ओडिशाचे राज्यपाल डॉक्टर हरिबाबू जी, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन चरण माँझी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी एस. जयशंकरजी, ज्युएल ओरांवजी, धर्मेंद्र प्रधानजी, अश्विनी वैष्णवजी, शोभा करंदलाजेजी, कीर्ति वर्धन सिंहजी, पबित्रा मार्गेरिटाजी, ओडिशाचे उपमुख्यमंत्री कनक वर्धन सिंहदेव, प्रवती परिदाजी तसंच अन्य मंत्रीगण, खासदार, आमदार, जगभरातून इथे उपस्थित भारतमातेचे सर्व सुपुत्र !
महिला आणि पुरुषगण,
भगवान जगन्नाथ आणि भगवान लिंगराज यांच्या पावन भूमीवर, संपूर्ण जगातून आलेल्या माझ्या भारतीय वंशाच्या परिवाराचे स्वागत करतो. आत्ता सुरूवातीला जे स्वागत गीत सादर झालं, ते भविष्यातही जगभरात जिथे कुठे भारतीय समुदायाचे कार्यक्रम होतील, त्या कार्यक्रमांमध्ये नेहमी सादर केले जाईल, असा मला विश्वास वाटतो. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. फार सुंदर पद्धतीने आपल्या समुहाने एका प्रवासी भारतीयाच्या भावना व्यक्त केल्या, आपल्या सर्वांचे खूप अभिनंदन.
मित्रांनो,
प्रवासी भारतीय दिवसाच्या प्रमुख पाहुण्यांचं भाषण आता आपण ऐकलं. त्रिनिदाद आणि टोबागोचे राष्ट्रपती ख्रिस्तीन कांगालू यांचा प्रभावी ध्वनिचित्रमुद्रीत संदेश आपण सर्वांनी ऐकला. त्या देखील भारताच्या प्रगतीविषयी व्यक्त झाल्या. त्यांच्या प्रेमळ शब्द आणि सद्भावना यांच्यासाठी त्यांना धन्यवाद देतो.
मित्रांनो,
भारतात सध्याचा काळ उत्साही सण आणि मेळाव्यांचा आहे. येत्या काही दिवसांत, प्रयागराज इथे महाकुंभ सुरू होईल. तसेच मकरसक्रांत, लोहरी, पोन्गल आणि माघ बिहू हे सणही येत्या काळात साजरे होतील . सर्वदूर आनंदी वातावरण आहे. शिवाय आजच्याच दिवशी 1915 मध्ये महात्मा गांधी दीर्घकाळ परदेशात वास्तव्य केल्यानंतर मायदेशी परतले होते. अशा या उत्तम काळात आपल्या सर्वांची भारतातली उपस्थिती या उत्सवाच्या उत्साहात भर घालते आहे. यावर्षीचा प्रवासी भारतीय दिन हा आणखी एका कारणासाठी विशेष आहे. आपण सारे, अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनंतरच्या काही दिवसांत जमलो आहोत. या कार्यक्रमासंदर्भात त्यांची दूरदृष्टी महत्त्वाची ठरली. ती भारत आणि प्रवासी भारतीय यांच्यातील बंध मजबूत करण्यातली एक संस्था ठरली. आपण, सर्वजण भारत, भारतीयत्व, आपली संस्कृती, आपली प्रगती साजरी करतो आहोत आणि आपल्या मुळांशी जोडले जातो आहोत.
मित्रांनो,
आपण ज्या ओडिशाच्या महान भूमीवर जमला आहात, ती भारताची एक समृद्ध वारश्याचे प्रतिबिंब आहे. ओडिशामध्ये पावलोपावली आपल्या वारश्याचे दर्शन घडते. उदयगिरी-खंडगिरीच्या ऐतिहासिक गुंफा असो, कोणार्कचं सूर्य मंदीर असो, तम्रलिप्ती, माणिकपटना आणि पलूरमधील प्राचीन बंदरे असो, हे सारे पाहिल्यानंतर प्रत्येकाला अभिमान वाटतो. शेकडो वर्षांपुर्वी आपले व्यापारी-व्यावसयिक ओडिशातून दीर्घ सागरी प्रवास करून बाली, सुमात्रा, जावा सारख्या ठिकाणी जात असत. त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ आजही ओडिशामध्ये बाली यात्रेचे आयोजन केले जाते. ओडिशामध्येच धौली नावाचे स्थान, शांततेचे मोठे प्रतीक आहे. जगभरात जेव्हा तलवारीच्या जोरावर साम्राज्य विस्ताराचा काळ होता, तेव्हा आमच्या सम्राट अशोकाने हा शांतीचा मार्ग निवडला होता. आपल्या याच वारश्याचे बळ आहे, ज्याची प्रेरणेने भारत जगाला सांगू शकतो की, युद्धात भविष्य नाही तर ते बुद्धांमध्ये आहे. म्हणून ओडिशाच्या या भूमीवर आपले स्वागत करणे माझ्यासाठी विशेष गोष्ट आहे.
