पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गँगटोक येथे आयोजित ‘सिक्कीम@50’ कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. ‘उद्देशासह प्रगती आणि निसर्गातून वृद्धीची जोपासना’ ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी सिक्कीम राज्यस्थापनेच्या 50 व्या वर्धापनदिनाच्या विशेष प्रसंगी सिक्कीमच्या जनतेला अभिवादन केले. ते म्हणाले की त्यांना स्वतःला या प्रसंगी उपस्थित राहून सिक्कीमच्या जनतेचा उत्साह, उर्जा आणि उत्सुकता अनुभवायची होती मात्र प्रतिकूल हवामानामुळे ते तेथे हजार राहू शकले नाहीत. नजीकच्या भविष्यात सिक्कीमला भेट देण्याचे आणि तेथील लोकांची यशस्वी कामगिरी तसेच सोहळे यांचा भाग होण्याचे वचन त्यांनी तेथील जनतेला दिले. आजचा दिवस सिक्कीममधील लोकांनी गेल्या 50 वर्षात केलेल्या सफल कामगिरीचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे असे सांगून त्यांनी हा भव्य सोहोळा संस्मरणीय पद्धतीने आयोजित केल्याबद्दल सिक्कीमचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. सिक्कीम राज्यस्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन सोहोळ्याच्या प्रसंगी त्यांनी पुन्हा एकदा तेथील जनतेचे अभिनंदन केले.
“50 वर्षांपूर्वी, सिक्कीमने स्वतःसाठी लोकशाही भविष्य आरेखित केले. सिक्कीममधील जनता भारताच्या भूगोलाशीच नव्हे तर आत्म्याशी देखील जोडली गेली,” मोदी म्हणाले. त्यावेळी की तेथील प्रत्येकाचे मत विचारात घेतले जाईल आणि प्रत्येकाचे हक्क अबाधित राहतील तसेच प्रत्येकासाठी विकासाच्या समान संधी निर्माण होतील असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. ते म्हणाले की आज, सिक्कीममधील प्रत्येक कुटुंबाचा सरकारवरील विश्वास अधिक बळकट झाला आहे.सिक्कीमच्या उल्लेखनीय प्रगतीच्या रुपात देशाने या विश्वासाचा परिणाम बघितला आहे हे सांगण्यावर त्यांनी अधिक भर दिला. गेल्या 50 वर्षांमध्ये हे राज्य निसर्गाच्या सोबतीने प्रगती करण्याचा आदर्श नमुना बनले आहे याचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले, “सिक्कीम हा देशाचा अभिमान आहे.” हा भाग जैवविविधतेच्या विस्तीर्ण अभयारण्यात परिवर्तीत झाला असून या राज्याने 100% सेंद्रिय राज्याची स्थिती प्राप्त केली आहे आणि आता हे राज्य सांस्कृतिक तसेच वारशाचे प्रतीक म्हणून उदयाला आला आहे. सिक्कीमने आज देशभरात सर्वाधिक दरडोई उत्पन्न असणाऱ्या राज्यांमध्ये स्थान मिळवले आहे हे त्यांनी अधोरेखित केले. या यशस्वी कामगिऱ्या म्हणजे सिक्कीमच्या जनतेच्या क्षमतांचा पुरावाच आहेत.गेल्या पाच दशकांमध्ये देशाच्या क्षितिजावर झळकणारे अनेक तारे सिक्कीममधून उदयाला आले आहेत हे मोदी यांनी मान्य केले. सिक्कीममधील प्रत्येक समुदायाने राज्याची संस्कृती तसेच समृद्धता यांच्याप्रती दिलेल्या योगदानाची त्यांनी दखल घेतली.

