या अभियानाअंतर्गत आपले वैज्ञानिकांचे पथक प्रयोगशाळेमधून बाहेर पडून शेतापर्यंत जाईल आणि शेतकऱ्यांना संपूर्ण डेटासह आधुनिक शेतीची माहिती देईल आणि हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत करेल : पंतप्रधान
भारतीय शेतीला विकसित भारताचा मुख्य आधार बनवणे हा या अभियानाचा संकल्प आहे : पंतप्रधान
भारताने केवळ स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यापुरते सीमित राहू नये तर जागतिक अन्न पुरवठादार म्हणूनही उदयास यावे : पंतप्रधान
विकसित कृषी संकल्प अभियान शेतीमध्ये आधुनिकीकरणाला चालना देत शेतकऱ्यांसाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले करेल : पंतप्रधान

जय जगन्नाथ!

आज, भगवान जगन्नाथांच्या आशीर्वादाने देशातील शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी मोहीम सुरू होत आहे. ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ हा एक अनोखा उपक्रम आहे. पावसाळ्याची चाहूल लागली आहे, खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे आणि अशा परिस्थितीत, देशातील शास्त्रज्ञ, तज्ञ, अधिकारी आणि प्रगतीशील शेतकऱ्यांची दोन हजारपेक्षा जास्त पथके पुढचे 12 ते 15 दिवस गावोगावी जात आहेत. ही पथके देशातील 700 पेक्षा जास्त जिल्ह्यांमधल्या कोट्यवधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील. देशातील सर्व शेतकऱ्यांना, या पथकांमध्ये सहभागी असलेल्या सर्व सहकाऱ्यांना, या महान मोहिमेसाठी, एका मोठ्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमासाठी आणि शेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो.

मित्रहो,

आपल्या देशात शेती हा राज्याच्या अखत्यारीतला विषय आहे. सरकारी व्यवस्थेअंतर्गत हा राज्याचा विषय आहे. प्रत्येक राज्य स्वतःची कृषी धोरणे तयार करते, शेतकऱ्यांच्या हितासाठी पावले उचलते. मात्र , वेगाने बदलणाऱ्या आजच्या काळात, भारतीय कृषी क्षेत्रात व्यापक बदल घडवून आणण्याची गरज आहे. आपल्या शेतकऱ्यांनी विक्रमी पिके घेऊन अन्नधान्याची कोठारे भरली आहेत, पण आता बाजारपेठसुद्धा बदलत आहे आणि ग्राहकांची पसंतीही बदलली आहे. अशा परिस्थितीत, कृषी व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.  भारतीय शेती आणखी आधुनिक कशी करता येईल, याबाबत राज्यांमधल्या सरकारांशी आणि शेतकऱ्यांशी चर्चा व्हायला हवी, या विचारातून या मोहिमेअंतर्गत, आमचे शास्त्रज्ञांचे पथक ‘लॅब से लँड’ अर्थात ‘प्रयोगशाळेपासून जमिनीपर्यंत’ ही एक मोठी मोहीम घेऊन पुढे जात आहे. ही पथके शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती सर्व डेटासह देतील आणि हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत करतील.

मित्रहो,

गेल्या काही दशकांमध्ये आपल्या कृषी शास्त्रज्ञांनी अनेक क्षेत्रांमध्ये चांगले संशोधन केले आहे, चांगले परिणाम दाखवले आहेत. दुसरीकडे, आपल्या देशातील प्रगतीशील शेतकऱ्यांनी स्वतःचे प्रयोग करून कृषी क्षेत्रात बरेच बदल घडवून आणले आहेत, उत्पादनही वाढवले आहे आणि अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. शास्त्रज्ञांच्या यशस्वी संशोधनाची आणि प्रगतीशील शेतकऱ्यांच्या यशस्वी प्रयोगांची जास्तीत जास्त माहिती आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही सर्वजण आधीपासूनच या दिशेने प्रयत्न करत आहात, पण आता हे काम नवीन उर्जेने करण्याची गरज आहे. विकासित कृषी संकल्प अभियानाच्या माध्यमातून तुम्हाला यासाठी भरपूर संधी मिळतील.

