16 अटल निवासी विद्यालयांचे केले उद्घाटन
"काशी संसद सांस्कृतिक महोत्सवासारखे प्रयत्न या प्राचीन शहराचे सांस्कृतिक चैतन्य द्विगुणित करतात"
महादेवाच्या आशीर्वादाने काशी विकासाचे अभूतपूर्व आयाम साकारत आहे”
"काशी आणि संस्कृती ही एकाच उर्जेची दोन नावे आहेत"
“काशीच्या कानाकोपऱ्यात संगीत प्रवाहित आहे, कारण ते साक्षात नटराजाचे शहर आहे
“2014 मध्ये मी येथे आलो तेव्हा काशीच्या विकासाचे आणि वारशाचे जे स्वप्न मी पाहिले होते, ते आता हळूहळू प्रत्यक्षात साकारत आहे”
"वाराणसी हे आपल्या सर्वसमावेशक स्वभावामुळे अनेक शतकांपासून शिक्षणाचे केंद्र राहिले आहे"
"मला काशीमध्ये पर्यटक मार्गदर्शकांची संस्कृती रुजवायची आहे आणि काशीच्या पर्यटक मार्गदर्शकांना जगात सन्मान मिळवून द्यायचा आहे"

हर हर महादेव!

उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, काशी संसद सांस्कृतिक महोत्सवाचे सर्व सहभागी सहकारी आणि रूद्राक्ष केंद्रामध्ये उपस्थित असलेल्या माझ्या  प्रिय काशीवासियांनो!

विश्वनाथ बाबांच्या आशीर्वादाने काशीचा सन्मान, गौरव नित्य नवीन उंचीवर जात आहे. जी-20 शिखर परिषदेच्या माध्यमातून भारताने संपूर्ण जगामध्ये अपना ध्वज रोवला आहे. परंतू त्यामध्ये झालेली काशीची चर्चा विशेष म्हणावी लागेल. काशीची सेवा, काशीचा स्वाद, काशीची संस्कृती आणि काशीचे संगीत... जी-20 साठी जे-जे पाहुणे काशीमध्ये आले, ते या आपल्या सर्व आठवणी बरोबर घेऊन गेले आहेत. मला असे वाटते की, जी-20 ला मिळालेले हे अद्भुत यश महादेवांच्या आशीर्वादानेच शक्य झाले आहे.

 

मित्रांनो,

बाबांच्या कृपेमुळे काशी आता विकासाचे असे काही विक्रम तयार करीत आहे की, ते अभूतपूर्व म्हणावे लागतील. तुम्हा मंडळींनाही असेच वाटते ना? तुम्ही बोलला तरच माहिती होवू शकेल. मी जे काही सांगतोय, ते खरे वाटतेय ना? तुम्हीही झालेले परिवर्तन पाहताय ना? काशी चमकतेय ना? जगामध्ये काशीचा नावलौकिक वाढतच चालला आहे.

 

मित्रांनो,

आजच मी बनारससाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा शिलान्यास केला आहे. आणि आताच मला उत्तर प्रदेशातील 16 अटल निवासी विद्यालयांचे लोकार्पण करण्याची संधीही मिळाली. या सर्व कामगिरीसाठी मी काशवासियांचे खूप-खूप अभिनंदन करतो. उत्तर प्रदेशच्या लोकांचे मी अभिनंदन करतो. माझ्या श्रमिक परिवारांचे अभिनंदन करतो.

 

