'केन्स सेमीकॉन' सुविधेचे उद्घाटन हे आत्मनिर्भरतेच्या दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रयत्नांना बळ देणारे आहे; एका भक्कम सेमीकंडक्टर परिसंस्थेच्या उभारणीतील हे एक ऐतिहासिक पाऊल ठरले आहे: पंतप्रधान
जागतिक बाजारपेठेत एक विश्वासार्ह सेमीकंडक्टर पुरवठादार म्हणून भारत आपली भूमिका बळकट करत आहे: पंतप्रधान
2021 मध्ये भारताने 'इंडिया सेमीकंडक्टर मिशन'चा शुभारंभ केला; हे मिशन केवळ एक औद्योगिक धोरण नसून भारताच्या आत्मविश्वासाची घोषणा आहे: पंतप्रधान
21 व्या शतकाचा हा कालखंड केवळ आर्थिक स्पर्धेचा काळ नाही, तर भविष्यातील तंत्रज्ञान-विश्वाला आकार देण्याचा काळ आहे: पंतप्रधान
या दशकात भारत हाती घेत असलेले तंत्रज्ञानविषयक उपक्रम आगामी दशकांमध्ये भारताच्या नेतृत्वाला अधिक बळकट करतील: पंतप्रधान
21 व्या शतकातील भारत हा केवळ बदलांचा साक्षीदार नाही, तर त्या बदलांचे नेतृत्व करण्याच्या निर्धाराने पुढे वाटचाल करत आहे: पंतप्रधान

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, राज्याचे  उपमुख्यमंत्री हर्ष भाई संघवी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, राज्याचे मंत्री भाई अर्जुन मोढवाडियाजी, केन्स आणि अल्फा ओमेगा सेमीकंडक्टर्समधील प्रतिनिधी, इतर मान्यवर, उपस्थित बंधु आणि भगिनिंनो

गेल्या महिन्याच्या अखेरीस मी साणंदला आलो होतो आणि या महिना अखेरीस देखील साणंदमध्ये उपस्थित आहे. दिनांक 28 फेब्रुवारी रोजी माइक्रोन प्रकल्पातून उत्पादनाची सुरुवात झाली आणि आज 31 मार्च रोजी केन्स टेक्नॉलॉजीयुक्त सेमीकंडक्टर प्रकल्पातून उत्पादन सुरू झाले आहे.हा केवळ योगायोग नाही तर भारताची सेमीकंडक्टर परिसंस्था कशा गतीने, किती जलद, किती वेगाने काम करत आहे याचे हे उदाहरण आहे. रमेश रघु आपले अभिनंदन! गुजरात सरकार तसेच या प्रकल्पांवर काम करणाऱ्या सर्वांचेच आणि माझ्या मित्रांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. 

मित्रांनो,

आज सकाळी मी एका भक्तिमय कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि आता मी एका डिजिटल कार्यक्रमासाठी उपस्थित आहे.

मित्रांनो,

एका भारतीय कंपनीने सेमीकंडक्टर चिप्सच्या निर्मितीमध्ये रस दाखवला आहे,आणि त्याचे परिणामस्वरूप आपल्या सर्वांसमोर आहे; याचा मला अतिशय आनंद होत आहे. आपली भारतीय स्वदेशी कंपनी, केन्स, आता जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळीचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. ही एक शानदार सुरुवात आहे, एक अभिमानाचा क्षण आहे, प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. येत्या काळात, अनेक भारतीय कंपन्या जागतिक सहकार्याच्या माध्यमातून जगाला एक मजबूत सेमीकंडक्टर पुरवठा साखळी प्रदान करणार आहेत.