वर्ष 2014 पासून आपल्या सरकारने ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणजेच सर्वांच्या सोबतीने सर्वांचा विकास’ ते तत्व अंगिकारले आहे हे आवर्जून नमूद करत पंतप्रधानांनी ठळकपणे सांगितले की विकसित भारतासाठी समतोल विकास आवश्यक असून देशातील इतर प्रदेश प्रगती करत असताना त्यांच्या तुलनेत कोणताही भाग मागे पडणार नाही याची सुनिश्चिती करून घेणे आवश्यक आहे. “भारतातील प्रत्येक राज्य आणि प्रत्येक भागाची स्वतःची अशी अनोखी ताकद आहे ही संकल्पना ध्यानात घेऊन सरकारने गेल्या दशकात ईशान्य प्रदेशाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे,” पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकार ‘ऍक्ट फास्ट’च्या उर्जेसह ‘ऍक्ट ईस्ट’चे धोरण पुढे नेत आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ईशान्य गुंतवणूक शिखर परिषदेचे स्मरण करत पंतप्रधान मोदी म्हणाले की या कार्यक्रमात आघाडीचे उद्योजक आणि प्रमुख गुंतवणूकदारांनी या कार्यक्रमात भाग घेऊन सिक्कीमसह संपूर्ण ईशान्य भागात लक्षणीय गुंतवणूक जाहीर केली. ते म्हणाले की यातून येत्या काही वर्षांत सिक्कीम तसेच ईशान्य भागामधील युवकांसाठी प्रचंड रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.
सिक्कीमच्या विकासाशी संबंधित विविध प्रकल्पांचे आज उद्घाटन झाले असून पायाभरणी देखील झाली आहे हे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले, “आजच्या कार्यक्रमातून सिक्कीमच्या भविष्यकालीन वाटचालीची झलक दिसून येते.” सदर प्रकल्पांमुळे या भागातील आरोग्य, पर्यटन, सांस्कृतिक तसेच क्रीडाविषयक सुविधांमध्ये वाढ होणार आहे हे त्यांनी ठळकपणे नमूद केले. या प्रकल्पांच्या यशस्वी उद्घाटनाबद्दल पंतप्रधानांनी प्रत्येकाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
“सिक्कीम आणि संपूर्ण ईशान्य प्रदेश भारताच्या प्रगतीमधील एक झळाळता अध्याय म्हणून उदयाला येत आहे,” पंतप्रधान मोदी उद्गारले. या भागाचे दिल्लीपासून अंतर एकेकाळी प्रगतीमधील अडथळा ठरत होते, मात्र आता याच भागात संधींची नवी कवाडे खुली होत आहेत असे ते म्हणाले. संपर्कातील सुधारणा हे या भागाच्या कायापालटाचे सर्वात मोठे कारण असून सिक्कीमची जनता प्रथमच या बदलाची साक्षीदार होत आहे हे त्यांनी ठळकपणे सांगितले. या भागात जेव्हा शिक्षण, वैद्यकीय उपचार आणि रोजगारासाठी प्रवास करणे हे मोठे आव्हान होते असे त्या काळाची आठवण काढत पंतप्रधान म्हणाले. मात्र, गेल्या दशकात तेथील परिस्थिती लक्षणीयरित्या बदलली आहे याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. या काळात सिक्कीममध्ये सुमारे 400 किमी लांबीचे नवे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले असून त्या भागातील गावांमध्ये शेकडो किलोमीटर्सचे नवे रस्ते तयार करण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. अटल सेतूच्या उभारणीमुळे सिक्कीमचा दार्जिलिंगशी असलेला संपर्क अधिक सुधारला आहे असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की सिक्कीम आणि कॅलीम्पोंग यांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम वेगाने सुरु आहे. ते पुढे म्हणाले की बागडोगरा-गँगटोक द्रुतगती महामार्गामुळे सिक्कीमच्या दिशेने आणि परतीच्या मार्गाने होणारा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. पुढील काळाचा विचार करून या भागातील पायाभूत सुविधा आणखी मजबूत करत हा द्रुतगती महामार्ग गोरखपूर-सिलीगुडी द्रुतगती महामार्गाशी जोडण्याची योजना नियोजित आहे अशी घोषणा त्यांनी केली.

