राष्ट्रपतींनी विकसित भारताच्या दिशेने भारताच्या प्रवासात गेल्या वर्षभरात झालेली जलद प्रगती स्पष्टपणे अधोरेखित केली : पंतप्रधान
या शतकातील दुसरा पंचवीस वर्षांचा टप्पा विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वाचा असेल: पंतप्रधान
प्रत्येक नागरिकाला वाटत आहे की देश एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला आहे आणि मागे वळून न पाहता पुढे जात राहिले पाहिजे: पंतप्रधान
ग्लोबल साऊथचा एक बुलंद आवाज म्हणून भारत उदयास आला आहे: पंतप्रधान
देशाच्या युवकांसाठी हा अनंत संधींचा काळ आहे: पंतप्रधान
कितीही आव्हाने असली तरी त्यावर आपल्याकडे 140 कोटी उपाय आहेत: पंतप्रधान
भारत आता ही संधी दवडणार नाही, तो आता आघाडीवर राहून नेतृत्व करेल: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर दिले. सभागृहाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि आभार प्रस्तावाच्या समर्थनार्थ आपल्या भावना व्यक्त करणे हे आपले  भाग्य असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की गेल्या वर्षभरात विकसित भारताच्या प्रवासात वेगाने प्रगती झाली आहे, प्रत्येक क्षेत्रात आणि समाजाच्या सर्व घटकांमध्ये परिवर्तन झालेले दिसून येत असून देश योग्य दिशेने वेगाने पुढे जात आहे. राष्ट्रपतींनी हे विषय अतिशय संवेदनशीलतेने आणि स्पष्टपणे मांडले आहेत असे मोदी यांनी अधोरेखित केले.

राष्ट्रपतींनी मध्यमवर्ग, निम्न मध्यमवर्ग, गरीब, गावे, शेतकरी, महिला, विज्ञान, तंत्रज्ञान आणि शेती याबद्दल विस्ताराने सांगितले आणि संसदेत भारताच्या प्रगतीचा आवाज मांडला यावर मोदी यांनी भर दिला. देशाचे युवक भारताच्या सामर्थ्याला कसे पुढे नेत आहेत याबाबतही राष्ट्रपतींनी सविस्तरपणे सांगितले आणि प्रत्येक वर्गाच्या क्षमता व्यक्त करताना भारताच्या उज्ज्वल भविष्याप्रति विश्वास व्यक्त केला जे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

21व्या शतकातील पंचवीस वर्षांचा पहिला टप्पा संपला आहे आणि ज्याप्रमाणे गेल्या शतकातला  पंचवीस वर्षांचा दुसरा टप्पा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात निर्णायक होता, त्याचप्रमाणे हा दुसरा टप्पा  विकसित भारताच्या उभारणीतही तितकाच सामर्थ्यवान आणि वेगवान असेल, असे मोदी म्हणाले. ते म्हणाले की, प्रत्येक नागरिकाला वाटत आहे की देश एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला आहे, जिथे थांबण्याचा किंवा मागे वळून पाहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, फक्त वेगाने पुढे जायचे आहे, ध्येय साध्य करायचे आहे आणि ते गाठल्यानंतरच श्वास घ्यायचा आहे आणि या दिशेने देश प्रगती करत आहे.

भारत सध्या अनुकूल परिस्थितीचा दुर्मिळ संगम पाहत आहे असे अधोरेखित करत पंतप्रधानांनी हा सुखद योगायोग असल्याचे म्हटले. जगातील सर्वात श्रीमंत देश वृद्ध होत असताना, भारत विकासाची नवी उंची गाठत आहे आणि वाढत्या युवा लोकसंख्येसह देशही तरुण बनत आहे यावर त्यांनी भर दिला. भारतातील प्रतिभावंतांची जगाने दखल घेतली असून जगाचे भारताप्रति आकर्षण लक्षणीयरीत्या वाढले आहे, यावर मोदी यांनी भर दिला. त्यांनी नमूद केले की भारतात प्रतिभावंतांची खाण आहे ज्यांच्याकडे स्वप्ने आहेत, दृढनिश्चय आणि क्षमता आहे, आणि हा शक्तीचा दुसरा आशीर्वाद आहे असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी सांगितले की, भारत हा जागतिक आव्हानांवर उपाय देणारा आशेचा किरण म्हणून उदयास आला आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेतील उच्च विकास आणि चलनवाढीचा कमी दर हा अनोखा मिलाफ त्याची लवचिकता प्रतिबिंबित करतो. त्यांनी आठवण करून दिली की जेव्हा त्यांच्या सरकारला सेवा करण्याची संधी देण्यात आली तेव्हा भारताची गणना 'नाजूक पाच' अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये केली जात होती आणि स्वातंत्र्याच्या वेळी देश सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश होता मात्र नंतर ती अकराव्या क्रमांकावर घसरली होती, परंतु आज भारत तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे.

विज्ञान, अंतराळ, क्रीडा या प्रत्येक क्षेत्रात भारत आत्मविश्वासाने वावरत आहे यावर मोदी यांनी भर दिला. कोविडनंतर जगात अस्थिरता वाढत असताना, एक नवीन जागतिक व्यवस्था उदयास येत आहे आणि निष्पक्ष विश्लेषणातून भारताकडे कल असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यांनी भर देत सांगितले की भारत अनेक राष्ट्रांचा विश्वासू भागीदार आणि मित्र बनला आहे, जागतिक कल्याणासाठी खांद्याला खांदा लावून योगदान देत आहे. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की भारत आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर ग्लोबल साऊथचा बुलंद आवाज बनला आहे आणि प्रमुख देशांसोबत "भविष्यासाठी सज्ज व्यापार करार" करत आहे. त्यांनी नमूद केले की अलीकडेच नऊ महत्त्वपूर्ण व्यापार करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे, ज्यामध्ये 27 देशांचा समावेश असलेल्या युरोपियन युनियनसोबत "सर्व करारांची जननी" असा मदर ऑफ ऑल डील्स समाविष्ट आहे. त्यांनी यापूर्वीच्या सरकारांवर टीका केली. त्यांनी भारताला अशा स्थितीत सोडले जिथे कोणताही देश व्यापार करार करण्यास तयार नव्हता, त्याउलट सध्याची  परिस्थिती आहे जिथे विकसित राष्ट्रे भारतासोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहेत.

