"तामिळनाडूतील प्रत्येक घरातून जसा पोंगलचा प्रवाह वाहतो, तसाच प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धीचा प्रवाह वाहो याच शुभेच्छा आपण देत आहोत"
"कुटुंब आणि मित्रांसोबत सण साजरा करण्यासारखीच आजची भावना आहे"
"पिके, शेतकरी आणि गावे बहुतांश सणांच्या केंद्रस्थानी आहेत"
“भरड धान्याला मिळालेल्या प्रोत्साहनामुळे लहान शेतकरी आणि तरुण उद्योजकांना फायदा होत आहे”
"पोंगल सण एक भारत श्रेष्ठ भारत ही राष्ट्रीय भावना प्रतिबिंबित करतो"
“2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्यासाठी ही एकतेची भावना सर्वात मोठे सामर्थ्य आहे”

वणक्कम, (नमस्कार) आपल्या सर्वांना पोंगल सणाच्या अनेक अनेक शुभेच्छा ! इनिय पोङ्गल् नल्वाळ्तुक्कल् !

 

पोंगलच्या पवित्र दिनी, तामिळनाडूच्या प्रत्येक घरात पोंगलच्या धारेचा प्रवाह असतो. माझी अशी इच्छा आहे, की आपल्या आयुष्यात देखील सुख समृद्धी आणि समाधानाच्या धारेचा हा प्रवाह असाच निरंतर वाहत राहो. कालच देशभरात लोहडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. काही ठिकाणी आज मकर संक्रांती उत्तरायण साजरे केले जात आहे, तर काही ठिकाणी, ते कदाचित उद्या साजरे केले जाईल. माघ बिहू देखील, आता येणारच आहे. मी या सर्व सण-उत्सवांसाठी सर्व देशबांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो, माझ्या शुभकामना त्यांच्या सोबत आहेत.

 

मित्रांनो,

मला इथे काही ओळखीचे चेहरे दिसत आहेत. गेल्या वर्षी देखील आपण सराव तामिळ पुथांडु च्या निमित्त इथे भेटलो होतो. मी मुरूगन जी यांना धन्यवाद देतो, की त्यांनी मला या अद्भुत कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिली. मला असे वाटते आहे, की जसे मी माझे कुटुंबिय आणि मित्रांसोबत काही उत्सव साजरा करतो आहे.

मित्रांनो,

संत तिरुवल्लूवर यांनी म्हटले होते-  तळ्ळा विळैयुळुम् तक्कारुम् ताळ्विला चेव्वरुम् सेर्वदु नाडु. म्हणजे, उत्तम पीक, शिकल्या सवरलेल्या व्यक्ती आणि प्रामाणिक व्यापारी हे तिन्ही घटक मिळून राष्ट्र उभारणी करत असतात. तिरुवल्लूवर जी यांनी त्यात राजकारण्यांचा उल्लेख नाही केला, हा आपल्या सर्वांसाठी एक संदेश आहे. पोंगलच्या सणात नवे पीक देवाच्या चरणी वाहण्याची परंपरा आहे. या संपूर्ण परंपरेचे केंद्र आपले अन्नदाता, आपले शेतकरी आहेत. आणि तसेही, भारतातील प्रत्येक सण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात, गावाशी, शेतीशी, पिकांशी जोडलेला असतो. 

 

मला आठवते, गेल्या वर्षी, आम्ही याविषयी देखील चर्चा केली, की कशी आपले भरड धान्य किंवा श्रीअन्न हे  तामिळ संस्कृतीचा भाग आहेत. मला अत्यंत आनंद आहे, की या सूपरफूडबद्दल देशात आणि जगातही एक नवी जागृती आली आहे. आमचे अनेक युवक,भरड धान्य, श्री अन्न याच्याशी संबंधित स्टार्टअप्स सुरू करत आहेत आणि ह्या स्टार्ट अप्स आज अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत.

श्री अन्नाच्या  उत्पादनांशी  आपल्या देशातील, तीन कोटींपेक्षा अधिक छोटे शेतकरी संबधित आहेत. आम्ही श्री अन्नाला प्रोत्साहन दिले तर त्याचा थेट लाभ या तीन कोटी शेतकऱ्यांना मिळतो.

 

मित्रांनो,

पोंगलच्या निमित्ताने, तामिळ स्त्रिया आपल्या घराच्या बाहेर कोलम तयार करतात. सर्वात आधी, त्या तांदळाच्या पीठाचा वापर करून, जमिनीवर अनेक ठिपक्यांच्या रचना तयार करतात. आणि जेव्हा या  ठिपक्यांच्या विविध रचना तयार होतात, तेव्हा त्या प्रत्येकाचे एक वेगळे महत्त्व असते. हे चित्र देखील मन मोहवणारे असते. मात्र कोलमचे खरे रूप तेव्हा अधिक समृद्ध आणि सुंदर असते, जेव्हा हे सगळे ठिपके  एकत्र जोडले जातात आणि त्यातून एक नवीन कलाकृती तयार होऊन, त्यात रंग भरले जातात.

आपला देश आणि त्यातील विविधता सुद्धा या कोलम सारखी आहे. जेव्हा देशाचा काना कोपरा एकमेकांशी भावनिक दृष्ट्या जोडला जातो, तेव्हा आपली शक्ती एका वेगळ्या स्वरूपात दिसते. पोंगलचा सण देखील एक असा असाच एक सण आहे, जो एक भारत-श्रेष्ठ भारताची राष्ट्रीय भावना प्रतिबिंबित करतो. पूर्वी काशी-तमिळ संगमम आणि सौराष्ट्र तमिळ संगमम यांनी एक अतिशय महत्त्वाची परंपरा सुरू केली आहे आणि ही भावना त्यांच्यातही दिसून येते. या सर्व कार्यक्रमांमध्ये आपले तामिळ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी होतात.

 

मित्रांनो,

एकतेची ही भावना 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीसाठी सर्वात मोठी ताकद आणि सर्वात मोठी ठेव आहे. तुम्हाला आठवत असेल, मी लाल किल्ल्यावरून पुकारलेल्या पंचप्रणाचा मुख्य घटक म्हणजे देशाच्या एकतेला ऊर्जा देणे, देशाच्या एकतेला बळकटी देणे. पोंगलच्या या शुभ सणानिमित्त आपल्याला देशाची एकता बळकट करण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार करावा लागेल.

मित्रांनो, आज अनेक कलाकार, नामवंत कलाकार आणि मान्यवर इथे आपल्या कलेच्या सादरीकरणासाठी तयार आहेत, तुम्ही सर्वजण वाट पाहत असाल, मी देखील वाट पाहत आहे. हे सर्व कलाकार राजधानी दिल्लीत प्रत्यक्ष तामिळनाडूचे दर्शन आपल्याला घडवणार आहेत.  त्यायोगे, आपल्याला काही काळ तामिळनाडू मध्ये राहण्याची संधी मिळेल, हे देखील एक सदभाग्य आहे. या सर्व कलाकारांना माझ्या शुभेच्छा. मी पुन्हा एकदा मुरुगनजी यांचे आभार मानतो.

मुणक्कम !

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Assam Was Nearly Separated From India’: PM Modi Attacks Congress, Hails First CM Bordoloi's Role

Media Coverage

‘Assam Was Nearly Separated From India’: PM Modi Attacks Congress, Hails First CM Bordoloi's Role
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 डिसेंबर 2025
December 20, 2025

Empowering Roots, Elevating Horizons: PM Modi's Leadership in Diplomacy, Economy, and Ecology