पाकिस्तानात बसून आमच्या भगिनींचं कुंकू पुसणाऱ्यांचे तळ आपल्या सैन्यानं उद्ध्वस्त केले : पंतप्रधान
भारताच्या लेकींच्या कुंकवाची ताकद पाकिस्तानबरोबरच जगानेही आता पाहिली !: पंतप्रधान
माओवादी हिंसाचाराचा पूर्णपणे अंत होईल तो दिवस आता फार दूर नाही, प्रत्येक गावात आता विनाअडथळा शांतता, सुरक्षा, शिक्षण आणि विकास पोहोचू शकेल: पंतप्रधान
पाटणा विमानतळाच्या टर्मिनल्सच्या आधुनिकीकरणाची बिहारच्या जनतेची दीर्घकाळापासूनची मागणी आता पूर्ण झाली : पंतप्रधान
आमच्या सरकारने मखाणा बोर्डाच्या स्थापनेची घोषणा केली, बिहारच्या मखाण्याला भौ‍गोलिक नामांकन दिले , याचा मखाणा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ : पंतप्रधान

बिहारमधील सर्व स्वाभिमानी आणि कष्टाळू बंधू आणि भगिनींना प्रणाम.

बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान जी, आपले  लोकप्रिय मुख्यमंत्री  नितीश कुमार जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी  जीतन राम मांझी जी, लल्लन सिंह जी, गिरीराज सिंह जी, चिराग पासवान जी, नित्यानंद राय जी, सतीश चंद्र दुबे जी, राजभूषण चौधरी जी, राज्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी जी, विजय कुमार सिन्हा जी, उपस्थित अन्य मंत्रीगण, लोकप्रतिनिधी आणि बिहारच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!

आज मला या पवित्र भूमीवर बिहारच्या विकासाला नवी चालना देण्याचे सौभाग्य मिळाले आहे. येथे 50 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करण्यात आली आहे.

तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आला आहात, तुमचा हा स्नेह, बिहारचे हे प्रेम, याचा मी नेहमीच आदर करतो. आणि आज, बिहारमध्ये इतक्या मोठ्या संख्येने माता आणि भगिनींची उपस्थिती म्हणजे बिहारमधील माझ्या सर्व कार्यक्रमांपैकी हा सर्वात मोठा आणि सर्वात नेत्रदीपक कार्यक्रम आहे. मी माता आणि भगिनींना मनापासून वंदन करतो. मी तुम्हा सर्व जनता-जनार्दनाचे मनःपूर्वक आभार मानतो.

 

मित्रहो,

सासारामच्या या भूमीच्या नावातच राम आहे, सासाराम. सासारामच्या लोकांना माहित आहे की भगवान राम आणि त्यांच्या वंशाची प्रथा काय होती 'प्राण जाये पर वचन ना जाये' . म्हणजेच एकदा दिलेल्या वचनाची पूर्ती होतेच. भगवान श्री रामांची ही प्रथा आता नवीन भारताचे धोरण बनली आहे. अलिकडेच जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, त्यात आपल्या अनेक निरपराध नागरिकांना प्राण गमवावे लागले. या निर्घृण दहशतवादी हल्ल्याच्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी माझ्या बिहार भेटीत दहशतवादाच्या सूत्रधारांना त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी अद्दल घडवून न्याय मिळवून दिला जाईल असे मी देशवासियांना वचन दिले होते. आज पुन्हा बिहारमध्ये येताना मी माझे वचन पूर्ण करून आलो आहे. ज्यांनी पाकिस्तानात बसून आमच्या बहिणींचे कुंकू पुसले, त्यांच्या लपण्याच्या जागा आमच्या सैन्याने उध्वस्त केल्या आहेत. पाकिस्तान आणि जगाने भारताच्या लेकींच्या कुंकवाची ताकद पाहिली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या संरक्षणाखाली स्वतःला सुरक्षित समजणाऱ्या दहशतवाद्यांना, आमच्या सैन्याने एका झटक्यात गुडघे टेकण्यास भाग पाडले. आम्ही पाकिस्तानचे हवाई तळ, त्यांची लष्करी आस्थापने काही मिनिटांत उद्ध्वस्त केली, हा नवा भारत आहे, ही नव्या भारताची ताकद आहे.

