जय जगन्नाथ, जय आई समोलेई, जय आई रामोचंडी ।
येथे काही तरुण बांधव अनेक कलाकृती घेऊन आलेले आहेत. ओडिशातील कला प्रेम जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. आपण दिलेली ही भेट मी आदरपूर्वक स्वीकारतो. माझे एसपीजी सहकारी या सर्व कलाकृती आपल्याकडून गोळा करतील. जर तुम्ही मागे तुमचे नाव व पत्ता लिहून दिलात, तर माझ्याकडून तुम्हाला पत्र अवश्य मिळेल. मागे एक लहान मूलही कलाकृती घेऊन उभे आहे, त्याचे हात दुखत असतील, कृपया त्याचीही मदत करा आणि वस्तू गोळा करून घ्या. मी या स्नेहपूर्ण भेटीसाठी आणि या कलाकृती भेट देणाऱ्या सर्व युवक-युवती व बालकांचे मनःपूर्वक आभार मानतो.
मंचावर उपस्थित ओडिशाचे राज्यपाल हरिबाबू, ओडिशाचे लोकप्रिय तथा कार्यक्षम मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जुएल ओराम, उपमुख्यमंत्री प्रवती परिदा, कनकवर्धन सिंह देव, संसदेतले माझे सहकारी बैजयंत पांडा, प्रदीप पुरोहित, ओडिशा भाजपचे अध्यक्ष मनमोहन सामल आणि मंचावर उपस्थित इतर मान्यवरांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमास देशातील अनेक केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री विविध ठिकाणांहून असंख्य लोकांसह आपल्याशी जोडलेले आहेत. मी त्यांचेही अभिनंदन करतो. झारसुगुडा येथील माझ्या बांधवांना मी आदरपूर्वक नमस्कार करतो. आपल्या या स्नेहासाठी मी आपला आभारी आहे. ऐठी उपस्थितो समस्त मान्यगण्यो व्यक्ति मानंकू मोर जुहार।(इथे उपस्खित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार)

मित्रांनो,
सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. अशा पवित्र दिवसांत मला आई समोलेई आणि आई रामोचंडी यांच्या पवित्र भूमीवर येऊन आपले दर्शन घेण्याचे सौभाग्य लाभले आहे. इथे मोठ्या संख्येने माता-भगिनी उपस्थित आहेत. तुमचे आशीर्वाद हेच आमची खरी ताकद आहेत. मी तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो.
बंधू आणि भगिनींनो,
दीड वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या काळात ओडिशाच्या जनतेने एक नवा संकल्प करून पुढे जाण्याचा प्रण घेतला होता. हा संकल्प होता , विकसित ओडिशाचा. आणि आज आपण पाहत आहोत की, ओडिशा डबल इंजिन सरकारमुळे झपाट्याने पुढे सरकत आहे. आज पुन्हा एकदा ओडिशाच्या विकासासाठी, देशाच्या प्रगतीसाठी, हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे कार्य सुरू झाले आहे. आजपासून बीएसएनएलचे नवे रूप आपल्या समोर आले आहे. बीएसएनएलची स्वदेशी फोरजी सेवाचा प्रारंभ झाला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्थांचा विस्तार करण्याचे कार्यही आजपासून सुरू झाले आहे. याशिवाय, ओडिशामध्ये शिक्षण, कौशल्यविकास आणि संपर्क साधनांशी निगडित अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले आहे. काही वेळापूर्वीच ब्रह्मपूर ते सूरत दरम्यान धावणाऱ्या आधुनिक अमृत भारत रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. आणि आपण सर्वजण जाणता की सूरतशी ओडिशाचे नाते किती महत्त्वाचे आहे. या भागातील असे कोणतेही गाव नाही की, जिथल्या लोकांचा सूरतशी संबंध नाही. काही लोक म्हणतात की, पश्चिम बंगालनंतर सर्वाधिक ओडिया जनता गुजरातमध्ये, विशेषतः सूरतमध्ये वास्तव्यास आहे. आज त्यांच्या सोयीसाठी ही प्रत्यक्ष रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. विकासाच्या या सर्व उपक्रमांसाठी मी आपणा सर्वांना, ओडिशावासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आज सूरतमध्येही आमचे रेल्वेमंत्री या कार्यक्रमात उपस्थित आहेत, तिथेही सर्व ओडिया बंधू मोठ्या संख्येने जमलेले आहेत.
