पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
उभय नेत्यांनी गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, अंतराळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण, लोकांमधील परस्पर संबंध आणि दहशतवादविरोधी क्षेत्रातील द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीतील विकासाचा आढावा घेतला आणि त्याचे सकारात्मक मूल्यांकन केले. संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 च्या अनुषंगाने भागीदारी आणखी दृढ करण्याच्या त्यांच्या बांधिलकीचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला.
दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. युक्रेनमधील संघर्षाचे लवकर आणि शांततापूर्ण निराकरण करण्याच्या गरजेवर त्यांनी सहमती दर्शविली. या दिशेने प्रयत्नांना भारताचा पूर्ण पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी केला.
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी परस्पर फायदेशीर भारत-ईयू मुक्त व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आणि 2026 मध्ये भारताने आयोजित केलेल्या ‘एआय इम्पॅक्ट’ शिखर परिषदेच्या यशासाठी इटलीच्या जोरदार पाठिंब्याचा पुनरुच्चार केला. भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर (आयएमईईईसी) उपक्रमांतर्गत कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी पावले उचलण्यावरही नेत्यांनी सहमती दर्शविली.
उभय नेत्यांनी संपर्कात राहण्यासही सहमती दर्शवली.


