पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष 2025 (ईएसटीआयसी) बैठकीला संबोधित केले.याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी देश-परदेशातील विज्ञानिक, नवोन्मेषकर्ते, शिक्षण क्षेत्राचे सदस्य तसेच इतर सन्माननीय पाहुण्यांचे स्वागत केले. आयसीसी महिला विश्वचषक 2025 स्पर्धेत भारतीय संघाने मिळवलेल्या उल्लेखनीय विजयाबद्दल बोलताना, भारतीय क्रिकेट संघाच्या या यशामुळे संपूर्ण देश आनंदित झाला आहे हे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. भारताने मिळवलेला हा पहिलाच महिला क्रिकेट विश्वचषक होता यावर अधिक भर देत त्यांनी महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. देशाला या क्रिकेटपटूंचा अभिमान आहे असे सांगत या खेळाडूंचे यश देशभरातील लाखो तरुणांना प्रेरणा देईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, काल भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विश्वात महत्त्वपूर्ण भरारी घेतली आहे.भारतीय शास्त्रज्ञांनी भारताच्या सर्वात वजनदार दळणवळण उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाला अधोरेखित करत त्यांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व शास्त्रज्ञांचे तसेच भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) हार्दिक अभिनंदन केले. आजचा दिवस विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी महत्त्वाचा दिवस आहे यावर त्यांनी अधिक भर दिला. 21 व्या शतकात उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांना योग्य दिशा देण्यासाठी जागतिक तज्ञांनी एकत्र येऊन विचार विनिमय करण्याची गरज निर्माण झाली. या गरजेने, एका संकल्पनेला जन्म दिला आणि त्यातून या बैठकीचा विचार जन्माला आला असे त्यांनी सांगितले. विविध मंत्रालये, खासगी क्षेत्र, स्टार्ट अप्स आणि विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातील सहभागाची त्यांनी नोंद घेतली. ते म्हणाले की, आज आपल्यामध्ये नोबेल पुरस्कार विजेते उपस्थित आहेत ही सन्मानाची बाब आहे. या प्रसंगी सर्व उपस्थितांचे स्वागत करून त्यांनी बैठक यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

21 वे शतक हा अभूतपूर्व परिवर्तनाचा काळ होता हे अधोरेखित करत पंतप्रधान मोदी म्हणाले की जागतिक व्यवस्था एका नव्या बदलाला सामोरी जात आहे आणि बदलाचा हा वेग एकरेषीय नसून घातांकी आहे. याच दृष्टीकोनासह, भारत उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषयांच्याशी संबंधित विविध पैलूंमध्ये प्रगती करत असून त्यांच्यावर सातत्याने लक्ष एकाग्र करत आहे. उदाहरणादाखल त्यांनी संशोधनाला दिल्या जाणाऱ्या निधीचा विषय अधोरेखित केला आणि त्यांनी ‘जय जवान, जय किसान’ च्या परिचित राष्ट्रीय संकल्पनेचे स्मरण करून दिले तसेच संशोधनावर नव्याने भर देण्यात आल्याची बाब नमूद केली. ते म्हणाले की संशोधनावर नव्याने भर देण्यासह यामध्ये ‘जय विज्ञान’ आणि ‘जय अनुसंधान’ या नव्या संकल्पना जोडण्यात आल्या आहेत. भारतीय विद्यापीठांमध्ये संशोधन आणि नवोन्मेष यांचे प्रमाण वाढवण्यासाठी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. याशिवाय, पंतप्रधानांनी 1 लाख कोटी रुपयांच्या तरतुदीसह एका नव्या संशोधन, विकास आणि नवोन्मेष योजनेची सुरुवात करत असल्याची घोषणा केली. खासगी क्षेत्रात देखील संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत हे त्यांनी ठळकपणे नमूद केले. “पहिल्यांदाच, अधिक जोखमीच्या आणि उच्च-प्रभाव साधणाऱ्या प्रकल्पांसाठी भांडवल उपलब्ध करून दिले जात आहे,” मोदी म्हणाले.
आर्थिक नियम आणि खरेदी विषयक धोरणांच्या बाबतीत सरकारने अनेक सुधारणा हाती घेतल्या आहेत हे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले, “भारत एक आधुनिक नवोन्मेष परिसंस्था उभारण्याच्या दिशेने कार्यरत असून संशोधन करण्यातील सुलभता सुधारण्यावर अधिक लक्ष एकाग्र करत आहे.” याव्यतिरिक्त, प्रोटोटाईप्स म्हणजेच नमुने प्रयोगशाळेतून बाजारापर्यंत वेगाने पोहोचतील याची खात्री करून घेण्यासाठी नियम, अनुदाने आणि पुरवठा साखळ्या यांच्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत.
