Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Jumbo Indian contingent comprising 768 athletes, support staff and officials for Asian Games

Media Coverage

Jumbo Indian contingent comprising 768 athletes, support staff and officials for Asian Games
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
बेल्जियमच्या पंतप्रधानांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे प्रसार माध्यमांना निवेदन
September 03, 2026

महामहीम, पंतप्रधान महोदय,

दोन्ही देशांचे प्रतिनिधी,

माध्यमांमधील मित्रहो,

नमस्कार!

पंतप्रधान महोदयांचे त्यांच्या पहिल्या भारत दौऱ्यावर हार्दिक स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे.

हा त्यांचा पहिलाच भारत दौरा असला, तरी भारताशी त्यांचा परिचय जुना आहे. त्यांनी दीर्घकाळ अँटवर्पचे महापौर म्हणून काम केले आहे आणि अँटवर्पमधील मोठ्या भारतीय समुदायाला व भारत-बेल्जियम हिरे व्यापाराला त्यांनी नेहमीच पाठबळ दिले आहे.

मित्रांनो,

भारत आणि बेल्जियम यांच्यातील संबंधांची मुळे इतिहासात खोलवर रुजलेली आहेत. पहिल्या महायुद्धात बेल्जियममध्ये हजारो भारतीय सैनिकांचे साहस आणि बलिदान हे आपल्या सामायिक स्मृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे.

आज, लोकशाही मूल्ये, बाजार अर्थव्यवस्था आणि लोकांमधील दृढ परस्पर संबंध आपल्याला नैसर्गिक भागीदार बनवतात.

मित्रांनो,

दहा वर्षांपूर्वी मला बेल्जियमला भेट देण्याची संधी मिळाली होती; आणि मला अत्यंत आनंद आहे की गेल्या एका दशकात आपल्या भागीदारीने उल्लेखनीय प्रगती केली आहे.

आज आपल्या सहकार्याची व्याप्ती पारंपरिक क्षेत्रांच्या पलीकडे जाऊन संरक्षण आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या धोरणात्मक क्षेत्रांपर्यंत पोहोचली आहे. आपण 'झोरावर' टँकसारख्या आधुनिक संरक्षण उपकरणांवर एकत्रितपणे काम करत आहोत. आंध्र प्रदेशातील काकिनाडा येथे आपण जगातील सर्वात मोठ्या ग्रीन अमोनिया प्रकल्पांपैकी एक विकसित करत आहोत.

मित्रांनो,

आज जग एका मोठ्या उलथापालथीच्या टप्प्यातून जात आहे. जगातील अनेक भागांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अन्न, इंधन किंवा पुरवठा साखळी असो, प्रत्येक क्षेत्रात अनिश्चिततेचा प्रभाव दिसून येत आहे.

या आव्हानात्मक वातावरणातही भारताच्या अर्थव्यवस्थेने आपला वेग कायम ठेवला आहे. गेल्या तिमाहीत आपण 7.8% विकास दर नोंदवला आहे. आज भारताची विकासगाथा जगासाठी विश्वास आणि नवीन संधींचा स्रोत बनत आहे.

मित्रांनो,

या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही ऐतिहासिक भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार केला. जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशांमधील हे अभूतपूर्व सहकार्य जागतिक स्थिरता, विकास आणि सामायिक समृद्धीलाही नवी चालना देईल.

भारताच्या सातत्यपूर्ण आर्थिक प्रगतीने आणि या करारामुळे आमच्या आर्थिक संबंधांसाठी नवीन क्षितिजं खुली झाली आहेत. आज आम्ही या शक्यतांना ठोस परिणामांमध्ये रूपांतरित करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.

मित्रांनो,

आम्ही बेल्जियमच्या कंपन्यांसाठी भारतात एक 'गुंतवणूक जलदगती यंत्रणा' स्थापन केली आहे. आम्ही भारत-बेल्जियम व्यवसाय मंचाला एक नियमित यंत्रणा बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोन्ही देशांच्या वित्तीय, फिन-टेक आणि नियामक संस्थांमधील समन्वय वाढवू.

