महामहीम, अध्यक्ष प्रबोवो

दोन्ही देशांचे प्रतिनिधी,

प्रसारमाध्यमांचे सहकारी,

नमस्कार!

सलामत सियांग!

सर्वप्रथम अतिशय जिव्हाळ्याने केलेल्या या स्वागताबद्दल मी माझे मित्र अध्यक्ष प्रबोवो यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

गेल्या वर्षी भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी म्हणून त्यांचे स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळाली. आणि आज, त्यांच्या आपुलकीने दिलेल्या निमंत्रणावरून इंडोनेशियाचा दौरा करताना मला अत्यंत आनंद होत आहे.

आज सकाळी मला अत्यंत स्नेहभावनेने आणि आदराने इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान कोट्यवधी भारतीयांचा आहे, इंडोनेशियातील जनतेच्या भावनांचा आहे, तसेच भारत आणि इंडोनेशियाच्या ऐतिहासिक आणि घनिष्ठ संबंधांचा आहे. मी अध्यक्ष प्रबोवोजी, इंडोनेशिया सरकार आणि येथील जनतेचे मनापासून आभार मानतो.

 

मित्रांनो,

गेल्या काही वर्षांत भारत आणि इंडोनेशियाच्या संबंधांमध्ये एक नवीन ऊर्जा, एक नवीन विश्वास निर्माण झाला आहे आणि हे संबंध अधिक सखोल झाले आहेत.

2018 मध्ये निर्माण झालेली आमची 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी'  आज एक नवीन झेप घेत आहे. आम्ही विकास, सुरक्षा, तंत्रज्ञान, संस्कृती आणि शिक्षण अशा प्रत्येक क्षेत्रात महत्त्वपूर्ण पावले टाकत आहोत.

मला पूर्ण विश्वास आहे की, आजपासून भारत-इंडोनेशिया भागीदारीचा एक सुवर्ण अध्याय सुरू होईल. आणि या सुवर्ण अध्यायाचा अत्यंत मोठा सकारात्मक प्रभाव 21व्या शतकातील जगावर आणि संपूर्ण मानवतेवर पडेल.

मित्रांनो,

आपल्या देशांमधील वाढता विश्वास आपले संरक्षण, सुरक्षा आणि सागरी सहकार्य यांना अधिक बळकट करत आहे. आज आम्ही संरक्षण देवाणघेवाण, आपत्ती व्यवस्थापन आणि औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली आहे.

आता दोन्ही देशांची तटरक्षक दले हिंदी महासागरात सागरी सुरक्षा आणि संरक्षणासाठी एकत्र येऊन काम करतील. दोन जवळचे सागरी देश या नात्याने, आम्ही 'नील अर्थव्यवस्था', बंदरांचा विकास आणि सागरी व्यापारातही परस्परांमधील सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मित्रांनो,

भारत आणि इंडोनेशियासाठी गरिबीवर मात करणे आणि आपल्या नागरिकांपर्यंत कल्याणकारी योजनांचे लाभ पोहोचवणे ही सर्वोच्च प्राधान्यक्रमाची बाब आहे. आम्ही इंडोनेशियासोबत आमच्या 'मध्यान्ह भोजन' योजनेचे आणि 'सार्वजनिक वितरण प्रणाली' विषयीचे मार्गदर्शन सामायिक केले आहे. आता आपण हे सहकार्य पुढच्या टप्प्यावर घेऊन जात आहोत.

आमचे आरोग्य क्षेत्रातील सहकार्य दोन्ही देशांमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल. आज झालेल्या करारामुळे भारताची उच्च दर्जाची आणि परवडणारी औषधे इंडोनेशियातील नागरिकांना अधिक सहजतेने उपलब्ध होतील.

आम्ही इंडोनेशियातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणीतही योगदान देऊ. भारतात विकसित केलेल्या गव्हाच्या बियाण्यांच्या पुरवठ्यामुळे इंडोनेशियाची अन्न सुरक्षा अधिक मजबूत होईल. आम्ही एकमेकांसोबत शाश्वत शेती आणि कृषी-तंत्रज्ञानातील सर्वोत्तम पद्धतीही सामायिक करू.

 

मित्रहो,

एकविसावे शतक हे तंत्रज्ञानावर चालणारे शतक आहे. भारत आणि इंडोनेशिया हे दोन्ही देश युवा ऊर्जेने परिपूर्ण आहेत. आपल्या तरुणांचा तंत्रज्ञानाकडे नैसर्गिक कल आहे.

एआय, दूरसंचार आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांमध्ये आपल्या तरुणांमधील तंत्रज्ञान सहकार्य वाढवण्यासाठी आज आम्ही एका महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी केली. तसेच, दोन्ही देशांमधील स्टार्ट-अप सहकार्य आणखी दृढ करण्यावरही आम्ही सहमती दर्शवली.

