
भारत माता की जय!
भारत माता की जय!
भारत माता की जय!
मी सर्वांना नमन करतो. बाबा महेंद्रनाथ, बाबा हंसनाथ, सोहागरा धाम, माँ थावे भवानी, माँ अंबिका भवानी, प्रथम राष्ट्रपती देशरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या पावन भूमीवरील सर्वांना मी अभिवादन करतो.
बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान जी, येथील लोकांच्या सेवेसाठी समर्पित असलेले मुख्यमंत्री नितीश कुमार जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जीतन राम मांझी जी, गिरीराज सिंह जी, लल्लन सिंह जी, चिराग पासवान जी, रामनाथ ठाकूर जी, नित्यानंद राय जी, सतीश चंद्र दुबे जी, राजभूषण चौधरी जी, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी जी, विजय कुमार सिन्हा जी, संसदेतील माझे सहकारी उपेंद्र कुशवाह जी, बिहार भाजपाचे अध्यक्ष दिलीप जायसवाल जी, इतर मंत्री महोदय, खासदार आणि आमदार आणि बिहारच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो
सिवानची ही भूमी आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान आहे. ही आपल्या लोकशाहीला, देशाला आणि संविधानाला बळ प्रदान करणारी भूमी आहे. सिवानने देशाला राजेंद्र बाबूंसारखा महान सुपुत्र दिला. संविधानाच्या निर्मितीपासून देशाला दिशा दाखवण्यात राजेंद्र बाबूंनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली.सिवानने देशाला ब्रज किशोर प्रसाद जीं सारखे महान समाजसुधारकही दिले. ब्रज बाबूंनी महिला सक्षमीकरणाला आपल्या जीवनाचे ध्येय बनवले होते.
मित्रांनो,
एनडीएचे हे दुहेरी इंजिन सरकार अशा महान आत्म्यांच्या जीवन ध्येयाला दृढनिश्चयाने पुढे नेत आहे याचा मला आनंद आहे. आजचा हा कार्यक्रम याच प्रयत्नांचा एक भाग आहे. आज या व्यासपीठावरून हजारो कोटी रुपयांच्या योजनांचे भूमिपूजन आणि उद्घाटन झाले आहे. आजचा कार्यक्रम याच प्रयत्नांचा एक भाग आहे. आज या व्यासपीठावरून हजारो कोटी रुपयांच्या योजनांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले. हे सर्व विकास प्रकल्प बिहारला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जातील, यामुळे समृद्ध बिहार बनेल. सिवान, सासाराम, बक्सर, मोतिहारी, बेतिया आणि आरा यासारखे बिहारमधील सर्व भाग समृद्ध होतील या दृष्टीने हे प्रकल्प मोठी भूमिका बजावतील. यामुळे गरीब, वंचित, दलित, महादलित, मागास आणि अत्यंत मागासलेल्या लोकांसह समाजातील प्रत्येक घटकाचे जीवन सुकर होईल. या प्रकल्पांसाठी मी बिहारच्या जनतेचे आणि आपणा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो. आता कालच येथे पाऊस झाला आहे. मी तुमच्या मधून येत असतानाही पाऊस पडला. सकाळीही थोडासा पावसाचा शिडकावा झाला. तरीही, आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात आणि आम्हाला आशीर्वाद दिलात. मी आपले मनापासून जितके आभार मानू तितके कमीच पडतील.
बंधू आणि भगिनींनो,
आपणा सर्वांना माहित आहेच की, मी कालच परदेशातून परतलो आहे. या भेटीदरम्यान मी जगातील प्रमुख समृद्ध देशांच्या नेत्यांशी चर्चा केली. भारताच्या जलद प्रगतीने सर्व नेते खूप प्रभावित झाले आहेत. ते भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनताना पहात आहेत आणि बिहार निश्चितच यामध्ये खूप मोठी भूमिका बजावणार आहे. बिहारची भरभराट होईल आणि देशाच्या समृद्धीतही बिहार मोठी भूमिका बजावेल.
