#BHIMAadhaar will revolutionise Indian economy, says Prime Minister Modi
#BHIMAadhaar will boost digital payments in the country: PM Modi
DigiDhan movement is a ‘Safai Abhiyan’ aimed at sweeping out the menace of corruption: PM Modi
Dr. Ambedkar did not have even a trace of bitterness or revenge in him. He added that this was Babasaheb Ambedkar's speciality: PM

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तनाचे कार्य ज्या भूमीवर केले त्या भूमीला माझे वंदन ! काशी जसे ज्ञानाचे नगर आहे, तसेच नागपूरही बनू शकेल का ? आज येथे अनेक नामवंत लोक बसले आहेत सगळ्यांची नावे तर घेऊ शकत नाही. बऱ्याच जणांनी ही नावे घेतली आहेत, तुम्हाला तर लक्षात असतीलच.

आज इतके सगळे प्रकल्प नागपूरच्या भूमीवरून राष्ट्राला समर्पित होत आहेत. आणि आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा प्रेरक उत्सव आहे. आज सकाळी दीक्षाभूमी येथे जाऊन डॉ आंबेडकरांना अभिवादन करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे सौभाग्य समजतो. तिथून एक नवी उर्जा आणि प्रेरणा घेऊन मी आज तुमच्यामध्ये आलो आहे.

या देशातील दलित, पीडि़त, शोषित, वंचित, ग्रामीण लोक, शेतकरी गरीब जनता या सगळ्यांनी स्वतंत्र भारतात जे स्वप्न आपल्या जीवनासाठी पहिले आहे, त्या स्वप्नाचे काय होणार ? त्यांच्या आशा आकांक्षांचे काय होणार? स्वतंत्र भारतात या सर्व लोकांना , त्यांच्या स्वप्नांना काही स्थान आहे की नाही ? त्यांना विचारणारे कोणी आहे की नाही? या सर्व प्रश्नाची उत्तरे भीमराव आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशावासियांना दिली आहेत. हमीस्वरुपात दिली आहेत. आणि त्याचाच परिणाम म्हणून आज देशात समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या व्यक्तीला काही ना काही करण्याची संधी उपलब्ध आहे आणि त्याचं संधीचा उपयोग करत आपली स्वप्ने साकार करण्याची जिद्द आणि प्रेरणा घेऊन तो उभा आहे.

माझ्या व्‍यक्तिगत आयुष्यात मी नेहमीच एक अनुभव घेतला आहे. की आयुष्यात काही कमतरता असल्या तरी त्याचा परिणाम, प्रभाव आपल्या आयुष्यावर पडू न देता, आपले आयुष्य प्रभावीपणे आणि यशस्वीपणे जगता येऊ शकते. आणि याची प्रेरणा आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातून मिळते. कमतरता, उणीवा, अडचणी यांचे रडगाणे गायचे नाही, आणि कुठल्याही प्रभावाने विचलित व्हायचे नाही, असे संतुलित आयुष्य दबलेल्या, वंचित अशा सर्वांची ताकद बनू शकते, आणि ही ताकद देण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात कटू अनुभव ही रोजच्या आयुष्यातली गोष्ट झालेली असते. अपमानित होते, पीडामय तिरस्कृत आयुष्य जगणे हे रोज सहन करावे लागते. जर माणसाचे मन छोटे असेल, तर ह्या त्रासदायक गोष्टी त्याच्या घरात, मनात, डोक्यात कायमच्या घट्ट रुतून बसतात. आणि जर कधी बदला घेण्याची संधी मिळाली तर त्याला वाटते की आता मी यांना धडा शिकवेन. माझ्या आयुष्यात मला त्रास भोगावा लागला. शाळा कॉलेज, नोकरी अशा प्रत्येक ठिकाणी मला अपमानित व्हावे लागले.