बिहारच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

हा बिहार वीर कुंवर सिंह जींची भूमी आहे. येथील हजारो तरुण देशाच्या सुरक्षेसाठी सैन्यात, बीएसएफमध्ये आपले तारुण्य पणाला लावत आहेत .  ऑपरेशन सिंदूरमध्ये, जगाने आपल्या बीएसएफचे अभूतपूर्व शौर्य आणि दुर्दम्य साहस देखील अनुभवले आहे. आपल्या सीमेवर तैनात असलेले शूर बीएसएफ सैनिक सुरक्षेची एक अभेद्य ढाल आहेत, भारतमातेचे रक्षण आपल्या बीएसएफ सैनिकांसाठी सर्वोपरि आहे. आणि मातृभूमीची सेवा करण्याचे पवित्र कर्तव्य बजावताना, बीएसएफचे उप निरीक्षक इम्तियाज 10 मे रोजी सीमेवर शहीद झाले. बिहारच्या या शूर सुपुत्राला मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आज, बिहारच्या या भूमीवरून मी पुन्हा सांगू इच्छितो की, ऑपरेशन सिंदूरमध्ये शत्रूने भारताची ताकद आजमावली आहे, परंतु शत्रूने हे समजून घेतले पाहिजे की हा आपल्या भात्यातील फक्त एकच बाण आहे. दहशतवादाविरुद्ध भारताचा लढा थांबलेला नाही आणि संपलेला नाही. जर दहशतवादाचा फणा पुन्हा उगारला गेला तर भारत त्याला त्याच्या बिळातून खेचून ठेचून टाकेल.

मित्रहो,

आमची लढाई देशाच्या प्रत्येक शत्रूविरुद्ध आहे, मग ती सीमेपलीकडे असो किंवा देशातील. गेल्या काही वर्षांत हिंसाचार आणि अशांतता पसरवणाऱ्यांचा आपण कसा बिमोड केला आहे याचे बिहारचे लोक साक्षीदार आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत सासाराम, कैमूर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती होती ते आठवा; नक्षलवादाचे वर्चस्व कसे होते? मुखवटा घातलेले आणि हातात बंदुका घेतलेले नक्षलवादी रस्त्यावर केव्हा कधी येतील याची सर्वांना भीती वाटायची. सरकारी योजना येत असत, पण त्या कधीच नागरिकांपर्यंत पोहोचत नव्हत्या. नक्षलग्रस्त गावांमध्ये ना रुग्णालय होते ना मोबाईल टॉवर. कधी शाळा जाळल्या जात होत्या, कधी रस्ते बांधणाऱ्या लोकांना मारले जात होते. या लोकांचा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास नव्हता. त्या परिस्थितीतही नितीशजींनी येथे विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला. 2014 नंतर, आम्ही या दिशेने अधिक वेगाने काम केले. आम्ही माओवाद्यांना त्यांच्या कृत्यांची शिक्षा देण्यास सुरुवात केली. आम्ही तरुणांनाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले. आज देशाला 11 वर्षांच्या दृढ प्रतिबद्धतेचे फळ मिळू लागले आहे. 2014 पूर्वी देशातील सव्वाशेहून अधिक जिल्हे नक्षलग्रस्त होते, आता फक्त 18 जिल्हे नक्षलग्रस्त राहिले आहेत. आता सरकार रस्ते तसेच रोजगारही उपलब्ध करून देत आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा माओवादी हिंसाचार पूर्णपणे नष्ट होईल; शांतता, सुरक्षा, शिक्षण आणि विकास कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रत्येक गावात पोहोचेल.

 

मित्रहो,

जेव्हा सुरक्षितता आणि शांतता असते तेव्हाच विकासाचे नवे मार्ग प्रशस्त होतात. नितीशजींच्या नेतृत्वाखाली जंगलराज सरकार बरखास्त झाल्यावर बिहार देखील प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. तुटलेले महामार्ग, खराब रेल्वे, मर्यादित विमान वाहतूक व्यवस्था, तो काळ आता इतिहासजमा झाला आहे, तो मागे पडत आहे.

मित्रहो,

एकेकाळी बिहारमध्ये फक्त एकच विमानतळ होते - पाटणा.  आज दरभंगा विमानतळ देखील सुरू झाले आहे. आता येथून दिल्ली, मुंबई, बेंगळुरू सारख्या शहरांत विमाने जातात. बिहारमधील लोक बऱ्याच काळापासून पाटणा विमानतळाच्या टर्मिनलचे आधुनिकीकरण करण्याची मागणी करत होते, आता ही मागणीही पूर्ण झाली आहे. काल संध्याकाळी मला पाटणा विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य मिळाले. हे नवीन टर्मिनल आता 1 कोटी प्रवाशांना सामावून घेऊ शकते. बिहटा विमानतळासाठी 1400 कोटी रुपयांची गुंतवणूक देखील केली जात आहे.