मित्रांनो,
माझ्या या विश्वासाचे कारण आहे बिहारमधील आपणा सर्वांची ताकद. आपण सर्वांनी मिळून बिहारमधील जंगलराज नष्ट केले आहे. येथील आपल्या तरुणांनी तर 20 वर्षांपूर्वीच्या बिहारच्या वाईट परिस्थिती बद्दल फक्त कथा आणि कहाण्यांमध्ये ऐकले आहे. जंगलराज लोकांनी बिहारला किती वाईट स्थितीत आणले होते याची त्यांना कल्पनाही नाही. शतकानुशतके भारताच्या प्रगतीचे नेतृत्व करणाऱ्या बिहारला पंजा आणि कंदिलाच्या विळख्याने पळपुटेपणाचे प्रतीक बनवून ठेवले होते.
मित्रांनो,
बिहारमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा स्वाभिमान. माझे बिहारी बंधू आणि भगिनी सर्वात कठीण परिस्थितीत काम करतात. ते कधीही त्यांच्या स्वाभिमानाशी तडजोड करत नाहीत. मात्र, पंजा आणि कंदील असलेल्या मंडळींनी बिहारच्या स्वाभिमानाला खूप दुखापत पोहोचवली. या लोकांनी इतकी लूटमार केली की गरिबी बिहारचे दुर्दैव बनले. अनेक आव्हानांवर मात करून, नितीशजींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने बिहारला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणले आहे आणि मी बिहारच्या जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी आलो आहे, आपण खूप काही केले असेल, करत आलो आहोत आणि करत राहू, पण मोदी असे नाहीत जे इतके करूनही गप्प बसतील. आता पुरे झाले, बरेच काही केले आहे, पण नाही, मला तर बिहारसाठी अजून खूप काही करायचे आहे, तुमच्यासाठी करायचे आहे, इथल्या प्रत्येक गावासाठी करायचे आहे, इथल्या प्रत्येक घरासाठी करायचे आहे, इथल्या प्रत्येक तरुणासाठी करायचे आहे. जर मी गेल्या 10-11 वर्षांबद्दल बोललो तर या 10 वर्षांत बिहारमध्ये ग्रामीण भागात सुमारे 55 हजार किलोमीटर रस्ते बांधले गेले आहेत, दीड कोटींहून अधिक घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे, दीड कोटी लोकांना पाणी जोडणी देण्यात आली आहे, 45 हजारांहून अधिक सामान्य सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, आज बिहारच्या छोट्या छोट्या शहरांमध्ये नवनवीन स्टार्ट-अप्स सुरु होत आहेत.
मित्रांनो,
बिहारमधील प्रगतीचा हा वेग सातत्याने वाढत आहे, तो वाढवतच राहिला पाहिजे आणि त्याच वेळी, बिहारमध्ये जंगलराज आणणारे येनकेन प्रकारे त्यांच्या जुन्या कृत्यांची पुनरावृत्ती करण्याची संधी शोधत आहेत. बिहारच्या नागरिकांची आर्थिक संसाधने हस्तगत करण्यासाठी ते विविध युक्त्या अवलंबत आहेत, म्हणून बिहारच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी, तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, तुम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागेल. समृद्ध बिहारच्या प्रवासात गतिरोध निर्माण करण्यासाठी तयारीत बसलेल्यांना खूप लांब ठेवावे लागेल.
मित्रांनो,
'गरीबी हटाओ'चे नारे आपल्या देशाने अनेक दशकांपासून ऐकले आहेत. तुमच्या दोन, तीन पिढ्यांनी 'गरीबी हटाओ! गरिबी हटाओ!'चा नारा ऐकला आहे. प्रत्येक निवडणुकीत ते याबाबत घोषणा द्यायचे. पण जेव्हा तुम्ही आम्हाला संधी दिली, एनडीएला संधी दिली, तेव्हा एनडीए सरकारने दाखवून दिले की गरिबी कमीसुद्धा करता येते. गेल्या दशकात विक्रमी 25 कोटी भारतीयांनी गरिबीवर मात केली आहे. जागतिक बँकेसारख्या जगातील नामांकित संस्था भारताच्या या महान कामगिरीचे कौतुक करत आहेत. आणि भारताने केलेल्या या अद्भुत कामगिरीत, बिहार आणि आमच्या नितीशजींच्या सरकारचे मोठे योगदान आहे. पूर्वी बिहारची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या अत्यंत गरीब वर्गात मोडत होती. परंतु गेल्या दशकात, बिहारमधील सुमारे पावणे चार कोटी लोकांनी स्वतःला गरिबीतून मुक्त केले आहे.
