“ही केंद्रे आपल्या युवकांना कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उत्प्रेरक म्हणून कार्य करतील”
“कुशल भारतीय युवकांना जागतिक पातळीवर वाढती मागणी आहे”
“भारत केवळ स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी कुशल व्यावसायिक घडवत आहे”
“सरकारने कौशल्य विकासाची गरज ओळखली आणि स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतुदी तसेच विविध योजनांचा अंतर्भाव असलेले स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले”
देशातील गरीब, दलित, मागास आणि आदिवासी कुटुंबे सरकारच्या कौशल्यविकास उपक्रमांचे सर्वात मोठे लाभार्थी आहेत”
“महिलांचे शिक्षण आणि प्रशिक्षण यांच्यावर सरकारने अधिक भर दिला आहे आणि त्यामागे सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा आहे”
“पंतप्रधान विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागीर तसेच हस्तकलाकार अधिक सक्षम होतील”
“उद्योग 4.0 साठी नवी कौशल्ये आवश्यक असतील”
“देशातील विविध सरकारांना त्यांच्या कौशल्य विकासाचा परीघ अधिक विस्तारित करावा लागेल”

नमस्कार. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, अजित पवार जी, मंगल प्रभात लोढा जी, राज्य सरकारचे अन्य सर्व मंत्रिगण, स्त्री आणि पुरुष गण,  

नवरात्रीचा पवित्र उत्सव सुरु आहे. आज नवरात्रीचा पाचवा दिवस असून या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. प्रत्येक आई तिच्या मुलांना सुख आणि यश लाभो अशी प्रार्थना करते. सुख आणि यशाची प्राप्ति केवळ शिक्षण आणि कौशल्याद्वारेच शक्य आहे. आजच्या शुभ प्रसंगी महाराष्ट्रातील आपल्या मुलामुलींच्या कौशल्य विकासासाठी एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे. आणि माझ्या समोर जे लाखो युवक बसले आहेत आणि ज्यांनी या कौशल्य विकासाच्या मार्गावर पुढे चालण्याचा संकल्प केला आहे, त्यांना मी अवश्य सांगेन की त्यांच्या जीवनात आजची ही सकाळ मंगल प्रभात बनून आली आहे. महाराष्ट्रात 511 ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची स्थापना होणार आहे.

मित्रहो, 

आज जगभरात भारतातील कुशल युवकांची मागणी वाढत आहे. असे अनेक देश आहेत जिथे ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप जास्त आहे, वृद्धांची संख्या वाढत आहे आणि प्रशिक्षित तरुण मिळणे कठीण झाले आहे. या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की जगातील 16 देश सुमारे 40 लाख कुशल युवकांना नोकऱ्या देऊ इच्छितात.

या देशांमध्ये कुशल व्यावसायिकांच्या कमतरतेमुळे हे देश इतर देशांवर अवलंबून आहेत. बांधकाम क्षेत्र, आरोग्यसेवा क्षेत्र, पर्यटन उद्योग, आदरातिथ्य, शिक्षण आणि वाहतूक अशी अनेक क्षेत्रे आहेत, जिथे आज परदेशात खूप मागणी आहे. त्यामुळे आज भारत केवळ स्वतःसाठीच नाही तर जगासाठी कुशल व्यावसायिक तयार करत आहे.

महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात सुरू होणारी ही नवीन कौशल्य विकास केंद्रे युवकांना जगभरातील संधींसाठी तयार करतील.  या केंद्रांमध्ये बांधकाम क्षेत्राशी संबंधित कौशल्ये शिकवली जातील. आधुनिक पद्धतीचा वापर करून शेती कशी करायची याच्याशी संबंधित कौशल्ये शिकवली जातील.  महाराष्ट्रात प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्राचे काम  इतके मोठे  आहे. यासाठी देखील विशेष प्रशिक्षण देणारी अनेक केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. आज भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरचे मोठे केंद्र बनत आहे. अशा परिस्थितीत डझनभर केंद्रांवर या क्षेत्राशी संबंधित कौशल्येही शिकवली जातील.  या कौशल्य विकास केंद्रांसाठी मी महाराष्ट्रातील युवकांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आणि मी सरकारला, शिंदेजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला युवकांच्या कौशल्य विकासासाठी सॉफ्ट-स्किलचे प्रशिक्षण देण्याबाबत थोडा वेळ देण्याची विनंती करतो.

