पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जोहान्सबर्गमध्ये जी20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांची भेट घेतली. परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि त्यांनी आपुलकीने केलेल्या आदरातिथ्याबद्दल पंतप्रधानांनी अध्यक्ष रामाफोसा यांचे आभार मानले. नवी दिल्ली जी20 शिखर परिषदेदरम्यान घेतलेल्या निर्णयांचा पाठपुरावा केल्याबद्दल आणि त्यावर आधारित पुढील कार्य केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेच्या जी20 संबंधी प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संबंधांचा आधार असलेल्या ऐतिहासिक संबंधांना उजाळा देत, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि व्यापार व गुंतवणूक, अन्न सुरक्षा, कौशल्य विकास, खाणकाम, युवा आदानप्रदान आणि लोकांमधील परस्पर संबंध यांसारख्या सहकार्याच्या विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी एआय, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि महत्त्वपूर्ण खनिजे या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या संभाव्य मार्गांवर चर्चा केली. दक्षिण आफ्रिकेत भारतीय कंपन्यांच्या वाढत्या उपस्थितीचे नेत्यांनी स्वागत केले, विशेषतः पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, नवनिर्मिती, खाणकाम आणि स्टार्टअप क्षेत्रात परस्पर गुंतवणुकीला चालना देण्याचे मान्य केले. दक्षिण आफ्रिकेतून भारतात चित्ते आणण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी अध्यक्ष रामाफोसा यांचे आभार मानले आणि त्यांना भारताच्या नेतृत्वाखालील इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले.

ग्लोबल साऊथचा आवाज बुलंद करण्यासाठी संयुक्तपणे काम करण्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले. या संदर्भात, दक्षिण आफ्रिकेने आयबीएसए नेत्यांची बैठक आयोजित करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे पंतप्रधानांनी कौतुक केले. अध्यक्ष रामाफोसा यांनी 2026 मधल्या भारताच्या आगामी ब्रिक्स अध्यक्षपदाला दक्षिण आफ्रिकेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे आश्वासन दिले.

Had an excellent meeting with President Cyril Ramaphosa during the G20 Summit in Johannesburg. We reviewed the full range of the India-South Africa partnership, especially in boosting linkages of commerce, culture, investment and diversifying cooperation in technology, skilling,… pic.twitter.com/WuLLsh3yVf
— Narendra Modi (@narendramodi) November 23, 2025


