PM Narendra Modi inaugurates India’s largest cheese factory in Gujarat
Along with ‘Shwet Kranti’ there is also a ‘Sweet Kranti’ as people are now being trained about honey products: PM
Merely talking about the poor is different from working for the poor, something that the NDA government is always doing: PM
I urge you all to integrate people with e-banking, e-wallets: PM
India wants to progress. Corruption and black money is slowing our progress and adversely affecting the poor. These evils have to end: PM
These games of looting the poor and exploiting the middle classes will now be history: PM

व्‍यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्‍यवर आणि बनासकांठाचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो,

आपल्‍याला वाटत असेल आपले नरेंद्रभाई हिंदीमध्‍ये का बोलत आहेत?

अरे देशालाही समजलं पाहिजे की, बनासकांठाचे शेतकरी कसे काम करतात. या मरुभूमीमध्‍ये ‘जान’ भरण्‍याची ताकद जर कोणामध्‍ये आहे, तर ती बनासकांठाच्‍या शेतकऱ्यांमध्‍ये आहे. उत्‍तर गुजरातच्‍या शेतकऱ्यांमध्‍ये आहे. हा शेतकरी आपला घाम गाळून जमिनीमध्‍ये प्राण आणतो. आणि म्‍हणूनच देशाला समजले पाहिजे, की बनासकांठा जिल्‍हा हा पाकिस्‍तानच्‍या सीमेवर आहे, तिथे पाणी नाही, तिथे पाऊस पडत नाही, वाळवंटी प्रदेशातील कोरडे जीवन जगत असतानाही केवळ आपल्‍या पराक्रमाने, पुरुषार्थने आपले भाग्‍य कशा पद्धतीने बदलू शकतो, याचे हे जिवंत उदाहरण म्‍हणजे या जिल्‍ह्याचे नागरिक आहेत; त्‍यांचा पुरुषार्थ आहे आणि त्‍यांचे यश आहे.

बंधू आणि भगिनींनो, गेल्‍या 25 – 27 वर्षांनतर कोणी पंतप्रधान बनासकांठा जिल्‍ह्यात आला आहे, अशी माहिती मला सांगण्‍यात आली. बंधू आणि भगिनींनो, मी आपल्‍यामध्‍ये पंतप्रधान म्‍हणून आलो नाही, तर या भूमीचा पुत्र म्‍हणून आलो आहे. या मातीने मला लहानाचे मोठे केले आहे आणि आज मी इथे खास कारणासाठी आलो आहे. श्रद्धेय गलबाभाईंना, त्‍यांच्‍या तपस्‍येला नमन करण्‍यासाठी आलो आहे. लाखों पशु-प्राणी यांच्‍यावतीने, लाखो परिवारांच्‍यावतीने बनासकांठाच्‍या उजाड भूमीच्‍यावतीने मी आज गलबाभाई यांच्‍या शताब्‍दी कार्यक्रमाच्‍या प्रारंभी त्‍यांना शत शत नमन करतो. या सगळ्यांच्‍यावतीने नमन करतो.

आपण कल्‍पना करा, 50 वर्षांपूर्वी गलबाभाई यांचे वय 50 वर्षे होते. त्‍यावेळी त्‍यांनी आठ छोट्या छोट्या दूध मंडळांपासून कामाला प्रारंभ केला. आणि आज शेतकऱ्यांच्‍या सहकार्याने, परिश्रमाने आणि त्‍यातही बनासकांठाच्‍या उत्‍तर गुजरातच्‍या माझ्याच माता-भगिनींच्‍या पुरुषार्थामुळे; ज्‍यांनी पशुपालनाला परिवारच्‍या सेवेचा भाग बनवले, त्‍यांनी श्‍वेतक्रांती आणली. आज बनास दुग्‍धालयाची सुवर्णजयंती आहे. एक असा सुयोग आहे की, या महान आंदोलनाचे जनक, श्वेतक्रांतीचे जनक गलबाभाई यांची शताब्‍दी आणि दुसऱ्या बाजूला त्‍यांच्‍याच हातून लावल्‍या गेलेल्‍या रोपट्याचे, आठ मंडळांपासून सुरू झालेल्‍या या छोट्या रोपाचा आज बनास दुग्‍धालयाच्‍या रूपामध्‍ये वटवृक्ष बनला आहे. त्‍याची सुवर्ण जयंती आज आहे. आणि म्‍हणूनच या 50 वर्षामध्‍ये ज्‍या ज्‍या महानुभावांनी या बनास दुग्‍धालयाला चालवलं, पुढे नेले, या उंचीवर आणून ठेवले, अनेक अध्यक्ष होऊन गेले असतील, अनेक व्‍यवस्‍थापक येऊन गेले असतील, अनेक कर्मचारी असतील, या 50 वर्षाच्‍या प्रवासात ज्‍यांनी ज्‍यांनी योगदान दिले, त्‍या सर्वांचे मी आज अगदी हृदयापासून, मनापासून अभिनंदन करतो, त्‍यांचे आभार व्‍यक्‍त करतो.

बंधू, भगिनींनो, आपण मुंबईत जा, सुरतला जा किंवा इतर कोणत्‍याही भागात गेलात तर अतिशय कठीण परिस्थितीमध्‍ये जीवन जगण्‍यासाठी गुजरातमधून कोण आले आहे, याची माहिती घेतली की समजायचे कच्‍छ आणि बनासकांठाचे लोक आपले गाव, आपला प्रदेश, सोडून रोजी-रोटी कमविण्‍यासाठी बाहेर जात होते. याला कारण म्‍हणजे येथे कमाईसाठी कोणतीच संसाधने नव्‍हती. आणि बंधू, भगिनींनो, आम्‍ही आधीपासूनच सांगत होतो की, एकदा का माता नर्मदा नदीने येऊन आमच्‍या या बनासच्‍या भूमीला स्‍पर्श केला, येथे खळाळळी, तर माझा शेतकरी बंधू या मातीचे सोने बनवून दाखवेल. आज त्‍यानेच बनासच्‍या या दुष्‍काळी भूमीला, या वाळवंटी जमिनीला सोन्‍यामध्‍ये बदलवून टाकले आहे.

