पहिल्यांदा रोजगार मिळवण्याऱ्या कर्मचाऱ्यांना सक्षम करणे तसेच युवा आणि उद्योजक यांच्यात एक सेतू निर्माण करणे हा पीएम विकसित भारत योजनेचा उद्देश आहे- पंतप्रधान
आपल्या युवकांच्या आकांक्षा, कौशल्ये आणि क्षमता, यातून विकसित भारताच्या मार्गाला आकार मिळणार आहे- पंतप्रधान
भारताचा युवा, जागतिक विकास, नवोन्मेष आणि उद्यमशीलतेला चालना देण्यात आघाडीवर असेल: पंतप्रधान
भारत समोर येऊन नेतृत्व करण्यासाठी सज्ज- पंतप्रधान
एकविसाव्या शतकात, जे देश, कौशल्य आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देतील, नवोन्मेषाला पोषक वातावरण निर्मिती करतील आणि गुणवत्तेच्या सर्वोच्च निकषांचे पालन करतील, त्यांच्यासाठीच संधी उपलब्ध असतील – पंतप्रधान
जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी,आपल्याला गुणवत्तेच्या सर्वोच्च मानकांचे पालन करावेच लागेल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी आज प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचे  संबंधित लाभार्थी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध भागधारकांशी संवाद साधत,  भारतातील युवकांना सक्षम बनवणे आणि देशभरात रोजगारनिर्मितीला अधिक चालना देण्यासाठीची सरकारची कटिबद्धता अधोरेखित केली. यावेळी पंतप्रधानांनी, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत, 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचे वितरण केले. केंद्र सरकारच्या रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजना या पथदर्शी अशा प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अंमलबजावणीतला हा एक महत्वाचा टप्पा ठरला असून विविध क्षेत्रात, समाजिक सुरक्षेची व्याप्तीही यामुळे वाढली आहे.  या प्रोत्साहनपर निधीमुळे, देशभरात 15 लाख रोजगारनिर्मिती झाली आहे.

जी-7 परिषदेत सहभागी होऊन तसेच, विविध जागतिक नेत्यांसोबत बैठका घेऊन, आपल्या फ्रांस आणि स्लोवाकियाच्या दौऱ्याहून परत आल्यावर लगेचच झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधानांनी मार्गदर्शन केले. या दौऱ्यातल्या आपल्या अनुभवांबद्दल सांगताना ते म्हणाले की, भारतीय युवकांना, त्यांची कौशल्ये, गुणवत्ता आणि त्यांच्यातल्या क्षमता या बळावर, जगभरात आज अभूतपूर्व अशी ओळख मिळाली आहे. जग आज भारतीय युवकांच्या क्षमता ओळखत असल्याचे अधोरेखित करत, देशांतील प्रत्येक युवकाला त्यांच्या क्षमतांचे यशात रूपांतर करण्याची संधी देण्यास, सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची व्याप्ती एखाद्या रोजगार योजनेपेक्षा खूप अधिक आहे. या योजनेची रचना आपल्या जीवनातील पहिल्या नोकरीत पदार्पण करणाऱ्या नवयुवकांच्या महत्त्वाकांक्षाना बळ देण्याच्या उद्देशाने केली असून त्याचवेळी या माध्यमातून उद्योग आणि कार्यबळ यांच्यात एक सामर्थ्यवान दुवा निर्माण केला जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले. बऱ्याच योजना या सामान्यतः एक तर कर्मचारी किंवा नियोक्ता यांपैकी एका घटकावर केंद्रित असतात; मात्र हा कार्यक्रम कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांनाही एकाच वेळी लाभ देणारा आहे. आपल्या व्यावसायिक आयुष्याच्या प्रवासाचा श्रीगणेशा करणाऱ्या युवकांच्या पाठीशी केंद्र सरकार कायम ठामपणे उभे आहे तसेच रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देत आहे, असे त्यांनी सांगितले.