माझ्या कुटुंबियांनो,

2014 मध्ये ज्यावेळी मी इथे आलो होतो, त्यावेळी मी ज्या काशीची कल्पना केली होती, विकास आणि वारसा यांचे जे स्वप्न मी पाहिले होते, ते आता हळूहळू साकार होत आहे. दिल्लीमध्ये कामांमध्ये व्यग्र असतानाही मध्येच मी काशी  संसद  सांस्कृतिक महोत्सवाचा हा आपला कार्यक्रम सुरू झाला आणि मी पाहिले की, या कार्यक्रमामध्ये खूपच मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले आहेत. त्यामुळे मी कधी रात्री उशिरा पोहोचल्यानंतरही मी रात्रीही पाच दहा मिनिटे वेळ काढून व्हिडिओ पाहून घेत होतो. महोत्सवामध्ये नेमके काय सुरू आहे? हे जाणून घेत होतो. आणि मी पाहिले की, तुम्ही सर्वांनी जे कार्यक्रम सादर केले, ते अतिशय प्रभावित करणारे होते. अद्भूत संगीत, आणि त्याचे अद्भूत सादरीकरण! मला अभिमान वाटतो की, सांसद सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून मला या क्षेत्रातील, या भूमीतील इतक्या प्रतिभावंत लोकांबरोबर थेट जोडण्याची संधी मिळाली. आणि आता तर या आयोजनाचे हे पहिलेच वर्ष आहे. परंतु तरही यामध्ये जवळपास 40 हजार लोकांनी, कलाकारांनी भाग घेतला. आणि लाखो प्रेक्षक प्रत्यक्ष रूपात या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी येथे आले. मला विश्वास आहे की, बनारसच्या लोकांच्या प्रयत्नांमुळे, आगामी वर्षांमध्ये हा सांस्कृतिक महोत्सव आपोआपच काशीची एक वेगळी ओळख बनेल. याचे सामर्थ्य इतके वाढणार आहे की, प्रत्येकजण या महोत्सवाविषयी लेखन करेल आणि त्यामध्ये नमूद करेल की, मी या महोत्सवामध्ये अमूक स्पर्धेत भाग घेतला होता. मी अमूक एका स्पर्धेत पारितोषिक मिळवले होते. आणि दुनियाही असे विचारेल की, ‘‘ हो का, तुम्ही या महोत्सवामध्ये बक्षीस मिळवले आहे म्हणजे मग, तुमची मुलाखत वगैरे घेण्याचीच गरज नाही, असे घडणार आहे.’’ देश-दुनियेतल्या पर्यटकांसाठी आपली काशी आकर्षणाचे एक नवीन केंद्रही बनेल, हे नक्की आहे.

 

माझ्या कुटुंबियांनो,

काशी आणि संस्कृती, एकाच गोष्टीचे, एकाच ऊर्जेचे दोन नावे आहेत. तुम्ही या दोन गोष्टी वेगवेगळ्या करूच शकणार नाही. आणि काशीला तर देशाची सांस्कृतिक राजधानी असल्याचा गौरव मिळाला आहे. आणि काशीच्याा गल्ली-बोळांमध्ये गीताचे स्वर ऐकू येतात. आणि ही गोष्ट स्वाभाविकही आहे. कारण ही नटराजाची नगरी आहे. आणि सर्व नृत्य कला नटराजाच्या तांडवातूनच प्रगट झाली आहे. सगळे स्वर महादेवाच्या डमरूतून उत्पन्न झाले आहेत. सर्व कला प्रकारांचा जन्मही बाबांच्या विचारातून झाला आहे. याच कला आणि विधांना भरत मुनींसारख्या आचार्यांनी पुढे व्यवस्थित आणि विकसित केल्या. आणि काशीचा अर्थ ‘सात वार -नऊ सण,उत्सव’ या ‘सात वार -नऊ सण,उत्सव’ वाल्या माझ्या काशीमध्ये कोणताही उत्सव गीत -संगीताशिवाय पूर्णच होवू शकत नाही. मग तुम्ही घराच्या  बैठकीमध्ये असा अथवा बाजेवरती ‘बुढवा मंगल’, ‘भरत मिलाप’ असो किंवा ‘नाग नथैया’ , ‘संकटमोचन’चा संगीत कार्यक्रम असो. देव दीपावलीच्या वेळी तर इथे सर्व काही सूरांमध्ये समावलेले असते.