कोणीही माणूस अशा सगळ्या घटनांच्या आठवणी मनात ठेवेल .भीमराव आंबेडकरांना आयुष्यात इतक्या वाईट प्रसंगांचा सामना करावा लागला, इतकी अवहेलना झेलावी लागली, मात्र जेव्हा ते उच्चपदावर पोचले, तेव्हा या अवहेलनेविषयी त्यांनी मनात कुठलीही कटूता ठेवली नाही. कोणाचाही बदला घेण्याचा विचार ना त्यांनी लिहिलेल्या संविधानातून कधी डोकावला, न कधी त्यांच्या ओठांवर कधी वाईट शब्द आले. अशा कसोटीच्या प्रसंगीच माणसाचे मोठेपण आपल्याला कळू शकते, डॉ आंबेडकर हे असेच महान व्यक्तिमत्व होते. जेव्हा आपण शिवशंकराविषयी बोलतो, तेव्हा म्हणतो की त्यांनी हलाहल प्यायले होते. बाबसाहेब आंबेडकरानी तर आयुष्यात प्रत्येक क्षणी विषाचा घोट घेतला, मात्र आपल्यासाठी सदैव अमृतवर्षा केली आणि यासाठी त्या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त आणि ते पण जिथे त्यांचा नवा जन्म झाला त्या दीक्षाभूमीवर प्रणाम करत देशाच्या चरणी एक नवीन व्यवस्था देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

आज अनेक योजनांचा शुभारंभ होत आहे, नवीन प्रकल्पांचा प्रारंभ होत आहे. जवळ जवळ दोन हजार मेगावाट वीज निर्मिती केंद्रांचे लोकार्पण झाले आहे. आज वीज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. ऊर्जा नसेल तर विकासाचे कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. आणि आज एकविसाव्या शतकात ऊर्जा एकप्रकारे प्रत्येक नागरिकाचा अधिकार झालेली आहे. एक अलिखित अधिकार बनली आहे. देशाला एकविसाव्या शतकात जर विकासाच्या उंचीवर न्यायचे असेल, आपल्या देशाला आधुनिक भारताच्या स्वरूपात बघायचे असेल तर ऊर्जा आपली पहिली गरज आहे. आणि आज एकीकडे पर्यावरणाच्या चिंतेमुळे जागतिक पातळीवर औष्णिक उर्जेच्या वापराला आव्हान दिले जात आहे, मात्र विकसित देशांसाठी ऊर्जेचा तोच एक आधार आहे. जागतिक स्तरावरच्या या समस्येतून आपल्याला मार्ग काढायचा आहे.भारताने तर त्याचा विडाच उचलला आहे. आम्ही “हे विश्वचि माझे घर” असे मानणारे लोक आहोत , संपूर्ण ब्रह्मांड एक आहे यावर आमचा विश्वास आहे. आम्ही आमच्याकडून असे काही करणार नाही, ज्याचा भावी पिढीला त्रास होईल, त्यांच्यासाठी संकट निर्माण होईल. यासाठीच भारताने १७५ गीगावाट नवीकरणीय ऊर्जानिर्मितीचे स्वप्न बघितले आहे. सौरऊर्जा असो, की पवनऊर्जा असो, किंवा मग जलविद्युत प्रकल्प असोत सगळे प्रकल्प वेगाने सुरु आहेत. नितीनजी अतिशय अभिमानाने सांगत होते की नागपूरमध्ये सांडपाण्यापासून वीजउत्पादन केले जाते, त्या पाण्यावर प्रकीया केली जाते. हा एकप्रकारे पर्यावरणाला अनुकूल असा प्रकल्प उभारल्याबद्दल मी नागपूरवासियांचे अभिनंदन करतो. आणि देशाच्या अनेक भागातही आता शून्य कचऱ्याची संकल्पना रुजते आहे.

इथे गृहबांधणीचा एक मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्याचे उद्घाटनही आज झाले.२०२२ साली देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. एका क्षणासाठी आपण ७५ वर्षांपूर्वीचे आयुष्य जगण्याची कल्पना करून बघूया. जर आपण १९३०,४०, ५० या कालखंडाचा विचार केला, जेव्हा लोक देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावत असत, देशात तिरंगा फडकवण्यासाठी फासावर पण जायला तयार असत. भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आपले तारुण्य हसत हसत तुरुंगात घालवत असत. मृत्यूला आलिंगन देणारे लोक होते ते! हसत हसत देशासाठी आयुष्य वेचणाऱ्या लोकांची काही कमतरता नव्हती तेव्हा. या देशातल्या वीरांनी अशी काही ताकद दाखवली होती की फाशीचे दोर सुद्धा कमी पडत. मात्र मरणाऱ्याची, देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या वीरांची संख्या कधी कमी झाली नाही. या अगणित बलिदानाच्या परिणामातूनच आपली भारतमाता स्वतंत्र झाली आहे. मात्र या स्वातंत्र्याच्या वेड्या वीरांनीही देशासाठी काही स्वप्ने बघितली होती, आपला स्वतंत्र भारत कसा असेल, याचा काही विचार केला होता. मात्र त्यांना स्वतंत्र भारतात जगण्याची संधी मिळाली नाही. आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होण्याचे भाग्य आम्हाला मिळाले नाही. देशासाठी मरण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले नाही ,मात्र देशासाठी जगण्याचे भाग्य आणि आणि काही करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.

