तामिळनाडूत तुतिकोरीनमधील 4800 कोटी रुपये मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांची करणार पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण
तुतिकोरीन विमानतळावरील नव्या टर्मिनल इमारतीचे पंतप्रधान करणार उद्घाटन
कार्यक्षम प्रादेशिक संपर्कव्यवस्थेसाठी 3600 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे पंतप्रधान करणार लोकार्पण
पंतप्रधान कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातून वीज पारेषणासाठी आंतरराज्यीय पारेषण प्रणालीची करणार पायाभरणी
पंतप्रधान करणार व्ही. ओ. चिदम्बरनार बंदरातील माल हाताळणी सुविधेचे उद्घाटन
पंतप्रधान आदि थिरुवाथिराई उत्सवानिमित्त तिरुचिरापल्लीला देणार भेट

यूके आणि मालदीव दौऱ्यावरून परतल्यानंतर लगेचच, पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 जुलै रोजी रात्री 8 च्या सुमारास तामिळनाडूतील तुतिकोरिन येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात 4800 कोटी रूपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण करतील.

27 जुलै रोजी, पंतप्रधान तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली येथील गंगाईकोंडाचोलापुरम मंदिरात दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला आदि थिरुवाथिराई उत्सवासह, महान चोल सम्राट राजेंद्र चोल प्रथम यांच्या जयंती समारंभात सहभागी होतील.

तुतिकोरिनमध्ये पंतप्रधान

मालदीवमधील आपला शासकीय दौरा पूर्ण केल्यानंतर, पंतप्रधान थेट तुतिकोरिन येथे पोहोचतील आणि अनेक क्षेत्रांतील महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील. हे प्रकल्प प्रादेशिक संपर्क व्यवस्थेत लक्षणीय वाढ करतील,  तसेच यामुळे माल वाहतूक  कार्यक्षमता वाढणार आहे. याचबरोबर स्वच्छ ऊर्जा, पायाभूत सुविधा मजबूत करतील आणि संपूर्ण तामिळनाडूतील नागरिकांचे जीवनमान सुधारतील.

जागतिक दर्जाच्या हवाई पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या आणि संपर्कव्यवस्थेत वाढ करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेला अनुसरून,  तुतिकोरिन विमानतळावर सुमारे 450 कोटी रुपये खर्चाने बांधलेल्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान करतील. या वास्तूची  रचना दक्षिणेकडील  भागातील वाढत्या विमान वाहतुकीची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून करण्यात आली आहे. पंतप्रधान तुतिकोरिन विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीमध्‍ये प्रत्यक्ष फेरफटका मारून या वास्तूची  पाहणी देखील करतील.

या टर्मिनलचा 17,340 चौरस मीटरमध्ये विस्तार करण्‍यात आला असून  जास्तीत जास्त गर्दीच्या वेळी 1,350 प्रवाशांची आणि वर्षाला 20 लाख प्रवाशांची हाताळणी करण्याची या टर्मिनलची क्षमता आहे. तसेच भविष्यात जास्तीत जास्त गर्दीच्या वेळी हाताळणीच्या क्षमतेचा 1,800 प्रवासी आणि वर्षाला 25 लाख प्रवाशांपर्यंत विस्तार केला जाऊ शकतो. 100% एलईडी प्रकाश व्यवस्था, ऊर्जा-कार्यक्षम ई अँड एम प्रणाली आणि आहे त्याच जागेवर  सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाद्वारे प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर यामुळे हे टर्मिनल ‘ GRIHA-4’  शाश्वतता मानांकन मिळवण्यासाठी बांधले गेले आहे. या आधुनिक पायाभूत सुविधेमुळे प्रादेशिक हवाई संपर्कव्यवस्थेत लक्षणीय वाढ होण्याची आणि दक्षिण तामिळनाडूमध्ये पर्यटन, व्यापार आणि गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