या योजनेच्या यशाबद्दल सांगताना पंतप्रधान म्हणाले की आतापर्यंत सुमारे 70 लाख नवीन रोजगार निर्माण झाले आहेत तर पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तेवढ्याच कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे. सुमारे 20 लाख युवकांनी त्यांच्या पहिल्या नोकरीतले सहा महिने पूर्ण केले आहेत तर हा टप्पा गाठल्याबद्दल सुमारे  10 लाख लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर रक्कम आधीच मिळाली आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम आधीच जमा करण्यात आली आहे. या सहाय्याचे वर्णन केवळ आर्थिक मदत म्हणून न करता,  हे देशाच्या युवकांच्या कठोर परिश्रमाची दखल घेणारे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यावरील देशाच्या विश्वासाचे प्रतीक आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

या योजनेअंतर्गत रोजगार संधी निर्माण करणाऱ्या संस्था आणि उद्योगांच्या सहभागाबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. केंद्र सरकार, उद्योग आणि युवक ज्यावेळी एकाच उद्दिष्टाने प्रेरित होऊन कार्य करतात तेव्हा रोजगार निर्मितीला गती मिळते. या उपक्रमातून एका अशा नवीन भारताचे प्रतिबिंब झळकत आहे, जिथे युवकांना संधी मिळत आहेत, उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे आणि रोजगार निर्मिती हे राष्ट्राचे ध्येय बनले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

भारताचे लोकसंख्याशास्त्रीय सामर्थ्य अधोरेखित करुन पंतप्रधान म्हणाले की भारत हा जगातील तरुण देशांपैकी एक असून विकसित राष्ट्राकडे वाटचालीचा हा प्रवास मूलतः युवकांच्या आशाआकांक्षा, कौशल्य आणि क्षमतांशी निगडित आहे.  प्रत्येक भारतीय युवक त्याच्या किंवा तिच्या बुद्धिमत्तेनुसार आणि महत्वाकांक्षेनुसार प्रगती करु शकेल हे सुनिश्चित करणे ही केंद्र सरकारची वचनबद्धता असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. गेल्या बारा वर्षांमध्ये केंद्र सरकारने रोजगारनिर्मितीच्या प्रत्येक मार्गाला बळकटी देण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे, यावर त्यांनी भर दिला. पायाभूत सेवासुविधांपासून उत्पादकतेपर्यंत, डिजिटल अर्थव्यवस्था, अंतराळ तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्स पर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रयत्न करण्यात आले आहेत. तसेच मेक इन इंडिया, व्होकल फॉर लोकल, स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत पोहोचविण्याचे प्रयत्न आणि मिशन मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या उपक्रमांमुळे रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ झाली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांनी नमूद केले की, पायाभूत सुविधांमध्ये सरकारने केलेल्या ₹12 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीचा एक मजबूत पाया तयार होत आहे. त्यांनी हे देखील अधोरेखित केले की, 'प्रधानमंत्री मुद्रा योजने'अंतर्गत ₹ 33 लाख कोटींपेक्षा जास्त मिळालेल्या मदतीने लाखो तरुणांना स्वतःचे उद्योग उभे करण्यास सक्षम केले आहे. महिला सक्षमीकरणाचा  संदर्भ देत ते म्हणाले की, 10 कोटींहून अधिक महिला, स्वयंसहाय्यता गटांशी  जोडल्या गेल्या आहेत, तर 3 कोटींहून अधिक महिला 'लखपती दीदी' म्हणून उदयास आल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, 'पीएम स्वनिधी'  आणि 'पीएम विश्वकर्मा' यांसारख्या उपक्रमांनी छोटे उद्योजक, फेरीवाले आणि पारंपरिक कारागिरांच्या उपजीविकेला बळ दिले आहे.

