पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पंधराव्या वित्त आयोगाच्या 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी एकूण 2277.397 कोटी रुपयांच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग / वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (DSIR/CSIR) "क्षमता बांधणी आणि मानव संसाधन विकास" या विषयावरील योजनेला मान्यता देण्यात आली आहे.
ही योजना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेद्वारे राबविण्यात येत आहे. या योजनेत देशभरातील सर्व संशोधन आणि विकास संस्था, राष्ट्रीय प्रयोगशाळा, राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था, प्रतिष्ठित संस्था आणि विद्यापीठे समाविष्ट असतील. विद्यापीठे, उद्योग, राष्ट्रीय संशोधन आणि विकास प्रयोगशाळा तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये कारकिर्द घडवू इच्छिणाऱ्या तरुण, उत्साही संशोधकांना हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ प्रदान करतो. प्रख्यात शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली, ही योजना विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि गणितीय विज्ञान (STEMM) क्षेत्रात प्रगती करण्यास चालना देईल.
क्षमता निर्माण आणि मानव संसाधन विकास योजना, प्रती दशलक्ष लोकांमागे संशोधकांची संख्या वाढवून भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी) साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. या योजनेने क्षमता निर्माण करून तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च गुणवत्तेच्या मानवी संसाधन भांडारात वाढ करून आपले महत्व सिद्ध केले आहे.
गेल्या दशकात भारत सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञानात केलेल्या संशोधन आणि विकासात केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे, जागतिक बौद्धिक संपदा संघटना क्रमवारीनुसार भारताने 2024 मध्ये जागतिक नवोन्मेष निर्देशांकात आपले स्थान सुधारून 39 वा क्रमांक गाठला आहे. हा निर्देशांक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली नजीकच्या भविष्यात आणखी सुधारेल अशी अपेक्षा आहे. सरकारकडून संशोधन आणि विकासाला पाठिंबा मिळाल्याने, अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेच्या आकडेवारीनुसार वैज्ञानिक पेपर प्रकाशनांच्या बाबतीत भारत आता पहिल्या तीन देशांमध्ये आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाची योजना हजारो संशोधक विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांना पाठबळ देत आहे. यांच्या संशोधनांनी भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कामगिरीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
ही मान्यता, छत्री योजनेच्या अंमलबजावणीद्वारे भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधनासाठी सीएसआयआरच्या 84 वर्षांच्या सेवेत एक ऐतिहासिक टप्पा निर्माण करते, जो सध्याच्या आणि भविष्यातील पिढ्यांमध्ये देशाच्या संशोधन आणि विकास प्रगतीला गती देतो. सीएसआयआरची छत्री योजना ‘क्षमता निर्माण आणि मानव संसाधन विकास’ ज्यामध्ये चार उप-योजना आहेत जसे की (i) डॉक्टरेट आणि पोस्टडॉक्टरल फेलोशिप (ii) बाह्य संशोधन योजना, एमेरिटस सायंटिस्ट योजना आणि भटनागर फेलोशिप कार्यक्रम; (iii) पुरस्कार योजनेद्वारे उत्कृष्टतेला प्रोत्साहन आणि मान्यता; आणि (iv) प्रवास आणि संगोष्ठी अनुदान योजनेद्वारे ज्ञान सामायिकरणाला प्रोत्साहन देणे.
हा उपक्रम एक बळकट संशोधन आणि विकास-आधारित नवोन्मेष परिसंस्था तयार करण्यासाठी आणि 21 व्या शतकात जागतिक नेतृत्वासाठी भारतीय विज्ञान क्षेत्राला सज्ज करण्यासाठी सरकारची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो.
The Union Cabinet's approval for the DSIR Scheme “Capacity Building and Human Resource Development” will add vigour to India's R&D ecosystem, with a focus on a culture of innovation as well as excellence. https://t.co/geOm4AaX5x
— Narendra Modi (@narendramodi) September 24, 2025