मला अगदी चांगले आठवते, मी ज्‍यावेळी नव्‍याने मुख्‍यमंत्री झालो होतो, त्‍यावेळी अनेक प्रश्नचिन्‍ह माझ्याबद्दल लावले जात होते. हे मोदी! मुख्‍यमंत्री म्‍हणून काय करणार! यांनी तर कधी गावाचे सरपंच म्‍हणून काम केले नाही. कधी निवडणूक नाही लढवली, यांना काय येणार? खूप चेष्‍टा केली जात होती. त्‍यावेळी सर्वात प्रथम माझा सार्वजनिक कार्यक्रम डिसामध्‍ये झाला होता. या भूमीवर झाला होता. याच मैदानावर झाला होता. तो होता कल्‍याण मेळावा आणि त्‍या दिवशी मी जे चित्र पाहिले होते, त्‍यापेक्षा आज कितीतरी पट मोठे चित्र माझ्या नजरेसमोर दिसत आहे.

बंधू , भगिनींनो , बनासकांठाचे शेतकरी माझ्यावर खूप नाराज असायचे, त्‍यांना माझा खूप राग येत होता. कधी कधी तर त्‍यांनी माझे पुतळेही जाळले. मी पुन्‍हा मोठ्या हिंमतीने त्‍यांच्‍यामध्‍ये मिसळत होतो. मी त्‍यांना सांगत होतो, बनासकांठाचे भाग्‍य बदलायचे असेल तर आपल्‍याला पाणी वाचवले पाहिजे. विजेच्‍या तारा सोडल्‍या पाहिजेत. शेतकऱ्याला वीज नाही तर पाणी पाहिजे. ही गोष्‍ट मी त्‍या काळात सांगत होतो आणि नाराजी मोहुन घेत होतो. परंतु माझे सौभाग्‍य म्‍हणजे याच बनासकांठाच्‍या लोकांनी, शेतकऱ्यांनी माझे म्‍हणणे ऐकले, त्‍याचे मर्म समजले. आणि आज ठिबक सिंचनमध्‍ये, तुषार सिंचनामध्‍ये संपूर्ण गुजरातमध्‍ये क्रमांक एकवर आणले आहे. त्‍यांनी केवळ आपलेच भाग्‍य बदलले असे नाही, तर त्‍यांनी येणाऱ्या अनेक पिढ्यांचेही भाग्‍य बदलले आहे.

माझ्या स्‍मरणात आहे, 2007 किंवा 08 हे वर्ष असेल, अशाच एका शेतकऱ्याच्‍या कार्यक्रमाला मी बनासकांठाला आलो होतो. आमचे एक मि‍त्र गेनाजी आहेत, ते दिव्‍यांग आहेत. गेनाजी आमच्‍या लाखनी तहसीलचे आहेत. गेनाजी चालू तर शकत नाहीत, परंतु ते खूप चांगले प्रगतिशील शेतकरी आहेत. इतके मोठे डाळींब मला भेट देण्‍यासाठी घेवून आले होते. डाळींब नारळाच्‍या आकारा इतके मोठे होते. मी हैराण झालो. त्‍यांना विचारले, भाई ही कमाल कशी केलीत तुम्‍ही? तर ते म्‍हणाले, आज तर माझ्या शेतात सगळ्या जिल्‍ह्यातून लोक डाळींब पाहण्‍यासाठी येत आहेत. हळूहळू डाळींबाच्‍या शेतीमध्‍ये बनासकाठा सर्वांच्‍या पुढे जाणार हे नक्‍की. एका गावातून आलेले गेनाजी सरकारी नोकरी करणारे आहेत, आले असतील, इथे बसले असतील. आमचे गेनाजी इथे-तिथे असतील, पण त्‍यांनी किती कमाल केली आहे, हे लक्षात घ्‍या. बंधू, भगिनींनो, बनासकांठाच्‍या शेतकऱ्याने प्रगतिशील शेतकरी म्‍हणून आपली मोहर उठवली आहे. आणि असे एक- दोन शेतकरी नाहीत, तर एक आंदोलन उभे राहिले आहे. आज बनासकांठाच्‍या शेतकऱ्यांनी प्रति हेक्‍टर बटाट्याचे जे विक्रमी पिक घेतले आहे, तो विक्रम अद्याप कोणी मोडू शकला नाही. असे काम बनासकांठाने करून दाखवले आहे. आज बनासकांठाची ओळख बटाट्यामुळेही बनली आहे.

बंधू, भगिनींनो, शेतकऱ्यासाठी काही गोष्‍टी वरदान असतात. गलबाभाई यांनी ज्‍यावेळी दुग्‍धालयाचे काम सुरू केले, त्‍यावेळी येथे पाणी नव्‍हते, वाळवंट होते. दहा वर्षात सात वेळा दुष्‍काळ पडत होता; जिथे शेतकरी ईश्‍वराच्‍या इच्‍छेवर आयुष्‍य क‍ंठत असतो, अशावेळी त्‍याला आत्‍महत्‍या हा एकच रस्‍ता शिल्‍लक राहतो. परंतु या जिल्‍ह्याच्‍या शेतकऱ्यांनी पशुपालनाचा मार्ग स्‍वीकारला. दुग्‍धपालनाचा मार्ग पत्‍करला. आणि‍ पशुंची सेवा करत करत, दुग्‍ध क्रांती करत करत आपल्‍या परिवाराचे भरण पोषण केले. मुलांनाही शिकवले. आणि जीवनात प्रगती केली.