बंधुनो,
भारतीय जनता पक्षाची सरकारे ही गरीबांची सेवा करणारी, गरीबांना सक्षम करणारी सरकारे आहेत. गरीब, दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी बांधवांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचविण्यावर आमचा सर्वाधिक भर आहे. आजच्या या कार्यक्रमात आपण त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. मला आत्ता इथे अंत्योदय गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे प्रदान करण्याची संधी मिळाली. एखाद्या गरीब कुटुंबाला पक्के घर मिळते तेव्हा केवळ वर्तमानच नव्हे तर पुढील पिढ्यांचं जीवनही सोपं होतं. आमच्या सरकारने आतापर्यंत देशभरातील चार कोटीहून अधिक गरीब कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून दिली आहेत. ओडिशामध्येही हजारो घरांच्या बांधकामाचे कार्य जलदगतीने सुरू आहे. या कार्यासाठी आमचे मुख्यमंत्री मोहनजी आणित्यांचे सहकारी कौतुकास्पद कामगिरी करत आहेत.

आजही जवळपास पन्नास हजार कुटुंबांना नवीन घरांची मंजुरी देण्यात आली आहे. तसेच प्रधानमंत्री जनमन योजना अंतर्गत ओडिशातील आदिवासी कुटुंबांसाठी 40 हजारांहून अधिक घरांना मंजुरी देण्यात आली आहे. म्हणजेच आदिवासी समाजातील जे अतिमागास आहेत, त्यांचेही एक मोठे स्वप्न आज साकार होणार आहे. मी माझ्या सर्व लाभार्थी बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
बंधुनो,
ओडिशाच्या क्षमतेवर, ओडिशातील जनतेच्या प्रतिभेवर मला नेहमीच पूर्ण विश्वास राहिला आहे. निसर्गाने ओडिशाला भरपूर काही दिले आहे. अनेक दशके ओडिशाने गरीबी अनुभवली आहे. पण आता हे दशक ओडिशातील जनतेला समृद्धीकडे घेऊन जाणारे दशक ठरणार आहे. हे दशक ओडिशाच्या जीवनात फार महत्त्वाचे आहे. यासाठीच आमचे सरकार ओडिशामध्ये मोठमोठे प्रकल्प आणत आहे. केंद्र सरकारने नुकतीच ओडिशासाठी दोन सेमीकंडक्टर युनिट्सना मंजुरी दिली आहे. याआधी कुणी कल्पनाही केली नसती की आजच्या जगातील सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अशी सेमीकंडक्टर उद्योगयंत्रणा आसाममध्ये किंवा ओडिशामध्ये उभी राहू शकते. पण इथल्या युवकांच्या क्षमतेमुळेच आज अशी उद्योगयंत्रणा येथे उभारली जात आहे. चिप निर्मितीसाठी ओडिशामध्ये सेमीकंडक्टर पार्कही उभारला जाणार आहे. आता लवकरच ती छोटीशी चिप जी तुमच्या फोनमध्ये, टीव्हीमध्ये, फ्रीजमध्ये, संगणकामध्ये, गाड्यांमध्ये आणि असंख्य उपकरणांमध्ये जीवनसत्त्वासारखी असते ती आता आपल्या ओडिशामध्येच तयार होणार आहे. चला तर मोठ्याने म्हणूयात- जय जगन्नाथ ।
बंधुनो,
आपला संकल्प स्पष्ट आहे, चिपपासून शिपपर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारताने आत्मनिर्भर व्हावे. मला तुम्हाला काही विचारायचे आहे, तुम्ही त्याचे उत्तर द्याल का? भारताने आत्मनिर्भर व्हायला हवे की नाही?
भारताने आत्मनिर्भर बनायला हवे की नको ? भारताने आत्मनिर्भर व्हायला हवे की नको ? हे पहा, देशातील प्रत्येक नागरिकाला वाटते की आता आपला देश कुणावरही अवलंबून राहता कामा नये. प्रत्येक बाबतीत भारताने स्वयंपूर्ण असावे आणि म्हणूनच पारादीप पासून ते झारसुगुडा पर्यंत एक प्रचंड औद्योगिक क्षेत्र उभारले जात आहे.