आणि या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे आमचे ध्येय साध्य करू.

मित्रांनो,

संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य हा आमच्या संबंधांचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे. आज आम्ही दोन देशांमधील लष्करी देवाणघेवाण आणि प्रशिक्षण सहकार्य वाढवण्यास सहमती दर्शवली आहे.

आमच्या सरकारांमधील आणि संरक्षण उद्योगांमधील करारामुळे संरक्षण सह-विकास आणि सह-उत्पादनासाठी नवीन संधी निर्माण होतील. आम्ही आमच्या विविध संस्थांमधील गुप्त माहितीची देवाणघेवाण आणि गुन्हेगारीविरोधी सहकार्य देखील अधिक मजबूत करू.

मित्रांनो,

स्वच्छ ऊर्जेचे भविष्य आणि विश्वसनीय पुरवठा साखळी ही आमची सामायिक प्राथमिकता आहे. नवीकरणीय ऊर्जेवरील आजचा सामंजस्य करार आमच्या शाश्वतता सहकार्याला नवीन चालना देईल. महत्वपूर्ण खनिजांच्या बाबतीत आम्ही प्रक्रिया आणि पुनर्वापरामध्ये सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सेमीकंडक्टर क्षेत्रातील बेल्जियमचे नैपुण्य आणि भारताची व्यापक क्षमता हे एकमेकांना पूरक आहेत. या दिशेने बेल्जियमच्या आयएमईसी संस्थेला भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेशी जोडण्यासाठी एकत्रितपणे काम करू.

मित्रांनो,

लोकांमधील परस्पर संबंध ही आपल्या द्विपक्षीय संबंधांची सर्वात मोठी ताकद आहे. आज आम्ही आपल्या स्टार्ट-अप्समधील परस्पर संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी तसेच सागरी क्षेत्रातील क्षमता-निर्मिती वाढवण्याबाबत सहमती दर्शवली.

आपण विद्यापीठे आणि संशोधन क्षेत्रातील सहकार्यही अधिक बळकट करू. तसेच प्रतिभावान मनुष्यबळाच्या गतिशीलतेसाठी आपण लवकरच ‘स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करार’ करणार आहोत.

मित्रांनो,

आज आम्ही प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही सविस्तर चर्चा केली. भारत आणि बेल्जियम हे दोन्ही देश कायद्याचे राज्य, संवाद आणि मुत्सद्देगिरी यांवर विश्वास ठेवतात.

युक्रेन असो किंवा पश्चिम आशिया, संघर्ष लवकरात लवकर संपुष्टात यावा आणि शांततेसाठी सुरू असलेल्या सर्व प्रयत्नांना आमचा पाठिंबा आहे. तसेच दहशतवादाच्या प्रत्येक स्वरूपाचे मुळापासून उच्चाटन करणे ही आमची समान बांधिलकी आहे.

महामहिम,

गेल्या महिन्यात बेल्जियम आणि नेदरलँड्स यांनी संयुक्तपणे हॉकी विश्वचषकाचे यजमानपद भूषवले. या विश्वचषकाचे भव्य आयोजन केल्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो. तसेच आमच्या खेळाडूंनी केलेल्या मेहनतीचे आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे मी कौतुक करतो.

हिऱ्यांनी भारत आणि बेल्जियमला दीर्घकाळापासून जोडले आहे. आज आपण या ऐतिहासिक संबंधांना एका व्यापक भागीदारीचे नवे स्वरूप देत आहोत.

आज झालेली आपली चर्चा परस्पर संबंधांमध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात ठरेल, असा मला विश्वास आहे.

पुन्हा एकदा, आपले आणि आपल्या शिष्टमंडळाचे भारतात मनःपूर्वक स्वागत.

खूप खूप धन्यवाद.