मित्रांनो,
स्वातंत्र्याच्या इतक्या दशकांनंतरही, इतके लोक गरीब होते, घोषणा सतत दिल्या जात होत्या, गरिबी वाढत होती आणि हे बिहारच्या लोकांमध्ये किंवा देशवासीयांकडे कठोर परिश्रमांची कमतरता होती म्हणून घडले असे नव्हे. तर,याचे कारण त्यांच्याकडे पुढे जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता. बराच काळ काँग्रेसच्या परवाना राजने देशाला गरीब ठेवले आणि गरिबांना अत्यंत गरिबीत ढकलले. जेव्हा प्रत्येक गोष्टीसाठी कोटा आणि परवाने निश्चित केले होते. अगदी लहान कामांसाठीही परवाने आवश्यक ठरायचे. काँग्रेस-राजदच्या राजवटीत गरिबांना घरे मिळायची नाहीत, शिधावाटप दलालांकडून हिसकावून घेतले जात होते, वैद्यकीय उपचार गरिबांच्या आवाक्याबाहेर होते, शिक्षण आणि रोजगारासाठी संघर्ष करावा लागत होता, वीज-पाण्याची एक जोडणी मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये अगणित चकरा माराव्या लागत होत्या. गॅस जोडण्या मिळवण्यासाठी खासदारांची शिफारस आणावी लागत असे. लाच आणि शिफारसीशिवाय नोकरी मिळत नव्हती. आणि याचे सर्वात मोठे बळी कोण होते? यातील बहुतेक माझ्या दलित समुदायाचे, महादलित समुदायाचे, मागासलेल्या समाजातील, अतिमागास समाजातील माझे हेच भाऊ आणि बहिणी त्याची शिकार ठरले होते. गरिबी हटवण्याचे स्वप्न दाखवून काही कुटुंबे स्वतःच कोट्याधीश-अब्जाधीश झाली.
मित्रहो,
गेल्या 11 वर्षांपासून आमचे सरकार, गरिबांच्या मार्गातील प्रत्येक अडचण दूर करण्याचे काम करत आहे, आणि यापुढेही करत राहणार आहे, आणि इतकी मेहनत घेतात , तेव्हा असे चांगले परिणाम आज पहायला मिळत आहेत. आता ज्याप्रमाणे गरिबांसाठी घरे आहेत, आता ज्या कुटुंबांना मला घरांच्या चाव्या देण्याची मला संधी मिळाली, ते इतके आशिर्वाद देत होते, त्यांच्या चेहऱ्यावर इतके समाधान होते, भावनिक झाले होते.
मित्रहो,
गेल्या दशकात देशभरात 4 कोटींपेक्षा अधिक गरिबांना पक्की घरे मिळाली आहेत. मी तुम्हाला विचारू, उत्तर द्याल तुम्ही लोक? मी जर विचारले, तर तुम्ही उत्तर द्याल? मी आताच म्हटले, 4 कोटी लोकांना म्हणजे 4 कोटी कुटुंबांना पक्की घरे, किती लोकांना, जरा मोठ्याने बोला किती लोकांना? 4 कोटी! तुम्ही कल्पना करा, 4 कोटी लोकांना पक्की घरे मिळणे, फक्त त्या चार भिंती नाहीत, त्या घरांमध्ये स्वप्ने बहरतात, त्या घरांमध्ये संकल्प रुजतात. येणाऱ्या काळात 3 कोटी आणखी पक्की घरे तयार होणार आहेत. मी आधी म्हटले ना, सेवेच्या कामात मी थांबणार नाही. जेवढे झाले, आधीच्यांपेक्षा खूप चांगले झाले, तरीही मोदी स्वस्थ झोपणार नाही, दिवस-रात्र काम करत राहतील , तुमच्यासाठी करत राहतील कारण तुम्ही माझ्या कुटुंबाचे सदस्य आहात आणि माझ्या कुटुंबाचा एकही सदस्य मागे राहू नये, दुःखी राहू नये, हे मी स्वप्न घेऊन चाललो आहे. याचा खूप मोठा लाभ बिहारचे माझे गरीब बंधू-भगिनी, दलित बंधू-भगिनी, महादलित बंधू-भगिनी, मागास बंधू-भगिनी, अति मागास बंधू-भगिनी, या ज्या सर्व योजना मी राबवत आहे, सर्वात आधी लाभ यांना मिळत आहे. बिहारमध्ये पीएम आवास योजनेतून 57 लाखांपेक्षा जास्त पक्की घरे बनली आहेत. येथे सिवान जिल्ह्यातही गरिबांची 1 लाख 10 हजारांपेक्षा जास्त पक्की घरे बनली आहेत, मी एका जिल्ह्याची गोष्ट सांगत आहे आणि हे काम अविरत सुरू आहे. आजही बिहारमधील 50 हजार पेक्षा अधिक कुटुंबांसाठी घराचा हप्ता जारी करण्यात आला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, माझ्यासाठी दुहेरी आनंद कशाचा आहे? ही घरे बहुतांश माता-भगिनींच्या नावावर आहेत, माझ्या ज्या भगिनी-मुलींच्या नावावर कधीही कोणतीही संपत्ती नव्हती, आता त्या आपल्या घराच्या मालकीण होत आहेत.
