आदरणीय सभापती महोदय,
गेले दोन दिवस या अतिशय महत्त्वाच्या विधेयकावर सखोल चर्चा सुरू आहे. दोन्ही सभागृहाचे सुमारे 132 सदस्य एकत्र आले आणि त्यांनी यावर अतिशय अर्थपूर्ण चर्चा केली. या चर्चेतील शब्दन शब्द आपल्या सर्वांसाठी यापुढील काळातील वाटचालीसाठी महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच याच्याशी संबंधित प्रत्येक पैलूचे आपले स्वतःचे असे महत्त्व आणि मूल्य आहे. आपल्या निवेदनाच्या सुरुवातीलाच या सदस्यांनी या विधेयकाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आणि त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून आभार व्यक्त करतो. यामधून जी भावना निर्माण झाली आहे त्यामुळे देशवासियांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण होणार आहे आणि सर्व माननीय सदस्यांनी आणि सर्व राजकीय पक्षांनी या संदर्भात एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या विधेयकामुळे केवळ महिला सक्षमीकरणच साध्य होणार नाही तर त्यापेक्षाही जास्त काही होईल. या विधेयकाबाबत सर्वच राजकीय पक्षांमधील सकारात्मक दृष्टीकोन आपल्या देशातील महिला शक्तीला एक नवी ऊर्जा देणार आहे. त्या एका नव्या विश्वासाने राष्ट्रनिर्मितीमध्ये योगदान देण्यासाठी नेतृत्वासह पुढे येतील. ही बाब स्वतः देखील एका उज्ज्वल भवितव्याची हमी देईल.
आदरणीय सभापती महोदय,
मला सभागृहाचा जास्त वेळ घ्यायचा नाही. तुम्ही व्यक्त केलेल्या भावनांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि ज्यावेळी मतदान होईल त्यावेळी माझी अशी आग्रहाने विनंती आहे की हे एक वरिष्ठ सभागृह आहे आणि म्हणूनच अतिशय चांगली चर्चा करण्याचा प्रयत्न झाला आहे आणि म्हणूनच या विधेयकावर एकमताने मतदान करून आपण देशाला एक नवा विश्वास देऊ या. या अपेक्षेसह पुन्हा एकदा मी प्रत्येकाचे मनापासून आभार मानतो.