बंधू आणि भगिनींनो,
कोणताही देश जो आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ इच्छितो, तो जहाजबांधणीवर म्हणजेच मोठमोठ्या जहाजांच्या निर्मितीवर खूप भर देतो.व्यापार असो, तंत्रज्ञान असो किंवा राष्ट्रीय सुरक्षा असो, जहाज बांधणीमुळे प्रत्येक ठिकाणी फायदा होतो. जर आपल्याकडे स्वतःची जहाजे असतील तर संकटाच्या काळात जगासोबत आयात आणि निर्यातीमध्ये अडथळे येणार नाहीत . म्हणूनच, आपल्या भाजप सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. देशात मोठमोठी जहाजे तयार करण्यासाठी, जहाजबांधणीसाठी आम्ही सत्तर हजार कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर केले आहे. यामुळे भारतात साडेचार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येईल. हा पैसा स्टील, यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक्स आणि उत्पादन क्षेत्राशी निगडित अनेक छोट्या , लघु, कुटीर उद्योगांपर्यंत पोहोचणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा माझ्या तरुणांना, माझ्या देशातील मुला - मुलींना होणार आहे, यामुळे लाखो नवीन रोजगार निर्माण होतील, याचा फायदा आपल्या ओडिशाला, येथील उद्योगाला, येथील युवकांना होईल.

मित्रहो,
आज, देशाने आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. जेव्हा दूरसंचार विश्वात 2 जी , 3 जी आणि 4 जी सारख्या सेवा सुरू झाल्या तेव्हा भारत त्यामध्ये खूप मागे राहिला होता. आणि तुम्हाला हे देखील माहिती आहे की सोशल मीडियावर काय चालले होते, कशा प्रकारचे विनोद चालू होते, 2 जी , 3 जी , आणि आणखी काय काय लिहिले जात होते कोणास ठाऊक.
मात्र बंधू -भगिनींनो,
2 जी, 3 जी, 4जी या सर्व सेवांच्या तंत्रज्ञानासाठी भारत परदेशांवर अवलंबून राहिला. ही परिस्थिती देशासाठी चांगली नव्हती. म्हणूनच, देशाने दूरसंचार क्षेत्रासाठी हे आवश्यक तंत्रज्ञान देशात विकसित करण्याचा संकल्प केला. आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या बीएसएनएलने आपल्याच देशात पूर्णपणे स्वदेशी 4G तंत्रज्ञान विकसित केले आहे. कठोर परिश्रम, समर्पण आणि कार्यक्षमतेच्या माध्यमातून बीएसएनएलने एक नवीन इतिहास रचला आहे. आणि या कामात सहभागी असलेल्या देशातील युवकांचे, त्यांच्या प्रतिभेचे आणि भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांनी जे मोठे काम केले आहे, त्या सर्व युवकांचे मी खूप-खूप अभिनंदन करतो. भारतीय कंपन्यांनी भारताला जगातील त्या पाच देशांच्या यादीत स्थान मिळवून दिले आहे, आता आपण अशा पाच देशांच्या यादीत आलो आहोत, ज्यांच्याकडे 4G सेवा सुरू करण्यासाठी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान आहे.
मित्रहो,
हा योगायोग आहे की आज बीएसएनएल आपला 25 वा वर्धापनदिन साजरा करत आहे. आणि आज या ऐतिहासिक दिवशी, बीएसएनएल आणि त्याच्या सहयोगींच्या मेहनतीने आज भारत, जागतिक दूरसंचार निर्मिती केंद्र बनण्याच्या दिशेने पुढे वाटचाल करत आहे. ओदिशासाठी देखील ही अभिमानाची गोष्ट आहे की आज झारसुगुडा येथून बीएसएनएलच्या स्वदेशी 4G नेटवर्कचा प्रारंभ होत आहे, ज्यामध्ये सुमारे एक लाख, मित्रांनो, ही देशासाठी अभिमानाची गोष्ट असेल, 1 लाख इतके 4G टॉवर्स आहेत. हे टॉवर्स देशाच्या दुर्गम भागात कनेक्टिव्हिटीमध्ये एक नवीन क्रांती घडवून आणणार आहोत. 4G तंत्रज्ञानाच्या या विस्ताराचा देशभरातील 2 कोटींहून अधिक लोकांना थेट लाभ मिळेल. सुमारे 30 हजार अशी गावे, जिथे अतिजलद इंटरनेट सुविधा नव्हती, आता तिथेही ही सुविधा मिळणार आहे.