 

मित्रांनो,

काशीमध्ये शास्त्रीय संगीताची जितकी गौरवशाली परंपरा आहे, तितकेच अद्भूत इथले लोकगीतही आहेत. इथे तबलाही आहे, इथे शहनाई आणि सतारही वाजवली जाते. काशीमध्ये सारंगीचे सूरही उमटतात,  इथे वीणावादन ही खूप केले जाते. ख्याल, ठुमरी, दादरा, चैती आणि कजरी अशा कितीतरी प्रकारच्या गानकलांना बनारस शहरांने अनेक युगांपासून जतन करून ठेवले आहे. या पिढीकडून पुढच्या पिढीकडे असे अनेक परिवारांनी, गुरू-शिष्य परंपरेने भारताचा हा मधुर आत्मा जीवित ठेवला आहे. बनारसचे तेलिया घराणे, पियरी घराणे, रामापुरा कबीर चौरा मोहल्ल्यातील संगीतज्ञ, हा वारसा कितीतरी समृद्ध आहे. अशा सर्व कला प्रकारांचे नाव घ्यायला मी प्रारंभ केला तर कदाचित कितीतरी दिवस असेच निघून जातील. कितीतरी  विश्वप्रसिद्ध असलेल्या कलाकारांची नावे आपल्यासमोर घेता येतील. माझे भाग्य म्हणजे, मला बनारसच्या अशा अनेक सांस्कृतिक आचार्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्याबरोबर वेळ व्यतित करण्याचे भाग्य मिळाले आहे.

 

मित्रांनो,

आज इथे काशी सांसद क्रीडा स्पर्धेच्या  पोर्टलचाही प्रारंभ करण्यात आला आहे. सांसद क्रीडा स्पर्धा असो, सांसद सांस्कृतिक महोत्सव असो, काशीमध्ये नवीन परंपरांची ही तर आत्ता कुठे सुरूवात झाली आहे. आता इथे काशी सांसद ज्ञान स्पर्धेचेही आयोजन करण्यात येईल. प्रयत्न असा असणार आहे की, काशीचा इतिहास, इथला समृद्ध वारसा, इथले सण-उत्सव, इथे असलेली भोजनाविषयीची जागरूकता अधिक वाढली पाहिजे. सांसद ज्ञान स्पर्धाही बनारसच्या शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये वेग-वेगळ्या स्तरावर आयोजित केली जाणार आहे.

 

मित्रांनो,

काशीविषयी सर्वात जास्त काशीचेच लोक सर्वकाही जाणून असतात. आणि इथला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक परिवार, ही मंडळी ख-या अर्थाने काशीचे  एक ब्रॅंड अॅम्बेसेडर आहे. मात्र, त्याच्याच जोडीला एक गोष्ट करणे जरूरीचे आहे. याला कारण म्हणजे, सर्व लोक काशीविषयी आपल्याला असलेली सर्व माहिती चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. आणि, म्हणूनच  देशामध्ये पहिल्यांदाच माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे. इथे ती गोष्ट सुरू करावी का? आता तुम्हा  सर्वाची मदत त्यासाठी मिळेल का? तुम्हा लोकांना मी कशाविषयी बोलणार आहे, याबद्दल काहीच माहिती नाही, तरीही ही गोष्ट मी आज इथे सांगणार आहे. असे आहे पहा, पर्यटकांची जिथे खूप गर्दी असते, ज्याठिकाणी लोक यात्रा धाम करायला जातात,  असे कोणतेही स्थळ घ्या. पर्यटनाचे स्थान असलेल्या  प्रत्येक ठिकाणी आजच्या काळात चांगला गाईड, वाटाड्या असणे खूप आवश्यक असते. आणि तो गाईड, चांगला ज्ञानी, प्रतिभावंत असला पाहिजे. त्याच्याकडे जी माहिती आहे, ती अचूक असली पाहिजे. पर्यटकांना कोणत्याही प्रकारे गोलमाल  करणारा गाईड अजिबात नको. एक गाईड पर्यटकांना सांगतो की, या वास्तूला दोनशे वर्ष झाली आहेत, तर दसरा गाईड सांगतो की, ही वास्तू अडीचशे वर्ष जुनी आहे, तर तिसरा, ही वास्तू तीनशे वर्षांची जुनी आहे म्हणजे  या वास्तूला तीनशे वर्ष झाली आहेत. असे सगळे गाईड वेगवेगळे बोलून कसे काय चालेल? पर्यटनामध्ये असे अंदाजे बोलून चालणार नाही. जर वास्तू  240 वर्षांची असेल तर, 240 हाच आकडा सर्वांनी सांगितला पाहिजे. अशी ताकद काशीमध्ये तयार झाली पाहिजे. आणि आजच्या काळात टुरिस्ट गाईडलाही एक खूप मोठा रोजगार मिळत आहे. कारण जे पर्यटक येतात, त्यांना सर्व गोष्टी, समजून घ्यायच्या असतात. आणि ते गाईडना पैसेही देवू इच्छितात. आणि म्हणूनच माझी एक इच्छा आहे आणि मी त्यासाठी प्रयत्न करत आहे. आता इथे काशी सांसद महोत्सवामध्ये टुरिस्ट गाईड संबंधी एखादी स्पर्धाही आयोजित करता येईल. तुम्ही गाइड बनून यावे आणि लोकांना आपल्या इथल्या स्थानांची माहिती समजावून सांगा आणि बक्षीस मिळवा. यामुळे लोकांना माहिती होईल की, या शहरामध्ये गाइडची संस्कृती तयार होत आहे. आणि मला हे काम व्हावे, असे वाटते, याचे कारण म्हणजे माझ्या काशीचा संपूर्ण दुनियेमध्ये डंका वाजला गेला पाहिजे. आणि मला असेही वाटते की, संपूर्ण दुनियेमध्ये जर कोणी गाइडविषयी चर्चा करीत असेल तर त्यावेळी सर्वांनी काशीच्या गाईडचे नाव सर्वाधिक सन्मानाने घ्यावे.  सर्व काशीवासियांना मी आवाहन करू इच्छितो की, तुम्ही सर्वांनी यासाठी आत्तापासूनच तयारी सुरू करावी. आणि या कामामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घ्यावा.