ज्यामध्ये आपल्या युवकांना  परदेशात जाण्याची संधी मिळाली तर त्यांनी सामान्य व्यवहाराच्या ज्या गोष्टी असतात , अनुभव असतो, जगात उपयोगी पडतील अशी 10-20 वाक्ये वापरणे असेल, किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून त्यांना दुभाषी म्हणून भाषा संबंधी समस्या  येऊ नये, तर या गोष्टी परदेशात जाणाऱ्या लोकांसाठी खूप उपयुक्त आहेत. आणि अशाप्रकारे, जे आधीच तयार असतात, कंपन्या त्यांना त्वरीत भरती देखील करतात जेणेकरून ते तेथे गेल्यावर लगेच या कामासाठी पात्र होतात. त्यामुळे मला असे वाटते की सॉफ्ट स्किल्ससाठीही काही तरतूद करावी, काही ऑनलाइन मोड्यूल्स विकसित केले जावेत, ही मुले उर्वरित वेळेत ऑनलाइन परीक्षा देत राहिल्यास त्यांच्यामध्ये एक विशेष पद्धत विकसित होण्याची शक्यता आहे.

मित्रहो, 

यापूर्वीच्या सरकारांकडे कौशल्य विकासाबाबत दूरदृष्टी आणि गांभीर्य यांचा  अभाव होता. यामुळे आपल्या तरुणांचे मोठे नुकसान झाले. उद्योग क्षेत्रात मागणी असूनही , तरुणांमध्ये प्रतिभा असूनही कौशल्य विकासाअभावी तरुणांना नोकऱ्या मिळणे अत्यंत कठीण झाले होते. मात्र आमच्या सरकारने तरुणांमधील कौशल्य विकासाचे महत्व समजून घेतले आहे.

आम्ही कौशल्य विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले आणि भारतात प्रथमच कौशल्य या एकाच विषयासाठी समर्पित मंत्रालय आहे, म्हणजे देशातील तरुणांसाठी समर्पित एक नवीन मंत्रालय आहे. स्वतंत्रपणे तरतूद ठरवली आणि अनेक योजना सुरू केल्या. कौशल्य विकास योजनेंतर्गत आतापर्यंत 1 कोटी 30 लाखांहून अधिक तरुणांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सरकारने देशभरात शेकडो पंतप्रधान कौशल्य केंद्रेही स्थापन केली आहेत.

 

मित्रांनो,

कौशल्य विकासाच्या अशा प्रयत्नांमुळे सामाजिक न्यायालयालाही मोठे बळ मिळाले आहे. बाबासाहेब आंबेडकर देखील समाजातील दुर्बल घटकांच्या कौशल्य विकासावर खूप भर देत होते.  बाबासाहेबांची विचारसरणी वास्तवाशी जोडलेली होती. आपल्या दलित आणि वंचित बांधवांकडे तुटपुंजी जमीन आहे हे त्यांना चांगलेच माहीत होते. दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना सन्मानाचे जीवन मिळावे यासाठी त्यांनी औद्योगिकीकरणावर भर दिला. आणि उद्योगांमध्ये काम करण्यासाठी सर्वात आवश्यक अट आहे ...  कौशल्य. पूर्वीच्या काळी या समाजातील अनेक घटकांना कौशल्याअभावी चांगल्या कामापासून आणि चांगल्या रोजगारापासून वंचित राहावे लागले  होते. आणि आज भारत सरकारच्या कौशल्य योजनांचा सर्वाधिक लाभ गरीब, दलित, मागास आणि आदिवासी कुटुंबांना होत आहे.