मित्रहो,
या ऐतिहासिक दिवसाचे साक्षीदार बनण्यासाठी, या हजारो गावांमधील लोक देखील अतिजलद इंटरनेटच्या सुविधेद्वारे, या नवीन तंत्रज्ञानाद्वारे आपल्याशी जोडले गेले आहेत. त्याद्वारे, ते सीमेवरील दुर्गम गावांमधूनही आपल्याला ऐकत आहेत, आपल्याला पाहत आहेत आणि आपले दळणवळण मंत्री, ज्योतिरादित्य सिंधिया, जे या विभागाचे कामकाज पाहतात, ते देखील आसाममधून आता आपल्याशी जोडलेले आहेत.
मित्रहो,
बीएसएनएलच्या स्वदेशी 4 जी सेवांचा सर्वात अधिक लाभ माझ्या आदिवासी क्षेत्रांना माझ्या आदिवासी बंधू आणि भगिनींना, दुर्गम गावे आणि दुर्गम पर्वतीय भागांना होईल. आता, तिथल्या लोकांना उत्कृष्ट डिजिटल सेवा देखील मिळतील. आता ग्रामीण भागातील मुलांना ऑनलाइन वर्गांना उपस्थित राहणे, दुर्गम भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची किंमत जाणून घेणे, टेलिमेडिसिनद्वारे, कोणत्याही रुग्णाला आयुष्मान आरोग्य मंदिरद्वारे देशातील सर्वोत्तम डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय सोयीचे होणार आहे. याचा खूप मोठा लाभ, सीमेवर तैनात असलेले, हिमालयाच्या शिखरांवर उभे असलेले आणि वाळवंटात उभे असलेले आपले सैनिक बंधू आणि भगिनींनाही होईल. ते आता सुरक्षित कनेक्टिव्हिटीद्वारे एकमेकांशी संवाद साधू शकतील.
मित्रहो,
भारताने आधीच सर्वात वेगवान 5G सेवा सुरू केल्या आहेत. आज सुरु झालेले बीएसएनएल टॉवर्स 5G सेवांसाठी देखील सहज तयार होतील. या ऐतिहासिक दिवसानिमित्त मी बीएसएनएल आणि सर्व नागरिकांचे खूप-खूप अभिनंदन करतो.
मित्रहो,
आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी कुशल तरुण आणि संशोधनासाठी पूरक वातावरण देखील आवश्यक आहे. म्हणूनच, भाजप सरकारसाठी हे देखील एक प्रमुख प्राधान्य आहे. आज ओदिशासह संपूर्ण देशात शिक्षण आणि कौशल्य विकासामध्ये अभूतपूर्व गुंतवणूक केली जात आहे. आम्ही देशातील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि पॉलिटेक्निकचे देखील आधुनिकीकरण करत आहोत. यासाठी आज मेरिट नावाने एक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, तंत्रज्ञान शिक्षण देणाऱ्या संस्थांवर हजारो कोटी रुपये खर्च केले जातील. यामुळे आपल्या युवकांना दर्जेदार तांत्रिक शिक्षणासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागणार नाही. आपल्याच शहरात त्यांना आधुनिक प्रयोगशाळा उभारण्याच्या , जागतिक कौशल्ये शिकण्याच्या आणि स्टार्ट-अप्स सुरू करण्याच्या संधी मिळतील.

मित्रहो,
आज देशातील प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक वर्ग आणि प्रत्येक नागरिकापर्यंत सुविधा पोहचवण्यासाठी एवढे काम होत आहे. विक्रमी प्रमाणात पैसे खर्च केले जात आहेत.
नाहीतर, पूर्वीची परिस्थिती कशी होती हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. काँग्रेस तुम्हाला लुटण्याची एकही संधी सोडत नव्हती.
मित्रहो,
2014 मध्ये जेव्हा तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिली, तेव्हा आम्ही देशाला काँग्रेसच्या या लूट तंत्रापासून मुक्त केले. भाजप सरकारच्या काळात, आता, दुप्पट बचत आणि दुप्पट कमाईचे युग आले आहे.