 

माझ्या कुटुंबियांनो,

आपले वाराणसी अनेक युगांपासून शिक्षणाचे एक मोठे केंद्र आहे. वाराणसीच्या शैक्षणिक यशाचा सर्वात मोठा आधार आहे इथला सर्व समावेशक स्वभाव! देश आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे अभ्यास करण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी येतात. आजही जगातील कितीतरी देशातून लोक इथे संस्कृत शिकण्यासाठी, ज्ञान घेण्यासाठी येतात. आज आपण याच भावनेला केद्रस्थानी ठेवून इथे अटल निवासी विद्यालयांचा शुभारंभ केला आहे. आज ज्या अटल निवासी विद्यालयांचे लोकार्पण करण्यात आले आहे, त्यांच्या उभारणीसाठी अकराशे कोटी रूपये खर्च केले आहेत. आणि या शाळा अतिशय भव्य आहेत. या शाळांमध्ये आमच्या श्रमिकांची, इथे मजुरी करणारे जे लोक आहेत, आणि समाजातील सर्वात दुर्बल घटकातील मुले-मुली  शिकण्याचे काम करणार आहेत. ही विद्यालये त्यांच्यासाठीच बनविण्यात आली आहेत. त्यांना इथे चांगले शिक्षण, संस्कार मिळतील. अत्याधुनिक शिक्षण मिळेल. ज्या लोकांचा कोरोना काळात दुःखद अंत झाला, त्यांच्या मुलांनाही या निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण दिले जाईल. मला  असे सांगण्यात आले आहे  की, ज्या लोकांचा कोरोना काळात दुःखद अंत झाला, त्यांच्या मुलांनाही या निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण दिले जाईल. या शाळांमध्ये अभ्यासक्रमाबरोबरच संगीत, कला, हस्तकला, संगणक आणि क्रीडा या विषयांचेही शिक्षक असतील. याचा अर्थ गरीबांची मुले  आता चांगल्यात चांगले शिक्षण घेण्याचे, सर्वांगीण शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतील. आणि केंद्र सरकारच्या वतीने आम्ही अशाच पद्धतीने आदिवासी समाजातील मुलांसाठी एकलव्य निवासी शाळा बनविल्या आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेला जुन्या विचारातून बाहेर काढून परिवर्तन करण्यात आले आहे. आता आमच्या शाळा आधुनिक बनत आहेत. स्मार्ट वर्ग तयार केले जात आहेत. भारत सरकारने देशातील हजारों शाळांना आधुनिक बनविण्यासाठी पीएम-श्री अभियानही सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत देशातील हजारों शाळा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त बनविल्या जात आहेत.

