योगने संपूर्ण जगाला एकजुट केले : पंतप्रधान
योग सीमांच्या पलीकडे, पार्श्वभूमीच्या पलीकडे, वय किंवा क्षमतेच्या पलीकडे प्रत्येकासाठी आहे : पंतप्रधान
योग आपल्याला जगाशी एकरूप होण्याच्या प्रवासाला घेऊन जातो, तो आपल्याला केवळ आपल्या एकट्याचे अस्तित्व नसून आपण निसर्गाचा भाग आहोत याची शिकवण देतो : पंतप्रधान
योग ही आपल्याला 'मी' पासून ते 'आपण' या भावने पर्यंत घेऊन जाणारी व्यवस्था आहे : पंतप्रधान
योग हे श्वास घेण्यासाठी, संतुलन साधण्यासाठी, पुन्हा पूर्णत्वापर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने मानवतेसाठी गरजेचे असलेले विरामाचे बटण आहे : पंतप्रधान
हा योग दिन, जिथे आत्मिक शांतता जागतिक धोरण असेल अशा प्रकारच्या Yoga for Humanity 2.0 ची सुरुवात ठरो : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे आयोजित 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्याला संबोधित केले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व केले आणि योगसाधना सत्रात भाग घेतला.

यावेळी पंतप्रधानांनी आपल्या संबोधनातून भारत आणि जगभरातील लोकांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या, तसेच 21 जून रोजी एकत्रितपणे योग साधना करण्यासाठी जग एकत्र येण्याचा हा अकरावा प्रसंग असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. एकजूट होणे हेच योग साधनेचे सार आहे आणि योग साधनेने ज्या रितीने जगाला एकत्र आणले आहे ते पाहणे आनंददायी असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी गेल्या दशकभरातील योग साधनेच्या प्रवासाचाही मागोवा घेतला. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कल्पनेचा प्रस्ताव मांडलेल्या क्षणाची आठवण त्यांनी सांगितली. त्यावेळी 175 देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला, इतक्या व्यापक जागतिक एकतेचे हे एक दुर्मिळ उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले. हा पाठिंबा केवळ एका प्रस्तावासाठी नव्हता, तर मानवतेच्या मोठ्या कल्याणासाठी जगाने केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे ते प्रतिनिधित्व करत होते, ही बाब त्यांनी आवर्जून नमूद केली. आता अकरा वर्षांनंतर, योग साधना जगभरातील लाखो लोकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला असल्याचे ते म्हणाले.  दिव्यांग व्यक्ती ब्रेल लिपीत ज्या रितीने योग ग्रंथ वाचतात, आणि शास्त्रज्ञ अवकाशात ज्या रितीने योग साधना करतात ते पाहून अभिमान वाटत असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.  ग्रामीण भागातील युवा वर्गाने योग ऑलिंपियाडमध्ये उत्साहाने भाग घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. सिडनी ऑपेरा हाऊसच्या पायऱ्या असोत, माउंट एव्हरेस्टचे शिखर असो, अथवा समुद्राची अथांगता असो, अगदी  प्रत्येक ठिकाणी सीमांच्या पलीकडे, पार्श्वभूमीच्या पलीकडे, वय किंवा क्षमतेच्या पलीकडे,ही योग प्रत्येकासाठी आणि सर्वांसाठी आहे हा एकच संदेश असतो असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

 

विशाखापट्टणममधल्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हे शहर निसर्ग आणि प्रगतीचा संगम असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी लोकांचे कौतुक केले आणि चंद्राबाबू नायडू तसेच पवन कल्याण यांचेही त्यांच्या नेतृत्वासाठी अभिनंदन केले. या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली, आंध्र प्रदेशने योगआंध्र अभियान हा एक उल्लेखनीय उपक्रम सुरू केला असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. नारा लोकेश यांच्या प्रयत्नांचेही त्यांनी विशेष कौतुक केले. योग कशा रितीने एक खरा सामाजिक उत्सव बनू शकतो आणि समाजातील प्रत्येक घटकाला त्यात कसे सामावून घेतले जाऊ शकते हे नारा लोकेश यांनी दाखवून दिले आहे असे ते म्हणाले.  गेल्या दीड महिन्यांत, लोकेश यांनी योगआंध्र अभियानातून अनुकरणीय वचनबद्धता दर्शविली आहे आणि त्यांच्या प्रयत्नांसाठी ते कौतुकास पात्र आहेत असे पंतप्रधान म्हणाले.