मित्रहो,

आज बिहारमध्ये सर्वत्र चार पदरी आणि सहा पदरी रस्त्यांचे जाळे विस्तारत आहे. पाटणा ते बक्सर, गयाजी ते दोभी, पाटणा ते बोध गयाजी, पाटणा-आरा-सासाराम ग्रीनफील्ड कॉरिडॉर, सर्वत्र वेगाने काम सुरू आहे. गंगा, सोन, गंडक, कोसीसह सर्व प्रमुख नद्यांवर नवीन पूल बांधले जात आहेत. हजारो कोटी रुपयांचे असे प्रकल्प बिहारमध्ये नवीन संधी आणि शक्यता निर्माण करत आहेत. या प्रकल्पांमधून हजारो तरुणांना रोजगार मिळेल. येथे पर्यटन आणि व्यवसाय दोघांनाही फायदा होईल.

मित्रांनो,

बिहारमधील रेल्वेची स्थितीही आता वेगाने बदलतआहे. आज बिहारमध्ये जागतिक दर्जाच्या वंदे भारत ट्रेन धावत आहेत, रेल्वे लाईन्स दुप्पट आणि तिप्पट केल्या जात आहेत, छपरा,मुझफ्फरपूर, कटिहार सारख्या भागांमध्ये काम वेगाने सुरू आहे. सोन-नगर आणि अंडाल दरम्यान मल्टीट्रॅकिंगचे काम सुरू आहे,ज्यामुळे गाड्यांची ये-जा वेगवान होईल. सासाराममध्येही आता 100 पेक्षा जास्त रेल्वेगाड्या थांबतात. म्हणजेच, आम्ही जुन्या समस्या दूर करत आहोत आणि रेल्वेचे आधुनिकीकरणही करत आहोत.

 

बंधूंनो आणि भगिनींनो,

ही कामे आधीही होऊ शकली असती. पण, ज्यांच्यावर बिहारला आधुनिक ट्रेन्स देण्याची जबाबदारी होती, त्यांनी रेल्वेतील भरतीच्या नावाखाली तुमची जमीन लुबाडण्याचे काम केले आहे,गरिबांच्या जमिनी आपल्या  नावावर करून घेतल्या. सामाजिक न्यायाचे त्यांचे हेच मार्ग होते – गरिबाला लुटणे, त्यांचे अधिकार हिरावून घेणे, त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेणे आणि मग राजेशाहीचा आनंद घेणे. बिहारमधील तुम्ही लोकांनी जंगलराजवाल्यांच्या खोटेपणापासूनआणि फसवणुकीपासून यापुढेही सावध राहणे खूप गरजेचे आहे.

मित्रांनो,

विजेशिवाय विकास अपूर्ण आहे. जेव्हा वीज असते, तेव्हा औद्योगिक विकास होतो,जेव्हा वीज असते, तेव्हा जीवन सुकर होते. आणि 21 वे शतक तर तंत्रज्ञानाने धावणारे शतक आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर विजेची गरज भासणार आहे. गेल्या काही वर्षांत, बिहारमध्ये वीज उत्पादनावर खूप भर देण्यात आला आहे. आज बिहारमध्ये विजेचा वापर 10 वर्षांपूर्वीपेक्षा चार पट वाढला आहे. नबीनगरमध्ये एनटीपीसीचा मोठा ऊर्जा प्रकल्प बनत आहे, यावर 30 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. यामुळे बिहारला 1500 मेगावॅट वीज मिळेल. बक्सर आणि पीरपैंतीमध्येही नवीन औष्णिक ऊर्जा प्रकल्प सुरू होतील.

बंधूंनो आणि भगिनींनो,

आता आमचे लक्ष भविष्यावर आहे. आपल्याला बिहारला हरितऊर्जेकडे   घेऊन जायचे आहे. म्हणूनच,कजरा येथे  सोलरपार्कचे बांधकाम सुरू आहे. पीएम-कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे कमाईचे पर्याय दिले जात आहेत. रिन्यूएबल ॲग्रिकल्चर फीडरमुळे शेतांना वीज मिळत आहे. आमच्या या प्रयत्नांचा परिणाम म्हणून, येथील लोकांचे जीवन सुखकर  झाले आहे. महिला स्वतःला सुरक्षित समजत आहेत.