मित्रहो,
आमचे सरकार घरासोबतच मोफत रेशन, वीज आणि पाण्याची सुविधाही देत आहे. गेल्या काही वर्षांत देशभरात 12 कोटींपेक्षा अधिक नवीन कुटुंबांच्या घरात नळ पोहोचला आहे. यामध्ये सिवानमधीलही साडेचार लाखांपेक्षा अधिक कुटुंबांना पहिल्यांदा नळाने पाणी मिळाले आहे. गावांमध्ये प्रत्येक घरात नळ असावा, शहरांमध्ये पिण्यासाठी पुरेसे पाणी असावे, हे लक्ष्य घेऊन आम्ही काम करत आहोत. गेल्या काही वर्षांत बिहारमधील अनेक शहरांसाठी पाणी पाइपलाइन आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीवेज ट्रीटमेंट प्रोजेक्ट) तयार करण्यात आले. आता डझनभर अधिक शहरांसाठी पाइपलाइन आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स) मंजूर करण्यात आले आहेत. हे सर्व प्रकल्प, गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे जीवन अधिक चांगले बनवतील.
बंधूंनो आणि भगिनींनो,
आरजेडी-काँग्रेसची कृत्ये, त्यांचे कारनामे, बिहारविरोधी आहेत, गुंतवणूकविरोधी आहेत. जेव्हाही स्वतःच्या तोंडून हे लोक विकासाची गोष्ट करतात, तेव्हा लोकांना दुकान-व्यवसाय, उद्योग-धंदे, सर्वत्र कुलूप लागलेले दिसतात. त्यामुळेच, हे बिहारच्या तरुणांच्या मनात कधीही स्थान निर्माण करू शकले नाहीत. हे लोक, दूरावस्थेतील पायाभूत सुविधा, माफिया राज, गुंडाराज आणि भ्रष्टाचाराचे पोषक राहिले आहेत.
मित्रहो,
बिहारचा प्रतिभावान तरुण आज जमिनीवर होणारे काम पाहत आहे, ते पारखून घेत आहे. एनडीए, कसा बिहार बनवत आहे, याचे उदाहरण मढौरा रेल्वे कारखाना आहे. आज मढौराच्या लोकोमोटिव्ह कारखान्यातून पहिले इंजिन, आफ्रिकेला निर्यात केले जात आहे. हे तुमचेच इंजिन जाईल, तिथल्या गाडीला ओढेल. तुम्ही विचार करा, आफ्रिकेतही बिहारचा जयघोष होणार आहे. हा कारखाना त्याच सारण जिल्ह्यात उभारलेला आहे, ज्याला पंजा आणि आरजेडीवाल्यांनी मागासलेला म्हणून दुरावस्थेत सोडून दिले होते. आज हा जिल्हा जगाच्या उत्पादन आणि निर्यात नकाशावर आपले स्थान निर्माण करत आहे. जंगलराजवाल्यांनी तर बिहारचे विकास इंजिनच ठप्प केले होते, आता बिहारमध्ये बनलेले इंजिन, आफ्रिकेची रेल्वे चालवेल. ही खूप मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे, मला पूर्ण विश्वास आहे बिहार, मेड इन इंडियाचे एक मोठे केंद्र बनेल. येथील मखाना, येथील फळे-भाज्या तर बाहेर जातीलच, बिहारच्या कारखान्यांमध्ये बनणारे सामानही जगाच्या बाजारांमध्ये पोहोचेल. बिहारचे तरुण जे सामान बनवतील, ते आत्मनिर्भर भारताला बळ देईल.