 

२०२२ साली स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत, आज आपण २०१७ मध्ये आहोत,आपल्यापाशी पाच वर्षांचा वेळ आहे. ज्या महापुरुषानी स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य वेचले, त्यांच्या स्वप्नातला भारत साकार करण्यासाठी जर आपण सव्वाशे कोटी भारतीयांनी एकत्र येत संकल्प केला, की हा भारत बनवण्यासाठी माझ्याकडून मी हे योगदान देईन, मी देखील काहीतरी करू शकेन तर, मला विश्वास आहे , की २०२२ पर्यंत आपला देश एक मोठी ताकद बनून उभा राहील. आणि या स्वप्नात एक स्वप्न हे ही आहे की २०२२ मध्ये जेव्हा स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील, तेव्हा देशातल्या प्रत्येक गरीबाकडे स्वतःच्या मालकीचे घर असावे. आणि ते घर असे असावे, जिथे वीज असेल, पाणी असेल, स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध असेल, जवळच मुलांसाठी शाळा असेल, वृद्धांसाठी जवळ एखादे रुग्णालय असेल, असे स्वप्न आपण भारतात का बघू शकत नाही? सव्वाशे कोटी भारतीय एकत्र येऊन देशातील गरिबांचे अश्रू पुसू शकत नाही का ? भीमराव आंबेडकरांनी जे स्वप्न मनात बघत आपले संविधान लिहिले, ते स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. आणि म्हणूनच आपण २०२२ साठी काही संकल्प मनात धरून तो पूर्ण करण्याचा निश्चय करुया, मला खात्री आहे की हे स्वप्न नक्कीच साकार होईल.

मी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करतो कि केंद्र सरकारच्या योजनांसोबत ते ही खांद्याला खांदा लावून सरकारच्या योजना राबवीत आहेत. खूप मोठ्या प्रमाणात घरे बांधण्याचे काम सुरु होणार आहे आणि त्यातून अनेक जणांना रोजगारही मिळणार आहे. गरिबांना घर मिळेल आणि ते घर बनवणाऱ्याना रोजगार मिळेल. सिमेंट बनवणाऱ्याला काम मिळेल, लोखंड बनवणाऱ्याला काम मिळेल, प्रत्येक व्यक्तीला काम मिळेल. एकप्रकारे रोजगारनिर्मितीचेही मोठे काम ह्या प्रकल्पातून होणार आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात घरे बनवण्याचे प्रकल्प वेगवेगळ्या रुपात साकार होत आहेत. आज त्याचा शुभारंभ करण्याची संधी मला मिळाली.

एकविसावे शतक ज्ञानाचे शतक आहे. आणि मानवाचा इतिहास याचा साक्षी आहे की जेव्हा जेव्हा मानवजात ज्ञानाच्या युगात राहिली आहे, तेव्हा तिचे नेतृत्व भारताने केले आहे. एकविसावे शतक हे ज्ञानाचे युग आहे. भारताला त्याचे नेतृत्व करण्याची मोठी संधी मिळाली आहे. आज इथे आय आय एम, आय आय टी , एम्स अशा एकाहून एक सरस अशा संस्थांची पायाभरणी झाली. या सगळ्या ज्ञान आणि संशोधनाला वाव देणाऱ्या संस्था इथे सुरु होणार आहेत. महारष्ट्र आणि देशातल्या युवकांना आपले नशीब घडवण्याची संधी इथे मिळणार आहे. जागतिक स्तरावर आपले अस्तित्व सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. या युवकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा !

गेल्या काही दिवसांपासून आम्ही डिजिटल इंडीयाच्या दिशेने काम करतो आहोत, खूप व्यापक प्रमाणात काम करतो आहोत ... त्याचाच एक भाग आहे-डीजी धन ! आणि माझे असे मत आहे की देशातला गरिबातला गरीब व्यक्ती जेव्हा म्हणेल डीजीधन –निजीधन ! तो दिवस दूर नाही. डीजीधन –निजीधन हा लवकरच देशातल्या गरीबाचा आवाज बनणार आहे. मी पहिले आहे की अनेक विद्वान लोक केवळ विरोधासाठी विरोध करत आहेत, मोदीजी आता म्हणत आहेत कॅशलेस सोसायटी , अमुक तमुक !! या निर्णयाविरोधात मी तर अशी अशी भाषणे ऐकली की की त्यावर मला काहीही भाष्य करण्याची गरज पडली नाही. मी ती भाषणे ऐकायचो तर मला खूप आश्चर्य वाटायचे, म्हणजे इतकी विद्वान माणसे हे काय बोलत आहेत ? घरात कमी रोख रक्कम असण्याचा काळ तुम्ही देखील पहिला असेल. अगदी श्रीमंत कुटुंब असेल, मुलगा वसतिगृहात राहात असेल तर आई वडिलांमध्ये चर्चा होत असेल, एकदम खूप पैसे पाठवू नका, मुलाच्या सवयी बिघडतील. आणि गरिबातल्या गरीब कुटुंबातला मुलगा जेव्हा म्हणतो मला पाच रुपये द्या तेव्हा बाप म्हणतो बेटा असे कर दोन रुपयेच घे. कमी पैसे खर्च करणे यालाही आयुष्यात एक वेगळे महत्त्व आहे, हे आपण सगळे कुटुंबात शिकलो आहोत, अनुभवले आहे. सुखी श्रीमंत कुटुंबही मुलांच्या हाती नोटांची बंडले देत नाहीत कारण त्याचे काय दुष्परिणाम होतात, हे त्याना व्यवस्थित माहित असते. त्याचे परिणाम चांगले होत नाहीत, वाईटच होतात. जे व्यक्तीच्या जीवनात असेल तेच समाजजीवनातही असते आणि राष्ट्राच्या जीवनातही असते. तेच अर्थव्यवस्थेच्या बाबतीतही तेच घडत असते. ही साधी सरळ गोष्ट आपण व्यवहारात आणायला हवी. कमी पैसे, कमी रोकड यातूनही व्यवहार चालवले जाऊ शकतात. एक काळ असा होता की सोन्याची लगडीच चलन राहत असे. सोन्याचे नाणे असायचे, त्यानंतर बदल होत चामड्याचे चलन आले, कागदाचे आले ..कितीतरी बदल झाले. प्रत्येक युगाने हे बदल स्वीकारले. होऊ शकते की त्यावेळीही काही लोक असतील जे अशा बदलांवर टीका करत असतील, तेव्हा वर्तमानपत्रे नसतील त्यामुळे हे सगळे छापून येत नसेल. मात्र काही लोक त्यावेळीही नक्कीच बोलत असतील, वादविवादही झाले असतील , मात्र तरीही बदल झालेत. आता काळ बदलला आहे. आपल्यापाशी पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहेत, सुरक्षित व्यवस्था आहेत आणि त्यापैकीच एक आहे भीम ॲप. मला विश्वास आहे की भारताच्या संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीयांना त्यांचे अधिकार देण्याचे काम जसे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले, त्याचप्रकारे भीम ॲप देशाच्या अर्थव्यवस्थेत महारथीच्या रुपात काम करणार आहे, माझे शब्द लिहून ठेवा. कोणीच त्याला थांबवू शकणार नाही, हे होणारच आहे.