बंधू, भगिनींनो, श्‍वेतक्रांतीचे नेत़ृत्‍व करणारा हाच बनासकांठा, हाच गुजरात आहे. आज मला खूप आनंद होतोय की, बनास दुग्‍धालयाने श्‍वेतक्रांतीच्‍या बरोबरीने मधूर क्रांतीचेही बिगूल वाजवले आहे. जिथे श्‍वेतक्रांती झाली तिथेच आता मधूर क्रांतीही होणार आहे. ‘मधूक्रांती’ करण्‍यासाठी बनासने मध गोळा करण्‍याची दुग्‍धालयासारखी व्‍यवस्‍था केली आहे. शेतकऱ्यांना मधासाठी मधमाशी पालनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. आज या मधापैकी आलेल्‍या पहिल्‍या मधाचे पॅक तयार करून त्‍यांनी बाजारात विक्रीसाठी ठेवला आहे. मला पूर्ण खात्री आहे, गुजरातमध्‍ये दुधाच्‍या विक्रीचे जाळे आहे, बहुतेक सर्व जिल्‍ह्यांमध्‍ये असे जाळे आहे. शेतकऱ्यांनी समित्‍या बनवल्‍या आहेत. दुधाबरोबरच शेतामध्‍ये मधमाशांचे पालन करणे शेतकऱ्यांना शक्‍य होणार आहे. दूध भरायला जातात, तसे मध भरायला जाता येणार आहे. दूधाबरोबर मध घेऊन जातील. दुग्‍धालयाच्‍या गाडीत दूधही जाईल आणि मधही जाईल. जास्‍त नफा, जास्‍त फायदा, अतिरि‍क्‍त कमाईचा नवा रस्‍ता, गुजरातची दुग्‍धालये, सर्व शेतकरी, या नव्‍या मार्गाने जावून श्‍वेतक्रांतीच्‍या बरोबर मधूक्रांती आणू शकतात, असा माझा विश्‍वास आहे. जगात मधाला खूप मागणी आहे. मधाला खूप मोठी बाजारपेठ आहे. जर आपण मधाच्‍या व्‍यवसायामध्‍ये प्रगती केली आणि आता नर्मदेचे पाणीही येत आहे, त्‍याचा लाभ मिळणार आहे. नर्मदेच्‍या परिसराला तर तिच्‍या पाण्‍याचा खूप मोठ्या प्रमाणावर लाभ होत आहे. खतांच्‍या वापराची पद्धती बदलण्‍याची आवश्‍यकता आहे. या गोष्‍टी केल्‍या तर खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. बनासकांठाच्‍या शेतकऱ्यांचे मन जसे बदलले आहे, तसाच हा मोठा बदल होऊ शकतो, असा माझा विश्‍वास आहे.

आज बनास दुग्‍धालयाने अमूल ब्रँडच्‍याबरोबर चीझचे उत्‍पादन करण्‍याचा प्रकल्‍प सुरू केला आहे. गुजरातमध्‍ये जितकी दुग्‍धालये आहेत, ती सर्व चीझच्‍या कामामुळे चालतात. आपल्‍याला नवल वाटेल पण जगभरामध्‍ये अनेक देशांमध्‍ये अमूल ब्रँडच्‍या चीझला मागणी आहे. जितके उत्‍पादन होते, तितक्‍याला लगेच मागणी आलेली असते. ग्राहक मिळतात. आज यामध्‍ये बनास दुग्‍धालयाची वाढ झाली आहे. मी त्‍यांचे अभिनंदन करतो. एका गोष्‍टीमध्‍ये दुग्‍धालयाने पुढाकार घेतला आहे. कांक्रेच जातीच्‍या गाईचे मूल्‍य आपण सगळे जाणतोच. वैज्ञानिकांनीही गिरच्‍या कांक्रेच गाईंचे महात्म्य मान्‍य केले आहे. आता ‘ए2’ दूध या कांक्रेच गाईची विशेषता आहे. या विशेषतत्‍वाचे त्‍यांनी बाजारपेठेतील महत्‍व ओळखून त्‍यांनी बाजारपेठेत उत्‍पादन आणले आहे. जे लोक आरोग्‍याविषयी जागरूक आहेत, जिथे लहानमुलांमध्‍ये कुपोषणाची समस्‍या आहे, अशा मुलांना ‘ए2 दूध, कांक्रेच गाईचे ‘ए2दूध’ त्‍यांच्‍या आरोग्‍यासाठी उपकारक ठरणारे आहे. अशा एका भगीरथ कार्याचा आज येथे प्रारंभ झाला आहे. येथे कांक्रेच जातीच्‍या गायींची पैदास जास्‍त व्‍हावी यासाठी प्रोत्‍साहन देण्‍याची गरज आहे. हे लक्षात घेवून त्‍यामध्‍ये सुधारणा करणे, त्‍यांची क्षमता वाढवणे, त्‍यांची दरडोई दूध उत्‍पादन क्षमता वाढविणे यासाठीही वैज्ञानिक प्रयोग सुरू आहेत.