नव्याने उदयास येणारे तंत्रज्ञान रोजगार निर्मितीच्या कशा नवीन संधी निर्माण करत आहे, याचे उदाहरण देताना पंतप्रधानांनी झपाट्याने विस्तारणाऱ्या ड्रोन क्षेत्राचा  उल्लेख केला. औषध वितरण, कृषी क्षेत्रातील विविध उपयोग, ‘स्वामित्व’ योजनेअंतर्गत जमिनींचे नकाशांकन तसेच संरक्षण क्षेत्रातील कामगिरी अशा विविध क्षेत्रांत ड्रोन तंत्रज्ञानाचा वाढता वापर होत असून, त्यामुळे भारतीय तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. डिजिटल अर्थव्यवस्थेच्या परिवर्तनकारक प्रभावाविषयी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी ‘गिग इकॉनॉमी’ (अल्पकालीन किंवा कराराधारित कामकाज व्यवस्था), प्लॅटफॉर्म-आधारित सेवा, सामग्री निर्मिती (कंटेंट क्रिएशन) आणि तंत्रज्ञानाधारित उद्योग यांचा रोजगार आणि उत्पन्नाचे महत्त्वपूर्ण स्रोत म्हणून उल्लेख केला. "एकेकाळी अकल्पनीय असलेल्या संधी आता लाखो तरुण भारतीयांसाठी शाश्वत उपजीविकेचे साधन बनल्या आहेत. हाच बदल भारताच्या गतिमान नवउद्योग परिसंस्थेतही (स्टार्टअप इकोसिस्टम) स्पष्टपणे दिसून येतो, जी सातत्याने नवोपक्रमाला प्रोत्साहन देत आहे, रोजगार निर्माण करत आहे आणि देशाच्या आर्थिक विकासात योगदान देत आहे," असे मोदी यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी गेल्या दशकात भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेच्या झालेल्या उल्लेखनीय वाढीवर प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की, एकेकाळी देशात केवळ 500 च्या आसपास स्टार्टअप्स होते, तर आज 2,00,000 पेक्षा जास्त नोंदणीकृत स्टार्टअप्स देशातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहेत. "जागतिक समुदाय भारताच्या भविष्याबाबत दिवसेंदिवस अधिक आशावादी होत आहे आणि त्यांना येथील तरुण लोकसंख्येच्या क्षमतेवर अपार विश्वास आहे," असे मोदी म्हणाले.

अलीकडेच झालेल्या त्यांच्या फ्रान्स भेटीचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी कृत्रिम बुद्धीमत्ता, अवकाश तंत्रज्ञान, हरित उर्जा आणि जैवतंत्रज्ञान यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमधील भारतीय स्टार्ट अप्स आणि जागतिक गुंतवणूकदार यांना एकत्र आणणाऱ्या ‘इंडिया इनोव्हेट्स’ या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाचे स्मरण केले. अशा कार्यक्रमांमधून भारताच्या नवोन्मेष परिसंस्थेत वाढते आंतरराष्ट्रीय स्वारस्य आणि भविष्यातील तंत्रज्ञानांना आकार देण्यात भारताची विस्तारत जाणारी भूमिका यांचे दर्शन घडते असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.

मोदी पुढे म्हणाले की भारत आता सक्रियपणे जगभरातील विविध देशांशी नवनवे व्यापारी करार करत आहे. या करारांमुळे भारतीय उद्योगांसाठी नव्या बाजारपेठा खुल्या होत आहेत तसेच भारतीय व्यावसायिकांसाठी नव्या संधी निर्माण होत आहेत याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. “संपूर्ण जग भविष्यातील अर्थव्यवस्थेसाठी सज्ज होत असताना, भारत त्याचे नेतृत्व करण्याची तयारी करत आहे. जसजसे विविध देश भविष्यातील तंत्रज्ञानांकडे वेगाने वाटचाल करत आहेत, तसतसे भारत आपल्या तरुणांना वेगाने बदलणाऱ्या जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आणि क्षमतांनी युक्त करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे,” त्यांनी ठामपणे सांगितले.

गेल्या बारा वर्षात भारताच्या रोजगार परिसंस्थेमध्ये लक्षणीय परिवर्तन घडून आले आहे याकडे देखील पंतप्रधानांनी सर्वांचे लक्ष वेधले. या बाबीकडे कमी लक्ष गेले असेल तरीही ते विकसित भारताच्या दिशेने असलेल्या प्रवासात महत्त्वाचे आहे. “सुरक्षितता, सन्मान आणि सामाजिक संरक्षणाशी रोजगाराला जोडण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेला (ईपीएफओ) आधुनिक स्वरूप देण्यासाठी, निवृत्तीवेतन योजनेचे सुलभीकरण करण्यासाठी तसेच लाखो कामगारांसाठी आरोग्य विमा आणि परवडणाऱ्या दरातील आरोग्य सेवेची उपलब्धता विस्तारण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतला जात आहे. हेच तत्वज्ञान कामगारविषयक सुधारणांना देखील लागू होते,” पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

भारताच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात महिलांचे वाढते योगदान देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “कार्यबळामध्ये महिलांचा सहभाग आणखी वाढवण्यासाठी रात्रपाळीच्या रोजगारांशी संबंधित सुधारणा, स्वतःच्या घरातून काम करण्याच्या संधींना प्रोत्साहन आणि कार्यस्थळाच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा बळकट करणे इत्यादी सुधारणा करण्यात आल्या आहेत,” मोदी यांनी अधोरेखित केले.