गुजरातमधील आपल्या अनुभवाची आठवण करून देताना मोदी म्हणाले की, व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेत जपान भागीदार देश होता आणि आज भारत एक राष्ट्र म्हणून अशीच ताकद दाखवत आहे. जेव्हा तुमच्याकडे आर्थिक शक्ती असते, नागरिकांमध्ये ऊर्जा आणि मजबूत उत्पादन परिसंस्था असते तेव्हाच हे शक्य होते यावर त्यांनी भर दिला. या प्राधान्यांकडे दुर्लक्ष करून मतपेढीचे राजकारण करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली आणि विरोधी सरकारांमध्ये दूरदृष्टी, इच्छाशक्ती आणि कल्पनांचा अभाव होता ज्यामुळे देशाला नुकसान सहन करावे लागले असे नमूद केले.

सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मोदी यांनी जनतेप्रति कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या सरकारची बरीचशी ऊर्जा भूतकाळातील चुका दुरुस्त करण्यात आणि भारताची जागतिक प्रतिमा सुधारण्यात गेली आहे हे त्यांनी नमूद केले. मात्र आता  भारत धोरणाच्या आधारे चालत आहे, तदर्थवादाने नाही आणि "रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म" या मंत्राने देशाला "रिफॉर्म एक्सप्रेस" वर स्वार केले आहे. उत्पादन क्षेत्र मजबूत करणे, उद्योजकांना सक्षम करणे आणि मूल्यवर्धन सुनिश्चित करणे या उद्देशाने संरचनात्मक, प्रक्रिया आणि धोरणात्मक सुधारणांचा त्यांनी विस्तृत आढावा घेतला आणि घोषित केले की भारत आता जगाशी स्पर्धा करण्यास पूर्णपणे तयार आहे.

जागतिक सीईओ मंच आता भारतीय उद्योजकांकडे समानतेने पाहतात हे अधोरेखित करून मोदी म्हणाले की, सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीमंडळांनीही परदेशात ही समानता अनुभवली आहे आणि ते अभिमानाने परतले आहेत. त्यांनी दीर्घकालीन आर्थिक शक्ती प्रदान करणाऱ्या भारताच्या एमएसएमई नेटवर्कच्या ताकदीवर भर दिला आणि नमूद केले की विमानांचे अनेक घटक भारतातील लहान एमएसएमईद्वारे तयार केले जातात, ज्यामुळे जागतिक विश्वास निर्माण होतो. त्यांनी सांगितले की या प्रयत्नांचे परिणाम सर्वांसमोर आहेत, प्रमुख राष्ट्रे भारतासोबत व्यापार संबंध निर्माण करण्यास उत्सुक आहेत. त्यांनी युरोपियन युनियन व्यापार करार आणि अमेरिकेसोबतच्या अलीकडील कराराकडे लक्ष वेधले, ज्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात कौतुक झाले आहे. ते म्हणाले की युरोपियन युनियन कराराने जगाला जागतिक स्थिरतेवर विश्वास दिला आणि अमेरिकेच्या कराराने गतीची भावना बळकट केली, हे दोन्ही जगासाठी शुभ संकेत आहेत .

पंतप्रधान मोदी म्हणाले की, सध्याच्या संधींचा सर्वात मोठा फायदा भारतातील तरुणांना होईल. ते म्हणाले की मी जेव्हा तरुणांना असे म्हणतो तेव्हा त्यात मध्यमवर्गीय तरुण, शहरी तरुण, ग्रामीण तरुण, मुले आणि मुली यांचा समावेश असतो आणि त्याकडे तुकड्यांमध्ये पाहिले जाऊ नये.

आता देशातील युवा शक्तीसाठी जागतिक बाजारपेठ खुली झाली असून सर्वत्र संधी उपलब्ध आहेत, त्यामुळे देशाने आपल्या युवाशक्तीचा अभिमान बाळगायला हवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. मी तरुणांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे, त्यांनी धैर्याने पुढे जावे, आता संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे आणि जग त्यांच्या योगदानाची वाट पाहत आहे, अशा शब्दांत त्यांनी युवा वर्गाला प्रोत्साहन दिले. परदेशात भारतीय व्यावसायिक तज्ञांसाठीची मागणी वाढत असून, पात्र युवा प्रतिनिधींच्या भरतीसाठी अनेक कंपन्यांनी भारतात विशेष कार्यालये सुरू केली आहेत, हे जगभरात भारतीयांसाठी खुल्या होत असलेल्या संधींचेच द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यसभा हे राज्यांचे प्रतिनिधित्व करते, मात्र इथे होणाऱ्या चर्चेची गुणवत्ता अधिक चांगली असायला हवी, विशेषतः जे दशकानुशतके सत्तेत होते त्यांनी ही संधी गमावली, त्यामुळे देश त्यांच्यावर विश्वास कसा ठेवणार, असा प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थित केला. स्वतःला राजा म्हणवून घेणारी व्यक्ती जेव्हा आर्थिक समानतेवर भाष्य करते, तेव्हा अशा प्रकारचा विरोधाभास देशाला पहावा लागतो असे ते म्हणाले. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असून, त्यांच्या कारभारामुळे सर्वच निकषांवर अधोगतीचे नवे विक्रम प्रस्थापित झाले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. अनधिकृत घुसखोरांचे समर्थन करणे हा भारतीय युवा वर्गाचे हक्क, उपजीविका आणि आदिवासींच्या जमिनींवरील गदा आणण्याचा प्रयत्न आहे. घुसखोरांना वाचवण्यासाठी न्यायालयावर दबाव आणणारे लोक देशातील युवा वर्गाशी प्रतारणा करत आहेत, त्यांच्या या कृत्याला कधीही माफ केले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

ज्यांची सरकारे भ्रष्टाचार आणि अत्याचारात बुडाली आहेत, त्यांचे राजवाडे आता द्वेषाचे प्रतीक बनले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. विरोधी पक्षांनी केंद्रात आणि राज्यांत दशकानुशतके सत्ता उपभोगली असली तरी त्यांची ओळख केवळ भ्रष्टाचारी आणि अपयशी प्रशासन म्हणूनच उरली आहे, असे ते म्हणाले. पूर्वीच्या सरकारांचा भर नागरिकांचे जीवन सुधारण्यावर नसून स्वतःचे खिसे भरण्यावर होता, म्हणून त्या काळात केवळ घोटाळ्यांची आणि बोफोर्स सारख्या व्यवहारांची चर्चा व्हायची, हे कारण होते, असे ते म्हणाले.