मित्रहो,

भारताला विकसित करण्यासाठी भारतीय शेतीचाही विकास झाला पाहिजे. यासाठी केंद्र सरकार सतत अनेक विषयांवर लक्ष केंद्रित करत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य किंमत कशी मिळेल? कृषी अर्थव्यवस्था कशी मजबूत करता येईल? देशाच्या गरजेनुसार पिके कशी घेता येतील? भारत स्वत:च्या आणि जगाच्या गरजा कशा पूर्ण करू शकेल? भारत जगाचा अन्नधान्य पुरवठादार कसा होऊ शकेल? हवामान बदलाच्या आव्हानाला आपण कसे तोंड देऊ शकू? कमी पाण्यात आपण जास्त धान्याचे उत्पादन कसे घेऊ शकू? धोकादायक रसायनांपासून धरती मातेला कसे वाचवता येईल? शेतीचे आधुनिकीकरण कसे करता येईल? विज्ञान आणि तंत्रज्ञान शेतीपर्यंत कसे पोहोचवता येईल? अशा अनेक विषयांवर गेल्या 10-11 वर्षांमध्ये आपल्या सरकारने बरेच काम केले आहे. आता या मोहिमेअंतर्गत, तुम्हाला आपल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक जागरूक करायचे आहे.

मित्रहो,

शेतकऱ्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त साधन उपलब्ध करून देणे हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. शेताच्या कुंपणावर सौर पॅनेलिंग केले पाहिजे. देशात होत असलेल्या मधु क्रांतीचा, मधमाश्या पाळणाऱ्यांना फायदा होत आहे, जास्तीत जास्त शेतकरी त्यात कसे सामील होऊ शकतात? कचरा म्हणून टाकल्या जाणाऱ्या अवशेषांपासून ऊर्जा कशी निर्माण करावी? कचऱ्यापासून संपत्ती कशी निर्माण करावी? कोणत्या शेतात कोणते श्रीधान्य अर्थात भरड धान्य पिकवता येईल? उत्पादनाचे मूल्य कसे वाढवायचे? त्याचबरोबर, दूध न देणारे प्राणी सुद्धा आता गोबर धन योजनेद्वारे अर्थप्राप्तीचे साधन होत आहेत. आपल्या शेतकरी बंधू-भगिनींसोबत बसून, चर्चा करून आणि संवाद साधून आपल्याला या सर्वांची सविस्तर माहिती द्यायची आहे.

मित्रहो,

भारतीय शेतीला विकसित भारताचा मुख्य आधार बनवण्याचा हा एक खूप मोठा संकल्प आहे. मी माझ्या शेतकरी बंधू-भगिनींना सांगू इच्छितो की, तुम्ही तुमच्या गावात पोहोचणाऱ्या शास्त्रज्ञांना खूप प्रश्न विचारा. मी शास्त्रज्ञांना आणि इतर कर्मचाऱ्यांना देखील सांगू इच्छितो की तुमच्यासमोर एक खूप मोठे ध्येय आहे. तुम्ही जे काम हाती घेत आहात ते फक्त सरकारी काम समजू नका. हे काम तुम्हाला देशसेवेच्या भावनेने करावे लागेल. तुम्हाला शेतकऱ्यांच्या उत्सुक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मौल्यवान सूचनांचीही नोंद ठेवावी लागेल. हे 'विकसित कृषी संकल्प अभियान' आपल्या अन्न पुरवठादारांसाठी प्रगतीची नवी दारे खुली करेल. याच कामनेसह सर्व पथकांना आणि सर्व शेतकऱ्यांना अनेकानेक शुभेच्छा.

धन्यवाद!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's 1 Trillion Retail Moment: Dawn of Retail Revenue Intelligence

Media Coverage

India's 1 Trillion Retail Moment: Dawn of Retail Revenue Intelligence
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 जून 2026
June 27, 2026

Appreciation for PM Modi's Development-Focused and People-Centric Governance