भारताला नवोन्मेष विषयक मुख्य केंद्र बनवण्यासाठी अलीकडच्या वर्षांमध्ये तयार केलेली धोरणे आणि घेतलेले निर्णय यांचे परिणाम आता दिसू लागले आहेत यांवर अधिक भर देत पंतप्रधानांनी अभिमानाने याविषयीची आकडेवारी सामायिक केली. गेल्या दशकभरात भारताचा संशोधन आणि विकासविषयक व्यवसाय दुप्पट झाला आहे; नोंदणीकृत पेटंटच्या संख्येत 17 पटींनी वाढ झाली आहे; आणि भारत आता जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्ट अप परिसंस्था असलेला देश झाला आहे. सध्या भारतात 6,000 हून अधिक गहन-तंत्रज्ञान विषयक स्टार्ट अप्स स्वच्छ उर्जा आणि प्रगत द्रव्यांच्या क्षेत्रात कार्यरत आहेत हे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारतातील सेमीकंडक्टर क्षेत्र आता भरारी घेत आहे. त्यांनी भारतातील जैव-अर्थव्यवस्थेची वाढ देखील अधोरेखित केली. 2014 मध्ये 10 अब्ज डॉलर्स मूल्याची असलेली ही अर्थव्यवस्था आता सुमारे 140 अब्ज डॉलर्स मूल्याची झाली आहे असे त्यांनी सांगितले.

अलीकडच्या काही वर्षांत भारताने, हरित हायड्रोजन, क्वांटम गणन, गहन समुद्रातील संशोधन आणि महत्त्वाच्या खनिजांच्या क्षेत्रांत लक्षणीय झेप घेतली आहे हे अधोरेखित करत, भारताने या सर्व क्षेत्रांमध्ये आश्वासक उपस्थिती नोंदवली आहे हे मोदी यांनी ठळकपणे सांगितले.
“जेव्हा विज्ञानाचे प्रमाणात व्यापक होते, जेव्हा नवोन्मेष समावेशक होतो, जेव्हा तंत्रज्ञान परिवर्तनाला चालना देते तेव्हा महान कामगिरीचा पाया रचला जातो,” पंतप्रधान म्हणाले. गे;या 10-11 वर्षांमधील भारताची वाटचाल या विचाराचे उदाहरण ठरतो असे ते म्हणाले. भारत आता तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक राहिला नाही, तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारत परिवर्तनाचा अग्रदूत बनला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. कोविड-19 महामारीदरम्यान भारताने विक्रमी वेळात स्वदेशी लस विकसित केली आणि जगातील सर्वात भव्य लसीकरण कार्यक्रम राबवला याची त्यांनी उपस्थितांना आठवण करून दिली.
भारत अशा प्रचंड प्रमाणात धोरणे आणि कार्यक्रम यशस्वीपणे कसा राबवू शकला आहे यावर विचार व्यक्त करत पंतप्रधानांनी या कामगिरीचे श्रेय भारताच्या जागतिक पातळीवरील आघाडीच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांना दिले. देशातील दोन लाखांहून अधिक ग्राम पंचायती ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आल्या असून संपूर्ण देशात मोबाईल डाटाचे लोकशाहीकरणकरण्यात आले आहे हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
भारताचा अंतराळ कार्यक्रम चंद्र आणि मंगळावर पोहोचला आहेच; त्यासह अवकाश विज्ञान अनुप्रयोगांद्वारे शेतकरी आणि मच्छिमारांना लाभ व्हावा यासाठीही त्याचा वापर केला जात आहे, असे मोदी यांनी नमूद केले. या यशामागील सर्व संबंधितांच्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली.
जेव्हा नवोन्मेष सर्वसमावेशक असतो तेव्हा; त्याचे प्राथमिक लाभार्थी देखील त्याचे नेते बनतात, असे समावेशक नवोन्मेषाचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधानांनी सांगितले. भारतीय महिला हे या परिवर्तनाचे सर्वात उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. जेव्हा जेव्हा भारताच्या अंतराळ मोहिमांची जागतिक स्तरावर चर्चा केली जाते, तेव्हा भारतीय महिला शास्त्रज्ञांना लक्षणीय मान्यता मिळते, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. एक दशकापूर्वी भारतात महिलांकडून दरवर्षी 100 पेक्षा कमी पेटंट दाखल केले जात होते, तर आज ही संख्या दरवर्षी 5000 पेक्षा अधिक झाली आहे,असे पेटंट दाखल करण्याच्या क्षेत्राचे उदाहरण देत त्यांनी निदर्शनास आणून दिले.भारतातील STEM शिक्षण नोंदणीमध्ये महिलांचे प्रमाण आता सुमारे 43 टक्के आहे, जे जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे, असे त्यांनी पुढे अधोरेखित केले. हे आकडे भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांच्या जलद प्रगतीचे प्रतिबिंब असल्याचे ते म्हणाले.