जेव्हा देशात काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा आपले कर्मचारी, व्यापारी आणि व्यावसायिक दोन लाख रुपयांपर्यंत कमाई करत असले तरी, वर्षाला दोन लाख रुपये कमाई करत असलेल्यांना प्राप्तिकर भरावा लागत होता.
काँग्रेसने 2014 पर्यंत हे सुरु ठेवले. मात्र आज, जेव्हा तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली, 12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर आता एक रुपयाही कर द्यावा लागत नाही.
मित्रांनो,
आता या 22 सप्टेंबरपासून देशामध्ये, ओदिशामध्ये जीएसटीची नवीन सुधारित करप्रणाली लागू केली आहे. या सुधारित करदरांमुळे तुम्हा सर्वांना जीएसटी बचत उत्सवाची भेट दिली आहे. आता माता-भगिनींना घर खर्च करताना आणखी स्वस्ताई अनुभवता येणार आहे. दैनंदिन गरजेच्या असलेल्या बहुतांश वस्तूंचे दर बरेच कमी झाले आहेत. एक उदाहरण देवून मी आपल्याला समजावून सांगतो. असे गृहीत धरले की, ओदिशामध्ये एका कुटुंबासाठी अन्नधान्य आणि घरामध्ये ज्या ज्या गोष्टींची सामान्यतः आवश्यकता असते, त्यासाठी संपूर्ण वर्षभरामध्ये एक लाख रूपये खर्च येत असणार. म्हणजेच दर महिन्याला हा खर्च 12 ते 15 हजार रूपये होत असेल तर वर्षभराचा खर्च एक लाख रूपये होतो. 2014च्या आधी कॉंग्रेसचे सरकार होते, त्यावेळी तुम्ही एक लाख रूपये खर्च करीत असताना पंचवीस हजार रूपये, साधारण 20 ते 25 हजार रूपये कर घेतला जात होता. याचा अर्थ एक लाख रूपये खर्च करायचे आणि त्याचा कर म्हणून 25 हजार रूपये सरकारला द्यावे लागत होते. वर्ष 2017 मध्ये आम्ही सर्वप्रथम जीएसटी प्रणाली लागू केली. आणि या करप्रणालीमध्येच खूप मोठा करबोझा आम्ही कमी केला. बरेच कर कमी केले. आता आम्ही दुस-यांदा जीएसटी प्रणालीमध्ये सुधारणा घडवून आणल्या आहेत. त्यामुळे आमच्या भाजपा सरकारने करबोझा खूपच कमी केला आहे. आता एक लाख रूपये तुम्ही वर्षभरामध्ये कुटुंबासाठी खर्च केला तर फक्त पाच ते सहा हजार रूपये सरकारला कर स्वरूपामध्ये द्यावे लागतात. आता तुम्ही सांगा, कुठे 25 हजार रूपये आणि कुठे 5-6 हजार रूपये. काँग्रेस राजवटीच्या तुलनेमध्ये आज, वर्षभराच्या एक लाख रूपये खर्चामध्ये आपल्या गरीब, सामान्य, मध्यम वर्ग कुटुंबांची 20 ते 25 हजार रूपयांची बचत नक्कीच होत आहे.

मित्रांनो,
आपले ओदिशा शेतकरी बांधवांचे राज्य आहे. शेतकरी वर्गासाठी जीएसटी बचत उत्सव खूप लाभदायक, शुभ आहे. काँग्रेसच्या काळामध्ये जर शेतकरी बांधवाने ट्रॅक्टरची खरेदी केली तर, एका ट्रॅक्टरवर सत्तर हजार रूपये कर द्यावा लागत होता. जीएसटी कर प्रणाली लागू झाल्यानंतर आम्ही हा कर कमी केला आहे. आता जीएसटीचे नवीन स्वरूप आले आहे. त्यानुसार शेतकरी बांधवाचे तोच ट्रॅक्टर खरेदी करताना जवळपास थेट 40 हजार रूपये वाचतात. एका ट्रॅक्टरवर 40 हजार रूपयांची बचत होते. धान रोपणीसाठी शेतकरी बांधव जे यंत्र वापरतात, त्याची खरेदी करताना आता 15 हजार रूपयांची बचत होणार आहे. याचप्रमाणे पॉवर टीलर खरेदी करताना 10 हजार रूपये तर थ्रेशरवर 25 हजार रूपयांपर्यंत बचत होईल. शेतीसाठी वापरण्यात येणा-या अशा अनेक उपकरणांवर, अवजारांवरची कर भाजपा सरकारने खूप कमी केला आहे.