तुम्हाला आश्चर्य वाटेल भारतासारख्या देशात चलनी नोटांची छपाई करणं, छापलेल्या नोटा ठीक ठिकाणी पोहोचवणे, सुरक्षित पोहोचवणे यावर कोट्यावधी रुपये खर्च होतात. जर आपण ह्यातून पैसे वाचवू शकलो तर किती गरीब लोकांना फायदा होईल. किती मोठी देशसेवा होईल. आणि हे शक्य आहे, म्हणूनच करायचं आहे, शक्य नसेल तर करायचं नाही. जर आपण ठरवलं तर दैनंदिन व्यवहारात रोखीचे व्यवहार कमीत कमी करू शकतो, जर ठरवलं तर हा बदल घडू शकतो. मला आश्चर्य वाटतं एकेका एटीएम साठी पाच पाच पोलीस तैनात असतात. लोकांना सुरक्षा द्यायला पोलीस कमी पडतात, पण एटीमसाठी उभे राहावे लागते. जर रोखीचे व्यवहार कमी झाले, आपला मोबाईल फोन आपले एटीएम बनले तर तो दिवस दूर नाही जेंव्हा परिसर विरहीत आणि कागद विरहीत बँक आपल्या जीवनाचा भाग बनतील.

जर परिसर विरहीत आणि कागद विरहीत बँक आपल्या जीवनाचा हिस्सा बनणार आहे, याचा अर्थ असा, आपला मोबाईल फोन फक्त बटवाच नाही तर आपली बँक बनेल. तंत्रज्ञान क्रांती आपल्या आर्थिक जीवनाचा भाग बनते आहे. आणि म्हणूनच २५ डिसेंबरला डीजीधन योजना सुरु करण्यात आली होती. ज्या दिवशी ही योजना सुरु करण्यात आली तो क्रिसमसचा दिवस होता. शंभर दिवस शंभर शहरात ही योजना राबवली गेली. आणि आज एकप्रकारे ही योजना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी १४ एप्रिलला पूर्ण होत आहे, एकीकडे भीम ॲप आणि दुसरी कडे गुड फ्रायडेचा दिवस. क्रिसमसच्या दिवशी सुरुवात केली, हसत खेळत काम करत इथवर आले.

तेव्हा लोकांना वाटत होतं की ज्याच्या कडे मोबाईल फोन नाही, ते काय करतील. मी संसदेत अनेक भाषणं ऐकली, त्यातली काही फार मनोरंजक होती. देशात स्मार्ट फोन नाही. अमुक नाही, तमुक नाही. आम्ही त्यांना समजावलं, ८०० – १००० रुपयाच्या मोबाइल फोनने देखील काम होईल, पण ज्यांना समजूनच घ्यायचं नाही, त्यांना कसं समजावणार? पण आता तर मोबाईल फोनची देखील गरज नाही. आता नाही विचारणार, कसं करणार म्हणून. आपल्याला अंगठा तर आहे ना. एक काळ होता, अंगठा, निरक्षरतेची निशाणी होती. जग कसं बदललं, तोच अंगठा आता आपली शक्ती बनतो आहे. इथे उपस्थित सगळे तरुण दोन दोन तास अंगठा वापरत असतील. मोबाईल फोन वर संदेश लिहित असतील. तंत्रज्ञानाने अंगठ्याला शक्तिशाली बनवलं आहे. म्हणूनच भीम-आधार चा भारताला अभिमान आहे. जगातील प्रगत देशांकडे देखील हिंदुस्थानाकडे असलेली ही व्यवस्था नाही.

आधी लोकांनी भीम App ला विरोध केला नंतर ते स्वीकारले. ते लोक आता आधारच्या वापराला विरोध करत आहेत. ते त्याचं काम करत राहतील. आपल्या जवळ मोबाईल फोन असो वा नसो, आधार क्रमांक आहे. तुम्ही कुठल्याही दुकानात गेलात तर तिथे एक छोटंसं मशीन असेल. मोठ्या PoS मशीनची गरज नाही. छोटंसं दोन इंच बाय दोन इंच आकाराचं. दुकानदार आपला अंगठा तिथे लावेल. जर आपलं बँक खात आधार कार्डशी जोडलं असेल तर पैसे आपोआप खात्यातून वळते होतील. जर दहा रुपयाच सामान घेतलं असेल तर दहा रुपये खतातून आपोआप दुकानदाराच्या खात्यात वळते होतील. तुम्हाला खरेदीला जाताना एक रुपया सुद्धा सोबत नेण्याची गरज नाही. आपलं काम कुठेच अडणार नाही. आपण किती उत्तम व्यवस्थेकडे जात आहोत. म्हणूनच आज भीम आधारचं एक असं रूप.....आणि तुम्ही बघाल, तो दिवस दूर नाहे, जेंव्हा जगातील मोठमोठ्या विद्यापीठातील विद्यार्थी भीम आधार ॲपचा अभ्यास करण्यासाठी भारतात येतील. सगळे तरुण ह्याचा अभ्यास करतील. जगातील आर्थिक बदलांचा हा आधार बनणार आहे, हा उपक्रम जगासाठी एक संदर्भ बनणार आहे.

