पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, राष्ट्रीय महामार्ग-19 आणि वाराणसी रिंग रोड दरम्यान एका 'लिंक/कनेक्टर कॉरिडॉर'च्या विकासाला मंजुरी दिली आहे. याद्वारे गंगा नदीच्या किनाऱ्यालगत कनेक्टिव्हिटी साधली जाईल. 46.039 किमी लांबीच्या या प्रकल्पामध्ये सहा-पदरी उन्नत मुख्य मार्ग, एक शानदार 'केबल-स्टेड' पूल, 'एक्स्ट्राडोज्ड'  पादचारी पूल-सह-प्रमुख  पूल (Foot Over Bridge-cum-Major Bridge), लूप्स, रॅम्प्स, लिंक रोड आणि सर्व्हिस रोड यांचा समावेश आहे. हा प्रकल्प 'हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल' अंतर्गत आणि NH(O) योजनेद्वारे एकूण 14,447.64 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चासह पूर्ण केला  जाईल. या खर्चात 6,037.85  कोटी रुपयांचा स्थापत्य बांधकाम खर्च (ज्यात युटिलिटी शिफ्टिंगचा समावेश आहे, परंतु जीएसटीचा समावेश नाही) आणि 541.11 कोटी रुपयांचा भूसंपादन खर्च समाविष्ट आहे.

हा प्रकल्प NH-19 आणि वाराणसी रिंग रोड यांच्यात वेगवान  कनेक्टिव्हिटी  उपलब्ध करून देईल, ज्यामुळे शहरातील रस्ते जाळ्यावरील वाहतुकीची कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल आणि शहरी वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होईल. ताशी 80–100 किमी वेगासाठी डिझाइन केलेल्या या प्रकल्पामुळे, संबंधित क्षेत्रातील प्रवासाचा सरासरी वेळ सुमारे 60 मिनिटांवरून 20  मिनिटांपर्यंत म्हणजेच जवळपास 67 टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. तर NH-19 आणि काशी रेल्वे स्थानक यांच्यातील प्रवासाचा वेळही सुमारे  50 मिनिटांवरून 25  मिनिटांपर्यंत कमी होईल ज्यामुळे 25 मिनिटांची (जवळपास 50 टक्के) बचत होईल.

'पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहद् आराखड्याशी सुसंगत हा मार्ग प्रमुख महामार्ग, रेल्वे स्थानके, लाल बहादूर शास्त्री विमानतळ आणि रामनगर IWAI बंदर यांना वेगवान जोडणी देऊन 'मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी'  बळकट करेल. त्याचबरोबर, काशी विश्वनाथ मंदिर, बनारस हिंदू विद्यापीठ , नमो घाट, रामनगर किल्ला आणि वाराणसीचे घाट यांसारख्या प्रमुख धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्थळांना जोडणारी संपर्क व्यवस्थाही यामुळे मोठ्या प्रमाणात सुधारेल. महत्त्वाच्या आर्थिक, सामाजिक आणि लॉजिस्टिक्स केंद्रांना एकमेकांशी जोडून, हा प्रकल्प लॉजिस्टिक्स कार्यक्षमता वाढवेल, रस्ते सुरक्षा सुधारेल, पर्यटन व तीर्थयात्रा सुलभ बनवेल  आणि पूर्व उत्तर प्रदेशातील शाश्वत प्रादेशिक आर्थिक विकासाला मदत करेल.

हा कॉरिडॉर वाराणसी आणि चंदौली येथील रस्ते जाळ्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी एक परिवर्तनकारी शहरी गतिशीलता प्रकल्प म्हणून हाती घेण्यात आला  आहे. हा प्रकल्प NH-19, वाराणसी रिंग रोड (NH-135B), रामनगर/BHU आणि शहरातील इतर प्रमुख ठिकाणांना जोडणारा एक वेगवान आणि नियंत्रित-प्रवेश मार्ग उपलब्ध करून देईल. दरवर्षी 15 कोटींहून अधिक पर्यटक आणि यात्रेकरू  वाराणसीला भेट देतात.  हा प्रकल्प काशी विश्वनाथ मंदिर, बनारस हिंदू विद्यापीठ , नमो घाट, रामनगर किल्ला, वाराणसीचे घाट आणि काशी रेल्वे स्थानक  यांसारख्या प्रमुख धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्थळांशी संपर्क व्यवस्था लक्षणीयरीत्या सुधारेल; तसेच शहरातील विद्यमान रस्ते जाळ्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी करेल. BHU/लंका आणि सामने घाट दरम्यान उन्नत मार्ग , स्थानिक वाहतूक आणि शहरातून जाणारी वाहतूक  वेगळी करून, अत्यंत वर्दळ असलेल्या लंका जंक्शनवरील वाहतूक कोंडी आणखी कमी करेल.