आपल्या भाषणात पंतप्रधानांनी बँकिंग क्षेत्राचा दाखला दिला. हे क्षेत्र अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असल्याचे सांगितले. 2014 पूर्वी फोन बँकिंगचे युग होते, त्यावेळी नेत्यांच्या एका फोनवर करोडो रुपयांचे वाटप केले जायचे, मात्र गरिबांसाठी बँकांचे दरवाजे उघडले जात नसत, असे ते म्हणाले. त्यावेळी निम्म्याहून अधिक लोकसंख्येने कधीही बँकेचे दारही पाहिले नव्हता, तर सत्ताधारी आपल्या साथीदारांना अब्जावधी रुपये वाटत होते. मागील सरकारांच्या काळात आणि आता विरोधी आघाडीच्या सत्ता असलेल्या राज्यांमध्ये बँकिंग व्यवस्था कोलमडण्याच्या स्थितीत होती, असे ते म्हणाले. जेव्हा मी पहिल्यांदा पंतप्रधान झालो, तेव्हा एका परदेशी नेत्याने मला भारतीय बँकिंग व्यवस्थेचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला होता, यावरून तत्कालीन परिस्थितीची भीषणता लक्षात येते, असे त्यांनी सांगितले. यापूर्वीच्या मागील सरकारांनी अनुत्पादित मालमत्तेचे (एनपीए) डोंगर उभे केले होते, त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणतीही ठोस पावलेही उचलली गेली नाहीत, असे त्यांनी नमूद केले.

बँकिंग क्षेत्रात धाडसी सुधारणा करणे हे एक मोठे आव्हान होते, मात्र सरकारने सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन अत्यंत शहाणपणाने काम केले. बँकिंग सुधारणांच्या प्रक्रियेत कमकुवत बँकांचे सक्षम बँकांमध्ये विलीनीकरण करण्यात आले असे त्यांनी सांगितले. जर मोदी सरकार हे साध्य करू शकले, तर ती भारतासाठी एक मोठी सुधारणा ठरेल असे एका विचारवंताने लिहीले होते असे ते म्हणाले. मात्र आपण  सत्तेवर आल्यावर लगेचच ही बाब पूर्णत्वाला नेली, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. बँकांची क्षीण झालेली पूर्वीची स्थिती सुधारली त्यामुळे आता त्या वेगाने प्रगती करत आहेत, असे त्यांनी सांगितले. बँकांच्या सुधारलेल्या स्थितीमुळे व्यवहार वाढले आणि सामान्य नागरिकांना तसेच गरिबांना कर्ज उपलब्ध झाले. मुद्रा योजनेच्या माध्यमातून युवा वर्गाला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विनाहमी तत्वावर 30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज दिले असून, यात महिला लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे, असे त्यांनी सांगितले. 10 कोटी महिलांना बचत गटांच्या माध्यमातून थेट आर्थिक मदत मिळत असून ग्रामीण महिला आता मोठी स्वप्ने पाहू लागल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. 2014 पूर्वी प्रचंड वाढलेली अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) आता एक टक्क्याच्या खाली आली आहे, बँका अभूतपूर्व नफा नोंदवू लागल्या आहेत, यामुळे एकूण अर्थव्यवस्था मजबूत होऊ लागली आहे, असे ते म्हणाले.

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांबद्दलही त्यांनी सांगितले. एकेकाळी या संस्था बंद पडणार असे मानले जात होते, मात्र आम्ही ती मानसिकता बदलली. एलआयसी, एसबीआयआणि एचएएल यांसारख्या संस्थांची पूर्वीच्या सरकारांनी दुरवस्था केली होती, परंतु आपल्या नेतृत्वातील सरकारने धाडसी सुधारणा लागू केल्या. आज एलआयसी सर्वोत्तम कामगिरी करत आहे आणि एकेकाळी बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या सार्वजनिक संस्था आता विक्रमी नफा मिळवत आहेत. हे उपक्रम आता मेक इन इंडियाला गती देत असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करत आहेत. भारतीय सार्वजनिक उपक्रम आता जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करत असून अनेक देशांच्या विकासाच्या वाटचालीत सहभागी होत आहेत, ही भारताच्या प्रगतीची मोठी झेप आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांनाही धोका देणाऱ्या विरोधकांवर टीका करत सांगितलं की दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेले 10 कोटी छोटे शेतकरी दुर्लक्षित राहिले. त्यांनी म्हटलं की काही मोठ्या शेतकऱ्यांना हाताळलं की संपूर्ण व्यवस्था चालते, असा विरोधकांचा समज होता आणि लहान शेतकऱ्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की त्यांच्या सरकारला लहान शेतकऱ्यांचं दु:ख समजतं आणि जमिनीवरील वास्तव लक्षात घेऊन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. अल्पावधीतच 4 लाख कोटी रुपये थेट लहान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून त्यामुळे त्यांना नवी ताकद मिळाली आणि मोठी स्वप्नं पाहायची हिंमत निर्माण झाली. शेतकरी भारताच्या आकांक्षांनुसार निकाल देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अंमलबजावणीबाबत टीका होत असताना पंतप्रधान म्हणाले की काही सदस्य आधीच तक्रारी करायच्या ठरवूनच येतात आणि त्यामुळे त्यांची आघाडी स्पष्ट होते. त्यांनी एक प्रसंग सांगत स्पष्ट केलं की ते केवळ  तथ्य मांडत होते. नरेंद्र मोदी यांनी आठवण करून दिली की विरोधी पक्षातील एक वरिष्ठ नेत्या आणि माजी पंतप्रधान यांनी स्वतः कबूल केलं होतं की नियोजन आयोगाशी त्यांना झगडावं लागायचं, कारण तो डोंगराळ भागांसाठी वेगळ्या योजना करायला तयार नव्हता. कामकाजाची ही चुकीची संस्कृती मान्य करूनही काहीच सुधारणा झाली नाही, असं त्यांनी सांगितलं. नियोजन आयोग अनेक दशकं निष्क्रियपणे चालू राहिला आणि 2014 पर्यंत लोक त्रस्त राहिले, असंही त्यांनी म्हटलं. सत्ता आल्यानंतर आपल्या सरकारनं नियोजन आयोग रद्द करून नीति आयोग स्थापन केला आणि तो आता वेगानं काम करतोय, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. आकांक्षीत  जिल्ह्यांच्या यशाबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की जागतिक संस्था त्याला विकसनशील देशांसाठी विकासाचं मॉडेल मान्य करतायत. जे जिल्हे आधी मागास आणि दुर्लक्षित होते ते आता बदल अनुभवतायत. आधी अशा जिल्ह्यांत अधिकाऱ्यांना शिक्षा म्हणून पाठवलं जायचं, त्यामुळे परिस्थिती अजून बिघडायची, अशी टीकाही त्यांनी केली. आपल्या सरकारनं ही पद्धत बदलून तरुण आणि कुशल अधिकाऱ्यांना तीन वर्षांसाठी नेमलं आणि ठोस निर्णय घेतले, असं त्यांनी सांगितलं. छत्तीसगडमधील बस्तरचं उदाहरण देत त्यांनी सांगितलं की तो आधी आकांक्षी जिल्हा होता, पण आज बस्तर ऑलिम्पिकमुळे देशभर ओळखला जातोय. ज्या गावांत पहिल्यांदाच बस पोहोचली, तिथे लोकांनी त्याचा उत्सव साजरा केला. हा बदल देशाच्या नव्या दिशेचं प्रतीक आहे, असं त्यांनी म्हटलं.

