सन्माननीय महोदय,

आजच्या बैठकीच्या दिमाखदार आयोजनाबद्दल मी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

मला खूप आनंद होत आहे की आज आपण एका विस्तारित ब्रिक्स कुटुंबाच्या रूपात प्रथमच भेटत आहोत.ब्रिक्स परिवाराशी संबंधित सर्व नवीन सदस्य आणि सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो.

गेल्या वर्षभरात रशियाचे यशस्वी अध्यक्षपद भूषवल्याबद्दल मी अध्यक्ष पुतीन यांचे अभिनंदन करतो.

मित्रहो,

आमची बैठक अशा वेळी होत आहे जेव्हा जग युद्ध, संघर्ष, आर्थिक अनिश्चितता, हवामान बदल, दहशतवाद इत्यादी अनेक आव्हानांनी वेढलेले आहे.जगात उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम अशी फूट पडल्याची चर्चा आहे.

महागाई रोखणे, अन्न सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, आरोग्य सुरक्षा, जल सुरक्षा हे सर्व देशांचे प्राधान्याचे मुद्दे आहेत.

आणि, तंत्रज्ञानाच्या युगात, सायबर सुरक्षा, डीप फेक, चुकीची माहिती यांसारखी नवीन आव्हाने बनली आहेत.अशा स्थितीत ब्रिक्सकडून खूप अपेक्षा आहेत.

एक वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक व्यासपीठ म्हणून ब्रिक्स सर्व मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका बजावू शकते असा मला विश्वास वाटतो. या संदर्भात आपला दृष्टिकोन लोककेंद्रित असला पाहिजे. ब्रिक्स हा फुटीरतावादी नसून सार्वजनिक हिताचा समूह असल्याचा संदेश आपण जगाला द्यायला हवा.

आम्ही युद्धाचे नव्हे तर संवाद आणि मुत्सद्देगिरीचे समर्थन करतो. आणि, ज्याप्रमाणे आम्ही एकत्रितपणे कोविडच्या आव्हानावर मात केली, त्याचप्रमाणे भावी पिढ्यांच्या सुरक्षित, सक्षम आणि समृद्ध भविष्यासाठी नवीन संधी निर्माण करण्यात आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत.

दहशतवाद आणि दहशतवादी वित्तपुरवठा यांचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनी एकमताने एकत्र येऊन सर्वतोपरी सहकार्य केले पाहिजे. अशा गंभीर विषयावर दुटप्पीपणाला थारा नाही. आपल्या देशातील तरुणांमध्ये कट्टरतावाद रोखण्यासाठी आपण सक्रीय पावले उचलली पाहिजेत. संयुक्त राष्ट्रातील आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील व्यापक अधिवेशनाच्या प्रलंबित मुद्द्यावर आम्हाला एकत्र काम करावे लागेल.

त्याचप्रमाणे,सायबर सुरक्षा, सुरक्षित आणि विश्वसनीय कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी जागतिक नियमनासाठी काम केले पाहिजे.

मित्रहो,

ब्रिक्स भागीदार देश म्हणून भारत नवीन देशांचे स्वागत करण्यास तयार आहे. यासंदर्भातील सर्व निर्णय सर्वांच्या सहमतीने घेतले जावेत आणि ब्रिक्सच्या संस्थापक सदस्यांच्या विचारांचा आदर केला पाहिजे. जोहान्सबर्ग शिखर परिषदेत आम्ही स्वीकारलेली मार्गदर्शक तत्त्वे, मानके, निकष आणि प्रक्रिया सर्व सदस्य आणि भागीदार देशांनी पाळल्या पाहिजेत.

मित्रहो,

ब्रिक्स (BRICS) ही एक अशी संघटना आहे जिच्यामध्ये काळाबरोबर स्वतःमध्ये बदल घडवण्याची इच्छाशक्ती आहे. आपण आपला आदर्श संपूर्ण जगासमोर ठेवत, जागतिक संस्थांमधील सुधारणांसाठी एकमताने आवाज उठवायला हवा.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, बहुपक्षीय विकास बँका, डब्ल्यूटीओ यांसारख्या जागतिक संस्थांमध्ये सुधारणा घडवण्यासाठी आपण कालबद्ध रीतीने पुढे जायला हवे. ब्रिक्स च्या प्रयत्नांना पुढे नेताना आपण हे लक्षात ठेवला हवे, की या संघटनेची प्रतिमा अशी बनायला हवी, की आपल्याला जागतिक संस्थांमध्ये सुधारणा घडवायच्या नसून, त्या बदलायच्या आहेत.

ग्लोबल साऊथ मधील देशांच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षांकडे देखील लक्ष द्यायला हवे. व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ समिट (परिषद) आणि G20 च्या अध्यक्षतेदरम्यान भारताने या देशांचा आवाज जागतिक व्यासपीठावर पोहोचवला आहे.

ब्रिक्स मध्ये देखील या प्रयत्नांना बळ मिळत आहे, याचा मला आनंद आहे. गेल्या वर्षी आफ्रिकी देशांचा ब्रिक्स मध्ये समावेश करण्यात आला. या वर्षी देखील रशियाने ग्लोबल साउथ च्या अनेक देशांना आमंत्रित केले आहे.

मित्रहो,

विविध प्रकारचे विचार आणि विचारसरणीच्या संगमाने स्थापन झालेला ब्रिक्स गट, आज जगाला सकारात्मक सहयोगाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देत आहे. आपली  विविधता, एकमेकांबद्दलचा आदर आणि सर्वसहमतीने पुढे जाण्याची आपली परंपरा, हा आपल्या सहकार्याचा पाया आहे. आपला हा गुण आणि ‘ब्रिक्स स्पिरिट’ इतर देशांनाही या व्यासपीठाकडे आकर्षित करत आहे. मला विश्वास आहे, की आगामी काळात आपण सर्वजण एकत्र येऊन या आगळ्या वेगळ्या व्यासपीठाला संवाद, सहकार्य आणि समन्वयाचे उदाहरण बनवू.

या संदर्भात, ब्रिक्सचा (BRICS) संस्थापक सदस्य म्हणून, भारत नेहमीच आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत राहील.

पुन्हा एकदा, सर्वांचे मनःपूर्वक आभार!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Jan Dhan accounts hold Rs 2.75 lakh crore in banks: Official

Media Coverage

Jan Dhan accounts hold Rs 2.75 lakh crore in banks: Official
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 डिसेंबर 2025
December 07, 2025

National Resolve in Action: PM Modi's Policies Driving Economic Dynamism and Inclusivity