यावेळी पंतप्रधानांनी उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनाही मार्गदर्शन केले. एकविसाव्या शतकात आर्थिक यशाची दिशा ठरवण्यासाठी कुशल प्रतिभा, नवोन्मेष आणि गुणवत्ता हे तीन घटक अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. ज्या देशांकडे या क्षमता असतील, त्या देशात सर्वात जास्त संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले. भारताकडे या तिन्ही क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व क्षमता असल्याचेही त्यांनी नमूद केले. संपूर्ण जग आता भारतासाठी आपली दारे खुली करत आहे, जवळपास चाळीस देशांसोबत मुक्त व्यापार करार पूर्णत्वाला गेले आहेत, असे ते म्हणाले. या करारांमुळे नवीन बाजारपेठा उभ्या राहात आहेत, जागतिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे मार्गांचा विस्तार करत आहे, परिणामी मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत तयार होणाऱ्या ब्रँड्ससाठी नवीन संधी निर्माण होत आहेत ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली.

जेव्हा एखादा देश जागतिक दृष्टिकोनाचा अंगिकार करतो, त्यावेळी त्या देशाच्या यशाच्या सीमाही स्वाभाविकपणे विस्तारतात, असे त्यांनी सांगितले. एकविसाव्या शतकाच्या अनुषंगाने  भविष्यातील गरजांसाठी सज्ज असलेले मनुष्यबळ तयार करण्याकरता प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि इंटर्नशिप अर्थात प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणचा अनुभव हे आता पर्यायी घटक राहिले नसून अनिवार्य घटक बनले असल्याचे वास्तवही त्यांनी आपल्या संबोधनातून मांडले. विकसित भारताचा संकल्प केवळ गुंतवणुकीच्या बळावर साध्य करता येणार नाही, तर त्यासाठी देशातील प्रतिभा, कौशल्य आणि नवोन्मेषाच्या ताकदीचे मोठे पाठबळ उभारावे लागणार असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात गुणवत्ता हाच सर्वात मुख्य निकष असायला हवा ही बाब त्यांनी अधोरेखित केली. जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी देशाने आंतरराष्ट्रीय मानकांचे सातत्यपूर्णतेने पालन केले पाहिजे आणि या मानकांचा मापंदड ओलांडला पाहीजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आज संपूर्ण जगाला भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. देशातील युवा पिढीबद्दल आपल्याला पूर्ण विश्वास वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. भारताचा युवा वर्ग आपला दृढनिश्चय, सर्जनशीलता आणि क्षमतेच्या बळावर या अपेक्षा केवळ पूर्ण करेल आणि त्यासोबतच अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी करून दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा विश्वास म्हणजेच विकसित भारताची खरी ताकद आहे आणि यातून देशाच्या युवा शक्तीच्या अफाट क्षमतेची प्रचिती येते असे ते म्हणाले. युवा वर्गाने अपयश किंवा अडचणींमुळे खचून जाऊ नये असा सल्लाही यावेळी पंतप्रधानांनी दिला. प्रत्येक अपयश आपल्याला महत्त्वाचे शिकवण देत असते, आणि अशी शिकवण वैयक्तिक प्रगती तसेच भविष्यातील यशासाठी मोलाची असते असे त्यांनी सांगितले.  आव्हानांमधून सातत्याने शिकणे, स्वप्नांचे प्रत्यक्ष यशात रूपांतर करणे आणि प्रत्येक यशानंतर नवीन आकांक्षा जोपासणे हीच एका युवा मनाची खरी ओळख असते, असे त्यांनी अधोरेखित केले.

देशाच्या युवा पिढीवर आणि त्यांच्यातील उद्योजकीय भावनेवर आपला दृढ विश्वास असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. या निमीत्ताने त्यांनी सर्व सहभागींना शुभेच्छा दिल्या. आज भारत एक विकसित राष्ट्र बनण्याच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतो आहे, अशावेळी देशाच्या युवा वर्गाच्या आकांक्षा, नवोन्मेष आणि महत्त्वाकांक्षांना पूर्ण पाठबळ देण्याप्रति सरकार वचनबद्ध असल्याची हमी त्यांनी पुन्हा एकदा दिली.

 

 

 

 

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Centre releases Rs 1.09 lakh crore tax devolution; Uttar Pradesh gets biggest share to accelerate development spending

Media Coverage

Centre releases Rs 1.09 lakh crore tax devolution; Uttar Pradesh gets biggest share to accelerate development spending
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03, 2026