ईशान्य प्रदेशातील सर्व राज्यांच्या राजधानीची शहरे एकमेकांशी रेल्वे मार्गांनी जोडण्याच्या प्रयत्नांवर अधिक भर देत सेवोक-रांगपो रेल्वे मार्ग सिक्कीमला राष्ट्रीय रेल्वेच्या जाळ्यात समाविष्ट करून घेईल ही बाब पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केली.ज्या भागात रस्ते बांधणे अशक्य आहे अशा ठिकाणी पर्याय म्हणून रोपवे बांधण्यात येत आहेत असे त्यांनी सांगितले. सिक्कीमच्या लोकांच्या सोयीत सुधारणा करत, आज अनेक रोपवेंचे आधीच उद्घाटन करण्यात आले आहे असे देखील त्यांनी नमूद केले. गेल्या दशकात भारताने अनेक नवे निर्धार पूर्ण केले असून आरोग्यसुविधेत सुधारणा करण्याला मुख्य प्राधान्य देण्यात आले असे ते म्हणाले. गेल्या 10-11 वर्षांत प्रत्येक राज्यात मोठी रुग्णालये उभारण्यात आले आली आहेत असे सांगून त्यांनी देशभरातील एम्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला आहे हे अधोरेखित केले. सर्वात वंचित कुटुंबांसाठी देखील दर्जेदार आरोग्यसुविधा मिळण्याची खात्री होण्यासाठी 500 खाटांचे रुग्णालय सिक्कीमच्या जनतेला अर्पण करत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
सरकार रुग्णालये उभारण्यावर लक्ष केंद्रित करतानाच किफायतशीर दरातील दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याची देखील सुनिश्चिती करून घेत आहे असे मोदी म्हणाले. आयुष्मान भारत योजनेतून सिक्कीममधील 25,000 हून अधिक कुटुंबांना मोफत वैद्यकीय उपचारांचा लाभ मिळाला आहे हे त्यांनी अधोरेखित केले.देशभरातील 70 वर्षांहून अधिक वयाचे सर्व ज्येष्ठ नागरिक आता 5 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाचे वैद्यकीय उपचार मोफत मिळण्यास पात्र आहेत अशी घोषणा त्यांनी केली.सिक्कीममधील कुटुंबांना आता त्यांच्या वयोवृद्ध सदस्यांच्या वैद्यकीय उपचारांची चिंता करण्याची गरज नाही कारण त्यांच्या उपचारांची काळजी सरकार घेईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
“विकसित भारताचा पाया, गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण यांचे सक्षमीकरण अशा चार सशक्त स्तंभांवर रचलेला आहे,” असे सांगून पंतप्रधान म्हणाले की देश या चार स्तंभांना सातत्याने मजबूत करत आहे. भारताच्या कृषीविषयक प्रगतीमध्ये सिक्कीमच्या शेतकऱ्यांच्या लक्षणीय योगदानाची दखल घेत पंतप्रधानांनी तेथील शेतकऱ्यांची प्रशंसा केली. सिक्कीममधील सेंद्रिय उत्पादनाची निर्यात वाढत आहे यावर अधिक भर देत पंतप्रधान म्हणाले, “कृषी विकासाच्या नव्या लाटेत सिक्कीम आघाडीवर आहे.”
अलीकडेच, सिक्कीममधील प्रसिद्ध डल्ले खुरसानी मिरची पहिल्यांदाच निर्यात करण्यात आली आणि मार्च 2025 मध्ये पहिले वाण परदेशात पाठवण्यात आली असून येत्या काळात, सिक्कीममधील अनेक उत्पादने जागतिक स्तरावर निर्यात केली जातील असे मोदी यांनी नमूद केले. या प्रयत्नांना सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारसोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहे, असे त्यांनी सांगितले.