नरेंद्र मोदी म्हणाले की आकांक्षीत  जिल्हे म्हणजे खरी अंमलबजावणी काय असते याचं जिवंत उदाहरण आहे. अशी शेकडो उदाहरणं असली तरी त्यांनी हे खास सांगितलं. विरोधी नेते अजूनही जुन्या नियोजन आयोगाच्या जीप आणि खेचरांच्या काळात अडकलेत आणि अंमलबजावणीतून झालेला बदल त्यांना दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. त्यांनी सांगितलं की त्यांच्या जन्मापूर्वीच सरदार वल्लभभाई पटेल यांनी नर्मदा नदीवर धरणाची कल्पना मांडली होती, जवाहरलाल नेहरू यांनी पायाभरणी केली, पण उद्घाटन त्यांच्या पंतप्रधानपदात झालं- हेच आधीच्या सरकारांच्या अपयशी अंमलबजावणीचं उदाहरण आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना सरदार सरोवर धरणासाठी शेतकऱ्यांच्या बाजूने तीन दिवस उपोषण केलं आणि केंद्र सरकारला कारवाई करायला भाग पाडलं, असंही त्यांनी सांगितलं. आज कच्छमधल्या खवडापर्यंत, जिथे बीएसएफ जवान तैनात आहेत, तिथपर्यंत नर्मदेचं शुद्ध पाणी पोहोचतंय, याचा त्यांनी अभिमान व्यक्त केला.

विरोधक फक्त राजकीय फायद्यासाठी प्रकल्प जाहीर करतात, दिवे लावतात, पायाभरणी करतात आणि मग काहीच करत नाहीत, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली. ही कामकाजाची संस्कृती बदलण्यासाठी त्यांनी प्रगती  PRAGATI, नावाचा  तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म सुरू केला , ज्यातून रखडलेल्या  प्रकल्पांचा आढावा घेतला जातो . संसदेत जाहीर झालेल्या हिमाचल प्रदेशातील  एका रेल्वे लाईनचं उदाहरण देत त्यांनी सांगितलं की त्यांच्या येण्यापूर्वी त्या प्रकल्पाचे रेखाचित्रही तयार नव्हते , पण निवडणुकीसाठी घोषणा करण्यात आली होती. प्रगती मंचाद्वारे यासाठी कोणते विभाग जबाबदार आहेत, राज्यांना काय अडचणी आहेत, खर्च 900 कोटी रुपये पासून 90,000 कोटी रुपये कसा वाढला हे सगळं तपासलं गेलं, असे  त्यांनी सांगितले . दर महिन्याला स्वतः या प्रकल्पांचा आढावा घेऊन 50 बैठक घेतल्या आणि राज्यांना सहभागी करून काम पुढे नेले , असे  त्यांनी म्हटले . या सगळ्या देखरेखीमुळे 85 लाख कोटी रुपये किमतीचे प्रकल्प मार्गी लागले, म्हणजे खरी अंमलबजावणी काय असते ते दिसले , असे  त्यांनी सांगितले . रेल्वे, रस्ते, सिंचन आणि ग्रामीण पायाभूत सुविधा सगळ्यांवर याचा फायदा झाला, असे ही त्यांनी जोडून सांगितले .

जम्मू–उधमपूर–श्रीनगर–बारामुल्ला रेल्वे मार्गाचं उदाहरण देत त्यांनी सांगितले  की हा प्रकल्प तीन दशके , म्हणजे दोन पिढ्यांपर्यंत रखडला होता, पण त्यांच्या सरकारने  तो पूर्ण केला. हिमाच्छादित प्रदेशातून धावणारी वंदे भारत ट्रेन दाखवणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. लोक म्हणत होते तो परदेशासारखा दिसतो, पण तो भारत आहे — हेच अंमलबजावणीचं सामर्थ्य आहे, असे  त्यांनी सांगितले.

त्यानंतर त्यांनी आसामचा उल्लेख करत बोगीबील पूलाचे  उदाहरण दिले . अरुणाचल प्रदेश आणि आसामला जोडणारा हा पूल वर्षानुवर्षं रखडला होता. प्रगती अंतर्गत त्याचा आढावा घेऊन त्यांच्या सरकारनं तो पूर्ण केला आणि त्यामुळे आसामसह संपूर्ण ईशान्य भारताला मोठा फायदा झाला, असे  नरेंद्र मोदी यांनी सांगितले .

