पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील यशोभूमी येथे आशियातील सर्वात मोठा दूरसंचार,माध्यम आणि तंत्रज्ञान कार्यक्रम असलेल्या इंडिया मोबाइल काँग्रेस (आयएमसी) 2025 च्या 9 व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. इंडिया मोबाइल काँग्रेसच्या या विशेष आवृत्तीत आर्थिक फसवणूक प्रतिबंध, क्वांटम कम्युनिकेशन, 6जी, ऑप्टिकल कम्युनिकेशन आणि सेमीकंडक्टर्स यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर असंख्य स्टार्टअप्सनी सादरीकरणे केली आहेत, असे सर्व मान्यवरांचे स्वागत करताना मोदी म्हणाले. अशा महत्त्वाच्या विषयांवर सादरीकरणे पाहिल्यानंतर भारताचे तांत्रिक भविष्य सक्षम हातात आहे हा विश्वास दृढ होतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी या कार्यक्रमासाठी आणि सर्व नवीन उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.
इंडिया मोबाईल काँग्रेस आता मोबाईल आणि दूरसंचार क्षेत्राच्याही सीमा ओलांडत विकसित झाली आहे असे ते म्हणाले. गेल्या काही वर्षांतच आशियातील सर्वात मोठा डिजिटल तंत्रज्ञान मंच म्हणून ही परिषद उदयास येत आहे असे त्यांनी सांगितले.ही यशोगाथा भारताच्या तंत्रज्ञान-कुशल तज्ज्ञांच्या व तरुणांच्या नेतृत्वाखाली तसेच देशाच्या प्रतिभेने प्रेरित होऊन आकारली आहे असे त्यांनी सांगितले.

नवोन्मेषक आणि स्टार्टअप्सनी केलेली ही प्रगती देशाच्या कार्यक्षम तंत्रज्ञांसोबत खंबीरपणे उभे असलेल्या सरकारमुळे शक्य झाली आहे ,असे पंतप्रधानांनी नमूद केले . त्यांनी दूरसंचार तंत्रज्ञान विकास निधी आणि डिजिटल संपर्क नवोन्मेष केंद्र सारख्या उपक्रमांचा उल्लेख केला, ज्याद्वारे स्टार्टअप्सना निधी दिला जात आहे. नवीन उत्पादने विकसित करण्याच्या दिशेने जाताना सरकार 5G, 6G, प्रगत ऑप्टिकल कम्युनिकेशन्स आणि टेरा-हर्ट्झ सारख्या तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी वित्तपुरवठा करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. स्टार्टअप्स आणि प्रमुख संशोधन संस्थांमधील भागीदारी वाढवली जात आहे. भारतीय उद्योग, स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्था सरकारी पाठबळामुळे विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य करत आहेत यावर त्यांनी भर दिला. स्वदेशी तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित करणे, संशोधन आणि विकासाद्वारे बौद्धिक संपदा निर्माण करणे आणि जागतिक मानकांमध्ये योगदान देणे या प्रत्येक बाबीत भारत प्रगती करत असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर भारताला एक प्रभावी मंच म्हणून स्थान मिळाले आहे, असे ते म्हणाले.