मी बनासमध्‍ये आलो आहे, तर बनास दुग्‍धालयाने एक काम करावे असे मला वाटते. आणि ते हे काम करू शकतात. बनास असो, सांभर असो, दुग्‍धसागर असो; अगदी तिघेही मिळून करू शकतात. आपल्‍याकडे एरंडाची शेती केली जाते. मात्र एरंड आपण खूप स्‍वस्‍तात विकून टाकतो. आपल्‍याकडे 80टक्‍के शेती एरंडाची होती मात्र त्‍याच्‍या मूल्‍यवर्धनाचा विचार केला जात नाही. एरंडावर प्रक्रिया केली तर त्‍याचे दाम खूप मोठ्याप्रमाणावर वाढू शकते, याचा विचार आपण करत नाही. संपूर्ण दुनियेमध्‍ये सर्वात महत्‍वपूर्ण तंत्रज्ञान कोणते आहे, तर स्‍पेस शटलचे तंत्रज्ञान, हे तंत्रज्ञान एरंडाच्‍या तेलाने बनलेल्‍या गोष्‍टींमुळे यश्‍स्‍वी होते. परंतु आपण मात्र आपल्‍याकडे अमर्याद पिकणाऱ्या एरंडाला असेच मातीमोलाने विकून टाकतो. आता या बनास, सांभर आणि दूग्‍धसागर यांनी मिळून एक संशोधन केंद्र बनवावे. आणि आपण, आमच्‍या शेतकऱ्यांनी जो एरंड पिकवला आहे, त्‍यामध्‍ये मूल्‍यवर्धन कसे होऊ शकेल हे पहावे. आमची बहूमूल्‍य संपत्‍ती पाण्‍याच्‍या भावाने, अगदी बेभाव बाहेर जाते,ती वाचवली पाहिजे.

दुसरे आहे ईसबगोल. इसबगोलची क्षमता खूप खूप मोठी आहे. यामध्‍ये खूप मोठ्याप्रमाणावर मूल्‍यवर्धन होऊ शकते. ज्‍यावेळी कुरियन जिवंत होते, त्‍यावेळी कुरियन यांना मी इसबगोलवर मूल्‍यवर्धनासाठी काम करावे असे सांगितले होते. त्‍यांनी प्रारंभही केला होता. इसबगोलचे त्‍यांनी आईसक्रिम बनवले होते. आणि त्‍याला ‘इसबकूल’ असे नाव दिले होते. आनंदमध्‍ये त्‍यावेळी कामाला प्रारंभ झालाही होता. इसबगोलला खूप मोठी जागतिक बाजारपेठ आहे. त्‍यामुळे याविषयावर जर अगदी शास्‍त्रशुद्ध पद्धतीने काम आपण केले तर खूप चांगला आणि मोठ्याप्रमाणावर बदल घडून येउू शकतो. आणि आपल्‍याला हा बदल केलाही पाहिजे.

बंधू, भगिनींनो, सध्‍याच्‍या दिवसात संपूर्ण देशात नोटांचे काय होणार अशी चर्चा सुरू आहे. आता तुम्‍ही मला सांगा, 8 तारखेच्‍या आधी 100च्‍या नोटेला काही किंमत होती का? 50च्‍या नोटेला काही किंमत होती का? छोट्यांना कोणी विचारत होत का? प्रत्‍येकजण फक्‍त मोठ्यांनाच विचारत होते. हजार, पाचशे; हजार, पाचशे; हजार, पाचशे. आठ तारखेनंतर देशात 100चे मूल्‍य कसे वाढले पाहा. कशी ताकद वाढली, जणू नवीन प्राण आले.

बंधू ,भगिनींनो, जसे आठ तारखेपूर्वी फक्‍त बड्या बड्यांनाच विचारले जात होते, तसेच हजार, पाचशेची मोजदाद केली जात होती. 20, 50, 100 यांना कुणी विचारतही नव्‍हतं, छोट्यांकडे कोणी पहातही नव्‍हतं. आठ तारखेनंतर आता मोठ्यांकडे कुणी पाहत नाही आणि बंधूनो छोटे घ्‍यायला तयार आहेत आता. हा फरक आता दिसून येतोय. आणि मोठी नोट नाही तर छोट्या नोटेची ताकद वाढली आहे. मोठे लोक नाही तर छोट्या लोकांची ताकद वाढविण्‍यासाठी हा खूप मोठा निर्णय मी घेतला आहे. देशाचा गरीब नागरिक, देशाचा सामान्‍य माणूस, जशी 100 रूपयाची ताकद वाढली तशीच गरिबाची ताकद वाढवण्‍यासाठी मी हे काम केले आहे. आपण कल्पना करू शकता बंधूंनो, आपण पाहिले असेल, काहीही खरेदी करायला जा, कच्‍चे बिल पाहिजे की पक्‍के बिल पाहिजे, असा प्रश्‍न विचारला जातो. बिल मागितले तर छोटा व्‍यापारी म्‍हणायचा, नाही नाही बिल विल नाही मिळणार, बिल हवे असेल तर दुसऱ्या दुकानात जा. असेच सगळे चालायचे. घर घ्‍यायचे आहे, घरवाला म्‍हणतो चेकमध्‍ये इतके द्यायचे आणि रोखीने इतके द्यायचे. आता हा गरीब माणूस रोख रक्‍कम आणणार कोठून सांगा ?