2 कोटींहून अधिक लोक योगआंध्र अभियानात सामील झाले आहेत, यातून सार्वजनिक सहभागाची चैतन्यमय भावना दिसून येते ही बाब पंतप्रधानांनी नमूद केली. या भावनेतूनच विकसित भारताचा पाया रचला जात असल्याचे ते म्हणाले. जेव्हा नागरिक स्वतः एखाद्या अभियानाची जबाबदारी घेतात आणि त्यात सक्रियपणे सहभागी होतात, त्यावेळी कोणतेही ध्येय आवाक्याबाहेर राहत नाही, असे ते म्हणाले. विशाखापट्टणममधील संपूर्ण कार्यक्रमात लोकांच्या सदिच्छा आणि उत्साही प्रयत्न दिसून आल्याचेही त्यांनी नमूद केले.

या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या एक पृथ्वी, एक आरोग्य यासाठी योग या संकल्पनेचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. या संकल्पनेतून, पृथ्वीवरील प्रत्येक घटकाचे आरोग्य परस्परांशी जोडलेले आहे या एका गहन सत्याची प्रचिती येते असे ते म्हणाले. मानवी कल्याण, आपले अन्न पिकवणाऱ्या मातीच्या आरोग्यावर, आपल्या पाणी पुरवणाऱ्या नद्यांवर, आपल्या परिसंस्थेत राहात असलेल्या प्राण्यांवर आणि आपल्याला पोषण देणाऱ्या वनस्पतींवर अवलंबून असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. योग साधना आपल्याला या परस्पर संबंधांची  जाणीव करून देते आणि जगाशी एकरूप होण्याच्या प्रवासात आपल्याला मार्गदर्शन करत राहते असे ते म्हणाले. या जगात केवळ आपल्या एकट्याचे अस्तित्व नाही, तर आपण निसर्गाचे अविभाज्य भाग आहोत याची शिकवण योग आपल्याला देते ही बाब त्यांनी अधोरेखित केली. सुरुवातीला आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याची आणि कल्याणाची काळजी घ्यायला शिकतो, पण हळूहळू, ही काळजी आपल्या पर्यावरणापर्यंत, समाजापर्यंत आणि ग्रहापर्यंत विस्तारत जाते असे त्यांनी सांगितले. योग साधना म्हणजे एक मोठी वैयक्तिक शिस्त आहे, मात्र त्याच वेळी ही एक अशी सामूहिक व्यवस्था आहे, ज्याअंतर्गत व्यक्ती 'मी' पासून ते 'आपण' या भावनेपर्यंतची वाटचाल करतो असे पंतप्रधानांनी सांगितले.

 

"‘मी' ते 'आपण' ही भावना भारताचा आत्मा आहे," ही बाब त्यांनी अधोरेखित केली.  जेव्हा एखादी व्यक्ती केवळ स्वतःचा स्वार्थ टाळत, त्यापलिकडे मोठ्या प्रमाणात समाजाबद्दल विचार करू लागते, त्यावेळेसच संपूर्ण मानवतेचे कल्याण शक्य होते असे ते म्हणाले. भारतीय संस्कृती आपल्याला सर्वे भवन्तु सुखिनः, अर्थात  सर्वांचे कल्याण हेच आपले पवित्र कर्तव्य आहे या मूल्याची शिकवण देते, आणि मी पासून ते आपण या भावनेपर्यंतचा  हा प्रवास सेवा, समर्पण आणि सहअस्तित्वाचा पाया रचतो असे त्यांनी सांगितले. याच विचारांतून सामाजिक सलोखाही वाढतो असे त्यांनी सांगितले.

यावेळी पंतप्रधानांनी जगाच्या विविध भागांमध्ये वाढलेल्या तणाव, अशांतता आणि अस्थिरतेबद्दल चिंता व्यक्त केली. अशा काळात, योग साधना शांततेचा मार्ग देत असून,  योग हे श्वास घेण्यासाठी, संतुलन साधण्यासाठी, पुन्हा पूर्णत्वापर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने   मानवतेसाठी गरजेचे असलेले विरामाचे बटण झाले असल्याचे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी जागतिक समुदायालाही विशेष आवाहन केले. हा योग दिन, जिथे आत्मिक शांतता जागतिक धोरण असेल अशा प्रकारच्या Yoga for Humanity 2.0 सुरुवात ठरो अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

 

योग केवळ वैयक्तिक साधना राहू नये तर जागतिक भागीदारीचे माध्यम बनला पाहिजे यावर त्यांनी भर दिला. त्यांनी प्रत्येक राष्ट्र आणि प्रत्येक समाजाला त्यांच्या जीवनशैलीत आणि सार्वजनिक धोरणात योगचा समावेश करण्याचे आवाहन केले. शांततापूर्ण, संतुलित आणि शाश्वत जग निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची कल्पना मोदी यांनी स्पष्ट केली. "योगाने जगाला संघर्षाकडून सहकार्याकडे आणि तणावाकडून उपायांकडे मार्गदर्शित केले पाहिजे", असेही ते म्हणाले.