इंडिया मोबाईल काँग्रेस आणि दूरसंचार क्षेत्रातील देशाच्या यशातून ‘आत्मनिर्भर भारत’ दृष्टिकोनाची शक्ती दिसून येते", असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत उत्पादने तयार करण्याच्या भारताच्या क्षमतेवर शंका घेणाऱ्यांनी काही वर्षांपूर्वी 'मेक इन इंडिया'च्या कल्पनेची कशी थट्टा केली होती, याची त्यांनी आठवण करून दिली. पूर्वीच्या नेतृत्वाच्या कारकिर्दीत देशाला नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या प्रक्रियेत अनेक दशके विलंब होत होता. परंतु आता यावर देशाने निर्णायक प्रतिसाद दिला आहे असे मोदी यांनी सांगितले . एकेकाळी 2G जाळे देखील मुश्किलीने मिळत असलेल्या देशात आता जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात 5G कव्हरेज आहे असे त्यांनी म्हटले . 2014 पासून इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सहा पटीने वाढले आहे, मोबाइल फोन उत्पादन अठ्ठावीस पटीने वाढले आहे, तर निर्यात एकशे सत्तावीस पटीने वाढली आहे. गेल्या दशकात, मोबाइल फोन उत्पादन क्षेत्राने लाखो थेट रोजगार निर्माण केले आहेत. त्यांनी एका प्रमुख स्मार्टफोन कंपनीच्या अलिकडच्या आकडेवारीचा उल्लेख केला की आता 45 भारतीय कंपन्या त्यांच्या पुरवठा साखळीत सहभागी आहेत. यामुळे सुमारे 3.5 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत - आणि त्याही फक्त एकाच कंपनीकडून. पंतप्रधानांनी यावर भर दिला की देशभरात असंख्य कंपन्या मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहेत आणि या आकडेवारीत अप्रत्यक्ष रोजगार संधींचे आकडे जोडले, तर एकूण रोजगाराचे आकडे आणखी लक्षणीय बनतात.

भारताने अलीकडेच आपला मेड इन इंडिया 4 जी स्टॅक लाँच केला, ही एक मोठी स्वदेश निर्मित कामगिरी असून यासोबतच भारताने आता अशा प्रकारची क्षमता असलेल्या जागतिक स्तरावरील पाच देशांच्या यादीत स्थान मिळवले आहे असे सांगून आत्मनिर्भरता आणि तांत्रिक स्वालंबनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला. स्वदेशी 4 जी आणि 5 जी स्टॅक च्या माध्यमातून भारत अखंडित कनेक्टिव्हिटी तर सुनिश्चित करेलच शिवाय आपल्या नागरिकांना अति जलद इंटरनेट आणि विश्वासार्ह सेवा प्रदान करु शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वदेशी 4G स्टॅक च्या उदघाटन प्रसंगी देशभरात एकाच वेळी सुमारे एक लाख '4जी’ टॉवर्स सक्रियपणे कार्यरत झाले आणि भारताच्या डिजिटल चळवळीत सुमारे दोन कोटी लोक जोडले गेले, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. यापैकी बरीचशी क्षेत्र दुर्गम भागात असून यापूर्वी तिथे डिजिटल नेटवर्कची सुविधा उपलब्ध नव्हती आणि आता त्या सर्व प्रदेशांमध्ये इंटरनेट सेवा पोहोचली आहे, असे ते म्हणाले.
भारताच्या मेड इन इंडिया अर्थात 4 जी स्टॅकचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे त्याची निर्यात सज्जता हे होय. हा स्वदेशी स्टॅक भारताच्या व्यवसाय विस्तारासाठी एक माध्यम म्हणून कार्य करेल आणि ‘इंडिया 6G व्हिजन 2030’ साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल, असे ते म्हणाले.
गेल्या दशकात भारतात वेगाने तंत्रज्ञान क्रांती झाली आहे आणि या गती आणि व्याप्तीला जुळवून घेण्यासाठी, एक मजबूत कायदेशीर आणि आधुनिक धोरणात्मक पाया फार पूर्वीपासून आवश्यक होता यावर पंतप्रधानांनी भर दिला . सध्याच्या युगातील आधुनिक नागरिकांच्या जन्माच्या आधीपासून असलेला आणि कालबाह्य झालेला भारतीय टेलिग्राफ कायदा आणि भारतीय वायरलेस टेलिग्राफ कायद्याची जागा आता दूरसंचार कायद्याने घेतली असून देशात त्याची अंमलबजावणी होत असल्याचे त्यांनी सांगितले. एकविसाव्या शतकातील दृष्टिकोनाशी सुसंगत एक नवीन आराखडा स्थापन करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला आणि केंद्र सरकारने त्याची यशस्वी अंमलबजावणी केल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन कायदे एखाद्या नियामकाप्रमाणे कार्य करत नाहीत तर एखाद्या सुविधा प्रदात्याप्रमाणे आहेत ज्यामुळे आवश्यक मंजुरी मिळणे सोपे झाले आहे . तसेच राईट-ऑफ-वे परवानग्या आता जलद गतीने दिल्या जात आहेत.