 

मित्रांनो,

आजचा दिवस खऱ्या अर्थाने 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' या मंत्राला प्रत्यक्ष स्वरुप देत आहे. या प्रकल्पाच्या उत्पादनाला सुरुवात झाल्याने, भारत जागतिक बाजारपेठेत एक विश्वसनीय सेमीकंडक्टर पुरवठादार म्हणून आपली भूमिका अधिक सशक्त करत आहे. आज, एकाप्रकारे, साणंद आणि सिलिकॉन व्हॅली यांच्यात एक नवीन पूल तयार झाला आहे. कॅलिफोर्नियामधील एका कंपनीसाठी हा साणंद येथील प्रकल्प इंटेलिजेंट पॉवर मॉड्यूल्स पुरवत आहे. येथे उत्पादित होणाऱ्या उत्पादनांचा एक मोठा भाग निर्यातीसाठी आधीच बुक करण्यात आला आहे, असे मला सांगण्यात आले आहे.  साणंदमध्ये तयार झालेले मॉड्यूल्स अमेरिकेतील कंपन्यांपर्यंत पोहोचतील आणि तिथून संपूर्ण जगाला ऊर्जा पुरवली जाईल. 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड'च्या यशाच्या मंत्राचे प्रतिध्वनि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील.

मित्रांनो,

येथे उत्पादित झालेल्या इंटेलिजेंट पॉवर मॉड्यूल्स, भारत आणि जगभरातील इलेक्ट्रिक वाहन परिसंस्थेला आणि अवजड उद्योगाला मोठी चालना देतील. हीच जागतिक भागीदारी जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक भक्कम पाया आहे.

मित्रांनो,

एकविसाव्या शतकाचे हे दशक सुरुवातीपासूनच जगासमोर असंख्य आव्हाने उभी करत आले आहे. महामारीचे संकट होते, युध्दाचे संकट आहे आणि संघर्षांनी जगाला ग्रासले आहे. याचा सर्वात मोठा फटका जागतिक पुरवठा साखळीला बसला आहे. चिप्स असोत, दुर्मिळ खनिजे असोत किंवा ऊर्जा असो, या सर्वांवर संघर्षांचा गंभीर परिणाम झाला आहे. या गोष्टी मानवतेच्या जलद विकासाशी निगडित आहेत. त्यांच्या पुरवठा साखळीतील व्यत्यय, त्यांच्या प्रवाहातील अडथळा, संपूर्ण मानवतेच्या विकासावर परिणाम करतो. त्यामुळे, भारतासारख्या लोकशाही देशाची या दिशेने होणारी प्रगती संपूर्ण जगाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

 

मित्रांनो,

कोरोनाच्या संकटाच्या काळातच आम्ही ठरवले होते की, भारत सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी एक नवीन जागतिक केंद्र बनेल आणि या क्षेत्रात आत्मनिर्भर होईल. खरे पहाता सेमीकंडक्टरमधील आत्मनिर्भरता केवळ एका चिपपुरती मर्यादित नाही. याचा अर्थ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इलेक्ट्रिक वाहने, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स आणि अशा इतर अनेक क्षेत्रांमधे आत्मनिर्भर होण्यास अधिक समर्थन मिळेल. म्हणूनच, 2021 मध्ये भारताने 'इंडिया सेमीकंडक्टर मिशन' सुरू केले. ही मोहीम केवळ एक औद्योगिक धोरण नाही; तर ही भारताच्या आत्मविश्वासाची घोषणा आहे. आणि त्याचा प्रभाव सर्वांनाच स्पष्ट दिसत आहे. या मोहिमेअंतर्गत, देशभरातील सहा राज्यांमधील एक लाख 60 हजार कोटींच्या 10 प्रकल्पांवर काम सुरू आहे. केन्स आणि मायक्रॉन यांचे प्रकल्पही या उपक्रमांचा भाग आहेत. सेमीकंडक्टर चिप डिझाइन आणि उत्पादनात आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी भारताने ध्रुव 64 सारखे आधुनिक मायक्रोप्रोसेसर विकसित केले आहेत. यामुळे आम्हाला 5G पायाभूत सुविधा, ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स आणि औद्योगिक ऑटोमेशन यांसारख्या अनेक क्षेत्रांसाठी एक सुरक्षित व्यासपीठ मिळाले आहे.

