"हिमाचल प्रदेशातील लेपचा इथे आपल्या शूर सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करणे हा खूप भावोत्कट आणि अभिमानास्पद अनुभव"
"देश तुमच्या प्रति कृतज्ञ आणि ऋणी आहे"
“जवान तैनात असलेले कोणतेही ठिकाण माझ्यासाठी मंदिरासारखेच! तुम्ही जिथे असाल तिथे माझा सण आहे"
“सशस्त्र दलांनी भारताला अभिमानाचे नवे शिखर गाठून दिले आहे”
"राष्ट्र उभारणीत गेले वर्ष, एक मैलाचा दगड ठरले आहे"
"रणांगणापासून ते बचाव मोहिमांपर्यंत, भारतीय लष्कर जीवनदान देण्यासाठी वचनबद्ध आहे"
"राष्ट्राच्या रक्षणात नारीशक्तीही मोलाची भूमिका बजावत आहे"

दिवाळीच्या निमित्ताने हिमाचल प्रदेशात लेपचा इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या शूर जवानांना संबोधित केले.

जवानांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, दिवाळीचा सण आणि जवानांच्या शौर्याचे गुणगान यांचा संयोग हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी अध्यात्मिक अनुभूतीचा क्षण आहे.  भारताच्या सीमावर्ती भागातील जवानांसह त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. देशातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जाणारे हे गांव आता देशातील पहिले गाव ठरले आहे.

 

आपले अनुभव कथन करताना पंतप्रधान म्हणाले की,  जिथे कुटुंब असेल तिथे सण असतो आणि सणाच्या दिवशी  कुटुंबापासून दूर सीमारेषेचे संरक्षण करणे म्हणजे कर्तव्याप्रति समर्पणाचे सर्वोच्च शिखर आहे. 140 कोटी भारतीय म्हणजेच आपले कुटुंबीय ही या जवानांची भावनाच त्यांना आपल्या उद्दीष्टाची जाणीव करुन देते असे त्यांनी सांगितले.  “त्यासाठीच देश तुमच्या प्रति कृतज्ञ आणि ऋणी आहे.  म्हणूनच प्रत्येक घरात तुमच्या सुरक्षित जीवनासाठी एक ‘दिवा’ पेटवला जातो,” असे ते म्हणाले.  “ जवान तैनात असलेले कोणतेही ठिकाण माझ्यासाठी  मंदिरासारखेच आहे! तुम्ही जिथे असाल तिथे माझा सण आहे. ही परंपरा कदाचित 30-35 वर्षे सुरु आहे,” असेही ते पुढे म्हणाले. पंतप्रधानांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि सशस्त्र दलांच्या बलिदानाच्या परंपरेला सलाम केला. "आपल्या शूर जवानांनी ते सीमेवरील सर्वात मजबूत संरक्षक भिंत असल्याचे सिद्ध केले आहे", असे ते म्हणाले. "आपल्या शूर जवानांनी पराभवाच्या जबड्यातून विजय हिसकावून आणत नेहमीच देशवासीयांची मने जिंकली आहेत." असे पंतप्रधान राष्ट्र उभारणीच्या कामात सशस्त्र दलांच्या योगदानावर प्रकाश टाकताना म्हणाले. सशस्त्र दलांनी असंख्य लोकांचे प्राण वाचवले आहेत अशा भूकंप आणि त्सुनामी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा तसेच आंतरराष्ट्रीय शांतता मोहिमांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. “सशस्त्र दलांनी भारताचा अभिमान नव्या उंचीवर नेला आहे”, अशी टिप्पणी त्यांनी केली. पंतप्रधानांनी गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रात शांती सैनिकांसाठी एक स्मारक हॉल प्रस्तावित करण्याचाही उल्लेख केला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला असे त्यांनी सांगितले. जागतिक शांतता प्रस्थापित करण्याच्या कार्यात या सैनिकांचे योगदान अमर राहील, असेही ते म्हणाले.

केवळ भारतीयांसाठीच नाही तर परदेशी नागरिकांसाठीही चालवलेल्या मायदेशी परतण्याच्या मोहिमांमध्ये भारतीय सशस्त्र दलांची भूमिका अधोरेखित करताना पंतप्रधानांनी सुदानमधील गृहयुद्धातून यशस्वीरित्या बाहेर काढलेल्या आणि तुर्कियेतील भूकंपानंतर राबवलेल्या बचाव मोहिमेचे स्मरण केले. "रणभूमीपासून बचाव मोहिमेपर्यंत, भारतीय सशस्त्र सेना जीव वाचवण्यासाठी वचनबद्ध आहेत", असे पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक देशवासीयाला देशाच्या सशस्त्र दलाचा अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले.

 

जागतिक परिस्थितीत भारताकडून असलेल्या जागतिक अपेक्षांकडे लक्ष वेधून पंतप्रधानांनी सुरक्षित सीमा, देशातील शांतता आणि स्थैर्य यांच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला. शूर जवानांनी हिमालयासम निर्धाराने आपल्या सीमांचे रक्षण केल्यामुळेच भारत सुरक्षित आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी मागच्या दिवाळीपासून गेल्या एका वर्षातील यशस्वी कामगिरीचे वर्णन केले. चांद्रयान मोहीम, आदित्य एल1, गगनयानशी संबंधित चाचणी, स्वदेशी विमानवाहू युद्धनौका  INS विक्रांत, तुमकूर हेलिकॉप्टर कारखाना, व्हायब्रंट व्हिलेज मोहीम आणि क्रीडा क्षेत्रातील यशांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. गेल्या वर्षभरातील जागतिक आणि लोकशाही लाभांविषयी बोलताना पंतप्रधानांनी नवीन संसद भवन, नारीशक्ती वंदन अधिनियम, जी-20, जैवइंधन युती, रीअल-टाइम पेमेंटमध्ये जगात अग्रस्थान, निर्यातीत 400 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडणे, जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणे, 5G साठी उचललेली मोठी पावले याबाबत अधिक संबोधन केले.