रस्ते पायाभूत सुविधा क्षेत्रात उभारण्‍यात आलेल्या   दोन धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण महामार्ग प्रकल्पांचे पंतप्रधान लोकार्पण करतील.  यातील पहिला प्रकल्प  एनएच -36 च्या सेथियाथोप-चोलापुरम रस्त्याच्या 50 किमी लांबीच्या पट्ट्याच्या चौपदरीकरणाचा  आहे.  हा प्रकल्प  विक्रावंडी-तंजावर कॉरिडॉर अंतर्गत 2,350 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाने विकसित केला आहे. यात तीन बायपास, कोल्लीडम नदीवरील 1 किमी लांबीचा चार-मार्गिकांचा पूल, चार मोठे पूल, सात उड्डाणपूल आणि अनेक अंडरपास यांचा समावेश आहे, ज्यामुळे सेथियाथोप-चोलापुरम दरम्यानचा प्रवासाचा वेळ 45 मिनिटांनी कमी होईल आणि त्रिभुज प्रदेशातील सांस्कृतिक आणि  कृषी केंद्रांशी संपर्कव्यवस्थेत वाढ होईल.

दुसरा प्रकल्प हा 5.16 किमी लांबीच्या एनएच-138 तुतिकोरिन बंदर मार्गाचे सहा- पदरीकरण करण्याचा आहे. यासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.   या कामाअंतर्गत बांधल्या जाणाऱे  भुयारी मार्ग (अंडरपासेस) आणि पुलामुळे मालवाहतूक सुलभ होईल, माल वाहतुकीच्या  खर्चात बचत होईल आणि व्ही.ओ. चिदंबरनार बंदराभोवती बंदर-आधारित औद्योगिक प्रगतीलाही चालना मिळेल.

बंदर पायाभूत सुविधा आणि स्वच्छ ऊर्जा उपक्रमांना मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधान व्ही.ओ. चिदंबरनार बंदर क्षेत्रात सुमारे 285 कोटी रुपये खर्चाच्या 6.96 दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष ( एमएमटीपीए) इतकी माल हाताळणी क्षमता असलेल्या नॉर्थ कार्गो बर्थ-III चे उद्घाटन करतील. यामुळे या प्रदेशात वाढत असलेल्या मोठ्या प्रमाणावर कोळसा, धान्य, खनिजे अशा कोरड्या कच्च्या  मालाची  हाताळणीची गरजा पूर्ण व्हायला मदत होणार आहे. यामुळे बंदराच्या एकूण कार्यक्षमतेत सुधारणा घडून येईल आणि तिथे माल हाताळणी अनुकुल वाहतूक विषयक सुविधा उपलब्ध होतील.

दक्षिण तामिळनाडूमध्ये शाश्वत आणि कार्यक्षम दळणवळणासाठी संपर्क  जोडणीला चालना देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान तीन प्रमुख रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पही राष्ट्राला समर्पित करतील. याअंतर्गतच्या 90 किमी लांबीच्या मदुराई-बोडीनायक्कनूर रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणामुळे पर्यावरणास अनुकूल वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल आणि मदुराई तसेच थेनीमधील पर्यटन आणि प्रवासी वाहतूकही सुरळीत होण्यास मदत होईल. थिरुवनंतपुरम-कन्याकुमारी प्रकल्पाचा भाग असलेला 21 किमी लांबीच्या नागरकोईल टाऊन-कन्याकुमारी विभागाचे 650 कोटी रुपये खर्चाचे दुहेरीकरण केल्याने तामिळनाडू आणि केरळ यांच्यामध्‍ये  दळणवळण संपर्क  जोडणी अधिक मजबूत होईल. याव्यतिरिक्त, अरलवायमोझी-नागरकोईल जंक्शन (12.87 किमी) आणि तिरुनेलवेली-मेलप्पलयाम (3.6 किमी) विभागांचे दुहेरीकरण झाल्याने चेन्नई-कन्याकुमारी सारख्या दक्षिणेकडील प्रमुख मार्गांवर प्रवासाच्या वेळेची बचत होईल आणि प्रवासी तसेच मालवाहतूक क्षमतेत सुधारणा होऊन प्रादेशिक आर्थिक एकात्मिकरणाची व्याप्तीही  वाढेल.