बंधू ,भगिनींनो, अशाप्रकारे नोटा छापल्‍या गेल्‍या, छापल्‍या गेल्‍या,
छापल्‍या गेल्‍या, आणि देश, त्‍याचे अर्थकारण, सगळे काही या नोटांच्‍या ढिगाऱ्याखली दबले जाऊ लागले. बंधू आणि भगिनींनो, माझी लढाई आहे, दहशतवादाच्‍या विरोधात, दहशतवाद्यांना बनावट नोटांमुळे ताकद मिळते. आणि सीमेपलिकडे काय होते, हे तर आपण सगळेजण जाणतोच. शेजारीच तर राहत आहोत. कोणत्‍या समस्‍यांना सामोरे जावे लागते हे बनासकांठा पाटन जिल्‍ह्याचे लोक जास्‍त जाणतात.

बंधू, भगिनींनो, बनावट नोटांचा कारभार जितका हिंदुस्‍तानात आहे ना, त्‍यापेक्षा जास्‍त गोंधळ देशाबाहेर बनावट नोटा तयार करणारे करीत आहेत. नक्षलवाद, सगळे नवयुवक समर्पण करून परत येत आहेत. प्रत्‍येकाला परतून आता मुख्‍य प्रवाहात सामिल व्‍हायचे आहे. दहशतवाद्यांना जिथून ताकद मिळत होती, ते रस्‍ते सगळे रोखण्‍यात यश मिळाले आहे. या एका निर्णयामुळे बनावट नोटांच्‍या कारभाराची मृत्‍यू घंटा वाजली आहे. भ्रष्‍टाचार, काळापैसा आणि या भ्रष्‍टाचारामुळे आणि काळ्यापैशामुळे कोणाला त्रास होत होता? कोणा बेईमानाला भ्रष्‍टाचारामुळे त्रास होत नव्‍हता की काळ्यापैशामुळे त्रास होत नव्‍हता. अरे एका भ्रष्‍टाचारीला दुसऱ्‍या भ्रष्‍टाचाऱ्‍याला काही द्यावे लागले तर देणारा भ्रष्‍टाचारी फार दु:खी होत नव्‍हता. येथे दु:खी होता तो या देशाचा प्रामाणिक नागरिक दु:खी होता. त्रासलेला होता तो या देशाचा प्रामाणिक नागरिक होता. 70 वर्षे प्रामाणिक लोकांना; 70 वर्षे प्रामाणिक लोकांना, आपण लूटले. आपण त्रास दिला, त्‍याचे जगणे मुश्किल करून टाकले. आज मी ज्‍यावेळी या प्रामाणिक लोकांच्‍या बाजूने उभा आहे तर प्रामाणिक लोकांना भडकावले जातेय. आणि मी मात्र आनंदात आहे. कारण माझ्या देशाच्‍या प्रामाणिक नागरिकांना कोणी कितीही भडकावले तरी सरकारच्‍या या निर्णयाला त्‍यांनी साथ दिली आहे. ते सरकारच्‍या बरोबर आहेत. इतक्‍या महत्‍वाच्‍या कार्यात मला मदत करणाऱ्‍या सव्‍वाशे कोटी जनतेला मी शत शत नमन करतो.

बंधू, भगिनींनो, आजकाल खूप बुध्‍दिवान लोक भाषण देत असतात. मोदींजी आपण इतका मोठा निर्णय घेतला, परंतु त्‍याचा आपल्‍याला या जन्‍मात तरी काहीही लाभ मिळू शकणार नाही. मृत्‍यूनंतर मिळू शकेल. बंधू आणि भगिनींनो, आपल्‍या देशात एक चारबाग नावाचे ऋ‍षी होवून गेले. हे चारबाग ऋषी म्‍हणाले होते, “ऋणम कृत्वा, घृत्‍तम पीवेत’’ याचा अर्थ मृत्‍यूच्‍या नंतर काय होणार आहे, कोणाला माहीत? जी काही मौजमजा करायची आहे ती आताच करून घे. जे काही खायचे असेल तर ते खाऊन घे, तूप पिऊन घ्यायचे आहे का, मग पिऊन घे. आनंदाने जगून घे. या चारबागचे तत्‍वज्ञान हिंदुस्‍थानात कधीच स्‍वीकारले गेले नाही. आमचा देश असा आहे की, घरात वृध्द आई-वडील असतील आणि घरामध्‍ये पैसे कमी असतील तर ते म्‍हणतील, रात्रीच्‍या जेवणात भाजी बनवणे बंद करूया आपण, म्‍हणजे पैसे वाचतील, आणि हेच पैसे आपण मेल्‍यानंतर मुलांना कामाला येतील. आपल्‍या देशात मृत्‍यूनंतर माझे काय होईल अशी चिंता कधीच केली जात नाही. आपल्‍या देशात माझ्यानंतर येणाऱ्‍या पिढीचे भले कसे होईल याचा विचार केला जातो. माझा देश स्‍वार्थी लोकांचा देश नाही. माझा देश सुखाचा विचार करताना केवळ स्‍वत:चा विचार करणारा नाही. माझ्या देशात सुखाचे चिंतन केले जाते त्‍यावेळी भावी पिढीचा विचार आधी केला जातो. आता नवे चारबाग निर्माण झाले आहेत ते “ऋणम कृत्वा, घृत्‍तम पीवेत’’अशा गोष्‍टी बोलतात, त्‍यांना पन्‍नास वेळा विचार करावा लागेल.

