शेअर करा
 
Comments
उत्तर प्रदेशातल्या वाराणसी येथे विविध विकास कार्याक्रमांचा शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आला, या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी यांनी केलेले भाषण

हर हर महादेव!!!

भक्ती, आस्था, पवित्रता यांनी युक्त अशा सूर्य उपासनेचे पर्व ‘छठ’ पूजेनिमित्त सर्व माता भगिनी यांना खूप शुभेच्छा!!

प्रत्येक घरामध्ये, सर्व कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदावी, अशी कामना या चार दिवसांच्या पर्वामध्ये मी व्यक्त करतो.

आपण सर्व लोकांनी दिवाळी साजरी केली असेल, भाऊबीज, गोवर्धन पूजा आणि त्यानंतर देव दिवाळीची तयारी केली असणार. या सर्व सणांनिमित्त सर्वांना एकत्रित शुभेच्छा देतो.

व्यासपीठावर उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळामधील माझे सहयोगी नितीन गडकरी जी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्या जी, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री श्री सुरेश खन्ना जी, संसदेमधले माझे सहकारी डॉ. महेंद्रनाथ पांडे जी, आणि श्री रामचरित निशाद जी, इथे उपस्थित असलेले इतर मान्यवर आणि माझ्या प्रिय वाराणसीचे बंधू तसेच भगिनींनो,

 

मित्रांनो,

दसरा आणि दीपावली या मोठ्या सणांच्यानंतर लगेचच आज पुन्हा एकदा आपल्या सर्व काशीवासियांना भेटण्याची संधी मला मिळाली आहे. यावेळी दीपावलीच्या दिवशीच मला बाबा केदारनाथ यांचे दर्शन करण्याचे भाग्य लाभले. आणि आता त्यानंतर अवघ्या एक आठवड्याच्या आत बाबा विश्वनाथ यांच्या नगरीमध्ये आपले आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली आहे. उत्तराखंडमध्ये माता भागीरथीची पूजा करून मनामध्ये धन्यतेचे भाव निर्माण झाले. तर आज या इथे, काही वेळापूर्वी गंगामातेचे दर्शन घेण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले.

आज सन्माननीय मालवीय जी यांची पुण्यतिथीही आहे. त्यांनी केलेल्या महान कार्याला, त्यांच्या तपस्येला आज मी आदरपूर्वक वंदन करतो.

मित्रांनो, काशीसाठी, पूर्वांचलसाठी, पूर्वेकडील भारतासाठी, संपूर्ण भारतवर्षासाठी आजचा हा दिवस  ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा ठरणार आहे.

– आज वाराणसी आणि संपूर्ण देश, विकासाच्या एका महत्वपूर्ण कार्याचे साक्षीदार बनले आहेत. जे कार्य काही दशकांपूर्वीच होणे आवश्यक होते, परंतु ते होवू शकले नाही.

– आज वाराणसी आणि देश, आणखी एका गोष्टीचे साक्षीदार बनले आहेत, ती गोष्ट म्हणजे, जर एखादा संकल्प केला आणि कार्याला प्रारंभ केला तर ते काम अगदी नियोजित वेळेमध्येच पूर्ण होवू शकते. अशा प्रकारे संकल्पाची सिद्धी झाली तर त्याविषयी किती भव्य प्रतिमा निर्माण होते, त्या कामाचे भवितव्य किती उज्ज्वल असते, ते काम किती गौरवमयी होते, याची साक्ष सर्वांना पटणार आहे.

– आज वाराणसी आणि देश, आणखी एका गोष्टीचा साक्षीदार बनणार आहे. पुढच्या पिढीसाठी अद्ययावत पायाभूत सुविधा म्हणजे नेमक्या कशा असणार, त्याचा नेमका अवाका किती प्रचंड असणार आहे, याची व्याप्ती किती असणार आहे, देशामध्ये वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे कायाकल्प करण्यात येत आहे.

देशाचा प्रधान सेवक या नात्याने आणि त्याचबरोबर वाराणसीचा खासदार या नात्याने माझ्यासाठी आज दुहेरी आनंदाची गोष्ट आहे. या पवित्र भूमीशी प्रत्येकाचा संबंध आध्यात्मिक असतोही, आज जल-थल-नभ, या तिघांना जोडणा-या नवीन ऊर्जेचा संचार  या क्षेत्रामध्ये झाला आहे.