राज्यामध्‍ये  वीज पुरवठा  पायाभूत सुविधा आणखी मजबूत करण्यासाठी आणि त्याची सुनिश्चिती करण्यासाठी, पंतप्रधान एका मोठ्या वीज पारेषण प्रकल्पाची (power transmission project) पायाभरणी करतील. याअंतर्गत सुमारे 550 कोटी रुपये खर्चून कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या युनिट्स 3 आणि 4 (2x1000 मेगावॅट) मधून विजेच्या वहनासाठी आंतर-राज्य पारेषण प्रणाली (Inter-State Transmission System - ISTS) विकसित केली जाणार आहे. या प्रकल्पात कुडनकुलम ते तुतिकोरिन-II  जीआयएय  उपकेंद्रापर्यंत 400 केव्ही  (quad) दुहेरी-सर्किट पारेषण लाईन आणि संबंधित टर्मिनल उपकरणांचा समावेश  असणार आहे. हा प्रकल्प राष्ट्रीय वीज पुरवठा व्यवस्था मजबूत करण्यासाठी, विश्वासार्ह स्वच्छ ऊर्जा वितरण सुनिश्चित करण्यासाठी आणि तामिळनाडू तसेच इतर लाभार्थी राज्यांची वाढती विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.

पंतप्रधानांचा तिरुचिरापल्लीमधील कार्यक्रम

या बरोबरीनेच पंतप्रधान तिरुचिरापल्लीमध्ये गंगाईकोंडा चोलापुरम मंदिरात एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान भारताच्या महान सम्राटांपैकी एक असलेल्या, राजेंद्र चोल पहिले (1) यांना श्रद्धांजली म्हणून स्मरणिका स्वरुपातले नाणेही (commemorative coin) प्रकाशित करणार आहेत, तसेच ते गंगाईकोंडा चोलापुरम मंदिरातील आदि थिरुवाथिराई सार्वजनिक उत्सवामध्‍येही सहभागी होतील.

हा विशेष सोहळा राजेंद्र चोल 1 यांच्या दक्षिण-पूर्व आशियातील दिग्गज सागरी मोहिमेला 1,000 वर्षे पूर्ण झाल्याची घटना आणि चोल स्थापत्यकलेचे एक भव्य उदाहरण असलेल्या प्रतिष्ठित गंगाईकोंडा चोलापुरम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाल्याच्या घटनेचे गौरवार्थ स्मरण म्हणून साजरा केला जाणार आहे.

राजेंद्र चोळ 1 (1014-1044 CE) हे भारतीय इतिहासातील सर्वात शक्तिशाली आणि द्रष्ट्या शासकांपैकी एक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली, चोल साम्राज्याने दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये आपल्या वर्चस्वाचा विस्तार केला होता. त्यांनी आपल्या विजयी मोहिमांनंतर गंगाईकोंडा चोलापुरम ही शाही राजधानी म्हणून स्थापित केली. त्यांनी तेथे बांधलेले मंदिर 250 वर्षांहून अधिक काळ शैव भक्ती, भव्य वास्तुकला आणि प्रशासकीय कौशल्याचे प्रतीक राहिले आहे. अत्यंत नाजूक, बारीक कोरीव काम असलेली  शिल्पकला, चोल  कांस्य आणि प्राचीन शिलालेखांसाठी प्रसिद्ध असलेले हे मंदिर आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक स्थळ आहे.

आदि थिरुवाथिराई उत्सवाच्या माध्यमातून तमिळ शैव भक्ती परंपरेच्या समृद्ध वारशाचा सोहळाही साजरा केला जातो. या सोहळ्याला चोल साम्राज्याने कायमच सहकार्यपूर्ण पाठबळ दिले होते. 63 नायनार अर्थात तमिळ शैव संत-कवींनी हा इतिहास  अजरामर केला. विशेष म्हणजे या वर्षी 23 जुलै पासून राजेंद्र चोल  यांचे जन्म नक्षत्र, थिरुवाथिराई (आर्द्रा) सुरू झाले, त्यामुळेही या वर्षीचा उत्सव अधिक महत्त्वाचा बनला आहे.

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Hiring momentum: India Inc steps up recruitment in 2025; big firms drive gains as demand picks up

Media Coverage

Hiring momentum: India Inc steps up recruitment in 2025; big firms drive gains as demand picks up
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 नोव्हेंबर 2025
November 15, 2025

From Bhagwan Birsa to Bullet GDP: PM Modi’s Mantra of Culture & Prosperity