सोरेंग जिल्ह्यात देशातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन केंद्र स्थापन करत असल्याची घोषणा करत सिक्कीमच्या सेंद्रिय शेतीला अधिक समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक पाऊल उचलले आहे. या उपक्रमामुळे सिक्कीमला राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर एक नवीन ओळख मिळेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. औंध सेंद्रिय शेतीसोबतच,सिक्कीम आता सेंद्रिय मासेमारीसाठी देखील ओळखले जाईल यावर पंतप्रधानांनी भर दिला. सेंद्रिय मासे आणि मत्स्य उत्पादनांना जागतिक स्तरावर मोठी मागणी आहे, या विकासामुळे सिक्कीमच्या तरुणांसाठी मत्स्यव्यवसाय क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील, असे त्यांनी नमूद केले.
प्रत्येक राज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळेल असे पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या गरजेवर लक्ष द्यावे असे, दिल्लीत अलिकडेच झालेल्या नीती आयोगाच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत संमत झाले असल्याचे नमूद करून,मोदी यांनी सिक्कीमला केवळ एक थंड हवेचे ठिकाण असण्यापलीकडे विकसित होण्याची आणि जागतिक पर्यटन स्थळ म्हणून स्वतःला ओळख निर्माण करण्याची वेळ आली आहे यावर त्यांनी जोर दिला. "सिक्कीमची क्षमता अतुलनीय आहे,जी संपूर्ण पर्यटनचा सुखदायक अनुभव देते", असे सांगून त्यांनी सिक्कीम हे नैसर्गिक सौंदर्य आणि अध्यात्म तसेच तलाव, धबधबे, पर्वत आणि शांत बौद्ध मठांचे माहेरघर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेले कांचनजुंगा राष्ट्रीय उद्यान हे केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला अभिमानाने वाटणारे वारसा स्थळ आहे,असे मोदी यांनी निदर्शनास आणून दिले.आज येथे एक नवीन स्कायवॉक बांधला जात आहे आणि सुवर्ण महोत्सवी प्रकल्पाचे उद्घाटन केले जात आहे तसेच अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जात आहे, हे सर्व प्रकल्प सिक्कीमच्या प्रगतीच्या नवीन उंचीचे प्रतीक आहेत,असे पंतप्रधान पुढे म्हणाले
"सिक्कीममध्ये साहसी आणि क्रीडा पर्यटनासाठी देखील प्रचंड क्षमता आहे", असे सांगून पंतप्रधानांनी सांगितले की,पर्वतारोहण,माउंटन बाइकिंग आणि डोंगर चढाईचे प्रशिक्षण यासारख्या उपक्रमांची भरभराट या प्रदेशात होऊ शकते. त्यांनी सांगितले यामुळे सिक्कीमला बैठकींच्या आयोजनासह पर्यटन, आरोग्यदायी पर्यटन आणि संगीत महोत्सवांसह पर्यटनासाठी केंद्र म्हणून स्थापन करणे, हे आमचे ध्येय आहे. सुवर्ण महोत्सवी कन्व्हेन्शन सेंटर हा भविष्यातील या तयारीचा एक महत्त्वाचा भाग आहे असे नमूद करून, पंतप्रधानांनी गंगटोकच्या निसर्गरम्य परिसरात जागतिक स्तरावरील प्रसिद्ध कलाकारांनी सादरीकरण करावे अशी आकांक्षा व्यक्त केली आणि सिक्कीम निसर्ग आणि संस्कृतीच्या सुसंवादाचे परिपूर्ण प्रतीक आहे या संकल्पनेवर सहमती दर्शविली.