केंद्र सरकार प्रकल्प केवळ वेळेवर पूर्ण करत नाही तर कित्येकदा मुदतीआधीच पूर्ण करते, असे पंतप्रधान म्हणाले. भारताने 2030 काही विशिष्ट सौर उद्दिष्टे पूर्ण करण्याची वचनबद्धता आखली होती मात्र ते 2025 पूर्वीच साध्य केली आहेत. त्याचप्रमाणे इथेनॉल संबंधातील उद्दिष्टे दोन ते तीन वर्षे आधीच पूर्ण झाली आहेत, असे ते म्हणाले. यावरूनच आपल्या सरकारचे  अंमलबजावणी संदर्भातील सामर्थ्य दिसून येते जे आश्वासनांच्या पलीकडे जाऊन काळाच्या खूप आधी ती पूर्ण देखील करते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आव्हाने आणि त्यावरील उपाय यांच्याकडे बघण्याचा आपल्या पक्षाचा दृष्टिकोन विरोधकांच्या दृष्टिकोनापेक्षा मूलतःच वेगळा आहे, असे सांगून तो आकाश आणि पृथ्वी यांच्यातील विरोधाभासा समान असल्याचे पंतप्रधान म्हणाले. देशातले एकशे चाळीस कोटी नागरिक या आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी सक्षम आहेत अशी केंद्रसरकारची विचारसरणी असून लोकांमधील हा विश्वास लोकशाहीवरील विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले. याच्या उलट, विरोधकांना नागरिक हेच एक मोठी समस्या वाटतात. यासंदर्भात  त्यांनी भूतकाळातील एक उदाहरण दिले जेव्हा नागरिकांकडे एक समस्या म्हणून बघितले जात असे मात्र आपल्या सरकारची ही ठाम धारणा आहे की भारतातील लोकांकडूनच 140 कोटी उत्तरे मिळतील. आपल्या सरकारसाठी नागरिक हे आधारभूत भांडवल आहेत, भारताच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार आणि चालक आहेत आणि त्यांना समस्या मानले जाऊ शकत नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. 

नागरिकांचा अपमान करणे हे विरोधकांच्या प्रवृत्ती आणि संस्कृतीमध्ये भिनले आहे, असे ते म्हणाले. विरोधकांनी अलीकडेच राष्ट्रपतींचा अपमान केला आणि निवडणुकीनंतर त्यांनी वापरलेले शब्द लज्जास्पद आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. अगदी लोकसभेत देखील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा होऊ शकली नाही हा सर्वोच्च संवैधानिक सभागृहाचा मोठा अपमान आहे. जेव्हा एखाद्या गरीब, आदिवासी कुटुंबातील स्त्री देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदावर विराजमान होते तेव्हा त्यांचा अपमान हा केवळ त्यांचा अपमान नसतो तर संपूर्ण आदिवासी समाजाचा, समस्त महिलावर्गाचा, संविधानाचा आणि खुद्द राष्ट्राचा अपमान असतो, असे त्यांनी सांगितले. 

पंतप्रधानांनी लोकसभेतील त्या वेदनादायक घटनेची आठवण करून दिली, ज्यावेळी  आसामचे एक सदस्य अध्यक्षस्थानी असताना कागदपत्रे फेकण्यात आली आणि सदस्य टेबलांवर चढले. हा ईशान्य भारताचा आणि तेथील नागरिकांचा अपमान नाही का? असा प्रश्न पंतप्रधानांनी विचारला. ज्यावेळी आंध्र प्रदेशातील दलित कुटुंबातील सुपुत्र अध्यक्षस्थानी होते तेव्हा त्यांचा देखील अपमान करण्यात आला यातून विरोधकांचा अल्पसंख्याक समुदायांबद्दल तिरस्कार दिसून येतो.  विरोधकांच्या मनात आसामच्या लोकांबद्दल द्वेष असल्याचे दिसते, कारण त्यांना त्या लोकांकडून विश्वासघात झाल्यासारखे वाटत आहे असे सांगून त्यांनी त्यांनी भारतरत्न भूपेन हजारिका यांच्याबद्दलच्या अपार आदराची आठवण करून दिली. हजारिका यांनी आपला आवाज आणि अभिव्यक्तीने देशाला एकत्र आणले,   सरकारने त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले, असे पंतप्रधान म्हणाले. विरोधकांनी याला विरोध केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची टीका केली आणि हा आसामचा आणि देशभरातील संपूर्ण कलारसिकांचा आणि हजारिका यांच्या वारशाचा अपमान असल्याचे सांगितले.

विरोधीपक्ष नेत्यांनी संसदेतील शीख  सदस्याला गद्दार असे संबोधल्याच्या घटनेचा पंतप्रधानांनी निषेध केला आणि यामुळे उद्वेग शिगेला पोहोचला आहे, असे ते म्हणाले. कित्येक नेत्यांनी विरोधी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे, मात्र शीख समुदायातील सदस्याव्यतिरिक्त कोणाचीही संभावना गद्दार अशी झाली नाही, जो शीख समुदायाचा आणि त्यांच्या गुरूंचा अपमान असल्याचे पंतप्रधान म्हणाले. विरोधी पक्षनेत्यांच्या या उद्गारांमुळे त्यांच्या मनात खोलवर रुजलेली शीख समुदायाबद्दलची द्वेषाची भावना दिसून येते असे ते म्हणाले. एका नागरिकाला गद्दार म्हणणे हे अमान्य आहे, विशेषतः एका अशा कुटुंबातील व्यक्तीला ज्यांनी आपले आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित केले आहे.