मी कालच आमच्या रविशंकरजींना विचारत होतो की, भारत सरकार ने ह्याचं पेटंट घेतलं आहे की नाही? कारण पुढे हे होणार आहे. ह्या व्यवहार पद्धतीवर जग आपला हक्क सांगणार आहे. अलीकडे आफ्रिकन देशांचे प्रमुख मला भेटले. ते सर्व ह्या पद्धतीबद्दल जाणून घेण्यास उत्सुक होते. त्यांना ही व्यवहार पद्धत त्यांच्या देशांत राबवायची आहे. हळू हळू व्यवहाराची ही पद्धत जागतिक स्तरावर विस्तारणार आहे आणि भारत ह्यात Catalytic Agent ची भूमिका पार पडणार आहे.

ह्या डीजीधन योजने अंतर्गत हिंदुस्थानच्या शंभर वेगवेगळ्या शहरांत कार्यक्रम केले गेले. ह्यात लाखो लोकांनी उत्साहाने भाग घेतला. तंत्रज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला, ते स्वीकारण्याचा प्रयत्न केला. आणि अनेक लोकांना बक्षिसे मिळाली. आज ज्या लोकांना बक्षिसे मिळाली त्यात चेन्नईचे एक गृहस्थ आहेत. त्यांनी तर घोषणाच करून टाकली, मला जे बक्षीस मिळाली आहे ते मी गंगा सफाईच्या कामाला दान करत आहे. मी त्यांचे आभार मानतो. आणि तसंही हे डीजीधन सफाई अभियानच आहे. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरुद्ध लढाईत एक वेगळाच आनंद असतो.

आणि देशवासियांना मी सांगू इच्छितो आपल्याला आवडो अथवा न आवडो, जास्तीत जास्त रोख विरहीत व्यवहार करा. रोख विरहीत समाजाचे स्वप्न आपल्याला आवडो अथवा न आवडो, रोखीविना जीवन कसं असेल ह्या बद्दल कुणाच्या मनात शंका असतील अथवा नसतील. पण भ्रष्टाचाराविषयी मनात राग नाही असा एकाही व्यक्ती देशात नसेल. लाच देणाऱ्याला ही मनातून राग येत असतो, आणि घेणारा घरी जाऊन विचार करत असेल, यार आता मोदी आले आहेत , मी पकडला गेलो तर काय होईल? खूप वाईट झालं आहे आजवर. यात सुधारणा करण्याचं उत्तम साधन आहे. जे लोक भीम-आधार ॲप वापरून मला मदत करतील ते सर्व, भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत माझे सैनिक असतील. ही माझ्यासाठी फार मोठी ताकद आहे. आणि म्हणूनच मी माझ्या तरुणांना यात सामील होण्याचं आवाहन करतो. आणि ह्यावेळी ह्यात दोन नवीन गोष्टी टाकल्या आहेत. तर, १४ ऑक्टोबर पर्यंत ही योजना आपण चालवणार आहोत. आज १४ एप्रिल आहे. १४ ऑक्टोबर ह्या साठी की १४ ऑक्टोबरला बाबासाहेब आंबेडकरानी दीक्षा घेतली होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षा घेण्याचा हा पवित्र दिवस होता १४ ऑक्टोबर. आणि म्हणून १४ एप्रिल ते १४ ऑक्टोबर पर्यंत ही विशेष योजना आहे. आज आपण बघतो, चांगल्या घरातील तरुण देखील सुट्ट्यांमध्ये काही तरी काम करतात. श्रीमंत घरातील तरुण देखील आपली ओळख लपवून अशा ठिकाणी जातात, अशी कामे करतात. त्यांना स्वतःला प्रशिक्षित करण्याची इच्छा असते. ते ज्या घरात जन्माला येतात तिथे त्यांना असे करण्याची संधी मिळत नाही. ते हॉटेल मध्ये भांडी घासतात, वेटर म्हणून काम करतात आणि इतरही कामे करतात. कुणी पेट्रोल पंपावर काम करतात. अभिमानाने जगण्यासाठी.... आज नव्या पिढीच्या डोक्यात हे विचार सुरु असतात.

