भारत आज प्रतिबंधात्मक आणि सर्वांगीण आरोग्याची दृष्टी बाळगून काम करत आहे - पंतप्रधान
गेल्या काही वर्षांत देशातील पायाभूत आरोग्य सुविधा अधिक मजबूत झाल्या आहेत; शेकडो जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली आहेत, आयुष्मान भारत योजना आणि आरोग्य मंदिरांमार्फत प्रत्येक गावापर्यंत आरोग्यसेवेची व्याप्ती वाढली आहे: पंतप्रधान
आपले योग आणि आयुर्वेद सर्व जगात लोकप्रिय होत आहेत - पंतप्रधान
आपल्या शिक्षण व्यवस्थेला वास्तव जगातील अर्थव्यवस्थेशी जोडण्याच्या प्रक्रियेचा वेग आपण आणखी वाढविला पाहिजे; कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ऑटोमेशन, डिजिटल अर्थव्यवस्था आणि डिझाइन-प्रेरित उत्पादन आदी विषयांकडे अधिक लक्ष देण्याची गरज - पंतप्रधान
भारताची नवोन्मेष-प्रेरित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल - पंतप्रधान
आपण भविष्यकालीन तंत्रज्ञानासाठी तयार होत असताना, संधींच्या अभावामुळे एकही मुलगी मागे राहू नये हे अत्यंत महत्त्वाचे - पंतप्रधान
गेल्या काही वर्षांत क्रीडा क्षेत्र हे राष्ट्रीय विकासाचा महत्त्वाचा घटक; ‘खेलो इंडिया’ सारख्या उपक्रमांमुळे देशातील क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा, देशभरात पायाभूत क्रीडा सुविधांचे बळकटीकरण - पंतप्रधान

अर्थसंकल्पानंतर सुरू करण्यात आलेल्या वेबिनार मालिकेतील चौथ्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला संबोधित केले. ‘सब का साथ सब का विकास – जनतेच्या आकांक्षांची पूर्तता’ असा या भागाचा विषय होता. शिक्षण, कौशल्य, आरोग्य, पर्यटन, क्रीडा आणि संस्कृती ही क्षेत्रे जनतेच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठीची मुख्य साधने असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. अर्थसंकल्पातील घोषणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांचे त्यांनी स्वागत केले. “जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणे हा केवळ एक विषय नाही; तर तो या अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश आणि सरकारचा निश्चय आहे,” असे मोदी यांनी स्पष्ट केले.

प्रतिबंधात्मक आणि सर्वांगीण आरोग्याच्या मुद्द्यावर भर देताना पंतप्रधानांनी पायाभूत आरोग्य सुविधांचे वेगाने बळकटीकरण आणि योग व आयुर्वेदाच्या जागतिक लोकप्रियतेचा उल्लेख केला. शेकडो जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत, आयुष्मान भारत योजना आणि आरोग्य मंदिरांमार्फत आरोग्यसेवांची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

 

त्यांनी उदयोन्मुख ‘केअर इकॉनॉमी’कडे लक्ष वेधले आणि जागतिक स्तरावर केअरगिव्हर्सची वाढती मागणी लक्षात घेता युवकांना सक्षम करण्यासाठी नवीन प्रशिक्षण मॉडेल्स विकसित करण्याचे आवाहन केले. “या वेबिनारमध्ये उपस्थित आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना मी विनंती करतो की नवा प्रशिक्षण कार्यक्रम आणि भागीदारी विकसित करण्याबाबत सूचना द्याव्यात, जेणेकरून देशातील प्रशिक्षण व्यवस्था अधिक मजबूत होईल,” असे मोदी म्हणाले.

आरोग्यसेवांमधील डिजिटल परिवर्तनाबाबत बोलताना पंतप्रधानांनी दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्यात टेली-मेडिसिनचे माध्यम यशस्वी ठरल्याचा उल्लेख केला. या माध्यमाच्या वाढीची दखल घेताना पंतप्रधानांनी वापरकर्त्यांसाठी हा अनुभव अधिकाधिक सुलभ करण्याची आणि जनजागृती वाढविण्याची गरज अधोरेखित केली. “माझ्या मते टेली-मेडिसिनबाबत जागरूकता आणि वापराची सुलभता आणखी वाढविण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.