मित्रांनो, आत्ताच काही वेळापूर्वी नदीमार्गे पोहोचलेल्या देशाच्या पहिल्या कंटेनरचे  स्वागत केले. या स्वागताबरोबरच 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बनवण्यात आलेल्या ‘मल्टी मॉडेल टर्मिनल’चे राष्ट्रार्पणही करण्यात आले. हे  काम सुरू होण्यासाठी काही दशकांचा विलंब झाला, इतका दीर्घ  कालावधी गेला. तरीही आज मी प्रफुल्लित आहे, आनंदी आहे. याचे कारण म्हणजे देशाने जे स्वप्न पाहिले होते, ते आज काशीच्या भूमीवर साकार झाले आहे. अशा प्रकारे कंटेनर व्हेसल चालवण्याचा अर्थ आहे की, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्वांचल आणि पूर्व भारत आता जलमार्गाच्या माध्यमातून बंगालच्या खाडीबरोबर जोडला गेला आहे.

बंधू आणि भगिनींनो,

आज इथे बाबतपुरा विमानतळ ते शहराला जोडणा-या रस्त्याच्या कामाचा, रिंग रोडचा, काशी शहराला जोडणा-या प्रकल्पाचा,  भूमीगत विद्युतवाहिनी टाकण्याचा, गंगामातेला प्रदूषणमुक्त करण्याच्या योजनेचा लोकार्पण आणि शिलान्यास कार्यक्रम करण्यात आला आहे. या सर्व प्रकल्पांसाठी जवळ जवळ अडीच हजार  कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्च येणार आहे. या प्रकल्पांमुळे आम्ही बनारसची प्रतिमा आणखी भव्य आणि दिव्य बनवणार आहोत. या सर्व प्रकल्पांसाठी मी सर्व काशीवासियांचे आणि संपूर्ण पूर्वांचल क्षेत्राचे अगदी हृदयापासून अभिनंदन करतो.

 

मित्रांनो,

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये पहिल्यांदाच असा नदीमार्गे व्यापार सुरू केला आहे. वाढत्या कारभारासाठी इतक्या व्यापक स्तरावर जलमार्ग वापरण्यासाठी आता आपण सक्षम झालो आहोत. चार वर्षांपूर्वी ज्यावेळी मी बनारस ते हल्दिया यांना जलमार्गाव्दारे जोडण्याचा विचार पहिल्यांदा सर्वांसमोर ठेवला होता, त्यावेळी अनेकांनी त्या विचाराची चेष्टा केली होती. इतकेच नाही तर या प्रकल्पाविषयी अनेक नकारात्मक पैलूही सांगितले होते. या घटनेला आपण सर्व काशीवासी साक्षी आहात. आता आपल्यासमोरच काही वेळापूर्वी कोलकत्यावरून आलेल्या या जहाजाने सर्व टीकाकारांना आपोआपच उत्तर मिळाले आहे.

देशांतर्गत जलमार्गाने आलेला हा पहिला मालवाहू कंटेनर केवळ माल वाहून नेण्याच्या प्रक्रियेचा हिस्सा नाही, तर नवीन भारताच्या नवीन ‘व्हिजन’चा जीवंत पुरावा आहे. या देशामध्ये असलेल्या स्त्रोतांवर आणि या देशाच्या सामर्थ्‍यावर जो भरवसा दाखवण्याचा आम्ही जो विचार करतो, त्याचे हे प्रतीक आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

आज वाराणसीमध्ये जो कंटेनर वेसल आला आहे, त्यामधून कोलकत्यावरून औद्योगिक माल आला आहे आणि आता हे जहाज इथून शेतीसाठी लागणारी खते घेवून परत जाणार आहे. याचा अर्थ उत्तर प्रदेश, पूर्वांचल या भागामध्ये खतांबरोबरच इतर जितके कारखाने आहेत, जो काही माल या भागात बनवला जातो, तो आता थेट पूर्व भारतामधल्या बंदरापर्यंत पोहोचू शकणार आहे.