पंतप्रधानांनी याची तुलना सदानंदन मास्टर यांच्या मोठेपणाशी केली, ज्यांनी राजकीय सूडबुद्धीमुळे दोन्ही पाय गमावले असले तरी ते नम्रतेने आणि कटुतेशिवाय देशाची सेवा करत आहेत. सदानंदन जी यांनी त्यांच्या पहिल्या भाषणात सभागृहात त्यांचे कृत्रिम अवयव ठेवले तो क्षण त्यांनी अत्यंत वेदनादायक पण देशासाठी प्रेरणादायी असल्याचे वर्णन केले. समाजात आदरणीय असलेल्या तरुण शिक्षकाविरुद्ध अशा हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्या विरोधी आघाडीचा पंतप्रधानांनी निषेध केला. क्रूर हल्ल्यानंतरही सेवेचे व्रत सुरू ठेवल्याबद्दल आणि धोरणनिर्मितीत योगदान दिल्याबद्दल त्यांनी सदानंदन मास्टर यांचे कौतुक केले आणि ही अभिमानाची बाब  आहे, असे सांगितले. अशा व्यक्तींमध्ये त्याग आणि सेवेची भावना असते आणि त्यांच्यासारख्या असंख्य कामगारांच्या समर्पणामुळेच देशाला भारताच्या प्रगतीसाठी जगण्याची आणि काम करण्याची प्रेरणा मिळते, असे ते म्हणाले.

 कोणत्याही जबाबदाऱ्या दिल्या तरी, त्यांनी राष्ट्रासाठी कसे जगावे याचे ज्ञान घेतले आहे आणि विकसित भारताचा पाया मजबूत करण्यासाठी ते काम करत आहेत, तसेच तरुणांसाठी भक्कम आधार तयार करत आहेत. विरोधकांना कोणताही पश्चात्ताप नाही  भर देत पंतप्रधान म्हणाले की पंतप्रधान राज्यसभेत रडल्याचा दावाही त्यांनी केला, ज्यामुळे ते ज्या प्रकारच्या मूल्यांसह आणि प्रवृत्तींसह वाढले आहेत ते दिसून येते. 2002 पासून, विरोधी पक्षात असो किंवा 2004 पासून सत्तेत असो, आणि 2014 मध्ये संसदेत प्रवेश केल्यापासून, 25  वर्षांत एकही अधिवेशन विरोधकांनी त्यांना शिवीगाळ केल्याशिवाय गेले नाही याची आठवण त्यांनी करून दिली.

आमच्या सरकारने कलम 370 रद्द केले, ईशान्येकडे शांतता प्रस्थापित केली आणि विकास घडवला, पाकिस्तानी दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून प्रत्युत्तर दिले, ऑपरेशन सिंदूर राबवले, माओवादी दहशतवादापासून देशाला मुक्त करण्यासाठी धाडसी पावले उचलली आणि तत्कालीन पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेल्या अन्याय्य सिंधू पाणी कराराचे पालन केले, असे पंतप्रधानांनी नमूद केले.ते या पदावर कसे पोहोचले हे स्वीकारण्याची असमर्थतता आणि त्यांच्या सततच्या उपस्थितीमुळे वाढती निराशा ही विरोधकांची खरी समस्या आहे हे  मोदींनी अधोरेखित केले.पंतप्रधानपदाची खुर्ची हा त्यांचा कौटुंबिक वारसा आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असे गृहीत धरून विरोधी पक्ष लोकशाही आणि संविधानाला काही अर्थ नाही असे मानतात, अशीही टिप्पणी त्यांनी  केली.

देशाने विरोधकांना अनेक दशकानुदशके संधी दिली आहे, लोक त्यांचे भविष्यही त्यासाठी पणाला लावत होते, परंतु त्यांनी गरिबी हटावच्या घोषणा देऊन देशाची दिशाभूलच केली, यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला. विरोधी पक्षाच्या प्रत्येक पंतप्रधानाने लाल किल्ल्यावरून गरिबी हटावची भाषा केली, पण  कोणीही ठोस कृती सादर केली नाही, कारण त्यांच्या सर्व घोषणा पोकळच होत्या.गरिबांना सक्षम बनवण्याचा मार्ग मी निवडला, यावर मोदी यांनी भर दिला, सरकारी योजना समजून घेतल्याबद्दल आणि त्यांचा स्वीकार केल्याबद्दल भारतातील गरिबांना त्यांनी सलाम केला आणि त्यांच्या स्वतःच्या क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.सरकारच्या हेतूवर गरिबांनी ठेवलेल्या विश्वासाची त्यांनी प्रशंसा केली आणि 25 कोटी कुटुंबांनी गरिबीवर मात केली आणि निराशेतून बाहेर पडून ते प्रगतीचे भागीदार झाले, असल्याचे नमूद केले. आशेचा शोध घेणाऱ्या आणि देशासोबत चालत जाण्यासाठी सज्ज असलेल्या या 25 कोटी नागरिकांना त्यांनी सलाम केला.

पंतप्रधानांनी आठवण करून दिली की 2014 सालापूर्वी रेल्वे क्रॉसिंगवर शेकडो लोकांचा मृत्यू होत असे, ज्यामध्ये शाळेच्या बसेसची टक्कर होऊन मुलांना आपला जीव गमवावा लागला होता. मानवरहित रेल्वे क्रॉसिंग सुरू करणे हे अशक्य कोटीतील काम नव्हते, तरीही त्यांच्या सरकारने ते सर्व बंद करेपर्यंत कोणीही कारवाई केली नाही, ज्यामुळे असंख्य जीव वाचवता आले.

मोदींनी पुढे सांगितले की 2014 पूर्वी ज्या 18,000 गावांनी कधीही वीज पाहिली नव्हती, बल्ब किंवा लाईट हे शब्द कधीच ऐकले  नव्हते . 2014 मध्ये त्यांच्यावर जबाबदारी सोपवल्यानंतर, त्यांच्या सरकारने त्या गावांमध्ये प्रकाश आणला.

पूर्वी सीमेवरील टंचाईच्या बातम्या वारंवार येत असत - दारूगोळा नाही, बुलेटप्रूफ जॅकेट्स नाहीत, योग्य बूटशिवाय बर्फात उभे असलेले सैनिक,अशा बातम्या येत यांची  पंतप्रधानांनी पुढे आठवण करून दिली. त्यांच्या सरकारने सैनिकांसाठी देशाची तिजोरी खुली केली आहे, त्यांना आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट पुरवण्याचा संकल्प केला आहे, असे  मोदी यांनी स्पष्ट केले.