योग विज्ञानाच्या जागतिक प्रसाराला पाठिंबा देण्यासाठी आधुनिक संशोधनाद्वारे बळकटी देण्याच्या भारताच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना, पंतप्रधानांनी नमूद केले की देशातील आघाडीच्या वैद्यकीय संस्था सक्रियपणे योगविषयक संशोधन करत आहेत. याचा उद्देश समकालीन वैद्यकीय पद्धतींमध्ये त्याची वैज्ञानिक प्रासंगिकता स्थापित करणे हा आहे.

 

भारत आपल्या वैद्यकीय आणि संशोधन संस्थांद्वारे योगच्या क्षेत्रात पुराव्यावर आधारित थेरपीला प्रोत्साहन देत आहे यावर त्यांनी भर दिला. या दिशेने दिलेल्या अनुकरणीय योगदानाबद्दल  मोदी यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), नवी दिल्लीचे कौतुक केले. एम्सच्या संशोधनाच्या निष्कर्षांचा हवाला देत त्यांनी सांगितले की, योगाने हृदयरोग आणि न्यूरोलॉजिकल विकारांवर उपचार करण्यात तसेच महिलांचे आरोग्य आणि मानसिक आरोग्य सुधारण्यात महत्त्वपूर्ण परिणाम दर्शविले आहे.

राष्ट्रीय आयुष अभियानाच्या माध्यमातून देशभरात योग आणि आरोग्याचा संदेश सक्रियपणे पोहोचवला जात आहे, असे मोदी यांनी नमूद केले. या प्रयत्नात डिजिटल तंत्रज्ञानाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे देखील त्यांनी नमूद केले.

 

योग पोर्टल आणि योगआंध्र पोर्टलद्वारे देशभरात दहा लाखांहून अधिक कार्यक्रमांची नोंदणी झाली आहे. यावरून देशभरात योगाचा उल्लेखनीय विस्तार दिसून येतो. भारताच्या कानाकोपऱ्यात होणाऱ्या कार्यक्रमांचे प्रमाण योगाच्या वाढत्या प्रभावाचे प्रतिबिंब आहे असे त्यांनी सांगितले.

"भारतात उपचार करा/ Heal in India" या मंत्राची वाढती जागतिक लोकप्रियता लक्षात घेऊन, भारत उपचारांसाठी एक अग्रगण्य ठिकाण म्हणून उदयास येत आहे यावर प्रकाश टाकत, मोदी यांनी या विकासात योग महत्त्वाची भूमिका बजावत आहे यावर भर दिला. योगाचे प्रमाणीकरण करण्यासाठी एक सामान्य योग प्रोटोकॉल विकसित करण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. योग प्रमाणन मंडळाच्या प्रयत्नांअंतर्गत 6.5 लाखांहून अधिक स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि सुमारे 130 संस्थांना मान्यता दिली आहे.  पंतप्रधानांनी समग्र निरामयता  परिसंस्था तयार करण्याच्या भाग म्हणून वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 10 दिवसांच्या योग मॉड्यूलचा समावेश केल्याचीही नोंद त्यांनी घेतली. देशभरातील आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये प्रशिक्षित योग शिक्षक तैनात केले जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. भारताच्या निरामयता परिसंस्थेचा जागतिक समुदायाला फायदा व्हावा यासाठी पंतप्रधानांनी विशेष ई-आयुष व्हिसाची तरतूद जाहीर केली.

