स्वयंसहाय्यता बचत गटाच्या एक लाख सदस्यांना बीज भांडवल सहाय्याचे केले वितरण
विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023 चा भाग असलेल्या फूड स्ट्रीटचे केले उद्घाटन
“तंत्रज्ञान आणि स्वाद यांचा मिलाफ भविष्यातील अर्थव्यवस्थेसाठी मार्ग तयार करेल”
“सरकारची गुंतवणूक-स्नेही धोरणे खाद्यान्न क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जात आहे”
“भारताने अन्न प्रक्रिया उद्योगाच्या प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय वृद्धी प्राप्त केली आहे”
“लहान शेतकरी, लघु उद्योग आणि महिला हे अन्न प्रक्रिया क्षेत्रातील भारताच्या यशोगाथेचे तीन स्तंभ आहेत”
“सरकारच्या ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ सारख्या योजना लहान शेतकरी आणि लघु उद्योगांना नवी ओळख मिळवून देत आहेत”
“भारतीय महिलांकडे अन्न प्रक्रिया उद्योगांचे नेतृत्व करण्याची नैसर्गिक क्षमता आहे”
“भारतातले अन्नपदार्थांचे वैविध्य हा जागतिक गुंतवणूकदारांसाठी एक लाभांश ठरतो आहे”
“भारताची खाद्य संस्कृती हजारो वर्षांपासून उत्क्रांत होत आली आहे. आपल्या पूर्वजांनी आहार सवयी आणि आयुर्वेद यांची सांगड घातली ”
“भरड धान्ये हा भारताच्या ‘सुपरफूड बास्केट’चा भाग आहेत आणि सरकारने त्यांना श्रीअन्न म्हणून मान्यता दिली आहे”
“शाश्वत जीवनशैलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अन्नाची नासाडी रोखणे हा महत्वाचा उपाय आहे”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी, ‘विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023’ या खाद्यान्नविषयक महा प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांना बळकट करण्याच्या उद्देशाने यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते बचत गटाच्या एक लाखाहून अधिक सदस्यांना बीज  भांडवल सहाय्य  वितरीत करण्यात आले. या प्रसंगी मांडण्यात आलेल्या प्रदर्शनातून पंतप्रधानांनी  फेरफटका मारला. भारताला ‘जगाचे फूड बास्केट’ या स्वरुपात सादर करणे तसेच 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’म्हणून साजरे करणे हा या महोत्सवाच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.

 

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी महोत्सवात उभारण्यात आलेले तंत्रज्ञान आणि स्टार्ट अप दालन तसेच फूड स्ट्रीट यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, तंत्रज्ञान आणि स्वाद  याचा मिलाफ भविष्यातील अर्थव्यवस्थेसाठी मार्ग तयार करेल. आजच्या सतत बदलत्या जगात आपल्यासमोर असलेल्या महत्त्वाच्या आव्हानांपैकी अन्न सुरक्षा विषयक आव्हानावर अधिक भर देऊन पंतप्रधानांनी विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023 च्या आयोजनाचे महत्त्व अधोरेखित केले.

विश्व भारतीय खाद्य महोत्सवातुन हाती येणारे निष्कर्ष म्हणजे भारतातील अन्न प्रक्रिया उद्योगाला ‘सनराईज सेक्टर’ म्हणजेच उदयाला येणारे क्षेत्र म्हणून मान्यता मिळाल्याचे मोठे उदाहरण आहे ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली.सरकारच्या उद्योग-स्नेही आणि शेतकरी स्नेही धोरणांचा परिणाम म्हणून गेल्या 9 वर्षांमध्ये या क्षेत्राने 50,000 कोटीं रुपयांहून अधिक थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित केली अशी माहिती त्यांनी दिली. अन्न प्रक्रिया क्षेत्रातील उत्पादनाशी संलग्न अनुदान (पीएलआय) योजनेवर अधिक प्रकाश टाकत पंतप्रधान म्हणाले की, या क्षेत्रात नव्याने प्रवेश केलेल्यांना ही योजना मोठ्या प्रमाणावर मदत करत आहे. अ‍ॅग्री-इन्फ्रा निधीअंतर्गत 50,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीसह काढणी-पश्चात पायाभूत सुविधांसाठी हजारो प्रकल्प उभारण्यात येत आहेत असे त्यांनी नमूद केले. तसेच मत्स्यपालन आणि पशुपालन क्षेत्रातील अन्नप्रक्रियाविषयक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी देखील हजारो कोटी रुपयांच्या  गुंतवणुकीसह  प्रोत्साहन  देण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी दिली.