मित्रांनो,

जेव्हा राज्यात आधुनिक पायाभूत सुविधा येतात, तेव्हा त्याचा सर्वाधिक फायदा गाव, गरीब,शेतकरी आणि छोट्या उद्योगांना होतो. कारण,ते देश-विदेशातील मोठ्या बाजारपेठांशी जोडले जातात. राज्यात नवीन गुंतवणूक येते, तेव्हा नवीन संधी निर्माण होतात. तुम्ही पाहा, गेल्या वर्षी झालेल्या बिहार बिझनेस समिटमध्ये मोठ्या संख्येने कंपन्या येथे गुंतवणुकीसाठी पुढे आल्या. जेव्हा राज्यात उद्योग येतात,तेव्हा लोकांना मजुरीसाठी स्थलांतर करावे लागत नाही, शेतकऱ्यांनाही नवीन पर्याय मिळतात. वाहतुकीच्या सुविधा सुधारल्यामुळे त्यांची उत्पादने दूरदूरपर्यंत पोहोचू शकतात.

 

बंधूंनो आणि भगिनींनो,

आमचे सरकार बिहारमधील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सातत्याने काम करत आहे. येथे 75 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आर्थिक मदत मिळत आहे. आपल्या सरकारने मखाना बोर्डची घोषणा केली आहे. आम्ही बिहारच्या मखानांना जीआय टॅग दिला, यामुळे मखाना उत्पादक शेतकऱ्यांना खूप फायदा झाला आहे. या वर्षाच्या अर्थसंकल्पात आम्ही बिहारमध्ये फूड प्रोसेसिंगसाठी राष्ट्रीय संस्थेचीही घोषणा केली आहे. आत्ता दोन-तीन दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाने  खरीप हंगामासाठी, म्हणजेच धानासह 14 पिकांची एमएसपी  वाढवण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळेल आणि त्यांचे उत्पन्नही वाढेल.

मित्रांनो,

ज्या लोकांनी बिहारला सर्वात जास्त ठगवले, ज्यांच्या काळात बिहारमधील गरीब आणि वंचित घटकांना बिहार सोडून जावे लागले, आज तेच लोक सत्ता मिळवण्यासाठी सामाजिक न्यायाचे असत्य बोलत आहेत. अनेक दशकांपर्यंत बिहारमधील दलित, मागास आणि आदिवासींकडे शौचालय नव्हते, दशकांपर्यंत आपल्या या बंधू-भगिनींकडे बँकेत खाते नव्हते, त्यांच्यासाठी बँकांमध्ये तर प्रवेश बंद होता, त्यांना दरवाजापर्यंतही जाऊ दिले जात नव्हते. दलित आणि मागासलेल्या वर्गातील सर्वाधिक लोक झोपडपट्ट्यांमधले जीवन जगत होते, त्यांच्याकडे पक्के घर नव्हते, ते बेघर होते, कोट्यवधी लोकांच्या डोक्यावर छतही नव्हते. मी तुम्हाला विचारतो, बिहारच्या लोकांची ही दुर्दशा,ही वेदना, ही अडचण, हा काँग्रेस आणि आरजेडीचा  सामाजिक न्याय होता  का? गरिबांना अशाप्रकारे असहाय्य परिस्थितीत जगण्यासाठी सर्व धोरणे बनवणारे लोक, मित्रांनो, यापेक्षा जास्त अन्याय दुसरा कोणताही असू शकत नाही. काँग्रेस आणि आरजेडीच्या लोकांनी कधीही दलित, मागासलेल्यांच्या इतक्या अडचणींची चिंता केली नाही. हे लोक परदेशी लोकांना बिहारची गरिबी दाखवण्यासाठी फिरवायला आणत होते. आता जेव्हा दलित, वंचित आणि मागासलेल्या समाजाने काँग्रेसला त्यांच्या पापांमुळे सोडून दिले आहे, तेव्हा त्यांना आपले अस्तित्व वाचवण्यासाठी सामाजिक न्यायाच्या गोष्टी आठवत आहेत.