मित्रांनो,
मी प्रवासी भारतीयांना नेहमीच भारताचे राष्ट्रदूत मानत आलो आहे. जेव्हा संपूर्ण जगभरात तुम्हा सर्वांना भेटतो, तुमच्याशी संवाद साधतो तेव्हा मला खूप आनंद होतो. जे प्रेम मला मिळते, ते मी कधीच विसरू शकत नाही. तुमचा स्नेह, आशीर्वाद नेहमीच माझ्याबरोबर असतो.
मित्रांनो,
आज मी, व्यक्तिगत पातळीवर तुमचे आभार मानू इच्छितो, आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो. धन्यवाद यासाठी कारण तुमच्यामुळेच जगभरात मला माझे मस्तक गर्वाने उंच करण्याची संधी मिळते. गेल्या दहा वर्षात मी जगातल्या अनेक नेत्यांना भेटलो. जगभरातला प्रत्येक नेता, आपल्या देशातल्या प्रवासी भारतीयांची, तुम्हा सर्वांची खूप प्रशंसा करतात. याचे एक महत्त्वाचे कारण आहे सामाजिक मूल्य, जी तुम्ही सर्वजण त्या त्या समाजात पेरता. आपण केवळ लोकशाहीची जननी नसून, लोकशाही आपल्या आयुष्याचा भाग आहे, आपली जीवनपद्धती आहे. आपल्याला विविधता शिकवावी लागत नाही, आपले विविधतेमुळेच आयुष्य सुरू राहाते. म्हणूनच भारतीय जिथे जातात, तिथल्या समाजाशी जोडले जातात. आपण जिथे जाऊ तिथले नियम, तिथल्या परंपरांचा आदर करतो. आपण प्रामाणिकपणे त्या देशाच्या, त्या समाजाची सेवा करतो. तिथल्या विकास आणि समृद्धीमध्ये योगदान देतो. आणि सर्वांबरोबरच आपल्या मनात भारत रुंजी घालत रहातो. आपण भारताच्या आनंदात आनंदी होता, भारताच्या प्रत्येक यशाचा उत्सवही साजरा करता.
मित्रांनो,
21 व्या शतकातला भारत ज्या वेगाने प्रगती करतो आहे, आज भारतात ज्या पातळीवर विकासाची कामे होत आहेत, ते सारे अभूतपूर्व आहे. केवळ 10 वर्षात भारताने आपल्या इथल्या 25 कोटी जनतेला गरीबीतून बाहेर काढले आहे. केवळ 10 वर्षांत भारत, जगातील दहाव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेवरून पाचव्या क्रमाकांची सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे. आणि तो दिवस दूर नाही, जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल.
जग आज भारताचे यश पाहत आहे, जेव्हा भारताचे चांद्रयान शिव-शक्ती बिंदूवर पोहोचते तेव्हा आपल्या सर्वांना अभिमान वाटतो. आज जेव्हा डिजिटल इंडियाची ताकद पाहून जग आश्चर्यचकित होते, तेव्हा आपल्या सर्वांना अभिमान वाटतो. आज भारतातील प्रत्येक क्षेत्र आकाशाची उंची गाठण्यासाठी पुढे सरसावले आहे. नवीकरणीय ऊर्जा असो, विमान वाहतूक परिसंस्था असो, इलेक्ट्रिक मोबिलिटी असो, मेट्रोचे विशाल जाळे असो, बुलेट ट्रेन प्रकल्प असो, भारताच्या प्रगतीचा वेग सर्व विक्रम मोडत आहे. आज भारत मेड इन इंडिया लढाऊ विमाने बनावट आहे, प्रवासी विमाने बनवत आहे, आणि तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही एखाद्या मेड इन इंडिया विमानाने, प्रवासी भारतीय दिन साजरा करण्यासाठी भारतात याल.