आधी आपण ऐकत असू, विदेशात तरुण रात्री दोन-दोन तीन-तीन तास अशी मेहनत करतात, टक्सी चालवतात, अमुक करतात, तमुक करतात. काही तरी कमी करतात आणि मग शिकतात. आज हिंदुस्थानात ह्या गोष्टी आल्या नाहीत असं नाही. आपल्या लक्षात येत नाहे. भीम-आधार योजनेअंतर्गत मी तरुणांना ह्या सुट्ट्यांमध्ये काम करण्यास निमंत्रित करतो. ह्यात एक रेफरल योजना आहे. रेफरल म्हणजे जर तुम्ही भीम एप बद्दल कुणाला समजावलं, एखाद्या व्यापाऱ्याला समजावलं, कुणा सामान्य माणसाला समजावलं, त्यांच्या मोबईलवर भीम ॲप डाऊनलोड करून दिलं आणि त्यानंतर ती व्यक्ती भीम ॲपवरून तीन व्यवहार करेल. कधी ३० रुपयाची, कधी १०० रुपयाची वस्तू खरेदी करेल. जर ती व्यक्ती तुमच्यामुळे भीम ॲप वापरू लागली असेल तर तुमच्या खात्यात १० रुपये जमा होतील. जर एका दिवसात २० लोकांनी जरी हे केलं तर संध्याकाळी तुमच्या खात्यात २०० रुपये जमा होतील. जर सुट्ट्यांच्या तीन महिन्यात रोज २०० रुपये कमावण्याचा निश्चय केला तर मला सांगा तुमच्यासाठी कठीण आहे का? काही घ्यायचं नाही काही द्यायचं नाही. फक्त त्यांना शिकवायचं आहे, समजवायचं आहे. आणि जो व्यापारी आपल्या दुकानात भीम-आधार ॲप लागू करेल, त्यावर व्यवहार सुरु करेल, त्याला २५ रुपये मिळतील. त्याच्या खात्यात २५ रुपये जमा होतील. म्हणजे, लोकांना समजावताना तुम्ही सांगू शकता की मला तर १० रुपये मिळतील, पण तुम्हाला २५ रुपये मिळतील. ही योजना १४ ऑक्टोबर, बाबासाहेबांच्या दीक्षा घेण्याच्या दिवसापर्यंत सुरु राहील. आपल्याकडे सहा महिने आहेत. ह्या सुट्ट्यांमध्ये प्रत्येक तरुण १०,००० रुपये, १५,०००० रुपये सहज कमवू शकतात. आणि भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई जिंकण्यात तुम्ही माझे सगळ्यात मोठे सहायक ठरू शकता. म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की ह्या योजनेतील बारकावे समजून घ्या आणि जे लिहिलं असेल तेच शेवटी समजावून सांगा. मी थोडं कमी जास्त बोलतो आहे. पण तुम्ही योजना वाचली की पूर्ण योजना तुम्हाला समजेल. आणि माझी इच्छा आहे की आता परीक्षा संपल्या आहेत. तर मग, मोबईल उचला, योजना समजून घ्या, लोकांना समजावून सांगा आणि रोज २०, २५, ३० लोकांना ह्यात सामील करून घ्या. संध्याकाळी तुम्ही २००-३०० रुपये कमावून घरी जा. पूर्ण सुट्ट्यांमध्ये तुम्ही पुढच्या वर्षीचा शिक्षणाचा खर्च स्वतः करू शकाल. कधी गरीब आईवडिलांकडे एक रुपया सुद्धा मागण्याची गरज पडणार नाही. क्रांती आणण्याचा हा एक प्रयत्न आहे.