भारतीय युवकांची बदलती मानसिकता हे देशाचे सर्वात मोठे सामर्थ्य असल्याचे सांगून पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले आणि या वृत्तीला साजेशी शिक्षण व्यवस्था निर्माण करावी असे आवाहन केले. देशात शिक्षणाला रोजगार आणि उद्योजकतेशी जोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण एका अशा अभ्यासक्रमाचा पाया प्रदान करते जो बाजारातील मागणी आणि प्रत्यक्ष जगातील अर्थव्यवस्था, प्रामुख्याने कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन आणि डिजिटल अर्थव्यवस्था यांसारख्या क्षेत्राशी सुसंगत असणे अनिवार्य आहे. आपली शिक्षण व्यवस्था प्रत्यक्ष जगातील अर्थव्यवस्थेशी जोडण्याच्या प्रक्रियेला आपण गती दिली पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. शिक्षण, रोजगार आणि उद्योग यांच्यातील संबंध, अधोरेखित करताना पंतप्रधानांनी अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स या क्षेत्रांना चालना देण्यावर भर दिला. भारत आता नवोन्मेष चलित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असल्याचे सांगून पंतप्रधानांनी शैक्षणिक संस्थांना त्यांच्या संकुलाचे रुपांतर उद्योग सहयोगी आणि संशोधन चलित अध्ययन व्यवस्थेत करण्याचे आवाहन केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जगातील आवश्यक अनुभव मिळू शकेल. या वेबिनारमध्ये आपल्या कॅम्पसना उद्योग सहकार्य आणि संशोधनाधारित शिक्षणाची केंद्रे म्हणून विकसित करण्याबाबत नक्कीच सखोल चर्चा  व्हावी, अशी मी आपणास विनंती करतो,” असे पंतप्रधान म्हणाले.

 

STEM म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या चार महत्त्वाच्या शिक्षण क्षेत्रांमध्ये महिलांची वाढती संख्या ही अभिमानाची बाब असून भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्रात मुलींना समान संधी देण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध आहे, असे पंतप्रधान म्हणाले. युवा संशोधकांना कोणत्याही अडथळ्यांविना नवकल्पना आणि प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या चैतन्यदायी संशोधन परिसंस्थेच्या निर्मितीचे आवाहन करुन पंतप्रधानांनी सांगितले की आपल्याला अशा प्रकारची संशोधन परिसंस्था निर्माण करायची आहे जिथे आपल्या युवा संशोधकांना नवनवीन प्रयोग करण्यासाठी आणि नवकल्पना पडताळून पाहण्यासाठी विपुल संधी उपलब्ध होतील.

क्रीडा क्षेत्राविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, निरोगी आणि शिस्तबद्ध युवा लोकसंख्या ही देशाच्या सामर्थ्याचा कणा आहे. त्यांनी खेलो इंडिया स्पर्धांमुळे साध्य झालेल्या परिणामांचे उदाहरण दिले आणि लहान शहरे आणि प्रदेशांमधूनही युवा प्रतिभा ओळखण्याची, क्रीडा संस्थांचे व्यावसायिकीकरण करण्याची आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि ऑलिंपिक बोलीसारख्या आगामी स्पर्धांसाठी तयारी करण्यासाठी खेळाडूंना संरचित आर्थिक पाठबळ सुधारण्याची गरज यावर भर दिला. अशा परिस्थितीत आपल्याला आजच तरुण खेळाडूंना ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन घडवावे लागेल; तेव्हाच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचा झेंडा उंच फडकेल,” असे त्यांनी सांगितले.

रोजगार निर्मितीला चालना देण्यातील पर्यटन आणि संस्कृती या क्षेत्रांच्या क्षमतेचा उल्लेख करुन ते म्हणाले की पारंपरिक स्थळांपेक्षा वेगळ्या नवीन स्थळांना विकसित केल्यास शहरांचे  ब्रँडिंग आणि एकूण विकास वाढतो. भागधारकांनी कौशल्य, कनेक्टिव्हिटी, समुदायाचा सहभाग या सर्वांचा अंतर्भाव असलेल्या सर्वांगीण दृष्टिकोनावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन त्यांनी केले. आता आपण देशातील पर्यटनस्थळांचा नव्याने विकास करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत,” असे पंतप्रधान म्हणाले.

"प्रशिक्षित गाईड्स, आदरातिथ्य कौशल्य, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि समुदाय सहभाग ही आता पर्यटन क्षेत्राचे स्तंभ बनत आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. याबरोबरच स्वच्छता आणि शाश्वत पद्धती देखील आवश्य आहेत. आपण सर्वजण भारताला पर्यटनाचे जागतिक आकर्षणाचे केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करत असताना पर्यटन आणि त्यासंबंधित क्षेत्रांशी निगडित तुम्हा सर्वांच्या सूचना अतिशय महत्त्वाच्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्राच्या प्रगतीसाठी संस्था, उद्योगजगत आणि शिक्षण संस्था यांच्यात समन्वय असणे महत्त्वाचे आहे यावर भर देऊन पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले की आज झालेले विचारमंथन भविष्यासाठी एक दिशादर्शक मार्ग दर्शवेल आणि विकसित भारताच्या पायाला अधिक मजबूत करेल. "या प्रयत्नांच्या साथीने विकसित भारताचा पाया अधिक मजबूत होईल" असे सांगून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Cheese from India makes its mark globally’: PM Modi lauds Indian winners at Mundial do Queijo

Media Coverage

‘Cheese from India makes its mark globally’: PM Modi lauds Indian winners at Mundial do Queijo
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 23 एप्रिल 2026
April 23, 2026

Inclusive Innovation: Empowering Every Citizen in the New India Under the Leadership of PM Modi