एन्सेफलायटीसमुळे होणाऱ्या असंख्य मुलांच्या मृत्यूबद्दल बोलत असताना, उत्तर प्रदेशच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांना एकदा संसदेत कसे रडू कोसळले होते, त्याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. पूर्वीच्या सरकारांनी हे संकट दूर करण्यासाठी कधीही  प्रयत्न केला नाही. लोकांची दृष्टी हिरावून घेणारा ट्रॅकोमा हा आजार वैज्ञानिक प्रगती झालेली असूनही  दुर्लक्षित करण्यात आला, असेही त्यांनी सांगितले. संवेदनशीलता, वचनबद्धता आणि समाजासाठी जगण्याचा आणि त्याग करण्याचा संकल्प दर्शवत,त्यांच्या सरकारने देशाला एन्सेफलायटीस पासून मुक्त केले आणि डोळ्यांना ट्रॅकोमापासून वाचवले, असे मोदी यांनी अधोरेखित केले. हे समर्पण, लोकांसाठी केलेले हे सततचे कष्ट त्यांच्या विरोधकांना अस्वस्थ करतात,असे ते म्हणाले. 

पूर्वीची सरकारे रिमोट कंट्रोलने चालवली जात असत, तर त्यांचे सरकारही रिमोटने चालवले जाते - परंतु ते रिमोट म्हणजे भारतातील 140 कोटी नागरिक!त्यांची स्वप्ने, आकांक्षा आणि तरुणांचा हा संकल्प आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. सत्ता हा आनंदाचा मार्ग नसून सेवेचे माध्यम आहे यावर त्यांनी भर दिला. त्यांनी मुद्रा योजनेचा उल्लेख केला, ज्याने लाखो लोकांना स्वयंरोजगाराद्वारे सक्षम केले. विरोधकांनी कधीही स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन दिले नाही, त्यांना काही शेकडो स्टार्टअप्स सुरू आहेत याची जाणीवच नव्हती, तर मोदी सरकारने 2 लाखांहून अधिक स्टार्टअप्सचा समर्थन दिले आहे. यशाने लोकांची मने जिंकली जातात असे त्यांनी नमूद केले. एकेकाळी बीएसएनएलची थट्टा केली जात होती, परंतु त्यांच्या सरकारच्या काळात स्वदेशी 4जी स्टॅकची स्थापना झाली आणि भारताने जागतिक स्तरावर सर्वात जलद गतीने 5जी आणले, ज्यामुळे संप्रेषण तंत्रज्ञान आणि नवोपक्रमात प्रगती झाली,त्या दिवसांची मोदींनी आठवण करून दिली

गरिबांची सेवा करणे हे आपले भाग्य आहे असे पंतप्रधान म्हणाले. 4 कोटी गरीब कुटुंबांना पक्की घरे, वीज, पाणी, गॅस सिलिंडर आणि शौचालये उपलब्ध   झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण महिला अभिमानाने स्वतःला "लखपती दीदी" घोषित करतात आणि आता करोडपती बनण्याच्या आकांक्षा ठेवतात, अशा परिवर्तनावर त्यांनी प्रकाश टाकला. हे कोट्यवधी नागरिकांच्या आशीर्वादाने आणि माता आणि भगिनींच्या संरक्षणात्मक कवचाने शक्य झाले आहे, असे त्यांनी हे अधोरेखित केले. ज्या माता आणि भगिनींची कोणीही काळजी घेत नाही मोदी त्यांची पूजा करतात; त्यांच्याबद्दलचा  आदर हेच विरोधकांचे त्रास देण्याचे कारण आहे यावर त्यांनी भर दिला.

चोरी हा त्यांचा वंशपरंपरागत व्यवसाय आहे, अगदी -महात्मा गांधी हे गुजराती आडनावही चोरले आहे,अशी टीका  मोदींनी विरोधकांवर केली. की त्यांनी असे म्हटले की भारतातील लोक अशा फसवणुकीवर जोरदार प्रहार करण्याइतके  पुरेसे शहाणे आहेत. त्यांचे सरकार विकसित भारताचे स्वप्न घेऊन चालले आहे, ज्याचे रुपांतर आता लोकांच्या उर्जेने प्रेरित राष्ट्रीय संकल्पात  झाले आहे, यावर त्यांनी भर दिला.

2047 च्या दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काही सदस्यांच्या निराशावादी दृष्टिकोनाबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि त्यांना आठवण करून दिली की स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांच्या आयुष्यात स्वातंत्र्य येईल का नाही हे न कळताच आपले बलिदान दिले‌ होते .

अशा दूरदृष्टी आणि त्यागाशिवाय भारताला कधीही स्वातंत्र्य मिळाले नसते, असा युक्तिवाद त्यांनी केला. 

पंतप्रधानांनी आठवण करून दिली की संशयी  लोक डिजिटल इंडिया, फिनटेक आणि यूपीआयची कशी थट्टा करत होते आणि असा दावा करत होते, की गरीब लोक कधीही मोबाईल फोनवर व्यवहार करू शकणार नाहीत. तीन वर्षांत भारताने त्यांना चुकीचे असल्याचे सिद्ध केले आणि त्यांनी नमूद केले की खरे उत्तर लोकांच्या हातात असलेल्या मोबाईल फोनमध्ये आहे, भाषणांमध्ये नाही. त्यांनी निदर्शनास आणून दिले की विरोधी पक्षाच्या काळात, "भारताने बस चुकवली (भारताची संधी हुकली)" हा वाक्यांश सर्वसामान्य होता, जो गमावलेल्या संधींचे प्रतीक होता. आज,भारत कोणतीही बस चुकवत नाही (संधी गमावत नाही)परंतु आता तो आघाडीवरच राहील, असे त्यांनी जाहीर केले. 

उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी वर्तमानात सतत उज्ज्वल काम करणे आवश्यक आहे, यावर  मोदींनी भर दिला.पंतप्रधानांनी स्पष्ट केले की त्यांचे सरकार पाच वर्षांच्या चक्रीय योजना आखते, वार्षिक अर्थसंकल्प तयार करते आणि निवडणुकीतील लाभांसाठी नाही तर 2047 पर्यंत विकसित भारताच्या ध्येयासाठी निश्चित दिशा ठरवते. निवडणुका येतील आणि जातील, परंतु राष्ट्र शाश्वत आहे आणि त्यांचे ध्येय तरुणांच्या हाती समृद्ध भारत सोपवणे आहे, हे आहे, यावर त्यांनी भर दिला. आजही  जेव्हा ते लहान मुलांना पाहतात तेव्हाही ते त्यांच्या कामात समाधान मिळवण्यासाठी त्यांच्यासाठी एक सामर्थ्यशाली भारत उभा करून ठेवण्याचे स्वप्न पाहतात, असे त्यांनी सांगितले.