बंधू, भगिनींनो, आपण सर्वांनी पाहिले असेलच, संसदेचे कामकाज चालू नाही. कामकाज चालवू दिले जात नाही. आपल्‍या देशाच्‍या राष्‍ट्रपतींना सार्वजनिक जिवनामध्‍ये दीर्घ अनुभव आहे. शासन चालवणाऱ्‍या श्रेष्‍ठ व्‍यक्तिंमध्‍ये राष्‍ट्रपतींची गणना होते. ते वेगळ्याच राजनैतिक प्रवाहात वाढलेले आहेत, मोठे झाले आहेत. परंतु देशाच्‍या संसदेमध्‍ये जे काही होत आहे, हे पाहून त्‍यांना खूप त्रास होऊ लागला. ते खूप दु:खी झाले. दोन दिवसांपूर्वी त्‍यांना खासदारांना सार्वजनिक स्‍वरूपात दटवावे लागले. विरोधी पक्षांचे नाव घेवून त्‍यांची कानउघाडणी करावी लागली. आणि मला मोठे नवल वाटते की, सरकार चर्चेला तयार आहे, चर्चा व्‍हावी असे सरकारला वाटते असे वारंवार सरकारने सांगितले आहे. पंतप्रधान बोलायला तयार आहेत, पंतप्रधान बोलायला आले असतानाही विरोधकांचा गोंधळ थांबला नाही. कारण त्‍यांना माहीत आहे, की त्‍यांचा खोटेपणा टिकणार नाही. म्‍हणूनच ते चर्चेपासून दूर पळ काढत आहेत. आणि म्हणूनच लोकसभेमध्‍ये मला बोलू दिले जात नाही. बंधूंनो, मग मी जनसभांमध्‍ये बोलण्‍याचा मार्ग स्‍वीकारला आहे. आणि बंधू, भगिनींनो, ज्‍यादिवशी संधी मिळेल त्‍यावेळी लोकसभेतही सव्‍वाशे कोटी देशवासियांचा आवाज मी जरूर पोहोचविण्‍याचा प्रयत्‍न करणार आहे.

बंधू, भगिनींनो, मी विरोधी पक्षांच्‍या मित्रांना, आज महात्‍मा गांधीजींच्‍या या भूमीवरून, सरदार वल्‍लभभाई पटेल यांच्‍या भूमीवरून सार्वजनिक रूपाने आग्रह करू इच्छितो. ज्‍यावेळी निवडणुका होतात, त्‍यावेळी सगळे पक्ष एकमेकांविरूध्‍द बोलत असतात. आरोप-प्रत्‍यारोपाच्‍या फैरी झाडत असतात. चांगल्‍या आणि वाईट नीतिविषयी चर्चा होत असते. कोणत्‍याही प्रकारे आपल्‍या विरोधकांवर वार करण्‍याचा प्रयत्‍न केला जात असतो. सगळे पक्ष असे करत असतात. भारतीय जनता पार्टीही करते, काँग्रेस करते, इतर सर्व लहान-मोठे पक्ष करत असतात. परंतु सगळे पक्ष एक काम जरूर करतात. कोणते? मतदारसूची अद्ययावत करण्‍याचे काम सगळे करत असतात. जास्‍तीत जास्‍त लोक मतदानाला यावेत अशी चिंता सगळ्यांना असते. मतदारांनी बटन कसे दाबावे, हे शिकवण्‍याचे कामही सगळे पक्ष करतात. एका बाजूला नीतिला विरोध केला जातोय, दुसऱ्याला हरवण्‍यासाठी सगळी ताकद लावली जाते. परंतु दुसरीकडे सगळेजण मतदार सूचीकडे लक्ष देत असतात. इलेक्ट्रॉनिक व्‍होटिंग मशिनकडे लक्ष देत असतात. अधिक लोक मतदानाला यावेत म्‍हणून लक्ष देतात. कारण काय? कारण लोकशाही आपल्‍या सगळ्यांची जबाबदारी आहे.

मी विरोधी पक्षांच्‍या मित्रांना सांगू इच्छितो की, आता जनतेचे मन बदलले आहे, म्‍हणून आपला निर्णय योग्‍य आहे हे सांगण्‍याचे धाडस आपल्‍यात नाही. हो, काही लोकांनी म्‍हटले, अच्‍छा मोदीजी हे ठिक आहे, परंतु एक आठवडाभर थांबवा. का बरं? या एक आठवड्यात कोणती जादू होणार होती? आणि एक सप्‍ताह अंमलबजावणी लांबवण्‍याचा, थांबवण्‍याचा इरादा काय होता? परंतु एकही पक्ष निर्णय मागे घ्‍या असे म्हणत नाही. सगळे पक्ष म्‍हणतात, चांगल्‍या प्रकारे लागू करा. मी सगळ्या पक्षांना सांगू इच्छितो, की ज्‍या प्रमाणे निवडणुकीत आपण एक दुसऱ्‍याला टोकाचा विरोध करतो, परंतु मतदान वाढीसाठी परिश्रम करतो, मतदार सूची तयार करण्‍यासाठी कष्‍ट घेतो, इलेक्ट्रॉनिक मशिनचे प्रशिक्षण देतो. त्‍याचप्रमाणे आजच्‍या काळाची मागणी ओळखून तुम्‍ही माझ्यावर कितीही आरोप करा, टीका करा, विरोध करा, परंतु लोकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे कसे दिले जातात, कसे घेतले जातात, हे शिकवा. आपण सगळे मिळून देशाचे भाग्‍य बदलण्‍याची उत्‍तम संधी आली आहे, असे समजून सगळे मिळून काम करूया. आम्‍ही सगळे काम करत आहोतच. आणि आपणही त्‍याचा लाभ घ्‍या.

माझ्या विरोधी पक्षाच्‍या लोकांनी जर आपल्‍या कार्यकत्यांना कामाला लावून जनतेला मदत केली आणि राजकीय लाभ उठवला तर मला खूपच आनंद होईल. कारण्‍ देशाचे भले व्‍हावे असेच मला वाटते. अरे, राजनीतीपेक्षा वरचे स्‍थान राष्‍ट्रनीतीला आहे.