 

मित्रांनो,
सावित्रीबाई फुले यांनी भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी समाजाच्या बंधनांना तोडण्याचा मार्ग दाखवला होता. ज्याच्याकडे ज्ञान आणि कौशल्य असेल तोच समाजात परिवर्तन घडवू शकतो यावर त्यांचा दृढ विश्वास होता. सावित्रीबाई फुले यांच्याकडून प्रेरणा घेऊन  सरकार मुलींचे शिक्षण आणि प्रशिक्षण यावर सारख्याच प्रमाणात भर देत आहे. आज गावागावात स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. महिला सशक्तीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून 3 कोटींहून अधिक स्त्रियांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. देशात आता ड्रोनच्या वापरातून शेती आणि इतर कामांसाठी देखील प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी देखील गावातील भगिनींना विशेष प्रशिक्षण देण्यात येईल.

मित्रांनो,
आपल्याकडे गावागावांमध्ये अशी कुटुंबे आहेत जी त्यांच्याकडील कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला शिकवली जाते. केशकर्तन करणारी, पादत्राणे तयार करणारी, कपडे धुणारी, राजमिस्त्री, सुतार, कुंभार,लोहार, सोनार अशी वेगवेगळ्या कारागीरीत पारंगत असलेली कुटुंबे नसलेले एकतरी गाव असेल का, सांगा. अशा कुटुंबांना मदत करण्यासाठीच भारत सरकारने पीएम विश्वकर्मा योजना सुरु केली, जिचा उल्लेख आत्ता अजितदादांनी देखील केला. या योजनेअंतर्गत, प्रशिक्षणापासून, आधुनिक उपकरणे आणि कामाचा विस्तार वाढवण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर सरकार आर्थिक मदत देणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारला 13 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मला असे सांगण्यात आले आहे की महाराष्ट्रात उभारली जाणारी ही 500 हून अधिक ग्रामीण कौशल्य विकास केंद्रेदेखील पीएम विश्वकर्मा योजनेसाठी काम करणार आहेत. मी यासाठी महाराष्ट्र सरकारचे विशेष अभिनंदन करु इच्छितो.
 

मित्रांनो,
कौशल्य विकासासाठी हे प्रयत्न करत असतानाच आपल्याला याचा देखील विचार करावा लागेल की कोणकोणत्या क्षेत्रांमधील कौशल्ये वाढवल्यानंतर देशाला सामर्थ्य प्राप्त होईल. उदाहरणार्थ, आज निर्मिती क्षेत्रात उत्तम दर्जाची उत्पादने, संपूर्णपणे दोषमुक्त उत्पादने तयार होणे ही देशाची गरज आहे. उद्योग 4.0 साठी नवनव्या कौशल्यांची गरज आहे, सेवा क्षेत्र, ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था आणि आधुनिक तंत्रज्ञान लक्षात घेऊन सरकारला देखील नव्या कौशल्यांवर भर द्यावा लागेल. कोणत्या प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती केल्याने आपल्याला आत्मनिर्भर होता येईल याचा देखील विचार करावा लागेल. आपल्याला अशा उत्पादनांच्या निर्मितीसाठी आवश्यक कौशल्यांना प्रोत्साहन द्यावे लागेल.
 

मित्रांनो,
भारताच्या कृषी क्षेत्रामध्ये आज अनेक नव्या कौशल्यांची नितांत गरज आहे. रसायनांच्या वापरासह केल्या जात असलेल्या शेतीमुळे आपल्या धरतीमातेवर खूप अत्याचार होतो आहे. यापासून धरतीला वाचवण्यासाठी नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती यांचा स्वीकार करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी देखील कौशल्ये आत्मसात करण्याची गरज आहे. शेती करताना पाण्याचा समतोल वापर कसा करावा, यासाठी देखील काही नवी कौशल्ये शिकायची गरज आहे. आपल्याला आपल्या कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करून, त्यांचे मूल्यवर्धन करून, त्यांचे पॅकेजिंग, ब्रँडिंग करणे तसेच ही उत्पादने ऑनलाईन जगतापर्यंत पोहोचवणे या सगळ्यासाठी देखील नित्यनूतन कौशल्ये विकसित करण्याची गरज आहे. म्हणूनच देशातील विविध सरकारांनी त्यांच्या कौशल्य विकासाचा परिघ आणखी वाढवला पाहिजे. कौशल्य विकासाच्या संदर्भात झालेली ही जागृती, स्वातंत्र्याच्या अमृतकाळात, विकसित भारताच्या उभारणीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावेल.