मित्रांनो,

सेमीकंडक्टर मिशनच्या आतापर्यंतच्या यशानंतर, भारत आता त्याच्या पुढील टप्प्यात दाखल झाला आहे. याच दूरदृष्टीने, या वर्षीच्या अर्थसंकल्पात इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 ची घोषणा करण्यात आली. हा टप्पा भारतात सेमीकंडक्टर उपकरणे आणि सामग्रीच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करतो. आमचा आताचा प्रयत्न एक संपूर्ण भारतीय सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण करण्याचा आहे, ज्यामुळे आम्हाला देशांतर्गत आणि जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये आमचे महत्त्वपूर्ण योगदान प्रस्थापित करता येईल.

मित्रांनो,

आज भारत, तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि भविष्यासाठी सज्ज, कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी उद्योग-नेतृत्वाखालील संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रांना प्रोत्साहन देत आहे. देशात 85 हजारांहून अधिक डिझाइन व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल. याव्यतिरिक्त, संपूर्ण परिसंस्थेच्या गरजा लक्षात घेऊन व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जात आहे. सेमीकंडक्टर डिझाइनला प्रोत्साहन देण्यासाठी 'चिप्स टू स्टार्टअप्स' हा कार्यक्रमही सुरू आहे. आज देशातील जवळपास 400 विद्यापीठे आणि स्टार्टअप्सना आधुनिक डिझाइन साधनांचा वापर करण्याची संधी देण्यात आली आहे. यामुळे 55 हून अधिक चिप्सची रचना आणि उत्पादन करणे शक्य झाले आहे.

 

मित्रांनो,

उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार, भारताच्या सेमीकंडक्टर बाजाराचे आजचे मूल्य अंदाजे 50 अब्ज अमेरिकन डॉलर्स किंवा सुमारे 4.5 लाख कोटी रुपये आहे. या दशकाच्या अखेरीस ते 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स किंवा 9 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडू शकते. यावरून भारताची या क्षेत्रात असलेली प्रचंड क्षमता दिसून येते. आमच्या गरजांपेक्षाही शक्य तितक्या जास्त चिप्सचे उत्पादन भारतात करणे, हे आमचे ध्येय आहे. भारताच्या या वचनबद्धतेबद्दल जागतिक गुंतवणूकीदारांमधे असलेला उत्साह ही आमच्यासाठी एक मोठी पूंजी आहे.

मित्रांनो,

भारत केवळ एक मजबूत सेमीकंडक्टर परिसंस्था आहे इतकेच नव्हे तर कच्च्या मालासाठी एक लवचिक पुरवठा साखळी सुनिश्चित करण्यासाठीही महत्त्वपूर्ण प्रयत्न करत आहे. पॅक्स सिलिकामधील भारताचा सहभाग हा याच प्रयत्नाचा एक भाग आहे. जगभरातील आमच्या भागीदारांसोबत मिळून, आम्हाला भारतात एक सुरक्षित पुरवठा साखळी सुनिश्चित करायची आहे.

मित्रांनो,

महत्त्वाच्या दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी भारताने राष्ट्रीय दुर्मिळ खनिज अभियान (नॅशनल क्रिटिकल मिनरल्स मिशन) सुरू केले आहे. या उपक्रमांतर्गत, दुर्मिळ खनिजांचे खाणकाम आणि उत्पादन यावर भर दिला जात आहे. खनिज पुनर्चक्रीकरणासाठी 1500 कोटी रुपयांची योजनाही सुरू करण्यात आली आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ यांसारख्या किनारपट्टीच्या राज्यांना जोडणाऱ्या 'रेअर अर्थ कॉरिडॉर'च्या बांधकामाची घोषणा करण्यात आली. खाणकाम, शुद्धीकरण आणि उत्पादन यांची एक मजबूत साखळी तयार करणारी ही मार्गिका हे एक एकात्मिक जाळे असेल.देशात महत्त्वपूर्ण खनिजांचा एकत्रित राष्ट्रीय साठा असावा, असा आमचा प्रयत्न आहे. हे काम 30-40 वर्षांपूर्वी सुरू झाले असते तर अधिक चांगले झाले असते. पण आता भारत जोरात त्यावर काम करत आहे.