पक्षापेक्षा देश मोठा असतो. बंधू आणि भगिनींनो, गरिबांविषयी बोलणे वेगळे असते आणि गरिबांसाठी नीती बनवून त्‍याची कठोरतेने अंमलबजावणी करण्‍यासाठी समर्पणाचा भाव लागतो. आणि याच समर्पित भावाने आज हे सरकार आपल्‍या सेवेसाठी कार्यरत आहे.

बंधू भगिनींनो, मी पहिल्‍या दिवसापासून सांगत आहे, हा निर्णय काही साधा, सरळ, सोपा नाही, हे मी पहिल्‍या दिवसापासून सांगतोय. माझ्या बंधू भगिनींनो, हा निर्णय खूप अवघड, कठीण आहे. आणि मी सांगितलं होतं की, खूप त्रास होणार आहे. मी बोललो होतो, संकटे येणार आहेत. आणि 50 दिवस खूप अडचणींचा सामना करावा लागणार. आणि हा त्रास दैनंदिन व्यवहार करताना तर खूपच वाढणार. मी हिशेब केला आहे, परंतु 50 दिवसांनंतर परिस्थिती हळूहळू सुधारलेली तुम्‍हाला नक्‍कीच दिसेल.

बंधू भगिनींनो, देशाला भ्रष्‍टाचारापासून मुक्‍त करण्‍यासाठी हे एक उचलेले महत्‍वपूर्ण पाऊल आहे. आणि काही लोक आपण पाहिले असेल; या दिवसात सरकार बरोबर मागे लागली आहे. बँकवाले तुरूंगात जात आहेत. मोठे मोठे नोटांचे गठ्ठे घेऊन पळण्याचा प्रयत्‍न करणारे लोक तुरुंगात जात आहेत. चोहो बाजूंनी त्‍यांना घेरले आहे. त्‍यांना वाटत होते, ठीक आहे. मोदीजींनी 1000, 500 बंद केले तर काय झाले, आम्‍ही मागच्‍या दरवाजाने काहीतरी नक्‍कीच करू. परंतु त्‍यांना हे माहीत नव्‍हते की, मोदींनी मागच्‍या दरवाजावरही कॅमेरे लावून ठेवले आहेत. हे सगळेच्‍या सगळे पकडले जाणार आहेत. कोणीसुद्धा वाचणार, सुटणार नाहीत. दोन महिने, तीन महिने, सहा महिने, ज्‍यांनी आठ तारखेनंतर नवीन पाप केले आहे, ते तर कोणत्‍याही परिस्थितीत सुटणार नाहीत. बंधू भगिनींनो, त्‍यांना शिक्षा भोगावीच लागणार. सव्‍वाशे करोड देशवासियांचे स्‍वप्‍न भंग करण्‍याचे पाप ज्‍यांनी केले आहे, ते वाचणार नाहीत, असा विश्‍वास मी देशवासियांना देवू इच्छितो.

बंधू, भगिनींनो, आपण अडचणी सहन केल्‍या आहेत. खूप त्रासही सहन केला आहे. आणखी त्रास सोसावा लागणार आहे. आपल्या आशीर्वाद देशाला लाभणार आहे. प्रामाणिक लोकांना रांगेत उभे केले असे जे लोक म्‍हणतात, त्‍यांना सांगू इच्छितो की, प्रामाणिक लोक आपल्‍यासाठी रांगेत उभे नाही राहिले, तर ते देशासाठी उभे राहिले आहेत. बंधू आणि भगिनींनो, ते देशासाठी उभे रहात आहेत.

आणि म्‍हणूनच, दुसरे, आज काळ बदललाय. एकेकाळी आमच्‍या आजी-आजोबांकडून कधी ऐकलं असेल की, “बैलगाडीच्‍या चाकाऐवढा मोठा चांदीचा रूपया आम्‍ही पाहिला आहे; तो वापरात बंधू, भगिनींनो, असा चांदीचा रूपया बदलत बदलत किती धातू बदलले पाहा आता. तांबे आले, आणखी खूप काय काय आलं आणि हळूहळू आपण कागदावर येउून ठेपलो नाही? आता आठवण येते की, चांदीचा रूपया असेल तरच तो रूपया मानला जायचा. येते का आठवण? पण आता तो कागदाचा असला तरी तोच रूपया आपल्‍या जीवनाचा हिस्‍सा बनला आहे. कधी काळी चांदीचा रूपया होता आता हळूहळू कागदाचा रूपया आला आहे.

बंधू, भगिनींनो, आता काळ बदलला आहे. आता तर आपला मोबाईल फोनमध्‍येच बँक आली आहे. आपला पैशाचा बटवाही आपल्‍या मोबाईल फोनमध्‍ये आहे. आपण चहा प्यायला गेलात तर बटन दाबले की, चहावाल्‍याला पैसे पोहोचतील आणि पावतीही मिळेल. मधल्‍या काळात लोक धनादेश देत होते. धनादेश फाडून दोन महिन्‍यांनी समजत असे, की धनादेश वटला नाही, परत आला आहे. मग मागाहून न्‍यायालयात खटला चालवला जाई. धनादेश न वटल्‍याचेच खटले सर्वात जास्‍त असायचे. नवयुवकांना मी मनापासून धन्‍यवाद देतो. या युवकांनी खूप महत्‍वाचे काम करण्‍याचा निर्धार केला आहे. मी आपल्‍याला शुभेच्‍छा देतो. आणि बंधूंनो, बनासकांठा जिल्हा आपण सगळ्यांनी मिळून ई-बटवा वापरणारा जिल्‍हा बनवावा, असे आवाहन करतो. आपण लोकांना ई-मोबाईल बँकिंगने जोडण्‍यामध्‍ये यशस्‍वी होणार असा माझा विश्‍वास आहे.

