नवी दिल्लीत कर्मयोगी भवनच्या एकात्मिक संकुलाच्या पहिल्या टप्प्याचे केले भूमीपूजन
“राष्ट्रउभारणीमध्ये आपल्या युवाशक्तीचे योगदान वृद्धींगत करण्यात रोजगार मेळे महत्त्वाची भूमिका बजावतात”
“भारत सरकारमधील नियुक्ती प्रक्रिया आता पूर्णपणे पारदर्शक झाली आहे”
“भारत सरकारसोबत युवा वर्गाला जोडण्याचे आणि त्यांना राष्ट्रउभारणीत भागीदार बनवण्याचे आमचे प्रयत्न राहिले आहेत”
“या दशकाच्या अखेरपर्यंत भारतीय रेल्वेचा संपूर्ण कायापालट झालेला असेल”
“चांगल्या संपर्कव्यवस्थेचा देशाच्या विकासावर थेट परिणाम होतो”
“निमलष्करी दलांमधील निवड प्रक्रियेतील सुधारणा प्रत्येक भागातील युवा वर्गाला समान संधी उपलब्ध करून देतील”

सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या एक लाखांपेक्षा जास्त नियुक्तांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे वितरण केले. त्यांनी नवी दिल्लीत कर्मयोगी भवनच्या एकात्मिक संकुलाच्या पहिल्या टप्प्याचे भूमीपूजन देखील केले. हे संकुल मिशन कर्मयोगीच्या विविध स्तंभांदरम्यान सहकार्य आणि सुसंवादाला प्रोत्साहन देईल.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले की एक लाखांपेक्षा जास्त नियुक्तांना नियुक्तीपत्रे दिली जात आहेत आणि त्यांनी यावेळी या सर्वांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले. भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये युवा वर्गाला रोजगारसंधी देण्याचे काम पूर्ण भरात सुरू आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. नोकरीची अधिसूचना आणि नियुक्तीपत्रे हातात सोपवणे या प्रक्रियांदरम्यान खूप जास्त वेळ गेल्यामुळे लाचखोरीमध्ये वाढ होते याकडे निर्देश करत पंतप्रधान म्हणाले की विद्यमान सरकारने ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक केली आहे आणि नियुक्ती प्रक्रिया देखील निर्धारित केलेल्या वेळेच्या आत पूर्ण करण्यात येते. यामुळे आपल्या क्षमतांचे दर्शन घडवण्याची संधी युवा वर्गातील प्रत्येकाला उपलब्ध होऊ लागली आहे, असे त्यांनी सांगितले. “आपले कष्ट आणि कौशल्य यांच्या बळावर आपण आपल्या नोकरीमधील स्थान भक्कम करू शकतो असा विश्वास देशातील युवा वर्गातील प्रत्येकामध्ये निर्माण झाला आहे”, पंतप्रधान म्हणाले. देशाच्या विकासात युवा वर्गाला भागीदार बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे अधोरेखित करून पंतप्रधानांनी माहिती दिली की गेल्या 10 वर्षात सरकारने पूर्वीच्या सरकारांपेक्षा 1.5 पट जास्त रोजगार देशातील युवा वर्गाला दिले आहेत. नवी दिल्लीमध्ये कर्मयोगी भवनच्या एकात्मिक संकुलाच्या पहिल्या टप्प्याचे भूमीपूजन करण्यासंदर्भात ते म्हणाले की यामुळे क्षमता उभारणीच्या सरकारच्या उपक्रमांना बळकटी मिळेल.

 

सरकारच्या प्रयत्नांमुळे  रोजगार आणि स्वयंरोजगारांकरिता संधींची निर्मिती आणि नवी क्षेत्रे खुली करण्याविषयी बोलताना पंतप्रधानांनी अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या छतावरील सौर प्रकल्पांचा उल्लेख केला ज्यामुळे  त्या कुटुंबांची विजेची बिले कमी होतील आणि ही वीज ग्रीडकडे पाठवून त्याद्वारे उत्पन्न देखील मिळवतील, असे सांगितले. या योजनेमुळे लाखो नवे रोजगार देखील निर्माण होतील, ते म्हणाले.       

भारत सुमारे 1.25 लाख स्टार्ट अप्ससह जगातील सर्वात मोठी तिसऱ्या क्रमांकाची स्टार्ट अप प्रणाली असल्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी यापैकी बरेचसे स्टार्टअप द्वितीय किंवा तृतीय श्रेणीच्या शहरात असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. हे स्टार्ट अप्स रोजगारसंधी निर्माण करत असल्याने नुकत्याच मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या स्टार्ट अप्ससाठी करामधील सवलत पुढे सुरू ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या 1 लाख कोटी रुपयांच्या निधीचा देखील पंतप्रधानांनी उल्लेख केला.

रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून रेल्वेमध्ये देखील भर्ती करण्यात येत आहे अशी माहिती देऊन पंतप्रधानांनी सामान्य माणसाला प्रवास करण्याची वेळ येते तेव्हा त्याची प्रथम पसंती रेल्वेलाच असते यावर अधिक भर दिला. भारतातील रेल्वे क्षेत्रामध्ये व्यापक परिवर्तन घडून येत असून येत्या दशकात या क्षेत्राचा संपूर्ण कायापालट झालेला दिसेल या सत्याकडे पंतप्रधान मोदी यांनी सर्वांचे लक्ष वेधले. वर्ष 2014 च्या पूर्वीच्या काळात रेल्वेकडे म्हणावे तसे लक्ष देण्यात आले नाही अशी आठवण करून देत त्यांनी आता रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण तसेच दुपदरीकरण आणि नव्या गाड्यांची सुरुवात करण्यासह प्रवाशांसाठी अधिक प्रमाणात सुविधा या गोष्टींचा उल्लेख केला. वर्ष 2014 नंतर मात्र, रेल्वेचे आधुनिकीकरण आणि अद्यायावतीकरण यांसह संपूर्ण रेल्वे प्रवासाच्या उत्तम अनुभवाची पुन्हा सुरुवात करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. यावर्षीच्या अर्थसंकल्पातील तरतुदीअंतर्गत वंदे भारत एक्स्प्रेस सारख्या 40,000 आधुनिक डब्यांची निर्मिती करून सामान्य रेल्वे गाड्यांमध्ये त्यांचा समावेश करण्यात येईल आणि त्यातून प्रवाशांसाठी वाढीव सोयीसुविधा आणि आरामदायक प्रवासाची व्यवस्था होईल.

.

अति-दुर्गम भागात संपर्क सुविधा पोहोचवण्याच्या परिणामावर अधिक भर देत पंतप्रधानांनी सुधारलेल्या संपर्क व्यवस्थेमुळे नव्या बाजारपेठा, पर्यटनाचा विस्तार, नवे व्यापार तसेच लाखो नोकऱ्यांची निर्मिती या परिणामांकडे निर्देश केला. “विकासाला वेग देण्यासाठी पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक वाढवण्यात येत आहे,” पंतप्रधान म्हणाले.नुकत्याच मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीसाठी 11 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. नवीन रेल्वे मार्ग, रस्ते, विमानतळ आणि जलमार्ग यांच्यामुळे नव्या रोजगारसंधी निर्माण होतील असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.

आज नव्याने झालेल्या नियुक्त्यांपैकी अनेक नियुक्त्या निमलष्करी दलांमध्ये झाल्या आहेत याकडे सर्वांचे लक्ष वेधत पंतप्रधानांनी निमलष्करी दलांतील निवड प्रक्रियेमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांचा उल्लेख केला. या जानेवारी महिन्यापासून या दलांमधील भर्तीसाठीच्या परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसोबतच इतर 13 भारतीय भाषांमध्ये देखील घेतल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे लाखो उमेदवारांपैकी प्रत्येकाला समान संधी उपलब्ध होईल. सीमेवरील तसेच जहालमतवादाने प्रभावित जिल्ह्यांसाठी विहित निमलष्करी दलाच्या कोट्यात वाढ करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली.

विकसित भारताच्या प्रवासात सरकारी कर्मचाऱ्यांची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. “आज 1 लाखाहून अधिक कर्मयोगी सरकारी सेवेत दाखल होत आहेत त्यामुळे या प्रवासाला नवी उर्जा आणि गती मिळेल,” पंतप्रधान म्हणाले. कामाचा प्रत्येक दिवस देश उभारणीसाठी समर्पित करण्याची सूचना त्यांनी नव्या उमेदवारांना केली.800 हून अधिक अभ्यासक्रम तसेच 30 लाखांहून अधिक वापरकर्ते असलेल्या कर्मयोगी भारत पोर्टलविषयी माहिती देऊन या पोर्टल वरील सुविधांचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

 

पार्श्वभूमी

देशभरात 47 ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. या उपक्रमाला पाठबळ देत,  केंद्र सरकारचे विविध विभाग आणि राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेश प्रशासने यांमध्ये भर्ती करण्यात येत आहे. महसूल विभाग, गृह मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग, अणुऊर्जा विभाग, संरक्षण मंत्रालय, आर्थिक सेवा विभाग, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि केंद्रीय रेल्वे मंत्रालय यासारखी विविध सरकारी मंत्रालये तसेच विभागांमधील विविध पदांवर या नवनियुक्त उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.

 

रोजगार मिळावे हे देशातील रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्यासंदर्भात पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. या रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला अधिक चालना मिळेल तसेच तरुणांचे सक्षमीकरण आणि त्यांचा राष्ट्रीय विकासात थेट सहभाग यासाठीच्या अनेक लाभदायक संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.

नवनियुक्त उमेदवारांना आयजीओटी कर्मयोगी पोर्टलवरील कर्मयोगी प्रारंभ या ऑनलाइन मॉड्यूलच्या माध्यमातून स्वत:ला प्रशिक्षित करण्याची संधी देखील मिळणार आहे. या पोर्टलवर ‘कुठेही आणि कोणत्याही उपकरणाचा वापर करून’  अध्ययन पद्धतीसह 880 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 

Click here to read full text speech

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
How India's digital public infrastructure can push inclusive global growth

Media Coverage

How India's digital public infrastructure can push inclusive global growth
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 एप्रिल 2024
April 24, 2024

India’s Growing Economy Under the Leadership of PM Modi