 

“सरकारची गुंतवणूकदार-स्नेही धोरणे खाद्यान्न क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जात आहेत,” पंतप्रधान  म्हणाले. गेल्या 9 वर्षांमध्ये भारताच्या कृषीविषयक निर्यात क्षेत्रातील प्रक्रियायुक्त खाद्यान्नाचा वाटा 13 टक्क्यावरुन 23 टक्क्यापर्यंत पोहोचला आहे आणि त्यामुळे प्रक्रियायुक्त अन्नाच्या निर्यातीत एकूण 150 टक्क्याची वाढ झाली आहे असे त्यांनी सांगितले. “50,000 दशलक्ष डॉलर्सहून अधिक कृषी मालाच्या एकंदर निर्यात मूल्यासह भारत आज कृषी उत्पादन क्षेत्रात जगात सातव्या क्रमांकावर आहे,”ते म्हणाले. अन्न प्रकिया उद्योगातील असे  कोणतेही क्षेत्र  नाही जेथे भारताने अभूतपूर्व वाढ नोंदवलेली नाही ही बाब अधोरेखित करत ते म्हणाले की अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित असलेली प्रत्येक कंपनी आणि स्टार्ट अप उद्योगासाठी ही सुवर्णसंधी आहे.

पंतप्रधान मोदी यांनी  भारतातील अन्न प्रक्रिया उद्योगात दिसून येत असलेल्या वेगवान आणि जलद वाढीचे श्रेय सरकारच्या या क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि समर्पित प्रयत्नांना दिले.भारतात प्रथमच तयार करण्यात आलेले कृषी-निर्यात धोरण, लॉजिस्टिक्स आणि पायाभूत सुविधांचा देशव्यापी विस्तार, जिल्ह्यातील उद्योजकांना जागतिक बाजारपेठेशी जोडणाऱ्या जिल्हा स्तरावरील 100 हून अधिक केंद्रांची स्थापना, सुरुवातीला असलेल्या 2 मेगा फूड पार्क्सची संख्या वाढवून 20 पेक्षा जास्त करणे, आणि भारताची अन्न प्रक्रिया क्षमता 12 लाख टनांवरून 200 लाख टनांहून जास्त वाढवून गेल्या 9 वर्षामध्ये या क्षेत्रात 15 पट वाढ नोंदवणे या घडामोडींचा मोदी यांनी उल्लेख केला. भारतातून प्रथमच निर्यात होऊ लागलेल्या कृषी उत्पादनांची उदाहरणे देखील पंतप्रधानांनी दिली. हिमाचल प्रदेशातून काळा लसूण, जम्मू काश्मीरमधून ड्रॅगनफ्रुट, मध्य प्रदेशातून सोया दूध पावडर, लडाखहून कार्कीतशू सफरचंदे, पंजाबमधून कॅव्हेंडीश केळी, जम्मूमधून गुची मश्रुम्स आणि कर्नाटकातून कच्च्या मधाची पहिल्यांदाच निर्यात होऊ लागली आहे असे ते म्हणाले.

 

भारतात वेगाने होत असलेले शहरीकरण लक्षात घेत, शेतकरी, स्टार्ट अप्स आणि लहान उद्योजकांसाठी अनपेक्षित संधी निर्माण करणाऱ्या पॅकबंद पदार्थांच्या वाढत्या मागणीकडे पंतप्रधानांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. या शक्यतांचा पूर्णपणे वापर करून घेण्यासाठी महत्त्वाकांक्षी नियोजनाची गरज आहे यावर त्यांनी अधिक भर दिला.

लहान शेतकरी, लघु उद्योग आणि महिला हे अन्न प्रक्रिया क्षेत्रातील भारताच्या यशोगाथेचे मुख्य स्तंभ आहेत ही गोष्ट त्यांनी अधोरेखित केली. लहान शेतकऱ्यांचा सहभाग आणि फायदा वाढवण्यासाठीचा मंच म्हणून शेतकरी उत्पादक संघटनांचा म्हणजेच एफपीओजचा परिणामकारक वापर करून घेण्यावर त्यांनी अधिक भर दिला. “आम्ही भारतात 10 हजार नव्या एफपीओजची स्थापना करत आहोत आणि त्यापैकी 7 हजार संघटना यायाधीच स्थापन झाल्या आहेत,” त्यांनी माहिती दिली.शेतकऱ्यांना  आता व्यापक  बाजारपेठेपर्यंत पोहोचता येत आहे आणि त्यांना अन्न प्रक्रिया करण्याच्या सुविधा देखील अधिक प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत असे त्यांनी सांगितले. अन्न प्रक्रिया उद्योगात लघु उद्योगांचा सहभाग वाढवण्यासाठी सुमारे 2 लाख सूक्ष्म आस्थापनांची  उभारणी केली जात आहे अशी माहिती त्यांनी दिली. “सरकारच्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ – ओडीओपी सारख्या योजना देखील छोटे शेतकरी आणि लघु उद्योगांना नवी ओळख मिळवून देत आहेत.