बंधू, भगिनींनो, आता आपण जाणतो, की हा कागदी नोटांचा काळही संपणार आहे. आता तर आपल्‍या मोबाईल फोनमध्‍येच आपली बँक आहे. एकदा या बँकेत पैसे जमा झाले की, तुम्‍हाला बँकेच्‍या रांगेत उभे राहण्‍याची गरज भासणार नाही. किंवा आपल्‍याला एटीएमच्‍या बाहेरही रांगेत उ‍भे रहावे लागणार नाही. आपला वेळ वाया घालवण्याची आवश्‍यकता नाही. वर्तमानपत्रात जाहिरात येते, टि.व्‍हीवर जाहिरात दाखवतात. जर आपले पैसे आपल्या बँकेच्‍या खात्‍यात पडून असतील तर आपण आपल्‍या मोबाईलमार्फत, त्‍या पैशांनी काहीही खरेदी करू शकतो. धनादेश न वटण्‍याची शक्‍यता होती. आता इथे तसे नाही.

आपण पैसे दिले की, आपल्‍याला लगेच त्याची पावती मिळणार आहे. पैसा मिळाला, पैसा दिला गेला की लगेच समजणार आहे. न वटणे वगैरे काही भानगड नाही. पैसा गेला की नाही तिथेच समजणार आहे.

बंधू, भगिनींनो, हिंदुस्‍तान या जगात फार वेगाने पुढे येऊ इच्छित आहे. हा नोटांच्‍या बंडलांचा ढीग, नोटांचा डोंगर आपल्‍या अर्थव्यवस्थेला अडकाठी घालत आहे. काळा पैसा आणि भ्रष्‍टाचारींना त्‍याची मदत होत आहे. गरिबांची ताकद त्‍यामुळे कमी होत आहे. जसे की, हजाराच्‍या नोटेची किंमत होती आणि शंभराच्‍या नव्‍हती. श्रीमंतांची किंमत आहे, गरिबांना नाही. आज गरिबांची ताकद वाढली आहे. शंभराच्‍या नोटेची ताकदही वाढली आहे. आणि जर आपण ई-बटवा काय आहे, हे शिकलात, तर बॅंकांसमोरची रांग संपुष्‍टात येणार आहे. आणि आपल्‍या मोबाईल मध्‍ये आपली बँक येणार आहे. मग आपल्‍याला बँकेच्‍या रांगेत उभे राहावे लागणार नाही. बॅंकच आपल्‍या मोबाइलच्‍या रांगेत उभी राहील. मी आपल्‍याला आग्रह करतो, मी देशवासियांना आग्रह करतो, मी प्रसार माध्‍यमातील मित्रांना विशेष विनंती करू इच्छितो की, मोदी यांच्‍यावर टीका करण्याचा आपला हक्‍क आहे; आज जरूर टीका करा. रांगेत जे लोक उभे आहेत, त्‍यांना खूप त्रास होतोय; तो त्रास आपण दाखवता. त्‍याबद्दल माझी काही तक्रार नाही. परंतु त्‍याचबरोबर आपण हेही लोकांना शिकवा. की बॅंक आपल्‍या मोबाईलमध्‍ये आहे. त्‍यामुळे रांगेत उभे राहण्‍याची गरज नाही. बॅंक आपल्‍या मोबाइ्लच्‍या रांगेत उभी राहील, असा दिवस आता दूर नाही. तंत्रज्ञान उपलब्‍ध आहे, व्‍यवस्‍था उपलब्‍ध आहे.

बंधू, भगिनींनो, आता देश भ्रष्‍टाचार सहन करणार नाही. आता देश बनावट नोटा सहन करणार नाही. गरिबांना लुटण्‍याचा खेळ, मध्‍यम वर्गाचे शोषण करण्‍याचा खेळ आता चालणार नाही. आणि म्‍हणूनच मला आपले आशीर्वाद हवे आहेत. माझ्या गुजरातच्‍या बंधू, भगिनींनो, उभे राहून दोन्‍ही हातांनी टाळ्या वाजवून तुम्‍ही मला आशीर्वाद द्यावा , माझ्या डिसा बंधू, भगिनींनो, आशीर्वाद द्यावा. संपूर्ण ताकदीनिशी आशीर्वाद द्यावा.

भारत माता की, जय

भारत माता की, जय

भारत माता की, जय

ही लढाई, ही लढाई भारताचे भाग्‍य बदलण्‍यासाठी आहे. ही लढाई
भ्रष्‍टाचाराला संपवण्‍यासाठी आहे. ही लढाई काळा पैसा संपुष्‍टात आणण्‍यासाठी आहे. ही लढाई बनावट नोटांपासून देशाला मुक्‍ती मिळावी यासाठी आहे. आणि या लढाईसाठी बनासची भूमीने मला आशीर्वाद दिले आहेत. मी आपल्‍या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. आपला खूप खूप आभारी आहे. पुन्‍हा एकदा आपण म्‍हणावे, भारत माता की, जय, पूर्ण शक्‍तीनिशी म्‍हणा, संपूर्ण देश ऐकतोय.

भारत माता की, जय

भारत माता की, जय

खूप खूप धन्‍यवाद !

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India Exports First Akash Missile System Battery to Armenia, Boosts Defence Ties

Media Coverage

India Exports First Akash Missile System Battery to Armenia, Boosts Defence Ties
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 नोव्हेंबर 2024
November 13, 2024

Holistic Growth Story of Bharat under the Leadership of PM Modi