परिणामी, फायबर आणि टॉवर नेटवर्कचा विस्तार वेगाने होत आहे, ज्यामुळे व्यवसाय करणे अधिक अनुकूल होत असून गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळत आहे आणि उद्योगांना दीर्घकालीन योजना आखण्यास सक्षम केले जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले. देशात सायबर सुरक्षेला समान प्राधान्य दिले जात आहे. सायबर गुन्ह्यांच्या विरोधातील कायदे अधिक कठोर केले आहेत, उत्तरदायित्व वाढवण्यात आले आहे आणि तक्रार निवारण यंत्रणा देखील सुधारण्यात आली आहे. या उपायांमुळे उद्योगजगत आणि ग्राहक या दोघांना लक्षणीय लाभ होत आहे. जग आता भारताच्या वाढत्या क्षमतांची दखल घेत असून भारत जगातील दुसरी मोठी दूरसंचार बाजारपेठ बनला आहे तसेच जागतिक स्तरावरील दुसरी मोठी 5 जी बाजारपेठ म्हणून भारताने स्थान प्राप्त केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
बाजारपेठेतील ताकदीबरोबरच, भारताकडे मनुष्यबळ, गतिशीलता आणि प्रगतीशील मानसिकता आहे. असे सांगून पंतप्रधान म्हणाले की जेव्हा मनुष्यबळाचा विचार केला जातो तेव्हा भारत प्रमाण आणि कौशल्य या दोन्ही गोष्टीत अग्रस्थान दाखवून देतो. भारत हा जगातील सर्वात मोठ्या युवा लोकसंख्येचे घर असून या पिढीला मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण दिले जात आहे. आज भारतात जगातील सर्वात वेगाने वाढणारी विकासकांची लोकसंख्या आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतातील एक जी बी वायरलेस डेटाची किंमत एक कप चहापेक्षाही कमी आहे असे सांगून पंतप्रधान म्हणाले की प्रति वापरकर्ता डेटा वापराच्या प्रमाणात भारत आघाडीच्या देशांमध्ये असून डिजिटल कनेक्टिव्हिटी ही आता काही मोजक्या लोकांची किंवा चैनीची वस्तू न राहता दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहे.
उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रात नेतृत्त्व करण्याच्या मानसिकतेने भारत आगेकूच करत आहे असे सांगून पंतप्रधान म्हणाले की देशाची लोकशाही रचना, सरकारचा स्वागतशील दृष्टिकोन आणि व्यवसाय सुलभतेसाठी राबवलेल्या धोरणांमुळे भारत एक गुंतवणूकदार-स्नेही ठिकाण म्हणून स्थापित झाला आहे. भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचे यश हे सरकारच्या डिजिटल फर्स्ट मानसिकतेचा पुरावा आहे, असे ते म्हणाले. "ही गुंतवणुकीसाठी, नवोन्मेषासाठी आणि मेक इन इंडियासाठी अत्यंत योग्य वेळ आहे." असे पंतप्रधान म्हणाले. उत्पादकतेपासून सेमीकंडक्टर्स पर्यंत, मोबाईल पासून इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत सर्व क्षेत्रातील स्टार्टअप्स पर्यंत भारत संधी आणि ऊर्जेने भरलेला आहे.
लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात चालू वर्ष हे प्रमुख सुधारणा आणि परिवर्तनकारी बदलांचे वर्ष म्हणून घोषित केले होते याचे स्मरण करत पंतप्रधानांनी नमूद केले की सुधारणांचा वेग वाढत आहे, त्यामुळे उद्योग आणि नवोन्मेषकांची जबाबदारी वाढत आहे. स्वतःच्या गतीने आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेद्वारे नवीन मार्ग आणि संधी निर्माण करणाऱ्या स्टार्टअप्स आणि युवा नवोन्मेषकांच्या महत्वपूर्ण भूमिकेवर त्यांनी भर दिला. यावर्षी, इंडिया मोबाईल काँग्रेसने 500 हून अधिक स्टार्टअप्सना आमंत्रित करून त्यांना गुंतवणूकदार आणि जागतिक मार्गदर्शकांशी जोडण्यासाठी मौल्यवान संधी उपलब्ध केल्याबद्दल मोदींनी समाधान व्यक्त केले.

या क्षेत्राच्या विस्तारात प्रस्थापित कंपन्यांची भूमिका वाढत आहे याचा पुनरुच्चार करताना या कंपन्या चांगले संशोधन आणि विकास क्षमतांच्या आधारे देशाची अर्थव्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी स्थैर्य, व्याप्ती आणि दिशा प्रदान करतात असे मोदींनी निदर्शनास आणले. "स्टार्टअप्सच्या गतीने आणि एकजुटीने काम करणाऱ्या प्रस्थापित कंपन्यांच्या विस्तारामुळे भारत सक्षम होईल," असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
उद्योगातील अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांना तरुण स्टार्टअप नवोन्मेषक, शैक्षणिक संस्था, संशोधन समुदाय आणि धोरणकर्त्यांकडून सहयोगी प्रयत्नांची आवश्यकता आहे यावर भर देऊन, पंतप्रधानांनी आशा व्यक्त केली की इंडिया मोबाइल काँग्रेससारखे मंच अशा संवादासाठी प्रभावी उत्प्रेरक म्हणून काम करतील. मोबाइल, टेलिकॉम, इलेक्ट्रॉनिक्स आणि व्यापक तंत्रज्ञान परिसंस्थेतील जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन करताना कोठेही जागतिक समस्या आढळल्यास भारताला उपाय देण्याची संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. सेमीकंडक्टर उत्पादनाचे उदाहरण देताना यासाठीची क्षमता पूर्वी काही देशांपुरती सीमित होती मात्र आता जग वैविध्याचा मागोवा घेत आहे याकडे मोदींनी लक्ष वेधले. भारताने या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, देशभरात दहा सेमीकंडक्टर उत्पादन युनिट्सवर काम सुरू असल्याबद्दलही त्यांनी अवगत केले.
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात, विस्तार आणि विश्वासार्हता दोन्ही देऊ शकणाऱ्या विश्वासू भागीदारांचा शोध जागतिक कंपन्या घेत आहेत असे मोदींनी उद्धृत केले. जगाला टेलिकॉम नेटवर्क उपकरणांच्या संरचना आणि उत्पादनासाठी देखील विश्वासार्ह भागीदारांची आवश्यकता आहे यावर भर देत भारतीय कंपन्या विश्वसनीय जागतिक पुरवठादार आणि डिझाइन भागीदार का बनू शकत नाहीत? असा कळीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मोबाईल उत्पादनात चिपसेट, बॅटरी, डिस्प्ले आणि सेन्सर यांसारखे घटक देशातच वाढत्या प्रमाणात तयार केले पाहिजेत असे मोदी यांनी नमूद केले. जग पूर्वीपेक्षा जास्त डेटा निर्मिती करत आहे, त्यामुळे संकलन, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाचे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे बनले आहेत असे त्यांनी निदर्शनास आणले. डेटा सेंटर आणि क्लाउड पायाभूत सुविधांच्या कामांना चालना देऊन, जागतिक डेटा केंद्र म्हणून उदयास येण्याची भारताची क्षमता आहे, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. आगामी सत्रे त्याच दृष्टिकोनाने आणि लक्ष केंद्रित करून सुरू राहतील अशी आशा व्यक्त करून पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला. संपूर्ण इंडिया मोबाइल काँग्रेस कार्यक्रमासाठी त्यांनी पुन्हा एकदा सर्व सहभागींना शुभेच्छा दिल्या.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
दूरसंचार विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे इंडिया मोबाइल काँग्रेस 2025 चे आयोजन केले आहे. 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान आयोजित या परिषदेची संकल्पना "इनोव्हेट टू ट्रान्सफॉर्म" अर्थात “परिवर्तनासाठी नवोन्मेष ” ही आहे. डिजिटल परिवर्तन आणि सामाजिक प्रगतीसाठी अभिनवतेचा अंगीकार करण्याची भारताची बांधिलकी यातून प्रतीत होईल.