मित्रांनो,
ओदिशामध्ये खूप मोठ्या संख्येने आपला आदिवासी समाज वास्तव्य करतो. हा आदिवासी समाज वनोपजांवर आश्रित आहे. त्यांची रोजी-रोटी वनोपजांवर चालते. आधीपासूनच आमचे सरकार तेंदू पत्ता वेचणा-या, संग्रह करणा-या लोकांसाठी काम करीत आहे. आता त्यावरचा जीएसटीही खूप कमी केला गेला आहे. यामुळे तेंदू पत्ता संग्राहकांना अधिक मोबदला मिळणे आता निश्चित झाले आहे.
मित्रांनो,
भाजपा सरकार तुम्हाला सातत्याने करामध्ये सवलत देत आहे. त्यामुळे तुमची बचत वाढत आहे. परंतु कॉंग्रेसने अजूनही आपला जुना उद्योग सुरूच ठेवला आहे. कॉंग्रेसची सरकारे आत्ताही तुम्हा लोकांना लुटण्यासाठी काम करीत आहे. आणि ही गोष्ट मी काही सहजच बोलत नाही. त्यासंबंधी माझ्याकडे पुरावे आहेत. संपूर्ण देशातील लोकांना करबोझा कमी केल्यामुळे खूप लाभ होत आहे. ज्यावेळी आम्ही जीएसटीचे नवीन दर लागू केले, त्यावेळी सीमेंटवरील करही कमी केला. आमचा हेतू एकच होता की, लोकांना आपले- स्वतःचे घरकुल बांधता यावे, घराची दुरूस्ती करता यावी. यासाठी लागणारे सीमेंट स्वस्त झाले तर लोकांचे पैसे वाचतात. 22 सप्टेंबरनंतर, आता तुम्ही पहा, कशा प्रकारे विधाने केले जात आहेत. कर कमी केले तरीही बोलणा-या लोकांचे काम पहा. हिमाचलमध्ये कॉंग्रेसचे सरकार आहे. कॉंग्रेसच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तिथे आम्हाला अनेक प्रकारची दूषणे दिली जात आहेत. आम्ही ज्यावेळी जीएसटी सुधारित श्रेणी लागू केली त्यावेळी संपूर्ण देशामध्ये वस्तूंच्या किंमती कमी झाल्या आहेत. परंतु कॉंग्रेस अशाप्रकारे सर्वसामान्य जनतेला सुख, आनंद देवू इच्छित नाही. आधी ज्यावेळी आम्ही डिझेल-पेट्रोल च्या किंमती कमी केल्या होत्या, त्यावेळी ज्या ज्या राज्यांमध्ये कॉंग्रेसचे सरकार होते, त्या त्या राज्यांनी इंधनावर इतर वेगळे कर-उपकर वरून लावले आणि डिझेल-पेट्रोलची पूर्वीच्याच जास्त दराने विक्री सुरू ठेवली. कॉंग्रेसचे जिथे राज्य होते, तिथे उपकर लावून तिजोरी भरण्याचा नवीन मार्ग त्यांनी बनवला. अशाच पद्धतीने आम्ही ज्यावेळी सीमेंटचे कर आणि दर कमी केले त्याचवेळी हिमाचल प्रदेश कॉंग्रेस सरकारने, सीमेंटवर एक नवीन कर लावून ते महाग केले. आणि म्हणूनच कर कमी केल्याचा फायदा भारत सरकार हिमाचलच्या लोकांना देवू इच्छित असतानाही , हे कॉंग्रेसचे जनतेला लुटणारे सरकार मध्येच भिंत बनून अडथळा बनत आहे. म्हणूनच मी म्हणतो की, कॉंग्रेसचे सरकार कोणत्याही राज्यात आले तरी ते तिथल्या लोकांना लुटत राहणार आहे. म्हणूनच देशातील लोकांनी कॉंग्रेसपासून सावध राहिले पाहिजे आणि त्यांच्या सहकारी पक्षांपासूनही सांभाळून राहिले पाहिजे.