हे तर मी आपल्याला एक उदाहरण दिले आहे. आता वाराणसी आणि या परिसरामध्ये पिकणा-या भाज्या, अन्नधान्य, माझ्या विणकर बंधूंनी तयार केलेल्या वस्तू, माल, याच जलमार्गाव्दारे जावू शकणार आहे. आता आपणच विचार करा, आता इथल्या शेतकरी वर्गाला, लघुउद्योगाशी जोडले गेलेल्या लाखो लोकांना व्यापारासाठी किती चांगला, सोईचा, मोठा मार्ग आता खुला झाला आहे. आपल्या उद्योगांसाठी, कृषी क्षेत्रासाठी काही आवश्यक असलेल्या गोष्टी , कच्चा माल मागवणे आता सोपे, स्वस्त झाले आहे. असा कच्चा माल आल्यानंतर त्या मालाच्‍या  मूल्यवर्धनाची प्रक्रिया करून तो  पुन्हा विक्रीसाठी पाठवण्यामध्ये या जलमार्गाची खूप महत्वपूर्ण भूमिका असणार आहे.

आपले प्रेम, आपला उत्साह यासाठी मी आपल्याला खूप -खूप धन्यवाद देतो. लोकांना मी बोलावं आणि आपण ऐकावं असं वाटतंय. याबद्दल आणि आपण दाखवत असलेला उत्साह, प्रेम पाहून मी आपले आभार व्यक्त करतो. परंतु आपण सर्वांनी ही प्रचंड ऊर्जा थोडी वाचवली पाहिजे. 2019 मध्ये हीच ऊर्जा उपयोगी पडणार आहे. मग मी बोलण्यास प्रारंभ करू का? आपण सर्वजण शांतचित्ताने ऐकणार आहात की आता फक्त ‘मोदी-मोदी’ करत राहणार आहात? मी आज आपल्या सर्वांचे आभार मानतो. नवयुवकांनी इतक्या प्रेमाने, इतक्या उत्साहाने उपस्थिती दर्शवली आहे. आज खूप मोठ्या संख्येने काशीचे नागरिक आले आहेत.त्यांना सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने जाणून, समजून घ्यायच्या आहेत. सर्व बाबतीत कशा प्रकारे बदल घडून येत आहेत, आणखी कसे परिवर्तन घडून येणार आहे, हे मी जरा बारकाईने, आ‍णखी तपशीलासह, खोलवरची माहिती देवून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.

आगामी काही दिवसात, ज्यावेळी वाराणसी इथं बनलेल्या या ‘मल्टी मॉडेल टर्मिनल’मधून ‘रो-रो’ सेवा थेट सुरू होईल, त्यावेळी खूप लांबचा पल्ला गाठण्यासाठी आणि खूप दूरच्या अंतरावर माल पाठवण्यासाठी वाहतुकीला आणखी एक आणि नवीन पर्याय आपल्या सर्वांना उपलब्ध होणार आहे. मोठ-मोठे टँकर, ट्रक, बसगाड्या, कार थेट जहाजाच्या माध्यमातून दुस-या शहरांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत.

मित्रांनो, आज या जहाजातून जितके सामान इथे आले, तेच सामान रस्ते वाहतुकीमार्फत आणायचे ठरवले असते, तर 16 ट्रक लागले असते. इतकेच नाही तर, जलमार्गाने हे सामान आल्यामुळे प्रत्येक कंटेनरच्यामागे माल वाहतुकीसाठी होत असलेल्या खर्चात साडे चार हजार रुपयांची बचतही झाली आहे. याचा अर्थ आज जे काही सामान आले, त्याच्या वाहतूक खर्चात सरळ-सरळ 70 ते 75 हजार रूपर्य वाचले आहेत. एकूणच पाहिले तर या जलमार्गामुळे माल वाहतुकीसाठी लागणारा  वेळ आणि पैसा वाचला तर आहेच. त्याचबरोबर रस्त्यावरची वाहतुकीची होणारी रहदारी कमी होणार आहे. वाहनांसाठी लागणा-या इंधनाचा खर्च कमी होणार आहे आणि गाड्यांमुळे होत असलेल्या प्रदूषणापासूनही थोडी सुटका मिळू शकणार आहे. 