आज इथे कमी रोख रक्कम वापरणाऱ्या ७५ वसाहतींचे लोकार्पण झाले. ह्याचा अर्थ हा की, ह्या वसाहतींमध्ये लोक राहतात, वेगवेगळी खते बनविणाऱ्या कंपन्यांच्या वसाहती आहेत, कुठे रेल्वे कर्मचाऱ्यांची वसाहत आहे, कुठे सैनिकांची वसाहत आहे. अशा ७५ वसाहतींनी व्यवहारात कमीत कमी रोकड वापरायला सुरुवात केली आहे. तर, जेंव्हा मी अशा पहिल्या वसाहतीचे सादरीकरण बघत होतो, मी म्हणालो, ह्यात भाजी विक्रेत्याला काय रस असेल ? तो का ह्या व्यवहारात आला आहे. तर तो म्हणाला, आधी मी ह्या वसाहतीत भाजी विकायचो. ज्या महिला भाजी घ्यायच्या, त्या २५ रुपये ८० पैसे झाले तर फक्त २५ रुपये द्यायच्या, ८० पैसे देत नसत. कितीही श्रीमंत घरातील महिला असो, कुठल्याही मोठ्या अधिकाऱ्याची पत्नी असो, ८० पैसे देत नसे. २५ रुपये घे, ८० पैसे सोडून दे. तो म्हणाला भीम-आधार ॲप मुळे मला पूर्ण २५ रुपये ८० पैसे मिळतात. आणि म्हणाला संध्याकाळी जे मला १५-२० रुपये कमी मिळायचे ते मिळू लागले. आता १५-२० रुपयाने माझी कमाई वाढली आहे. आता बघा, एका गरीब माणसाने ह्यातून किती फायदा मिळवला. पण ह्या ७५ वसाहतींमध्ये एक चांगली सुरुवात झाली आहे. देशातील रोख व्यवहार कमी करण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. आणि ह्यासाठी सुरु झालेल्या क्रांतीला हातभार लावला पाहिजे. आपण स्वतः ह्या क्रांतीचे सैनिक बनले पाहिजे. आणि त्याला पुढे नेले पाहिजे.

या योजनेच्या काळात अनेकांना सुमारे अडीचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची बक्षिसे मिळाली आहे. आज ज्या लोकांना बक्षिसे मिळालीत ते आणि आधीही मिळाली आहेत त्या सर्वाना माझी विनंती आहे की त्यांनी या बक्षिसावर समाधान मानू नये.हजारोंच्या संख्येने नागरिकांना बक्षिसे मिळाली आहेत, त्यांनी रोखरहित, डिजिटल व्यवहारांचा प्रसार करणारे सदिच्छादूत बनावे. हे काम पुढे न्यावे. देशात परिवर्तन आणण्यासाठी नागरिकांच्या मदतीने चालवले जाणारे हे एक मोठे यशस्वी अभियान आहे. मी रविशंकर जी आणि त्यांच्या पूर्ण चमूला, नीती आयोगाच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो आणी खूप खूप अभिनंदन करतो. त्यांनी एक निर्दोष तंत्रज्ञान विकसित करण्याचे पूर्ण प्रयत्न केले आहेत. त्यासाठी देशातील सगळ्या तंत्रज्ञानाच्या, नवनवीन संशोधनाचा अभ्यास केला, त्यापैकी आपल्या देशात उत्तम काय असू शकेल हे पहिले, भारतातातील सर्वसामान्य गरीब व्यक्तीही ज्यातून आपला व्यवहार पूर्ण करू शकतील, अशी वापरायला अतिशय सोपी व्यवस्था नीती आयोगाने विकसित केली आहे.

मी पुन्हा एकदा या विभागाच्या सर्वांचे अभिनंदन करतो. या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे आणि नागपूरच्या आयोजकांचे आभार मानतो. यजमान म्हणून त्यांनी या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले आहे. तुम्ही सगळे इथे मोठ्या संख्येने आलात, तुम्हाला भेटण्याची संधी मला दिली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार ! खूप खूप धन्यवाद !

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Festive season auto sales scale record high in 2023, up 19%, says FADA

Media Coverage

Festive season auto sales scale record high in 2023, up 19%, says FADA
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 नोव्हेंबर 2023
November 28, 2023

PM Modi’s Viksit Bharat – Sabka Saath, Sabka Vikas – Economy, Digital, Welfare and Social