ईशान्येकडे G-20 शिखर परिषदेचे आयोजन करणे हे या प्रदेशाची क्षमता जगासमोर मांडण्याच्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे हे अधोरेखित करून, सिक्कीम सरकार हे स्वप्न जलदगतीने प्रत्यक्षात आणत आहे याबद्दल श्री. मोदी यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले, की भारत आता एक प्रमुख जागतिक आर्थिक शक्ती आहे आणि क्रीडा महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे. हे स्वप्न साकार करण्यात ईशान्येकडील, विशेषतः सिक्कीममधील तरुणांची भूमिका महत्त्वाची असेल यावर त्यांनी भर दिला. मोदींनी सिक्कीमच्या समृद्ध क्रीडा वारशाची प्रशंसा केली, फुटबॉलचे दिग्गज खेळाडू भाईचुंग भुतिया, ऑलिंपियन तरुणदीप राय आणि धावपटू जसलाल प्रधान यांसारख्या व्यक्तींचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. सिक्कीममधील प्रत्येक गाव आणि शहर एक नवा विजेता निर्माण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला."खेळ हे केवळ सहभागापुरते मर्यादित नसावेत तर दृढनिश्चयाने जिंकण्याची जिद्द धरून खेळले गेले पाहिजेत",असे सांगून श्री मोदी म्हणाले की, गंगटोकमधील नवीन क्रीडा संकुल भविष्यातील विजेत्यांसाठी प्रशिक्षण केंद्र बनेल. खेलो इंडिया योजनेअंतर्गत, सिक्कीमवर विशेष लक्ष दिले जात आहे यावर त्यांनी भर दिला. प्रतिभावंत खेळाडूंचा शोध आणि ओळख, प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि स्पर्धांना प्रत्येक स्तरावर पाठिंबा दिला जात आहे. सिक्कीमच्या तरुणांची ऊर्जा आणि आवड भारताला ऑलिंपिक गौरवाकडे नेईल अशी मनीषा त्यांनी व्यक्त केली.

"सिक्कीमच्या लोकांना पर्यटनाची ताकद समजलेली आहे आणि पर्यटन हे केवळ मनोरंजन नाही तर तो विविधतेचा रमणीय उत्सव आहे", असे पंतप्रधानांनी सांगितले. पहलगाममधील हल्ला हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता तर मानवतेवर आणि बंधुत्वाच्या भावनेवर हल्ला होता हे अधोरेखित करून दहशतवाद्यांनी केवळ अनेक कुटुंबांचे आनंद हिरावले नाहीत तर भारतातील लोकांना विभाजित करण्याचा प्रयत्न केला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. "आज जग भारताच्या अभूतपूर्व एकतेचे साक्षीदार आहे आणि दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना स्पष्ट इशारा देण्यासाठी देश एकत्र आला आहे," असे मोदी यांनी घोषित केले. त्यांनी सांगितले की त्यांनी भारतीय मुलींच्या कपाळावरील कुंकू (सिंदूर) पुसून वेदना दिल्या, परंतु भारताने गुन्हेगारांविरुद्ध ऑपरेशन सिंदूर आयोजित करून त्याचे तडफदारपणे प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय नागरिक आणि सैनिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला परंतु या प्रक्रियेत ते उघडे पडले.भारताने पाकिस्तानचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त करून देशाच्या धोरणात्मक क्षमतांचे प्रदर्शन केले,यावर मोदींनी भर दिला.
सिक्कीमचा राज्य म्हणून गेल्या 50 वर्षांचा टप्पा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि त्याच्या विकासाचा प्रवास आता अधिक वेगवान होईल", असे मोदी म्हणाले. 2047 हे भारताच्या स्वातंत्र्याची 100 वर्षे आणि सिक्कीम राज्याची 75 वर्षे पूर्ण होतील हे अधोरेखित करत, या टप्प्यावर सिक्कीम कसा असावा यासाठी ध्येयनिश्चिती करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. सिक्कीमच्या भविष्यासाठी एक आराखडा कल्पना, नियोजन करून त्याचे वेळोवेळी पुनरावलोकन करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन करत, श्री. मोदी यांनी सिक्कीमच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या आणि त्याला 'कल्याणकारी राज्य' बनवण्याच्या महत्त्वावर भर दिला. तरुणांसाठी अधिक संधी निर्माण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे असे त्यांनी नमूद केले. "सिक्कीमची तरुण पिढी केवळ स्थानिक गरजांसाठीच नव्हे तर जागतिक मागण्या पूर्ण करण्यासाठी देखील तयार असली पाहिजे", असे आवाहन श्री. मोदी यांनी केले. जगभरातील युवावर्गाला उपयुक्त अशा जास्त मागणी असलेल्या क्षेत्रांमध्ये नवीन कौशल्य विकास संधी निर्माण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