मित्रांनो, कोणे एके काळी आपल्या देशातल्या नद्यांमध्येही खूप मोठमोठाली जहाजे चालवली जात होती. परंतु स्वातंत्र्यानंतर गेली इतकी वर्षे या जलमार्गाची क्षमता वाढवण्याऐवजी वाहतुकीच्या या मार्गाची उपेक्षा केली गेली. त्यामुळे देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. आपणही विचार केला तर, देशाचे सामर्थ्‍य  असलेल्या या नद्यांची क्षमता, शक्ती यांच्याबाबतीत आधीच्या सरकारने किती मोठा अन्याय केला, हे आपल्या लक्षात येवू शकेल.

देशाचे सामर्थ्‍य  असलेल्या गोष्टींवर होत असलेला अन्याय समाप्त करण्याचं कार्य आमचे सरकार करीत आहे. आता आज देशामध्ये 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय जलमार्गावर कार्य करण्यात येत आहे. वाराणसी -हल्दिया जलमार्ग हा त्यापैकीच एक आहे. वाराणसी ते हल्दिया यांच्यामध्ये फरक्का, साहिबगंज, बक्सर येथे 5 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून अनेक सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. या जलमार्गामुळे केवळ उत्तर प्रदेशच नाही तर बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल म्हणजे पूर्व भारताच्या एका मोठ्या भूभागाला खूप चांगला लाभ होणार आहे.

बंधू आणि भगिनींनो, हा जलमार्ग केवळ सामानाच्या वाहतुकीसाठी कार्यरत असणार नाही. तर आपल्याला पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठीही उपयुक्त ठरणार आहे. पूर्व भारतातल्या तीर्थ क्षेत्रांना पूर्व अशियाई देशांबरोबर जोडण्यासाठी हा जलमार्ग उपयुक्त ठरणार आहे. वाराणसीसहीत पूर्वांचल, पूर्व भारत विभागातल्या अनेक क्षेत्रामध्ये काळाबरोबर ‘क्रूझ पर्यटन’ ही विशेष ओळख निर्माण होवू शकणार आहे. हे सगळे काही काशीची संस्कृती, काशीची सभ्यता यांना अनुरूप असेच काही होईल. पारंपरिक काशी आता आधुनिक स्वरूपात विकासाच्या वाटेवरून मार्गक्रमणा करीत सर्वांसमोर येणार आहे.

बंधू आणि भगिनींनो, आधुनिक सुविधांबरोबरच हे प्राचीन रस्ते, हा निसर्ग, संस्कृती आणि साहसाचे हे संगमस्थान बनणार आहे.

मित्रांनो, वाराणसी असो, भदोही असो, मिर्जापूर असो ही सर्व नगरे कारपेट उद्योगाची केंद्रस्थाने आहेत. आणि आता ही गावे देशाचे वस्त्रोद्योग निर्यातदार बनत आहेत, विशेष म्हणजे वस्त्रोद्योग निर्यातीमध्ये ही गावे वैश्विक केंद्र बनत आहेत. गेल्या सहा महिन्यातच पहिल्यांदा दीनदयाळ हस्तकला संकुलामध्ये जे मोठ्या प्रमाणावर  भारतीय कारपेट प्रदर्शनाचे आयोजन केले होते आणि त्याला जे प्रचंड यश मिळाले होते, त्यामुळे कारपेट निर्यातीमध्ये या शहरांनी दबदबा निर्माण केला आहे. दिल्लीमध्ये मी या प्रदर्शनाचा प्रारंभ केला होता. आता वाराणसी ते कोलकाता हा राष्ट्रीय जलमार्ग सुरू झाला आहे, त्याचाही लाभ वस्त्रोद्योग, कारपेट क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांना होणार आहे. त्यांना निर्यात करण्यासाठी मदत मिळणार आहे.