मित्रांनो,
भारताचे हे जे यश आहे, ज्या शक्यता आज भारतात दिसत आहेत, त्यामुळे भारताची जागतिक भूमिका मजबूत होत आहे. आज जग भारताचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत आहे. आजचा भारत आपला मुद्दा तर ठामपणे मांडतोच, पण त्याबरोबर ग्लोबल साउथचा आवाजही पूर्ण ताकदीनिशी उठवतो. भारताने आफ्रिकन युनियनला जी-20 चे स्थायी सदस्य बनवण्याचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा सर्व सदस्यांनी त्याला पाठिंबा दिला. ‘ह्युमॅनिटी फर्स्ट’च्या भावनेतून भारत आपल्या जागतिक भूमिकेचा विस्तार करत आहे.
मित्रांनो,
भारताच्या प्रतिभेचा डंका आज संपूर्ण जगात वाजत आहे, आज आमचे व्यावसायिक जगातील मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून जागतिक विकासात योगदान देत आहेत. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या अनेक सहकाऱ्यांना प्रवासी भारतीय सन्मान प्रदान केला जाईल. हा सन्मान प्राप्त करणाऱ्या सर्व मान्यवरांना मी शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
येत्या अनेक दशकांपर्यंत भारत हा जगातील सर्वात तरुण आणि कुशल लोकसंख्या असलेला देश राहील. हा भारत आहे, जिथून जगाची सर्वात मोठी कौशल्याची मागणी पूर्ण होईल. जगातील अनेक देश आता भारतातील कुशल तरुणांचे दोन्ही हात पुढे करून स्वागत करत असल्याचे आपण पाहिले असेलच. हे लक्षात घेऊन, कोणत्याही भारतीयाने उत्तम कौशल्य संपादन करूनच परदेशात जावे, असा भारत सरकारचा प्रयत्न आहे. यासाठीच आम्ही आमच्या युवा वर्गाला सातत्त्याने स्किलीलंग, रि-स्किलिंग आणि अप-स्किलिंग करत आहोत.

मित्रांनो,
आम्ही आपल्याला सोयी सुविधा मिळाव्यात, या गोष्टीला मोठे महत्व देतो. तुमची सुरक्षा आणि कल्याण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. संकटाच्या काळात भारतीय समुदायाला मदत करणे, ही आम्ही आपली जबाबदारी समजतो, मग ते कोठेही असोत. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे हे एक मार्गदर्शक तत्त्व आहे. गेल्या दशकभरात जगभरातील आपले दूतावास आणि कार्यालये संवेदनशील आणि सक्रिय राहिली आहेत.
मित्रांनो,
यापूर्वी अनेक देशांमध्ये दूतावास सुविधा मिळण्यासाठी लोकांना लांबचा प्रवास करावा लागत होता. मदतीसाठी त्यांना अनेक दिवस वाट पहावी लागत होती. मात्र, आता हा प्रश्न सुटला आहे. गेल्या केवळ दोन वर्षांत चौदा दूतावास आणि वाणिज्य दूतावास उघडण्यात आले आहेत. ओसीआय कार्डची व्याप्तीही वाढविण्यात येत आहे. मॉरिशसच्या सातव्या पिढीतील पीआयओ आणि सुरीनाम मार्टिनिक आणि ग्वाडेलूपच्या सहाव्या पिढीतील पीआयओपर्यंत याचा विस्तार करण्यात आला आहे.
मित्रांनो,
जगभर पसरलेल्या भारतीय समुदायाचा इतिहास, त्यांनी त्या देशात पोहोचून तेथे आपला झेंडा फडकवल्याच्या कहाण्या, हा भारताचा महत्त्वाचा वारसा आहे. तुमच्या अशा अनेक औत्सुक्य वाढवणाऱ्या आणि प्रेरणादायी कथा आहेत, ज्या सांगायला, दाखवायला हव्यात आणि जपायला हव्यात. ही आपली सामायिक परंपरा आहे, सामायिक वारसा आहे. आत्ता काही दिवसांपूर्वीच मन की बातमध्ये मी अशाच प्रयत्नाबद्दल सविस्तर बोललो होतो. काही शतकांपूर्वी गुजरातमधील अनेक कुटुंबे ओमानमध्ये स्थायिक झाली. त्यांचा 250 वर्षांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. यासंबंधीचे प्रदर्शनही येथे आयोजित करण्यात आले आहे. या ठिकाणी या समाजाशी संबंधित हजारो कागदपत्रांचे डिजिटायझेशन करून ठेवण्यात आहे. त्याच बरोबर 'ओरल हिस्ट्री प्रोजेक्ट' ही करण्यात आला आहे. म्हणजे समाजातील जे ज्येष्ठ लोक आहेत, त्यांनी आपले अनुभव शेअर केले आहेत. यापैकी अनेक कुटुंबे आज या ठिकाणी उपस्थित आहेत, याचा मला आनंद वाटतो.