लठ्ठपणाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधून, त्याला वाढत्या जागतिक समस्येचे नाव देत,   मोदी यांनी मन की बात कार्यक्रमादरम्यान या विषयावर केलेल्या चर्चेची सविस्तर आठवण करून दिली आणि दैनंदिन आहारात तेलाचा वापर 10 टक्क्यांनी कमी करण्याचे आव्हान सुरू केले होते. पंतप्रधानांनी भारत आणि जगभरातील नागरिकांना या उपक्रमात सामील होण्याचे आवाहन पुन्हा केले. व्यक्तींनी त्यांच्या जेवणात तेलाचा वापर कमीत कमी 10  टक्के कसा कमी करू शकतो याबद्दल जागरूकता पसरवण्याची गरज अधोरेखित करून, मोदी म्हणाले की तेलाचे सेवन कमी करणे, अस्वास्थ्यकर आहार टाळणे आणि योगाभ्यास करणे हे निरोगी जीवनशैलीचे महत्त्वाचे घटक आहेत.

 

योगाला जनआंदोलनात - एका  लोकचळवळीत रूपांतरित करण्याचे आवाहन करून, पंतप्रधानांनी अशा चळवळीची अपेक्षा व्यक्त केली जी जगाला शांती, आरोग्य आणि सौहार्दाकडे घेऊन जाईल. जीवनात संतुलन आणण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपला दिवस योगाभ्यासाने  सुरू करावा आणि प्रत्येक समाजाने तणावमुक्त राहण्यासाठी योगचा स्वीकार करावा असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधानांनी समारोप करताना म्हटले की, “योग हा मानवतेला एकत्र जोडणारा धागा म्हणून उपयोगात आणला जाऊ शकतो, एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग हा जागतिक संकल्प बनला पाहिजे”.

आंध्र प्रदेशचे राज्यपाल सय्यद अब्दुल नजीर, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू, केंद्रीय मंत्री राममोहन नायडू किंजरापू, प्रतापराव जाधव, डॉ चंद्रशेखर पेम्मासानी, भूपती राजू श्रीनिवास वर्मा आदी कार्यक्रमात उपस्थित होते.

पार्श्वभूमी

11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, पंतप्रधानांनी विशाखापट्टणम येथून राष्ट्रीय उत्सवाचे नेतृत्व केले. विशाखापट्टणमच्या समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या कॉमन योगा प्रोटोकॉल सत्रात त्यांनी सुमारे 5 लाख सहभागींसह भाग घेतला आणि  योग प्रात्यक्षिकात नेतृत्व केले.

 

संपूर्ण भारतात 3.5 लाखांहून अधिक ठिकाणी एकाच वेळी योग संगम कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या वर्षी, MyGov आणि MyBharat सारख्या प्लॅटफॉर्मवर योगा अनप्लग्ड अंतर्गत योग विथ फॅमिली आणि युवा-केंद्रित उपक्रमांसारख्या विशेष स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात सहभाग वाढला आहे.

या वर्षीची संकल्पना, "एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग" ही मानव आणि पृथ्वीच्या आरोग्याच्या परस्परसंबंधावर प्रकाश टाकते आणि भारताच्या "सर्वे संतु निरामय" (सर्वजण रोगमुक्त असावे) या तत्वज्ञानात रुजलेल्या सामूहिक कल्याणाचा जागतिक दृष्टिकोन प्रतिध्वनीत  करते.

2015 मध्ये स्थापना झाल्यापासून, जेव्हा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने (UNGA) 21  जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा भारताचा प्रस्ताव स्वीकारला, तेव्हापासून पंतप्रधानांनी नवी दिल्ली, चंदीगड, लखनौ, म्हैसूर, न्यू यॉर्क (संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय) आणि श्रीनगर यासह विविध ठिकाणांहून योगदिनाचे  नेतृत्व केले आहे. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय योग दिन एक शक्तिशाली जागतिक आरोग्य चळवळीत विकसित झाला आहे.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
FIIs pour over $1 billion into Indian stocks, biggest weekly buying since June 2025

Media Coverage

FIIs pour over $1 billion into Indian stocks, biggest weekly buying since June 2025
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister expresses grief over loss of lives due to boat capsizing in South 24 Parganas district of West Bengal
July 13, 2026
Prime Minister announces ex-gratia

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed deep grief over the loss of lives due to the capsizing of a boat in the South 24 Parganas district of West Bengal.

The Prime Minister conveyed his thoughts to the bereaved families in this hour of grief and prayed for the speedy recovery of the injured.

The Prime Minister announced that an ex-gratia of Rs. 2 lakh from the Prime Minister’s National Relief Fund (PMNRF) would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000.

The Prime Minister’s Office posted on X;

“The loss of lives due to the capsizing of a boat in the South 24 Parganas district of West Bengal is deeply painful. My thoughts are with the bereaved families in this hour of grief. May the injured recover at the earliest.

An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi”