दिल्ली-देहरादून आर्थिक मार्गिका जागतिक दर्जाचा पायाभूत सुविधा प्रकल्प असून यामुळे दळणवळण विस्तारेल, अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला चालना देईल : पंतप्रधान
स्थापनेला 25 वर्ष पूर्ण होऊन उत्तराखंडने 26 व्या वर्षात पदार्पण केले आहे, आज दिल्ली-देहरादून द्रुतगती महामार्गाच्या उद्घाटनामुळे आणखी एक मैलाचा टप्पा जोडला गेला आहे : पंतप्रधान
देहरादून-दिल्ली आर्थिक मार्गिका संपूर्ण क्षेत्राचा कायापालट घडवेल : पंतप्रधान
या मार्गिकेमुळे वेळेची बचत होईल, प्रवास अधिक स्वस्त आणि वेगवान होईल; लोकांना पेट्रोल आणि डिझेलवर कमी खर्च करावा लागेल, तसेच प्रवासी भाडे आणि मालवाहतुकीचा खर्चही कमी होईल. याशिवाय, यामुळे रोजगाराच्या संधीही निर्माण होतील: पंतप्रधान
आपले पर्वत, ही वनक्षेत्रे आणि देवभूमीचा हा वारसा, ही अत्यंत पवित्र स्थळे आहेत; अशी ठिकाणे स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य : पंतप्रधान
या भागात आढळणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचऱ्याचे ढीग देवभूमीच्या पावित्र्याला बाधा पोहोचवतात; देवभूमीतली ही स्थळे, आपली तीर्थक्षेत्रे, स्वच्छ आणि सुंदर ठेवणे अत्यंत आवश्यक : पंतप्रधान

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली-देहरादून आर्थिक मार्गिकेचे उद्घाटन केले. उत्तराखंड आणि विस्तारित क्षेत्राच्या विकासात हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. देहरादून इथे आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधानांनी बैसाखी, बोहाग बिहू आणि पुथांडू या सणांच्या निमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. देशभरात सध्या सणांचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

देवभूमीच्या पवित्र भूमीला पंतप्रधानांनी वंदन केले. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ यांचा समावेश असलेली 'चार धाम यात्रा' येत्या काही दिवसांत सुरू होणार असून हा असा एक क्षण आहे, ज्याची देशभरातील लक्षावधी भाविक अत्यंत श्रद्धेने वाट पाहतात, असे पंतप्रधान म्हणाले.   त्यांनी 'पंच बद्री', 'पंच केदार', 'पंच प्रयाग' आणि माता संतला व माता डाट काली या प्रदेशातील पूजनीय देवतांना वंदन केले.   कार्यक्रमापूर्वी त्यांनी माता  डाट कालीच्या  मंदिराला भेट दिली. "इतक्या विशाल प्रकल्पाची पूर्तता करण्यासाठी माता डाट कालीचा आशीर्वाद हीच आमची मोठी शक्ती ठरली आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी संपूर्ण देशाच्या वतीने बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. गरीब आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर आंबेडकर यांनी आयुष्यभर केलेल्या समर्पित कार्याकडे त्यांनी लक्ष वेधले. कलम  370 रद्द करण्यापासून ते डझनभर जिल्ह्यांमधून माओवाद आणि नक्षलवादाचे उच्चाटन करण्यापर्यंत, गेल्या दशकभरातील सरकारच्या धोरणांनी  संवैधानिक मूल्यांचे जतन केले आहे. "समान नागरी संहितेची संवैधानिक आकांक्षा पुढे नेऊन, उत्तराखंडने संपूर्ण देशाला दिशा दाखवली आहे," असे पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले.

 

26 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या उत्तराखंड राज्याच्या प्रगतीवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. या शतकाचे तिसरे दशक उत्तराखंडचे दशक असेल, या आपल्या आधी केलेल्या घोषणेचा त्यांनी पुनरुच्चार केला. सध्याच्या सरकारच्या धोरणांमुळे आणि येथील जनतेच्या कठोर परिश्रमामुळे, हे तरुण राज्य आपल्या विकासात नवनवीन पैलूंची भर घालत असल्याचे त्यांनी नमूद केले. "हा द्रुतगती महामार्ग उत्तराखंडच्या विकासाला नवी गती देईल," असा ठाम विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

एखाद्या राष्ट्राचे भविष्य हे त्या देशातील रस्ते, महामार्ग, द्रुतगती मार्ग, हवाई मार्ग, रेल्वे मार्ग आणि जलमार्गांमध्येच लिहिले गेलेले असते, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले. वर्ष 2014 पूर्वी पायाभूत सुविधांवरील खर्च दरवर्षी 2 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी होता, तो आता सहा पटींहून अधिक वाढून वर्षाला 12 लाख कोटी रुपयांहून अधिकवर पोहोचल्याचे सांगत, त्यांनी, देशात पायाभूत सुविधांच्या विकासाला मिळालेल्या अभूतपूर्व गतीकडे लक्ष वेधले. "केवळ उत्तराखंडमध्येच सध्या 2.25 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे पायाभूत सुविधा प्रकल्प प्रगतीपथावर आहेत," असे पंतप्रधानांनी सांगितले. 

 

दिल्ली-उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, उत्तराखंड या क्षेत्रातील अलीकडील विकासाचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी दिल्ली मेट्रोचा विस्तार, मेरठमध्ये मेट्रो सेवांचा प्रारंभ, 'दिल्ली-मेरठ नमो भारत रेल'चे उद्घाटन, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एमआरओ सुविधेचा प्रारंभ,  या सर्व बाबी अत्यंत अल्पावधीतच साध्य झाल्याचे नमूद केले. ''देशात किती मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत, याची कल्पना करा. या छोट्या क्षेत्रात अल्पावधीत जी कामे होत आहेत, ती एक झलक आहे,''असे पंतप्रधान म्हणाले.  

दिल्ली-देहरादून आर्थिक मार्गिकेच्या परिवर्तनकारी लाभांचे तपशीलवार विवेचन करताना, पंतप्रधानांनी सदर प्रकल्पाचा त्या भागावर पडणारा बहु-आयामी प्रभाव अधोरेखित केला. ते म्हणाले की हा द्रुतगती महामार्ग प्रवाशांसाठी प्रवासाच्या वेळेत तसेच खर्चात मोठी बचत करणारा असून त्याद्वारे लक्षणीय प्रमाणात इंधनाची बचत तसेच कमी खर्चात मालवाहतूक शक्य होईल. या प्रकल्पातील बांधकामासाठी याआधीच 12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून हा प्रकल्प प्रमुख रोजगार निर्मात्याच्या रुपात उदयाला आला आहे आणि त्यातून हजारो अभियंते, मजूर आणि वाहतूक कामगारांसाठी उपजीविकेचे साधन मिळाले आहे. शेतकरी तसेच पशुपालकांची उत्पादने अधिक वेगाने मोठ्या बाजारांपर्यंत पोहोचू शकल्यामुळे त्यांना देखील या प्रकल्पाचा फायदा मिळणार आहे यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद, बाघपत, बरौत, शामली आणि सहारनपुर या भागांतून जाणारी ही मार्गिका या शहरांना देखील नवसंजीवनी देईल, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. हा केवळ एक रस्ता नाही; तर तो या संपूर्ण भागातील व्यापार, उद्योग, वखार, तसेच मालवाहतुकीसाठी नवे मार्ग खुले करून देईल.

नव्या द्रुतगती महामार्गामध्ये असलेल्या पर्यटनविषयक क्षमतेवर अधिक भर देत, या मार्गामुळे देहरादून, हरिद्वारे, ऋषिकेश, मसुरी तसेच चारधाम हे परिमंडळ अधिक सुलभतेने पोहोचता येण्याजोगे होईल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की उत्तराखंड भाग हिवाळी पर्यटन, हिवाळी क्रीडास्पर्धा तसेच विशेष स्थानी होणाऱ्या विवाहांसाठी अधिकाधिक प्रमाणात लोकप्रिय स्थळ होऊ लागले आहे. उत्तराखंडच्या अर्थव्यवस्थेसाठी संपूर्ण वर्षभर पर्यटन सुरु राहण्याचे महत्व लक्षात घेत त्यांनी सांगितले की आदि कैलास आणि ओम पर्वत यांच्या भेटींसाठी जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत काही शे भाविकांपासून 2025 मध्ये 36,000 भाविक संख्येपर्यंत उल्लेखनीय वाढ झाली आहे, तर हिवाळी चारधाम यात्रेत 2024 मध्ये 80,000 भाविक सहभागी झाले होते, ती संख्या 2025 मध्ये दीड लाखांच्या वर पोहोचली आहे. “जेव्हा पर्यटनात वाढ होते तेव्हा हॉटेल्स, धाबे, टॅक्सीज, गृह निवासव्यवस्था अशा सगळ्यांनाच त्याचा लाभ होतो, संपूर्ण स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते,” असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

 

निसर्ग तसेच संस्कृती यांच्यासोबत प्रगतीचा समतोल राखण्यासंदर्भात सरकारच्या कटिबद्धतेवर अधिक भर देत, पंतप्रधानांनी या द्रुतगती महामार्गाचा भाग म्हणून सुमारे 12 किमी लांबीच्या उन्नत वन्यजीव मार्गिकेच्या बांधकामाचा ठळक उल्लेख केला. हत्तींसह इतर वन्य प्राण्यांच्या हालचालीला कोणताही अटकाव होऊ नये याची खातरजमा करण्यासाठी ही विशेष मार्गिका बांधण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या देवभूमीतील पर्वत आणि वनांना भेट देणारे पर्यटक तसेच भाविकांनी ही पवित्र स्थाने स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त ठेवावीत, असे आवाहन देखील पंतप्रधानांनी यावेळी केले. “पायाभूत सुविधांच्या माध्यमातून लोकांना सोयीसुविधा पुरवतानाच, या भागांतील वन्यजीव आणि नैसर्गिक वारसा यांचे देखील संरक्षण करणे हा आमचा प्रयत्न आहे,” मोदी यांनी आवर्जून सांगितले.

पुढच्या वर्षी हरिद्वार येथे होऊ घातलेल्या कुंभ मेळ्यासंदर्भात बोलताना, हे पर्व भव्य, दिव्य आणि स्वच्छ असेल याची खात्री करून घेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी सर्व भागधारकांना केले. त्यांनी भारताच्या सांस्कृतिक जाणिवेचे जिवंत उदाहरण ठरलेल्या नंदा देवी रज्जत यात्रेचा देखील उल्लेख केला. या यात्रेत नंदादेवीला कन्यास्वरूप मानून संपूर्ण सन्मानासह तिला निरोप दिला जातो आणि लक्षणीय प्रमाणातील महिलांचा सहभाग या उत्सवाला विशेष अर्थ प्राप्त करून देतो असे ते म्हणाले.  “रज्जत यात्रा हा केवळ श्रद्धेचा प्रवास नाही; तर तो आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा पुरावा आहे,” असे मोदी म्हणाले.

महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्याकडे वळताना पंतप्रधानांनी सांगितले की महिलांची सुरक्षितता, संरक्षण तसेच राजकीय सहभागाप्रती सरकार संपूर्णपणे कटिबद्ध आहे. चार दशकांच्या प्रतीक्षेनंतर संसदेने नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक संमत करुन महिलांना लोकसभा तसेच राज्य विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षणाची हमी दिली आहे, याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली. हा मुद्दा पुढे नेण्यासाठी 16 एप्रिल रोजी संसदेत विशेष चर्चा होणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली. देवभूमीवरून सर्व राजकीय पक्षांना आवाहन करत त्यांनी सदर सुधारणेला पाठींबा देण्याचे आवाहन केले, जेणेकरून 2029 च्या सार्वत्रिक निवडणुकांपासून हा कायदा लागू होण्याची खात्री होईल. “ही या देशातील प्रत्येक भगिनीची आणि कन्येची इच्छा आहे आणि आपण ती एकमताने पूर्ण केली पाहिजे,” असे पंतप्रधान म्हणाले.

 

गढी छावणीच्या ऐतिहासिक स्थळावरून उत्तराखंडाच्या अभिमानास्पद लष्करी परंपरेला अभिवादन करताना पंतप्रधानांनी 1962 च्या युद्धातील रायफलधारी जसवंत सिंग रावत सारख्या हुतात्म्यांच्या शौर्याचे स्मरण केले. माजी सैनिकांसाठी हाती घेतलेल्या अनेक कल्याणकारी योजनांची त्यांनी माहिती दिली. एक श्रेणी, एक निवृत्तीवेतन योजनेंतर्गत 1.25 लाख कोटी रुपयांचे वितरण, माजी सैनिकांसाठी आरोग्य योजनाविषयक तरतुदीत 36%ची वाढ, 70 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या माजी सैनिकांसाठी घरपोच औषध वितरण, मुलांच्या शिक्षणासाठीचे अनुदान दुप्पट करणे तसेच मुलीच्या लग्नासाठीच्या मदतीमध्ये 50,000 रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंत वाढ इत्यादी उपक्रमांचा त्यात समावेश आहे. “सशस्त्र दलांचे बळकटीकरण आणि आपल्या सैनिकांच्या कुटुंबांचा सन्मान यांना या सरकारने कोणत्याही तडजोडीविना प्राधान्य दिले आहे,” अशी ग्वाही मोदींनी दिली.

 

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की विकसित भारताच्या संकल्पनेने प्रगती, निसर्ग आणि संस्कृती यांना समप्रमाणात एकत्र केले पाहिजे. या द्रुतगती महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांनी दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि संपूर्ण देशाचे हार्दिक अभिनंदन केले. “देशभक्ती, निष्ठा आणि सर्वंकष विकास यांचे एकत्रीकरण करून आम्ही अशा प्रकारे खऱ्या अर्थाने विकसित भारताची उभारणी करत आहोत,” असे पंतप्रधान मोदींनी आश्वासक सुरात सांगितले.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India-Cambodia UPI Connectivity Goes Live For Merchant Payments

Media Coverage

India-Cambodia UPI Connectivity Goes Live For Merchant Payments
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 6 जून 2026
June 06, 2026

Viksit Bharat Rising: PM Modi's Vision Powers Energy, Defense & Digital Dominance