मित्रांनो,
अशाच प्रकारचे प्रयत्न विविध देशांतील भारतीय समुदायाबरोबर व्हायला हवेत. एक उदाहरण म्हणजे, आपले "गिरमिट्या" बंधू-भगिनी आहेत. आपल्या गिरमिटिया साथीदारांचा डेटाबेस का तयार करू नये? ते भारतातील कोणत्या गावातून आणि शहरातून गेले, हे शोधायला हवे. ते जिथे जाऊन स्थायिक झाले, ती ठिकाणेही ओळखली गेली पाहिजेत. त्यांचे जीवन कसे होते, त्यांनी कोणकोणत्या आव्हानांचे संधीत रुपांतर केले, ही माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक चित्रपट बनू शकतो, माहितीपट बनू शकतो. गिरमिटिया वारशाचा अभ्यास व संशोधन करण्यासाठी विद्यापीठात अध्यासन स्थापन करता येईल, नियमित अंतराने जागतिक गिरमिटिया परिषदही आयोजित करता येईल. मी माझ्या टीमला याची शक्यता तपासायला, ते पुढे नेण्यावर काम करायला सांगेन.

मित्रांनो,
आजचा भारत, ‘विकासही आणि वारसाही’ याच मंत्रावर चालत आहे. जी-20 दरम्यान आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात बैठका घेतल्या, जेणेकरून जगाला भारताच्या विविधतेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. आम्ही या ठिकाणी काशी-तमिळ संगमम, काशी तेलुगू संगमम, सौराष्ट्र तमिळ संगमम असे कार्यक्रम मोठ्या अभिमानाने आयोजित करतो. आता काही दिवसांनी संत तिरुवल्लुवर दिन आहे. संत तिरुवल्लुवर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आमच्या सरकारने तिरुवल्लुवर सांस्कृतिक केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंगापूरमध्ये अशा प्रकारच्या पहिल्या केंद्राचे काम सुरू झाले आहे. अमेरिकेतील ह्युस्टन विद्यापीठातही तिरुवल्लुवर चेअरची स्थापना करण्यात येत आहे. या सर्व प्रयत्नांमुळे, तमिळ भाषा, तमिळ वारसा, भारताचा वारसा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत आहे.
मित्रांनो,
भारतामध्ये वारसा संबंधित स्थानांबरोबर तुमच्यापैकी कुणालाही सहजपणे भेट देता यावी , संपर्क साधता यावा, यासाठी आम्ही अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये भगवान श्रीराम आणि सीतामाता यांच्याशी संबंधित असलेल्या स्थानांना जोडण्यासाठी विशेष रामायण एक्सप्रेस रेल्वे गाडी सोडण्यात येते. भारत गौरव रेल गाडीही देशातील महत्वाच्या वारसा स्थानांना जोडण्यात आली आहे. आपल्या ‘सेमी हायस्पीड’ वंदे भारत गाड्याही आम्ही देशातील मोठ्या सांस्कृतिक वारसा स्थानांना जोडल्या आहेत. काही वेळापूर्वीच एक विशेष ‘प्रवासी भारतीय एक्सप्रेस‘गाडी सुरू करण्याची संधी मला मिळाली. यामध्ये जवळपास 150 लोक, पर्यटन आणि श्रध्दास्थानांना जोडणा-या वेगवेगळ्या 17 पर्यटन स्थानांना भेटी देतील. आपण सर्वांनी अगदी जरूर पाहिली पाहिजेत, अशी येथे म्हणजेच ओडिशामध्येही अनेक पर्यटन स्थाने आहेत, त्यांना आपण सर्वांनी अवश्य भेट द्यावी. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा लवकरच सुरू होत आहे. अशी संधी आयुष्यात पुन्हा पुन्हा मिळत नाही, त्यामुळे आपण कुंभमेळ्यालाही जरूर जावे.