भारतातील महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या मार्गावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी अर्थव्यवस्थेत महिलांच्या वाढत्या योगदानाकडे लक्ष वेधले. यामुळे अन्नप्रक्रिया उद्योगाला फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. आज भारतातील 9 कोटींहून अधिक महिला बचत गटांशी जोडलेल्या  आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. हजारो वर्षांपासून भारतातील अन्न विज्ञानात महिला आघाडीवर आहेत, हे अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, भारतातील खाद्य पदार्थ आणि खाद्य विविधता ही भारतीय महिलांच्या कौशल्य आणि ज्ञानाचा परिणाम आहे. लोणची, पापड, चिप्स, मुरब्बा अशा अनेक उत्पादनांची बाजारपेठ महिला घरातूनच चालवत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांसाठी कुटीर उद्योग आणि बचत गटांना प्रत्येक स्तरावर प्रोत्साहन दिले जात आहे असे सांगत “भारतीय महिलांमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगाचे नेतृत्व करण्याची नैसर्गिक क्षमता आहे”, अशी टिपण्णी  पंतप्रधानांनी केली. आजच्या प्रसंगी 1 लाखांहून अधिक महिलांना कोट्यवधी रुपयांचे बीज भांडवल वितरित केल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

 

“भारतात जेवढी सांस्कृतिक विविधता आहे तेवढीच खाद्य विविधता आहे. भारतातील खाद्य वैविध्य हा जगातील प्रत्येक गुंतवणूकदारासाठी लाभांश आहे”, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. भारताविषयी जाणून घेण्याबाबत जगाची वाढलेली उत्सुकता लक्षात घेऊन जगभरातील खाद्य उद्योगांना भारताच्या खाद्य परंपरांमधून खूप काही शिकण्यासारखे आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. भारताची शाश्वत खाद्यसंस्कृती ही हजारो वर्षांच्या विकासाच्या प्रवासाचा परिणाम आहे, असे ते म्हणाले. भारताच्या हजारो वर्षांच्या शाश्वत खाद्यसंस्कृतीच्या उत्क्रांतीवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी भारताच्या पूर्वजांनी अन्नाच्या सवयी आयुर्वेदाशी जोडल्याचे अधोरेखित केले. “आयुर्वेदात ‘रित-भूक’ म्हणजे ऋतुमानानुसार आहार, ‘मित भूक’ म्हणजेच संतुलित आहार आणि ‘हित भूक’ म्हणजेच सकस आहार असे म्हटले आहे, जो भारताच्या वैज्ञानिक आकलनाचा महत्त्वाचा भाग आहे,” असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. भारतातील अन्नधान्य, खास करुन भारतातील मसाल्यांच्या व्यापाराचा जगावर होणारा शाश्वत परिणामही लक्षात घेण्याजोगा आहे, असे त्यांनी सांगितले. जागतिक अन्न सुरक्षेबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी अन्न प्रक्रिया उद्योगाने शाश्वत आणि निरोगी अन्न सवयींचे प्राचीन ज्ञान समजून घेण्याच्या आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या गरजेवर भर दिला. 2023 हे वर्ष जग आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करत असल्याची आठवण पंतप्रधानांनी करुन दिली. “भरड धान्य हे भारताच्या ‘सुपरफूड बकेट’चा एक भाग आहे आणि सरकारने त्याचे श्री अन्न म्हणून नामकरण केले आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. जरी शतकानुशतके जगातील अनेक संस्कृतींमध्ये भरड धान्याला जास्त प्राधान्य दिले जात असले तरी, गेल्या काही दशकांमध्ये भारतासह अनेक देशांमध्ये भरड धान्याचा आहारात समावेश करण्याची सवयी कमी झाल्या  असून यामुळे जागतिक आरोग्य, शाश्वत शेती तसेच शाश्वत अर्थ व्यवस्था यांचे मोठे नुकसान झाले आहे , असे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले, "भारताच्या पुढाकाराने, जगाभरामध्ये आहारात भरड धान्याला प्राधान्य संदर्भात जनजागृती मोहीम सुरू झाली आहे", असे पंतप्रधान म्हणाले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रसाराप्रमाणेच भरड धान्यदेखील जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या जी 20 शिखर परिषदेदरम्यान भारताला भेट देणार्‍या मान्यवरांसाठी भरड धान्यापासून बनवलेल्या पदार्थांचा तसेच बाजारात भरड धान्यावर प्रक्रिया करून बनवलेल्या खाद्यपदार्थांच्या उपलब्धतेचा त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी मान्यवरांना आहारात श्री अन्नाचा वाटा वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा करण्याचे तसेच उद्योग आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वसमावेशी मार्गदर्शक आराखडा तयार करण्याचे आवाहन केले.