इतिहासातील काही क्षण पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचे कायमचे स्रोत म्हणून निरंतर काम करतात,असे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले
काही वर्षांपूर्वी, भारतातील मुलांनी चांद्रयानाचा प्रवास कसा होतो तो पाहिला, त्यातील अडथळे आणि यश अनुभवले आणि विज्ञानाबद्दल त्यांच्या मनात सुप्त आकर्षण कसे निर्माण केले गेले याचे स्मरण त्यांनी करून दिले. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या अलीकडील अंतराळ स्थानक मोहिमेमुळे मुलांमध्ये अतिशय उत्सुकता निर्माण झाली आहे, असे त्यांनी नमूद केले. तरुण पिढीत जागृत होत जाणाऱ्या या जिज्ञासूपणाचा वापर करण्याच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी सांगितले की भारतातील जितके हुशार तरुण विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाकडे वळतील तितका देशाचा उत्कर्ष होईल. या अनुषंगाने, त्यांनी माहिती दिली की देशभरात सुमारे 10,000 अटल टिंकरिंग लॅब स्थापन करण्यात आल्या आहेत, जिथे एक कोटींहून अधिक मुले कुतूहल आणि सर्जनशीलतेसह वैज्ञानिक प्रयोग करत आहेत. या प्रयोगशाळांच्या यशाने प्रोत्साहित होऊन, 25,000 नवीन अटल टिंकरिंग लॅब्स स्थापन केल्या जातील अशी घोषणा त्यांनी केली. अलिकडच्या काळात शेकडो नवीन विद्यापीठे स्थापन करण्यात आली आहेत, ज्यात सात नवीन आयआयटी आणि सोळा ट्रीपल आयआयआयटी यांचा समावेश आहे, असेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. नवीन शिक्षण धोरणांतर्गत, विद्यार्थ्यांना आता त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये विज्ञान आणि अभियांत्रिकीसारखे स्टेम (STEM) अभ्यासक्रम शिकता येतील हे सुनिश्चित करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
तरुण संशोधकांमध्ये पंतप्रधान संशोधन फेलोशिप अत्यंत यशस्वी ठरली आहे आणि या योजनेअंतर्गत अनुदान देऊन त्याला सक्षमपणे आधार देत आहोत हे अधोरेखित करून, पुढील पाच वर्षांत, देशात संशोधन आणि विकास अधिक मजबूत करण्यासाठी 10,000 फेलोशिप देण्यात येतील,अशी घोषणा मोदी यांनी केली.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाची परिवर्तनकारी शक्ती समजून घेण्याची आणि ती नैतिक आणि सर्वसमावेशक राहतील याची खात्री करण्याची गरज आहे ,यावर पंतप्रधानांनी भर दिला. कृत्रिम बुद्धिमत्तेचे उदाहरण देत त्यांनी सांगितले, की किरकोळ विक्री आणि लॉजिस्टिक्सपासून ग्राहक सेवा आणि मुलांच्या गृहपाठापर्यंत त्याचा झालेला व्यापक वापर आपण लक्षात घेतला पाहिजे.

“समाजातील प्रत्येक घटकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता लाभदायी बनवण्यासाठी भारतात काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. इंडिया एआय मिशन अंतर्गत, 10,000 कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली जात आहे.
“भारत नैतिक आणि मानव-केंद्रित कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी जागतिक चौकट तयार करत आहे,”असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासकीय आराखडा (एआय गव्हर्नन्स फ्रेमवर्क) हे या दिशेने एक मोठे पाऊल असेल, ज्याचे उद्दिष्ट नवोन्मेष आणि सुरक्षितता यांचा एकत्रितपणे विकसित करणे हा आहे. भारत फेब्रुवारी 2026 मध्ये जागतिक एआय शिखर परिषदेचे आयोजन करेल, ज्याद्वारे सर्वसमावेशक, नैतिक आणि मानव-केंद्रित एआयच्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांना गती मिळेल,अशी घोषणा मोदी यांनी केली.
विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये होत असलेल्या तीव्र प्रयत्नांचे आवाहन करताना, मोदी यांनी अन्न सुरक्षेपासून पोषण सुरक्षेकडे वळण्याचे आवाहन करत अनेक कल्पना मांडल्या. जागतिक स्तरावर कुपोषणाचा सामना करण्यासाठी भारत पुढील पिढीतील जैव-सुदृढ पिके विकसित करू शकेल का?