मित्रांनो, सुगमतेचे सुविधेबरोबर थेट नाते असते. आणि सुविधा या कधी कधी गौरव करण्यासारख्या असतात. बाबतपूर विमानतळाला जोडणारा हा जागतिक दर्जाचा रस्ता अर्थात ‘वर्ल्‍ड  क्लास रोड’ याचे हे उदाहरण आहे. या मार्गावर उभं राहून ‘सेल्फी’ घेण्यासाठी खूप दूर दूरवरून असंख्य लोक येत आहेत, असं आज मला सांगण्यात आलं. संपूर्ण समाज माध्यमांवरच सध्या बनारसने जणू कब्जा केला आहे. या रस्त्याच्या छायाचित्रांनी, व्हिडिओंनी समाज माध्यमांवरून जणू धुमाकूळ घातला आहे. सध्या सणा-सुदीचे दिवस आहेत.  आपल्यापैकी जे कोणी विमानाने घरी आले असतील, त्यांच्या मनात बाबतपूर विमानतळावरून घरी येताना तयार झालेला रस्ता पाहून अभिमानाची भावना निर्माण झाली असेल. काही दिवसांपूर्वी बनारसच्या बाहेर गेलेल्या लोकांना आता आज शहरामध्ये येतांना, आपण त्या नेहमीच्याच तरना-शिवपूर रस्त्यावरून जात आहोत, यावर त्यांचा हा रस्ता पाहून विश्वासच बसला नसेल. रस्त्यावरच्या वाहतुकीच्या कोंडीमुळे आपले विमान सुटल्याच्‍या दिवसाचीही आपण आठवण काढावी. विमानतळावर वेळेवर पोहोचण्यासाठी आपल्याला कितीतरी तास आधीच घरातून निघावं लागत होतं. रस्त्यावरचे खड्डे डोळ्यात पाणी आणत होते. आता ही स्थिती पूर्णपणे बदलली आहे.

मित्रांनो, 800 कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करून बाबतपूर विमानतळ आणि काशी शहर यांना जोडणारा हा तयार केलेला चार मार्गिकांचा रस्ता देश-विदेशातल्या पर्यटकांना आकर्षित करून घेत आहे. या रस्त्यामुळे काशीवासियांचा, तसेच इथे येणा-या पर्यटकांचा वेळ वाचणार आहे. जौनपूर, सुल्तानपूर, आणि लखनौपर्यंतचा प्रवास आता अधिक सुखकर आणि सोईचा होणार आहे. शहरातल्या रिंगरोडचा पहिला टप्पाही आज काशीवासियांना समर्पित करण्यात आला आहे. जवळपास 760 कोटी रूपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या रस्त्यामुळे गोरखपूर, लखनौ, आजमगढ आणि अयोध्या या शहरांकडे जाणा-या वाहनांना आता शहरामध्ये प्रवेश करण्याची गरज भासणार नाही. बाहेरच्या बाहेर जाता येणार आहे.

मित्रांनो, बनारस शहरासाठी रस्त्यांच्या या दोन्ही प्रकल्पांची मागणी खूप जुनी,  अगदी काही दशकांपासूनची होती. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर केवळ सहा महिन्याच्या आतच मी या दोन्ही रस्त्यांचे प्रकल्प वेगाने पूर्ण कसे होतील, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. आता रिंगरोडच्या दुस-या टप्प्याचेही काम अतिशय वेगाने सुरू आहे. ते कामही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

या रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यामुळे बनारस शहरामध्ये असलेली वाहतुकीच्या कोंडीची समस्या कमी होणार आहे. त्याचबरोबर प्रदूषणामध्येही घट होणार आहे. जनतेचा वेळ वाचणार आहे. या रस्त्यांमुळे पर्यटकांना सारनाथला जाणे आता अधिक सोईचे ठरणार आहे. रामनगरमध्ये जो हेलीपोर्ट बनवण्यात येणार आहे, त्याचा शिलान्यास आजच काही वेळापूर्वी झाला आहे, त्या हेलीपोर्टचा विशेष लाभ पर्यटकांना मिळू शकणार आहे.

मित्रांनो, संपर्क व्यवस्था, रस्ते, वाहनाची सोय चांगली असेल तर पर्यटन आणि त्यातून रोजगाराच्या संधीही वाढत असतात. देशाविषयी विश्वास निर्माण होतो, सत्तेविषयी जो भरवसा असतो, तो वाढत जातो. आज बनारसमध्ये जितक्या प्रकल्पांचे लोकार्पण झाले आणि शिलान्यास झाला आहे, त्या प्रकल्पांमुळेही इथल्या नवयुवकांसाठी रोजगाराच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.

बंधू आणि भगिनींनो, भाजपाच्या सरकारसाठी, भाजपाच्या नेतृत्वाखाली असलेल्या राज्यांसाठीही देश आणि देशवासियांचा विकास हीच गोष्ट आमच्यासाठी सर्वस्व आहे. आता देशात फक्त आणि फक्त विकासाचा विचार राजकीय पक्षांनी करावा, असे लोकांना वाटते. जनता आपला निर्णय हे विकासकामे पाहून निश्चित करीत असते. विशिष्‍ट मत बँकेचा विचार कोणी करावा, असे जनतेला वाटत नाही.