हा प्रकल्प नियंत्रित-प्रवेश वाहतूक व्यवस्थेद्वारे रस्ते सुरक्षा सुधारेल, वाहने चालवण्याचा खर्च व प्रदूषण कमी करेल, प्रवासाची विश्वासार्हता वाढवेल आणि प्रवासी व मालवाहतुक सुलभ करेल. तसेच, शहराच्या दाट वस्तीच्या भागातून जाणारी वाहतूक वळवून NH-19, BHU-रामनगर कॉरिडॉर आणि NH-35 वरील वाहतूक कोंडी कमी करण्यासही हा प्रकल्प मदत करेल.

या प्रकल्पामध्ये अनेक महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी वैशिष्ट्यांचा समावेश आहे, ज्यात गंगा नदीवरील 910  मीटर लांबीचा एक शानदार  केबल-स्टेड पूल, काशी विश्वनाथ मंदिरापर्यंत पादचारी मार्गांना अखंड जोडणारा ट्रॅव्हलेटरसह 1.32  किमी लांबीचा एक्स्ट्राडोज्ड फूट ओव्हर ब्रिज-कम-मेजर ब्रिज, विद्यमान/प्रस्तावित मालवीय पुलावर एक रेल ओव्हर ब्रिज, आपत्कालीन वापरासाठी समर्पित पार्किंग जागा, ध्वनीरोधक, दर्शनी भागातील प्रकाशयोजना आणि वाराणसीच्या सांस्कृतिक वारशापासून प्रेरित वास्तुशिल्पीय घटक यांचा समावेश आहे. ही वैशिष्ट्ये केवळ वाहतुकीची कार्यक्षमताच सुधारणार नाहीत, तर शहराच्या सौंदर्यात देखील भर घालतील, वाराणसीच्या आसमंतात अनोखी ओळख जोडतील  आणि भारतातील प्रमुख धार्मिक व सांस्कृतिक स्थळांपैकी एक म्हणून त्याचे स्थान अधिक मजबूत करतील.

'पंतप्रधान गतिशक्ती' राष्ट्रीय बृहद आराखड्याला अनुरूप  असलेला हा कॉरिडॉर एका आर्थिक केंद्राला (चंदौली एसईझेड), एका सामाजिक केंद्राला (चंदौली आकांक्षी जिल्हा) आणि सहा प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्रांना (लाल बहादूर शास्त्री विमानतळ, काशी रेल्वे स्थानक, बनारस रेल्वे स्थानक, वाराणसी शहर रेल्वे स्थानक, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन आणि रामनगर आयडब्ल्यूएआय (IWAI) बंदर) जोडून 'मल्टी-मोडल'  कनेक्टिव्हिटी बळकट करेल. वरील वाहतूक केंद्रे आणि काशी विश्वनाथ मंदिर, बनारस हिंदू विद्यापीठ , नमो घाट, रामनगर किल्ला आणि वाराणसीचे घाट यांसारखी महत्त्वाची ठिकाणे यांच्यात अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करून , हा प्रकल्प विविध वाहतूक साधनांचा समन्वय साधेल, लॉजिस्टिक्सची कार्यक्षमता वाढवेल, पर्यटन व तीर्थयात्रेला चालना देईल आणि पूर्व उत्तर प्रदेशातील शाश्वत प्रादेशिक आर्थिक विकासाला मदत करेल .

एकूणच, प्रस्तावित 'गंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर' एक आधुनिक आणि उच्च-क्षमतेचा शहरी वाहतूक मार्ग तयार  करेल. यामुळे वाराणसीमधील वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडतील; जलद, सुरक्षित आणि अधिक विश्वसनीय कनेक्टिव्हिटी मिळेल; वाहतूक कोंडीत लक्षणीय घट होईल; विविध वाहतूक साधनांचा समन्वय सुधारेल; पर्यटन व तीर्थयात्रेसाठीच्या पायाभूत सुविधांचा विकास होईल; तसेच 'पंतप्रधान गतिशक्ती' आणि 'विकसित भारत' या संकल्पनांना अनुरूप  शाश्वत आर्थिक विकासाला चालना मिळेल.

कॉरिडॉरचा नकाशा:

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's forex reserves hit all-time high of $729.33 billion after $12.42 billion jump

Media Coverage

India's forex reserves hit all-time high of $729.33 billion after $12.42 billion jump
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 ऑगस्ट 2026
August 29, 2026

New India, New Speed, New Stage: Missiles, Medals, Multilateralism under PM Modi