 

बंधूंनो आणि भगिनींनो,

बिहारमध्ये आणि देशात सामाजिक न्यायाची नवीन पहाट एनडीएच्या काळात दिसली आहे. आम्ही गरिबांपर्यंत जीवनाशी संबंधित मूलभूत सुविधा पोहोचवल्या आहेत. आम्ही या सुविधा शंभर टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत आहोत. चार कोटी नवीन घरे, 3 कोटी भगिनींना लखपती दीदी बनवण्याचे अभियान, 12 कोटींहून अधिक घरांमध्ये नळाचे कनेक्शन, 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्धाला 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार, दरमहा मोफत रेशनची सुविधा –आमचे सरकार प्रत्येक गरीब आणि गरजूंच्या सोबत उभे आहे.

मित्रांनो,

आमची अशी इच्छा आहे  की कोणतेही गाव नजरेतून सुटू नये, कोणतेही पात्र कुटुंब सरकारच्या योजनांपासून वंचित राहू नये. मला आनंद आहे की, याच विचाराने बिहार सरकारने डॉ. भीमराव आंबेडकर समग्र सेवा अभियान सुरू केले आहे. या अभियानात  महत्त्वाच्या 22 योजना एकत्र घेऊन सरकार गावो-गावी, वाडी-वस्तीवर पोहोचत आहे. आमचे लक्ष्य आहे – प्रत्येक दलित, महादलित, मागासलेल्या, अति-मागासलेल्या गरिबांच्या घरापर्यंत थेट पोहोचणे. मला सांगण्यात आले आहे की आतापर्यंत 30 हजारांहून अधिक शिबिरे लागली आहेत, लाखो लोक या अभियानाशी जोडले गेले आहेत. जेव्हा सरकार स्वतः लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते, तेव्हा कोणताही भेदभाव होत नाही, आणि कोणताही भ्रष्टाचार होत नाही. आणि तेव्हाच खरा सामाजिक न्याय होतो.

 

मित्रांनो,

आपल्याला आपल्या बिहारला बाबासाहेब आंबेडकर, कर्पूरी ठाकूर, बाबू जगजीवन राम आणि जेपी यांच्या स्वप्नातील बिहार बनवायचे आहे. आपले लक्ष्य आहे - विकसित बिहार, विकसित भारत! कारण, जेव्हा-जेव्हा बिहारने प्रगती केली आहे, तेव्हा भारत जगात शिखरावर पोहोचला आहे. मला विश्वास आहे की, आपण सर्व मिळून विकासाच्या गतीला आणखी पुढे नेऊ. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे या विकास कामांसाठी खूप खूप अभिनंदन करतो.माझ्यासोबत दोन्ही हात वर करून, मुठी वळवून म्हणा -

भारत माता की जय!

आवाज दूरदूरपर्यंत पोहोचायला पाहिजे. सीमेवर उभ्या असलेल्या आपल्या जवानाचे हृदय अभिमानाने भरून यायला पाहिजे.

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय ! खूप खूप धन्यवाद.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Bosch Home to start AC exports from India in two years: CEO & President Jan Brockmann

Media Coverage

Bosch Home to start AC exports from India in two years: CEO & President Jan Brockmann
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares Sanskrit Subhashitam paying tribute to Shaheed Udham Singh
July 31, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, paid heartfelt tributes to the great revolutionary martyr Udham Singh on his Balidan Diwas. He said that the saga of courage and valour embodied in Udham Singh’s life will continue to inspire every generation of the country to uphold the honour and self-respect of the motherland.

The Prime Minister shared a Sanskrit Subhashitam-

“न जातु शौर्यं पुरुषस्य भानुरस्तं गतो भवति कदापि शश्वत्।

यथा पुनस्तपति दिवाकरोऽयं तथा पुनर्विक्रमते स वीरः॥”

The Subhashitam conveys that The sun of valor never sets permanently. Just as the sun rises and shines brightly again, so too does a brave man triumph over every adversity with his valor.

The Prime Minister wrote on X;

“महान क्रांतिकारी शहीद उधम सिंह को उनके बलिदान दिवस पर सादर नमन। हिम्मत और हौसले से भरी उनकी जीवनगाथा देश की हर पीढ़ी को मातृभूमि के स्वाभिमान की रक्षा के लिए प्रेरित करती रहेगी।

न जातु शौर्यं पुरुषस्य भानुरस्तं गतो भवति कदापि शश्वत्।

यथा पुनस्तपति दिवाकरोऽयं तथा पुनर्विक्रमते स वीरः॥”