"गेले वर्ष हे राष्ट्र उभारणीतील मैलाचा दगड ठरलेले वर्ष आहे", असे ते म्हणाले. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे रस्त्यांचे जाळे, नदीवरील सर्वात लांब क्रूझ सेवा, नमो भारत ही जलद रेल्वे सेवा, 34 नवीन रेल्वेमार्गांवर वंदे भारत, भारत-मध्य पूर्व-युरोप कॉरिडॉर, दिल्लीत भारत मंडपम आणि यशोभूमी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची दोन संमेलन केंद्रे उभारत भारताने पायाभूत सुविधांच्या विकासात मोठी प्रगती केली असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत सर्वाधिक संख्येने विद्यापीठे, धोर्डो गावासाठी सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शांती निकेतन आणि होयसाळा मंदिर संकुलाचा समावेश असलेला देश बनला आहे अशी माहिती त्यांनी दिली.

 

जोपर्यंत आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण केले जात आहे तोपर्यंत देश चांगल्या भविष्यासाठी प्रयत्न करू शकतो यावर पंतप्रधानांनी भर दिला. भारताच्या विकासाचे श्रेय त्यांनी सशस्त्र दलांचे सामर्थ्य, संकल्प आणि बलिदान यांना दिले.

भारताने आपल्या संघर्षातून शक्यता निर्माण केल्याचे नमूद करून पंतप्रधान म्हणाले की, देशाने आता आत्मनिर्भर भारत बनण्याच्या मार्गावर पाऊल उचलले आहे. संरक्षण क्षेत्रातील भारताची अभूतपूर्व वाढ आणि देश जागतिक ताकद म्हणून उदयास येत असल्यावर त्यांनी प्रकाश टाकला आणि भारताच्या सैन्य आणि सुरक्षा दलांची ताकद सातत्याने वाढत असल्याचे सांगितले आहे. देश याआधी छोट्या छोट्या गरजांसाठी इतरांवर कसा अवलंबून होता याचे स्मरण करत आज देश मित्र राष्ट्रांच्या गरजा पूर्ण करत आहे असे ते म्हणाले. 2016 मध्ये पंतप्रधानांनी या प्रदेशाला भेट दिल्यानंतर भारताच्या संरक्षण निर्यातीत 8 पटीने वाढ झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. “आज देशात 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे संरक्षण उत्पादन होत आहे. हा स्वतःच एक विक्रम आहे,” असे त्यांनी पुढे सांगितले. पंतप्रधानांनी उच्च-तंत्रज्ञान आणि सीडीएस (CDS) सारख्या महत्त्वाच्या प्रणालींच्या एकत्रीकरणावर भर देत पंतप्रधान म्हणाले की,भारतीय सैन्यदल सातत्याने अधिकाधिक आधुनिक होत आहे. आगामी काळात भारताला गरजेच्या वेळी इतर देशांकडे पाहावे लागणार नाही, असेही ते म्हणाले. तंत्रज्ञानाच्या या वाढत्या प्रसारादरम्यान, पंतप्रधान मोदींनी सशस्त्र दलांना तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये मानवतेच्या दृष्टिकोनाला नेहमीच सर्वोच्च स्थान देण्याचे आवाहन केले.

 

मानवी संवेदनां पेक्षा तंत्रज्ञान कधीही वरचढ असू नये यावर पंतप्रधानांनी भर दिला.

पंतप्रधान म्हणाले, “आज, स्वदेशी संसाधने आणि उच्च श्रेणीतील सीमांवरील पायाभूत सुविधा देखील आपली ताकद ठरत आहे. आणि या कार्यात नारीशक्ती देखील मोठी भूमिका बजावत आहे याचा मला आनंद आहे.” पंतप्रधानांनी गेल्या वर्षभरात 500 महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती, राफेल लढाऊ विमाने उडवणाऱ्या महिला वैमानिक आणि युद्धनौकांवर महिला अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा विशेष उल्लेख केला. सशस्त्र दलांच्या आवश्यक गरजांची काळजी घेण्याच्या महत्त्वाविषयी बोलताना पंतप्रधानांनी प्रतिकूल हवामान परिस्थितीसाठी अनुकूल कपडे, जवानांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि संरक्षण देण्यासाठी ड्रोन सुविधा आणि वन रँक वन पेन्शन (ओआरओपी) योजनेंतर्गत 90 हजार कोटी रुपयांचा निधी यांचा उल्लेख केला.

 

पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप दोहे वाचून केला आणि ते म्हणाले की, सशस्त्र दलांचे प्रत्येक पाऊल इतिहासाची दिशा ठरवते. भारताचे सैन्यदल भारत मातेची सेवा मोठ्या निष्ठेने करत राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि ते म्हणाले की, “ आपल्या पाठिंब्यानेच देश विकासाच्या नवीन शिखरांना स्पर्श करत राहील. आपण सर्वजण मिळून देशाचा प्रत्येक संकल्प पूर्ण करू.”

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
India's exports growth momentum continues, services trade at all-time high in 2023-24

Media Coverage

India's exports growth momentum continues, services trade at all-time high in 2023-24
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 16 एप्रिल 2024
April 16, 2024

Viksit Bharat – PM Modi’s vision for Holistic Growth