जी -20 समूहाने  दिल्ली घोषणापत्रामध्ये शाश्वत शेती, अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेवर भर दिला आहे तसेच अन्न प्रक्रियेशी संबंधित सर्व भागीदारांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला आहे, याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. त्यांनी अन्न वितरण कार्यक्रमाला वैविध्यपूर्ण फूड बास्केटकडे नेण्यावर आणि परिणामस्वरुप कापणीनंतरचे पीकांचे नुकसान कमी करण्यावर भर दिला. तंत्रज्ञानाचा वापर करून धान्याचा अपव्यय कमी करण्यावरही त्यांनी भर दिला. अपव्यय कमी करण्यासाठी नाशवंत कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढवावे, ज्यामुळे शेतकर्‍यांना फायदा होईल आणि धान्याच्या किंमतीतील चढ-उतार रोखता येतील, असे आवाहन त्यांनी केले. भाषणाचा  समारोप करताना, पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे हित आणि ग्राहकांचे समाधान यांच्यात समतोल साधण्याची गरज अधोरेखित केली. या कार्यक्रमात काढलेले निष्कर्ष जगासाठी शाश्वत आणि अन्न-सुरक्षा असलेल्या  भविष्याचा पाया रचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिंह, केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री परशोत्तम रुपाला आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

बचत गटांना बळकट करण्यासाठी, पंतप्रधानांनी एक लाखाहून अधिक स्वयंसहायता  गट सदस्यांना बीज भांडवल सहाय्य वितरित केले. या मदतीमुळे स्वयंसहायता गटांना   सुधारित पॅकेजिंग आणि दर्जेदार उत्पादनाद्वारे बाजारपेठेत चांगली किंमत मिळवण्यात मदत होईल. पंतप्रधानांनी जागतिक भारतीय अन्न प्रदर्शन  2023 चा भाग म्हणून फूड स्ट्रीटचे उद्घाटनही केले. यामध्ये फूड स्ट्रीटवर प्रादेशिक पाककृती आणि शाही पाककृती वारसा असलेले खाद्य पदार्थ उपलब्ध असतील. यामध्ये 200 हून अधिक शेफ सहभागी होतील आणि पारंपारिक भारतीय पाककृती सादर करतील. त्यामुळे खाण्याच्या शौकींनांनसाठी हा एक अनोखा पाककलाविषयक  अनुभव असेल.

भारताला ‘जगातील फूड बास्केट’ म्हणून सिद्ध करणे आणि 2023 हे  आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम सरकारी संस्था, उद्योग व्यावसायिक, शेतकरी, नवउद्योजक आणि इतर भागधारकांना चर्चेत सहभागी होण्यासाठी, भागीदारी प्रस्थापित करण्यासाठी आणि कृषी-अन्न क्षेत्रात गुंतवणूकीच्या नवनवीन संधी शोधण्यासाठी नेटवर्किंग आणि व्यवसाय मंच प्रदान करेल. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज बैठकीत गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभीकरणाचे उपाय यावर भर आहे.

 

भारतीय अन्न प्रक्रिया उद्योगातील नावीन्य आणि सामर्थ्य दर्शविण्यासाठी विविध दालने उभारण्यात आली  आहेत. या कार्यक्रमात अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करणारी 48 चर्चा सत्रे आयोजित केली जाणार आहेत. या चर्चासत्रात आर्थिक सक्षमीकरण, गुणवत्ता हमी आणि यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानातील नवकल्पनांवर भर दिला जाईल.

या कार्यक्रमात 80 हून अधिक देशांतील प्रतिनिधींसह प्रमुख अन्न प्रक्रिया कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी होणार आहेत. याशिवाय 80 हून अधिक देशांतील 1200 हून अधिक परदेशी खरेदीदारांसह  खरेदीदार - विक्रेते बैठका देखील होतील. या उपक्रमात नेदरलँड्स भारताचा भागीदार देश म्हणून काम करेल, तर जपान हा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असेल.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
iPhone exports from India nearly double to $12.1 billion in FY24: Report

Media Coverage

iPhone exports from India nearly double to $12.1 billion in FY24: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 एप्रिल 2024
April 17, 2024

Holistic Development under the Leadership of PM Modi