गेल्या चार वर्षांमध्ये किती वेगाने आधुनिक पायाभूत सोई सुविधा विकसित झाल्या आहेत, हे आता अगदी स्पष्टपणाने सर्वांनाच दिसून येत आहे. देशामध्ये दुर्गम स्थानीही नवे-नवे विमानतळ, आदिवासी क्षेत्रे, उत्तर-पूर्वेकडील अतिदुर्गम क्षेत्रांमध्येही पहिल्यांदाच रेल्वे पोहोचत आहे. ग्रामीण भागात पक्के रस्ते, अतिशय शानदार महामार्ग, सगळीकडे ‘एक्सप्रेस वे’चे जाळे, ही आता आमच्या सरकारची वेगळी ओळख बनली आहे.

मित्रांनो, आम्ही फक्त स्त्रोतांच्या विकासावरच भर दिला, असे नाही. तर सामान्य माणसांच्या जीवनातल्या लहान-लहान गरजांचा, आवश्यकतांचाही विचार केला आहे. यामध्ये स्वच्छता आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये गांभीर्याने काम केले आहे. आमचे सरकार येण्याआधी 2014 मध्ये ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेचा विस्तार 40 टक्के होता, तो आता 95 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. आयुष्यमान भारत योजनेमुळे गरीबातल्या गरीब व्यक्तीला, गंभीर आजार झाल्यास चांगल्या रुग्णालयात उपचार मिळणे शक्य झाले आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त गरीबांना मोफत औषधोपचार मिळाले आहेत. विशेष म्हणजे ही योजना लागू होवून अजून 40 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेला नाही.

मित्रांनो, आम्ही फक्त आरोग्याचीच चिंता केली असे नाही. तर आमच्या जीवनधारा, आमच्या नद्यांचे आरोग्य कसे चांगले राहिल, याचा विचार करून काही संकल्प केले आहेत. या भावनेतूनच गंगामातेच्या स्वच्छतेसाठी सुरू करण्यात आलेली मोहीम ‘नमामी गंगे’ आज एका नवीन टप्प्यावर पोहोचली आहे.

गंगेमध्ये मिसळल्या जाणा-या अस्वच्छ पाण्यावर प्रक्रिया करून ते स्वच्छ करण्यासाठी चारशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून चार मोठे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यांचे लोकार्पण आज करण्यात आले आणि आणखी काही प्रकल्पांचा शिलान्यास करण्याची संधीही मला आज मिळाली. दीनापूर येथे ‘सीवर ट्रिटमेंट’शी संबंधित तीन प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यामुळे आगामी वर्षांमध्ये शहरातली कोणत्याही प्रकारची घाण गंगामातेच्या प्रवाहामध्ये मिसळणे शक्य होणार नाही. त्याचबरोबर रामनगरचा प्रकल्पही लवकरच गंगामातेच्या सेवेमध्ये रूजू व्हावा, यासाठी तयार करण्यात येत आहे.

मित्रांनो, आमच्या सरकारने गंगाजीसाठी ठेवलेला पैसा, काही पाण्यामध्ये प्रवाहीत केला नाही. उलट गंगेमध्ये जे अस्वच्छ, घाण पाणी येते, ते स्वच्छ करण्यासाठी सर्व पैसा वापरला आहे. ‘नमामी गंगे’या मोहिमेमध्ये, आतापर्यंत 23 हजार कोटी रूपये खर्चाच्या परियोजनेला स्वीकृती देण्यात आली आहे. 5 हजार कोटी रूपयांच्या योजनेचे काम सध्या सुरू आहे. गंगेच्या किना-यांवर वसलेली  बहुतेक सर्व गावे आता उघड्यावरील शौचापासून मुक्त झाली आहेत. या  प्रकल्पामध्ये गंगोत्रीपासून सुरू झालेला गंगेचा प्रवाह थेट गंगासागरपर्यंत अविरत, निर्मल बनवण्यात येणार आहे. उगमापासून गंगासागरापर्यंत स्वच्छ, निर्मल गंगा करण्याचा आमचा संकल्प आहे.