 

मित्रांनो,

काशीमध्ये खासदार म्हणून जे नवीन कार्यक्रम सुरू होत आहेत, त्या सर्वांमध्ये मला तुम्हा मंडळींकडून खूप मोठे सहकार्य मिळत आले आहे. या ज्या अटल निवासी शाळा आहेत ना, यांचे बांधकाम करणारे जे श्रमिक, मजूर आहेत, ते कधी या गावांतून दुस-या गावांमध्ये काम करायला जातात. त्यामुळे मुलांचे शिक्षण राहून जाते, त्यांची शाळा सुटते. मात्र त्यासाठी एक वेगळे बजेट ठेवले जाते. वास्तविक ज्यावेळी मुलांचे शिक्षण, शाळा सुटणे हा या श्रमिकांच्या दृष्टीने चिंतेचा विषय असतो. आता तुम्ही पहा तत्कालीन राजकीय लाभ घेण्याचा ज्यांचा इरादा नसतो, ज्यांना स्वार्थभाव नसतो, ते कसे काम करतात ते तुम्ही लक्षात घ्या. आणि ज्यांच्या डोक्यामध्ये फक्त निवडणूक हाच विचार असतो,  कशाही पद्धतीने मते जमा करण्याचा खेळ खेळण्याची ज्यांना सवय असते, ते हा वेगळा ठेवलेला निधी कसा वाया घालवतात, ही गोष्ट तुम्ही जाणून घेवू शकता. हा पैसा सर्व राज्यांकडे असतो आणि भारत सरकारने त्यांना पूर्ण सवलत दिली आहे. मात्र बहुतेक राज्यांनी मते कमावण्याच्या कामासाठी त्या पैशाचा वापर केला आहे. याविषयी  योगी जी आणि माझी चर्चा खूप आधी झाली होती. परंतु त्यांनी ही गोष्ट मनामध्ये जणू नोंदवून ठेवली होती. आणि आज हा प्रकल्प आकाराला आला. आता या शाळांमध्ये सर्व श्रमिकांची मुले इतक्या चांगल्या पद्धतीने तयार होतील की, त्या परिवाराला पुन्हा मजुरी करण्याची वेळच येणार नाही. आत्ताच मी अटल निवासी विद्यालयांच्या काही मुलांना भेटून आलो. श्रमिकांच्या कुटुंबातील ही मुले होती. त्यांनी पक्के घरही कधी पाहिले नव्हते. परंतु इतक्या कमी काळामध्ये त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला मी पाहिला. या मुलांच्या सर्व शिक्षकांचे मी अभिनंदन करतो. ज्या आत्मविश्वासाने ही मुले बोलत होती, आणि पंतप्रधानांबरोबर  ज्याप्रकारे बोलत होते, असे काही प्रश्न विचारत होते ते कौतुकास्पद वाटले. मी काही त्यांचा अभ्यास वाचून आलो नव्हतो. या मुलांना पाहिल्यावर लक्षात आले, या मुलांमध्ये एक ‘स्पार्क‘ आहे, त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे. मित्रांनो, मला पूर्ण विश्वास आहे, दहा वर्षांच्याच या शाळांमधील प्रतिभेतून उत्तर प्रदेशचा आणि काशीचा अभिमान, गौरव आणि प्रतिष्ठा उजळून निघणार आहे.

 

माझ्य प्रिय काशीवासियांनो

माझ्यावर आपला आशीर्वाद असाच कायम ठेवावा. या भावनेबरोबरच आपल्या सर्वांना खूपखूप धन्यवाद!

हर हर महादेव !!

 

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
India's Q3 GDP grows at 8.4%; FY24 growth pegged at 7.6%

Media Coverage

India's Q3 GDP grows at 8.4%; FY24 growth pegged at 7.6%
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
West Bengal CM meets PM
March 01, 2024

The Chief Minister of West Bengal, Ms Mamta Banerjee met the Prime Minister, Shri Narendra Modi today.

The Prime Minister’s Office posted on X:

“Chief Minister of West Bengal, Ms Mamta Banerjee ji met PM Narendra Modi.”