मी पुन्हा एकदा शिंदे जी आणि त्यांच्या संपूर्ण सहकारी संघाचे अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. तसेच ज्या तरुण मुलामुलींनी हा कौशल्याचा मार्ग स्वीकारला आहे, किंवा जे यासंबंधी विचार करत आहेत, मला वाटते की त्यांनी अगदी योग्य मार्ग निवडला आहे. ही मुले मुली त्यांच्या कौशल्याच्या सामर्थ्याच्या माध्यमातून स्वतःच्या कुटुंबासाठी खूप काही करू शकतात, देशासाठी देखील खूप काही करू शकतात. माझ्यातर्फे या सर्व तरुण मुलामुलींना विशेष शुभेच्छा. 


मला आलेला एक अनुभव तुम्हांला सांगतो, मी एकदा सिंगापूरला गेलो होतो. त्यावेळी, सिंगापूरच्या पंतप्रधानांसोबत माझा काही कार्यक्रम होता. त्यावेळी माझे वेळापत्रक अत्यंत व्यस्त होते, अनेक कार्यक्रम ठरलेले होते. तर त्या पंतप्रधानांनी खूप आग्रह केला की कसेही करून तुम्ही माझ्यासाठी थोडा तरी वेळ काढा. आता, त्या देशाच्या पंतप्रधानांचा आग्रह म्हटल्यावर, मी ही म्हटले की ठीक आहे, मी काहीतरी व्यवस्था करतो. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी थोडा आढावा घेतला, वेळ काढला आणि बघतो तर काय.. त्यांनी कशासाठी वेळ मागितला असेल? तर आपल्याकडे जसे आयटीआय असतात तसे सिंगापूरमध्ये जे कौशल्य विकास केंद्र आहे ते पाहण्यासाठी पंतप्रधान मला घेऊन गेले. ते केवढ्या अभिमानाने मला त्या केंद्राचे दर्शन घडवत होते, मला ते म्हणाले की मी हे केंद्र अगदी मनापासून स्थापन केले आहे. त्यांनी सांगितले की एके काळी अशा प्रकारच्या संस्थेत येण्यामुळे लोकांना समाजात प्रतिष्ठा मिळत नसे, त्यांना लाज वाटत असे. बाकीचे लोक त्यांना म्हणत की, तुमचा मुलगा महाविद्यालयात शिकत नाही.. तर या संस्थेत शिकतो...अशा प्रकारे हिणवत असत. सिंगापूरचे पंतप्रधान पुढे म्हणाले की जेव्हापासून माझे हे कौशल्य विकास केंद्र उत्तम रीतीने विकसित झाले आहे तेव्हापासून सिंगापूरमधील नावाजलेल्या कुटुंबांतील लोक देखील त्यांच्या घरातील मुलांना, कुटुंबातील मुलांना कौशल्य विकासासाठी या संस्थेत प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न करत असतात. आणि खरोखरीच, त्यांनी या विषयाकडे एवढे लक्ष दिले म्हणून समाजात कौशल्य विकासाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. आपल्या देशात देखील श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणे, ‘श्रमेव जयते’ आपल्या कुशल मनुष्यबळाला मान मिळवून देणे हे समाजाचे देखील कर्तव्य आहे.


मी पुन्हा एकदा या सर्व तरुणांचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मला तुमच्या या कार्यक्रमाला यायला मिळाले, मी बघतोय येथे लाखोंच्या संख्येने तरुण उपस्थित आहेत, सर्वत्र तरुणच दिसत आहेत. या सर्व तरुणांना भेटण्याची संधी आज मला मिळाली. मी मंगल प्रभात जी यांचे आणि शिंदे यांच्या संपूर्ण सहकारी सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
 

नमस्कार।

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Modi’s podcast with Fridman showed an astute leader on top of his game

Media Coverage

Modi’s podcast with Fridman showed an astute leader on top of his game
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 18 मार्च 2025
March 18, 2025

Citizens Appreciate PM Modi’s Leadership: Building a Stronger India