नमस्कार मित्रहो,
संसदेचे हे सत्र अतिशय महत्वपूर्ण आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. हिंदुस्तानच्या चहू बाजूनी, स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवा निमित्त रचनात्मक, सकारात्मक आणि जनहितार्थ, राष्ट्र हितासाठी, जनता अनेक कार्यक्रम करत आहे, पावले उचलत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येय्याने झपाटलेल्या सर्वांनी जी स्वप्ने पहिली होती, ती स्वप्ने साकारण्यासाठी सामान्य नागरिकही देशाप्रती आपले उत्तरदायित्व निभावण्याचा प्रयत्न करत आहे, हे भारताच्या उज्वल भविष्यासाठी नक्कीच सुचिन्ह आहे.
काल आपण पाहिले. मागील संविधान दिनीही, नव्या संकल्पासह संविधानाचा उद्देश साध्य करण्यासाठी प्रत्येकाच्या दायित्वाप्रती देशाने एक संकल्प केला. त्या दृष्टीकोनातून आपण, देश, देशाच्या सर्व सामान्य नागरिकाचीही हीच इच्छा असेल की भारताच्या संसदेचे हे सत्र आणि येणारे पुढील सत्रही स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झगडणाऱ्या सर्वांच्या ज्या भावना होत्या, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या ज्या भावना आणि चैतन्य आहे त्याला अनुलक्षून संसदेतही देशहिताची चर्चा व्हावी, देशाच्या प्रगतीसाठी मार्ग शोधावेत, देशाच्या प्रगतीसाठी नवे मार्ग शोधावेत आणि यासाठी हे सत्र वैचारिक दृष्ट्या समृध्द, दूरगामी परिणाम निर्माण करणारे आणि सकारात्मक निर्णय घेणारे राहावे. संसदेचे कामकाज कसे चालले, किती उत्तम योगदान दिले या दृष्टीकोनातून भविष्यात मूल्यमापन केले जाईल अशी मला आशा आहे, कोणी किती जोर लावून संसदेच्या सत्रात अडथळा आणला हा मापदंड असू शकत नाही. संसदेत किती तास काम झाले, किती सकारात्मक काम झाले हा निकष असेल. सरकार प्रत्येक विषयावर चर्चेला तयार आहे, खुल्या चर्चेला तयार आहे. सरकार प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी तयार आहे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात संसदेत प्रश्नही असावेत आणि संसदेत शांतताही असावी अशीच आमची इच्छा आहे.
आमची इच्छा आहे की, संसदेत सरकार विरोधात, सरकारच्या धोरणाविरोधात आवाज प्रखर असावा मात्र संसदेची प्रतिष्ठा, अध्यक्षांचा सन्मान, आसनाची प्रतिष्ठा याबाबत आपले आचरण असे असावे जे आपल्या भावी पिढ्यांसाठी उपयोगी ठरेल. मागच्या सत्रा नंतर कोरोनासारख्या खडतर परिस्थितीतही देशाने कोरोना प्रतिबंधक लसीच्या 100 कोटीपेक्षा अधिक मात्रा दिल्या आणि आता आपण 150 कोटीच्या दिशेने झपाट्याने निघालो आहोत. उत्परावर्तीत नव्या विषाणूसंदर्भातले वृत्त आपल्याला अधिकच दक्ष आणि सजग करत आहे. संसदेच्या सर्व सहकाऱ्यांनाही मी सतर्क राहण्याची विनंती करतो. आपण सर्वानीही सावध राहावे अशी विनंती करतो. कारण संकटाच्या अशा काळात आपणा सर्वांचे उत्तम आरोग्य, देशवासीयांचे उत्तम आरोग्य याला आमचे प्राधान्य आहे.
देशाच्या 80 कोटी हून अधिक नागरिकांना या कोरोनाकाळाच्या संकटात अधिक त्रास सोसावा लागू नये यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून मोफत अन्नधान्य देण्याची योजना सुरु आहे. मार्च 2022 पर्यंत या योजनेला मुदत वाढ देण्यात आली आहे. सुमारे दोन लाख साठ हजार कोटी रुपये खर्चून ऐंशी कोटीहून अधिक गरिबांच्या घरची चूल या काळातही पेटावी याची काळजी घेण्यात आली आहे. या सत्रात देशहिताचे निर्णय आम्ही वेगाने घेऊ, एकजुटीने घेऊ अशी आशा मी करतो. सर्व सामान्य जनतेच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण करणारे हे निर्णय असावेत अशी अपेक्षा करतो. खूप-खूप धन्यवाद.