पुढील 25 वर्षांत सिक्कीमला विकास, वारसा आणि जागतिक मान्यता यांच्या सर्वोच्च शिखरावर नेण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रतिज्ञा करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. "आमचे स्वप्न आहे की सिक्कीम हे केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक हरित प्रारुप दाखवून देणारे आदर्श राज्य बनले पाहिजे", असे सांगत पंतप्रधानांनी सिक्कीमच्या प्रत्येक नागरिकासाठी सुरक्षित घर सुनिश्चित करण्याच्या ध्येयावर भर दिला. प्रत्येक घरात सौरऊर्जेवर चालणारी वीज पोहोचवण्याचे स्वप्न त्यांनी अधोरेखित केले. "सिक्कीमने कृषी-स्टार्टअप्स आणि पर्यटन स्टार्टअप्समध्ये आघाडीचे स्थान मिळवावे आणि सेंद्रिय अन्न निर्यातीत जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करावी", असे स्वप्न आम्ही पहात आहोत,असे मोदी यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की सिक्कीम हे असे राज्य असले पाहिजे जिथे प्रत्येक नागरिक डिजिटल व्यवहार स्वीकारेल आणि जिथे कचरा ते संपत्ती असे उपक्रम नवीन उंची गाठतील."पुढील 25 वर्षे ही महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर सिक्कीमचे अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी समर्पित आहेत", असे सांगताना मोदी यांनी सर्वांना याच भावनेने पुढे जाण्याचे आणि त्यांच्या समृद्ध वारशाची उभारणी सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर,सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
सिक्कीम राज्याच्या गौरवशाली सुवर्ण महोत्सवी वर्षांचे औचित्य साधत, पंतप्रधानांनी सिक्कीम @50: जिथे प्रगतीचा उद्देश पूर्ण होतो आणि निसर्ग विकासाला पोषक असतो या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी भाग झाले होते. सिक्कीम सरकारने "सुनौलो, समृद्ध आणि समर्थ सिक्कीम" या संकल्पनेअंतर्गत वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमांची एक मालिका आखली आहे, जी सिक्कीमच्या सांस्कृतिक समृद्धतेचे, परंपरांचे, नैसर्गिक वैभवाचे आणि त्याच्या इतिहासाचे सार साजरे करते.
पंतप्रधानांनी सिक्कीममध्ये अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन देखील केले.या प्रकल्पांमध्ये नामची जिल्ह्यात 750 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमत खर्च करून बांधलेले 500 खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय समाविष्ट आहे;ग्यालशिंग जिल्ह्यातील पेलिंग येथील सांगचोलिंग येथे प्रवासी रोपवे; गंगटोक जिल्ह्यातील सांगखोला येथील अटल अमृत उद्यानातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा यांचा समावेश आहे.
पंतप्रधानांनी राज्याच्या 50 वर्षांच्या स्मृतिचिन्हाचे, स्मरणिकेचे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशनही यावेळी केले.
संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Sikkim is the pride of the country: PM @narendramodi pic.twitter.com/qiybL5ugiQ
— PMO India (@PMOIndia) May 29, 2025
Over the past decade, our government has placed the Northeast at the core of India's development journey.
— PMO India (@PMOIndia) May 29, 2025
We are advancing the 'Act East' policy with the spirit of 'Act Fast': PM @narendramodi pic.twitter.com/ui8YZqUp27
Sikkim and the entire Northeast are emerging as a shining chapter in India's progress. pic.twitter.com/gPngdyYzPS
— PMO India (@PMOIndia) May 29, 2025
We endeavour to make Sikkim a global tourism destination. pic.twitter.com/k8gUCUZFVe
— PMO India (@PMOIndia) May 29, 2025
In the coming years, India is poised to emerge as a global sports superpower. The Yuva Shakti of the Northeast and Sikkim will play a pivotal role in realising this dream. pic.twitter.com/10MVtVFNp0
— PMO India (@PMOIndia) May 29, 2025