मित्रांनो,
वर्ष 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले यामध्ये खूप मोठी भूमिका भारताबाहेर वास्तव्य करणा-या, मात्र मूळ जन्माने भारतीय असलेल्या नागरिकांनीही बजावली आहे. त्यांनी परदेशामध्ये राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले योगदान दिले आहे. आता आमच्या समोर 2047 मध्ये विकसित भारत तयार करण्याचे लक्ष्य आहे. आपल्याला भारत देश पूर्ण विकसित राष्ट्र बनवायचे आहे. तुम्ही सर्व मंडळी आजही भारताच्या विकासामध्ये खूप महत्वपूर्ण योगदान देत आहात. तुमच्या परिश्रमामुळे आज भारत ‘रेमिटन्स’च्याबाबतीत संपूर्ण जगामध्ये क्रमांक एक वर पोहोचला आहे. आता आपल्याला यापुढे जावूनही विचार करावा लागणार आहे. तुम्ही भारताबरोबरच इतर देशांमध्येही गुंतवणूक करीत असता. वित्तीय सेवा आणि गुंतवणूक यासंबंधित असलेल्या आपल्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आता आपल्याकडे असलेली गिफ्ट सिटी परिसंस्था लाभदायक ठरू शकते, तिचा फायदा तुम्ही करून घेवू शकता. आणि विकसित भारताच्या प्रवासाला अधिक बळकट करू शकता. तुमच्याकडून होणारा प्रत्येक प्रयत्न, भारताला बळकट बनवेल. भारताच्या विकासयात्रेला त्याची मदत होईल. याचे कारण म्हणजे, पर्यटनामध्ये एक क्षेत्र ‘वारसा संरक्षित संस्था’ आहे. आता अवघ्या जगामध्ये भारताला नवीन ओळख इथल्या मोठ-मोठ्या महानगरांच्या शहरांमुळेही मिळाली आहे. देशातली मोठी महानगरे भारताची नवी ओळख निर्माण करीत आहेत. परंतु भारत काही फक्त या मोठ्या महानगरांपर्यंतच मर्यादित आहे असे नाही. भारताचा खूप मोठा भाग हा दुस-या आणि तिस-या स्तरावरील शहरांनी व्यापला आहे. तसेच लहान खेडेगावेही इथली वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या भागातून भारताच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन होते. संपूर्ण जगाला अशा शहरातील, गावातील सांस्कृतिक वारशाबरोबर जोडले पाहिजे. तुम्ही मंडळींनीही आपल्या मुलांना भारतातील लहान -लहान शहरे आणि गांवांपर्यत घेवून गेले पाहिज.या मुलांनी आपल्याला आलेले अनुभव आपल्या बाहेरच्या देशातील नवीन मित्रांना जरूर सांगावे . मला असे वाटते की, पुढच्यावेळी भारतामध्ये येताना परदेशी वास्तव्य करणा-या मुलांनी आपल्या तिकडच्या किमान पाच मित्रांना भारतामध्ये यावेसे वाटावे, यासाठी प्रेरणा द्यावी. त्यांच्यामध्ये भारत पाहण्याची उत्सुकता निर्माण करण्याचे काम भारतीय मुलांनी जरूर करावे.
मित्रांनो,
परदेशस्थ भारतीय असलेल्या सर्व युवा मित्रांना माझे एक आवाहन आहे की, तुम्ही मंडळींनी भारत कसा आहे, ते जरूर जाणून घ्यावे. भारतासंबंधी असलेल्या प्रश्न मंजूषा कार्यक्रमातून जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. यामुळे भारत जाणून घेण्यास तुम्हाला मदत मिळेल. तसेच तुम्ही ‘स्टडी इन इंडिया’ या कार्यक्रमचाही खूप उपयोग होईल. ‘आयसीसीआर’मार्फत जी छात्रवृत्ती दिली जाते, त्याचाही अनिवासी भारतीय युवकांनी जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे.

मित्रांनो,
ज्या देशामध्ये तुम्ही वास्तव्य करीत आहात, तिथल्या लोकांपर्यंत भारताचा खरा इतिहास पोहोचविण्यासाठी तुम्हीच पुढाकार घेतला पाहिजे. ज्या देशांमध्ये तुम्ही वास्तव्य करीत आहात, तिथल्या तुमच्या आजच्या पिढीला आपल्या देशाची समृद्धी माहिती नाही, तसेच गुलामीच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये आपल्या लोकांनी केलेला संघर्षही त्यांना माहिती नाही. त्यामुळे भारताचा खरा इतिहास तुम्ही मंडळीच जगामध्ये पोहोचवू शकणार आहे.
मित्रांनो,
भारत आज विश्व-बंधू म्हणून अवघ्या जगामध्ये ओळखला जातो. हा वैश्विक संपर्कधागा अधिक मजबूत करण्यासाठी आता तुम्हा लोकांनाच विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. तुम्ही ज्या देशामध्ये वास्तव्य करता, त्या देशामध्ये सर्व भारतीयांनी एकत्र येवून एखादा वेगळा कोणता तरी पुरस्कार देण्यास प्रारंभ करू शकता. आणि हा पुरस्कार त्या देशांच्या मूळ निवासी लोकांसाठी ठेवला पाहिजे. आणि तिथे तुम्हीही वास्तव्य करीत असले पाहिजे. तुम्ही ज्या देशात वास्तव्य करता, त्या देशातले कोणी प्रतिष्ठित लोक असतील, कोणी साहित्य जगताशी जोडले गेलेले असतील, तर काहीजण कलाकुसरीचे काम करीत असतील, तर काहीजण चित्रपट, रंगभूमी यांच्याशी जोडले गेले असतील. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविणारे, काही विशेष कामगिरी करणारे असतील. अशा कलाकरांना, साहित्यिकांना निमंत्रित करून त्यांचा सन्मान जरूर करावा. यासाठी तिथल्या भारतीय दूतावासाची मदत तुम्ही जरूर घ्यावी. या कामी ते नक्की तुम्हाला मदत करतील. यामुळे तुमचा देशांतील लोकांबरोबर थेट संपर्क साधला जाईल. परदेशस्थ भारतीय आणि तुमच्यामध्ये एक चांगले ऋणानुबंध निर्माण होतील. एकमेकांविषयी आपुलकी, प्रेम, घनिष्ठ मैत्री निर्माण होतील.
मित्रांनो,
भारताच्या ‘लोकल’ सामुग्रीला ‘ग्लोबल’ बनविण्यामध्येही तुम्ही खूप मोठी भूमिका पार पाडली आहे. तुम्ही -मेड इन इंडिया’ अन्नपदार्थाची पाकिटे, मेड इन इंडिया‘चे कपडे अशा प्रकारचे काही ना काही सामान जरूर खरेदी करावे. जर तुमच्या देशात एखादी गोष्ट मिळत नसेल तर तुम्ही ऑनलाईन मागवून घ्यावे. ‘मेड इन इंडिया’ चे उत्पादन आपल्या स्वयंपाक घरामध्ये, बैठकीच्या खोलीमध्ये, कुणाला काही द्यायचे असेल तर त्यामध्ये भारतीय बनावटीच्या वस्तूंचा समावेश जरूर केला पाहिजे. अशा पद्धतीने विकसित भारताच्या निर्माणामध्ये तुमच्याकडून हातभार लावला जाईल. तुमच्याकडून दिले जाणारे हे योगदान खूप मोठे असणार आहे.

मित्रांनो,
आपणा सर्वांना, माझे अजून एक आवाहन आहे. हे आवाहन -माता आणि धरणीमातेशी संबंधित आहे. अलिकडेच काही दिवसांपूर्वी मी गुयानामध्ये गेलो होतो. तिथल्या राष्ट्राध्यक्षांबरोबर मी ‘एक पेड मॉं के नाम’ या उपक्रमामध्ये भाग घेतला. भारतामध्ये कोट्यवधी लोक या अभियानामध्ये सहभागी झाले आहेत, होतही आहेत. तुम्हीही ज्या कोणत्या देशामध्ये आहात, त्या देशामध्ये आपल्या मातेच्या नावाने एक झाड, एक रोप जरूर लावावे. मला विश्वास आहे की, तुम्ही ज्यावेळी सर्वजण भारतातून, आपल्या कर्मभूमी असलेल्या देशामध्ये परतणार आहात, त्यावेळी मनामध्ये एका संकल्पाचा निश्चय करूनच जाणार आहात. हा संकल्प भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा असावा. आपण सर्वांनी मिळून भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे. वर्ष 2025 आपल्या सर्वांना मंगलमय जावो, आरोग्य असो अथवा संपत्ती, आपल्या सर्व प्रकारची समृद्धी लाभावी, अशी सदिच्छा व्यक्त करतो. तुम्हा सर्वांचे भारतामध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आणि सर्वांचे अभिनंदन करतो. सर्वाना माझ्या खूप -खूप, शुभेच्छा, खूप -खूप धन्यवाद!!