मित्रहो,
यात बिहारमध्ये बनत असलेल्या आधुनिक पायाभूत सुविधा खूप कामी येतील. आज बिहारमध्ये रस्ते, रेल्वे, हवाई प्रवास आणि जलमार्ग, प्रत्येक प्रकारच्या पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक होत आहे. बिहारला सातत्याने नवीन गाड्या मिळत आहेत. इथे वंदे भारतसारख्या आधुनिक गाड्या धावत आहेत. आज आम्ही आणखी एक मोठी सुरुवात करणार आहोत. श्रावण सुरू होण्यापूर्वी आज बाबा हरिहरनाथची भूमी, वंदे भारत ट्रेनने बाबा गोरखनाथच्या भूमीशी जोडली गेली आहे. पटना ते गोरखपूरची नवीन वंदे भारत ट्रेन, पूर्वांचलच्या शिवभक्तांना मिळालेली नवीन गाडी आहे. ही गाडी भगवान बुद्धांच्या तपोभूमीला, त्यांच्या महापरिनिर्वाण भूमी कुशीनगरशी जोडण्याचेही माध्यम आहे.
मित्रहो,
अशा प्रयत्नांमुळे बिहारमधील उद्योग-धंद्यांना तर बळ मिळेलच, यातून पर्यटनाला सर्वात अधिक फायदा होईल. यामुळे जगाच्या पर्यटन नकाशातही बिहार आणखी अधिक उजळून पुढे येईल. म्हणजे बिहारच्या तरुणांसाठी रोजगाराच्या अगणित संधी निर्माण होणार आहेत.
मित्रहो,
देशात सर्वांना पुढे जाण्याची संधी मिळावी, कोणासोबतही भेदभाव होऊ नये, ही आपल्या संविधानाची भावना आहे. आम्हीही याच भावनेने म्हणतो- सबका साथ, सबका विकास. पण हे लालटेन आणि पंजा वाले म्हणतात- परिवार का साथ, परिवार का विकास. आम्ही म्हणतो- सबका साथ, सबका विकास. ते म्हणतात- परिवार का साथ, परिवार का विकास. त्यांच्या राजकारणाचा एकूण जमाखर्च हाच आहे. आपल्या-आपल्या कुटुंबांच्या हितासाठी हे देशाच्या, बिहारच्या करोडो कुटुंबांचे अहित करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. स्वतः बाबासाहेब आंबेडकरही या प्रकारच्या राजकारणाच्या बिल्कुल विरोधात होते. त्यामुळे हे लोक पावलोपावली बाबासाहेबांचा अपमान करतात. आता संपूर्ण देशाने पाहिले आहे की आरजेडीवाल्यांनी बाबासाहेबांच्या फोटोसोबत कशी वर्तणूक केली आहे. मी पाहत होतो, बिहारमध्ये पोस्टर लागले आहेत की बाबासाहेबांच्या अपमानाबद्दल माफी मागा, पण मी जाणतो, हे लोक कधी माफी मागणार नाहीत, कारण या लोकांच्या मनात दलित, महादलित, मागासलेले, अति मागास यांच्याबद्दल कसलाही सन्मान नाही. आरजेडी आणि काँग्रेस बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पायाशी ठेवतात, तर मोदी बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या हृदयात ठेवतात. बाबासाहेबांचा अपमान करून हे लोक स्वतःला बाबासाहेबांपेक्षाही मोठे दाखवू इच्छितात. बिहारचे लोक बाबासाहेबांचा हा अपमान कधीही विसरणार नाहीत.
मित्रहो,
बिहारच्या वेगवान प्रगतीसाठी जो लॉन्चिंग पॅड अपेक्षित आहे, तो नितीशजींच्या प्रयत्नांनी तयार झाला आहे. आता एनडीएने मिळून, बिहारला प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचवायचे आहे. माझा बिहारच्या तरुणांवर विश्वास आहे. आपण सर्व मिळून बिहारचा प्राचीन गौरव पुन्हा मिळवून देऊ, बिहारला विकसित भारताचे मजबूत इंजिन बनवू, याच विश्वासाने, तुम्हा सर्वांना विकास कामांसाठी पुन्हा अनेक-अनेक शुभेच्छा. माझ्यासोबत दोन्ही मुठी बंद करून हात वर करून बोला, भारत माता की जय! ज्यांच्याकडे तिरंगा आहे, त्यांनी तिरंगा फडकवावा.
भारत माता की जय!
भारत माता की जय!
भारत माता की जय!
खूप-खूप धन्यवाद!