आयएमसी 2025 मध्ये दूरसंचार आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील अद्ययावत प्रगतीवर प्रकाश टाकला जाईल. जागतिक नेते, धोरणकर्ते, उद्योग धुरीण आणि नवोन्मेषक यात सहभागी होत आहेत. हा कार्यक्रम ऑप्टिकल कम्युनिकेशन्स, टेलिकॉममधील सेमीकंडक्टर्स, क्वांटम कम्युनिकेशन्स, 6G आणि फसवणूक जोखीम निर्देशकांसह प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित करेल. पुढील प्रगत कनेक्टिव्हिटी, डिजिटल सार्वभौमत्व, सायबर फसवणूक प्रतिबंध आणि जागतिक तंत्रज्ञान नेतृत्वातील भारताच्या धोरणात्मक प्राधान्ये यातून उमगतील.
150 हून अधिक देशांमधून 1.5 लाखांहून अधिक अभ्यागत , 7,000 हून अधिक जागतिक प्रतिनिधी आणि 400 हून अधिक कंपन्या सहभागी होण्याची अपेक्षा आहे. 5G/6G, एआय, स्मार्ट मोबिलिटी, सायबर सुरक्षा, क्वांटम कंप्युटिंग आणि हरित तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांमधील 1,600 हून अधिक प्रचलित बाबींवर 100 पेक्षा अधिक सत्रे असून 800 हून जास्त वक्ते त्यावर आपले विचार मांडतील.
आयएमसी 2025 मध्ये जपान, कॅनडा, युनायटेड किंग्डम, रशिया, आयर्लंड आणि ऑस्ट्रियाचे प्रतिनिधीमंडळ सहभागी होत असून आंतरराष्ट्रीय सहकार्य यातून अधोरेखित होते.
संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा
India Mobile Congress and the country's success in the telecom sector reflect the strength of the Aatmanirbhar Bharat vision. pic.twitter.com/iQHhJvykIu
— PMO India (@PMOIndia) October 8, 2025
The country that once struggled with 2G…
— PMO India (@PMOIndia) October 8, 2025
Today, 5G has reached almost every district of the same nation. pic.twitter.com/EjtmUrXEFb
India has launched its Made in India 4G Stack. This is a major indigenous achievement for the country.
— PMO India (@PMOIndia) October 8, 2025
With this, India has joined the list of just five countries in the world that possess this capability. pic.twitter.com/sapRifUeb2
We have the world's second-largest telecom market, the second-largest 5G market, the manpower, mobility and mindset to lead. pic.twitter.com/O1P9THkgZI
— PMO India (@PMOIndia) October 8, 2025
Digital connectivity in India is no longer a privilege or a luxury. It is now an integral part of every Indian's life. pic.twitter.com/BiaAwIYeRS
— PMO India (@PMOIndia) October 8, 2025
This is the best time to invest, innovate and make in India! pic.twitter.com/ytmaoxwQYk
— PMO India (@PMOIndia) October 8, 2025
In mobile, telecom, electronics and the entire technology ecosystem… wherever there are global bottlenecks, India has the opportunity to provide solutions to the world. pic.twitter.com/yk14Dznu66
— PMO India (@PMOIndia) October 8, 2025


