते की त्यांना त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा राष्ट्रीय विकास विषयक चर्चांमध्ये योगदान देण्यासाठी पुरेशा संधी मिळत नाहीत. अशा खासदारांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल याची सुनिश्चिती करून घेण्याची विनंती त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केली. “हे सदन, आणि देश यांना नव्या पिढीचे विचार तसेच उर्जा यांचा लाभ व्हायला हवा,” ते म्हणाले.
संसद हे नाट्यमय घटना किंवा घोषणाबाजीचे ठिकाण नसून धोरणे आणि अंमलबजावणीचे स्थान आहे यावर देखील पंतप्रधानांनी अधिक भर दिला. “नाट्यप्रयोग किंवा घोषणांसाठी इतर जागांची टंचाई नाही. संसदेत आपण धोरणांवर आपले कश केंद्रित केले पाहिजे आणि आपला हेतू स्पष्ट असला पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी या सत्राचे वैशिष्ट्य अधोरेखित करत सांगितले की या सत्रापासून आपल्या राज्यसभेला नव्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाचा लाभ होणार आहे. नव्या अध्यक्षांना शुभेच्छा देत, त्यांच्या नेतृत्वाखाली संसदेचे कामकाज अधिक सशक्त होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

जीएसटी सुधारणांना नव्या युगाच्या सुधारणांचे स्थान देत पंतप्रधानांनी सांगितले की या सुधारणांमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे मजबूत वातावरण निर्माण झाले आहे. ते म्हणाले की, हे हिवाळी सत्र, या दिशेने अनेक महत्त्वाचे उपक्रम पुढे नेण्यासाठी सज्ज आहे.
संसदेत अलीकडे दिसून आलेल्या काही पद्धतींबाबत चिंता व्यक्त करून मोदी म्हणाले की अलीकडच्या काळात संसदेचा वापर निवडणुकांसाठीची तयारी करण्याचे स्थान किंवा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर निराशा व्यक्त करण्याचे ठिकाण म्हणून करण्यात येतो आहे. या लोकांनी त्यांचे दृष्टीकोन आणि नीती बदलण्याची गरज आहे. आणखी चांगली कामगिरी कशी पार पाडावी यासाठी सूचना द्यायची माझी तयारी आहे,” मोदी पुढे म्हणाले.
“या सर्व जबाबदाऱ्या लक्षात घेऊन आपण पुढे वाटचाल करू अशी मला आशा आहे. आणि मी देशवासियांना खात्री देतो की देशाने प्रगतीपथावर प्रवास सुरु केला आहे,” मोदी पुनरुच्चार करत म्हणाले. प्रगतीकडे वाटचाल करण्याच्या देशाच्या निश्चयाची पुष्टी करत ते म्हणाले, “देश नव्या उंचीच्या दिशेने झेप घेत आहे आणि हे सदन या प्रवासाला नवी उर्जा आणि सामर्थ्य देण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल.”
संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा
No matter which party it is, we should ensure that the new generation of MPs and first-time parliamentarians are given meaningful opportunities: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 1, 2025
India has proven that democracy can deliver: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 1, 2025
This Winter Session will infuse new energy into our efforts to take the nation forward at an even faster pace: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 1, 2025