इंडोनेशियामध्ये आयआयएम बंगळुरू या भारताच्या प्रतिष्ठित व्यवस्थापन संस्थेचे कॅम्पस आम्ही सुरू करणार आहोत. संपूर्ण आसियान क्षेत्रातील युवकांना याचा मोठा लाभ मिळेल.

अंतराळ क्षेत्रातही आमचे अनेक दशकांचे विश्वासार्ह सहकार्य आहे. हे सहकार्य पुढे नेत, आज अंतराळ क्षेत्रातील संयुक्त संशोधन, तंत्रज्ञान देवाणघेवाण आणि क्षमता विकास या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मित्रहो,

आजच्या युगात, तंत्रज्ञानाची "पुरवठा साखळी लवचिकता" अत्यंत महत्त्वाची आहे. महत्त्वपूर्ण खनिजे आणि पोलाद या क्षेत्रांमधील पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे करारही झाले. तसेच, आमच्या कंपन्यांमध्ये स्टेनलेस स्टील आणि रेअर अर्थ मॅग्नेट्स क्षेत्रात एक नवीन भागीदारी सुरू होत आहे.

मित्रहो,

दोन्ही देशांच्या नागरिकांमधील संबंध ही आमच्यातील संबंधांची सर्वात मोठी ताकद आहे. भारताचे युपीआय इंडोनेशियाच्या पेमेंट प्रणालीशी जोडले जाणार आहे, याचा आम्हाला आनंद आहे. यामुळे व्यवसाय सुलभता आणि प्रवासातील सुलभता या दोन्हीला बळकटी मिळेल.

मित्रहो,

उद्या, राष्ट्रपती प्रबोवो यांच्यासमवेत, मला योग्याकार्ता येथील प्रंबनन मंदिराच्या संवर्धन प्रकल्पाचा शुभारंभ करण्याचा बहुमान मिळेल. एक हजार वर्षांहून अधिक जुने असलेले प्रंबनन मंदिर, भारत आणि इंडोनेशियाच्या सामायिक सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे.

 

दोन्ही देश गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या इंडोनेशियाच्या ऐतिहासिक भेटीची शताब्दी मोठ्या उत्साहात साजरी करतील. महान शिक्षणतज्ज्ञ आणि इंडोनेशियाचे पहिले शिक्षणमंत्री, देवंतरा यांनी इंडोनेशियाच्या विकास प्रवासात महत्वाचे योगदान दिले. शिक्षणाविषयीचे त्यांचे विचार गुरुदेव टागोर यांच्या विचारांनी प्रेरित होते. त्यामुळे, भारत आणि इंडोनेशिया, हे शताब्दी वर्ष 'टागोर आणि देवंतरा सांस्कृतिक आणि शैक्षणिक मुत्सद्देगिरी’ वर्ष म्हणून साजरे करतील.

मित्रहो,

लोकशाही मूल्ये आणि विविधतेतील एकता ही भारत आणि इंडोनेशियाची समान ताकद आहे. दोन्ही देशांच्या निवडणूक आयोगांमधील सामंजस्य कराराद्वारे आम्ही लोकशाही सहकार्य आणखी मजबूत करणार आहोत.

मित्रहो,

जागतिक मुद्द्यांवर भारत आणि इंडोनेशियाचे सहकार्यही सातत्याने वाढत आहे. हिंद-प्रशांत क्षेत्राबाबतच्या आमच्या दृष्टिकोनातही समन्वय आहे. भारताने 'आसियानच्या केंद्रीय भूमिकेला' नेहमीच विशेष महत्त्व दिले आहे.

सध्याच्या जागतिक अशांततेच्या काळात, संवाद आणि राजनैतिक संबंधांची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे, असे भारताला वाटते. पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर, आम्ही द्वि-राज्य तोडगा आणि दीर्घकालीन शांततेचे समर्थन करतो.

मित्रहो,

आमच्या दोन्ही देशांसमोर एक सोनेरी युग दाखल होत आहे.

आमचा इतिहास सामायिक संस्कृतीचा आहे,

आमचे वर्तमान सामायिक विश्वासाचे आहे,

आणि आमचे भविष्य सामायिक समृद्धीचे आहे.

मला विश्वास आहे की, आम्ही एकत्र येऊन इंडोनेशिया "AMAS" आणि विकसित भारताचा संकल्प साकार करू.

धन्यवाद!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
New Smart Drug RK-251 Developed as Replacement for Chemotherapy

Media Coverage

New Smart Drug RK-251 Developed as Replacement for Chemotherapy
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 ऑगस्ट 2026
August 21, 2026

Ease of Living Meets Strategic Strength: How India Is Building the Future in Real Time Under the Leadership of PM Modi