भारत अवकाश, विज्ञान, तंत्रज्ञान, महासागर, जमीन, आकाश आणि बाह्य अवकाश या सर्व क्षेत्रात नवीन ऊर्जा आणि कामगिरीसह प्रगती करत आहे, असे  पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्यांनी ग्रीन हायड्रोजन, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि एआय मिशनमधील उपक्रमांचा उल्लेख केला.भारत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो,असा विश्वास आता जगाला वाटतो आहे. भारत महत्त्वपूर्ण खनिजे आणि दुर्मिळ पृथ्वींवर लक्ष केंद्रित करत आहे, जी आता भू-राजकीय शस्त्रे बनले आहेत, जेणेकरून देशाला कधीही इतरांकडे हात पुढे करावा लागू नये,यावर त्यांनी भर दिला. 

जग आता भारताच्या भूमीत आपले भविष्य पाहते, भारताच्या प्रतिभेवर विश्वास ठेवते आणि स्वतःचे उज्ज्वल भविष्य भारताच्या आशादायक मार्गाशी जोडते, त्यामुळे असंख्य प्रकल्प परदेशी गुंतवणूक आकर्षित करत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. की,  भारत विकसित राष्ट्र बनण्याबद्दल का बोलतो हे काहींना समजत नसले तरी, जगाला समजते की भारताने योग्य दिशा निवडली आहे आणि "भारताने बस चुकवली" वरून "आपण भारतात पोहोचण्यास उशीर करू नये" अशी चर्चा जागतिक स्तरावर होत आहे.

येणारा काळ भारतासाठी, विशेषतः तरुणांसाठी, संधींनी भरलेला आहे असे प्रतिपादन मोदी यांनी केले. या शक्यतांचा लाभ घेण्यासाठी धोरणे आखली जात आहेत. त्यांनी नागरिकांना संबोधित करत संसद सदस्यांना त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करण्याचे  आवाहन केले. संधींची उपलब्धता ही तडजोड न करणाऱ्या मानकांवर अवलंबून असते यावर त्यांनी भर दिला. नफा कमी असू शकतो, परंतु नवोपक्रम, संशोधन आणि भौतिक सुधारणांद्वारे गुणवत्तेत सतत सुधारणा झाली पाहिजे, जेणेकरून भारताला जागतिक स्तरावर उत्कृष्टतेसाठी ओळखले जाईल, असे त्यांनी अधोरेखित केले.

त्यांनी नागरिकांना उत्तम दर्जा सुनिश्चित करण्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले आणि जाहीर केले की तरच जग "मेड इन इंडिया, मेड इन भारत" चे गुणगान गाईल.पंतप्रधानांनी विरोधी पक्षातील सहकाऱ्यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.त्यांनी नमूद केले की गेल्या दशकात पाच-सहा वेळा त्यांना बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता.एकदा त्यांनी बोलायला सुरुवात करतात की ते थांबत नाहीत हे त्यांना माहिती होते. त्यांना आता अनुभवातून कळले आहे की अशा प्रयत्नांमुळे कोणताही लाभ होत नाही आणि ही समज वाढत राहावी अशी त्यांची इच्छा आहे, असे त्यांनी म्हटले आहे मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणात योगदान देणाऱ्या सर्व संसद सदस्यांचे मनापासून आभार मानले आणि सांगितले की त्यांनी सामायिक केलेले मौल्यवान विचार देशाच्या प्रगतीला मदत करतील. त्यांनी भाषणाबद्दल माननीय राष्ट्रपतींचे मनापासून आभार मानले.

 

Click here to read full text speech

 

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Cyber crime reports down from 1.2Lin 2024 to 16,377 now: Government

Media Coverage

Cyber crime reports down from 1.2Lin 2024 to 16,377 now: Government
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister marks seven years of the abrogation of Articles 370 and 35(A)
August 05, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, today marked seven years since the historic abrogation of Articles 370 and 35(A), describing 5th August 2019 as a defining milestone in India's journey towards inclusive development.

Shri Modi noted that over the past seven years, the people of Jammu and Kashmir and Ladakh have witnessed wide-ranging transformation across sectors. Infrastructure has expanded significantly, while new opportunities have emerged in education, healthcare, entrepreneurship and sports. "The women and members of marginalised communities, who had been deprived of several constitutional rights for decades, have now been empowered through the full application of the Constitution of India", Shri Modi added.

The Prime Minister observed that this year's anniversary assumes even greater significance as the nation commemorates the 125th birth anniversary of Dr. Syama Prasad Mookerjee. He said that Dr. Mookerjee's lifelong commitment to national unity continues to inspire generations, and that the vision he championed found historic fulfilment on 5th August 2019.

Reaffirming the Government's unwavering commitment to the development of Jammu and Kashmir and Ladakh, the Prime Minister said that every citizen must have the opportunity to dream big, realise their aspirations and contribute to the vision of a Viksit Bharat.

The Prime Minister posted on X:

Seven years ago, on this day, Articles 370 and 35(A) became history, marking a decisive new chapter in the journey of Jammu and Kashmir as well as Ladakh.

Since then, the lives of the people of J&K and Ladakh have witnessed wide-ranging transformation. Infrastructure has expanded, opportunities in areas such as education, healthcare, entrepreneurship and sports have grown. Be it the women or the marginalised communities, those who were denied their basic constitutional rights for decades have been empowered thanks to the full application of the Constitution of India.

5th August this year assumes even greater significance as this is the year our nation commemorates the 125th birth anniversary of Dr. Syama Prasad Mookerjee. His lifelong commitment to national unity continues to inspire generations. What he envisioned decades ago found historic fulfilment on 5th August 2019.

We reaffirm our commitment to the progress of Jammu and Kashmir as well as Ladakh and to ensure that every citizen has the opportunity to dream big, achieve and contribute to the making of a Viksit Bharat.

#Article370Abrogation