 

मित्रांनो,

भारताचा विश्वास आहे, की एकविसाव्या  शतकाचा  हा काळ केवळ आर्थिक स्पर्धेचा काळ नाही.तर हा काळ भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्राला आकार देण्याचा काळ आहे. म्हणूनच, मी या दशकाला 'भारताचे तंत्रज्ञान‌ दशक(India's Techade) म्हणतो. या दशकात भारत जे तंत्रज्ञानविषयक उपक्रम राबवत आहे, त्यामुळे येणाऱ्या दशकांमध्ये भारताचे नेतृत्व अधिक मजबूत होईल. नुकत्याच झालेल्या 'एआय इम्पॅक्ट समिट'च्या यशाबद्दल आपणा सर्वांना माहिती आहे. एआयचा स्वीकार करण्याच्या बाबतीत भारत जगात आघाडीवर आहे. आम्ही भारतीय तंत्रज्ञानाचा शोध घेतो. 'डिजिटल इंडिया'चे यश आणि फिनटेक क्षेत्रात होत असलेले उत्कृष्ट कार्य हे तंत्रज्ञानावरील भारतीयांवर असलेला विश्वास दर्शवतो. आणि आपल्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील उदयामुळे भारताच्या एआय परिसंस्थेला मोठा आधार मिळेल.

मित्रांनो,

एकविसाव्या शतकातील बदलांचा भारत केवळ साक्षीदारच नाही, तर त्याचे नेतृत्व करण्याच्या निर्धाराने पुढे वाटचाल करत आहे. आमची धोरणे आणि निर्णय येत्या दशकांतील तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रांसाठी एक मजबूत पाया रचत आहेत. त्यामुळे, आज भारत प्रत्येक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानामध्ये अभूतपूर्व गुंतवणूक आणि सुधारणा करत आहे. आम्ही अंतराळ क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले केले आहे आणि इन-स्पेस (IN-SPACe) सारख्या संस्थांची निर्मिती केली आहे. त्याचे परिणाम आज दिसत आहेत. आमचे अंतराळ-संबंधित स्टार्टअप्स उत्कृष्ट काम करत आहेत. त्याचप्रमाणे, आम्ही अलीकडेच अणुऊर्जा क्षेत्रात शांती विधेयकासारखे ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. यामुळे नवीकरणीय ऊर्जा मिश्रणामध्ये अणुऊर्जेचा वाटा लक्षणीयरीत्या वाढणार आहे. हे आपल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.

मित्रांनो,

भारत क्वांटम कंप्युटिंगला एक धोरणात्मक मालमत्ता मानून मिशन मोडवर काम करत आहे. हे भारताचे डिजिटल भविष्य सक्षम करण्यात मोठी भूमिका बजावेल. याचा अर्थ असा की, भारत तंत्रज्ञान विकास आणि तंत्रज्ञानाचा वापर या दोन्ही क्षेत्रांमध्ये वेगाने प्रगती करत आहे. यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे. आम्ही व्यवसाय सुलभता, उत्पादन सुलभता आणि लॉजिस्टिक्स सुलभता यावरही सातत्याने काम करत आहोत.

मित्रांनो,

मला विश्वास आहे की, या केन्स प्रकल्पामधून तयार होणारी उत्पादने, जगाची उत्पादन केंद्र म्हणून  भारताच्या वाटचालीस आणखी बळ देतील. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा माझ्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Rolls-Royce joins with HAL at the wheel to make India a major aerospace hub

Media Coverage

Rolls-Royce joins with HAL at the wheel to make India a major aerospace hub
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 मे 2026
May 15, 2026

Viksit Bharat Unleashed: PM Modi's Blueprint Delivers Energy Independence, Tech Boom, and Diplomatic Dominance