पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘भारतात सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले उत्पादक परिसंस्थेचा विकास’ उपक्रमा अंतर्गत तीन सेमीकंडक्टर युनिट्सच्या स्थापनेला मंजुरी दिली. येत्या 100 दिवसांत या तीनही युनिटच्या उभारणीला सुरूवात केली जाणार आहे.
भारतातील सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले उत्पादक परिसंस्थेचा विकास’ उपक्रम 21.12.2021 रोजी अधिसूचित करण्यात आला होता. या उपक्रमासाठी एकूण 76,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
जून 2023 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने गुजरातमधील साणंद येथे सेमीकंडक्टर युनिट स्थापन करण्याच्या मायक्रोनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.
या युनिटचे बांधकाम वेगाने सुरू असून युनिटजवळ एक मजबूत सेमीकंडक्टर परिसंस्था उदयास येत आहे.
मंजूरी देण्यात आलेले तीन सेमीकंडक्टर युनिट्स पुढील प्रमाणे आहेत:
1. 50,000 wfsm क्षमतेसह सेमीकंडक्टर फॅब:
टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (“TEPL”) तैवान येथील पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन (PSMC), बरोबर भागीदारीत सेमीकंडक्टर फॅब स्थापन करेल.
गुंतवणूक : हा फॅब गुजरातमध्ये ढोलेरा इथे उभारण्यात येईल. या फॅबमध्ये 91,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.
तंत्रज्ञान भागीदार: पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन, लॉजिक आणि मेमरी फाउंड्री विभागातील निपुणतेसाठी प्रसिद्ध आहे. पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन च्या तैवानमध्ये 6 सेमीकंडक्टर फाउंड्री आहेत.
क्षमता : प्रति महिना 50,000 वेफर (WSPM)
समाविष्ट विभाग:
- 28 एनएम तंत्रज्ञानासह उच्च कार्यक्षमतेची कम्प्युट चिप्स.
- इलेक्ट्रिक वाहने, दूरसंचार, संरक्षण , ऑटोमोटिव्ह, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, डिस्प्ले, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इ. साठी पॉवर मॅनेजमेंट चिप्स. पॉवर मॅनेजमेंट चिप्स या हाय व्होल्टेज,हाय करंट ॲप्लिकेशन आहेत.
2. आसाममध्ये सेमीकंडक्टर एटीएमपी युनिट:
आसाममधील मोरीगाव येथे टाटा सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रायव्हेट लिमिटेड ("टीएसएटी") सेमीकंडक्टर युनिट स्थापन करेल.
गुंतवणूक : या युनिटची निर्मिती 27,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून होईल.
तंत्रज्ञान : टीएसएटी सेमीकंडक्टर स्वदेशी प्रगत सेमीकंडक्टर वेष्टन तंत्रज्ञान विकसित करत आहे ज्यामध्ये फ्लिप चिप आणि आयएसआयपी (वेष्टनातील एकात्मिक प्रणाली) तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
क्षमता : प्रतिदिन 48 दशलक्ष
समाविष्ट विभाग : वाहन उद्योग, इलेक्ट्रिक वाहने, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार, मोबाईल फोन इ.
3. विशेष चिप्ससाठी सेमीकंडक्टर एटीएमपी युनिट:
जपानच्या रेनेसास इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन आणि थायलंडच्या स्टार्स मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स यांच्या भागीदारीतून सीजी पॉवर गुजरातमधील सानंद येथे सेमीकंडक्टर युनिट स्थापन करणार आहे.
गुंतवणूक : हे युनिट 7,600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह स्थापन केले जाईल.
तंत्रज्ञान भागीदार : रेनेसास ही एक अग्रगण्य सेमीकंडक्टर कंपनी आहे जी विशेष चिप्सवर केंद्रित आहे. ती 12 सेमीकंडक्टर सुविधा परिचलीत करते आणि मायक्रोकंट्रोलर, ॲनालॉग, पॉवर आणि सिस्टम ऑन चिप ('एसओसी)' उत्पादनांमधील एक महत्त्वाची कंपनी आहे.
समाविष्ट विभाग: सीजी पॉवर सेमीकंडक्टर युनिट हे ग्राहक, औद्योगिक, वाहन आणि ऊर्जा उपयोगासाठी चिप्स तयार करेल.
क्षमता : प्रतिदिन 15 दशलक्ष
या युनिट्सचे धोरणात्मक महत्त्व:
- अल्पावधीत, भारत सेमीकंडक्टर अभियानाने चार मोठे यश संपादन केले आहे. या युनिट्सद्वारे, भारतात सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण होईल.
- भारताकडे आधीपासूनच चिप संरचनेत सखोल क्षमता आहे. या युनिट्समुळे आपला देश चिप निर्मितीची क्षमता विकसित करेल.
- आजच्या घोषणेसह भारतात स्वदेशी बनावटीचे प्रगत पॅकेजिंग तंत्रज्ञान विकसित केले जाईल.
रोजगार क्षमता:
- या युनिट्समुळे 20 हजार प्रगत तंत्रज्ञानाच्या नोकऱ्या आणि सुमारे 60 हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील.
- ही युनिट्स वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, दूरसंचार उत्पादन, औद्योगिक उत्पादन आणि इतर सेमीकंडक्टर वापरणाऱ्या उद्योगांमध्ये रोजगार निर्मितीला चालना देतील.