आज ज्याप्रमाणे गंगा स्वच्छतेची मोहीम वेगाने होत आहे, त्यामागे जनभागीदारी हे मोठे कारण आहे. नद्यांविषयी प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये जागृत झालेली जबाबदारीची भावना इथे महत्वाची आहे. जनभागीदारी नसती तर, माता गंगेची स्वच्छता  करणार या नावाखाली जुन्या सरकारांनी कशा प्रकारे हजारों कोटी रूपये खर्च केले आणि ते कसे वाया गेले, हे तर आपण सगळेजण चांगलेच जाणून आहात.

मित्रांनो, आज इथे वाराणसीच्या काही क्षेत्रामध्ये वीज पुरवठा कार्यात सुधारणा व्हावी, यासाठी केलेल्या कामाचेही लोकार्पण करण्यात आले आहे. जुन्या काशी व्यतिरिक्त आणखी काही क्षेत्रांमध्ये ‘आयपीडीएस’योजनेअंतर्गत हे कार्य पूर्ण करण्यात आले आहे. रस्त्यांवर जे विजेच्या तारांचे जाळे लटकणारे दिसत होते, त्या तारा आता सगळ्या भूमीगत करण्यात आल्या आहेत. आगामी दिवसात शहराच्या अन्य भागातही याप्रकारच्या कार्याचा विस्तार करण्यात येणार आहे.

मित्रांनो, आपण करीत असलेल्या प्रयत्नांमुळे आणि आपल्या सर्वांच्या प्रेरणेने चिरपुरातन काशीची नवीन प्रतिमा देश-दुनियेसमोर आता येवू लागली आहे. आता आपल्याला या काशीची ही नवी प्रतिमा जपली पाहिजे. ती प्रतिमा सुरक्षित ठेवली पाहिजे. त्यामुळे आपल्या या गौरवशाली शहराचे गौरवगान संपूर्ण दुनियेमध्ये गायले जाईल.

पुढच्यावर्षी जानेवारीमध्ये प्रवासी भारतीय दिवस काशीच्या या पवित्र भूमीमध्ये साजरा करण्यात येणार आहे. या आयोजनासाठी मी सुद्धा आपल्‍या  सर्वांप्रमाणेच देश-विदेशातून येणा-या लोकांचे स्वागत करण्यासाठी वाराणसीमध्ये उपस्थित राहणार आहे. त्यावेळी प्रयागराजमध्ये अर्धकुंभाचे आयोजनही होणार आहे. तिथूनही अनेक लोक वाराणसीला येतील.

आम्हा सर्वांची इच्छा आहे की, दुनियेतल्या या सर्वात प्राचीन शहराची, काशीची महती कायम रहावी आणि सर्वात चांगल्या सुविधा असणारे शहर, अशा स्मृती इथं येणा-या प्रत्येक पर्यटकाच्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गेल्या पाहिजेत. त्यांना काशीला पुन्हा-पुन्हा यावे, असे वाटले पाहिजे. अशा प्रकारचे वातावरण आपण या ऐतिहासिक शहरामध्‍ये तयार केले पाहिजे.

अखेरीस पुन्हा एकदा आपणा सर्वांना या सर्व सुविधांसाठी, विकासाच्या नवनवीन प्रकल्पांसाठी अनेक-अनेक शुभेच्छा देतो. आपल्‍या  सर्वांचे अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना, पूर्वांचल आणि पूर्व भारतामधल्या माझ्या सहकारींना छठ पूजेनिमित्त पुन्हा एकदा खूप-खूप शुभेच्छा देतो. 

जय छठी मइया!!!

हर-हर महादेव !!

Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Indian Railways achieves major WiFi milestone! Now, avail free high-speed internet at 5500 railway stations

Media Coverage

Indian Railways achieves major WiFi milestone! Now, avail free high-speed internet at 5500 railway stations
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 9 डिसेंबर 2019
December 09, 2019
शेअर करा
 
Comments

Crowds at Barhi & Bokaro signal towards the huge support for PM Narendra Modi & the BJP in the ongoing State Assembly Elections

PM Narendra Modi chaired 54 th DGP/IGP Conference in Pune, Maharashtra; Focus was laid upon practices to make Policing more effective & role of Police in development of Northeast Region

India’s progress is well on track under the leadership of PM Narendra Modi