कमी किमतीच्या जमिनीचे आरोग्य वाढवणाऱ्या आणि जैव-खतांमधील नवोपक्रम रासायनिक मातीला पर्याय म्हणून काम करू शकतात आणि मातीचे आरोग्य सुधारू शकतात का? वैयक्तिक औषध आणि रोगांचे अंदाज वाढवण्यासाठी भारत त्याच्या जीनोमिक विविधतेचे चांगले मॅपिंग आपण करू शकतो का?बॅटरीसारख्या स्वच्छ ऊर्जा साठवणूक क्षेत्रात नवीन आणि परवडणाऱ्या किंमतीत उत्पादन करणारे नवोपक्रम विकसित करता येतील का?: असे अनेक महत्त्वाचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.ज्यासाठी भारत जगावर अवलंबून आहे,अशा महत्त्वाच्या बाबी ओळखणे आणि त्या क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरता साध्य करणे शक्य आहे का याचा विचार करा,असे आवाहन त्यांनी संबंधितांना केले.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील जगातील अभ्यासक विचारलेल्या प्रश्नांच्या पलीकडे जाऊन नवीन शक्यतांचा शोध घेतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. प्रत्येक कल्पक वैज्ञानिकाला त्यांनी पाठिंबा दर्शविला आणि संशोधनासाठी निधी आणि शास्त्रज्ञांना संधी उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या पूर्ण वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या परिषदेतून एक सामुहिक नकाशा तयार व्हावा अशी आकांक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
ही परिषद भारताच्या नवोन्मेषाच्या प्रवासाला अधिक उंचीवर नेईल असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व सहभागींना शुभेच्छा देऊन त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला आणि "जय विज्ञान, जय अनुसंधान" ही घोषणा दिली.
केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह, भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद, नोबेल पुरस्कार विजेते सर आंद्रे गीम आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पार्श्वभूमी
देशातील संशोधन आणि विकास परिसंस्थेला मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधानांनी1 लाख कोटी रुपयांचा संशोधन विकास आणि नवोन्मेष (RDI) योजना निधी सुरू केला. या योजनेचा उद्देश देशातील खाजगी क्षेत्राद्वारे संशोधन आणि विकास परिसंस्थेला प्रोत्साहन देणे हा आहे.

3-5 नोव्हेंबर 2025 दरम्यान एस्टिक (ESTIC) 2025- परीषद आयोजित केली जात आहे. या परिषदेत नोबेल पारितोषिक विजेते, प्रख्यात शास्त्रज्ञ, नवोन्मेषक आणि धोरणकर्ते यांच्यासह शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था, उद्योग आणि सरकारमधील असे 300 हून अधिक प्रतिनिधी एकत्र येतील.
प्रगत साहित्य आणि उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, जैव-उत्पादने, ब्लू इकॉनॉमी (पर्यावरणपूरक आर्थिक व्यवहार) डिजिटल कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर उत्पादन, उदयोन्मुख कृषी तंत्रज्ञान, ऊर्जा, यासह 11 प्रमुख विषयांवर यामध्ये चर्चा केली जाईल.ESTIC 2025 मध्ये पर्यावरण आणि हवामान, आरोग्य आणि वैद्यकीय तंत्रज्ञान, क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञान,या विषयांवर
आघाडीच्या शास्त्रज्ञांची भाषणे, गट चर्चा, सादरीकरणे आणि तंत्रज्ञान प्रदर्शने असतील, ज्यामुळे भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान परिसंस्थेला बळकटी देत संशोधक, उद्योग आणि तरुण नवोन्मेषकांमध्ये सहकार्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होईल.
संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा
We are focusing on Ease of Doing Research so that a modern ecosystem of innovation can flourish in India. pic.twitter.com/wNvUcUDw9Z
— PMO India (@PMOIndia) November 3, 2025
When science meets scale,
— PMO India (@PMOIndia) November 3, 2025
When innovation becomes inclusive,
When technology drives transformation,
The foundation for great achievements is laid. pic.twitter.com/R3YH8kxhIS
India is no longer just a consumer of technology. It has become a pioneer of transformation through technology. pic.twitter.com/nvwH0dhzMg
— PMO India (@PMOIndia) November 3, 2025
Today, India has the world's most successful digital public infrastructure. pic.twitter.com/EZ2lOJXM9I
— PMO India (@PMOIndia) November 3, 2025
Today, India is shaping the global framework for ethical and human-centric AI. pic.twitter.com/rSUIJMRzSb
— PMO India (@PMOIndia) November 3, 2025