मित्रांनो,
जीएसटी च्या बचत उत्सवाने सर्वात अधिक आनंद तर आमच्या माता-भगिनींना दिला आहे. भगिनी-कन्या यांची सेवा करण्याच्या कामाला आमच्या सरकारचे प्राधान्य असते. यामध्ये आम्ही माता-भगिनींच्या आरोग्याची काळजी घेण्यावर भर देत आहोत.
मित्रांनो,
आपल्या कुटुंबाच्या हितामध्ये घरातील एक माता-आई सर्व गोष्टींचा त्याग करण्यामध्ये नेहमीच सर्वात आघाडीवर असते. घरातल्या मातेचा त्याग तर आपल्याला नेहमी दिसतो. ती महिला प्रत्येक संकट आपल्यावर झेलत असते. अशा संकटामुळे आपल्या मुलांवर बोझा पडू नये, असा विचार घरातील महिला करीत असते. अशावेळी आई आपला आजारही लपवून ठेवते. यामागचे कारण म्हणजे, आपल्या आजारावरील खर्चाचा बोझा घरावर पडू नये, असे तिला वाटत असते. म्हणूनच आम्ही ज्यावेळी आयुष्मान भारत योजना सुरू केली, त्यावेळी त्या योजनेचा खूप मोठा लाभ आमच्या माता-भगिनींना, देशातील महिलावर्गाला झाला. त्यांना पाच लाखापर्यंत मोफत औषधोपचाराची सुविधा मिळाली.
मित्रांनो,
घरातील आई-माता ज्यावेळी स्वस्थ असेल, त्यावेळी ते कुटुंबही सशक्त होईल. म्हणूनच यावर्षी 17 सप्टेंबरपासून म्हणजे विश्वकर्मा जयंतीपासून प्रत्येक मातेच्या उत्तम आरोग्यासाठी ‘स्वस्थ नारी,सशक्त परिवार‘ असे अभियान देशभरामध्ये सुरू केले आहे. याअंतर्गत आत्तापर्यंत देशभरामध्ये आठ लाखांपेक्षाही जास्त आरोग्य शिबिरे भरविण्यात आली आहेत. ही संख्या खरोखरीच खूप मोठी आहे. या शिबिरांमध्ये आत्तापर्यंत 3 कोटींपेक्षा जास्त महिलांची तपासणी करण्यात आली आहे. मधुमेह, स्तनाचा कर्करोग, सिकल सेल अनिमिया म्हणजे रक्ताल्पता अशा अनेक आजारांबाबत महिलांची तपासणी या आरोग्य शिबिरातून केली जात आहे. ओडिशातील सर्व माता-भगिनीं तसेच कन्यांना माझा आग्रह आहे की, तुम्ही सर्वांनी या शिबिरांमध्ये जावून आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी.

मित्रांनो,
देश आणि देशवासियांचे सामर्थ्य वाढविण्यासाठी भाजपा आणि आमची सरकारे समर्पण भावनेने सातत्याने कार्यरत आहे. मग यामध्ये करदर कमी करणे असो अथवा आधुनिक कनेक्टिव्हिटी असो; आम्ही सुविधा आणि समृद्धीचा मार्ग तयार करीत आहोत. यामुळे ओडिशाचा खूप मोठा फायदा होत आहे. ओडिशामध्ये आज सहा वंदेभारत गाड्या सुरू झाल्या आहेत. जवळपास साठ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. झारसुगुडाचे वीर सुरेंद्र साय विमानतळ, आजपासून देशाच्या अनेक प्रमुख शहरांना जोडले गेले आहे. खाणी आणि खनिजे यातून आता ओडिशाला खूप मोठ्या प्रमाणावर पैसा मिळत आहे. सुभद्रा योजनेमुळेही ओडिशातील माता-भगिनींना सातत्याने मदत मिळत आहे. आमचा ओडिशा आता प्रगतिपथावर स्वार झाला आहे. आपल्या सर्वांना मी विश्वास देतो की, विकासाचा हा कार्यक्रम आता अधिक वेगाने पुढे नेला जाईल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा! सर्वांनी माझ्याबरोबर पूर्ण क्षमतेने जयघोष करावा-
भारत माता की जय!
भारत माता की जय!
भारत माता की जय!
जय जगन्नाथ!!
जय जगन्नाथ!!
जय जगन्नाथ !!
खूप-खूप धन्यवाद !!!


